युगांतर - आरंभ अंताचा! भाग ४३

Submitted by मी मधुरा on 12 October, 2019 - 05:25

फुलांच्या, सोन्याच्या माळांनी भरलेल्या चहूबाजू आणि मखमली गालिचे टाकलेले भव्य सभागृह! अत्यंत सुंदर कलाकुसरीचे सुशोभीकरण त्याला शोभून दिसत होते. मध्यभागी एक सुंदर गोलाकार पात्र होते.... नितळ पाण्याचे! कडेच्या तबकात विशाल आणि सुबक धनुष्य काही बाणांसोबत विराजमान होतं.

सभागृह खचाखच भरलेले होते. स्वयंवरात भाग घ्यायला आलेल्या क्षत्रियांकरता मखमली आसने ठेवण्यात आली होती. कर्ण, दुर्योधन, मगधनरेश, मद्रनरेश आणि आलेले सर्व द्रौपदीच्या दर्शनाकरता उत्सुक झाले होते. कृष्ण आणि बलराम आसनस्थ झाले, तेव्हा कृष्णाने चौफेर नजर फिरवली.
"अनुज? तू स्मित करतो आहेस? समोर बघ. आपली द्वारका ज्याच्या मुळे पुनर्स्थापित करावी लागली, ज्याच्यामुळे तुझ्यावर रणछोड नावाचा कलंक लागला, तोच..... तोच निर्लज्ज जरासंध नजरेसमोर ऐटीत बसलेला आहे..... आणि तु आनंदी होतो आहेस?"
"आनंद तर होणारचं ना दाऊ!"
"कशामुळे? अधर्मी दैत्य प्रवृत्तीच्या व्यक्तीचे दर्शन झाले म्हणून??"
"नाही दाऊ."
"मग कोणाला पाहून प्रसन्नता पसरलीये एवढी तुझ्या मुखकमलावर?" बलरामने वैतागून विचारले.
"प्रत्येकाचा आपापला दृष्टीकोन आणि आपापली नजर असते, दाऊ. तुम्हाला या सभागृहात समस्या दिसली आणि मला त्याचा उपाय!"
"सरळ सरळ सांगशील?"
"म्हणजे तुम्हाला अधर्मी व्यक्तीचे दर्शन झाले आणि मला अधर्मी व्यक्तीच्या यमराजांचे!"
"म्हणजे? तू भीमबद्दल बोलतो आहेस? कुठे दिसला तुला तो?"
कृष्णाने प्रवेशद्वाजवळ उभे असणाऱ्या ब्राह्मणांच्या दिशेने खूण केली.
"अनुज? भीम नाही तर आता या ब्राह्मणाच्या हातून वध करवून घेणार आहेस जरासंधाचा?"
"नाही दाऊ! जरासंधाचा अंत तर केवळ भीमाच्याच हाती शक्य आहे."
"मग काय आता तुला त्या ब्राह्मणामध्येही भीम दिसू लागला आहे?"
"हो दाऊ!"
"अनुज, आता हे खेळ थांबव. बिचारे पांडव लाक्षागृहातच गेलेत.... हो ना? आणि मी जरासंधाचा विचार सोडावा म्हणून भीम जिवंत असल्याचा भास निर्माण करतो आहेस तू. खरं की नाही?"
"नाही दाऊ! मी तुमच्याशी कधी असत्य बोलतो का?" निरागस चेहरा करत कृष्ण म्हणाला.
"असं? मग काय तिथे धिप्पाड शरीराचा तो ब्राह्मण वेष घालून उभा असलेला भीम आहे?"
"हो दाऊ!"
"आणि त्याच्या सोबत उभे आहेत ते चौघे युधिष्ठिर, नकुल, अर्जुन, सहदेव असतील. नै का?" बलरामाने उपरोधिक स्वरात विचारले.
"हो दाऊ."
बलरामने कृष्णाकडे चिडून पाहिले. बलरामाचा चेहरा पाहून कृष्णाला हसू आवरेना.
"हेच..... हेच तुझं वागणं कळत नाही मला. थट्टा करतोस आणि वर हसतोस? ते ही अश्या गंभीर विषयावर?"
"शांत व्हा, दाऊ! द्रौपदीचे स्वयंवर आहे आज. ती कुठल्याही क्षणी येईल इथे. आणि मी तर तुमच्याच सोबत आहे. नंतर हवे तेव्हा, हवे तितके रागे भरू शकता तुम्ही मला!"
"अनुज...."
