हॅरी पॉटर - भाग चार

Submitted by राधानिशा on 9 October, 2019 - 04:46

हॉगवार्ट्सच्या संस्थापकानंतर महत्वाची पात्रं पुढीलप्रमाणे -

१ - एल्बस डम्बलडोर

एल्बस डम्बलडोर हे हॉगवॉर्ट्सचे वर्तमान मुख्याध्यापक . त्यांच्या काळातील सर्वात शक्तिमान जादूगार म्हणून हे प्रसिद्ध आहेत . शालेय जीवनात , हॉगवॉर्ट्स मध्ये विद्यार्थी असताना सातही वर्षे त्यांनी आपल्या असामान्य प्रतिभेची चमक दाखवली , संशोधने करून जादुई जगताला उपयोगी ठरतील असे अनेक शोध लावले ...

दूरदर्शीपणा , माणसं ओळखण्याचं कसब , लोकांच्या मनात आधाराची विश्वासाची भावना निर्माण करेल असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे ..

चुकलेल्यालाही दुसरी संधी देणारा , वाईट समजल्या जाणाऱ्या माणसातही चांगले गुण शोधण्याचा आणि त्याला चांगल्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न करणारा त्यांचा स्वभाव आहे .

ग्रिन्डेलवाल्ड नावाच्या शक्तिशाली पण गैरमार्गावर गेलेल्या - गुन्हेगारी जादूगाराने जादूगारांच्या जगतास जेरीस आणलं होतं . जादू मंत्रालयाने हरेक प्रयत्न करून तो हाती लागत नव्हता . शेवटी डम्बलडोरने त्याच्याशी युद्ध करून त्याला पराजित केलं व कैदी बनवलं ( याबाबतीत डिटेल माहिती हॅरी पॉटरच्या शेवटच्या पुस्तकात मिळते ) .

एल्बस डम्बलडोर हॉगवर्ट्स मध्ये शिक्षकाची नोकरी स्वीकारतात . ग्रिन्डेलवाल्डचा पराभव केल्यानंतर त्यांनी जादू मंत्र्याचे पद ( हे जादूगार समाजाच्या मंत्रालयातील सर्वोच्च पद आहे . ) स्वीकारावे असा संपूर्ण जादूगार समाजाचा आग्रह असतो पण ते नम्रपणे नकार देतात व आपले शिक्षकाचे काम सुरु ठेवतात व कालांतराने हॉगवर्टसचे मुख्याध्यापक बनतात . डम्बलडोर बद्दल बहुतांश जादूगार समाजात अत्यंत आदराची भावना आहे .

२ . वोल्डेमॉर्ट -

जादूचा गैर - गुन्हेगारी कृत्यांसाठी वापर केलेल्या जादूगारांमध्ये वोल्डेमॉर्टचं नाव सगळ्यात वर लागतं . असामान्य शक्तिशाली , जादूच्या अनेक शाखा - प्रकारांमध्ये सर्वोत्तम कौशल्य असलेला पण तितकाच क्रूर असा हा जादूगार आहे .

वोल्डेमॉर्ट हादेखील हॉगवर्ट्सचाच विद्यार्थी आहे . पण आज त्याचे पूर्वीचे सहाध्यायी त्याला ओळखत नाहीत आणि जे ओळखतात ते इतके घाबरलेले असतात की त्याबद्दल काहीही बोलण्यास नकार देतात . इतकंच काय पण त्यावेळचे त्याचे शिक्षकही आज त्याचं नाव उच्चारु धजत नाहीत .

पूर्ण जादूगार समाज व मगल जग म्हणजेच संपूर्ण जगावर सत्ता मिळवण्याची त्याची महत्वाकांक्षा होती . सुरुवातीच्या काळात अनुयायी प्राप्त करण्यासाठी त्याने " आपण शुद्ध रक्ताला सर्वश्रेष्ठ मानत असून जगात शुद्ध रक्ताच्या जादूगारांची सत्ता आणणे , मडब्लड्सची कीड नष्ट करणे आणि मगल लोकांना त्यांची खरी जागा दाखवून देणे " हि आपली महान ध्येये आहेत असं जाहीर केलं .

