पुस्तक परिचय : शल्य कौशल्य - डॉ. भा. नी. पुरंदरे

Submitted by प्राचीन on 26 November, 2019 - 09:21

मी वाचलेले पुस्तक : शल्य कौशल्य - डॉ. भा. नी. पुरंदरे
प्रकाशन - अश्वमेध
वर्ष - १९८३.
'भारतीय लोकांना लहानपणापासून हातांची बोटे वापरून कामे करता येतात, त्यामुळे सहजपणे बोटांची हालचाल करता येते. अर्थात शस्त्रक्रिया करताना फारसे कठीण जात नाही.', हे प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. पुरंदरे यांनी काढलेले उद्गार पूर्वी कोणत्या तरी कार्यक्रमात उद्धृत झाले होते. तेव्हापासून त्यांच्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. पुढे त्यांच्या आत्मचरित्राबाबत वाचून आणखीनच ओढ लागली, की ह्या व्यक्तीबाबत अधिक जाणून घ्यायला हवेच. मायबोलीवर एका धाग्यात त्यांच्या ज्योतिष विषयक ज्ञानाचा उल्लेखही वाचला.
जालावर शोध घेतला असता, शल्य कौशल्य हे पुस्तक (डॉक्टर पुरंदरे यांचं आत्मचरित्र) उपलब्ध नव्हतं. अचानक लक्षात आलं (जरा उशिराच) की आपल्या लायब्ररीत विचारून पाहू. सुदैवाने लायब्ररीत पुस्तक मिळालं. अगदी जुनी प्रत होती. पण सांभाळून वाचूया, अशा विचाराने ती घेतली.
आता एवढ्या प्रस्तावनेनंतर सुरुवात करते पुस्तक परिचयास. खरं म्हणजे हे पुस्तक वाचताना, एका व्यक्तीने एवढं बहुआयामी आणि तरीही लोककल्याणकारी असावं, हे नवल पानोपानी वाटत राहतं. पद्मविभूषण, धन्वंतरी अशा राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रख्यात असलेल्या भालचंद्र पुरंदरे यांनी अगदी वस्तुनिष्ठ दृष्टीने आपल्या जीवनाचा आलेख रेखाटला आहे. 'नानासाहेब' या आदरार्थी संबोधनाने परिचित असलेल्या डॉक्टरांच्या आधीच्या दहा पिढ्याही वैद्यकीय सेवा देत होत्या.
डॉक्टर भालचंद्र यांचे बालपण व शिक्षण हे स्वातंत्र्यपूर्व काळात झाल्याने तत्कालीन भारत, सामाजिक स्थिती, कुटुंबव्यवस्था, भारतीय लोकांबाबत ब्रिटिशांनी अवलंबलेलं धोरण, मेडिकल शिक्षणाची उपलब्ध सोय, इ. अनेक गोष्टी वाचायला मिळतात. काही वेळा मनोरंजक वाटते ही माहिती. उदाहरणार्थ, लहानपणी त्यांची गाडी (तत्कालीन मुंबईत असलेल्या चार पाच गाड्यांपैकी एक) वाटेत बंद पडली तेव्हा हाजी अली ते वरळी पर्यंत चा भाग निर्मनुष्य असल्याने पाणीदेखील मिळालं नाही... अजबच आहे नै?
डॉक्टरांचं मेडिकलचं शिक्षण वाचताना तर अजुनच मजेदार तपशील कळतात. उदाः तेव्हा मेडिकल ला जाणारे कमी विद्यार्थी असल्यामुळे मेडिकल कॉलेजमध्ये सीटस् भरण्यासाठी विद्यार्थ्यांना बोलवावं लागत असे.
वयाची अट पूर्ण झाली नाही म्हणून (लहान वय असल्याने) डॉक्टरांना FRCS करण्यासाठी वर्षभर थांबावे लागले. या दरम्यान त्यांनी केलेले उपक्रम म्हणजे 'आदर्श विद्यार्थी कसा ज्ञानार्थी असावा' याचा वस्तुपाठ आहे.
KEM ची जन्मकथा, डॉक्टरांची व्यावसायिक कारकीर्द, त्या दरम्यान आलेले विविध अनुभव, सरकारी यंत्रणांचा कारभार, परदेशी असताना आलेले संमिश्र अनुभव, अशा टप्प्यांनी चरित्र समृद्ध झालं आहे. रुग्णाचं रक्त थेंबभरही न सांडता डॉक्टर केवळ अडीच मिनिटांत एक गर्भाशयाची शस्त्रक्रिया करीत, हे त्यांचं स्वतः विकसित केलेलं शल्य तंत्र होतं व त्यामुळेच सुरुवातीला वैद्यकविश्वात खळबळ उडाली होती. पण हे एवढंच कौशल्य नव्हे, तर विमान चालवणं, योगाभ्यास, अनेक वैद्यकीय शल्यपद्धतींचा शोध व अवलंब, अचूक रोगनिदान (टेस्ट्स वगैरे न करता), ज्योतिषशास्त्राचा अभ्यास, शेतीमधील प्रयोग.. काय नि किती विस्तार आहे त्यांच्या क्षमतांचा, ते वाचून अचंबा आणि आदर वाटतो. सामाजिक भान ठेवून त्यांनी जो कामाचा पसारा उभा केला, त्याबद्दल वाचताना आपल्याला कुठेही त्यांचा अहंकार जाणवत नाही.
"डॉक्टर हा रुग्णाला बरं करत नसतो. तो फक्त आपल्या अस्तित्वाने रोग्याची मनःशक्ती जागवतो, त्यामुळे रोगी बरा होत असतो ", हे त्यांचं वाक्यच त्यांची वागण्यातील सहजता दाखवून देतं.
इति लेखनमर्यादा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान परीचय! मी दहावीच्या सुट्टीत हे पुस्तक वाचल्यावर अगदी भारावूनच गेले होते ते आठवले. Happy