"तेच तर दाऊ! मी अनुज आहे ना तुमचा! अजूनही चिडला आहात तुम्ही तुमच्या अनुजावर?" कृष्ण एकदम नाटकी केविलवाणा चेहरा करत म्हणाला आणि बलराम निवळला. 'हा कृष्ण नेहमी एका बाणात दोन निशाणे साधतो. बोलणी खाणे टाळून देतो आणि वर समोरच्याला शब्दात गुंडाळून याच्यावर रागवणे कसे निष्ठूरपणाचे आहे हे भासवत समोरच्याला गप्प करतो. याचा मोठा बंधु बनावे किंवा लहान..... शेवटी वर्चस्व याचेच!' बलराम स्वतःशीच हासला.
पांडव कडेला उभे राहून स्वयंवर संपून पंगत बसण्याची वाट पाहत होते. बघता बघता त्यांची नजर सर्व स्वयंवरात भाग घ्यायला आलेल्या राजांवर पडू लागली. चक्क हस्तिनापूरहून कौरव स्वयंवरात आले आहेत हे पाहून त्यांनी 'आ' वासले. दुर्योधनाला पाहून भीमाच्या पिळदार बाहुंवरील नसा प्रचंड ताणल्या गेल्या. त्याच्या श्वासांची गती अनियमितपणे वाढली. युधिष्ठिराला जाणवलं. त्याने भीमाकडे पाहून नकारार्थी मान डोलावली.
"का भ्राताश्री? का नाही?" भीम रागातच पण हळू आवाजात कुजबुजला.
"भीम, ही न्याय करायची जागा नाही."
"का भ्राताश्री? मी त्याला आत्ताच्या आत्ता धडा शिकवू शकतो. लाक्षागृह नावाची त्याने माझ्या आत जी आग लावलीये ना..... मी त्याच आगीची दाहकता दाखवून देईन त्याला आज." दोन्ही हातांच्या मुठी एकमेकांवर आदळत भीम म्हणाला.
"पण भीम तो आत्ता पांचाल नगरीचा अतिथी आहे. त्याच्यावर हल्ला केलास तर....."
"सगळे मधे पडतील? पडू देत. त्या सर्वांना पुरुन उरेन मी."
"तुझ्यापुढे कोण तग धरेल भीम? पण पांचाल नगरी ही वर्तमानात आपली अन्नदात्री आहे. तिच्याच अतिथीचा अनादर म्हणजे स्वयं पांचाल नगरीचा अपमान. ही कृतघ्नता आपल्याला शोभत नाही, भीम. हे धर्मसंमतही नाही. न्याय मलाही हवा आहे. पण तो मिळवताना कोणा दुसऱ्यावर अन्याय होता कामा नये. पांचाल नगरीचा विचार कर. शांत हो."
कसेबसे भीमने स्वतःवरचे नियंत्रण पुन्हा मिळवले. त्याने नजर फिरवली आणि नकूल कडे पाहिले. तर तो आणि सहदेव मद्रनरेशकडे एकटक पाहत उभे होते. मद्रनरेशना सरळ जाऊन वंदन करावं आणि 'मामाश्री, आम्ही जिवंत आहोत.' सांगत त्यांना मिठी मारावी अशी तीव्र इच्छा त्यांच्या मनात झळकून गेली. पण क्षणार्धातच सहदेव आणि नकूलने स्वतःला सावरत चेहऱ्यावरचे भाव पुर्ववत केले.
अश्वत्थामा राजसभागृहात आला आणि दुर्योधनाने त्याला आलिंगन देत स्वतः जवळच्या आसनावर बसवले.
"तुझीच वाट पाहत होतो. कर्णाला तू येणार आहेस असं सांगितलं होतं मी. त्यात धनुर्विद्येचा पण असावा असे दिसते आहे. म्हणल्यावर तू असायलाच हवं इथे. वाटलं रद्द केलेस की काय?"
"अरे मित्रा, मी कसे रद्द करेन? निमंत्रणही होते म्हणल्यावर येणारच ना स्वयंवर पहायला?"
"स्वयंवर पहायला? फक्त पाहायला? भाग घेणार नाहीस तू?"
"मी कसा भाग घेईन दुर्योधन?"
"का अश्वथामा? पांचालनरेशने केलेल्या ब्राह्मण-क्षत्रिय भेदामुळे अजून तू....."
"नाही दुर्योधन. असे काहीही नाही. माझ्या पिताश्रींनी ज्याला बंधू समान मानले, त्या मित्राची कन्या आहे द्रौपदी. त्या नात्याने ती माझी भगिनी झाली आणि म्हणून शास्त्रानुसार हा विवाह होऊ शकत नाही. मग मी भाग कसा घेईन? मी तर स्वयंवरात केवळ उपस्थिती लावायला आलोय."
