गूढ, अद्भुत तरीही विलोभनीय ....गिरनार (भाग १)

Submitted by आशिका on 17 September, 2019 - 02:32

पार्श्वभूमी:

आपण आपल्या आयुष्यात काही गोष्टींचा ध्यास घेतला असतो. ती गोष्ट पुरी करण्यासाठी आपण जीवाचे रान करुन ते ध्येय गाठतो. पण कधीतरी असेही होते की कसलीही इच्छा, योजना मनात नसतांना एखादी गोष्ट आपसुक आपल्या पुढ्यात येऊन ठाकते आणि आपण अगदी झपाटल्यागत त्या मागे लागतो. ती पुरी करण्याच्या दॄष्टीने योग्य ती कार्यवाही अगदी नकळत घडून येते. घरात एखादं पक्वान्न बनवलं असतं आणि आई ते पक्वान्न आपल्या बाळाने खावं म्हणून आग्रह करत असते, पण अजाणतेपणामुळे बाळ मात्र नको नको म्हणत आढेवेढे घेत असतं. शेवटी आई बाळाचा हात धरुन स्वहस्ते त्याला भरवते आणि ती अवीट गोडी चाखतांच बाळाला जो आनंद होतो त्याचे वर्णन शब्दातीत असतं.

ऑगस्ट अर्थात श्रावण महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात माझ्याकडून गिरनार पर्वताची यात्रा घडली. त्याची कहाणीही थोडीफार अशीच आहे. ही यात्रा अगदी पाच सहा दिवसांची असली तरी तो प्रवास माझ्या मनात त्याआधी तीन महिन्यांपासून सुरु झाला होता. या प्रवासात जे जे घडले ते तुमच्याबरोबर शेअर करावे तसेच हा अनुभव कायम स्मरणात रहावा यासाठी हा लेखनप्रपंच.

हे निव्वळ प्रवासवर्णन नाही. तर त्याला माझ्या विचारांची,अनुभवांची जोड आहे. वर लिहिल्याप्रमाणे मूळ प्रवासाच्या ३ महिने अगोदर ज्या आणि जशा घटना घडून आल्या आणि ध्यानी मनी नसलेली ही यात्रा माझ्याकडून घडवली गेली त्याचे मला जसे जाणवले तसे वर्णन यात असेल. या लेखनमालिकेचा 'श्रद्धा' हाच मूळ गाभा आहे, हे लक्षात घेऊनच हे वाचाल तर हे लेखन अधिक भावेल असं वाटतं.

साधारण फेब्रुवारी महिन्यात माझा चुलत भाऊ माझ्या घरी आला होता. त्या वेळी त्याने 'दत्त अनुभुती' नामक एक पुस्तक मला भेट दिले. "वाच तुला नक्की आवडेल", असं म्हणाला. यात काय आहे? असं विचारताच या पुस्तकाच्या लेखकाने गिरनार पर्वताच्या ११ वार्‍या केल्या आहेत आणि त्या दरम्यानचे अनुभव यात लिहिले आहेत हे सांगितलं त्याने. “मी वाचेन” म्हणून ते पुस्तक असंच टीपॉयमध्ये इतर पेपरांसोबत ठेवून दिले आणि त्याबद्दल विसरून गेले. या घटनेला तीन साडेतीन महिने उलटून गेल्यावर १८ मे या दिवशी घरात एकटी असतांना अचानक मला या पुस्तकाची आठवण झाली. लगेच ते वाचायला घेतले. अक्षरशः ते खाली ठेववेना, इतके थरारक अनुभव त्यात लिहिले होते. तोवर मला गिरनार नामक एक उंच पर्वत असून तिथे दत्तगुरुंचे जागॄत स्थान आहे जिथे गीरच्या जंगलातून जावे लागते,इतपत जुजबी माहिती होती. मात्र हे पुस्तक वाचत असतांना बर्‍याच गोष्टी कळल्या. काही शंका कुशंका मनात आल्याही ज्यांचे निरसन गूगल भाऊंनी केले. दहा हज्जार पायर्‍या चढून या दत्तगुरुंच्या स्थानी पोहोचता येते हे वाचताच "माझा आपला इथूनच नमस्कार घे दत्तबाप्पा" हे सहजोद्गार निघाले. याचं कारण मी मुळात श्रद्धावान असले तरी आवाक्याबाहेर असलेली शारिरीक मेहनत घेऊन, खूप उंच चढून किंवा खूप वेळ चालत त्याचप्रमाणे तासंतास रांगा लावून देवदर्शन घेणार्‍यांतली नाही. देव तर आहेच ना सर्वत्र , मग काय गरज आहे इतका त्रास करुन कुठे जायची हे असं साधं सोपं लॉजिक मी नेहमी लावत आले आहे. त्यामुळे गिरनारबद्दल काही वेगळे घडण्याची सुतराम शक्यता माझ्या बाबतीत नव्हती. पण.....

