गूढ, अद्भुत तरीही विलोभनीय ....गिरनार (भाग २)

Submitted by आशिका on 19 September, 2019 - 03:23

तुमच्या गावी आलो आम्ही

प्रवास सुरु झाला. दोन वेगळ्या डब्यांत मिळून आमचे २४ लोक बसले होते. आयोजक थोड्या थोड्या वेळाने चक्कर मारुन कुणाला काही हवं नको ते पहात होते. मिनरल वॉटरचे वाटप करीत होते. जाताना दुपारचे जेवण बोरीवली येथे तर रात्रीचे अहमदाबाद येथे गाडीत चढवले गेले. आयोजकांचे टाय अप्स असलेल्या कॅटररने पॅक्ड फूड गाडीत पोहोचते केले. पहाटे पावणेतीनच्या सुमारास जुनागढ येणं अपेक्षित होतं, जिथे आम्हाला उतरायचं होतं. त्यामुळे अहमदाबादला जेवण झाल्यावर सगळे गुडुप झोपून गेलो. झोपताना अडीचचा गजर लावला होता. त्याप्रमाणे उठलो. सामान आवरले. गाडी वेळेवर पोहोचत होती. साधारण तीनला दहा मिनिटे असतांना आम्ही उतरलो. रिक्षात बसून लगेच तळेठी गाठले. तिथेच आमची रहयची सोय केली होती आणि तिथूनच सगळीकडे जायचे होते.

पंधरा-वीस मिनिटांत आमचे हॉटेल आले. रूम्स ताब्यात दिल्या गेल्या. रूमवर गेल्यावर काही वेळ आराम केला. सकाळी नऊ-साडेनऊला तयार रहायला सांगितले होते. त्याप्रमाणे आवरत होतो. रुमवरच चहा नाश्ता केला.

आज २५ ऑगस्ट रविवारचा दिवस होता. आज रात्री गिरनार चढण्यास सुरुवात करायची होती. खोलीबाहेर असलेल्या गॅलरीतून आजुबाजूला पर्वत शिखरे दिसत होती. त्यांपैकी अनेकांच्या माथ्यावर ढगांनी दुलई पसरली होती.हिरव्यागार पर्वतशिखरावर अधेमधे पिंजलेल्या कापसासारखे भासणारे ढगांचे पुंजके लक्ष वेधून घेत होते. यातलं नेमकं कुठलं आपल्याला चढायचंय? उत्सुकता शीगेला पोचत होती. डाव्या बाजूला दिसत असणारा पर्वत आम्हाला दाखवला गेला. त्यावर काही बांधकाम केलेलं दिसत होतं. तो जैन मंदीर परिसर, जो ४००० पायर्‍या चढल्यावर येतो तो. इथवर जाणारे बरेच आहेत. विशेषतः स्थानिक जैन लोक. तेथून अजून वरती अगदी इवलुसं काहीतरी दिसत होतं ते अम्बाजी धाम होतं, ५००० पायर्‍या चढून येणारं अंबा मातेचं मंदीर. मग दहा हजार पायर्‍यांवरचं दत्तशिखर कुठे होतं? तर तिथे पोहोचण्यासाठी हा अम्बाजी धामचा पर्वत चढून विरुद्ध बाजूने उतरावा लागणार होता आणि त्या पुढे अजून एक डोंगर चढून उतरल्यावर मग तिसर्‍या सुळक्यावर दत्तशिखर. अबब.....

त्यामुळे पायथ्यापासून वर नजर टाकली तर दत्तशिखर नजरेत येणे शक्यच नाही. मनात म्हटलं इथे काही मुखदर्शन, लांबून दर्शन, व्हीआयपी दर्शन, नवसाची रांग अशा कॅटेगरीज नाहीत. जे आहे ते दहा हज्जाराचा पल्ला गाठूनच पहायचं.

