एक्स्ट्रा इनिंग

Submitted by अस्लम बेग on 28 September, 2019 - 03:45

उत्तर ध्रुवाच्या थोडं दक्षिणेकडे जगाच्या नकाशावर 'लीबोयमा' नावाचा एक छोटासा देश होता. या देशाचे आद्य नागरिक उच्च अभिरुचीचे आणि चतुरस्त्र का काय ते म्हणतात तसे होते. त्यांनी अनेक चांगले पायंडे पाडले, स्पर्धा आणि उत्सव सुरु केले. चेंडूफळीचा खेळ इथे मोठ्या उत्साहाने खेळला जायचा. एकंदर फार भारलेले वातावरण होते. या भारलेल्या वातावरणात अनेक व्यक्तिमत्वे फुलली. अनुभवसंपन्न झाली. इथल्या मैदानात खेळून खेळून अनेक खेळाडू नावारुपाला आले.

हळूहळू या देशाची किर्ती दाहीदिशेला पसरु लागली. काही आवड म्हणून, काही सवड म्हणून तर काही प्रसिद्धीच्या मिषाने इथे जमा होवू लागले. देशाच्या प्रमुखांनीही याला चालनाच दिली. हा छोटासा देश विस्तारु लागला. नवनव्या सुखसोयी आल्या. कोणताही कर नाही, ओळखपत्राची गरज नाही. मग काय खोगीरभरती सुरुच राहिली. लोक कैक मुखवटे जवळ बाळगायला लागले. जसा प्रसंग तसा मुखवटा. जसा कंपू तसा झंपू. राजकारण सुरु झाले, आघाड्या उघडल्या गेल्या. थोडक्यात वातावरण गढूळ व्हायला लागले. जुन्या जाणत्या लोकांच्यात चलबिचल चालू झाली. अनेक सूज्ञ लोक काळाची पावले ओळखून थोडं अजुन उत्तर ध्रुवाकडे स्थलांतरीत झाले. काहींनी आपापल्या वसाहती बनवल्या आणि समविचारी लोकांचा एक कोष विणून त्यातच रममाण झाले. ज्यांना हे बदल मानवले नाहीत, जुन्यांच्यात सामिल होता आले नाही, नव्यांशी जुळवून घेता आले नाही आणि संस्थान सोडून जाण्याची हिम्मत झाली नाही अश्या अस्वस्थ आत्मांची एक फळी तयार झाली. स्वताच्याच गतस्मृतींमध्ये रमणारे, आपल्या कर्तबगारीचे ढोल जिथे तिथे वाजवत फिरणारे, चेल्या चपाट्यांची फौज जमा करुन त्यांच्यासमोर आपल्या हुषारीच्या बाता मारत बसणारी ही अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली प्रवृत्ती सगळीकडे थैमान घालू लागली. यांच्या मध्ये एक प्रथितयश 'सर' होते. हा किताब त्यांना कुणी दिला (की त्यांनी स्वताच स्वताला बहाल केला याची कुणालाच फारशी कल्पना नाही). सगळेचजण त्यांना 'सर' म्हणायचे आणि त्यांचा एकंदर आविर्भाव सरदारीच होता.

या छोटेखानी देशात दरवर्षी एक महोत्सवी प्रदर्शनीय सामना व्हायचा. एकेकाळी दिग्गज खेळाडू त्यात भाग घ्यायचे आणि अवघ्या देशाची वाहवा मिळवून जायचे. या स्पर्धेत सहभागी होणे हा एक सन्मान होता. जुना-नवा, आपला-परका सगळे भेद विसरुन लोक या सामन्याचा आनंद घ्यायचे. जसेजसे खेळाडू नावारुपाला आले तसा त्यांचा प्रदर्शनीय सामना खेळण्यातला उत्साह संपला. देशोदेशींच्या अतिभव्य स्पर्धा, अनेक झगमगाटी लीग्स आणि पैशाला पासरी झालेले अधिकृत सामने यासगळ्यात त्यांना या घरच्या महोत्सवी सामन्याचे कौतुक वाटेनासे झाले. मान्यवर आणि मातब्बर खेळाडू विश्रांतीची कारणे देवून किंवा वेळेच्या अनुपलब्धतेमुळे या महोत्सवी प्रदर्शनीय सामन्यातुन माघार घेवू लागले.संघ निवडीसाठी दवंडी पिटून वाट बघत बसायची वेळ निवडसमितीवर आली. मग काय दोन चार हौशी गल्ली क्रिकेटवीर, काही अनुभवी पण फारसे सरावात नसणारे उत्सुक खेळाडू, तर काही EA sports खेळून स्वताला सुपरस्टार समजणारे पुढे आले आणि त्यांनी हा सामन्याचा विडा उचलला. टीम तयार झाली... संघाची घोषणा झाली.

