कसब

Submitted by मोहना on 2 October, 2019 - 06:22

पन्नाशीच्या पुढची लोकं सतत, ’मागे वळून बघताना...’ असं म्हणत असतात. नुकतीच पन्नाशी पार केली असल्याने मीही मागे वळून बघितलं. चष्मा न घालताही बरंच काही दिसायला लागलं... नुसतं दिसून काय उपयोग, मागे वळून जे दिसलं त्याचं पुढे काय झालं हे सांगायला हवंच ना.

माझी आई अप्रतिम गायची आणि मला माझ्या आईसारखं व्हायचं होतं म्हणून मी गाणं शिकायला सुरुवात केली. आमच्या गुरुंनी थेट ओंकार प्रधाननेच सुरुवात केली. मला ते गाणं इतकं आवडलं की नकळत मी ते वेगवेगळ्या पद्धतीने गाऊन पाहायला सुरुवात केली. गुरु म्हणाले,
"तुझा आवाज छान आहे पण जी चाल शिकवलेली असते त्याच चालीत गायला पाहिजे." मी प्रयत्न करत राहिले, नविन चालींची भर पडत राहिली. माझ्या गुरुंनी माझ्यासमोर हात टेकल्यासारखा गळा टेकला. गाण्याचा वर्गच बंद करून टाकला. तेव्हापासून माझं ’गाणं’ राहिलं आहे.

गाता गळा बंद व्हायच्या आधी थै, थै थक करत पाय थिरकत होते. सगळ्या मैत्रिणी कथ्थक शिकायला जायच्या. आमची एक मैत्रीण तिच्या घरी गेलं की कथ्थकचा सराव आम्हाला बघायलाच लावायची. मी बदले की आग घेऊन कथ्थक शिकायला जाणं सुरू केलं. आल्या मैत्रिणी की कर कथ्थक असं करायचा माझा डाव होता. पण माझ्या दाणदाण पदरवाला गुरु इतक्या वैतागल्या की त्यांनीही तो वर्ग लवकरच बंद केला आणि मी फक्त मैत्रिणीचं कथ्थक बघत राहिले.

ट्रेकिंग करायचं होतं पण, ’गप्पा मारत राहिलीस की चढायचं विसरतेस’ असं म्हणत माझ्यामुळे मित्रमैत्रिणींनी स्वत:चं ट्रेकिंग बंद केलं. त्यांची कुठलीशी संस्था होती ती बंद पडली. घ्या, पाद्र्यांना पावट्याचं निमित्त.

याला काही दशकं झाली आणि ’बकेट लिस्ट’ आली. मलाही वाटायला लागलं त्यात काहीतरी टाकावं. बॉलीवूड नाच शिकायला घातलं स्वत:लाच. पहिल्या तासाची जाहिरात घरात, पूर्वी रिक्षातून फिरत ओरडून करायचे तशी आठवडाभर केली. घरातले तीन जीव मुठीत धरून माझा नाच पाहायला सज्ज झाले. नंतर वेळेवर नाहीसे व्हायला लागले, लपायला लागले.

लपायच्या, नाहीसं व्हायच्या जागा संपल्यावर ’पण माझी गुरु शिकवते तेव्हा मी मस्त नाचते. घरी आल्यावर जमत नाही.’ ही नृत्याच्या अगोदरची धून कानावर आदळली की मुलं आणि नवरा नेत्रकटाक्ष टाकायला लागले. आता मला नाचायला यायला लागलं होतं त्यामुळे कुठे का टाकेनात कटाक्ष म्हणून नित्यनेमाने देवदर्शनाला गेल्यासारखं मी नाचायला जात होते. निदान या गुरुला तरी माझ्या तालासुराचं ज्ञान जाणवलं या आनंदात होते. एक दिवस दुकानाला टाळा. नवरा म्हणाला,

"तू कितीजणांचे व्यवसाय धोक्यात आणतेस. भारतात तेच इथेही तुझा हाच उद्योग?" मला अगदी गदगदून आलं त्यामुळे आता काही करायचं राहिलं आहे का? असं कुणी विचारलं की माझं उत्तर असतं,

’लोकांचे छोटे छोटे उद्योग मी त्यात शिरले तरी चालू ठेवण्याचं कसब शिकायचं राहिलं आहे ते एकदा जमलं की झालं.’

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

.

हेहेहेहे
भारीच. आता साठी बुध्दी नॉटी कडे वाटचाल म्हणा की. Wink

धन्यवाद सर्वांना.
मन्या ऽ <<<शेवटी शिकायची जिद्द महत्वाची!!>>> पण शिकवणार्‍यांचे ’हाल’ होतात त्यांचं काय :-).
अभ्या...<<<साठी बुध्दी नॉटी...>>>नुकतीच पन्नाशी ओलांडली आहे त्यामुळे देखते है आगे आगे क्या होता है Happy

ही ही मस्तच!
गेलेला मूड परत आणलात. धन्यवाद.