अश्वत्थामा हा उत्तम धनुर्धारी! आणि आता तोही भाग घेत नाहीये म्हणल्यावर द्रौपदीला आपणच जिंकणार; असं वाटूनही असेल कदाचित पण दुर्योधनाच्या चेहऱ्यावर एक स्मित झळकलं खरं!
"पाहिलेत दाऊ?"
"कोणाला? जरासंधाला? केव्हापासून बघतोच आहे त्या विकृतीला."
"नाही दाऊ. काही काळ जरासंधाचा विचार सोडून यांच्या कडे नजर टाका.... पहा एक राजा - एक भूपती बनूनही आपलं मुळ तत्व न बदलणाऱ्या दोघांना!"
"कोण? अश्वत्थामा?"
"आणि कर्ण सुद्धा! दोघेही होते तसेच आहेत. एक जण दान करणे सोडत नाही आणि दुसरा संस्कार-मान-मर्यादा!"
"पण हे स्थिरत्व घातक आहे अनुज!"
"काय सांगावे दाऊ...... भविष्यात एखाद्याने स्वतःचे तत्व बदलले म्हणून त्याचा घात होऊ शकतो आणि दुसऱ्याने त्याचे तत्व बदलले नाही म्हणून त्याचाही!"
द्रुपद राजा मुख्य आसनावर स्थानापन्न झाला आणि जमलेल्या नगरवासीयांनी 'पांचालनरेश चा विजय असो!' अश्या घोषणाही दिल्या. काहीही वैयक्तिक वैर नसताना केवळ द्रोणाचार्यांना गुरुदक्षिणा म्हणून, ज्याचा राजमुकुट आपण जमिनीवर पाडला, त्याच्याच नावाने विजय घोषणा देताना, अर्जुनाला पांचालनरेशच्या केलेल्या अपमानाची भरपाई केल्यासारखे समाधान मिळाले.
जयजयकार थांबवत धृष्टद्युम्नाने सर्वांना प्रणाम केला.
"मी पांचालनगरीचा युवराज म्हणून पांचाल नगरी आणि महाराजांच्या वतीने इथे जमलेल्या सर्व उपस्थितांचे स्वागत करतो. माझी भगिनी, दिव्यजन्मा द्रौपदीच्या स्वयंवरास तुमच्या सारख्या वीरांची उपस्थिती आणि स्वयंवरात सहभागी होण्याची आतूरता पाहून आम्ही धन्य झालो आहोत. तुम्ही जिच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहात, तिचे आता मी पाचारण करतो आहे. प्रिय द्रौपदी...... "
दासींनी फुलांची उधळण करत पांढऱ्या जमिनीवर लाल-गुलाबी रंगाचा कोमल मार्ग बनवला. चेहऱ्यावर अग्नीतेजाचा भास व्हावा अशी एक सुंदर कन्या त्यावरून चालत तिच्याकरता रिक्त ठेवलेल्या आसनाकडे जाऊ लागली. तिच्यावर सोनेरी दागिने म्हणजे अग्नीची आसमंताकडे झेपावणारी सोनेरी वलयेच जणू! सगळे तिच्या रूपाकडे बघतचं राहिले. गुडघ्यांपर्यंतचे लांब केस तिने सुंदर त्रिवेणी मध्ये बांधून त्यावर पांढऱ्या फुलांना माळले होते. मोहकता म्हणावे की अजून काही? निशब्द झाल्यासारखे सगळे तिच्याकडे बघत होते.
"तर या स्वयंवरात धनुर्विद्येचे परिक्षण होणार आहे. सर्वांना मध्यभागी दिसत असणार्या जलातील प्रतिबिंबाला पाहून वरती असणाऱ्या अस्थिर मत्स्याचा डोळा लक्ष म्हणून साधायचा आहे. जो धनुर्धारी हे साध्य करेल, द्रौपदी त्यालाच वरमाला घालून सन्मानित करेल."
'प्रतिबिंब पाहून लक्षभेद?' 'कसं शक्य आहे?' 'एकापेक्षा जास्त वेळा संधी ठेवली असती तर शक्यही असते पण.....'
आपापसात चर्चा सुरु झाली आणि द्रुपद चिंतीत झाला. हस्तिनापुरास निमंत्रण धाडूनसुद्धा अर्जुन काही स्वयंवरात आलेला दिसत नव्हता. 'त्याच्या ऐवजी दुर्योधन का आला असेल? द्रोणाला संशय तर आला नसेल? आणि कदाचित म्हणूनच त्याने अर्जुनाला पाठवले नसेल का.....?'
"धृष्टद्युम्न...."
"बोला पितामहाराज."