या टीममधली नावे वाचूनच 'सर' सरफिरे झाले बहुतेक. या संघातल्या कुणी नवख्या खेळाडूने दुसऱ्या कुठलातरी लीगमध्ये यांचे पार सीमारेषेपासून स्टान्स घेऊन त्वेषाने टाकलेले चेंडू सोडून देवून त्यांना उचित सन्मान देण्याऐवजी चेंडूला फळी लावण्याची गुस्ताखी केली होती. तो राग बहुदा त्यांच्या मनात अजूनही खदखदत होता.

हे असले नवशिके खेळाडू इतकी मोठी परंपरा असलेला प्रदर्शनीय सामना कसा खेळू शकतात? उद्या गावस्कर स्पर्धेत उतरला तर हे तुमचे जोगींदर शर्मा, विनयकुमार वगैरे लोक त्याला कसे आउट करणार? गेल तर त्यांना उचलून मैदानाबाहेरच फेकून देईल असे बिन(बुड)तोड सवाल सरांनी प्रसारमाध्यमे बोलावून सुरु केले. सरांच्या घराजवळ असलेल्या हिरव्यागार खेळपट्टीच्या मैदानावर सामना न घेता अतिशय सोप्प्या अश्या पाटा खेळपट्टीवर सामना घेतायत हे कळल्यावर आणि याबाबतीत सरांना विश्वासात घेतले नाही म्हणून सरांनी तीव्र नापसंती दर्शवत घरापासून खुप लांब पडत असल्याने आपण वेळेअभावी सामन्यास उपस्थित राहू शकणार नाही असे ट्वीट केले. मग त्यांच्या चाहत्यांनी (?) अश्याने अवघा महोत्सवी सामना एका जाणत्या प्रेक्षकाला मुकेल तेंव्हा तुम्ही तुमच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा अश्या अर्थाची जाहिर पत्रे लिहली. काही अतिउत्साही नागरिकांनी तर #बंडाचा_झेंडा अश्या हॅशॅटॅग चळवळीही चालू केल्या.

अश्यात ते बिचारे नवखे खेळाडू जमेल तसा सराव करत होते. आजूबाजूला चाललेल्या सगळ्या कोलहलाकडे कानाडोळा करुन त्यांनी आपल्याच पद्धतीचा खेळ दाखवायला सुरुवात केली. हे असे सोशल मिडियावर रागराग करुन आपल्याकडे कुणी लक्ष देत नाही म्हंटल्यावर मग सर चांगलेच सरसावले आणि इतर दोघाचौघा मातब्बर खेळाडूंची नावे (खरी अपेक्षा स्वताबद्दलच होती.... आणि आपल्या चेल्या चपाट्यांपैकी कुणीतरी आपले नाव पुढे करेल ही त्यांना आशाही होती) प्रशिक्षक/परिक्षक/निरिक्षक पदासाठी सुचवून पाहिली पण असले चॅपेलगुरुजी राशीला आले तर अवघ्या स्टेडियमची छळछावणी बनवून टाकतील हे त्या नवख्या असलेल्या चमूलाही माहिती असावे त्यामुळे त्यांनी त्या (धमकीवजा) सुचनेलाही वाटाण्याच्या अक्षता लावल्या.

