गेम ऑफ थ्रोन्स पार्श्वभूमी

Submitted by राधानिशा on 16 September, 2019 - 08:07

गेम ऑफ थ्रोन्सच्या कथानकाची पार्श्वभूमी थोडक्यात -

वेस्टेरोज या प्रचंड प्रदेशात सात प्रमुख घराणी व त्यांची 7 राज्यं आहेत . ती घराणी म्हणजे बरॅथिऑन , स्टार्क , लॅनिस्टर , टार्गेरियन्स , ग्रेजॉय आणि टली , टायरेल आणि सातवं मार्टेल . आणखी लहान अशी अनेक राजघराणी आहेत ..

मालिकेची सुरुवात होते तेव्हा किंग रॉबर्टस राजा आहे आणि बाकीची सगळी राज्यं मांडलिक .. किंग रॉबर्ट्स हा वंशपरंपरागत राजा नाही .. त्याच्याआधी टार्गेरियन्स या घराण्याची सत्ता होती , पहिल्या एपिसोड मध्ये जे चंदेरी केसांचे भाऊ बहीण व्हिसेरिस व डॅनेरिस भेटतात त्यांच्या घराण्याची .

टार्गेरियन घराण्याचे सुरुवातीचे बहुतेक राजे पराक्रमी आणि प्रजाहितदक्ष होते , प्रजेला त्यांच्याबद्दल प्रेम आदर होता . ड्रॅगन या महाकाय शक्तिशाली प्राण्याला काबूत ठेवण्याची आणि त्याचा आपल्याला हवा तसा युद्धात वापर करण्याची क्षमता वंशपरंपरेने फक्त या घराण्यात होती . महाकाय अशा ड्रॅगन्सच्या जोरावरच त्यांनी सातही राज्यांवर आपली एकछत्री सत्ता स्थापन केली होती . पण कालांतराने सततच्या बंदिवासामुळे ड्रॅगनच्या पुढील पिढ्यांचा आकार लहान लहान होत शेवटी ती प्रजात नष्ट झाली . तरीही या घराण्याची सत्ता कायम राहिली . सुरुवातीचे पराक्रमी राजे वगळता या घराण्यातील पुढील काही राजे अत्यंत क्रूर , जुलमी असे निपजले . त्यात सगळ्यात क्रूर राजा म्हणजे किंग रॉबर्टची सत्ता निर्माण होण्यापूर्वी सत्ताधीश असलेला एरिस टार्गेरियन .

व्हिसेरिस व डॅनेरिस दोघांचा जन्मदाता असलेला एरिस टार्गेरियन हा प्रचंड जुलमी व अत्याचारी राज्यकर्ता होता , त्याच्या डोक्यावर जवळपास परिणामच झालेला होता , ( ह्या राजाला मॅड किंग म्हटलं जाऊ लागलं ) त्याला सगळीकडे शत्रू दिसू लागले होते , सगळ्यांबद्दल संशय निर्माण झाला होता आणि त्याने चक्क स्वतःच्या राजधानीत ठिकठिकाणी अंडरग्राउंड भयानक स्फोटकाचे साठे ठेवले होते अर्थात हे त्याच्या राज्यात कोणाला माहीत नाही , ते पुढे समजतं प्रेक्षकांना .. पण त्याच्या जुलमाने त्रस्त झालेल्यांनी बंड पुकारलं , युद्ध झालं .. या युद्धाचं नेतृत्व किंग रॉबर्टने केलं , त्याचा जिवलग मित्र ज्याने युद्धात खांद्याला खांदा लावून त्वेषाने लढाई केली तो एड्डार्ड स्टार्क शॉर्टफॉर्म नेड स्टार्क ..

विंटरफेलच्या स्टार्क घराण्यातील एड्डार्ड स्टार्कची बहीण लियाना हिचं बरॅथिऑन घराण्याच्या रॉबर्टशी लग्न ठरलं असताना टार्गेरियन घराण्याचा वारस , मॅड किंगचा सगळ्यात मोठा मुलगा आणि आधीच विवाहित असलेल्या आणि 2 मुलांचा बाप असलेल्या राजकुमार ऱ्हेगारने तिला पळवून नेली . त्यात लियानाचा मोठा भाऊ ब्रॅन्डन राजाला जाब विचारायला गेला असता राजाने त्याला अटक केली व त्याची सुटका व्हावी अशी इच्छा असेल तर दरबारात या म्हणून त्याच्या वडिलांना दरबारात पाचारण केले पण ते येताच वडील व मुलगा दोघांची हत्या केली .. ही घटना मॅड किंगच्या जुलमांनी त्रस्त झालेल्या 7 राज्यांमध्ये बंडाची ठिणगी टाकायला कारणीभूत झाली .. आणि उघड बंडाला सुरुवात झाली . याचं नेतृत्व लियानाचा लहान भाऊ एड्डार्ड आणि ज्याच्याशी तिचं लग्न ठरलं होतं त्या रॉबर्टने केलं . त्या दोघांचे गुरू / मार्गदर्शक जॉन ऍरीन हे होते . टली घराण्याची राजकुमारी कॅटलिनशी ब्रॅन्डनचं लग्न ठरलं होतं , तो मरण पावल्यामुळे लहान भाऊ एड्डार्ड / नेडशी तिचं लग्न झालं आणि तिची लहान बहीण लिसा हिचं वयाने बऱ्याच मोठ्या असलेल्या जॉन ऍरीनशी लग्न झालं . 7 पैकी अर्ध्याहून अधिक राज्यं बंडवाल्यांच्या बाजूने होती तर टायरेल सारखी काही राजाच्या बाजूने लढली .. 1 वर्ष युद्ध सुरू होतं .. या युद्धात राजकुमार ऱ्हेगारला रॉबर्टने स्वतः ठार केलं .

