गिरनार... श्री दत्तात्रेयांचे अक्षय निवासस्थान :भाग २: सोमनाथ दर्शन*

Submitted by निकु on 3 December, 2019 - 01:23

माझ्याबरोबर शेजारी रहाणाऱ्या काकू व त्यांची बहिण होती.. त्यामुळे अगदी एकटे वाटणार नव्हते. जाताना त्या दोघी माझ्या घरी आल्या व आमचा माझ्या घरून एकत्र प्रवास सुरु झाला..
ओला बुक केली होतीच गाडीत बसल्यावर गेले २/३ दिवसाचा ताण निवळला आणि डोळे पेंगू लागले.. मनोमन कुलदेवतेला, दत्तात्रयांना आणि आई बाबांना नमस्कार केला. त्यांच्या पुण्याईनेच हा दिवस उजाडला होता.. बाबा, माझी आजी, आई आणि आजोळ हे दत्तभक्त. मी त्यांच्यामध्ये नास्तिकच! बाबा आणि आजीला स्वामी समर्थांचे वेड.. त्यांचा स्वामींवर गाढ विश्वास.. बाबांनी अगदी शेवट पर्यंत गुरुवारचे स्वामी दर्शन सोडले नव्हते.. आईने तर सगळे आयुष्यच त्यांच्या भरवश्यावर जगलेले.. माझी धाकटी बहीणही त्यांच्याच पावलावर चालणारी.. मीच कशी काय नास्तिक जन्मले या लोकात देव जाणे.. माझे म्हणणे अगदी स्पष्ट असे की देवाला जर सगळ्यांची काळजी आहे तर त्याला नमस्कार न करता, त्याची पुजा न करता त्याने सर्वांना आनंदी ठेवायला हवे. हा म्हणजे व्यवहारच झाला की तु माझे स्तोत्र म्हण मग मी तुला बळ देतो.. आता जसे वाचन वाढते आहे तसे हळुहळू उमगतंय असं वाटते आहे.. देव म्हणा निसर्ग म्हणा ही एक उर्जा आहे, आणि तिची शक्ती जर तुम्हाला मिळवायची असेल तर तिच्याशी संधान हवे. जसे इलेक्ट्रीसिटी घराबाहेर पोलवर वाहते आहे, पण घरात दिवा लावण्यासाठी, पंखा लावण्यासाठी, एसी ला वेगवेगळ्या पॉवरची बटणे, वायर टाकून ती घरात आणावी लागते. तिचे बटण गरज असताना दाबावे लागते तेंव्हा दिवा लागतो.. देवाचंही तसंच काहीसं असावं!

असो..तर आम्ही अगदी वेळेत गाडी सुटायच्या तासभर आधी स्टेशनवर पोचलो. गाडी फलाटावर लागली होती आणि बरीचशी लोकं गाडीत आपापल्या जागेवर गेलेली होती. जी थोडीफार मंडळी फलाटावर होती त्यांना भेटलो आणि आमच्या जागा जाणून घेऊन स्थानापन्न झालो.. गाडी अगदी वेळेवर सुटली आम्ही राजकोटच्या दिशेने निघालो. आजुबाजुला पाहीले तर सगळीच मंडळी गिरनारला निघालेली.. हळुहळू असे जाणवले की सारा डबाच गिरनारयात्रींनी भरलाय.. प्रत्येक ग्रुपच्या सहकाऱ्यांची वेगवेगळ्या डब्यांत वाटणी झालेली त्यामुळे बराच वेळ लोक या डब्यांतुन त्या डब्यात करत होती.
अखेर सगळे स्थिरस्थावर झाले, रात्री आम्हाला पॅक फूड देण्यात आले, मस्त पोळी भाजी, मसाले भात होता.. आम्ही जेवून झोपेची आराधना करू लागलो.. काही लोकांना ५ वाजता अलिकडच्या स्टेशनावर उतरायचे असल्याने दिवे बंद करून मंडळी ढाराढूर झोपली.

मला मात्र काही केल्या झोप येईना एक तर सर्वात वरचा बर्थ होता त्यामुळे सतत पडण्याची भीती. शेजारी एक लहान मुलगी होती एकदम चुणचुणीत, ती सर्वांना बालसुलभ विनोद सांगत होती, अखंड बडबड चाललेली. तिच्या निरागस गप्पा ऐकीत झोपेच्या आधीन झाले.. सकाळी ६लाच जाग आली, म्हणजे रात्रभर गाढ झोप नव्हतीच पण आता डुलकीही येईना तेव्हा उठून बसले.. थोड्याच वेळात बाकीची मंडळी उठली. गाडी बरोब्बर वेळेत राजकोटला पोचली. आयोजकांनी बस तयार ठेवली होती, मधे आंघोळीसाठी थांबून सोमनाथकडे प्रयाण केले.

सोमनाथची २ मंदिरे आहेत, एक नवे जिथे पाताळात खाली महादेव स्थापिले आहेत व त्यावरच्या मजल्यावरपण एक पिंड. पुर्वी हिंदूमंदिरे आक्रमणांपासून वाचविण्यासाठी ही व्यवस्था.