First look1.jpg तळेठी गाव
Talethi1.jpgTalethi2.jpg

साधारण दहाच्या सुमारास बाहेर पडलो. सर्वप्रथम तळेठी गावचे ग्रामदैवत 'भवनाथ' मंदीरात निघालो. गिरनार यात्रा ज्या गावातून सुरु होते त्या गावच्या दैवताला सर्वप्रथम आमची यात्रा निर्विघ्नपणे पार पडू दे असं साकडं घातलं जातं. त्यासाठी सर्वात आधी या शिवमंदीरात आलो.पाऊस नव्हता. प्रसन्न हवा होती. सुंदर नक्षीदार बांधकाम असलेले हे शिवमंदीर खूप छान आहे. दर्शन घेऊन तेथून बाहेर पडलो.

Bhavnath1r.jpg भवनाथ मंदीर
Bhavnath2r.jpg

आता कुठे? याचं उत्तर आलं "जटाशंकर", बरं म्हणत निघालो. तसं आम्हाला सांगितलं गेलं की जास्त नाही पण पाचएकशे पायर्‍या चढायच्या आहेत. माझा 'आ' वासला. एकतर गेले काही दिवस कोणत्याही संख्येपुढे ‘पायर्‍या’ हा शब्द ऐकू येताच माझे कान टवकारले जात होते. माझी चलबिचल सुरु झाली. डोळ्यांसमोर भाच्याचं मॅरेथॉनचं शेड्युल आलं. स्पर्धेसाठी ढोर मेहनत घेतात मात्र स्पर्धा ज्या आठवड्यात आहे तो पूर्ण आठवडा आरामाचा असतो. कसलाही व्यायाम करायचा नसतो शेवटचे काही दिवस. स्पर्धेसाठी एनर्जी साठवून ठेवायची असते. मी सुद्धा असेच केले होते. पण हे काय भलतेच? आज रात्री ‘मिशन गिरनार’ आहे तर त्याआधी कशाला ५०० पायर्‍या चढून उतरायच्या? ते ही उन्हात? आपण ग्रुपसोबत आहोत त्यामुळे ग्रुप लीडरच्या मतानुसारच वागायला हवे हे कळत होते, तरी देखील मी एक खडा टाकायचा असे ठरवून बोलले की “आता रात्री जाणारच आहोत ना, तेव्हाच ५०० पायर्‍यांवर जटाशंकराचं दर्शन घेतलं तर नाही का चालणार?”, "नाही हो ताई, जटाशंकर या अंगाला आणि गिरनार त्या तिथे". “अरे देवा”, हे स्वगत होतं. शेवटी ठरवलं की आपण स्पष्ट बोलून तर बघू. म्हटलं, "दादा, आपण आत्ताच ५०० पायर्‍या चढून उतरलो तर आपली एनर्जी वाया नाही का जायची या उन्हात? रात्रीसाठी ठेवायला हवी ना शिल्लक? उद्या करुयात का जटाशंकर?” तर उत्तर आले की "जटाशंकर म्हणजे प्रिलिम आहे असं समजा आणि रात्री फायनल एक्झाम." “बोंबला… म्हणजे प्रिलिम नंतर लग्गेच त्याच दिवशी फायनल? आपल्या चुका सुधारायला काही वावच नाही की..”. हे ही अर्थात स्वगत होतं. आता ठरवलं की जाऊ दे आता हे लोक जिथे नेतील तिथे गपगुमान जायचं, सांगतील तसं चढायचं , सांगतील तेव्हा उतरायचं. बाकी कोणीच काही बोलत नव्हते तर आपणच का विरोध करावा? त्यात ६९ वर्षांचे आजोबा, दुसरे साठीचे जोडपे उत्साहात चढायला तयार होते त्यांच्यासमोर मी हॉटेलवर जाऊन आराम करते हे बोलायचीही लाज वाटू लागली. मनाशी पक्कं केलं जे व्हायचंय ते सर्वांसोबत माझंही होईल, आता जास्त आढेवेढे घेणं नको. आमच्या म्होरक्याने शेवटी म्हटलं “ताई तुम्ही चला तर खरं, नक्की आवडेल तुम्हाला असं ठिकाण आहे ते.”