अखेर सामन्याचा दिवस उगवला. काही जुन्या जाणत्यांनी मोठ्या मनाने शुभेच्छाही दिल्या. नवचमूबरोबर गल्लीत खेळणारी काही मित्रमंडळी संघाला प्रोत्साहित करायला आवर्जून मैदानात उपस्थित होती. इतकेच काय तर सरांच्या मांडीला मांडी लावून कान उपटणारे काहीजण सामन्यात रंगून स्टॅंडमध्ये टाळ्या वाजवताना दिसले तेंव्हा मात्र सरांचा तोल ढळला. इतक्या वर्षाच्या प्रशासनातील ओळखीचा लग्गा लावून हे महाशय थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये घुसले. त्यानंतर एकदा माईक हातात आल्यानंतर त्यांनी जे काही दर्जा समालोचन केलय ते "ज्या परंपरांचे पाईक होण्याची पात्रता या नवख्या चमूमध्ये नाही असा ठाम समज पसरवला" त्याच समृध्द परंपरांची शान वाढवणारे होते याबाबत सरांच्या पाठीराख्यांमध्ये अजिबात दुमत दिसले नाही. सरांनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि उपरोधिक शैलीत आपल्याच खेळाडूंची जी मापे काढली आणि पनवती लावली ते बघून दस्तुरखुद्द मांजरेकरनेही सरांकडे शिकवणीला येण्याची इच्छा व्यक्त केल्याचे ऐकिवात आले.

पण एक गोष्ट मान्य करायलाच पाहिजे की खेळाडू मैदानात उतरुन जितके मनोरंजन करु शकले नाहीत त्यापेक्षा कैकपटींनी अधिक पैसावसूल कामगिरी सरांनी समालोचन कक्षात बसून केली.... शेवटी अनुभव तो अनुभव बॉस!

मला सगळ्यात गंमत आली जेंव्हा सर म्हणाले की खेळाडूंनी घरोघरी जावून निमंत्रणे दिली नाहीत म्हणून मला यंदा इथे बऱ्याच रिकाम्या खुर्च्या दिसतायत (सरांना दिसणाऱ्या त्या रिकाम्या खुर्च्या सरांच्या बाष्कळ बडबडीला वैतागून पळून गेलेल्या त्यांच्या सहसमालोचकांच्याच असाव्यात असा आपला अंदाज मी फुकट पासावर मिळालेल्या आणि रिकाम्या नसलेल्या फायबरच्या खुर्चीवर बसून समोसा खात खात बांधला). यंदा काय नेहमीसारखी मज्जा नाय बुवा.... काय मूडच नाय वगैरे वगैरे दर ओव्हरनंतर यांचे चालूच होते. अधूनमधून आपले खेळाडू चेंडू चक्क मैदानाबाहेर भिरकावून देत होते. अश्याच एका पुलच्या फटक्यांनंतर सर खुर्चीवरुन उठुन "परंपरा मोडली... परंपरा मोडली" म्हणून ओरडायलाच लागले. त्यांच्या मते आखूड टप्प्याचा चेंडू शक्य तितक्या बॅकफूटवर जाऊन उभ्या ब्याटीने तटवायचा किंवा खाली वाकून सोडूनच द्यायचा असतो. त्याच्यावर पुल वगैरे मारणे म्हणजे फारच अविचारी खेळतायत आपले खेळाडू.

आपल्या काही खेळाडूंनी समोरच्या गोलंदाजाने टाकलेल्या सुरेख टप्प्याच्या चेंडूला दिलखुलास दाद दिली. एकाने तर बाद होवून जाताजाता अप्रतिम झेल घेतलेल्या क्षेत्ररक्षकाच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. नवखेच खेळाडू ते हे असे प्रतिस्पर्धी खेळाडूंचे उघड कौतुक करणे सर्वसंमत नाही हे त्यांच्या लक्षातच नाही आले. पण तेवढ्यावरुन सरांनी मात्र इकडे खेळाडूंना शिव्याची लाखोली वाहिली. काही नेहमीच "टीका"कारी चष्मा घालून वावरणाऱ्यांनी "मॅच फिक्सिंग, मॅच फिक्सिंग" वगैरे कुजबूज पण करुन घेतली. बाकी काही सहसमालोचकांचे यष्टीरक्षकाने गोलंदाजी का केली? गोलंदाजाने गोलंदाजी करताना टोपी काढून पंचांकडे का दिली नाही? उजवा फलंदाज खेळपट्टीवर असताना दुसरा डावखुरा फलंदाज का पाठवला नाही? असले किरकोळ आक्षेप घेणे चालू होते पण या बाबतीत सरांच्या जवळपासही पोहचणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यावर नंतरनंतर त्यांनी सरांचीच री ओढायला सुरुवात केली.

