पेण मध्ये असलेल्या वाशी ह्या सासरच्या गावी आमची वर्षातून दोन-तीन वेळा फेरी होते. प्रत्येक वेळी तिथे जाताना मला नेहमी एका गोष्टीच आकर्षण असत ते म्हणजे हायवेवर असलेल्या रामवाडीच्या समोर रस्त्याच्या कडेला ठोकत असलेल्या पाथरवटाच्या दगडी वस्तूंच. तिथून येताना नेहमी आम्ही गाडी थांबवतो आणि पाथरवटांकडून छोटे पाटा-वरवंटे, खलबत्ता अशा वस्तू कधी आम्हाला घरात तर कधी भेट देण्यासाठी घेतो. यावेळी जरा वेळ काढूनच या पाथरवटांशी गप्पा मारल्या. गप्पांतून त्यांच्या व्यवसायाबद्दल माहिती मिळाली आणि पाथरवटांच्या त्या दगडी कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला.
रामवाडीच्या हायवेच्या कडेला श्री रामदास जाधव व सौ. संगिता जाधव यांचं कुटुंब फलटण वरून येऊन पेणमध्ये वास्तव्य करत हे दगडी कलाकुसर करण्यात रमलेली असतात. त्यांचे नातलगही तिथेच हा व्यवसाय करतात. त्यांची झोपडीवजा तीन चार दुकाने जवळ जवळच आहेत. त्या दुकानांत छोटे-मोठे पाटा वरवंटे, खल-बत्ते, छोटी-मोठी जाती अगदी खेळण्यातलीही, मूर्ती अशा वस्तू आपले मन आकर्षीत करून घेत असतात. त्यांचं ठक ठक आवाजात काम चालूच असत. जवळ काही अवजारे असतात वेगवेगळ्या आकारातली. अवजारांच्या, आपल्या बळाच्या, बुद्धीच्या व कौशल्याच्या साहाय्याने ह्या कलाकृती पाथरवट बनवत असतात.
१)
४)
श्री रामदास जाधव यांच्याकडून माहिती मिळाली की ह्या वस्तूंसाठी लागणारे दगड ते स्थानिक डोंगरातले घेत नाहीत. कारण स्थानिक दगडांना वस्तू घडवताना चिरा पडतात. कल्याणच्या डोंगरातून खणून आणलेले दगड ते विकत घेतात. क्वारीतील दगडही तुटलेले असल्याने ते ह्या कामासाठी चालत नाहीत. दगडी वस्तू घडवत असताना त्यावर मारलेला प्रत्येक ठोका योग्य जागी पडावा लागतो. हे ठोके मारत असताना दगडांचे तुकडे आजूबाजूला, अंगावर उडत असतात. अनेकांचे दगडाचे तुकडे डोळ्यात गेल्याने डोळेही गेले आहेत. कारण निघालेला बारीक तुकडाही धारदार व वेगाने डोळ्यात गेल्याने बुबुळाला जखमी करून डोळा निकामी करतो. कधी कधी हातोडीचा नेम चुकून हातावरही येतो, सतत ठोकून हात दुखतात ते वेगळेच. दगड तासत तासत त्याची एखादी कलाकृती तयार करायची हे दगडाएवढंच कठिण काम आहे. अतिशय संयमाने हे पाथरवटाचे काम करावे लागते. एक पाटा घडवण्यासाठी एक पूर्ण दिवस लागतो. पाट्याचा दगड आकारात तासून झाला की त्याला धार येण्यासाठी टाकी लावली जाते. पूर्वी दारोदार टाकी बसवून द्यायला हे पाथरवट फिरायचे पण आता पाट्याची जागा मिक्सरने घेतल्यामुळे पाट्याचा वापर बहुतांशी घरातून बंदच झाला आहे. आता पाटा फक्त शोभेची वस्तू म्हणून घरात ठेवला जातो आणि आपल्या पारंपरिक रिती-भाती सांभाळण्यासाठी पाचवी ,बारसं, लग्न अशा समारंभांसाठी वापरण्यात येतो. फार कमी घरात आता पाटा-वरवंटा वापरला जातो.