त्यांच्या शब्दांची प्रचिती काही वेळातच आली.गल्लीबोळ पार करत एका आडवाटेला लागलो आणि काही क्षणांतच घनदाट जंगलात. आजूबाजूला प्रचंड मोठमोठाली झाडं आणि अवतीभवती दगडा-खडकांतून जाणारी वाट, काही ठिकाणी कच्च्या पायर्‍या. बाजूलाच खळखळत वाहणारा झरा. ज्याचा आवाज मन प्रसन्न करीत होता. झाडे झुडपे इतकी दाट होती की सूर्यकिरणे जमिनीपर्यंत पोचतही नव्हती, अंधारुन आलं होतं.जाता जाता पक्ष्यांचे विविध आवाज अगदी मोराचा केकाही ऐकू आला. वाटेत भरपूर माकडे दिसली. पण ती माणसांना त्रास देत नव्हती. एकंदर परीसर आल्हाददायक होता. अजून एक आनंदाची गोष्ट मला जाणवली ती म्हणजे जिथे सूर्यकिरणे पोचू शकत नव्हती तिथे जिओचे नेटवर्क मात्र व्यवस्थित मिळत होते. ताबडतोब घरी व्हिडिओ कॉल लावला आणि घरच्यांना ही रम्य जागा दाखवली. कधीही कुठेही माझ्यासोबत असणार्‍या घरच्या तीन मेम्बरांची प्रकर्षाने आठवण येत होती.मध्ये एका ठिकाणी पाण्याचा प्रवाह ओलांडून पुढे जायचे होते, तिथे मात्र जरा भिती वाटली इतकंच. मुंबईकरांसाठी भुशी डॅमचे जे स्थान ते इथल्या स्थानिकांसाठी जटाशंकरचे. जागॄत देवस्थान म्हणून ज्ञात असलं तरी पिक्निक स्पॉट सारखी गर्दी, पाण्याच्या प्रवाहाखाली डुंबणारी जनता. पाचशे पायर्यांची तमा न बाळगता ट्रंका, पेटारे भरभरुन घरून आणलेले खाणे-पिणे उत्साहात वाहून नेणार्‍या बायका आणि दर पाचेक मिनिटांवर एखाद्या डेरेदार वॄक्षाखाली गोलाकार विसावलेला कुटुंब कबिला, मधोमध वर्तमानपत्राच्या कागदांवर उघडलेले खाण्याचे डबे, अगदी बाटल्या भरभरुन ताकसुद्धा घरुन घेऊन आली होती ही मंडळी. हे दॄश्य पाहून माझी मैत्रीण अगदी सद्गदीत झाली. मला म्हणे गुजराथी माणूस कधीही कुठेही भुकेला रहात नाही, ठाण मांडून खाणं चालू करतो आणि त्यापुढे मी गुजराथी माणूस आणि त्याची खाद्ययात्रा यावर एक चमचमीत व्याख्यान ऐकले.

jatashankar1.jpgJatashankar2.jpg

पुढे जात जात आम्ही मंदीरात पोहोचलो. एका गुहेत , कपारीत ते स्वयंभू शिवलिंग होते आणि त्या भोवती डोंगर कपारीतून वाहत आलेल्या झर्यातील पाणी वाहत होतं. खरंच खूप शांत, रम्य वातावरण होतं तिथलं. मन प्रसन्न करुन गेला तो माहोल. दर्शन झल्यावर आम्ही परतीचा मार्ग घेतला.
jatashankar3.jpg जटाशंकर मंदीर
यापुढचं ठिकाण होतं साक्षात गिरनार पर्वताची पहिली पायरी. नाही चढाई रात्रीच करायची होती. पण भवनाथ आणि जटाशंकर दर्शनाननंतर गिरनारच्या प्रथम पायरीवर नतमस्तक होत दत्तगुरुंना आणि स्वतःच्या आराध्य दैवताला प्रार्थना करायची असते की आज रात्री आम्ही तुमच्या दर्शनासाठी निघणार आहोत. आम्हाला सुखरुप वरपर्यंत नेऊन आणा. त्यानुसार आमच्यातील प्रत्येकाने पहिल्या पायरीवर डोके टेकून मनोभावे प्रार्थना केली. शेजारीच 'चढवावा हनुमान' नामक हनुमान मंदीर आहे. हनुमानाकडेही पर्वत चढून उतरण्यासाठी शक्ती द्यावी अशी याचना करायची असते. ते ही केले आणि जेवून हॉटेलवर परतलो.

