पुनर्भेट

Submitted by Mukund Ingale on 26 November, 2019 - 05:24

पुनर्भेट

काल गेलो होतो तिकडे आठवणींच्या पावसाबरोबर .. परत भेटलास तू..पुन्हा नव्याने.. अगदी पूर्वी प्रत्येकवेळी भेटायचास तसाच.
पहिल्या पायरीवर असतानांच दूर धुक्यात दिसलास, मी वर पोहोचेपर्यंत तूही दरवाजात येऊन बसला होतास. खूप वर आलो चढून ..नाही का? सुरुवातीची छोटी पायवाट ..नंतर थोड्या तुटक्या पायरया..छोटे मोठे चढ..कातळाला लगटून चालणाऱ्या उंच पायऱ्या...नाही दमलो अस नाही..पण तात्पुरताच . प्रत्येक वेळी मनाला बजावत की आता थोडच राहिलंय...अजून फक्त थोडाच वेळ..मग येईल नजरेचं टप्प्यात सारे काही ....
तसच झालं...वरच्या दरवाजातून आत येताना....दाटून आलेल्या धुक्याच्या आवर्तनात आकाशभर घुमत असलेली तुझी हाक ऐकू आली. नेहमी तू हिरवळ होऊन पहायचास माझ्याकडे पण आज मात्र धुकं होऊन मिठी मारली होतीस..मनाच्या स्तिमित आनंदाच्या अवस्थेत मी किल्ला पालथा घातला.पायातुन वाहणाऱ्या पाण्यातून,मातीच्या गंधातून, आसपास पसरलेल्या इतिहासातून, दुर दिसणाऱ्या स्वच्छ आकाशाच्या तुकड्यातून, पावसाच्या पडणाऱ्या थेंबातून तू दिसलास खरा ,... ! क्षितिजाची व्याप्ती माहित नसलेल्या मनातले सारे ढग मी लोहगडाच्या पठारावर उलगडून ठेवले होते आणी आनंदाच्या असंख्य थेंबाची वादळे अंगावर घेत उभा होतो.
सोबत असलेल्यांपासून वेगळ होऊन कोणी दुसरा “मी” तिथे काहीतरी करीत होता.थोडी झाडे लावली. काही छोट्या मित्रांशी बोलला पण तो. “हरियाली” च्या कार्यकर्त्यांचा उत्साह ...आलेल्या ट्रेकर्स ची झाडे लावायची लगबग..गप्पा आणी बरच काही...हेही घडल तिथे...
मी मात्र त्या क्षणात त्या क्षणी ...गुंतला गेलो. लोहागडाचा चढ म्हणजे माझी आतापर्यंतची आयुष्याची वाटचाल वाटली. आणी वर येणे हा खर्या आयुष्यात घेतलेला स्वल्प विराम ,
अजून खूप डोंगर पालथे घालायचेत..खूप वळणे अनुभावायचित नवी क्षितिजे हुडकायचित....
”हरियाली” थेंक्स....
मला माझी परत भेट घडवून जगण्याचे नवे रोपटे मनात रुजवल्याबद्दल...
ते नक्कीच बहरेल.
काय म्हणताय “तो कोण होता?”...तेच तर शोधतोय आयुष्यभर...
पुन्हा भेटू..

[सेवानिवृत्त झाल्या झाल्या लोहगडावर गेलो होतो तेव्हाचा स्वसंवाद़]
मुकुंद इंगळे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users