नाला इस शोर से क्युं मेरा दुहाई देता - शेख़ इब्राहीम ज़ौक़

Submitted by सामो on 9 October, 2019 - 12:50

जौक यांची एक सुंदर गझल वाचनात आली. संपूर्ण गझलेचा अर्थ मला नीट कळला नाही परंतु जेवढ्या शेरांचा कळला तेवढा देते आहे. जेवढ्यास तेवढेच भाषांतर झाले आहे. जास्त भर घालून रंगविता आले नाही याबद्दल क्षमस्व.
वर दिलेल्या दुव्यातील अन्य शेरांचे अर्थ कोणी लावले व मांडले तर आनंदच होइल.
____________
नाला इस शोर से क्युं मेरा दुहाई देता
ए फलक गर तुझे ऊंचा न सुनाई देता

- हे ईश्वरा,जर तुला कमी ऐकू येत नसते तर, मला इतका ऊंच आवाजात विलाप करावाच लागला नसता. इथे मला कबीरांचचीओळ आठवते - चींटी के पग नूपुर बाजे सो भी साहब सुनता है वरील शेर आणि ही ओळ विसंगत आहेत. कोणाला इश्वराचे रुप काही वाटू शकते तर अन्य कोणाला बरोब्बर विरोधीही वाटू शकते आणि हीच मिस्टरी आहे, गूढ आहे.
.
देख छोटोंको है अल्लाह बडाई देता
आंसमां आंख के तिल मे है दिखाइ देता

- डोळ्यांच्या इवल्याशा बाहुलीने सारे आकाश पहाता येत खरोखर ईश्वर लहानग्यांनाही किती मोठेपणा वेळप्रसंगी बहाल करु शकतो - करतो. इथे बायबलमधील ओळ आठवल्याशिवाय रहात नाहि - Blessed are the meek: for they shall inherit the earth.
.
लाख देता था फलक आजार गवारा थे मगर
इक तेरा ना मुझे दर्द-ए-जुदाई देता

- ईश्वराने मला लाखो यातना बहाल केल्या असत्या तरी हरकत नव्हती, पण हे तुझ्यापासूनच्या वियोगाचे दु:ख मला व्याकुळ करते, हे तेवढे द्यायला नको होते.
.
दे दुआ वादी-ए-पुर-खार-ए-जुनूं को हर गाम
दाद ये तेरी है ए आबला-पाई देता

- वणवण करुन माझ्या तळपायांवर पडलेले हे घट्टे, व्रण हे तुझ्याच न्यायप्रियतेचेच प्रतिक आहे आणि म्हणूनच काटेकुटे असलेल्या रानटी झाडाझुडपाच्या,खाचाखळग्यांच्या दरीला हे ईश्वरा, मी तुझी कृपाच समजतो. अतिशय सुरेख वाटतो हा शेर. इथे ना ईश्वरापाशी गार्‍हाणे आहे, ना त्याच्यावरती रोष आहे. आहे तर बस्स - एक समजूतदारपणा, आल्या परिस्थितीचा आदरयुक्त स्वीकार.
.
मै हूं वोह सैद कि फिर दाम से फँसता जा कर
के कफस से मुझे सय्यद रिहाई देता

- मी असा वेडा बंदी आहे, की जरी पारध्याने मला पिंजर्‍यातून मुक्त केले असते तरी त्या पिंजर्‍यात मी परत मोठ्या आनंदाने परत जाऊन बंदी झालो असतो.
.
देख गर देखना है "जौक" कि वो पर्दा-नशीं
दीदा-ए-रौजन-ए-दिल से है दिखाई देता

- जर पडद्याआड लपलेली ती सौंदर्यवती तुला पहायची असेल तर सामान्य डोळ्यांनी भलेही नाही, पण अंतःचक्षूंनी तू केव्हाही पाहू शकतोच की.
_______________________________
तिश्नगी अर्थात तृष्णा

लोग दर्या पे क्युं जान दिये जाते है,
तिश्नगी का तो तआल्लुक नही पानी से

वा! काय चपखल , सुरेख वर्णन आहे तहानेचे. तृष्णा पाणी पिऊन थोड्या काळाकरता मिटते पण परत जागृत होते, त्रास देते. मग काय संबंध काय तहानेचा आणि जलाचा? काय संबंध आहे तृष्णेचा आणि अमर्याद पसरलेल्या अथांग सागराचा? जितका समुद्र अथांग तितकीच तहानही असीम नाही का?

"तृष्णा" हा शब्द कोणाला काय आठवण करुन देइल तर कोणाला काय. या शब्दाने मला मात्र आठवतो तो दुसरा शब्द - "द्वैत." वेगळेपण, भिन्नत्व. जर द्वैतच नसते तर कुठुन आली असती अमर्याद तडफड, व्याकुळ तहान?
जिथे द्वैतच नाही तिथे ना तृष्णा, ना तृषार्त ना जल. तिढाच मिटला असता कायमचा.
शांती असेल का अद्वैतात? ना तहान ना तृप्ती. ना ओढ ना मीलन.
कदाचित शांती असेलही पण जिवंतपणा असेल का? अनुभूती असेल का?

जेव्हा तहान लागते, ओढ लागते तेव्हा आपल्या माध्यमातून नक्की हा अनुभव कोण घेत असतं? माझी तहान ना पाण्याला कळते ना तहानेला कळते. फक्त मला जाणवते, व्याकुळ करते, वेडीपिशी करते. हा व्याकुळ होणारा "मी" कोण असतो? हाच तो फेमस कोहम प्रश्न का? हा "मी" मेंदूत असतो, हृदयात असतो की संप्रेरकांत की गुणसूत्रात?

तहानेचा अनुभव माझ्या माध्यमातून कोण अनुभवतं?

छान छान शेर आहेत या विषयावरती. कवींनी वेगवेगळ्या अँगलमधून "तहान" या संकल्पनेकडे पाहीले आहे. काही जणांनी तर त्यांचा काव्यसंग्रह या शब्दाला वाहीला आहे.
या विषयावरचे अजुन काही शेर -

वोह और होंगे जो पी के सरशार (धुंद) हो गये
हर जाम से हमे तो नई तिश्नगी मिली| - साहीर होशियारपुरी

हा शेवटचा आवडीचा -

विसाल-ए-दोस्त से भी कम ना हो सकी "राशिद",
अजल (beginning, eternity) से पाई हुई तिश्नगी को क्या कहिये|

Group content visibility: 
Use group defaults

>>कोणाला इश्वराचे रुप काही वाटू शकते तर अन्य कोणाला बरोब्बर विरोधीही वाटू शकते आणि हीच मिस्टरी आहे, गूढ आहे.

आपला मूड कसा आहे आणि सध्या आयुश्यात कुठल्या परिस्थितीतून जावं लागतंय ह्यावरही ईश्वराचे गोडवे गायचे का त्याला दूषणं द्यायची हे अवलंबून असतंच की. सुखात आणि दु:खात एकसारखं वागायला आपण स्थितप्रज्ञ थोडेच असतो, नाही का?

तुमच्या लेखांतून नेहमीच काहीतरी नवी माहिती मिळते. धन्यवाद Happy

आवडलंय रसग्रहण..

लाख देता था फलक आजार गवारा थे मगर
इक तेरा ना मुझे दर्द-ए-जुदाई देता..

मस्त!