आराम केला. डोंगरावर नेण्याचे जुजबी सामान सॅकमध्ये भरले. आपल्याकडे काही देवळांत विशिष्ट पोशाख घालूनच प्रवेश दिला जातो असे बंधन इथे अजिबात नाही. ज्याला चढतांना जे कंफर्टेबल वाटेल ते घालावे असे सांगण्यात आले होते. जीन्स, शॉर्टस, थ्री फोर्थ काहीही. संध्याकाळी जरा पाय मोकळे करुन आलो आणि जेवलो. रात्रीसाडेअकराला पुन्हा आंघोळ करुन निघायचे होते. डोंगर चढतांना आधारासाठी प्रत्येकाला काठी देण्यात आली होती.

एका हातात टॉर्च आणि दुसर्‍या हातात काठी या दोन गोष्टी प्रत्येकाकडे असायलाच हव्यात असे सांगितले गेले होते. दुसर्‍या दिवशी दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत डोंगरावर नेटवर्क नसल्यामुळे संपर्क करता येणार नाही, तरी काळजी करु नये असे घरच्या सदस्यांना सांगून ठेवायची सुचना आधीच केली गेली होती. निघतांना घरी फोन केला, सर्वांशी बोलले. मन भरुन आले होते. नवर्‍याला म्हटलं की जोवर नेटवर्क मिळतंय तोवर मी तुला एसेमेस पाठवत राहीन, किती पायर्‍या चढले , कशी आहे वगैरे. तू सकाळी उठशील तेव्हा मी नेटवर्कमध्ये नसेन पण तुला निदान समजेल तरी माझा प्रवास.

गेले तीन महिने सतत ज्याचा विचार मनात घोळत होता, अगदी ध्यास लागला होता, ते आता काही तासांनंतर दॄष्टीपथात येणार होते. खरंच डोळ्यांनी दिसणार होते की अर्धवट परतावे लागणार होते? माहीत नाही. पण आता त्याची पर्वा नव्हती. ज्याने इथवर आणलं तोच ठरवेल पुढचं. पण जर त्रास झाला, विशेषतः श्वास लागला, धाप लागली तर न लाजता डोली करायची हे मी मनाशी ठरवले होते. तरीही ती वेळ येऊ नये, आपण पायी चढून जावे ही इच्छाही होतीच.

आता ज्यासाठी इतका अट्टाहास केला त्या गिरनारस्थित दत्तगुरुंबद्दल थोडेसे:-
(ही माहिती 'दत्त अनुभुती' हे पुस्तक तसेच आंतरजालावर गिरनार बद्द्ल जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार इथे देत आहे).