तसे घडायचे नव्हते………..

हे पुस्तक वाचल्यापासून गिरनार माझ्या डोक्यात घोळू लागाला. दुसर्‍या दिवशी नेटवर गिरनार बद्दल माहिती वाचून काढली. यू ट्युबवर काही व्हिडीओज पाहिले. पुस्तक वाचून आवडल्याची पोच रविवारी रात्री भावाला व्हॉटसअपवर दिली. त्याच्याशी चॅटींग करत असतांना सहज बोलून गेले की “हे पुस्तक वाचल्यापासून एकदातरी गिरनारला जावंस वाटतंय रे”. त्यानेही थम्ब्स अप ची स्मायली पाठवली आणि मी झोपले. दुसर्‍या दिवशी स्वप्नात मी स्वतःला गिरनार पर्वत चढत असलेलं पाहिलं. दोन दिवस सतत हेच विचार करतेय त्याचा परिणाम म्हणून असले स्वप्न पडले असणार असा विचार करतच सकाळी उठले. दूध तापत ठेवले असतांना सहज म्हणून फोन हातात घेतला, नेट ऑन केलं. सर्वात पहिले दिसला तो भावाचा मेसेज की श्रावण महिन्यात २४ ते २९ ऑगस्ट गिरनार यात्रा,इतर माहिती आणि लवकर नावे नोंदवण्याची सुचना. माझ्या भावाची मेडीकल कॉलेजातील मैत्रीण, जी स्वतः ज्या ग्रुपसोबत गिरनार यात्रा करुन आली होती तिने याच ग्रुपच्या पुढच्या यात्रेसंबंधित माहिती माझ्यासाठी भावाला पाठवली होती.

आपलं स्वप्न खरं होऊ घातलंय की काय असं मनात येऊन जीवाची उगीचच तगमग होऊ लागली. का कोण जाणे पण आपण गिरनारला जावं असं वाटू लागलं, पण त्याचबरोबर दहा हजार पायर्‍या समोर दिसू लागल्या. हे काही आपल्याला झेपायचे नाही. लहानपणापासून आजतागायत कधीच कुठला मैदानी खेळ, नियमित व्यायाम काहीही न केलेली मी, आता एकदम दहा हजार पायर्‍या कशा काय चढणार? याबद्दल साशंक होते, नव्हे माझ्या आवाक्यातलं हे नाहीच अशी खात्री होती.पण आतला आवाज काही वेगळं सांगत होता आणि ते म्हणजे प्रयत्न तर करुया, इतके लोक जाऊन आले आहेत की.कदाचित जमेलही आपल्याला. द्विधा मनःस्थिती झाली. लेकाचे दहावीचे वर्ष, त्याला फक्त आईंसोबत ठेवणे नवर्‍याला योग्य वाटेना, आईंचे ही वय झाले आहे. मग नवरा म्हणाला की तुझी मनापासून जायची इच्छा दिसतेय तर तू जा, मी आणि आई मिळून घरचं मॅनेज करु. तरीही अशा अनोळखी ग्रुपसोबत एकटं जायला मन धजावत नव्हतं. गिरनार चढाई ग्रुपनेच करतात. तो रात्री चढला जातो त्यामुळे शक्यतो लोक ग्रुपनेच जातात. माझं हो /नाही अजूनही नक्की ठरत नव्हतं. शेवटी भावाशी बोलले. त्याने त्याच्या मैत्रिणीशी बोलायला सांगितलं. तिने अगदी आश्वस्त केलं, की “बिनधास्त नाव दे, तुला घेऊन जाणारा 'तो' आहे इतकं लक्षात ठेव, बाकी कसलीही शंका मनात आणू नकोस”. बस्स ! मनाचा निर्णय झाला होता की आता मागे पहायचं नाही, फक्त कुणाची तरी सोबत हवीशी वाटत होती. ऑफिसमधली माझी एक मैत्रीण गुजराती आहे, देवभोळी आहे. ती येईलसे वाटले. ऑफिसमध्ये पोचताच तिला अमुक अमुक तारखांना गिरनारला येशील का? विचारले. क्षणाचाही विलंब न लावता तिने होकार दिला आणि मी आमच्या दोघींचं नाव रजिस्टर केलं. नाव देऊन पैसे तर भरुन ठेवू, जाणं, न जाणं पुढे बघू असाच विचार करुन.