हिंसाप्रिय जादूगार , गुन्हेगारी वृत्तीचे जादूगार , मगल आणि मगलबॉर्न लोकांचा तिरस्कार करणारे जादूगार , शुद्ध रक्ताला महत्व देणारे जादूगार , कायदे - नियमांच्या चौकटीत राहून उद्योगधंदा करू इच्छित नसलेले जादूगार , सामान्य जादूगार समाजाने ज्यांची हेटाळणी केली असे वेअरवुल्फ्स , दानव यांसारखे जादुई जीव ........ असे अनेक प्रकारचे लोक वोल्डेमॉर्टचे अनुयायी झाले . अनेकजण भीतीपोटी वोल्डेमॉर्टच्या आज्ञा मानण्यास तयार झाले होते तर अनेकांना इंपेरियस कर्सचा ( संमोहन शापाचा ) वापर करून त्यांच्याकडून हवं ते करवून घेतलं जात होतं.

वोल्डेमॉर्टच्या अनुयायांमधील सगळेजण प्युअरब्लड होते असं मुळीच नाही , बरेचजण हाफब्लड होते पण ते आपण प्युअर ब्लड असल्याचं सांगत . खरंतर त्यातल्या बहुतेकांना या शुद्ध रक्त - अशुद्ध रक्त संकल्पनेशी फारसं घेणंदेणं नव्हतं .... कोणत्याही प्रकारे कमजोर जादूगार आणि मगल लोकांचे हाल - शोषण / टॉर्चर करण्यास , जीव घेण्यास , लूट करण्यास मुक्त सूट मिळावी यासाठी त्यांनी वोल्डेमॉर्टच्या संरक्षणाचा आश्रय घेतला होता . वोल्डेमॉर्ट स्वतः हाफब्लड होता , त्याला मगल लोकांविषयी तिरस्कार होता पण हाफ ब्लड लोकांविषयी खरोखर संताप नसावा . त्याचे अर्ध्याहून अधिक अनुयायी हे हाफ ब्लडच होते .

वोल्डेमॉर्टने आपल्या अनुयायांना डेथ इटर ( मृत्यूभक्षी / प्राणभक्षी ) असं नाव दिलं . प्रत्येकाच्या हातावर एक आकृती गोंदवलेली असे , वोल्डेमॉर्टने एकाच्या हातावरील आकृतीस स्पर्श केल्यावर सर्व डेथ इटर्स पर्यंत हा संदेश पोहोचे व ते जिथे कुठे असतील तिथून अंतर्ध्यान पावून तत्क्षणी वोल्डेमॉर्टसमोर हजर होत . या आकृतीस डार्क मार्क असं नाव दिलं गेलं .

वोल्डेमॉर्टची खरोखरच जादूगारांचे वंश शुद्ध रक्ताचे असावेत अशी इच्छा होती की सर्व जगावर एककेंद्री , बिनविरोध सत्ता प्राप्त करण्याच्या मार्गातला तो एक भाग होता हे निश्चित सांगता येत नाही .

वोल्डेमॉर्ट आणि त्याचे अनुयायी यांनी मिळून जादूगार समाजात अशी भयानक दहशत निर्माण केली होती की लोक त्याच्या नावाचा उच्चारही करण्यास घाबरू लागले ... वोल्डेमॉर्ट असं कुणी म्हणेना .. त्याच्याबद्दल बोलायचं झाल्यास "you know who " असा उल्लेख होऊ लागला . चुकून कोणी वोल्डेमॉर्ट म्हटलं तर ऐकणारा भीतीने पांढरा होऊ लागला .

मगल लोकांची तर त्याने जनावरांसारखी कत्तल केली .
जादूगार समाजातील अर्ध्याहून अधिक लोक हाफ ब्लड होते . त्यांना या हिंसेच्या मार्गाने सत्ताप्राप्ती नको होती , ना त्यांना वोल्डेमॉर्टचे क्रूर मार्ग हवे होते .
वोल्डेमॉर्ट व त्याच्या अनुयायांनी अनेक हाफब्लड कुटुंबांतील जादूगारांना स्वार्थासाठी / त्याची साथ देण्यास तयार झाले नाहीत म्हणून / मार्गात अडथळा आणला म्हणून यमसदनास पाठवलं होते .