गुजरात राज्यातील जुनागढ शहरात गिरनारच्या पर्वतरांगा आहेत. समुद्रसपाटीपासून ३६६५ फूट उंचीवर या पर्वतरांगांवरील सर्वांत उंच शिखर - गोरक्षशिखर आहे. तसेच 'गुरुशिखर' - हे गुरु दत्तात्रेयांचे अक्षय्य निवासस्थान आहे असे मानतात. 'गुरुशिखर' या ठिकाणी दत्तगुरुंच्या पादुका - खडकावर अर्धा ते एक इंच आत रुतलेल्या पावलांच्या ठशांच्या रुपात आहेत. पादुकांच्या मागे त्रिमुर्ती स्थापन केली आहे. पूर्वी गुरुजींव्यतिरिक्त केवळ एक व्यक्ती जाऊन दर्शन घेऊ शकेल इतपतच जागा होती, मात्र आता बांधकाम करुन साधारण १५ ते २० माणसे आत मावू शकतील इतकी जागा केली आहे. या स्थानावर गुरु दत्तात्रेयांनी, ज्या वेळी अत्री ऋषी - आणि अनसुयामातेचे पुत्र म्हणून पृथ्वीवर लौकिक अवतार धारण केला होता तेव्हा, या गुरुशिखरावर तब्बल १२००० वर्षे तपश्चर्या केली होती असे म्हणतात. तपश्चर्या सुरु असताना जुनागढ येथे दुष़्काळ पडला. पाऊस पडत नव्हता, त्यामुळे पिक-पाणी होत नव्हते, गुरे, वासरे, माणसे मरु लागली. त्यावेळी अनसुया मातेने आपल्या लेकाला तपश्चर्येतून जागे केले. जागे होताच त्यांनी आपल्या हातातील कमंडलू खाली फेकला, तो दुभंगून दोन ठिकाणी पडला, एका ठिकाणी पाणी उत्पन्न झाले तर दुसर्‍या ठिकाणी अग्नी. अशा प्रकारे दत्तात्रेयांनी अग्नी व पाण्याची सोय करुन जुनागढ मधील दुष्काळ दूर केला होता. या स्थानावर आजही अन्नपूर्णेचा वास आहे असे म्हणतात व येथे येणार्‍या प्रत्येकाला अन्नपूर्णेचा प्रसाद दिला जातो. अगदी सकाळी सहा वाजल्यापासून. त्यामुळे गिरनार चढत असतांना उपवास करु नये, इथला अन्नपूर्णेचा प्रसाद ग्रहण केल्यावरच ही यात्रा संपन्न होते असे म्हणतात. त्या ठिकाणी आजही पाण्याचे कुंड आहे. या स्थानाला ‘कमंडलू तीर्थ’ असे संबोधले जाते. जिथे अग्नी प्रकटला तिथे आजही दर सोमवारी पिंपळाच्या पानांची मोळी ठेवून विशिष्ट मंत्रोच्चरण करतांच स्वयंभू अग्नी प्रकट होतो. हीच धुनी. दत्तगुरु तेथे धुनीच्या रुपात प्रकटतात व अनेकांना त्या धुनीत त्यांचे आजही दर्शन होते असे म्हणतात. त्याचप्रमाणे इथे गोरक्षनाथांचे स्थान आहे. त्यांनी आपले सद्गुरु श्री दत्तात्रेयांना प्रार्थना केली होती की जिथे मी आहे तिथे तुम्ही, माझे गुरु असायलाच हवेत. म्हणूनच गोरक्षनाथांनी अधिक उंचावर जाऊन तापश्चर्या केली जेणेकरून त्यांच्या नजरेसमोर दत्तपादुका राहातील. हे गोरक्षशिखर म्हणूनच सर्वात जास्त उंचीवर (३६६५ फूट) आहे. पायथ्यापासून ४००० पायर्‍यांवर जैन तीर्थंकर नेमिनाथ यांचे स्थान व जैन मंदीरे आहेत. तर ५००० पायर्‍या चढल्यावर अंबा मातेचे देऊळ आहे. अंबा मातेच्या चरणी नतमस्तक होऊन,तिचा आशिर्वाद घेऊनच गुरु शिखराकडे मार्गस्थ व्हावे असा प्रघात आहे. साधारण अडीच ते तीन हजार पायर्‍यापर्यंतची वाट ही गीरच्या जंगलातील आहे. त्यामुळे वन्य श्वापदे दिसू शकतात. यासाठी काठी आणि टॉर्च सोबत घ्यायला सांगितले जाते.

स्वतःभोवती अनेक गूढ वलये ल्यालेला, अद्भुत अशा आख्यायिका ज्याबद्दल सांगितल्या जातात असा हा गिरनार पर्वत. गिरनार चढण्यास जायचे असल्यास व्यवस्थित रस्ता माहीत असलेली व्यक्ती सोबत असावी, त्याचप्रमाणे जो वहिवाटीचा रस्ता आहे, त्या वाटेनेच चढावे आणि उतरावे असे सांगितले जाते. गिरनार ही पर्वत शॄंखला आहे. वहिवाटेनुसार जैन मंदीर, अंबाजी, गोरक्षशिखर,गुरुशिखर या मार्गाने न जाता, वेगळ्याच पर्वतावरुन, वेगळ्या मार्गानेही जाता येत असावे, मात्र अशा कोणत्याही वेगळ्या मार्गावर पायर्‍या, लाईटस नाहीत. पायरी मार्गावर लाईटस आहेत पण फार अंधुक प्रकाश, त्यामुळे पावसाळी वातावरणात टोर्च शिवाय पर्याय नाही. इतर मार्गाने जाता -येतांना वाट चुकण्याची, वन्य श्वापदांची भिती असते. या पर्वतांवर बर्‍याच गुहा आहेत. तिथे आजही अनेक जण तपसाधना करीत असतात. अशा आडमार्गावर अनेक तांत्रिक त्यांची साधना करीत असतात, त्यांच्या मार्गातून आपण जाऊ नये आणि म्हणून वहिवाटेनेच पायर्‍या चढत जावं असं सांगितलं जातं.