टार्गेरियन घराण्याचा वजीर / प्रधान लॅनिस्टर घराण्यातील टायविन लॅनिस्टर हा अत्यंत बुद्धिमान माणूस होता , लॅनिस्टर घराणं सगळ्यात श्रीमंत घराणं आहे . टायविनचा मुलगा जेमी याला त्या जुन्या राजाने आपला अंगरक्षक नेमला .. राजाच्या अंगरक्षकाला लग्न करता येत नाही त्यामुळे टायविनचा वंश खुंटल्यात जमा होता .. या घटनेमुळे टायविन लॅनिस्टर नाराज झाला होता .. राजाचा मोठा मुलगा ऱ्हिगार तरी निदान आपली मुलगी सरसी हिच्याशी लग्न करेल व नात्याने जोडले जाऊ अशी त्याला आशा होती तीही पूर्ण झाली नाही , राजाने ऱ्हिगार याचं डॉर्ने नावाच्या राज्याच्या राजकुमारी इलियाशी लग्न लावून दिलं होतं .. शिवाय खुद्द टायविनवरही त्याला संशय होता की तो आपल्याला दगा देईल म्हणून त्याने अंगरक्षक झालेल्या टायविनच्या मुलाला निष्ठेची परीक्षा म्हणून आपल्या वडिलांना ठार मारायला सांगितलं , राजाने ज्यावेळी राजधानी उडवून द्यायचा निर्णय घेतला तेव्हा तो ज्या मोजक्या लोकांना माहीत होता त्यात त्यावेळी 16 - 18 वर्षांचा असणाऱ्या जेमीचा समावेश होता ...

ह्या सगळ्या परिस्थितीत राजाला म्हणजे मॅड किंगला संपवणं ही अपरिहार्य गोष्ट होऊन बसली होती . टायविनने बंडवाल्यांशी संधान साधलं . राजाला राजधानीच्या संरक्षणाची जबाबदारी आपण घेऊ असं सांगितलं , राजाने त्याच्यावर विश्वास ठेवून राजधानीचे दरवाजे टायविनच्या सैन्यासाठी उघडले .. या कुशल सैन्याने राजधानीवर हल्ला चढवून ती जिंकून घेतली ... विश्वासघात आणि हार झाल्यामुळे मॅड किंगने स्फोटकांचे सगळे साठे पेटवून संपूर्ण राजधानी उडवून देण्याचा निर्णय घेतला .. ही आज्ञा अंमलात आणली गेली असती तर फक्त शत्रूच नाही तर लाखभर नागरिक / रहिवासीसुद्धा मरणार होते .. त्याला थांबवायला जेमीने त्याच्या पाठीत तलवार खुपसून त्याला ठार मारलं ... अंगरक्षकाला जी एकनिष्ठतेची शपथ घ्यावी लागते ती शपथ जेमीने या कृत्याने भंग केली ... शिवाय स्फोटकांबद्दल त्याने पुढे कोणाशी वाच्यताही केली नाही ...

बंडवाल्यांनी राजधानीत प्रवेश केला तेव्हा राजधानी आधीच शरण आली होती ... रॉबर्टने राजपदासाठी दावा केला , त्यानेच आधीच्या वारसाला ठार केलं होतं आणि बंडाचंही नेतृत्व केलं होतं .. नेड स्टार्कला राजा होण्यात फारसा रस नव्हता .. इतर सर्व घराण्यांनी हा दावा स्वीकारला आणि रॉबर्टचा राज्याभिषेक झाला . आपली मदत केल्याबद्दल राजा झालेल्या रॉबर्टने टायविनची मुलगी सरसी हिच्याशी विवाह करण्यास संमती दिली पण मनाने तो नेहमीच लियानात गुंतलेला होता . नेड स्टार्क आपल्या विंटरफेल या राज्याचा उत्तराधिकारी बनला आणि रॉबर्टचा मांडलिक म्हणून राज्यकारभार पाहू लागला , त्यांची जिवलग मैत्री रॉबर्ट राजा झाल्यानंतरही बदलली नाही . जेमीने रॉबर्टचं अंगरक्षक पद स्वीकारलं . कारण त्याला लग्न संसार वगैरे करायचा नव्हता ..

सरसी आणि जेमी हे जुळे भाऊबहीण होते , त्यांचा सगळ्यात लहान भाऊ टिरियन हा ठेंगु होता , त्याला जन्म देताना त्यांची आई मरण पावली होती ... ह्याच्यामुळे आपली आई गेली हा राग मनात ठेवून सरसीने आयुष्यभर टिरियनचा द्वेष केला .. तर जेमीच्या मनात मात्र आपल्या निष्पाप भावाबद्दल राग नव्हता तर एक मृदू कोपरा होता , त्याने नेहमीच सरसीच्या रागापासून टिरियनला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला . वयाच्या 14 व्या वर्षांपासून जेमी आणि सरसीमध्ये अनैतिक संबंधांची सुरुवात झाली . अशा तऱ्हेचे संबंध पूर्ण वेस्टरोज मध्ये अत्यंत निषिद्ध मानले जात .. पूर्वी राजपदावर असलेल्या टार्गेरियन घराण्यात मात्र वांशिक पवित्रता जपण्यासाठी भाऊ - बहिणींचे विवाह ही रुळलेली प्रथा होती .

टायविनच्या मनात आपल्या पत्नीच्या मृत्यूला कारणीभूत झाला म्हणून आणि बुटका - कुरूप , लढण्यास अपात्र म्हणून अशा कारणांमुळे टिरियनबद्दल कधीच प्रेम नव्हतं . अतिशय कडवट वागणूक टिरियनला मिळाली . पण टिरियनची धारदार बुद्धिमत्ता , राजकारणाची समज , वाचन - व्यासंगाने आलेली समज , माणसांची अचूक पारख , मनाचा चांगुलपणा असे अनेक गुण त्याला एक महत्त्वाचं पात्र बनवतात .

ऱ्हिगारची पत्नी मार्टेल घराण्याची राजकुमारी इलिया आणि तिची 2 मुलं ही बंडाच्या वेळी राजधानीत होती .. मार्टेल घराण्याने या युद्धाच्या प्रसंगात आपल्याशी एकनिष्ठ राहावं आणि शत्रूला मिळू नये यासाठी त्यांना सुरक्षित गुप्त ठिकाणी हलवण्याऐवजी मॅड किंगने त्यांना आपल्यापाशी राजधानीत राजवड्यातच ठेवलं होतं.. टायविनने राजधानी जिंकून घेतल्यावर त्याच्या आज्ञेनुसार तिच्या दोन लहान मुलांना तिच्या नजरेसमोर क्रूरपणे ठार करण्यात आलं त्यानंतर तिच्यावर पाशवी बलात्कार करून नंतर तिलाही ठार केलं गेलं . मात्र रॉबर्ट राजा होताच टायविनने हे क्रूर कृत्य घडत असताना आपण संपूर्ण अनभिज्ञ होतो असं सांगितलं आणि त्या युद्धात मरण आलेल्या 1 - 2 सरदारांची नावं गुन्हेगार म्हणून सांगितली .. प्रत्यक्षात इलिनावर बलात्कार करणारा व तिच्या दुसऱ्या बाळाला मारणारा सेवक जिवंत होता .. त्याच्या पाशवी शक्ती , आज्ञापालन , क्रूरपणा वगैरे गुणांमुळे त्याला गमवायची टायविनची इच्छा नव्हती , त्याने त्याला पाठीशी घातला .. रॉबर्टला संशय आला असला तरी इलिया व तिच्या मुलांबद्दल फारशी सहानुभूती नव्हतीच .. ऱ्हिगारने लियानाचं अपहरण केल्याचा राग त्याच्या मनातून कधीच कमी झाला नाही .