डेथ इटर्स एखाद्या ठिकाणी हत्या केल्यानंतर विशिष्ट मंत्राचा वापर करून त्या ठिकाणी आकाशात डार्क मार्कची मोठी आकृती निर्माण करीत , ही आकृती काही तास टिके . डार्क मार्क आकाशात आहे म्हणजे तिथे कुणाचीतरी हत्या झाली आहे हे कळे . ह्याचा वापर दहशत निर्माण करण्यासाठी केला जात होता .

" आपण एके दिवशी घरी येऊ आणि घरावरच्या आकाशात डार्क मार्क चमकत असेल .... याचा अर्थ घरातील कुणीतरी एक किंवा सगळेच ... !! आत काय पाहावं लागेल ... " हि त्याकाळी सगळ्या सामान्य जादूगार समाजाची सर्वात वाईट भीती होती . संपूर्ण सामान्य जादूगार समाजात प्रचंड दहशतीचं , निराशामय वातावरण होतं .

डम्बलडोरच्या नेतृत्वाखाली ऑर्डर ऑफ फिनिक्स हि कुशल , बुद्धिमान आणि धैर्यवान जादूगारांची गुप्त संघटना वोल्डेमॉर्टच्या विरुद्ध काम करू लागली .जादू मंत्रालय सर्वशक्तीनिशी प्रयत्न करूनही वोल्डेमॉर्टचा पराभव शक्य होत नव्हता . खुद्द जादू मंत्रालयात वोल्डेमॉर्टचे हस्तक फितूर होते . त्याच्या अनुयायांची संख्या ऑर्डर ऑफ फिनिक्सच्या सदस्यांपेक्षा 20 पटीने जास्त होती . एकेक करून ते मृत्यूला बळी पडत होते ...

वोल्डेमॉर्ट अंतिम विजयापासून काही हातच दूर होता , आणखी काही वर्षातच त्याने जादू मंत्रालयाची सत्ता नष्ट करून जादूगार समाजावर स्वतःची एककेंद्री जुलमी राजवट स्थापन केली असती . आणि त्यानंतर मगल समाजाला आपलं गुलाम बनवलं असतं , अमर्याद , अनियंत्रित हत्या , हिंसा केली असती .

या परिस्थितीत वोल्डेमॉर्टला एका भविष्यवाणीची माहिती कळली . या भविष्यवाणीनुसार ज्यांनी 3 वेळा वोल्डेमॉर्टचा पराभव केला आहे अशा दाम्पत्याच्या पोटी वोल्डेमॉर्टचा पराभव करणाऱ्याने जन्म घेतला आहे , जुलैच्या अखेरीस त्याचा जन्म झाला आहे .

भविष्यकथन हि जादूच्या अनेक शाखांमधली एक शाखा आहे . हे भविष्य वर्तवणारे भविष्यवाण्या करतात . पण यातल्या 100 % भविष्यवाण्या खऱ्या ठरतात असं मुळीच नाही पण तरी वोल्डेमॉर्टला कोणतीही रिस्क घ्यायची नव्हती .

वोल्डेमॉर्टला समजलेला हा भविष्यवाणीचा भाग अर्धाच होता , पण हे त्याला माहीत नव्हतं . या भागाप्रमाणे 3 वेळा त्याच्यापासून वाचलेली आणि ज्यांच्या मुलाचा जन्म जुलैच्या अखेरीस झाला आहे अशी 2 दाम्पत्यं होती . हि दोन्ही दाम्पत्यं ऑर्डर ऑफ फिनिक्सची सदस्य होती .

एक म्हणजे फ्रँक आणि ऍलिस लॉंगबॉटम आणि त्यांचा मुलगा नेव्हील व दुसरं कुटुंब म्हणजे जेम्स आणि लिली पॉटर आणि त्यांचा मुलगा हॅरी .

लॉंगबॉटम हे शुद्ध रक्ताचं घराणं होतं , नेव्हील हा प्युअर ब्लड होता . तर जेम्स पॉटरचं घराणं शुद्ध रक्ताचं होतं पण लिली हि मगलबॉर्न / मडब्लड होती त्यामुळे हॅरी हाफ ब्लड होता .

