एका शिक्षकाचा बदला

Submitted by Dr Raju Kasambe on 26 July, 2019 - 07:35

एका शिक्षकाचा बदला

“कुणी केली ही खोडी? हा खोडसाळपणा कुणाचा?”
शिक्षकांनी दरडावून विचारले. त्यांच्या आवाजात करारीपणा होता. नजरेत जरब होती. वर्गातील सर्व मुलं जागेवरच उभी राहिली. काही तर थरथरत होती. सर्वांच्या माना खाली झुकलेल्या होत्या. आज पुन्हा कुणीतरी मधल्या सुट्टीत फळ्यावर किचाडून ठेवले होते. त्यावेळेत बहुतेक मुलं लघवीसाठी आणि पाणी पिण्यासाठी जात असत. मीसुद्धा त्यापैकीच एक होतो. त्यामुळे वर्गखोलीत काय घडले किंवा कुणी केले याची मला सुतराम कल्पना नव्हती.

“ज्याने कुणी हा खोडसाडपणा केला असेल त्याने हात वर करावा अन्यथा सर्वांना शिक्षा मिळेल”. अर्थात कुणीच हात वर केला नाही. सरांनी त्यांची बांबूची छडी सरसावली. काही क्षणातच छडीचा सपासप आवाज आणि “आई गंss”, “मेलोss” असे आवाज घुमू लागले. मुलं वेदनेने हात चोळू लागले. पहिल्या बाकापासून छडीची छमछम वाजत माझ्यापर्यंत आली. मी गुमानं उजवा हात पुढे केला. माझ्या चेहेऱ्यावर निश्चितच केविलवाणे भाव असावेत. मी मान वर करून त्यांच्या नजरेतली जरब बघितली. छडी वर गेली...हळूच माझ्या हातावर टेकली...त्यांचा डावा हात माझ्या खांद्यावर स्पर्श करता झाला आणि सर एक पाउल पुढे सरकले. छडी शेजारच्या विद्यार्थ्याच्या हातावर परत सपकन् वाजली. सरांनी मला वेगळी वागणूक दिली होती. हा इतरांवर अन्याय आहे असे इतरांना वाटल्याचे नंतर मला कळले. पण माझी काहीच चूक नव्हती, तरीही मला शिक्षा मिळणार होती, आणि ती भोगण्यासाठी माझा हात मी पुढे केला होता. आता त्यांनी मला का मारले नाही ह्याचे उत्तर त्या मुलांनीच सरांना विचारावे असे माझे मत होते. अर्थात असे करायची कुणाची बिशाद नव्हती !

आठव्या-नवव्या वर्गातील काही आठवणी अजूनही ताज्या आहेत. आताशा जाठे सर माझ्याशी असेच वागत होते. शिक्षा द्यायची वेळ आली की मला सोडून द्यायचे किंवा उगाच मारल्याचे नाटक करायचे. तसे जाठे सरांचे व्यक्तीमत्त्व भीती वाटण्यासारखे होते. त्यांचा गोल चेहरा, पिकलेल्या रूंद फिस्कारलेल्या मिशा, जाड भिंगाचा काळ्या फ्रेमचा चष्मा, त्यांची बटुक मूर्ती, गोल ढेरी. दुरून बघितले तर त्यांना कुणी गांभीर्याने बघणार नाही असे. पण सर किती धीरगंभीर स्वभावाचे आहेत ते परिचय झाल्यावरच कळायचे.

माझं बारावीपर्यंतचं शिक्षण वऱ्हाडातल्या दारव्हा (जि. यवतमाळ) ह्या छोटेखाणी गावात झालं. देशात इतरत्र ज्या ट्रेनला आपण “टॉय ट्रेन” म्हणतो ती ट्रेन आजही इथे गंभीरपणे “शकुंतला एक्सप्रेस” म्हणून ‘चालविली’ जाते (होय, अजूनही ती ‘धावते’ असे म्हणता येणार नाही) ! शेतीसाठी प्रसिद्ध असलेल्या गावातील एका भागाला मोतीबाग असे नाव अजूनही शाबूत आहे. हे नाव इथे पिकणाऱ्या मोत्यासारख्या ज्वारीच्या दाण्यांवरुन पडलं आहे असं बुजुर्ग मंडळी सांगतात.

जाठे सर मला आठवीला वर्गशिक्षक म्हणून आले. आठवीच्या पन्नास विद्यार्थ्यांचा वर्गाच्या ‘ड’ तुकडीतील मी एक. शिक्षकांची विशेष नजर पडणार नाही अशा वर्गातील शेवटच्या बाकड्यावर कुठेतरी दडून बसायचं.

एक दिवस त्यांनी मला टीचर रूम मध्ये बोलावून घेतले. माझी चौकशी केली. म्हणजे बाबा काय करतात, भाऊ, बहिणी किती वगैरे. मग म्हणाले
“अरे वाचनालयाचे काम पण मीच बघतो. मधली सुट्टी असली की तिकडे येत जा”.