शिर्डी, अक्कलकोट आणि इतरही काही देवस्थानांबद्दल जी वदंता आहे तीच या तीर्थक्षेत्राबद्दलही आहे की इथे कुणीही स्वतःच्या इच्छेने येऊ शकत नाही. 'दत्तगुरुंची इच्छा' असावीच लागते. अशा अनेक आख्यायिका, पुरातन कहाण्या मनात साठवत आम्ही २४ जण सांगितल्या गेलेल्या सुचनांचा आदर करुन, शंका कुशंकांना स्थान न देता, असं खरंच असेल का? असे उलट प्रश्न न करता अर्थात पूर्ण श्रद्धेने चढू लागलो. जास्त लोक ३० ते ५० या वयोगटातील होते. कौतुक करावे तर आमच्या चमूतल्या बाल शिलेदाराचे, रजत त्याचं नाव. खूप उंचावर असलेल्या दत्तबाप्पाच्या दर्शनाला आजी आजोबा आणि आजीची बहीण जात आहेत हे कळताच त्याने येण्याचा हट्टच धरला. इतका की शेवटी आयत्या वेळेस त्याला आणि त्याची काळजी घेण्यासाठी त्याच्या आईलाही आमच्या सोबत घेतले. कराटे शिकत असलेल्या या चिमुरड्याचा स्टॅमिना जबरदस्त, सात वर्षांचा हा पोरगा, न थकता उत्साहात चढला तसेच सकाळी उतरलाही, कुठेही झोप येतेय, दमलो अशी तक्रार, कुरकुर नाही की आईला त्याला कडेवर घ्यावे लागले नाही. हॅटस ऑफ टू रजत.

साडेअकराच्या सुमारास एकमेकांना शुभेच्छा देत बाहेर पडलो. पुन्हा एकदा बंद असलेल्या भवनाथ मंदीराला बाहेरुन नमस्कार करुन गार्‍हाणे घातले आणि मार्गस्थ झालो. पहिल्या पायरीपाशी आलो. बूट काढून पुन्हा एकदा पहिल्या पायरीवर नतमस्तक झालो. त्यावेळी कंठ दाटून आला. सद्गुरुंना म्हटलं, “हे इतकं मोठं दिव्य करायला धजावतेय पण एकटी आहे, तुम्ही माझ्यासोबत रहा बस्स”. 'चढवावा हनुमंतालाही प्रार्थना केली. बूट घातले आणि चढण्यास सुरुवात केली.

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सुंदर भाग!!
सोलापूरचे नरेश क्षिरसागर आणि त्यांचे काही गिरनारप्रेमी दत्तभक्त मार्गदर्शन,मदत करण्यासाठी कायम तयार असतात आणि सहली सुध्दा आयोजित करतात बहुतेक.

सुंदर लिहिलय.
पुढचा भाग लवकर येउदेत. फोटो सुद्धा अजुन येउदेत की. Happy

मस्त चालू आहे मालिका.

अंबा मातेच्या चरणी नतमस्तक होऊन,तिचा आशिर्वाद घेऊनच गुरु शिखराकडे मार्गस्थ व्हावे असा प्रघात आहे. >>> हा प्रघात हल्लीच पडला असावा. ते देऊळ अलीकडच्या काळातील आहे. आणि तसेही रात्री / भल्या पहाटे ते बंदच असते. त्यामुळे बाहेरूनच नमस्कार करून पुढे मार्गस्थ व्हावे लागते. पण एक मात्र होते या ठिकाणी - प्रचंड डळमळीत झालेला आत्मविश्वास दुर्दम्य इच्छाशक्तीत परावर्तित होतो.

तसेच 'गुरुशिखर' - हे गुरु दत्तात्रेयांचे अक्षय्य निवासस्थान आहे >>> गिरनार परीसरात पादुका असलेल्या शिखराला हल्ली गुरुशिखर म्हणतात. पण खरे गुरुशिखर अरवली पर्वतात आहे - राजस्थानात.