वोल्डेमॉर्ट स्वतः हाफ ब्लड होता . त्यामुळे भविष्यकथनात म्हटलेला मुलगा हाफ ब्लडच असणार , हाफ ब्लडच माझ्याइतका शक्तिशाली असेल , मला टक्कर देऊ शकण्याएवढा बलवान असेल असं त्याने मनाशी म्हटलं आणि छोट्या हॅरी पॉटरला संपवून आपल्याला निर्माण होणारा संभाव्य धोका नष्ट करून टाकण्याचा निर्णय घेतला .

वोल्डेमॉर्टच्या गतजीवनाबद्दल अतिशय रोचक आणि महत्वाची माहिती हॅरी पॉटर अँड हाफ ब्लड प्रिन्स या पुस्तकात मिळते . तो कोण , कुठे वाढला , त्याचे आईवडील कोण आणि वाईट मार्गावर त्याची वाटचाल कशी झाली याची संपूर्ण डिटेल माहिती या पुस्तकात मिळते .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान भाग. ग्रीनडेलवाल्डविषयी फँटॅस्टिक बीस्टच्या दोन्ही भागात डिटेलवार माहिती मिळाली. व्हॉल्डेमॉर्टविषयी चित्रपटात माहित होतं. मला टॉम रिडल आणि वोल्डेमॉर्टच नातं अजूनही नीट उमजलेले नाही. नागिणीचं नेविल लॉंगबोटमने केलेलं शिरकाण हा आठव्या भागातील एक ऑ मुमेंट होता, पण त्याच्याविषयी माहिती आज कळली.
पुढील भाग आलेलाच आहे, तो आता वाचतो. Happy

टॉम रिडल आणि वोल्डेमॉर्टच नातं अजूनही नीट उमजलेले नाही.>>>>>>>> सेमच आहेत दोघे. आत्मा को बार बार मारना वगैरे काहीतरी भानगड आहे. ७ तुकडे करतो तो स्वतःच्या आत्म्याचे. असं काहीसं.....

बाकी vfx सोडलं तर मला हॅरी पॉटर आवडत नाही.
लहानपणी पहायला मजा यायची जादू वगैरे. आता बालिश वाटतं.

अवांतर:
कोई मिल गया अजूनही भारी वाटतो. त्यातही जादू आहे म्हणून उल्लेख करावा वाटला.

@ अज्ञातवासी - टॉम रिडल म्हणजेच व्हॉल्डमॉर्ट होय... त्याचे संपूर्ण नाव टॉम मार्व्हलो रिडल... मात्र आपल्या मगलू वडिलांशी असलेल्या नात्याचा आणि जुन्या आयुष्याचा तिटकारा असल्याने त्याने (मोठा जादूगार झाल्यानंतर ) त्याचे नाव बदलून लॉर्ड व्हॉल्डमॉर्ट हे नवे नाव धारण केले.

अज्ञातवासी- लॉर्ड व्हॉल्डमॉर्ट हा टॉम मार्व्हलो रिडल चा अ‍ॅनाग्राम आहे.. इति भाग २ - चेंबर ऑफ सीक्रेट्स. त्याला स्वतःच्या पार्श्वभुमीचा इतका तिटकारा असतो कि तो मूळ नाव टाकून नवीन नाव धारण करतो.

radhanisha - मी पण हॅरी पॉटर चा फॅन आहे. आता अनेक वेळा कथा ऐकून, चर्चा करून काही लूप होल्स कळू लागली आहेत Happy (पहिल्यांदा जेव्हा कथा ऐकली आणि पाहिली तेव्हा जाणवले नव्हते.. आता अक्षरशः पी एच डी झाली आहे..) त्याविषयी पण चर्चा करूयात का?

>>ज्यांनी 3 वेळा वोल्डेमॉर्टचा पराभव केला आहे >> जेम्स आणि लिली ने किंवा लाँगबॉटम दांपत्याने वोल्डेमॉर्टचा ३ वळा पराभव केल्याचे कुठेच वाचले नाही. भविष्यवाणी फक्त जुलै महिन्याच्या शेवटी जन्माला येणार्‍या बालकाबद्दल असते ना?