बंडाच्या रक्तरंजित गदारोळातही मॅड किंगची गर्भवती पत्नी आणि तिचा लहान मुलगा विसेरिस टार्गेरियन यांना सुरक्षित बाहेर काढण्यात मॅड किंगच्या विश्वासू सेवकांना यश आलं .. राजधानीतून निसटणं शक्य झालं . किंग रॉबर्टच्या सैनिकांपासून , अधिकाऱ्यांपासून , त्याच्याशी एकनिष्ठ असलेल्या लोकांपासून लपतछपत राणी आणि मुलगा राहू लागले , लहान मुलीला जन्म दिल्यानंतर राणी लवकरच मरण पावली . जसजशी रॉबर्टची सत्ता प्रबळ होत गेली आणि टार्गेरियन्स सत्तेची पुनर्स्थापना अशक्य बाब आहे हे लोकांच्या लक्षात येत गेलं तसंतशी व्हिसेरीस आणि त्याची छोटी बहीण डॅनेरिस यांना आश्रय देऊ पाहणाऱ्यांची संख्या झपाट्याने घटत गेली .. किंग रॉबर्टचे गुप्तहेर सतत त्यांचा शोध घेत होते , अशा परिस्थितीत त्यांना आश्रय देऊन राजाची वाकडी नजर आपल्याकडे वळवून घेण्याची कुणाची इच्छा नव्हती .. एकेकाळच्या राजकुमाराला अन्नासाठी लोकांपुढे हात पसरायचीही वेळ आली ... या मानहानीमुळे त्याचा स्वभाव कडवट , क्रूर , स्वार्थी , संतापी बनत गेला ... डॅनेरिसला त्याच्या संतापाची झळ अनेकवेळा भोगावी लागली ... जगाकडून झालेल्या सगळ्या अपमानाचा वचपा बिचाऱ्या डॅनेरिस वर निघत असे .. ती आपल्या भावासमोर सतत दबलेली , दहशतीखाली वावरत असे , त्याची हरेक गोष्ट बिनविरोध मान्य करत असे , तिला स्वतःचं असं काही मत , हक्क नव्हते .. डॅनेरिस 13 - 14 वर्षांची झाल्यावर या भाऊ बहिणीची राहण्याची सोय खर्च सर्व एका श्रीमंत व्यापाऱ्याने आपल्या अंगावर घेतला .. व्हिसेरीसचं एकच स्वप्न होतं ते म्हणजे आपलं गेलेलं राज्य परत मिळवून , राजगादी / आयर्न थ्रोन मिळवणं पण जिथे डोक्यावर छप्पर असण्याची मारामार होती तिथे सैन्य वगैरे कुठे असणार ? शिवाय त्यांच्यामध्ये राजा / नेता होण्यासाठी लागणारे शौर्य , पराक्रम , चातुर्य किंवा संघटन कौशल्य , नेतृत्वगुण , प्रभावी व्यक्तिमत्त्व यातले कोणतेही गुण नव्हते .... फक्त आपण राज्याचे रक्ताने खरे वारसदार आहोत आणि ते आपल्याला मिळणारच हे पोकळ स्वप्न तो डोक्यात घेऊन बसला होता ... डॅनेरिसचा एखाद्या पराक्रमी बलशाली सैन्यबळ असलेल्या राजाशी विवाह करून देऊन त्याच्या साहाय्याने आपली पूर्वीची सत्ता मिळवता येईल असा प्लॅन त्याच्या डोक्यात होता . व्हिसेरीस व डॅनेरिसला आश्रय दिलेल्या व्यापाऱ्याने डोथ्राकी या रानटी क्रूर जीवनपद्धती जगणाऱ्या जमातीच्या एका टोळीच्या प्रमुखाशी डॅनेरिसचा विवाह करण्याचा प्रस्ताव व्हिसेरीस समोर ठेवला ... हा प्रमुख प्रचंड बलवान होता आणि त्याची टोळीही .. त्याच्याकडे संख्याबळ मोठ्या प्रमाणात होतं आणि सर्व योद्धे अतिशय, कसलेले , कुशल आणि क्रूर होते . व्हिसेरिसने हा प्रस्ताव मान्य केला , डॅनेरिसच्या इच्छेचा विचार करण्याचा तर प्रश्नच नव्हता . विवाहानंतर टोळीचा प्रमुख खाल ड्रोगो हा आपल्या सैन्यासह राजधानी म्हणजे किंग्ज लँडिंगवर चालून जाणार आणि राज्य जिंकणार आणि हे जिंकलेलं राज्य अलगद व्हिसेरिसच्या ओंजळीत टाकणार अशी गोड दिवस्वप्न व्हिसेरिस पाहत होता . पण प्रत्यक्षात मात्र हे युद्ध करण्याचा ड्रोगोचा कोणताही मानस नव्हता .. डोथ्राकी जमातीत समुद्र प्रवास निषिद्ध मानला जात होता . त्याला उच्च राजवंशातली राजकुमारी पत्नी म्हणून हवी होती , ती मिळाली होती , त्यासाठी त्याने व्हिसेरिस राहत असलेल्या श्रीमंत व्यापाऱ्याला भरपूर संपत्ती दिली होती आणि व्हिसेरिस तयार व्हावा म्हणून आपल्या सैन्याच्या जोरावर तुझं गेलेलं राज्य मिळवून देऊ असं मधाचं बोट त्याला लावलं होतं , साफ खोटं आश्वासन दिलं होतं .

इकडे राजधानीमध्ये रॉबर्टच्या नजरेआड सरसी आणि जेमी यांचे अनैतिक संबंध चालू होतेच . सरसीची 3 मुलं ही खरी जेमीची असून संपूर्ण राज्य मात्र ती राजाची मुलं आहेत असं समजत आहे . सरसीचा पराकोटीचा क्रूर आणि स्वार्थी , विकृत स्वभाव तिचा मोठा मुलगा जॉफ्री याच्यात पुरेपूर उतरला आहे , मधला मुलगा टॉम्मन आणि छोटी मुलगी मात्र शुद्ध निर्भेळ मनाचे आहेत .

राजा झाल्यानंतर रॉबर्टने आपले मार्गदर्शक जॉन ऍरीन यांना वजीर / प्रधान ( हँड ऑफ द किंग ) हे पद दिलं होतं .. व जवळपास 14 - 15 वर्षे सर्व कारभार ते व्यवस्थित सांभाळत होते . राजा झाल्यानंतर रॉबर्टने राज्यकारभारकडे बऱ्याच प्रमाणात दुर्लक्ष केलं , तो विलासात मग्न झाला . सुदैवाने जॉन ऍरीन व इतर कार्यक्षम अधिकारी त्याला लाभल्यामुळे राज्याचा गाडा अगदीच बिघडला नाही ... शिवाय रॉबर्ट्स फारसा जबाबदार राजा नसला तरी क्रूर किंवा अत्याचारी नव्हता ... युद्ध , परराष्ट्रीय धोरण आदी बाबत त्याचे निर्णय अचूक असत , शिवाय तो राज्यकारभारही ठाकठीक सांभाळत होता .