"अर्जुन आलेला दिसतोय का?"
"कुंती पुत्र अर्जुन? नाही महाराज. मी तर ऐकले आहे की लाक्षागृहात पांडवांचा दुर्दैवी मृत्यू झाला."
'मृत्यू? मी माझ्या अपमानाचा बदला घेण्याआधीच अर्जुन मेला? कसं काय? असो..... द्रोण, तू मात्र तैयार रहा. द्रौपदी माझ्या कामी आली नाही म्हणून काय झालं? धृष्टद्युम्नच्या हस्ते तुझा मृत्यू हाच माझा बदला असेल.'
" पण तुम्ही चिंता करू नका, पिताश्री. इथे जमलेले राज्याधिपती सुद्धा उत्तम धनुर्धारी आहेत. त्यापैकी कोणीतरी हा पण नक्की पूर्ण करेल. चिंता करू नका."
'तुला काय कळणार, मला कशाची चिंता आहे ते! तसही जर अर्जुन मेला असेल तर द्रौपदीचा विवाह होतो, न होतो..... काय फरक पडणार आहे? आणि अर्जुन नसेल तरी स्वयंवर कोणी जिंकणार आहे?"' त्याने नजर फिरवली.
अर्जुनाचे लक्ष सिंहासना शेजारी मांडलेल्या आसनांकडे गेले. त्या आसनावरचा निळसर छटा असणारा आपल्याकडे बघून ओळखीचे स्मित करतो आहे असा भास त्याला झाला. मग त्यानेही कृष्णाला पाहून हात जोडून स्मित केले.
"काय रे? कोण आहे तो? ओळखतो का तो तुला?"
"आता ते तर त्यालाच विचारावे लागेल ना, दाऊ?"
"तू कधी सुधारणार नाहीसच. एकदा तरी सरळ उत्तर देणार आहेस का?"
"नक्की देईन दाऊ."
"कधी?"
"तुम्ही सरळ प्रश्न विचाराल तेव्हा!"
"हो का? मगं आता सरळ प्रश्नच विचारतो. ज्याने आत्ता तुला पाहून नमस्कार केला, त्याला ओळखतोस तू?"
"हो, दाऊ. तो सर्वश्रेष्ठ धनुर्धारी आहे या स्वयंवरात आलेला."
"पुन्हा तेच! तुला सर्वत्र पांडवच दिसतात."
"आणि ते सिद्ध झालं तर?"
"कसं होणारेय ते सिद्ध?"
"दाऊ, हा स्वयंवराचा पण तुम्हाला कसा वाटतो?"
"कसा म्हणजे?"
"म्हणजे कठीण वाटतो की सोप्पा?"
"कठीणच आहे खरंतर! मला तर वाटतंच नाही कोणी जिंकू शकेल या स्पर्धकांपैकी."
"अर्जुन इथे असता तरी तुम्हाला असचं वाटलं असतं?"
"नाही. पण अश्या जर - तर च्या गोष्टी का कराव्यात?"
"दाऊ, भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य सोडून केवळ अर्जुन हे लक्ष साध्य करू शकतो, हे राजा द्रुपदनाही माहिती आहे. त्यांनी त्याच हेतूने हा पण ठेवला असणार. त्यामुळे जर कोणी हा पण पूर्ण केला तर तो अर्जुनच असेल, याची खात्री बाळगा."
"काय म्हणालास तू? द्रुपदाला द्रौपदीचा विवाह अर्जुनाशी लावायचा होता? पण का? अर्जुनाने तर किती अपमानकारक पध्दतीने हारवले होते पांचालनरेशला! मी असतो तर प्रतिशोध म्हणून हस्तिनापुरास निमंत्रणच नसते दिले."
कृष्ण हसला.... "दाऊ, एकतर तुमच्यासारखा द्रुपद स्वच्छ मनाचा आजिबात नाही! अहंकारी आहे, राक्षसी प्रवृत्तीचा आहे. आणि दुसरे म्हणजे....... मला हे स्वयंवर प्रतिशोधाचाच एक भाग वाटते!"
"स्वयंवर आणि प्रतिशोध? झाले तुझे शब्दांचे खेळ सुरु! स्वतःची कन्या स्वत:च शत्रूच्या हाती सोपवायची हा केवळ मूर्खपणा आहे. यात कसला आलाय प्रतिशोध? जाऊ दे.... मी स्वयंवर बघायला आलो आहे इथे. तुझ्याशी बोलून मनातला गोंधळ वाढवायला नाही."
बलरामाने समोर पाहिले आणि बलरामशिष्य दुर्योधन पण पूर्ण करायला उठला.......