भरत Biggrin
माझ्या पोराची हीच व्याख्या आहे. हॅरी पॉटर न वाचलेले ते मगल!
ते ही त्याला मी मड ब्लड म्हणतो म्हणून मला विझर्ड करायला केलेली ती मखलाशी आहे.

धर्मग्रंथ हा बार आहे? Uhoh

हॅरी पॉटर मालिका ही जे के रोलिंग यांची उत्कृष्ट वाङ्मयीन कलाकृती आहे. चित्रपटांत यातलं एक आणाही उतरत नाही. त्यातून तुम्ही डब्ड चित्रपट पाहिले असतील, तर बोलायलाच नको.
माझ्यासाठी चित्रपटांनी फक्त त्या त्या व्यकितेरेखेला चेहरे दिलेत.
इंग्र जी भाषेचा डौल, भावभावनाचित्रण, तत्त्वज्ञान , कॉम्प्लेक्स व्यक्तिरेखाटन, जगभरातली मिथकं आणि महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना, व्यक्ती या कथानकात गुंफल्या आहेत. कथानकाची वीण, पुढले भाग वाचताना मागच्या भागातलं काही उलगडणं ...

जादू हा या संपूर्ण कलाकृतीचा एक भाग झाला. पुस्तक वाचून त्यातली गुंतागुंत समजून घेण्यातला आनंद हे असं गाइड वाचून मिळू शकत नाही.
पुस्तकं वाचल्यावर किंवा वाचताना आलेल्या शंका सोडवायला त्याचा उपयोग केला तर एकवेळ ठीक.

राधानिशा यांच्या या मालिकेतल्या एका लेखावरच मी आणि अन्य कोणीतरी मायबोलीवर हॅरी पॉटरबद्दल झालेल्या चर्चेची लिंक दिली आहे.

. स्पॉयलर होता म्हणून उडवला.

जे पुस्तकं वाचणार आहेत त्यांनी मी म्हणतोय त्या लिंकाही आधी वाचू नयेत.
कथेतल्या दोन मुख्य व्यक्ती मृत्यूच्या धाग्याने बांधलेल्या आहेत. मृत्यूबद्दलचे त्यांचे दृष्टिकोण हा या कथानका च्या सुरुवातीपासून शेवटापर्यंत चालणारा एक अंतर्प्रवाह आहे.

धन्यवाद मीनाक्षी, चौकट राजा.
मग तो भलामोठा साप, त्याला कंट्रोल करणारा मुलगा, त्यांचं नेमकं वालदेवमाठ (हे भारी नाव वाटतंय Lol ) शी कनेक्शन कसं?
सॉरी, मी इथेच सगके प्रश्न विचारतोय, कारण मला इतकी पुस्तके वाचण्यात अजिबात इंटरेस्ट नाही पुन्हा!

जेम्स आणि लिली ने किंवा लाँगबॉटम दांपत्याने वोल्डेमॉर्टचा ३ वळा पराभव केल्याचे कुठेच वाचले नाही >>

पराभव शब्द वापरण्यात थोडी चूक झाली असावी . इथे पराभवचा अर्थ साधारण प्रत्यक्ष वोल्डेमॉर्ट बरोबरच्या चकमकीत ( म्हणजे फक्त त्याच्या प्राणभक्षी अनुयायांसोबत नाही तर ज्या वेळी तो स्वतःही आला लढायला ) ही दोन दाम्पत्यं लढली आणि वाचली . वोल्डेमॉर्ट पासून प्रत्यक्ष लढाईत वाचणं तेही 3 वेळा याला मी चुकून पराभव शब्द वापरला .

The one with the power to vanquish the Dark Lord approaches... born to those who have thrice defied him, born as the seventh month dies...

डम्बलडोर हॅरीला पूर्ण भविष्यवाणी दाखवतात आपली मेमरी वापरून तेव्हा ती समजते .

भरत हे लेख मी हिंदी भाषांतरं वाचून ( पारायणं ) लिहिले आहेत ... तेव्हा इंग्रजी वाचता येईल इतपत चांगलं नव्हतं .. आताही फारसं चांगलं नाही Sad . साधारण वाचता येण्याइतपत ठीकठाक आहे . मी पहिली 2 पुस्तकं फिलॉसॉफर्स स्टोन आणि आणि चेंबर ऑफ सिक्रेट्स इंग्रजीतून वाचली आहेत .. फार मोठा फरक जाणवला नाही .. त्याउलट मराठी भाषांतरंही सुरुवातीला वाचली होती - हिंदी पुस्तकं मिळण्याच्या आधी . ती खूपच वाईट वाटतात ...

