अनुत्पादक काम

Submitted by सुबोध खरे on 27 November, 2019 - 01:40

मी डिसेंबर १९८९ साली ओखा येथे नौदलाच्या आय एन एस द्वारका या स्थावर तळ (BASE) वर डॉक्टर म्हणून एक महिन्यासाठी तात्पुरता गेलो होता. त्यावेळी ओख्याला रेल्वे व नौदल सोडून काहीच नव्हते.नौदलाच्या मेस मध्ये राहत होतो. तेथे पाणी पूर्ण खारट होते.(मचूळ नव्हे अलिबाग नागाव रेवदंडा इथे मिळते तसे मचूळ नव्हे ). चहा किंवा कॉफी सुद्धा खारट होत असे. पहिले १० दिवस मी शीत पेयांवर काढली.(नमकीन चहा हा तिबेट किंवा लडाख मध्ये मिळतो ज्यात याकचे लोणी घालतात). अजून मी चहा कॉफी शिवाय दिवस काढू शकतो पण प्यायचे पाणी खारट म्हणजे फारच त्रासदायक.असो.

तेथे माझा दवाखाना परेड मैदानाच्या बाजूलाच होता.दुसर्या दिवशी दुपारी जेंव्हा मी दुपारी जेवणानंतर दवाखान्याच्या बाहेर आलो तेंव्हा एक सैनिक रायफल डोक्यावर धरून परेड करताना दिसला. थोड्यावेळाने ते दोघे विश्रांतीसाठी माझ्या दवाखान्याच्या सावलीत आले. त्याच्यावर देखरेख करणाऱ्या दुसर्या सैनिकाला मी विचारले कि हे केंव्हा पासून चालू आहे. तो म्हणाला साहेब याला ७ दिवस झाले.मी त्या दुसर्या सैनिकास विचारले कि याला का शिक्षा झाली आहे?.तेंव्हा तो म्हणाला कि साहेब हा "विनासुट्टी गैरहजर" राहिला.( absent without leave). शिक्षा झालेल्या सैनिकाचे नाव पहिले तर चव्हाण (किंवा मालुसरे, मला नीट आठवत नाही )दिसले. मी त्या दुसर्या सैनिकास जायला सांगितले आणि चव्हाण बरोबर बोलण्यास सुरवात केली.

एक गोष्ट मला खटकली होती कि ४०-४५ वयाचा सैनिक सुट्टी न घेत गैरहजर राहतो. हि गोष्ट साधी सोपी नाही. मी नौदलात मानसोपचार तज्ञा बरोबर काम केले असल्यामुळे अशा गोष्टींचा पाठपुरावा करण्याची मला सवय आहे.
चव्हाण यांना मी विचारले कि एवढी नोकरी झाल्यावर आपण असे का केले?त्यावर चव्हाण यांनी अश्रू भरल्या डोळ्यांनी सांगितले कि ते या वर्षाची उरलेली १ महीना सुट्टी घेऊन सांगली जवळ गावाला गेले होते. शेवटच्या पंधरा दिवसात त्यांची १७ वर्षाची मुलगी कावीळीने आजारी पडली. शेवटी तिला मिरजच्या सरकारी (वानलेस)रुग्णालयात दाखल केले.दुर्दैवाने सुटीच्या शेवटच्या दिवशी तिचा मृत्यू झाला. त्यामुळे असलेले रिझर्वेशन सोडून देण्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता. या गडबडीत आपल्या युनिटला कळवायला ते विसरले.
१४ दिवस झाल्यानंतर(दहावा तेरावा दिवस आटपल्यानंतर) ते ओख्याला आपल्या युनिट मध्ये रुजू झाले.त्या वेळेपर्यंत त्यांच्या युनिटने वाट पाहून त्यांच्या रेकॉर्ड ऑफिस ला आणि आर्मी हेंड क्वार्टर्स ला "सिग्नल ने" कळविले होते. त्या काळात मोबाईल नव्हते. म्हणून परत आल्यावर त्यांचे कोर्ट मार्शल झाले आणि त्यांना ४८ दिवस DQ (detention in quarters) स्थानबद्धते ची शिक्षा झाली.चव्हाण यांनी सांगितले कि त्यांना पुढे नोकरीची गरज आहे. त्यांना एक १४ वर्षांचा मुलगा आहे त्याच्या व पत्नीच्या पालन पोषणासाठी हि नोकरी त्यांना आवश्यक होते.तेंव्हा जी काही शिक्षा मिळेल ती विनातक्रार भोगून ते नोकरी करणार होते.
मी चव्हाण यांना जाण्यास सांगितले.आणि त्यांच्या कंपनी कमांडर (एक्झिक्युटिव ऑफिसर EXO ) शी बोललो.EXO कमांडर दास हे अत्यंत सज्जन गृहस्थ होते.ते म्हणाले डॉक्टर सर्वत्र सिग्नल पाठवल्यामुळे आम्हाला चव्हाण यांच्यावर कारवाई करणे भागच होते. त्यांची परिस्थिती कितीही सत्य आणि कटू असली तरी प्राप्त परिस्थितीत मला सर्वात कमीत कमी देत येण्यासारखी शिक्षा मी त्यांना दिली आहे.त्यांना ४८ दिवस स्थानबद्धता आहे आणि रोज २ तास सक्त मजुरी.एवढी शिक्षा दिल्यावर त्यांची नोकरी चालू राहील आणि नोकरीत खंड सुद्धा पडणार नाही.हे १४ दिवस सुद्धा त्यांच्या पुढील वर्षाच्या रजेतून कापून जातील आणि त्याचा पूर्ण पगार सुद्धा त्यांना मिळेल.या पेक्षा कमी शिक्षा देणे अशक्य आहे.मी कमांडर दास यांना विचारले कि सक्त मजुरी हि फक्त "रायफल ड्रिलच" आहे का?
ते म्हणाले," असे जरूर नाही". यावर मी त्यांना विचारले "मी जर चव्हाणांना दुसरे काम दिले तर चालेल का?"
डॉक्टर असण्याचा हा "गैरफायदा" घेणे होते हे माहित असून मी हे प्रश्न मुद्दाम विचारला होता.