©मधुरा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुड!

छान झालाय भाग !
स्वयंवर आणि प्रतिशोध? >>>> हे कसे ते सांगाल का?
कि पुढच्या भागात येइल ते?

धन्यवाद आसा......

आधीच्या काही भागांमध्ये द्रुपदाने यज्ञ केल्याचे उल्लेख आहेत. बहुदा तुमच्या नजरेखालून गेले नसतील. म्हणून इथे थोडी पार्श्वभूमी सांगते.....
द्रोणाचार्यांचा आणि अर्जुनचा बदला घ्यायचा होता द्रुपदाला.
(कारण द्रोणाचार्यांना गुरुदक्षिणा द्यायला अर्जुनाने द्रुपदाला हरवले होते.) बदला किंवा प्रतिशोधाची भावना ठेवून त्याने यज्ञ केला आणि त्याला द्रौपदी आणि धृष्टद्युम्न प्राप्त झाले.

द्रौपदी अर्जुनाला अपमानास्पद आयुष्य देईल आणि धृष्टद्युम्न द्रोणांचा वध करेल असे यज्ञात प्रगटलेल्या अग्नीदेवतेने सांगितले. म्हणून द्रुपदाला द्रौपदीला कसंही करून अर्जुनच्या गळ्यात बांधायचे होते. (अर्जुनच्या आयुष्यात तिला पाठवायचे होते.) त्याच्या या इराद्यांपासून द्रौपदी आणि धृष्टद्युम्न अनभिज्ञ होते. म्हणून द्रौपदीचे अर्जुनशी लग्न लावायला त्याने असा पण ठेवला जो केवळ अर्जुन जिंकू शकेल.

म्हणून प्रतिशोधाचा एक भाग होता तिचा स्वयंवर असे कृष्ण म्हणतो.

Happy

Happy पुढच्या भागात याचे स्पष्टीकरण आहेच. पण भुतकाळातील भागांमध्येही याचे धागेदोरे आहेत.

अगदी उत्तम पध्दत आहे ती.

सलग रसग्रहणाची मजाच वेगळी!
मी सुद्धा काही वेगळा विचार केला आहे युगांतर बद्दल! लवकरच कळवेन तसे! Happy

द्रौपदी ही गाहुवरणीय होती व तिच्या शरीराचा सुगंध येत होता असं मी कुठेतरी वाचलं आहे बहुतेक.... पण खात्री नाही.. कदाचित मृत्युंजय madhe आहे

शरीराला सुगंध सत्यवतीच्या होता. त्याची कथा सुद्धा आहे युगांतरच्या एका भागात!............................................... हुं... ते मी वाचलं ...

द्रौपदी ही गाहुवरणीय होती व तिच्या शरीराचा सुगंध येत होता असं मी कुठेतरी वाचलं आहे बहुतेक.... पण खात्री नाही.. कदाचित मृत्युंजय madhe आहे

Submitted by Dhangya on 15 October, 2019>>
युगंधर मधे आहे असा उल्लेख. द्रौपदीच्या सुगंधाने आकर्षित होऊन जयद्रथ कुटीत येतो अस काहितरी आहे . नक्की आठवत नाही

<<<युगंधर मधे आहे असा उल्लेख. द्रौपदीच्या सुगंधाने आकर्षित होऊन जयद्रथ कुटीत येतो अस काहितरी आहे . नक्की आठवत नाही>>> युगंधर मध्ये आहे उल्लेख तसा. जेव्हा अज्ञातवासात जायचे असते तेव्हा तिला विराट पत्नी ची सौन्दर्य परिचारिका म्हणून काम ठरवतात जेणे करून तिझा सुंगध सौन्दर्य प्रसाधनांमध्ये सामावून जाईल आणि राणीची परिचारिका असल्या मुळे इतर कोना पुढे यावे लागणार नाही.

Pages