असो .. भाषांतर / डब बद्दल मला तुच्छता वाटत नाही .. कारण त्याशिवाय हॅरी पॉटर कितीतरी वर्षं वाचता आलं नसतं . चित्रपट इंग्रजीतून पाहिले आहेत .. सबटायटल वापरून अर्थात , ऍक्सेंट चटकन कळत नाही . पण आधी तेही हिंदीतूनच पाहिले होते आणि तेही मला आवडतात ...

मग तो भलामोठा साप, त्याला कंट्रोल करणारा मुलगा, त्यांचं नेमकं वालदेवमाठ (हे भारी नाव वाटतंय Lol ) शी कनेक्शन कसं? >>

तो साप हा सलझार स्लायदेरीनने रागाने हॉगवर्ट्स सोडून जाताना गुप्त तळघर बांधून त्यात ठेवला होता अशा हेतूने की एक दिवस आपल्या वंशाचा कोणीतरी येऊन त्याला आपल्या ताब्याखाली आणायला शिकेल आणि मगलबॉर्न विदयार्थ्यांना मारून हॉगवर्ट्समध्ये फक्त शुद्ध रक्ताचे विद्यार्थी राहू शकतील असं करेल ... किंवा सिम्प्ली सूडबुद्धीनेही ठेवलेला असू शकतो की माझ्या मर्जीनुसार न चालणारी ही शाळा तो बंद पाडेल .

सापाला कंट्रोल करणारा तो मुलगा हा सलझारच्या वंशातला , अनेक पिढ्यांनंतरचा होता आणि त्या वंशातल्या सर्वांप्रमाणे त्याच्यातही सर्पभाषा समजण्याची - सापांशी बोलण्याची क्षमता आली होती शिवाय तो त्या गुप्त तळघराचं द्वार शोधून काढण्यात यशस्वी होण्याएव्हढा बुद्धिमान होता . ह्या मुलाचं नाव टॉम रिडल होतं .. वर मीनाक्षी यांनी सांगितल्या प्रमाणे तेच नाव त्याच्या मगल वडिलांचंही होतं .. त्याची आई ही सलझार स्लायदेरीनच्या वंशातली होती ... जिने आपलं प्रेम असलेल्या टॉम रिडल या देखण्या मगल व्यक्तीवर जादूचा वापर करून त्याला आपल्या प्रेमात पाडलं आणि लग्न करायला भाग पाडलं .. पुढे प्रेग्नंट झाल्यावर आतापर्यंत तोही आपल्या खऱ्या प्रेमात पडला असेल किंवा निदान होणाऱ्या मुलासाठी तरी थांबेल म्हणून तिने जादूचा वापर थांबवला .. आपल्यावर जादूचा प्रयोग होऊन मनाविरुद्ध संसार करायला लागलेला आहे याचं भान आल्यावर गर्भवती पत्नीला सोडून टॉम रिडल हा मगल पळून गेला . खचलेल्या पत्नीने मुलाला एका अनाथाश्रमात जन्म दिला आणि त्याचं नाव टॉम रिडल ठेवा म्हणून सांगून मरण पावली ... सलझारच्या वंशातला हा टॉम रिडल पुढे हॉगवर्ट्स मध्ये शिकायला आला ... त्यावेळी डम्बलडोर हे तिथे शिक्षक होते .. पुढे तो त्या सापाला कंट्रोल करायला शिकला वगैरे ...

टॉम रिडल आपलं हॉगवर्ट्स मधलं शिक्षण संपवून बाहेर पडल्यावर काही काळाने त्याने आपल्या मगल वडीलांवरून ठेवलेलं आपलं नाव बदलून लॉर्ड वोल्डेमॉर्ट हे नाव स्वतःला घेतलं .. आपलं नाव घ्यायला एक दिवस सगळे घाबरतील अशी स्वतःची दहशत निर्माण करणं ही त्याची सुप्त इच्छा होती .