का माहीत नाही एकदम शांत, निवांत वाटू लागलं. मनाची दोलायमान अवस्था शमली होती.पण खरी कसोटी आता सुरु होणार होती. ती म्हणजे इतक्या पायर्‍या चढून उतरण्यासाठी शरीराला आणि मनालाही तयार करणे. तीन महिने माझ्या हातात होते. स्वतःच्या शारिरीक क्षमतेबद्दल खात्री होती की हे माझ्याच्यानं होण्यासारखं नाही. त्यात कॉलेस्टेरॉल वरचेवर धोक्याची पातळी गाठत असतं माझं. आपल्यामुळे ग्रुपमधल्या कोणाला त्रास होऊ नये असं वाटत होतं.जे आधी जाऊन आले होते ते ट्रेकर्स वगैरे, ज्यांच्या गाठीशी असे डोंगरमाथे पालथे घालण्याचा मुबलक अनुभव आहे. माझ्यासारख्या ‘कच्च्या लिंबू’ कॅटेगरीतलं कोणी चढून गेलंय याबद्दल काही माहिती मिळत नव्हती.शेवटी मनाशी निर्धार केला की गिरनारची वारी ‘दत्तगुरुंच्या’ इच्छेनेच पुरी करता येते ही वदंता आहे, ते निर्विवादपणे खरं, तरीही आपण आपल्या परीने प्रयत्न चालू ठेवायचे, स्वतःची शारिरीक क्षमता वाढवायची,तितकं आपल्या हातात नक्कीच आहे. मगच देवाला आळवायचं की यापुढंचं सगळं तू बघून घे देवा.

झालं, दुसर्‍या दिवसापासून चालायला नियमितपणे सुरुवात केली, जी मी माझ्या लहरीनुसार कधी-मधी करत होते. ३-४ दिवस झाले, पण असे वाटू लागले की जिने चढण्यासाठी आवश्यक त्या व्यायामाची आता खरी गरज आहे. माझ्या काही ट्रेकर्स मैत्रिणींनी मोलाचे सल्ले दिले, त्यांचा फायदा चढताना झालाच. माझा भाचा गेली काही वर्षे मॅरेथॉन्स करत आलाय. त्याच्याशी बोलले. त्याच्याकडून जिने चढणे-उतरणे यासाठी शरीराची तयारी करण्यासाठी आवश्यक ते व्यायाम प्रकार जाणून घेतले. त्याने पाठवलेले व्हिडिओज पाहिले आणि सुरु झाली माझी भौतिक तपश्चर्या. दररोज सकाळी सूर्यनमस्काराने सुरुवात, हॅमस्ट्रींगचे व्यायाम,क्रंचेस, स्क्वॅटस इ. त्याचबरोबर प्रोटीन्सयुक्त आहार. संध्याकाळी ऑफिसातून निघतांना जिने चढून -उतरण्याचा सराव. हे दररोज करत, हळू हळू वाढवत महिन्या दीड महिन्याभरात रोज १४ सू.न., ४५ स्क्वॅटस, 30 क्रंचेस आणि २० ते २२ जिने चढणे -उतरणे इथवर गाडी आली. त्यानुसार आहारात बदल केल्यामुळे असेल कदाचित किंवा व्यायाम हळू हळू वाढवत नेल्यामुळे शरीराला सवय झाली असावी म्हणून असेल, पण थकवा जाणवत नव्हता. याच्या जोडीला ऑफिसला येण्या- जाण्यासाठी ट्रेनचे जिने चढणे-उतरणे हे तर होतच होते.