मधूनच संघातला एक खेळाडू सरांना प्रेक्षकात बसून टाळ्या वाजवताना दिसला. ते बघता सरांनी तडक सीमारेषेवर धाव घेऊन जवळच उभ्या असलेल्या एका फिल्डरकडे याची विचारणा केली. फिल्डरने त्यांना खासगीत सांगितलेल्या माहितीचा त्यांनी लगेच कक्षात येउन माइकवरुन उलगडा केला आणि वेगवेगळे कयास बांधायला चालू केले. अहो तुम्हीच म्हणत होता ना खुर्च्या रिकाम्या आहेत म्हणून तर मग तुम्हाला वाईट वाटू नये म्हणून एखादा खेळाडू येवून बसला असेल रिकाम्या खुर्चीवर... तेव्हढीच अजुन एक खुर्ची भरलेली दिसेल तुम्हाला म्हणून!

बाकी विश्लेषण करायची सरांना प्रचंड आवड. मैदानावर घडलेल्या प्रत्येक गोष्टीचे विश्लेषण आणि वरुन मी तिथे असतो तर काय केले असते याचेही रसभरीत वर्णन. मैदानावर मारल्या गेलेल्या अनेक अगम्य फटक्यांचे अर्थ, तंत्र आणि त्यामागचा विचार फक्त आणि फक्त सरांच्या रसग्रहणामुळेच इतर अज्ञ आणि अर्धतज्ञ प्रेक्षकांना कळला. एकदा असाच चुकुन आंधळी पट्टा मारुन चेंडू सीमापार धाडलेल्या फटक्या मागचे मानसशास्त्रीय विश्लेषण वगैरे ऐकून माझे तर बुवा डोळे पाणावले (नंतर लक्षात आले समोश्यातल्या मिरचीने ठसका लागला होता)

सर हळूहळू फॉर्मात येत होत होते. "जेवणाच्या सुट्टीत आपल्या खेळाडूंनी घरुन आणलेली पोळीभाजी खाल्ल्याने मैदानातल्या खाद्यविक्रेत्यांच्या धंद्यावर परिणाम झाला" ही त्यांची टिप्पणी ऐकून तर अवघे पॅव्हेलियन त्या पातळविजयम चित्रपटातल्या राक्षसासारखे खदाखदा हसले असेल याची खात्री आहे. मी तर हसताहसता खुर्चीवरुन खाली पडलो आणि माझ्या प्लेटीतला उरलेला समोसा सांडला. मग मैदानातल्याच खाद्यविक्रेत्यांकडून अजुन एक प्लेट समोसा घेवून मी (आदरणीय सरांचा मते) त्यांच्या घसरणाऱ्या विक्रीला माझ्यापरीने टेकू द्यायचा प्रयत्न केला.

मैदानात घडलेल्या प्रत्येक नाट्यपूर्ण घडामोडींनंतर सर फार कळकळीने आपल्या कारकीर्दीतले दाखले देवून आपण त्या परिस्थितीत कसा अचूक खेळ केला होता हे सर्वांना सांगत होते. आपला अनुभवी सल्ला घसा फोडफोडून कर्ण्यावरुन मैदानात पोहचवत होते आणि मैदानावरील खेळाडू त्याला प्रतिसाद देत नाहीत म्हणून त्यांची घालमेल चालू होती. पण मी काय म्हणतो की ते मैदानावर उतरलेत तर खेळू देत ना त्यांना त्यांच्या कुवतीप्रमाणे. आता त्यांनी त्यांना जसा जमतोय तसा खेळ खेळायचा का यष्ट्यातल्या माईकमध्ये तोंड घालून तुमच्या प्रश्नांची उत्तरे देत बसायचे?

