चना दाल तडका

Submitted by योकु on 21 November, 2019 - 18:16
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक ते दीड वाटी चण्याची डाळ
दोन मध्यम टोमॅटो
दोन हिरव्या मिरच्या
दोन सुक्या लाल मिरच्या
गुबगुबीत आल्याचा दीडएक इंचाचा गठ्ठोबा
चमचाभर धणेपूड
मोठी चिमटीभर हिंग
मीठ
तेल
हळद
चमचाभर साजुक तूप + पाव चमचा लाल तिखटपूड
थोडी कोथिंबीर वरून घालायला

क्रमवार पाककृती: 

चण्याची डाळ दोन तास तरी पाण्यात (शक्य असेल तर गरम पाण्यात) भिजत घालावी. हा वेळ अर्थातच कृतीत नाही धरलेला.

भिजलेली डाळ बेताच्या पाण्यात कुकरमध्ये मऊ शिजवून घ्यावी. डाळीचे दाणे जरा जाणवायला हवेत असं पोत हवं.

हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घ्याव्यात, आलं स्वच्छ करून बारीक किसून घ्यावं. टोमॅटो चिरून घ्यावेत. लाल मिरच्या आख्ख्याच ठेवाव्या.

एका पॅनमध्ये जरा जास्त तेल तापवून त्यात जिरं फुलवावं आणि हिरव्या मिरच्या, लाल मिरच्या, हिंग, हळद, आलं आणि धणापूड घालावी. मिनिटभर हे मसाले तेलात होऊ द्यावेत. यावर आता तोमॅटो घालून तेल सुटेस्तोवर आणि टोमॅटो मऊ होइपर्यंत परतावं.
यावर शिजलेली डाळ पाणी काढून मग घालावी. मीठ घालावं आणि अतीच कोरडी असेल तर डाळ शिजलेलं पाणीच वापरून जरा सरसरीत करावी.
झाकण घालून ५-७ मिनिटं अगदी बारीक आचेवर मुरू द्यावी. अतिशय चविष्ट जरा वेगळ्या धाटाची डाळ तयार आहे. कोथिंबीर घालून जरा नटवावी म्हणजे एकसुरी पिवळा रंग मोडेल.

अजून च चव वाढवण्या करता चमचाभर तूप गरम करून त्यात पाव चमचा लाल तिखट पोळवावं आणि हे तूप-तिखट डाळीवर वरून ओतावं. फारच सुरेख चव येते तुपाची आणि सात्विक झणझणीतपणा येतो जरा.

कांदा लसूण अजिबात न वापरता फार सुरेख चवीचा पदार्थ होतो. घडीची पोळी, जरा मऊ भात यांबरोबर सुरेख लागेल.

वाढणी/प्रमाण: 
भाजीप्रमाणे
अधिक टिपा: 

डाळ आधी भिजवणं आवश्यक आहे. नाहीतर शिजायला फार वेळ लागेल.
धण्याची तयार पूड वापरण्यापेक्षा धणे जरा भाजून भरड पूड जास्त चविष्ट लागेल असं वाटतं
मिरच्या + आलं + लाल तिखट असं जरी असलं तरी फार तिखट होत नाही कारण लाल मिरच्या सबंधच आणि हिरव्या मिरच्या उभ्या चिरून वापरल्या आहेत.

माहितीचा स्रोत: 
निशा मधुलिका युट्यूब चॅनल. मूळ कृती तुपात आहे आणि शेवटी वरून नुसतं तूप सोडलं आहे. तेलात करणे + वरून तूपतिखटाच्या फोडणीची आयड्या माझी
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख लिहिलंय Wink
एवढं सुरेख लिहिलंय की तुम्ही फोटो टाकला नाहीये तरी ती पिवळीधमक डाळ डोळ्यासमोर आली. अशी रेसिपि मी मेजवानी मध्ये बघितली होती, गिरीजा ओकने दाखवली होती.
सात्विक झंझणीतपणा Happy

फोटो का नाही टाकला???

आम्ही ओले खोबरे घालुन करतो, आता अश्या पदध्तीने करुन बघेन.

चनाडाळ भाजी खावी तर फक्त तांदळाची भाकरी किंव्या दिवश्यांसोबत.

दिवश्यांसोबत.>> ?? हे काय असत>>> कसे सांगू कळत नाही पण उकडीचे पोकळ मोदक म्हणा हवे तर

यात अंड्याची कोशिंबीर किंवा चना अथवा मसूर डाळीची भरपूर ओले खोबरे घातलेली झणझणीत भाजी भरून खायचे. एकदम यम्मी प्रकार आहे हा

आता तुझी कृती आहे म्हटल्यावर करून बघणं आलं. तुझ्या दुसऱ्या कृतीने दाल तडका कायम करते आणि फार भारी होतो.