दिवस पुढे पुढे सरकत होते. अधून मधून भेटणारे बारीक दिसतेयस असे बोलू लागले. माझ्या गिरनार यात्रेबद्दल आणि त्यासाठीच्या तयारीबद्दल फारच कमी जणांना माहीत होते. बापरे दहा हज्जार पायर्‍या? जमणार आहे का तुला? काही झालं म्हणजे? असं माझ्या काळजीपोटी बोलून माझा आधीच डळमळता निर्धार गळपाटून जाऊ नये म्हणून मीच ठरवलं जेव्हा जायला निघू तेव्हा सांगायचं सर्वांना. वजनावर लक्ष ठेवून होते, ते काही कमी झाले नव्हते, मला थकवा, अशक्तपणा जाणवत नव्हता, So I was on a right track असे स्वतःला समजावत माझी साधना चालू ठेवली.
दिवस सरत होते. बघता बघता ऑगस्ट महिना येऊन ठेपला. घरापासून, घरच्यांपासून दूर रहाणं हे ऑफिसनिमित्तानं अधेमधे होत असलं तरी आता जिथे जाऊन रहाणार होतो ते एक गाव असणार होतं. तळेठी नावाचं गाव जिथून गिरनारचा पायथा सुरु होतो. या गावात काहीच सुविधा नाहीत. अगदी बँकेचं एटीएमही नाही असं आम्हाला सांगण्यात आलं होतं.त्यामुळे तिथे जाऊन दुसरं काही होऊ नये म्हणून स्वतःला मी या काळात विशेष जपलं. केव्हाही डोकं वर काढणारी माझी दाढदुखी., या ऐन मोक्याच्या वेळेस कशी कच खाईल? जुलैमध्ये तिने आपला इंगा दाखवायला सुरुवात केली. महिन्याभराचा अवधी होता. ताबडतोब डेंटीस्ट गाठून अक्कलदाढ काढण्याची शस्त्रक्रिया उरकून घेतली. इतर फिलिंग्स वगैरे पूर्ण केली.

माझ्या सोबत येणारी माझी मैत्रीण तर दररोज नियमित चालण्याचा व्यायाम कित्येक वर्षे करत आली आहे, तसंच ती पूर्वी गिरनारलासुद्धा जाऊन आली होती, पण ५००० पायर्यांवरील अंबा मातेच्या देवळापर्यंत. त्यामळे तिला बर्याच गोष्टी माहीत होत्या. ती रोज काही ना काही सल्ला देत असे. ती माझ्या सोबत असणार ही गोष्ट मला फारच दिलासादायक होती. पण याच सुमारास काहीतरी विपरीत घडले.

तिची आई आजारी पडली. प्रकॄती खालावत जाऊन ती अत्यवस्थ झाली. हॉस्पिटल, आय सी यू, या चक्रात ती अडकली. आईचे वय ८७. कधीही काहीही होऊ शकेल अशी परिस्थिती. जर ती येऊ शकली नसती तर मी पुन्हा एकटी पडले असते. मी एकटीने गिरनारला जावे याला आमच्या आई तयार नव्हत्या. त्यांनी जरी असे बोलून दाखवले नाही तरी त्यांचा काळजीचा सूर मला जाणवत होता. त्यांच्या मनाविरुद्ध आणि जीवाला घोर लावून माझा पाय घराबाहेर पडला नसता. त्यावेळी मनोभावे दत्तगुरुंना प्रार्थना केली की “इतकं सारं घडवून आणलंयस तर आता काही मोडता येऊ नये असं वाटतंय, याउप्पर माझ्यासाठी जे उचित असेल तसं घडू दे आणि ते स्वीकारायची ताकद मला दे”.