असो! तर सालाबादप्रमाणे हा प्रदर्शनीय सामना संपला. आपल्या संघाला संमिश्र का कायसेसे यश मिळाले. ज्यांना महोत्सवी प्रदर्शनीय सामने हे कुठल्याही हारजीतीपेक्षा खेळाचा निखळ आनंद लुटण्यासाठी असतात हे समजले अश्या सुजाण प्रेक्षकांनी खेळाडूंची पाठ थोपटली. काही जेष्ठ्य श्रेष्ठ खेळाडूंनी अधिकारवाणीने थोडक्यात कानउघाडणी केली.
बक्षीसवितरण समारंभ झाला. संघाने सर्व उपस्थितांचे आभार मानले. सर्व पाठिराख्यांना धन्यवाद दिले. संधी मिळाल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानले. आणि "boys played well" म्हणून सहकाऱ्यांना प्रोत्साहित केले.
संघाची सामनोत्तर बैठक झाली असावी. झाल्या चुकांचा आढावाही घेतला असावा. सुधारणा सुचवल्या गेल्या असाव्यात आणि प्रशासनाला अहवालही पोचला असावा. (अर्थात हा आपला आमचा अंदाज)

संघाचा श्रमपरिहार वगैरे सुरु झालेला दिसला. काही खेळाडू विरंगुळा करताना दिसून आले. काहीनी त्यांच्या नेहमीच्या प्रांतात मुशाफिरी सुरु केलेली दिसली तर काही खेळाडू सुट्टीसाठी अज्ञातवासात गेलेले जाणवले.
हे सगळे एकीकडे होत असताना आपले सर मात्र अजुन त्या सगळ्यातुन बाहेर पडताना दिसले नाहीत. इतके दु:लक्ष्य किंवा इतका अनुल्लेख त्यांचा याआधी कधीच झालेला नसावा. मग ती खदखद शांत करण्यासाठी त्यांनी एक्स्ट्रा इनिंग हा कार्यक्रम सुरु केला. त्यांची इतर काही समदु:खी मित्रमंडळी त्यांना सामिल झाली.

सुरुवातीलाच "हा आख्खा संघ त्याच्या गलथान कामगिरीबद्दल अरबी समुद्रात बुडवून टाकला पाहिजे" असला बिशनसिंग बेदी पवित्रा सरांनी घेतला. संघाने केलेल्या चुकांचा पाढा हा एक कलमी कार्यक्रम होता. आणि त्या चुकांबद्दल (?) सर्व खेळाडूंनी एक पत्रकार परिषद घेवून जाहीर स्पष्टीकरण (स्पष्टीकरण कसले; खर म्हणजे या ट्रोलधाडीचे तुष्टीकरण) द्यावे अशी मागणी लावून धरली. मधूनच कुणीतरी संघातल्या कुण्या खेळाडूने केलेल्या चमकदार कामगिरीचा विषय काढला की तेव्ह्ढ्यापुरते त्याचे कौतुक करुन आपण किती समतोल आहोत याचा आभास निर्माण केला जायचा. पण थोड्याच वेळात पहीले पाढे पंचावन्न व्हायचे.

सामनावीर ठरलेल्या एका स्पर्धकाच्या संघपोषाखावरील (शुद्ध मराठीत टीम जर्सी) क्रमांक कुण्या एका माजी दिग्गज खेळाडूशी मिळताजुळता असल्या कारणाने त्या सामनावीराने केलेली कामगिरी ही त्याची ओरिजनल न राहता त्या मिळत्याजुळत्या क्रमांकामुळे त्या दिग्गज खेळाडूने आपल्या सामनावीराच्या शरीरात प्रवेश करुन त्याच्याकडून ही कामगिरी घडवून घेतली असावी असली गृहीतके जेंव्हा आपल्या सरांनी मांडायला सुरुवात केली तेंव्हा मात्र त्यांच्या एक सहपॅनेलिस्ट तडकल्या आणि त्यांनी दस्तुरखुद्द सरांनीच इतर स्पर्धातुन कसा दुसऱ्या एका अतिदिग्गज खेळाडूचा जर्सी क्रमांक वापरला होता ह्याचा पर्दाफाश केला.