हॅरी पॉटर मालिका ही जे के रोलिंग यांची उत्कृष्ट वाङ्मयीन कलाकृती आहे. >> ++11111 भरत. यांच्या आख्ख्या प्रतिसादाला +1
तुम्ही इंग्रजीतून वाचायचा जरुर प्रयत्न करा.
इथे भरपूर चर्चा झाली आहे. ते धागे पहा.
बाकी हॅरी पॉटरच्या जादूशी कोई मिल गया चं साम्य पाहून Uhoh झालं.

माहिती असायलाच हवा, निदान त्याची ओळख असायलाच हवी अश्या महत्त्वाच्या साहित्य प्रकारात धर्मग्रंथ मोडतो. हॅरी पॉटर तर त्या प्रकारात येत नाही ना? नसेल माहिती किंवा नसेल त्यात रस तर लगेच लेबल लावण्यासारखे काय आहे?

बाकी सिंदबादच्या सफरी, फाफे, सुशींच्या अमर कथा सुद्धा रंजक वाटतात. पण त्याला कोणी 'उत्कृष्ट वाङ्मयीन कलाकृती' म्हणल्याचे आठवत नाही मला.

जगभरातली मिथकं आणि महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना, व्यक्ती या कथानकात गुंफल्या आहेत. >>>>>>>>> मग पुन्हा एकदा नीट बघावे लागेल किंवा नेट वरून डाऊनलोड करून पुस्तक तरी वाचावे लागेल. कारण हॅरी पॉटर काल्पनिक कथा आहे असेच समजून मी डब्ड सिरिज पाहिली होती.
English येते, पण आवडत नाही, म्हणून डब्ड पाहिली असेही नाही. शेवटी मराठी आणि हिंदी जास्त जवळची भाषा वाटते. पण हिंदी सिनेमा चॅनेलवर डब्ड सिरिजच दाखवली. म्हणून पाहिली.

बाकी हॅरी पॉटरच्या जादूशी कोई मिल गया चं साम्य पाहून Uhoh झालं.>>>>>>>> साम्य काल्पनिक/ जादुई कथा आहे. असो.... प्रत्येकाचं मत वेगळं असू शकत. आणि भरत म्हणताहेत तसं जर हॅरी पॉटर मध्ये ऐतिहासिक घटना आणि पात्र असतील तर काहीच साम्य नाही.

Lol

ही लेबलं मजेशीर - हलकेत घेण्याच्या दृष्टीने बनवलेली आहेत . माझ्या माहितीप्रमाणे ( जी चुकीचीही असू शकते ) हॅरी पॉटरच्या फॅन गटातील 12 ते 25 पर्यंतच्या लहान - किशोर - तरुण गटातील मुलं ही लेबलं मजा म्हणून वापरतात ... याच वयोगटातील कुणीतरी ही लेबलं निर्माण केली आहेत त्यामुळे त्यांना फार सिरियसली घेण्याची गरज नाही ...

त्यात बऱ्याचवेळा आम्ही पुस्तकं वाचलेले श्रेष्ठ असा भाव असतो .. तुम्हीही पुस्तकं वाचा , नुसते चित्रपट पाहून थांबू नका असा एक प्रोवोक करून वाचनाला भरीला पाडायचाही छुपा हेतू असतो काहीवेळा ... हे त्या वयोगटाच्या मॅच्युरिटीला अनुसरून योग्यच आहे ...

ज्या प्रौढ लोकांना हलकेच घेता येत नसेल त्यांनी तरुणांची थेरं म्हणून त्याकडे दुर्लक्ष करावं आणि अशी लेबलं प्रौढांनी न वापरणं अधिक चांगलं ... कारण मुलं मुलं हलकेत घेऊन सोडून देतात जास्त इन्सल्ट मानून घेत नाहीत ... मोठे लोक उगाच वाद घालत बसतात , वाचली नाहीत म्हणून काय झालं , माहीत असायला असणं गरजेचं आहे का अशी गंभीर वाटेला जाणारी चर्चा .

ही लेबलं मजेशीर - हलकेत घेण्याच्या दृष्टीने बनवलेली आहेत . >>>>>>>>>>> ओह्ह.... Biggrin

बाकी एक व्हिडिओ पाहिला होता. हर्मायनी कडे असलेलं टाईम मशीन वापरून त्यांनी हे सगळं घडण्यापासून रोखलं कसं असतं अश्या आशयाचा.