>>>>>>ज्योतिषशास्त्राचा अभ्यास, शेतीमधील प्रयोग.. काय नि किती विस्तार आहे त्यांच्या क्षमतांचा>>>> हरहुन्नरी!!

वावे, पुंबा, स्वाती २,सामो,कवि पुरंदरे - प्रतिसादाबद्दल आभार.
मलाही कळवा पुस्तक कुठे खरेदी करण्यासाठी उपलब्ध असेल तर. संग्रही ठेवावे असे वाटते.

छान परिचय

मी देखील हे पुस्तक वाचल्याचे आठवते आहे, त्यांनी लता मंगेशकर यांच्या वरही काही उपचार केले होते त्यासाठी परदेशातल्या तज्ञांनी ह्यांचे नाव लताबाईंना सुचवले होते.

लोणावळ्याला ह्यांचा बंगला बांधायचे काम चालू असताना ठेकेदाराने ह्यांना जास्त काम झाल्याचे सांगितले होते तर हे विमान चालवण्याचा सराव करत असताना नक्की किती काम झाले आहे हे प्रत्यक्षात पाहून आले होते त्यामुळे ठेकेदाराची पंचाईत झाली

असं काहीबाही ह्या लिखाणामुळे आठवले

छान परिचय !

डॉ. भा नींची एक आठवण सांगतो. माझे वैद्यक शिक्षण चालू होते. साधारण ३ वर्षे लागोपाठ स्नेहसंमेलनाच्या समारोपाला हिंदी चित्रपटातील नट/नटी बोलावले गेले होते. त्यानंतर एक नवे अधिष्ठाता रुजू झाले. त्यांच्या कारकिर्दीतील पहिल्याच संमेलनात त्यांनी जाहीर केले की प्रमुख पाहुणा हा नट/नटी चालणार नाही. समाजाच्या बाकी क्षेत्रांतील कुठलीही अधिकारी व्यक्ती चालेल.

मग डॉ. भा नीं ना बोलावले. मला अजूनही ते गच्च भरलेले सभागृह आठवते. डॉ तर फारच प्रभावी बोलले. कायमचे मनावर कोरले गेलेले ते भाषण !
ते अधिष्ठाता सुद्धा आमच्यावर एक संस्कार करून गेले.
सलाम !

मी हे पुस्तक बऱ्याच वर्षांपूर्वी वाचलं आहे. तेव्हा खूप भारावून गेले होते, हे लक्षात आहे.
परिचय आवडला.

मी हे पुस्तक बऱ्याच वर्षांपूर्वी वाचलं आहे. तेव्हा खूप भारावून गेले होते, हे लक्षात आहे.> +1

मी हे पुस्तक बऱ्याच वर्षांपूर्वी वाचलं आहे. तेव्हा खूप भारावून गेले होते, हे लक्षात आहे.>>> +1

फार पूर्वी हे पुस्तक वाचले होते. पत्रिका बघून C-section करणाऱ्या त्या डॉक्टरला मनातल्या मनात नमस्कार केला होता. आज इतक्या वर्षांनीपण ते अजून लक्षात आहे.