बऱ्याच लोकांना जुने मंदिर माहीत नसते ते फक्त नवीन मंदिरच पहातात. दोन्ही मंदिरे एकदम जवळ जवळ आहेत. हे मंदिर अनेकवेळा पाडले गेले व पुन:पुन्हा उभे केले गेले असे म्हणतात. अतिशय सुंदर बांधकाम, शंकराची पिंडही मोठ्ठी आहे. १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक. मी मंदिरात शिरले तेंव्हा प्रदोषाची सायंकाळची पुजा चालु होती. विविधरंगी, विविधसुगंधी फुले इतक्या आकर्षकपणे मांडली होती की पहात रहावे. मंत्रांचा धीरगंभीर आवाज गाभाऱ्यात घुमत होता.. एक प्रसंन्नता मंदिर वेढून राहीली होती. मनात शंकराचार्यांचे आत्मषटक घोळत होते - चिदानंदरुपम् शिवोहं शिवोहं !

चंद्राने दक्षाच्या शापातून मुक्त झाल्यावर येथे शिवलिंगाची स्थापना केली असे पौराणिक कथा सांगतात तर मंदिराचा उल्लेख अगदि इ.स. पुर्वीपासून इतिहासकारांना मिळतो. सध्याचे मंदिर हे सरदार वल्लभभाई पटेलांनी बांधले आहे.

मी दर्शन घेतले आणि मागे गेले, देवळाभोवती बाग थाटली होती, हिरवळ पसरलेली चहूबाजूनी. त्याच्याकडेने सज्जा होता सागर दर्शनासाठी. देवळातून बाहेर पडल्यावर डाव्या बाजूलाच प्रसिद्ध असलेला बाणस्तंभ पाहीला. म्हटलं व्हॉटस् ॲपचे सगळेच मेसेजेस् फेक नसतात तर Happy

तर या खांबावर एकबाण दाखवून एक श्लोक कोरलेला आहे. त्याचा अर्थ असा की बाणाच्या दिशेने सोमनाथ मंदिर आणि दक्षिण ध्रुव यात कुठलाही भुभाग नाही. हा स्तंभ ६व्या शतकातील आहे म्हणतात.

मंदिर अगदी समुद्र किनाऱ्यावर आहे, पुर्वी आलेली लोकं सांगत होती की भरतीच्या वेळेत पाणी मंदीरात शिरत असे. आता मात्र भर टाकून बहुतेक, समुद्रापासून थोड उंचावर वाटलं देऊळ. मस्त समुद्रजल शांतपणे हेलकावत होतं.. दूरवर काही नावा दिसत होत्या एकूण शांतता वाटत होती मनाला..

सोमनाथाच्या दर्शनाने एक वेगळी उर्जा घेऊन आम्ही जुनागढला प्रस्थान ठेवलं. जुनागढ हे गावच एक गड आहे म्हणे. त्यामुळे गावाला अनेक मोठमोठाले दरवाजे दिसतात. तसेच बाजूची तटबंदीही सतत दिसत रहाते. काही ठिकाणी पडझड झालीय. पण बऱ्याच अंशी तटबंदी शाबूत असावी.

रात्री जुनागढ स्टेशनजवळ गीता लॉजमधे जेवलो, जेवण अप्रतीम होतं. मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे त्यांनी मधुर ताकाचा जगच टेबलवर आणून ठेवला.. मी मस्त २/३ ग्लास ताकच प्यायले.. केरळमध्ये सांबार, रस्सम, नाशिकला मिसळीच्या ठिकाणी रस्सा तस इथे अनलिमिटेड ताक.. भारीच.. जुनागढला जाणाऱ्यांनी एकदातरी इथे जेवाव. जेवणे आटोपून रात्री १०.३०ला आम्ही आमच्या खोल्यात पोचलो.

रहाण्याची सोय तळेठीला नरसी मेहता धर्मशाळेत होती. धर्मशाळा असली तरी सोय उत्तम होती. खोलीत गरमपाणी, एसी, सगळ्या सुविधा होत्या. आता २/३ दिवस आमचा ईथेच मुक्काम असणार होता. दिवसभराच्या प्रवासाने थकवा आलेला होता. उद्या सकाळी ४.३०लाच परिक्रमेला निघायचे होते. तेंव्हा खोलीत गेल्यावर ताबडतोब झोपून गेलो.

क्रमश:

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान. पण पटकन संपला हा भाग. मी कधी आस्तिक कधी नास्तिक याच्या मध्ये घुटमळत असते. दिव्याच्या बटनाचे उदा. आवडले.पु. भा.प्र .

अरे वा दुसरा भाग ही आला. गुरुशिखरा वर वर्ष भरात कधीही जाऊ शकतो का?
फोटो असतील तर टाका वाचायला अजून गोड वाटेल.

गुरुशिखरा वर वर्ष भरात कधीही जाऊ शकतो का? कधीही जाऊ शकतो.

फोटो असतील तर टाका वाचायला अजून गोड वाटेल>>

प्रयत्न करते आहे. अजून जमत नाहीये.