धर्मग्रंथ माहीत असायलाच हवा किंवा तोंडोळख असायला हवी असं न वाटणारे भरपूर सापडतील.
पॉटरपुस्तकं माहीत असायलाच हवी किंवा वाचायलाच हवी, असं म्हणत नाहीए. पण त्यातल्या फक्त जादूबद्दल बोलणाऱ्यांना
आणि त्यावरून त्याचा दर्जा ठरवणाऱ्यांना पुस्तका़बद्दल सांगितलं इतकंच.
हे लेख लोक लिहिताहेत आणि वाचताहेत म्हणजे त्यात रस असेल असं समजून पुस्तकं वाचण्याबद्दल सुचवलं.
रस असायलाच हवा असा आग्रह नाही.
पुस्तक वाचायला सांगणं चूक आहे (छुपा आग्रह?) काहीतरी सूर इथे उमटलेले दिसताहेत. त्याबद्दल नो कमेंट्स.
रोलिंग बाईंनी जसं एक नवं विश्व निर्माण केलं तसंच पॉटर Fans नी
हे तयार केलंय https://harrypotter.fandom.com/wiki/Main_Page

तुमच्याबद्दल नाही म्हटलं . ही विझार्ड , मगल , मगलबॉर्न , मडब्लूड इत्यादी लेबलं वापरणाऱ्या काही लोकांचा ( मुलं , टीनेजर्स किंवा तरुणांचा खरं तर ) ती लेबलं वापरण्यामागे - पुस्तकं न वाचलेल्या लोकांनी ती वाचावीत असा छुपा हेतू असतो असं म्हटलं आहे . छुपा कारण सरळ वाचा सांगून ऐकत नाहीत तर असं लेबल लावलं तर रागाने म्हणून का होईना वाचतील असं ..

मीही वापरलंय तो लेबल. (पुस्तक न वाचता त्याला लेबलं लावणारे कारण असले तरी).अर्थात गंमतीतच. पण बाकीच़ सगळं सिरियसलीच लिहिल़य.

ज्यात रस आहे ते मूळ वाचा असं सुचवण्यात वाईट काय आहे?

धन्यवाद radhanisha! आता कळलं.
बाकी मीही सिनेमे आधी इंग्लिश मग हिंदी डब असे बघितले. उदय सबनीसच्या आवाजात ती बोलकी टोपी काय भारी वाटते!

मी मधुरा, तुम्ही हवं तर ऑडीओ बुक्स ऐका. जीम डेल ह्या माजी अभिनेत्यानी अतिशय सुंदर वाचली आहेत सर्व पुस्तके. मी एकही पुस्तक स्वतः वाचलेले नाही पण जीम डेल कडून गोष्ट १०० वेळा ऐकली आहे. कामाला येता जाता, फावल्या वेळात, अगदी रात्री झोपतानाही थोडा वेळ ऐकत गेलो आणि मला हे कथानक आवडत गेलं. जे. के. रोलींग ने सर्व पात्रे फार सुंदर रंगवली आहेत. आपल्या जगात वसणारी जादुई दुनीया रंगवताना तिने खूप विचार करून बारकाईने वर्णने केली आहेत. पहिल्या भागापासून एक एक करत प्रसंग, पात्रांचे परिचय, हॅरी व वॉल्डेमॉर्टशी निगडीत इतिहास इ. इतके छान गुंफले आहेत कि शेवटच्या पुस्तकात जेव्हा सगळे बिंदू एकत्र होऊन चित्र पूर्ण होते तेव्हा झकास वाटते.

आधी चित्रपट पण चान वाटले होते. पण सगळी कथा नीट उमगल्यावर आणि सर्व धागे कळाल्यावर चित्रपट किती "तोकडे" आहेत ते लक्षात आले. मनोरंजन म्हणून चित्रपटही उत्तम आहेत आणि ग्रंथवाचनाचा उत्साह नसेल तर तेही बघावेत. पण पुस्तकातून पूर्ण कथा अनुभवायची मजा काही वेगळीच आहे.