तुम्ही माझ्यासोबत रहा बस्स >>> गिरनार चढायला दोन मार्ग आहेत - स्वतःच्या फिटेनेसवर पूर्णपणे भरवसा असणे नाही तर श्रद्धा!

दोन्ही भाग अतीशय सुंदर झालेत. आशिका तुला दंडवत !

श्री दत्तबावनी लिहीणारे श्री रंगावधूत स्वामी यांच्या विषयी माहिती असेल तर लिही. गिरनारशी काही संबंध असेलच ना त्यांचा पण?

पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

धन्यवाद सर्वांना.
सोलापूरचे नरेश क्षिरसागर आणि त्यांचे काही गिरनारप्रेमी दत्तभक्त मार्गदर्शन,मदत करण्यासाठी कायम तयार असतात आणि सहली सुध्दा आयोजित करतात बहुतेक.>>> अमर ९९ - चांगली माहिती दिलीत. त्या भागातील कोणी जाऊ इच्छित असेल तर उपयोग होऊ शकतो. धन्यवाद.

फोटो सुद्धा अजुन येउदेत की>>>> फोटो रिसाइझ वगैरे करुन टाकणे बरेच वेळखाऊ आहे. तसंच लिखाण ही जास्त आहे. त्यामुळे फोटो मोजकेच पोस्ट केलेत.
हा प्रघात हल्लीच पडला असावा. ते देऊळ अलीकडच्या काळातील आहे. आणि तसेही रात्री / भल्या पहाटे ते बंदच असते. त्यामुळे बाहेरूनच नमस्कार करून पुढे मार्गस्थ व्हावे लागते. पण एक मात्र होते या ठिकाणी - प्रचंड डळमळीत झालेला आत्मविश्वास दुर्दम्य इच्छाशक्तीत परावर्तित होतो.>>>>> हे देऊळ अलिकडच्या काळातील आहे हे माहीत नव्हतं पण हो पहाटे बंद देवळाच्या पायरीवर नतमस्तक होऊनच पुढचा मार्ग धरला होता.
खरे गुरुशिखर अरवली पर्वतात आहे - राजस्थानात.>>>> माउंट अबूवरील म्हणत आहात का? ते असेल तर मी पाहिले आहे ते. पण तिथे पायी चढायची वाट फार थोडी आहे. कारण मुळात माउंट अबूच उंचावर आहे. तिथे एक मोठी घंटाही आहे, तेच ना?
गिरनार चढायला दोन मार्ग आहेत - स्वतःच्या फिटेनेसवर पूर्णपणे भरवसा असणे नाही तर श्रद्धा!>>> अगदी

श्री दत्तबावनी लिहीणारे श्री रंगावधूत स्वामी यांच्या विषयी माहिती असेल तर लिही. >>>> रश्मी - अजिबातच माहिती नाही गं

म मो, राजसी, वावे सिद्धी, नम्रता, प्रविण - सर्वांना धन्यवाद

सुंदर लेख आहे आशिका. तुमच्या या लेखामुळे आम्ही तेवीस वर्षांपूर्वी गिरनार येथे यात्रा केली होती त्या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद. आता बरेच बदल झाले आहेत. गेली दोन वर्षे माझे वडील गिरनार परिक्रमा देखील करत आहेत. त्यांनाही हे बदल जाणवले.

आशिका, मस्त लिहिते आहेस. तुझ्याबरोबर निघाल्यासारखं वाटतंय.

रश्मी, श्री रंगावधूत स्वामींचे नर्मदाकाठचे नारेश्वर. गेल्यावर्षी बडोद्याला ३ दिवस गेले होते कामासाठी तेव्हा थोडावेळ तिथे जाऊन आले.