गिरणी झाल्यामुळे जाती तर फक्त शोभिवंत वस्तू व पाट्यांप्रमाणेच लग्नातील काही विधीसाठी उपयोगात येतात. काही हौशी व्यक्तीच घरी दळण्यासाठी जात्याचा कधीतरी वापर करतात. मोठी जाती तर आता बनतच नाहीत जी शेतातील टरफलासकट असणारा तांदूळ दळण्यासाठी उपयोगात यायची. ही जाती मी लहानपणी उरण नागावात माझ्या माहेरी पाहिली आहेत, विरंगुळा म्हणुन आई-आजीचा हात धरुन लहान मोठी अशी जाती फिरवलीही आहेत.
यावरून आपल्या लक्षात येईल की आता विजेच्या उपकरणांमुळे पाट्या-वरवंट्याचा, जात्यांचा खप किती कमी झाला असेल पूर्वीपेक्षा. पूर्वी जाती, पाटा-वरवंटा, खलबत्ते हे घरोघरी असायचे, पूर्वी तर दगडी उखळी होत्या, पाणी ठेवण्यासाठी मोठमोठी भांडी तयार केली जायची दगडाची. माझ्या सासरी उरण-कुंभारवाड्यात ही पाण्याची भांडी व एक उखळ अजून आहे ज्यात मी आता झाडे लावली आहेत. हौसे खातर नव-याने घेतलेल जातं, खलबत्ता आहे. जुुुुना सासूबाईनचा पाटा वरवंटा आहे, ओट्यावर छोटा पाटा वरवंटा आहे ज्याचा मी रोज आले व लसुण ठेचण्यासाठी वापर करते.
५)
त्यावेळच्या मोठमोठ्या कामांमुळे पाथरवटांना फुरसत मिळत नसे. आताच्या यांत्रिकी युगात मात्र नवनवीन विजेच्या उपकरणांमुळे पाथरवटांचा व्यवसाय अस्ताला चालला आहे. पण श्री रामदास जाधव यांना त्याबद्दल काही खंत नाही. ते त्यांच्या व्यवसायाशी प्रामाणिक व समाधानी आहेत. ते म्हणतात अजूनही लोक शोभेसाठी का होईना पाटे-वरवंटे, जाती, खलबत्ते घेतात त्यात आमची गुजराण होते. त्यांना फक्त खंत आहे ती हा व्यवसाय संपुष्टात यायला लगला आहे याची. ह्या धंद्यात वस्तूला कमी मागणी, अतिशय मेहनत व कमी मिळकत असल्याने नवीन पिढी ह्यात रस घेत नाही. परिणामी ह्या व्यवसायाचे भविष्य धोक्यात आले आहे. ही कला व हा व्यवसाय टिकावा अशी मनोमन ईश्वर चरणी प्रार्थना.
सौ. प्राजक्ता प. म्हात्रे, उरण
झी मराठी दिशा (शनिवार १२ - १८ ऑकटोबर २०१९ ) साप्ताहिकात प्रकाशित
क्या बात है ! सुरेख लेख व
क्या बात है ! सुरेख लेख व माहिती. जागू, तू समाजातील विवीध घटकांची व त्या त्या कलाकारांची कायम नव्या पद्धतीने ओळख करुन देतेस. बरेचसे व्यवसाय हे आता आधूनीकीकरणामुळे विस्मरणात गेले असले तरी तुझ्या लेखामुळे ते नव्याने उजळतात.
लहानपणी हे लोक दारावर यायचे तेव्हा माझी आई व आसपासच्या सार्या काकवा , वरवंटा व पाट्याला टाके मारुन घ्यायच्या.
जागू ताई मस्त आहे लेख. खूपच
जागू ताई मस्त आहे लेख. खूपच मेहनतीचं काम.
खर तर पाटा आणि जाते हा एक
खर तर पाटा आणि जाते हा एक चांगला व्यायाम आहे आणि आजकाल व्यायामासाठी जाते आणि पाटा वापरायचा ट्रेंड परत येतोय.
क्या बात है ! सुरेख लेख व
क्या बात है ! सुरेख लेख व माहिती. जागू, तू समाजातील विवीध घटकांची व त्या त्या कलाकारांची कायम नव्या पद्धतीने ओळख करुन देतेस. बरेचसे व्यवसाय हे आता आधूनीकीकरणामुळे विस्मरणात गेले असले तरी तुझ्या लेखामुळे ते नव्याने उजळतात +१११११
छान लेख.. आवडला
रश्मी.. अनुमोदन. आवडलं लिखाण
रश्मी.. अनुमोदन. आवडलं लिखाण जागूताई.
सुंदर लेख, सुंदर फोटो.