त्यांनी सांगितले डॉक्टर चव्हाण यांच्याकडून काम करून घेणे ही "जबाबदारी" मी तुमच्यावर सोपवितो. आणि माझा एक सैनिक त्यावर सुपर व्हिजन करतो, त्याला पण मी काढून घेतो.
दुसर्या दिवशी चव्हाण परत परेड मैदानावर आले असताना मी त्यांना म्हणालो कि मी कमांडर दास यांची परवानगी घेतली आहे आणि तुमचे रायफल ड्रिल माफ झाले आहे.त्या ऐवजी तुम्ही रोज २ तास दवाखान्यासमोर बागकाम करायचे आहे.मी तुमच्यावर लक्ष ठेवणार नाही. तुमच्या मुलीच्या आठवणीसाठी तुम्हाला जमेल तशी तुम्ही इथे बाग तयार करा.
पुढचही२५-३० दिवस त्यांनी कोणताही आळशी पण न करता काम करून एक फार सुंदर अशी बाग दवाखान्याच्या दर्शनी भागात तयार केली.
त्यानंतर मी ओखा सोडून परत मुंबईला आलो.

आज ती बाग आहे कि नाही हे मला माहित नाही, पण एका बापाचे दुख समजून घेऊन एका "अनुत्पादक कामा"चा विधायक कार्यात काही उपयोग करु शकलो असे वाटते.
( (इतरत्र प्रकाशित)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान आहे अनूभव. चव्हाणांबद्दल वाईट वाटले आणी वरिष्ठांचा राग आला. आपल्या भारतात नाण्याची दुसरी बाजू पहाण्याची पद्धत नाही हे परत अधोरेखीत झाले.

डॉ, तुमचे इतर अनूभव पण वाचायला आवडतील, लिहीत रहा.

खूप हृदयस्पर्शी घटना...

चव्हाणांबद्दल वाईट वाटले आणी वरिष्ठांचा राग आला. आपल्या भारतात नाण्याची दुसरी बाजू पहाण्याची पद्धत नाही हे परत अधोरेखीत झाले.>>>

रश्मी, वर आलेय की
EXO कमांडर दास हे अत्यंत सज्जन गृहस्थ होते.ते म्हणाले डॉक्टर सर्वत्र सिग्नल पाठवल्यामुळे आम्हाला चव्हाण यांच्यावर कारवाई करणे भागच होते. त्यांची परिस्थिती कितीही सत्य आणि कटू असली तरी प्राप्त परिस्थितीत मला सर्वात कमीत कमी देत येण्यासारखी शिक्षा मी त्यांना दिली आहे

सर्वत्र सिग्नल पाठवले नसते तर कारवाई न करता गप्प बसणे शक्य होते, पण 14 दिवस सैनिक न परतल्यामुळे सिग्नल पाठवावे लागले. मिलीटरीत नियम पाळले जातात.