मालिकेची सुरुवात होते तेव्हा जॉन ऍरिनचा मृत्यू झाल्यामुळे नेड स्टार्कला प्रधानपद स्वीकारण्याची विनंतीवजा आज्ञा करण्यासाठी किंग रॉबर्ट आपल्या कुटुंबासहित विंटरफेलला येतो . त्याच रात्री नेडची पत्नी कॅटलिन हिची बहीण लिसा जिचं जॉन ऍरिनशी लग्न झालं होतं तिचं गुप्त पत्र कॅटलिनला येतं की आपल्या नवऱ्याचा मृत्यू नैसर्गिक नाही तर लॅनिस्टर घराणं म्हणजे राणी आणि तिचे नातेवाईक त्याला जबाबदार आहेत , आपल्या लहान मुलाच्या जीवाचंही बरंवाईट करायला ते मागेपुढे पाहणार नाहीत या भीतीने मी मुलाला घेऊन राजधानी सोडून आमच्या म्हणजे नवऱ्याच्या राज्यात जाऊन तिकडचा कारभार हाती घेत आहे , पत्र वाचून होताच नष्ट करणे .. अशा कारस्थानांनी भरलेल्या ठिकाणी न जाता नेड स्टार्कने राजाची आज्ञा नाकारावी अशी कॅटलिनची इच्छा होती .

पण या पत्राने नेड स्टार्कच्या मनात राणी व लॅनिस्टर घराण्याबद्दल संशयाची बीजं रोवली गेली आणि त्याने राजाच्या सुरक्षिततेसाठी आपण वजीरपदाचा प्रस्ताव स्वीकारणं अधिकच आवश्यक आहे , तिथे राहूनच आपल्याला सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवता येईल हे कॅटलिनला पटवलं व जाण्याचा निर्णय घेतला .

नेड स्टार्क व कॅटलिन यांना पाच मुलं होती , रॉब , सान्सा , ब्रॅन्डन / ब्रान , आर्या आणि रिकॉन . आणि नेड स्टार्कला युद्धावर असताना दुसऱ्या स्त्रीपासून झालेला मुलगा जॉन . जॉनसारख्या कायदेशीर विवाहसंबंधातून न उपजलेल्या मुलांना वेस्टरोज मध्ये बास्टर्ड ही संज्ञा आहे , तो अपमानकारक किंवा शिवीसदृश्य शब्द नाही ...पण अर्थात बहुतेक ठिकाणी बास्टर्ड मुलांना कमीपणाची वागणूक दिली जाते . पण या कुटुंबात मात्र जवळपास सर्व लोक जॉनला कुटुंबाचा एक सदस्य या नात्याने , प्रेमानेच वागवत असत .. कॅटलिनच्या मनात त्याच्याबद्दल प्रेम नव्हतं , ती त्याला दूर ठेवणंच पसंत करत असे आणि आईचं पाहून मोठी मुलगी सान्साही जॉनशी फार बरी वागत नसे.. पण रॉब , आर्या , ब्रॅन , रिकॉन ह्यांचं जॉन वर भावासारखंच प्रेम होतं . पुढे जॉन हा नेड स्टार्कचा अनौरस मुलगा नसून बहीण लियानाला ऱ्हिगार टार्गेरियन पासून झालेला मुलगा होता , एवढंच नाही तर लियानाचं अपहरण झालेलं नसून ती स्वखुशीने विवाहित ऱ्हिगार बरोबर पळून गेली होती हे सत्य प्रेक्षकांना समजतं ... म्हणजे ज्या कारणाने रॉबर्टने बंड केलं ते कारणच खोटं निघतं . लियाना व ऱ्हिगारने गुप्तपणे विवाहही केलेला असल्यामुळे जॉन हा बास्टर्ड सुद्धा नाही तर टेक्निकली तो टार्गेरियन घराण्याचा वारस आणि जन्मसिद्ध हक्काने आयर्न थ्रोनचा वारसदार आणि संपूर्ण वेस्टरोजचा राजा आहे . अर्थात या सत्यापासून सर्व जग व तो स्वतःही अनभिज्ञ आहेत . लियाना आणि ऱ्हिगारच्या मुलाच्या अस्तित्वाचं सत्य रॉबर्टला कळलं तर तो जॉनला कदापि जिवंत राहू देणार नाही म्हणून नेड स्टार्कने आयुष्यभर या सत्याची वाच्यता केली नाही , अगदी स्वतःच्या पत्नीलाही याचा थांगपत्ता लागू दिला नाही .

नेड स्टार्कची मोठी मुलगी सान्सा ही 12 - 14 वर्षांची म्हणजे किंग रॉबर्टचा मुलगा जॉफ्री या 16 -17 वर्षांच्या राजकुमाराला वधू म्हणून साजेशा वयाची होती . जॉफ्रीच्या खऱ्या स्वभावाची तिला सुतरामही कल्पना नव्हती .. देखण्या राजकुमाराशी आपलं लग्न होईल , आपण वेस्टेरोजची भावी राणी बनू , राजपुत्र आपल्यावर खूप प्रेम करेल , आपली सुंदर मुलं पुढे राजगादीवर बसतील अशा अत्यंत भोळ्याभाबड्या सोनेरी स्वप्नांमध्ये ती मग्न होती .. त्यांचा विवाह ठरणे ही अगदी शक्यतेच्या कोटीतली गोष्ट होती , स्टार्क घराणं राजाच्या घराण्याच्या तोलामोलाचं होतंच शिवाय रॉबर्ट आणि नेड स्टार्कचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते .

मधला मुलगा ब्रॅन आणि मुलगी आर्या हे जवळपास एकाच व्हायचेच 7 - 8 वर्षांचे होते . आर्याला राजघराण्यातील मुलींना दिलं जाणारं शिक्षण म्हणजे विणकाम , भरतकाम , चित्रकला , संगीत , वेगवेगळ्या कला , शिष्टाचार , नाजूक हसणं बोलणं या सगळ्यात अजिबात गोडी नव्हती ... तिला तलवारबाजी , निशाणेबाजी , युद्धाशी संबंधित कलांमध्ये रस होता . पण अर्थात लहान मुलगी म्हणून तिच्या आवडीनिवडी कोणी फार सिरियसली घेत नसत . तरी पुढे तिची हौस भागवण्यासाठी तिच्या वडीलांनी तलवारबाजी शिकवण्यासाठी एक शिक्षक नेमला .

ब्रॅन हा 10 वर्षांचा गोंडस खेळकर मुलगा सगळ्यांचा लाडका होता .. त्याला झाडं , उंच इमारती , मनोरे वगैरे खाचा असलेल्या इमारतीत पाय ठेवून सरसर वर चढून उंचावरून सगळं न्याहाळण्याची आवड होती .. याबद्दल त्याने अनेकदा आईची म्हणजे कॅटलिनची बोलणी खाल्ली होती पण तो काही स्वतःला रोखू शकत नसे .. रॉबर्ट आणि त्याचं कुटुंब विंटरफेलमध्ये वास्तव्यास आलेलं असतानाही ब्रॅन आपल्या नेहमीच्या टॉवरवर चढला .. हा टॉवर साधारण दुर्लक्षित अवस्थेत असे , तिथे क्वचितच वर्दळ असे . एरवी चिडीचूप शांत असलेल्या या टॉवर मध्ये त्यादिवशी मात्र कसलेतरी आवाज येत होते .. बालसुलभ कुतूहलाने आत डोकावून पाहताच त्याला किंग रॉबर्टची राणी सरसी आणि तिचा भाऊ जेमी नको त्या अवस्थेत दिसले .. त्या दृश्याचा अर्थ कळण्याएवढीही त्याची समज नव्हती . पण अचानक आपलं रहस्य उघड होण्याचा धोका उभा राहिलेला पाहताच राणी आणि जेमी भयंकर अस्वस्थ झाले . ही घटना जर किंग रॉबर्टला कळली असती तर त्या दोघांनाही भयानक मृत्युदंड दिला गेला असता . आपली कातडी वाचवण्यासाठी जेमीने ब्रॅनला त्या उंच टॉवरच्या खिडकीतून धक्का देऊन खाली पाडलं .

या अपघातात ब्रॅनचा मृत्यू होईल ही त्या दोघांची अपेक्षा मात्र पूर्ण झाली नाही . ब्रॅन काही काळासाठी कोमासदृश्य अवस्थेत गेला .. कॅटलिन दिवसरात्र त्याच्या उशापायथ्याशी बसून त्याची काळजी घेत असतानाच अज्ञात हल्लेखोराने प्रत्यक्ष किल्ल्यात , त्या शयनकक्षात येऊन निद्रिस्त ब्रॅनचा जीव घेण्याचा प्रयत्न केला . या झटापटीत कॅटलिन स्वतः जखमी झाली पण ब्रॅनच्या पाळीव लांडग्याने हल्लेखोराच्या नरडीचा घोट घेऊन मालकाच्या प्राणांचं रक्षण केलं . परिणामी ब्रॅनने अशी कोणतीतरी गोष्ट पाहिली असावी जी कोणापर्यंत पोहोचू नये यासाठी त्याला संपवण्याचा प्रयत्न केला गेला हे कॅटलिनच्या लक्षात आलं . मधील काळात नेड आपल्या सान्सा व आर्या या दोन मुलींना घेऊन रॉबर्टच्या सर्व कुटुंब व सैनिकांसहित राजधानीतील वास्तव्यास निघून गेला होता . हल्लेखोराने वापरलेला खंजीर अतिशय किमती दुर्मिळ धातूचा केवळ राजघराण्यातील लोकांनाच परवडू शकेल असा होता आणि त्याच्यापाशी मोहरांचा बटवाही सापडला होता .. त्यामुळे राजधानीतून जे लोक आले होते त्यांच्यापैकीच कोणाचंतरी हे काम असावं हा संशय कॅटलिनच्या मनात निर्माण झाला , लिसाची चिट्ठीही त्याला कारणीभूत होतीच . तेव्हा तो खंजीर घेऊन आपणच गुप्तरीतीने राजधानीत जाऊन नवऱ्याला भेटावं व खंजीर कोणाचा याचा शोध घ्यावा यासाठी कॅटलिन आपल्या अगदी मोजक्या विश्वासू माणसांना याची माहिती देऊन राजधानीकडे रवाना झाली ..