बाप रे! पहाटे पावणेतीनला ट्रेन मधून उतरायचं? चलो ये भी करके देखते है.....:-)

लोकांच्या खाण्याबद्दल वाचून तिथे किती कचरा झाला असेल असे म्हणे म्हणतो फोटोत चिप्सच्या पाकिटासारखं काहितरी दिसलं. आपला कचरा सोबत न्यायची सवय लोकाना कधी लागेल असं वाटत नाही. असो. मंदिरात जायला काही खास ड्रेसकोड नाही हे वाचून बरं वाटलं. त्याचा खास उल्लेख केलात त्याबद्दल धन्यवाद! जैन मंदिरात जाता येतं का?मला दत्तात्रेय महाराष्ट्रातल्ं दैवत आहेत असं वाटलं होतं. गुजरात, राजस्थान इथेही मन्दिर्ं आहेत ही माहिती नवीन आहे.

हाही लेख मस्तच झालाय.

आहा! काय सुरेख झालाय हा भागदेखील. कथन करण्याची शैली रंजक आहे. बारीक सारीक बारकावे , निसरर्गसौंदर्यटिपून, लेखात ते मांडलेले आहे. हा भागदेखील फार आवडला.

मला दत्तात्रेय महाराष्ट्रातल्ं दैवत आहेत असं वाटलं होतं. गुजरात, राजस्थान इथेही मन्दिर्ं आहेत ही माहिती नवीन आहे >>>> नेपाळात भक्तपूरमध्ये अगदी पुरातन दत्ताचे देऊळ आहे. कर्नाटकात गाणगापूर वगैरे ठिकाणी दत्ताची स्थाने आहेत.

माउंट अबूवरील म्हणत आहात का? >>> हो तेच. गिरनारला न गेलेल्या लोकांकरता गुरुशिखर म्हणजे माउंट अबूजवळीलच! अशाच एकाने माझी चूक सुधारली होती.

गेली दोन वर्षे माझे वडील गिरनार परिक्रमा देखील करत आहेत.>>>अरे वा, परिक्रमेबद्दलही बरेच ऐकले आहे.
मला दत्तात्रेय महाराष्ट्रातल्ं दैवत आहेत असं वाटलं होतं. >>>अश्विनीने सांगितली आहेतच. शिवाय कुरवपुर हे कर्नाटकात आणि पीठापुर आंध्रप्रदेशात असलेलं दत्तक्षेत्र. मात्र इथे चढून जायचं नाही. खालीच आहेत ही क्षेत्रं.

काही नवीन फोटोज पोस्ट केले आहेत.
धन्यवाद

धन्यवाद अश्विनी Happy

ओके, आशिका. मला वाटलं की गिरनार प्रदक्षिणेत तेथील लोक श्री रंगावधूत स्वामींबद्दल माहिती सांगत असतील कारण दत्तबावनी खूप परीणामकारक आहे. Happy

ती माकडे नाहीत, वानरे आहेत. ती अजिबात ओरबाडत नाहीत. शिस्तीत एकापाठोपाठ एकजण दिलेला खाऊ घेतात. बऱ्याच ठिकाणचा अनुभव आहे. त्यांच्या घोळक्यातही बसलेलो आहे.
दुरुस्ती : गिँरनारला गेलो नाही पण वानरांचा अनुभव आहे इतर ठिकाणचा.

>>बऱ्याच ठिकाणचा अनुभव आहे. त्यांच्या घोळक्यातही बसलेलो आहे.>>
Srd - आपला गिरनार यात्रेचा अनुभव वाचायला देखील आवडेल.

सामो, गिँरनारला गेलो नाही पण वानरांचा अनुभव आहे इतर ठिकाणचा.
गिरनार आणि जुनागढ जरा इंटरेस्टिंग वाटतय. बर्याच ऐतिहासिक गोष्टी आहेत तिथे . सर्वच पाहण्याचा विचार आहे. या लेखात बरीच डिटेल माहिती दिली आहे गिरनारची.

सुरेख ओघवते वर्णन...
गुरुशिखरची माहिती छानच...

पहिल्या पायरीपाशी आलो. बूट काढून पुन्हा एकदा पहिल्या पायरीवर नतमस्तक झालो. त्यावेळी कंठ दाटून आला. सद्गुरुंना म्हटलं, “हे इतकं मोठं दिव्य करायला धजावतेय पण एकटी आहे, तुम्ही माझ्यासोबत रहा बस्स”. >>> अशा शरणागत भक्तासाठीच देव असतो.

____/\____

Pages