७ ऑगस्टला माझ्या मैत्रिणीची आई देवाघरी गेली, तिचे दिवसकार्य वगैरे होऊन मैत्रीण २० तारखेला घरी आली. २४ तारखेला निघायचे होते, दत्तगुरुंनी मार्ग दाखवला होता.

ऑगस्ट सुरु झाला तसा आयोजकांनी गिरनारयात्रेत सहभागी होणार्‍यांचा व्हॉटस अप ग्रुप तयार केला. त्यावर रोज काही ना काही सुचना येत असत. प्रवासात आणायचे सामान, पर्वत चढताना घेऊन जायच्या वस्तू, अगदी चढतांना चप्पल, बूट कसे असावेत इतक्या बारीक-सारीक बाबतीत मार्गदर्शन केले जाऊ लागले.त्यांच्या अनुभवी सल्ल्याबरहुकुमच मी माझी बॅग भरत होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आयत्या वेळी नवे बूट नकोत, म्हणून आधी बूट घेऊन ते घालून चालण्याचा, चढ-उताराचा सराव करु लागले. नऊ हजार पायर्‍यांच्या टप्प्याला भणाणता वारा असतो, छत्री कुचकामी ठरते, त्यामुळे रेनकोटच न्यायचे ठरवले. चढतांना आपण थकतो त्या वेळी पटकन एनर्जी मिळेल असे खाऊचे पदार्थ जवळ ठेव असा मोलाचा सल्ला भाच्याने दिला होता. त्याप्रमाणे स्निकर्स एनर्जी बार्स आणि खजूर, इलेक्ट्रलचे सॅशेस सोबत घेतले. बाम, रोल ऑन, सेंसर अशा वेदनाशमक गोष्टींनी औषधांची बॅग पूर्ण भरली.

या सुमारास पर्वतावर प्रचंड धुकं असतं. काही फुटांवरचंही दिसत नाही. त्यामुळे ७ ते ८ फूट लांब प्रकाशझोत पडेल अशी टॉर्च सोबत घ्यायची होती. ती घेतली. संपूर्ण चढाई रात्री करायची असली तरी अध्येमध्ये देवळात न्यायचे सामान विकणार्‍यांची दुकाने/घरे असतात. त्या लोकांशी संपर्क करुन कोणत्याही क्षणी डोलीची व्यवस्था करता येते ही दिलासाजनक खबर मिळाली. डोलीवाले किती पैसे घेतात तो अंदाज दिला गेला. मी तेव्हढे पैसे जवळ बाळगायचे ठरवले. कोणत्याही वेळी असे वाटले की आपण नाही चढू शकत तर अधिक त्रास सहन करण्यापेक्षा, किंवा एकटे वाटेत थांबण्यापेक्षा डोलीचा पर्याय चांगला होता. चढतांना जास्त वजन नको, म्हणून देवासाठीही घरुन काहीही प्रसाद्,वगैरे नेला नव्हता. आयोजक त्याची व्यवस्था करणार होते. अगदी रिक्त हस्ताने जात होते आणि खरंतर त्याला देऊन तरी काय देणार होते मी? तोच तर देत आला होता आजवर.

२४ ऑगस्ट २०१९....... गेले तीन महिने उराशी बाळगलेलं स्वप्न साकार होत होतं. आज दुपारी १२.४५ ची बांद्रा टर्मिनसवरुन ट्रेन होती. सकाळपासून शुभेच्छांचे फोन, मेसेजेस येत होते. समोरच्याच्या आवाजात काळजी जाणवत होती. मग मीच त्या प्रत्येकाला धीर दिला की काळजी करु नका, मी सुखरुप जाऊन येईन.