१९८९ साली फक्त एस टी डी , आय एस डी पिवळ्या (टपरीतील) होते आणि त्यातून बहुसंख्य सैनिकांच्या घरी फोन नसतच. त्यामुळे एखादा सैनिक जर आला नाही तर एखादा दिवस वाट पाहून हेड क्वार्टर्सला कळवावे लागेच. कारण सैनिकाचा कुठे अपघात झाला आहे, कुठल्या गुन्ह्यात अडकला आहे किंवा काय झाले आहे हे समजणे अशक्य असे.

आणि एकदा एखादी गोष्ट कागदोपत्री आली कि ती पुसून टाकणे अशक्य असते ( नागरी जीवनात एकदा एफ आय आर ची नोंद झाली कि न्यायालयातून सुटका होईपर्यंत ती फाईल बंद करता येत नाही).

एकदा गुन्हा झाला आहे कि त्याची शेवटपर्यंत वासलात लावे पर्यंत न्यायासनापुढे येऊन तेथून दोषी कि निर्दोषी ठरवून शिक्षा द्यायची कि सुटका हे सर्व अभिलेखात ( रेकॉर्ड) मध्ये जर आले नाही तर त्याचा त्या नोकराला नंतर कधीतरी ( निवृत्तीवेतन किंवा संतोष फंड )त्रास होऊ शकतो.

न्यायाधीश कितीही सहृदय असला तरीही समोर आलेल्या कागदोपत्री पुराव्यानुसारच त्याला निवाडा द्यावा लागतो हि वस्तुस्थिती आहे.

लष्करी नोकरीत साध्या साध्या गुन्ह्यात झटपट न्याय होण्यासाठी अशी न्यायालयीन अधिकार ( judicial power) स्थानिक लष्करी अधिकाऱ्यांना (local military commanders) दिलेली असते आणि हि सर्व कागदोपत्री प्रक्रिया करून सेना मुख्यालय आणि अभिलेख कार्यालय( रेकॉर्ड ऑफिस-- जेथे सैनिकाचे निवृत्तीवेतन किंवा संतोष फंड इ चा अभिलेख ठेवला जातो) यांच्या दप्तरी नोंद करावीच लागते.

भयानक मोठी चूक केलीत तुम्ही. लष्कराच्या कामात ढवळाढवळ हा गंभीर गुन्हा आपण केलेला आहे. आपल्याला काय अधिकार आहे असे का करण्याचा ? सैनिक तिकडे सीमेवर मरत असताना तुम्ही आणि आम्ही मस्त मजेत असतो. तिकडे सीमेवर लढण्यासाठी त्यांच्याशी कसे वागावे हे तुम्ही कसे ठरवणार ? तुमच्यासारख्यांच्या आगंतुक नाकखुपशीमुळे वरीष्ठांना नाईलाजास्तव परवानगी द्यावी लागली असेल तर त्यानंतरच्या जवानाला हे फेवरिझम नाही का वाटणार ? यामुळे जर लष्करात बंडाची ठिणगी पडली तर त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल.

हा हा हा
तिथे मी सीमेवरच होतो. ओखा हा "फॉरवर्ड ऑपरेटिंग बेस" होता.( तेथे कराचीच्या "दूरदर्शन"चे कार्यक्रम दिसत असत) त्यामुळे तिथल्या ExO ला ते अधिकार होते आणि त्यांनी ते अधिकार माझ्याकडे सोपवले (delegation of power). म्हणजे मी माझ्याच अखत्यारीत असलेल्या अधिकाराचा वापर केला होता.
बाकी लष्करात बंड झाले असते तर ते आम्ही कोमल हृदयाने शमवले असते.
हलके घ्या

मिपावर हे पूर्वी वाचले होते तरी पुन्हा वाचायला आवडले. केवळ "कायद्यानुसार" नियम न पाळता, त्यात थोडी लवचिकता दाखवल्याबद्दल एका डॉक्टरची empathy दिसून आली. धन्यवाद.

हृदयस्पर्शी.

डाॅ. तुमची सह्रदयता भावून गेली मनाला >>> अगदी अगदी.

खरेसाहेब लिहितात म्हणून थोडे काय चालले आहे ते कळते. अन्यथा आर्मी/बलातील व्यवहार नागरीजनांपर्यंत पोहोचणार नाहीत.
त्या सैनिकाने चिडून नोकरी सोडली असती तर खूपच नुकसान झाले असते.

"चव्हाण यांनी सांगितले कि त्यांना पुढे नोकरीची गरज आहे. त्यांना एक १४ वर्षांचा मुलगा आहे त्याच्या व पत्नीच्या पालन पोषणासाठी हि नोकरी त्यांना आवश्यक होते.तेंव्हा जी काही शिक्षा मिळेल ती विनातक्रार भोगून ते नोकरी करणार होते."
सरकारी नोकरी सोडून देणे ही फार मोठी चूक ठरली असती

Pages