मग मात्र सरांनी आपल्या त्या आक्षेपाबद्दल बिनशर्त माफी मागितली. (पर्यायच नव्हता) तरी सरांची खुमखुमी गेली नव्हती. त्यांनी रोज येवून आकडे लावायला सुरुवात केली. फक्त एका आकड्यासाठी प्राईम टाईम अडवणारा एक्स्ट्रा इनिंग हा कार्यक्रम आता चॅनेलवाल्यांना पण नकोसा झाला होता बहुतेक. पण सर आपल्या उपोषणाचा तंबू सोडायला तयार नव्हते. रिकाम्या खुर्च्यांच्या रिकाम्या मांडवाने रोजचा ट्रॅफिक जाम व्हायला लागला. मग मात्र प्रशासनाने याची दखल घेवून सरांना मोसंबीचा रस पाजला. उपोषण सुटले खरे पण हार मानणे सरांच्या स्वभावातच नव्हते. मग त्यांनी पुरस्कारवापसीचा रस्ता धरला (त्या निमित्ताने आपल्याला कुठले कुठले पुरस्कार मिळालेत हे तरी लोकांना कळतील असा ही एक अंतस्थ हेतू असावा).

या सगळ्यात मला सदस्य खेळाडूंकडून फारच अपेक्षा होत्या. त्यांचा संघ जाहिर झाल्यापासूनचा एकूण इतिहास बघता एक तरी खेळाडू होणाऱ्या टीकेने उधळेल आणि इकडे जरा कलगीतुरा बघायला मिळेल म्हणून मी रोज न चुकता एक्स्ट्रा इनिंग लावून बघायचो पण श्या! या खेळाडूंनी याबाबतीत फारच निराशा केली. मैदानावर बेजबाबदार खेळ खेळणारे खेळाडू इकडे मात्र अगदीच संयम पाळताना दिसून आले. चला या सामन्यातुन कुणीतरी काहितरी शिकले म्हणायचे.

अजुनही काही दिवस मी रोज न चुकता एक्स्ट्रा इनिंग लावून बघेन. तुम्ही लोक मला निराश करणार नाही अशी पुसटशी आशा आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मधूनच संघातला एक खेळाडू सरांना प्रेक्षकात बसून टाळ्या वाजवताना दिसला. ते बघता सरांनी तडक सीमारेषेवर धाव घेऊन जवळच उभ्या असलेल्या एका फिल्डरकडे याची विचारणा केली. फिल्डरने त्यांना खासगीत सांगितलेल्या माहितीचा त्यांनी लगेच कक्षात येउन माइकवरुन उलगडा केला>>>>>>> Rofl

एकदम ब्येस्ट पॉईंट...

काहीच कळलं नाही.
कोणी संदर्भासह स्पष्टीकरण करेल काय?

माझ्या अल्पमती आकलनाप्रमाणे हायजेनबर्ग यांनी गणेशोत्सव लेखमाला स्पर्धेचं परिक्षण संयोजक करणार याला आक्षेप घेतला होता. नेहमीप्रमाणे मतदान घेऊन विजेते निवडावेत असे त्यांचे मत होते. दुसरं म्हणजे युगांतर धाग्यावर प्रतिसाद देऊन लेखिकेने महाभारत लिहून काही उपयोग नाही असे सांगणं. त्याला संबंधित लेखिकेने योग्य प्रत्युत्तर दिले असे धागालेखकाला सांगायचे आहे. चुकभूल देणेघेणे. धन्यवाद.

या टीममधली नावे वाचूनच 'सर' सरफिरे झाले बहुतेक. या संघातल्या कुणी नवख्या खेळाडूने दुसऱ्या कुठलातरी लीगमध्ये यांचे पार सीमारेषेपासून स्टान्स घेऊन त्वेषाने टाकलेले चेंडू सोडून देवून त्यांना उचित सन्मान देण्याऐवजी चेंडूला फळी लावण्याची गुस्ताखी केली होती. तो राग बहुदा त्यांच्या मनात अजूनही खदखदत होता.>>>>>>>>> निशब्द झाले मी! काय लिहिता राव! मस्तच!!!! Rofl

उशीरा कळला का लेख काही लोकांना. स्पष्टीकरण योग्य वाटलं बहुतेक. कटप्पा भाई आप का डुआयडी तो नहीं है ना अस्लम बेग नामका?

AB, हा लेख माझ्या निवडक दहात आहे बरं का!
आणि हो, भारी लिहिता, लिहित रहा!!

आणि तुम्ही खरंच समुद्रात उडी मारून लांबड्या माश्यावर हल्ला केलात की! दाद द्यायला लागेल तुमच्या जिद्दीला! Happy

पार उदार झालात की तुमच्या या आयडीवर तुम्ही. Lol

Lol
अप्रतिम विश्लेषण!!!!
जे खेळाडू अज्ञातवासात असतील त्यांना सर्व सुखसुविधा मोफत पुरवण्यात येतील!
(बिचार्यांना तेवढं तरी समाधान.)

अजुन सरांचे चमचे कसे आले नाहित धाग्यावर ...... >>>>>>>>>>> प्रतिसाद काय द्यावा, कसा द्यावा यावर चर्चा सुरु असेल. Wink

काहीही असो पण अस्लम भाई आपकी लेखनशैली जबरी आहे. चिमटे भारी काढले आहेत, टपल्या तर कमालच मारल्या आहेत. मी हे लिखाण कोण करु शकतो हे ९९.९९ टक्के ओळखलं आहे. कटप्पा यांनी नक्कीच नाही लिहिलेले.

सर्व वाचकांचे आभार _/|\_
___________________________

काहीच कळलं नाही.
कोणी संदर्भासह स्पष्टीकरण करेल काय?

नवीन Submitted by मन्जुशा on 28 September, 2019 - 17:37>>>>>
ह्या लिखाणासाठीचा कच्चा माल मला इथे मिळाला. (संदर्भ आणि स्पष्टीकरण)

बाकी विश्लेषण करायची सरांना प्रचंड आवड. मैदानावर घडलेल्या प्रत्येक गोष्टीचे विश्लेषण आणि वरुन मी तिथे असतो तर काय केले असते याचेही रसभरीत वर्णन.
>>> खतरनाक ...

खरी अपेक्षा स्वताबद्दलच होती.... आणि आपल्या चेल्या चपाट्यांपैकी कुणीतरी आपले नाव पुढे करेल ही त्यांना आशाही होती) प्रशिक्षक/परिक्षक/निरिक्षक पदासाठी सुचवून पाहिली पण असले चॅपेलगुरुजी राशीला आले तर अवघ्या स्टेडियमची छळछावणी बनवून टाकतील हे त्या नवख्या असलेल्या चमूलाही माहिती असावे त्यामुळे त्यांनी त्या (धमकीवजा) सुचनेलाही वाटाण्याच्या अक्षता लावल्या.
>>>लोल

अगदी मस्त लिहिलय खरचं..... कितीही वेळा वाचलं, तरी पुन्हा वाचायला मजा येतेय आणि पुन्हा सगळे संदर्भ लक्षात येऊन हसू सुध्दा येते आहे.

खरचं.... उत्सुकता आहे. कोणाचा आयडी असेल हा? कारण असं लिखाण करणे कोण्या सोम्या गोम्याच काम नाही. Happy

लिखाण चांगल लिहिलय .

कुणाला उद्देशून अस लिहाव की नाही यावर माझा पास Happy

बाकी प्रतिसादावरून एक साईडची टीम तरी कळाली (टीम मधुरा ?)

दुसरी टीम कुठे आहे (टीम बहा ?)

नाहीतर गेले किती दिवस कोण कुणाच्या बाजूने आहे हेच कळत्त नव्हते Happy

बाकी प्रतिसादावरून एक साईडची टीम तरी कळाली (टीम मधुरा ?)
>>>>>>>>>> प्रश्न, टीम मध्ये कोण होते ? ज्यांनी सहभाग घेतला स्पर्धांमध्ये ते. मी तर कुठेच नव्हते त्यात. ( या लेखाच्या अनुषंगाने सांगते आहे.) Lol बाकी माझे नाव लिहिताना लोक घाबरत नाहीत. पण बहा असे लिहून सरांचा दरारा अजूनही आहे काहींच्या मनात, हे सिद्ध केलेत तुम्ही.
असो, कृपया हलके घ्या. Biggrin

सरांचा दरारा ?

बहा वर लिहिल म्हणून मी लिहिल , हाब अस लिहायला मला अडचण का असावी बर ?