सुंदर लेख, सुंदर फोटो.
)
(पाटा वरवंटा यांचे फोटो दिलेस ते ठिक आहे पण अगदी मसाल्याचाही फोटो द्यायलाच हवा होता का? एकतर उरणचे रस्ते खराब झालेत खुप.
रश्मी आपल्याला वाटते तितके काही हे व्यवसाय विस्मरणात गेले नाहीएत. आपणच आपल्या कोषात जास्त गुरफटलो आहोत. जरा बाहेर पडले की लोहार, सुतार, शिंपी, चर्मकार, पाथरवट, कासार वगैरेंची दुकाने दिसतात आणि त्यांचा व्यवसायही व्यवस्थित सुरु आहे. मी आठ दिवसांपुर्वीच एक सुरेख चप्पल बांधून घेतली आमच्या चांभाराकडून.
लेख आणि फोटो दोन्ही सुंदर .
लेख आणि फोटो दोन्ही सुंदर .
बरेचसे व्यवसाय हे आता आधूनीकीकरणामुळे विस्मरणात गेले म्हणण्यापेक्षा खुप कमी ठिकाणी पहायला मिळतात.... म्हणजेच विस्मरणाच्या दारातच उभे आहेत... या गोष्टी काही काळानंतर पाहायला मिळतील की नाही याची शंका आहे.
छान आहे लेख
छान आहे लेख
छान लिहिलंय नेहमीप्रमाणे.
छान लिहिलंय नेहमीप्रमाणे.
मागे एकदा मी मावशीकडे सासवड ला गेलेलो.. तिथे पाथरवट दिसला.. त्याच्याकडुन छोटासा खलबत्ता घेतला. पण त्याच्या दगडाची खर ठेचलेल्या मिरच्या, लसुण, खोबरे यात येते.. काय करावे बरे..??
छान माहिती जागूताई!
छान माहिती जागूताई!
रश्मी, ऋतुराज, चिडकू, किल्ली,
रश्मी, ऋतुराज, चिडकू, किल्ली, प्राचीन, साई, डी.जे., वावे धन्यवाद.
शालीदा धन्यवाद. फक्त मसाल्याचेच टाकलेयत, मासे नाहीत. ::))
आहेत हे व्यवसाय पण पूर्वीसारख त्यांना डिमांड नाही. कारण त्या वस्तूची जागा विद्युत उपकरणानी, प्लास्टीकने घेतली आहे.
डी.जे. त्या खलबत्त्यात भिजवलेले तांदुळ आधी वाटून घ्यायचे एक दोन वेळा त्याने ती खर निघून जाते मग धुवून तो वापरायला घ्यायचा.
मस्तच लेख! पाटा वरवंट्यावर
मस्तच लेख! पाटा वरवंट्यावर वाटलेल्या मसाल्याची चव वेगळीच लागते म्हणतात.
O my god, जागु तो लेखात फोटो
O my god, जागु तो लेखात फोटो तुमचा आहे??????मी तुम्हाला थोडी वयस्कर व्यक्ती समजत होते
कुठे ते आठवत नाही पण मी भेटली आहे तुम्हाला
छान माहितीपूर्ण लेख आहे हा ही
छान माहितीपूर्ण लेख आहे हा ही !!! आमच्याकडचा पाटा वरवंटा किचनमधे एका कोपऱ्यात असाच पडून असतो.
क्या बात है ! सुरेख लेख व
क्या बात है ! सुरेख लेख व माहिती. जागू, तू समाजातील विवीध घटकांची व त्या त्या कलाकारांची कायम नव्या पद्धतीने ओळख करुन देतेस. बरेचसे व्यवसाय हे आता आधूनीकीकरणामुळे विस्मरणात गेले असले तरी तुझ्या लेखामुळे ते नव्याने उजळतात>> +१००
पूर्वी माहेरी मिक्सरच्या बरोबरीनी पाटावरवंटाही वापरला जायचा. नेहमी लागणारी पीठं गिरणीत दळली जायची मात्र काही खास पिठांसाठी वर्षांतून ३-४ वेळा तरी जाते वापरले जाई. पुढे आईला झेपेना आणि मग घरच बदलले तेव्हा जाते, पाटा-वरवंटा वगैरे आईने ओळखीच्या एकांना दिले. देताना हळदी कुंकू वाहून पाठवणी केली.
इथे माझ्याकडे मेड इन मेक्सिको दगडी खलबत्ता आहे तो बर्यापैकी वापरला जातो. मध्यंतरी नवरा एका मटेरियल्सच्या कॉन्फरन्सला गेला होता. तिथे भेट म्हणून छोटे दगडी खलबत्ते वाटत होते तर नुसती झुंबड! ब्लू टूथ आणि इतर गॅजेट्स नाकारुन खलबत्यालाच मागणी होती. आयोजकांचा अंदाज चुकल्याने खलबत्ते संपले म्हणून बरेच जण खट्टू झाले. नवर्याने आणलेल्या छोट्या खलबत्यावर लगेच लेकाने हक्क सांगितला.
श्मी आपल्याला वाटते तितके
श्मी आपल्याला वाटते तितके काही हे व्यवसाय विस्मरणात गेले नाहीएत. आपणच आपल्या कोषात जास्त गुरफटलो आहोत. जरा बाहेर पडले की लोहार, सुतार, शिंपी, चर्मकार, पाथरवट, कासार वगैरेंची दुकाने दिसतात आणि त्यांचा व्यवसायही व्यवस्थित सुरु आहे. मी आठ दिवसांपुर्वीच एक सुरेख चप्पल बांधून घेतली आमच्या चांभाराकडून. >>>>>. हो शाली. हे मात्र तितकेच खरे आहे की आपला दिवस कधी उजाडला आणी संपला या धामधुमीत ते कळत नाही, आणी मग वेळ वाचवायला आपण नुसते झापडं बांधुन फिरतो. इतरत्र लक्षच जात नाही.
पण गावाकडे आणी तसेही शहराबाहेर अजूनही हे व्यवसाय टिकुन आहेत.
छान ओळख
छान ओळख
आजी पाटा वरवंटा वापरायची वाटणं करायला
जुन्या आठवणी
तू समाजातील विवीध घटकांची व त्या त्या कलाकारांची कायम नव्या पद्धतीने ओळख करुन देतेस>> +११ नक्कीच आणि त्यासाठी खास धन्यवाद
मी तुम्हाला थोडी वयस्कर
मी तुम्हाला थोडी वयस्कर व्यक्ती समजत होते.............

काय हे आदू! तुम्ही तर जागूताईला चक्क जागूआज्जी केले.
पण जागूताई स्वभावाने मात्र आज्जीसारखीच आहे. प्रेमळ आणि मिश्कील.
जागूतै, पाटा-वरवंट्याचा लेख
जागूतै, पाटा-वरवंट्याचा लेख आणी मसाल्याचा फोटो झक्क जमलाय. पण हे टीझर झालं. त्या वाटलेल्या मसाल्याचं पूर्ण-स्वरूप, परमेश्वराचा प्रथमावतार कुठंय?

जुन्या गोष्टी जायच्याच. निसर्गनियमच आहे तो. त्याबद्दल खंत करण्यात अर्थ नसतो. पण एका अस्तंगत होत चाललेल्या व्यवसायाची माहिती दिल्याबद्दल जागूताईचे आभार आणी कौतुक.
आवडला लेख, जागूताई. गावाला
आवडला लेख, जागूताई. गावाला आजी पाट्याला टाके मारून घेत असे. जात्यालापण टाके मारावे लागतात का? मला आठवत नाही आता.
मस्त लेख. माझ्याकडे पाटा आहे
मस्त लेख. माझ्याकडे पाटा आहे, पण टाकी पूर्ण गेलीय.
आता पेणला फेरी मारावी लागणार पाटा घेऊन.
जात्याला पण टाके मारावे
जात्याला पण टाके मारावे लागतात.
मी अगदी 25-30 वर्षांपूर्वीपर्यंत पाटा रोजच्या रोज वापरलाय आईकडे. इडलीचा घाट घातलेला असला की मी भयंकर वैतागायचे कारण उडीद डाळ वाटायला खूप कठीण. शेवटी आईच्या मागे भुणभुण लावून मिक्सर घेतला. आमचा वरवंटा मस्त काळाभोर होता. ह्या पाट्याआधीचा पाटा काळ्या दगडाचा होता तो पाटा गेला पण वरवंटा राहिलेला. मिक्सर घेतल्यानंतर पाटा पडून राहिला पण वरवंटा बारश्याला कामी येई
आता तो पाटा मी आईकडून उचलून आणलाय. टाकी मारली की वापरायला लागेन. एक वर्तुळ पुरे झाले.
माझ्याकडे जातेदेखील आहे.
जात्याला पण टाके मारावे
जात्याला पण टाके मारावे लागतात >>उत्तरासाठी धन्यवाद, साधना.
मी अगदी 25-30 वर्षांपूर्वीपर्यंत पाटा रोजच्या रोज वापरलाय आईकडे. >> मी पण. तेव्हा मेंदीसुद्धा आम्ही पाट्यावरच वाटत असू. मेंदीचे कोन इ. लाड नव्हते
डी.जे. त्या खलबत्त्यात
डी.जे. त्या खलबत्त्यात भिजवलेले तांदुळ आधी वाटून घ्यायचे एक दोन वेळा त्याने ती खर निघून जाते मग धुवून तो वापरायला घ्यायचा.>> गेली गेली ती कचकच.. मी तांदुळ धुवुन कुटले त्यात.. थँक यु जागु ताई..!
सुरेख लेख जागुली आमचे छोटे
सुरेख लेख जागुली
आमचे छोटे अन मोठे (रोवलेले) जाते आठवले.. पाटा काही वापरल्याचे आ ठवत नाही.. जात्यावर मात्र माझी आजी मीठ(खडे मीठविकत घेऊन), हळ्द, तिखट , मसाले सगळेच दळायची..
गोल्डफिश, असुफ, शालीदा
गोल्डफिश, असुफ, शालीदा धन्यवाद.
स्वप्ना राज हो पाट्यावरच वाटण, चटणी खुप चविष्ट लागते.
आदू होत हो अस. तरी तो दोन-तीन वर्षा पूर्वीचा आहे फोटो.
स्वाती लेकाने काही कुटल का त्यात
फेरफटका तुम्ही परमेश्वराचा प्रथमावतार अनुभवण्यासाठी एकदा आमच्या उरणात फेरफटका मारा.
चंद्रा धन्यवाद. जात्यालाही टाके मारावे लागतात.
साधनाकडे जाते आहे ते ती नुसते शो साठी ठेवत नाही. अधून मधून ती दळते हे खुप कौतुकास्पद आहे.
चंद्रा तुमच्यासाठी हा माझा पाट्या-वरवंट्याचा लेख https://prajaktamhatretarangmaniche.blogspot.com/2016/06/blog-post_88.html
डीजे - गुड
अनघा आमची दिवाळीची साखर, बेसनही आजी पूर्वी जात्यावरच दळायची.
"तुम्ही परमेश्वराचा
"तुम्ही परमेश्वराचा प्रथमावतार अनुभवण्यासाठी एकदा आमच्या उरणात फेरफटका मारा." - ह्यावरून मला पु.लं. चं, मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर आठवलं. 'मुंबई ते नागपूर प्रवासखर्च जमेस धरला तर मुंबईत संत्री स्वस्त पडतात. तेव्हा ह्या आमंत्रणाचा कुणीही स्वीकार करणार नाही, काळजी नसावी.'

तुमचं आमंत्रण तसं नाही असं मी समजून चालतो आणी कधीतरी उरण ची ट्रीप, तुमची भेट आणी मत्स्यगोत्री जेवण ह्या सगळ्याचा योग येईल अशी आशा ठेवतो.

अहो फेरफटका मी मनापासून बोलले
अहो फेरफटका मी मनापासून बोलले फक्त शब्द तुमच्याच प्रतिसादातले वापरले. नक्की या एक दिवस. मासे भरल ताट नककीच मिळेल तुम्हाला.
अतिशय सुंदर लेख..आताच्या
अतिशय सुंदर लेख..आताच्या पिढीतील कितीजणांचा अशा गोष्टींना हात लागला असेल ? माझ्या लहानपणी आजीच्या घरात होते ' जाते' ..सुट्टीत मजा आणि खेळ म्हणून मदत पण करायचो.. अजूनही आले - लसूण पेस्ट करण्यासाठी होतो वापर छोट्या खलबत्त्याचा
जागू ताई मला छोटं जातं
जागू ताई मला छोटं जातं घ्यायचं होतं म्हणून इथे जायचे ठरवले पण रामवाडीच्या पूर्ण रस्त्यावर, रामवाडीसमोर कुठेच नाही दिसले हे पाथरवट. त्यांना संपर्क करण्यासाठी काही मार्ग आहे का?
Pages