अजून एक म्हणजे डॉ. पुरंदरे यांच्या हॉस्पिटलमध्येच सुनील गावस्करचा जन्म झाला आणि तिथे mix-up होऊन मुलांची अदलाबदल झाली होती. (सुनील गावस्करच्या आत्मचरित्रात याबद्दल लिहिले आहे).

छान परिचय.
डॉ पुरंदरेंनी ज्योतिषशास्त्र व आधुनिक वैद्यकशास्त्राची सांगड घातली होती हे वाचून माहित आहे.

प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ व ज्योतिषसमर्थक कै. डॉ.भा.नि. पुरंदरे यांनी एक किस्सा पुण्यातील ज्योतिष संमेलनात सांगितला होता. तो असा:- त्यांच्या कडे प्रसूती साठी आलेल्या एका केसमध्ये पंधरावीस मिनिटांच्या अंतराने जुळ्या मुली जन्माला आल्या. त्या एकाच वारेवरच्या होत्या. परंतु एक काळसर होती व एक उजळ होती. त्यांनी जेव्हा मुलींच्या पत्रिका केल्या तेव्हा त्यांना असे आढळून आले की त्या पंधरावीस मिनीटांमध्ये एकीचे जन्म-नक्षत्र बदलले होते. त्या मुळे एक मुलगी सावळी व एक उजळ असा त्यांच्या वर्णात फरक पडला असे त्यांचे म्हणणे होते.
त्यांच्या विधानाचा अर्थ असा होतो की दोन्ही मुली या एकाच फलित गर्भपेशीचे विभाजन होउन झालेल्या जुळ्या मुली ( युनिओव्ह्यूलर ) होत्या कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्या एका वारेवरच्या होत्या. परंतु, तरीही त्यांच्या वर्णात फरक पडला तो केवळ १५ मिनिटात एकीचे नक्षत्र बदलल्यामुळे पडला. आम्हाला त्यांच्या या विधानाच्या सत्यतेबद्दलच शंका वाटते. ती शंका अशी:- असा वर्णातला फरक फक्त माता-पित्यांच्या जनुकांच्या जोडणीत होणाऱ्या फरकामुळे पडू शकतो असे जनुक-शास्त्र सांगते. युनिओव्ह्यूलर केस मध्ये असा फरक पडणे शक्य नाही. कारण तशा केसमध्ये जनुकांच्या जोडणीत फरक पडलेला नसतो. पण जर डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे केवळ नक्षत्र-बदलामुळे हा फरक पडला असेल तर ती गोष्ट या शास्त्रात मूलभूत क्रांति घडवणारी ठरेल. ती केस वास्तविक एखाद्या मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध होण्याच्या योग्यतेचीच ठरेल. ती काही एखाद्या ज्योतिष-संमेलनात सांगून सोडून देण्यासारखी किरकोळ गोष्ट नव्हे!

डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे केवळ नक्षत्र-बदलामुळे हा फरक पडला असेल तर ती गोष्ट या शास्त्रात मूलभूत क्रांति घडवणारी ठरेल. ती केस वास्तविक एखाद्या मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध होण्याच्या योग्यतेचीच ठरेल. ती काही एखाद्या ज्योतिष-संमेलनात सांगून सोडून देण्यासारखी किरकोळ गोष्ट नव्हे! >>>
प्रघा - तुम्हाला काय वाटते त्यांनी तसे केले नसेल तर का केले नसावे?

त्यांनी अजून दोन मुद्दे सांगितले होते
१) समाजातील सात टक्के व्यक्ति धनभारित असतात. २८ टक्के व्यक्ति ऋणभारित असतात व बाकीचे उदासिन असतात. व्यक्ति कोणत्याप्रकारची आहे हे त्याच्या तळहातावर रुद्राक्ष धरुन ठरवता येते. धनभारित व्यक्तिमधे आत्मिक सामर्थ्याने रोग बरा करण्याची, अंतर्ज्ञानाने भविष्य बरोबर सांगण्याची शक्ती असते. अशा व्यक्तिंनी पाणी दिले तरी त्याचे औषध बनते.
२) गरोदर स्त्रीच्या पोटावर रुद्राक्ष धरुन मुलगा की मुलगी होणार हे आधी कळते.

प्रघा - तुम्हाला काय वाटते त्यांनी तसे केले नसेल तर का केले नसावे?>>>>>वैज्ञानिक निकषांवर त्यात काही तथ्य सापडणार नाही हे त्यांना माहित होते. वर लिहिलेले मुद्दे हे मी स्वत: त्यांच्या तोंडून ऐकलेले आहेत. शिवाय त्यांनी तत्कालिन लेखाद्वारे अन्यत्र लिहिले आहेत. मी एक ज्योतिष शास्त्रावर लोकांचा विश्वास किती आहे हे तपासण्यासाठी एक प्रश्नावली तयार केली होती. त्यात शेवटचा प्रश्न बी एन पुरंदरे यांच्या या मुद्द्यांवर होता 86-88 च्या काळात .मी त्यावेळी मुंबईला भायखळ्याला नोकरीला होतो. तिथे मी एका छोट्या हॊटल मधे जेवायला जायचो तिथे एक वेटर होता. त्याच्याशी परिचय झाला तेव्हा तो म्हणला की मी एमबीबीएस चा विद्यार्थी आहे. व मला बी एन पुरंदरे शिकवायला आहेत. मग तो धागा पकडून मी त्याला ती सर्वेची प्रश्नावली डॊ पुरंदरे यांना द्यायची विनंती केली. त्याने ती मान्य केली व शंका समाधान विचारायला आम्ही त्यांच्याकडे जात असतो त्यावेळी ती देईन असे सांगितले. नंतर पुढच्या वेळी भेटला तेव्हा मी काय दिली का? असे विचारले. मग तो मला म्हणाला दिली पण वाचल्यावर ते खवळले व फेकून दिली ना राव! मला एकदम कानकोंडे झाल्यासारखे झाले.

हर्पेन, कुमार १,शैलजा, अनया, रायगड, अंकु, जाई, अन्जू, शूम्प, उ. बो., सनव, घाटपांडे जी, srd,.. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
@हर्पेन, तुमच्या लक्षात राहिला तसा मलाही आवडला तो विमान उडवण्याचा अनुभव. असाही फायदा झाला त्यांना विमान चालवण्याचा. अवांतर :एकदा मी मोबाईलवरून फोन केल्यामुळे त्या ठेकेदारासारखं एक व्यक्ती चटकन खोटं बोलून गेली की मी अमुक ठिकाणी पोहोचले आहे. प्रत्यक्षात मीच त्या तमुक ठिकाणी आधी पोहोचून मग फोन केला होता. :स्मित :

घाटपांडे जी, डॉक्टरांनी तर जुळं ही प्रकृति नसून विकृति आहे, असंही लिहिलं आहे पुस्तकात. तोवर मला तरी जुळं म्हणजे "कित्ती छ्छान" असंच वाटत होतं.

वाचलंय हे पुस्तक! आता परत वाचायला पाहिजे.

"गरोदर स्त्रीच्या पोटावर रुद्राक्ष धरुन मुलगा की मुलगी होणार हे कळते" हा भाग विस्मयजनक वाट्ला होता.

छान पुस्तक परिचय. यातला थोडा भाग वाचलेला पण पूर्ण पुस्तक वाचले नाही.

प्राचीन, विकृती म्हणजे वाईट असे का समजता? जे प्रकृतीच्या विरुद्ध ते विकृत. फलन झाल्यावर त्यातून एक जीव तयार होऊन वाढणे ही प्रकृती, त्याचे विभाजन होऊन त्यातून 2 जीव निर्माण होणे ही त्यामुळे विकृती. अर्थात मी पुस्तक वाचले नाही त्यामुळे डॉक्टरांना असेच अभिप्रेत होते का हे माहीत नाही; तुमचा प्रतिसाद वाचून सहज डोक्यात आले ते लिहिले.

विकृती म्हणजे abnormality. असे म्हणायचे असेल.

घाटपांडेकाका,
आता तुमचे मत वाचून इथले ज्योतिष"शास्त्र"प्रेमी तुमच्यावर तुटून पडले तर आश्चर्य वाटणार नाही. नाना पाटेकरच्या सिनेमातला डायलॉग आठवला, "इनको सोने की आदत पडी है, सोने दो उनको".

डॉ.कुमार/डॉ. सुबोध खरे,
तुम्ही स्वतः डॉक्टर आहात, तर तुम्ही वैद्यकीय शिक्षणानुसार काही सांगू शकाल का? उदा: नक्षत्र बदलल्याने रंग बदलतो का? रुद्राक्ष वापरून मुलगा की मुलगी सांगता येते का, पत्रिका बघून C-section करणे कितपत योग्य आहे?

Pages