वेस्टरोज आणि बाहेरच्या प्रदेशाची सीमारेषा म्हणजे नाईट वॉल ही प्रचंड बर्फाची भिंत आहे .. इथे काही सैनिक / पहारेकरी नियुक्त केले जातात .. या पहाऱ्याला नाईट वॉच म्हटलं जातं . एकदा नाईट वॉचची शपथ घेतली की ती आयुष्यभर पाळावी लागते , व मरेपर्यंत तिथेच राहावं लागतं .. या पहारेकऱ्यांना विवाह , कुटुंब हे वर्ज्य आहे .. लग्न न करण्याची , स्वतःचं कुटुंब निर्माण न करता नाईट वॉचचे इतर सहकारी हेच कुटुंब आणि नाईट वॉचची ड्युटी हेच आयुष्याचं कर्तव्य मानण्याची शपथ त्यांना घ्यावी लागते . त्यांना परत मुख्य वस्तीच्या प्रदेशात म्हणजे 7 पैकी कुठल्याही राज्यात येण्याची परवानगी नाही , अखंड नाईट वॉचची ड्युटी पार पाडावी लागते . त्या वेशीपलीकडे मुक्त जीवन जगणारे आदिवासी / शिकारी सदृश्य लोक राहतात .. त्यांच्यापासून राज्याचं संरक्षण करणे हे नाईट वॉचचं काम आहे . जर एखादा पहारेकरी हे कर्तव्य सोडून कुठल्याही राज्यात आढळला तर त्याला मृत्युदंडाची शिक्षा आहे . हे काम स्वीकारण्यास कोणीही उत्सुक नसतात ... मृत्युदंड किंवा हात पाय तोडणे अशी शिक्षा झालेल्या गुन्हेगारांसमोर ती शिक्षा किंवा नाईट वॉचचा पहारेकरी होणे असे दोन पर्याय ठेवले जातात , त्यावेळी ते नाईट वॉच स्वीकारतात .. किंवा अतिशय दरिद्री लोक पोटाची सोय होईल म्हणून नाईलाजाने हा पर्याय स्वीकारतात .

याआधी हा लेख मिसळपाव संकेतस्थळावर प्रकाशित केला होता ... माहितीत काही चुका झाल्या असल्या तर जाणकार प्रेक्षकांनी निदर्शनास आणून द्याव्यात ही विनंती ...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

लेख वाचला नाही पण मी चार सिझन पूर्ण आणि पाचव्याचे २ भाग पाहिले. लय मंजे लय बोर झालं म्हणून मग अर्धवट सोडून दिली मालिका Lol Lol

असं करणारं अजूनकोणी आहे का माझ्या सोबतीला? Wink

लेख वाचला नाही पण मी चार सिझन पूर्ण आणि पाचव्याचे २ भाग पाहिले. लय मंजे लय बोर झालं म्हणून मग अर्धवट सोडून दिली मालिका Lol Lol

असं करणारं अजूनकोणी आहे का माझ्या सोबतीला?
>>>>तिसरा सिजन अर्धा बघून सोडणारे चालतील? Lol

लेख मात्र खूप मेहनत घेऊन लिहिलेला दिसतोय. आवडला!

मी तर पहिला भाग बघून सोडून दिली. मी पण Proud
त्या पेक्षा मी LOR & Hobbit हे मुव्हीच रिपीट, रिपीट बघत बसते. all time favorite .

त्या पेक्षा मी LOR & Hobbit हे मुव्हीच रिपीट, रिपीट बघत बसते. all time favorite .

नवीन Submitted by 'सिद्धि' on 16 September, 2019 - 18
>>>>
नका रे असं करू, नका आठवण करून देऊ.
शनिवार रविवार गेला आता माझा Lol

मस्त लिहिलंय खुप सविस्तर माहिती दिली...गेम ऑफ थ्रोन आणि नार्कोस आल टाईम फेव्हरेट...त्या गेम ऑफ थ्रोन च्या एका सिजन मध्ये दोन तीन बाहुबली सहज बनतील

मी पूर्ण पुस्तक वाचून काढलं आहे
पाचही भाग
अप्रतिम डिटेलिंग आणि वर्णन
त्यामुळे सिरीज बघवली नाही अजिबात

पुस्तकांची मजा नाही सिरीज ला नाही. सिरीज मधे जे वेगळे वळसे घेतले आहेत ते पुढच्या दोन पुस्तकांमधे कसे उतरतील (ते वेगळे असणार आहेत असे म्हातारबुवांनी सांगितले आहे) ह्याची उत्सुकता आहे.

मला पाचवा भाग क्लिफहँगरला संपेल याची मुळीच कल्पना नव्हती. दिवसरात्र एक करून पाचही पुस्तके संपवली आणि पुढचे शोधू लागलो तर कळलं की ते लिहीलंच नाहीये.

अतिभयानक चिडचिड झाली.

अतिभयानक चिडचिड झाली. >> मला ते प्लॅन्ड वाटत नाही. पाचवा वाचताना म्हातारा रानोमाळ हरवलाय असे सारखे वाटत राहते. भयंकर धागे जिथे इथे उसवलेत नि ते कसे जोडायचे हे ठरवत असताना पब्लिशरने तगादा लावल्यामूळे आहेत तेव्हढी पाने देऊन टाकली असावीत Wink म्हणूनच पुढचा भाग अजूनही येतोच आहे.

@Ami- मी आहे तुमच्या सोबतीला...ऑफिसमध्ये लोक्स तावातावाने बोलायचे GOT बद्दल.... खुप curosity वाटली होती तेव्हा...

एकाच रात्री 2 सिझन पाहीले आणि पूर्ण mood off. झाला...नंतर पुढचे सिझन पाहीलेच नाही...आताही आहेत मोबावर सगळे सिझन पण पाहायची इच्छा होत नाही...

