मृगजळ . . .. . .

Submitted by सोहनी सोहनी on 19 November, 2019 - 02:37

मृगजळ . . .. . .

कितीतरी दिवसांनी मी हवेच जड होणं जाणवतोय पुन्हा, हि पाठमोरी आकृती कोणाची? २ सेकंड, निव्वळ २ सेकंड,
अवाजवी वाढलेला श्वास, डोळ्यांची चलबिचल, हातांना मंद कंपन,
हा कसला आभास आहे,
तुझ्या अस्तित्वाचा कि, कि निव्वळ माझ्या मनाचा भास ..

ती तूच होतीस ना, तुला कोणत्याही बाजूने मी ओळखले नाही असं कधी होणं शक्यच नाही,
हि मूर्ती जी माझ्या मनात घर करून आहे, ती मी ओळखणार नाही तर आश्चर्यच . . .

माझी गाडी नकळत तुझ्या मागे वळण, आणि तुझं तुझ्या गाडीचा वेग कमी करणं निव्वळ योगायोग असावा, पण माझ्याही नकळत मी तुझ्याकडे पाहतोय, कसलंच भान नसल्यासारखं, बेभान बेफिकीर . . .

तू नसताना देखील तुझ्या असण्याच्या भासांत जगलोय मी, तो काटेरी प्रवास केलाय मी एकट्याने, ते मन जाळणारे अनुभव तुझ्या नसण्याचे, त्या जिवंत आठवणी, ते जगायचं म्हणून श्वास घेणे सगळं अगदी सगळं पार केलं आहे मी तू गेल्यावर,

आता इतका पुढे आलोय कि मागे वळून पाहतच नाही अगदी ठरवूनच, शरीराने आणि बुद्धीने तुझ्याही पुढे आलोय मी,
पण मन.........

त्याच माहीतच नाही, कुठेतरी रेंगाळला आहे, त्याच भूतकाळी क्षणांत, त्या तुझ्या स्मरणांतच त्याने स्वतःला अडकवून ठेवलंय,
थोड्या काळापुरते वळवलं देखील होत मी मनाला, पण तो चुकतोय हे कळत असतानादेखील तो चुकत राहिला तुझ्यात जगत राहिला,

अशी तू अचानक दिसताना विज्ञानाच्या सगळ्या संकल्पना मोडीत काढून मला वाटलं हा क्षण, हा क्षण इथेच गोठवा,
हे लोक, ह्या गाड्या, हा भोवताल थांबून राहावा,
मी पाहून घ्यावं तुला डोळे भरून, सामावून घ्यावं पुन्हा एकदा ह्या मनात, आणि शोधावं माझं अस्तित्व तुझ्या गहिऱ्या डोळ्यांत, तुझं मन अगदीच ढवळून काढून माझ्या अस्तित्वाचे कण शोधावेत. . .

ह्या एका विचाराने अर्ध क्षण डोळ्यांची पापणी लवली आणि तू हरवलीस समोरून, सैरभैर वेड्या सारखा भर रस्त्यात गाडी थांबवून तुला शोधलं, कुणी वेडा आहेस का?? मूर्ख गाडी बाजूला घे, मरायचं आहे तर दुसरीकडे जा, असं म्हणाल, कानावर पडलं,

पण मनापर्यंत तो अनुभव ती भावना आरूढ झाली होती,
जे कधीच माझं नव्हतं जे केव्हाच हरवलं होत, ते पुन्हा एकदा गमावण्याची भावना. . .

पुन्हा मनाचा आक्रोश आवरण्यासाठीचे जड आणि वेदनादायी श्वास, तेच पाणावलेले डोळे, तोच तो अगतिक चेहरा, आणि तोच हरलेला हताश मी. . .
ते कंपन, ते तडफडणारे मन, तू नक्की होतीस कि नव्हतीस ह्या संभ्रमण असणारी नजर,
भयंकर त्रासदायक आहे ती, ती भावना भयंकर आहे. . .

मृगजळ, मृगजळ आहे ती आणि तिचे अस्तित्व देखील आताशा माझ्या आयुष्यातले,
मृगजळाच्या मागे धावून हाती काय मिळत नाही, हे अनुभवाचे बोल स्वतःला ऐकवून शांत करतो त्यावेळेपुरता . . .
निव्वळ ३ ते ४ मिनिटाचा तो प्रवास, ती भावना, तो अनुभव बस एक वाक्यात सामावतोय

" एहसास तेरा छूकर रुह को जब जब निकाला है,
तब तब हर लम्हा जिंदगीका, तुटे पत्ते कि तरह बिखरा है "

(हा लेख मी माझ्या मित्राच्या भावनेला अनुसरून लिहला आहे, एका आठवड्या पूर्वी त्याला त्याची ती सखी जिवलग अचानक दिसली, त्याची झालेली मनाची अवस्था तोडक्या मोडक्या शब्दांत माझ्यापुढे मांडून तो मन मोकळं करण्याचा प्रयत्न करताना, त्याला ती भावना त्या प्रसंगात त्याच्या मनात नेमकं काय होत ते सांगायला शब्द सुचत नव्हते,
म्हणून ते भाव मी माझ्या शब्दांत इथे उतरवण्याचा प्रयत्न केला,
हा लेख त्या प्रत्येकासाठी आहे ज्याच्या आयुष्यात अशी व्यक्ती आहे, जी शरीराने खूप खूप दूर असली तरी मनाने अजूनही जवळ आहे,
अशी व्यक्ती जी आयुष्यातून गेल्यावर तिची किंमत कळते किंवा तिला खूप काही सांगायचं असत, खूप बोलायचं असत... पण वेळ निघून गेलेली असते ...)

--मायबोलीवरच्या हा माझा पहिलाच लेख आहे, ५ ६ वर्षे झाली मी वाचक म्हणून मायबोलीवर आहे, आज खूप हिम्मत करून हा लेख पोस्ट केला आहे ( प्रचंड ताण आलाय आणि भीती हि वाटतेय ) . . .

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults