पाथरवट - दगडाचा कलाकार

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 October, 2019 - 02:50
patharvat

पेण मध्ये असलेल्या वाशी ह्या सासरच्या गावी आमची वर्षातून दोन-तीन वेळा फेरी होते. प्रत्येक वेळी तिथे जाताना मला नेहमी एका गोष्टीच आकर्षण असत ते म्हणजे हायवेवर असलेल्या रामवाडीच्या समोर रस्त्याच्या कडेला ठोकत असलेल्या पाथरवटाच्या दगडी वस्तूंच. तिथून येताना नेहमी आम्ही गाडी थांबवतो आणि पाथरवटांकडून छोटे पाटा-वरवंटे, खलबत्ता अशा वस्तू कधी आम्हाला घरात तर कधी भेट देण्यासाठी घेतो. यावेळी जरा वेळ काढूनच या पाथरवटांशी गप्पा मारल्या. गप्पांतून त्यांच्या व्यवसायाबद्दल माहिती मिळाली आणि पाथरवटांच्या त्या दगडी कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला.

रामवाडीच्या हायवेच्या कडेला श्री रामदास जाधव व सौ. संगिता जाधव यांचं कुटुंब फलटण वरून येऊन पेणमध्ये वास्तव्य करत हे दगडी कलाकुसर करण्यात रमलेली असतात. त्यांचे नातलगही तिथेच हा व्यवसाय करतात. त्यांची झोपडीवजा तीन चार दुकाने जवळ जवळच आहेत. त्या दुकानांत छोटे-मोठे पाटा वरवंटे, खल-बत्ते, छोटी-मोठी जाती अगदी खेळण्यातलीही, मूर्ती अशा वस्तू आपले मन आकर्षीत करून घेत असतात. त्यांचं ठक ठक आवाजात काम चालूच असत. जवळ काही अवजारे असतात वेगवेगळ्या आकारातली. अवजारांच्या, आपल्या बळाच्या, बुद्धीच्या व कौशल्याच्या साहाय्याने ह्या कलाकृती पाथरवट बनवत असतात.
१)

२)

३)
Code

४)

Code

श्री रामदास जाधव यांच्याकडून माहिती मिळाली की ह्या वस्तूंसाठी लागणारे दगड ते स्थानिक डोंगरातले घेत नाहीत. कारण स्थानिक दगडांना वस्तू घडवताना चिरा पडतात. कल्याणच्या डोंगरातून खणून आणलेले दगड ते विकत घेतात. क्वारीतील दगडही तुटलेले असल्याने ते ह्या कामासाठी चालत नाहीत. दगडी वस्तू घडवत असताना त्यावर मारलेला प्रत्येक ठोका योग्य जागी पडावा लागतो. हे ठोके मारत असताना दगडांचे तुकडे आजूबाजूला, अंगावर उडत असतात. अनेकांचे दगडाचे तुकडे डोळ्यात गेल्याने डोळेही गेले आहेत. कारण निघालेला बारीक तुकडाही धारदार व वेगाने डोळ्यात गेल्याने बुबुळाला जखमी करून डोळा निकामी करतो. कधी कधी हातोडीचा नेम चुकून हातावरही येतो, सतत ठोकून हात दुखतात ते वेगळेच. दगड तासत तासत त्याची एखादी कलाकृती तयार करायची हे दगडाएवढंच कठिण काम आहे. अतिशय संयमाने हे पाथरवटाचे काम करावे लागते. एक पाटा घडवण्यासाठी एक पूर्ण दिवस लागतो. पाट्याचा दगड आकारात तासून झाला की त्याला धार येण्यासाठी टाकी लावली जाते. पूर्वी दारोदार टाकी बसवून द्यायला हे पाथरवट फिरायचे पण आता पाट्याची जागा मिक्सरने घेतल्यामुळे पाट्याचा वापर बहुतांशी घरातून बंदच झाला आहे. आता पाटा फक्त शोभेची वस्तू म्हणून घरात ठेवला जातो आणि आपल्या पारंपरिक रिती-भाती सांभाळण्यासाठी पाचवी ,बारसं, लग्न अशा समारंभांसाठी वापरण्यात येतो. फार कमी घरात आता पाटा-वरवंटा वापरला जातो.

गिरणी झाल्यामुळे जाती तर फक्त शोभिवंत वस्तू व पाट्यांप्रमाणेच लग्नातील काही विधीसाठी उपयोगात येतात. काही हौशी व्यक्तीच घरी दळण्यासाठी जात्याचा कधीतरी वापर करतात. मोठी जाती तर आता बनतच नाहीत जी शेतातील टरफलासकट असणारा तांदूळ दळण्यासाठी उपयोगात यायची. ही जाती मी लहानपणी उरण नागावात माझ्या माहेरी पाहिली आहेत, विरंगुळा म्हणुन आई-आजीचा हात धरुन लहान मोठी अशी जाती फिरवलीही आहेत.

यावरून आपल्या लक्षात येईल की आता विजेच्या उपकरणांमुळे पाट्या-वरवंट्याचा, जात्यांचा खप किती कमी झाला असेल पूर्वीपेक्षा. पूर्वी जाती, पाटा-वरवंटा, खलबत्ते हे घरोघरी असायचे, पूर्वी तर दगडी उखळी होत्या, पाणी ठेवण्यासाठी मोठमोठी भांडी तयार केली जायची दगडाची. माझ्या सासरी उरण-कुंभारवाड्यात ही पाण्याची भांडी व एक उखळ अजून आहे ज्यात मी आता झाडे लावली आहेत. हौसे खातर नव-याने घेतलेल जातं, खलबत्ता आहे. जुुुुना सासूबाईनचा पाटा वरवंटा आहे, ओट्यावर छोटा पाटा वरवंटा आहे ज्याचा मी रोज आले व लसुण ठेचण्यासाठी वापर करते.
५)

त्यावेळच्या मोठमोठ्या कामांमुळे पाथरवटांना फुरसत मिळत नसे. आताच्या यांत्रिकी युगात मात्र नवनवीन विजेच्या उपकरणांमुळे पाथरवटांचा व्यवसाय अस्ताला चालला आहे. पण श्री रामदास जाधव यांना त्याबद्दल काही खंत नाही. ते त्यांच्या व्यवसायाशी प्रामाणिक व समाधानी आहेत. ते म्हणतात अजूनही लोक शोभेसाठी का होईना पाटे-वरवंटे, जाती, खलबत्ते घेतात त्यात आमची गुजराण होते. त्यांना फक्त खंत आहे ती हा व्यवसाय संपुष्टात यायला लगला आहे याची. ह्या धंद्यात वस्तूला कमी मागणी, अतिशय मेहनत व कमी मिळकत असल्याने नवीन पिढी ह्यात रस घेत नाही. परिणामी ह्या व्यवसायाचे भविष्य धोक्यात आले आहे. ही कला व हा व्यवसाय टिकावा अशी मनोमन ईश्वर चरणी प्रार्थना.

सौ. प्राजक्ता प. म्हात्रे, उरण

झी मराठी दिशा (शनिवार १२ - १८ ऑकटोबर २०१९ ) साप्ताहिकात प्रकाशित

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी जाते तेव्हा नेहमी असतात. संपर्क काहिच नाही त्यांचा माझ्याकडे.

नवीन Submitted by जागू-प्राजक्ता-... on 18 December, 2019 - 09:55>>>>>
ताई नक्की कुठे बसतात ते exact सांगाल का?
काल मी रामवाडी हायवे वर सगळीकडे पाहिले कुठेच नाही दिसले. फक्त चटई विकणारे, टोपल्या वगैरे विकणारे होते

छान लेख. आमच्याकडेही २ पाटे वरवंटे होते. उखळ, मुसळ, जाते सगळेच होते घरी लहानपणी आणि वापरही केला आहे आई बरोबर.

सध्या मात्र काहीच नाही वापरत. पाट्यावर वाटलेली चटणी काय अप्रतीम लागते..

Pages