मेजर थ्रोबॅक >>> टोटली Happy

स्पॉइलर बद्दल. मी ही सिरीज दोन वेळा पाहिली आहे. तरी हे वाचल्यावर बराच भाग लक्षात राहिला नाही - कारण इतकी पात्रे व घटना आहेत की सगळे लक्षात राहणे फार अवघड आहे. ज्यांना या कथानकाची फारशी माहिती नाही त्यांना हे सगळे आठवणे अवघडच आहे.

सिद्धी, sonalisl, तुम्ही दोघीनी तर मालिकेला संधीच दिली नाही अजीबात :D.
मला वाटतं पहिला सिझन बराच चांगला होता. दुसरा सिझन बेक्कार आहे अगदी. मलातर फक्त ती हिरवी आतिषबाजी ही एकच गोष्ट आवडली होती त्यात.
अजय, अगदी योग्यवेळी थांबला म्हणजे! Happy
तिसरा सिझन परत थोडा बरा झाला आहे.
अज्ञातवासी जिथे थांबला.
मीमात्र अजून संधी देत राहिले Sad पण चौथासिझनदेखील ओकेच निघाला. जवळपास ५०% भाग संपून गेला आणि कथा काहीच पिकअप होत नाहीय आणि एकही व्यक्तिरेखा आपल्याला आवडत नाहीय म्हणल्यावर मग मात्र माझा पेशन्स संपला. आता थांबणंच योग्य होतं.

• आठवा सिझन चालू झाला तेव्हा मी मालिका बघायला घेतली होती.
• त्या सिझनचे सगळे स्पॉयलर वाचत होते.
• माझा चौथा सिझन संपला आणि तेव्हाच मालिकादेखील संपली, ब्रान राजा झाल्याचे कळाले.
यासगळ्या मुद्दयांचा किती सहभाग मला मालिका न आवडण्यात आहे माहित नाही.

मी आधी पुर्ण सिरीज बघुन पुस्तक वाचायला घेतली. खरचं सिरिजपेक्षा पुस्तकांमध्ये खुपच डिटेलींग मध्ये लिहीलंय. आत्ताशी पहीलंच वाचुन झालंय. थोड्याच दिवसात क्लॅश ऑफ किंग्जला सुरुवात करनारेय.

सुरुवात केली वाचायला. पण पहिली ओळ आणि पहिले दोन पॅरा वाचुन बोर वाटलं.
ऑफिसात सगळे नुसते गॉट मॅट गॉट मॅट करायचे. ऐकुनच आपण अज्ञानी असल्याचं फीलिंग यायचं. Happy
मी पण मग इषा-विक्याबद्दल बोलुन वचपा काढायचे Lol

वाचाव ते नवलच...GOT fans साठी स्पेशल नोकरी..
बघा कुणाला इंटरेस्ट असेल तर...

अधिक माहीतीसाठी खाली लिंक आणि जाहीरातीचा फोटो देतोय..

Screenshot_20190920-032225_Facebook.jpghttps://www.facebook.com/WikiOfThrones/

ही जाहीरात खरीच आहे का? असेल तर हा जॉब कदाचित एखाद्या पब मध्ये गॉटवर आधारीत क्विझ मास्टर म्हणून किंवा गॉट थीमबेस्ड एस्केप रूम तयार करण्यासाठी असावा. किंवा एखादी गॉट बेस्ड वेबसाईट करत असतील.

मी आता पहिलं पुस्तक वाचत आहे ... सुरुवातीला इंग्रजी खूप कठीण वाटलं होतं .. याआधी वाचलेली थोडीफार पुस्तकं खूप सोप्या इंग्रजीत होती .. त्यामानाने हे खूप एकाग्रतेने लक्षपूर्वक वाचावं लागत होतं , सुरुवातीची 100 - 1 पानं तर दोनदोनदा वाचावी तेव्हा कुठे पूर्ण अर्थ समजत होता .... कथा आवडत असूनही फक्त इंग्रजी जमत नसल्याने कितीदा कंटाळून बंद केलं पुस्तक .... तरी रोज थोडी पानं वाचली कशीबशी .. पुढे सोपं झालं.. आता स्टोरीत रंगून जायला झालं आहे ... मालिकेत सगळं पाहिलं असूनही तेच वाचताना वाईट वाटल्यावाचून राहत नाही ...

लॉर्ड ऑफ द रिंग्ज वाचायचं आहे पण त्यातलं इंग्रजी तर आणखी कठीण वाटतं .. ही पाच पुस्तकं संपली की मग LOTR वाचायचं म्हणत आहे ... चित्रपट पाहिले होते , आवडले होते पण पारायणं करण्याएव्हढे वगैरे नाही .. कुठल्याच पात्राबद्दल फारशी आत्मीयता निर्माण झाली नाही , उलट गेम ऑफ थ्रोन्स पहिल्या एपिसोड पासूनच स्टार्क कुटुंबाशी लगेच मनाचे धागे जुळले त्यामुळे बोअर कधी झाली नाही मालिका ...

सिद्धी, sonalisl, तुम्ही दोघीनी तर मालिकेला संधीच दिली नाही अजीबात :D.>> संधी दिली Happy
नवर्‍याच्या आग्रहाखातर बघायला सुरुवात केली आणि ३-४ भागांनंतर मालिका चांगली वाटली. शेवट काय अन कसा होतो याबद्दल माहित नव्हते म्हणून मालिका (मारामारी पळवत) शेवटपर्यंत पाहिली. आवडली.