त्यावेळेस आम्हाला वाचनालयात अभ्यासाची पुस्तकं मोफत मिळत. तेवढाच काय तो वाचनालयाचा संबंध. पण आता कशाला आणि मला एकट्यालाच का बोलावतात म्हणून घाबरतच गेलो. सरांनी माझ्या समोर बऱ्याच रंगीत मासिकांचा-पुस्तकांचा ढीग टाकला. मला अजूनही आठवते त्यात “चांदोबा” नावाचे मासिक होते. मी ती पुस्तकं मासिकं चाळू लागलो. सर म्हणाले

“अरे घेऊन जा घरी, दोन तीन पुस्तकं”.
मी लाजत लाजत एकच पुस्तक घरी घेऊन आलो. पुस्तक खूप छान होते. दुसऱ्याच दिवशी परत द्यायला वाचनालयात गेलो. पुन्हा त्यांनी माझ्यासमोर पुस्तकं टाकली. त्यात मला “श्यामची आई” नावाचे पुस्तक दिसले. घरी घेऊन गेलो. पुस्तक वाचून सुद्धा आपल्याला रडायला येतं हे पहिल्यांदा जाणवलं. साने गुरुजींनी लिहिलेलं हे पुस्तक मला खूप आवडलं. आपले आई-वडील आपल्यासाठी किती मेहनत करतात आणि आपण त्याची किती व कशी ‘परतफेड’ करतो हा विचार पहिल्यांदा मनात आला.

मग हे वाचनालयात जाणं नेहेमीचं झालं. सर मला नवनवीन पुस्तकं देत राहिले आणि मी ती वाचत राहिलो. आठवीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत उनाडक्या न करता मी पुस्तकं वाचत राहिलो. माझी वेटाळातली कंपू मला बोलावून बोलावून कंटाळून गेली. वाडी-वावर-टेकड्यांवर भटकायला न जाता मी घरात जास्त वेळ द्यायला लागलो. दर रविवारी मी सरांच्या घरी जायचो. मग वाचनालयाची चावी घेऊन आम्ही शाळेत यायचो. वाचनालय उघडून सर पुस्तकं-मासिकं काढून द्यायचे. आठवडाभर वाचायला पुरतील एवढे. त्याची ते कुठेही नोंद ठेवत नसत.
सर सांगायचे,
shakuntala2.jpg (98.62 KB)“अरे आठवी आणि नववी म्हणजे दहावीचा पाया. आता अभ्यास केलास तर तुला पुढे कठीण जाणार नाही”.
अर्थात आठवीत माझा परीक्षेचा निकाल चांगला लागला. नववीत मागच्या बाकड्यावरून सरांनी मला पहिल्या बाकड्यावर आणले.
एकदा मी घरी शाळेतल्या घटना सांगत असताना माझ्या मोठ्या भावाने मला वर्ग शिक्षक कोण आहे म्हणून विचारले. मी सांगितले “जाठे सर”. तर तो म्हणाला,
“तुझ्या ह्या मास्तरला माझं नाव सांग, मग तो तुला त्रास देणार नाही”. अर्थात मला तसे करायची आवश्यकता नव्हती. सरांचा मी लाडका विद्यार्थी होतो. त्यांनी मला त्रास द्यायचा तर प्रश्नच नव्हता.

माझा हा मोठा भाऊ शाळेत असताना दांडगा होता. नेहमी मारपीट करायचा. योगायोगाने जाठे सरच त्याचे वर्गशिक्षक होते. एक दिवस त्यांनी माझ्या भावाला त्याच्या दांडगाईबद्दल मारले. तर ह्या पठ्ठ्याने सरांच्या श्रीमुखात एक ठेऊन दिली. त्यावेळेस तो केवळ आठव्या वर्गात होता. त्याचे हे दुःसाहस त्याला महाग पडले. दुसऱ्याच दिवशी त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले. विशेष म्हणजे त्याच्या आयुष्यातील ही लाजिरवाणी घटना त्याने मला अभिमानाने सांगितली. मला मात्र त्याच्या ह्या ‘बहादुरीचे’ विशेष कौतुक वाटले नाही.

नवव्या वर्गात सर मला प्रत्येक गोष्टीची विचारपूस करीत. त्यांचा विषयच नव्हे तर इतरही विषयांची मदत ते करीत. त्यांच्या अधिकारात असलेले वाचनालय तर माझ्या इतके दुसऱ्या कुठल्या आठवी-नववीच्या विद्यार्थ्याने धुंडाळले नसेल. त्यांनी म्हटल्याप्रमाणे मी नववीचा पाया पक्का केला. प्रथम श्रेणी मिळविली. दहावीत सर माझे वर्गशिक्षक नव्हते. पण त्यांच्याकडून पुस्तकांचा भक्कम आधार होता. त्यांच्या घरी भेटायला गेलो तर पाठीवरून मायेने हात फिरवायचे. अजून अभ्यास करायला प्रोत्साहन द्यायचे. परत दहावीत प्रथम श्रेणी मिळविली. पुढे मी शिकत राहिलो. जाठे सर हृदयात घर करून राहिले. दुसऱ्या कुठल्या शिक्षकाच्या घरापर्यंत मी कधी जात नसे.

शिक्षण संपले. नोकरी लागली. नोकरी निमित्तं अमरावतीला बदली झाल्यावर तिथे मी घर विकत घेतले. अनेक वर्षे निघून गेली. मला एका मित्राकडून कळले की सरांचा मुलगा अमरावतीलाच राहतो. शोध घेतला असता त्याचे घर सापडले. सुदैवाने सर सद्धा मुलाकडेच आलेले होते. ते आता निवृत्त झाले होते. शरीर थकले होते, केस पिकले होते. मी पाया पडलो. ओळख करून दिली. मला चांगली नोकरी लागली असून मी अमरावती सारख्या मोठ्या शहरात घर घेतले हे ऐकून त्यांना फार आनंद झाला.

ते शेवटी म्हणाले
“अरे तुझा भाऊ फार दांडगा होता. दुर्दैवाने त्याला शाळेतून काढून टाकावे लागले. नंतर तो फार बिघडला.”
“पण, सर त्याने तुमच्याशी दांडगाई करूनही तुम्ही मला का मारत नव्हते? तुम्ही त्याचा वचपा माझ्यावर काढू शकले असते” माझ्या तोंडून निघून गेले.
“तू सुद्धा तुझ्या मोठ्या भावासारखा बिघडला असतास तर तो माझा पराभव ठरला असता. त्याच्या गुन्ह्यांसाठी मी तुला शिक्षा करीत राहिलो असतो तर कदाचित तू सुद्धा त्याच्याच मार्गावर गेला असतास. तुला मी एक चांगला नागरिक म्हणून घडवून दाखविले हेच माझ्या आयुष्याचे यश. तुझ्या भावाचा बदला मी कधीच घेतलाय. तुला त्याच्या मार्गावर जाऊ न देता योग्य मार्गावर लावणे हेच माझे उद्दिष्ट होते. त्यातील माझे यश हाच त्याचा पराभव आणि माझा बदला आहे”.

आज जाठे सर हयात नाहीत. मला त्यांना चरणस्पर्श करायचाय!

डॉ. राजू कसंबे
डोंबिवली (पू.), जि. ठाणे

shakuntala2.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख ! निशःब्द ! असे गुरु सर्व विद्यार्थ्यांना मिळोत व तुमच्यासारखे आज्ञाधारक विद्यार्थी सर्व शिक्षकांना लाभोत.

खूप खूप धन्यवाद. असेच शिक्षक मला लाभले होते. मला एकदा शिक्षा केली तर घरी येऊन आई-वडिलांना सांगितले की मी तुमच्या मुलाला मारले. काही शिक्षक उत्तम मानसशास्त्र जाणतात.

किती छान आठवणी ! सुरेख लिहिलंय !.
असे गुरु सर्व विद्यार्थ्यांना मिळोत व तुमच्यासारखे आज्ञाधारक विद्यार्थी सर्व शिक्षकांना लाभोत.>>+९९ खरच!!

सर्वांना सरसकट मारत असताना आपल्याला सॉफ्ट कॉर्नर मिळणे! माझ्या पण अगदी अशाच आठवणी आहेत. आज मागे वळून पाहताना तो प्रकारच मुळात किती अमानुष होता असे वाटते. ज्यांची काहीही चूक नाही अशी मुले छडीचा मार लागून खूप कळवळत. पण तो काळच तसा होता.

व्वा, सुंदर
खूप छान
असे शिक्षक सर्वांना मिळोत....
फक्त पहिल्या ओळीत खोडसाळपणा असं पाहिजे ना ते खोडसाडपणा असं झालंय..

छान लिहलंय.
बदला घ्यायची पद्धत रोचक आहे सरांची.
पण अतुल पाटीलशीदेखील सहमत.
टॉय ट्रेनचा फोटो टाका.

हे असं जगणं कधी वाट्याला आलंच नाही. आम्ही ज्याच्यामुळे वर्गाला मार खावा लागेल अश्यातले होतो.. अर्थात तसा प्रसंग क्वचित यायचा, एरवी आमचा गुन्हा आम्हीच कबूल करून हात पुढे करायचो.. एकी फार होती आमच्यात, मारकुट्या मास्तर असला आणि सगळ्या वर्गाला शिक्षा होण्याची शक्यता वाटली तर आम्ही दांडगी पोरं स्वतःहुन पुढे होऊन हात समोर करायचो, पण गुन्हा मोठा असेल तर मात्र वर्गच आमच्या पाठीशी असायचा, सगळे एकत्र शिक्षा भोगायचे!
आणि असल्या वर्गात जर एखाद्याला मास्तरांचा सॉफ्ट कॉर्नर मिळाला तर त्याची फार घालमेल व्हायची.. त्याला स्वतःला अपराधी वाटायचं, मग पुढच्या दांडगाईत तोच विद्यार्थी हिरीरीने भाग घेऊन मास्तरांची शिक्षा मिळवायचा!

किती छान आठवणी ! सुरेख लिहिलंय !.
असे गुरु सर्व विद्यार्थ्यांना मिळोत व तुमच्यासारखे आज्ञाधारक विद्यार्थी सर्व शिक्षकांना लाभोत. >>>> +111111