१०:३० वाजता निघाले.सर्वांनी बान्द्रा टर्मिनसलाच भेटायचे होते. तिथेच सारे सदस्य प्रथम भेटले. हा वसईचा ग्रुप.काही जण एकमेकांना ओळखत होते, तर काही अनोळखी. एकूण २४ सदस्य होते. पैकी सर्वात ज्येष्ठ व्यक्ती ६९ वर्षांचे आजोबा आणि सर्वांत ज्युनियर त्या आजोबांचा ७ वर्षांचा नातू. बाकी सगळे अधले मधले. बरेचसे एकेकटे होते, आम्हा दोघींसारखे, फक्त एक जोडपं आणि आजोबा-नातवाचं कुटुंब. विशेष म्हणजे २४ पैकी फक्त ३ जण जे आयोजक होते तेच आधी गिरनारला जाऊन आले होते, पैकी एक मी वाचलेल्या 'दत्त अनुभुती' या पुस्तकाचे लेखक बाकी सर्व नवखे, माझ्यासारखेच साशंक, त्यामुळे अगदी हुश्श झालं. जुजबी ओळख वगैरे झाली आणि आम्ही मार्गस्थ झालो.

क्रमशः

Group content visibility: 
Use group defaults

श्रद्धा असो नसो,डोंगर चढण्याची पहिलीच वेळ कधी ना कधी येतेच. मग सल्ला देणारे सरसावतात . कधी त्यात घाबरवणारे, कधी आपल्या उपयोगाचेही असतात. पण जेव्हा आपण तिथे जाऊन येतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की एवढे लोक जातात म्हणजे एक दोन अपवाद सोडल्यास सर्वांनाच शक्य असणार. नाही तर देव डोंगरावर कशाला बसले असते? भाविक आणि भक्त येऊ शकणार नाहीत असे ठिकाण कशाला शोधतील?

१) अमुक तमुक इतक्या पायऱ्या हे डोलीवाल्यांनी घाबरवण्यासाठी असतं. गिरनार शिखरावर चारपाचशे लोक राहू शकतील एवढा माथा मोठा असता तर एका दिवशी चढून दुसऱ्या दिवशी उतरता आले असते. तसं नसल्याने पहाटे जाऊन संध्याकाळपर्यंत खाली येण्याचा पर्याय उरतो.
२) काही खाल्यावर लगेच डोंगर चढायला सुरुवात करण्याने धाप लागते. दोन तास जाऊ द्यावेत.

सुंदर लेखन..
भौतिक तपश्चर्या ... मस्त शब्द... Happy

काय योगायोग आहे पहा, दोन दिवसंपुर्वी च मी व माझा ज्युनिअर गिरनार विषयी बोलत होतो आणि तुमचा नवीन धागा आलायी Happy
खूप इच्छा आहे एकदा जायची, पण माझा अ‍ॅक्सिडेंट व नंतर झालेल्या ऑपरेशन मुळे कधीमधी दुखणारा अ‍ॅन्कल आणि माझं तुंदिल तनु शरीर घेउन कसं जावं हा एक गहन प्रश्न आहे माझ्यापुढे Sad बघु दत्तमहाराजांची इच्छा !!!

आशिका, तुमचं पायर्यांबद्दलचं स्पष्टीकरण वाचून मला थोडा धीर आलेला आहे. धन्यवाद! नाहीतर लोक पाय मागे कसे खेचायचे तेच पाहत असतात हल्ली. पुढल्या भागांची वाट पहात आहे.

छान लेख. तुमच्या पुढील लेखाबाबत उत्सुकता वाढली आहे. तसेच तुमच्या लेखामुळे गिरनारला माथा टेकून यावे असे वाटू लागले आहे.

दुसरा भाग पोस्ट करतांना तो धागा प्रवासाचे अनुभव- भारतात या ग्रुपमध्ये उघडला आहे.
हा भाग तिथे कसा हलवता येईल काही क्ल्पना आहे का?
अ‍ॅडमीन ना यासंबंधी विपु केली आहे. पण अजून उत्तर आले नाही, म्हणून इथेही विचारते.
कुणाला माहीत असल्यास प्लीज सांगा.

आशिका ,
१- दूसरा धागा संपादन करायला घ्या, त्यात सगळ्यात शेवटी ग्रुपचे नाव अन नंबर असेल तो कॉपी करा अन संपादन रद्द करा

२ - आता हा धागा संपादन करायला घ्या, अन ह्या धाग्याचा ग्रुप अन नंबर काढुन टाकुन आधी कॉपी केलेला ग्रुप अन नंबर पेस्ट करुन सेव्ह करा.

धन्यवाद VB.
तुम्ही सांगितल्यानुसार केले.

Pages