सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ४: रामपूर बुशहर ते टापरी

Submitted by मार्गी on 4 September, 2019 - 05:50

४: रामपूर बुशहर ते टापरी

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति १: प्रस्तावना

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति २: शिमला ते नार्कण्डा

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ३: नार्कण्डा ते रामपूर बुशहर

२९ जुलैची संध्याकाळ रामपूर बुशहरमध्ये गेली. दोन दिवस शिमला आणि नार्कंडा असं आल्यामुळे इथे फार गरम होत आहे. संध्याकाळी काही वेळ तर ताप आल्यासारखं वाटलं. चांगला आराम होऊ शकला नाही. रात्री पाऊस पडला. ३० जुलैला सकाळी जाग आली तेव्हा मनात नकारात्मक विचार आहेत. कदाचित शरीराचा पुरेसा आराम न झाल्यामुळे मनालाही ताजंतवानं वाटत नाही आहे. दोन दिवसांच्या थंडीनंतर हे गरम वातावरण जरा जड जातंय. तापासारखं वाटत असताना पुढे चालवायला जमेल का? पाऊसही पडण्याची लक्षणं आहेत. थोडक्यात अशा सायककल मोहीमेच्या पहिल्या दिवशी मनात जी अस्वस्थता असते; ज्या शंकाकुशंका असतात; त्या तिस-या दिवशी मनात आहेत! काही वेळेसाठी वाटलं की, आज कदाचित टापरीलाही जाता येणार नाही आणि त्या आधीच झाकड़ीमध्ये हॉल्ट करावा लागेल. पण हळु हळु हिंमत वाढवली. सायकलवर सामान नीट लावलं. पहिले दोन दिवस स्पेअर टायर सीटच्या खाली ठेवत होतो, पण पेडलिंग करताना ते पायांना घासत होतं. आता त्याला समोरच्या हँडलवर एडजस्ट केलं. बाकी शंकाकुशंकाही अशाच एडजस्ट केल्या. गेस्ट हाऊसमध्ये पराठा खाऊन निघायला सज्ज झालो. बाहेर पडल्यावर लगेचच सतलुजची मोठी गर्जना परत सुरू झाली. भुरभुर पाऊसही आहे. मनाच्या एका भागाला वाटतंय पाऊस यायला हवा. नाही तर इतक्या गरम हवेमध्ये सायकल चालवणं कठीण जाईल. त्यापेक्षा पाऊस आलेला चांगला.


.

.

पेडलिंग सुरू करेपर्यंत मनात शंकाकुशंका होत्या. पण जेव्हा हळु हळु पेडलिंग सुरू केलं, काही‌ किलोमीटर गेले, तेव्हा शंका दूर झाल्या! तेव्हा मात्र मुसळधार पाऊस सुरू झाला. आजूबाजूच्या पर्वतांवरही पावसाचंच वातावरण आहे. त्यामुळे थांबलो नाही. आणि किती वेळ थांबावं लागेल हे सांगता येत नव्हतं. त्यामुळे सायकल चालवत राहिलो. रामपूरनंतर जेवरी, झाकड़ी अशी गावं लागून गेली. आणि एक तासानंतर पाऊस थांबला. पण आता काही अडचण नाही. सगळीकडे अतिशय रमणीय नजारे फुलले आहेत! हिमालयाच्या अगदी अंतरंगातलं वैभव दिसतंय! मध्ये मध्ये पर्वतांवरून कोसळणारे झरे! हा हिरवागार हिमालय डोळे तृप्त होईपर्यंत बघून घेतला. कारण आता हळु हळु हिरवा रंग कमी होत जाणार! हिरवा हिमालय मागे पडत जाईल! आता रस्ताही आणखी थरारक होतो आहे. रामपूरच्या पुढे काही अंतरानंतर रस्ता अरुंद झाला. मध्ये मध्ये थोडा तुटलेलाही आहे. आता खरा दुर्गम प्रवास सुरू होत आहे!


.

रस्ता हलक्या चढाने वर चढत जातोय. जवळपास दोन तास सायकल चालवल्यानंतर जेव्हा बाजूला देवदार वृक्ष दिसले, तेव्ह छान वाटलं. कारण त्याचा अर्थ मी परत एकद १४००- १५०० मीटर उंचीवर आलो आहे आणि आता इथून पुढे तीव्र चढ असा लागणार नही. पाऊस पडल्यानंतर व आता इतक्या उंचीवर आल्यानंतर हवामान परत एकदा थंड झालं आहे. आता उष्णतेचा त्रास नाही. आणि देखावे तर अतिशय रमणीय! एकामागोमाग एक रमणीय नजारे समोर येत आहेत! ढग तर अजूनही आहेतच. पण एका जागी ढगांना चुकवत एका बर्फ शिखराने दर्शन दिलं! वा! सतलुजला लागून जाणारा हा रस्ता किती मोठं आश्चर्य आहे! हिमालयाला अगदी आतून कापत जाणा-या सतलजच्या बाजूला असलेली ही एक भेगच म्हणावी लागेल! आता किन्नौरमधल्या नैसर्गिक बोगद्याची प्रतीक्षा आहे- किन्नौरचं नैसर्गिक द्वार- जिथे रस्ता नैसर्गिक बोगद्यातून जातो! रस्त्यावर आता 'भितीदायक' वळणं येत आहेत. अनेकदा रस्ता बरोबर नदीच्या वरून जातोय. मध्ये मध्ये कच्चा रस्ता सुरू झाला आहे....


.

हळु हळु असे अनेक बोगदे मिळाले! पण त्यांची भिती नाही वाटली. जिथे रस्ता अगदी दरीजवळून जातोय, जिथे कच्चा व स्लिपरी रस्ता आहे, तिथे थोडं भय वाटत आहे. पण हळु हळु रस्त्यावर वाटणारी भिती कमी होत गेली. आणि लवकरच डोळ्यांना आणि मनाला चक्क सवयच झाली! देवभूमि किन्नौर! किन्नौर कैलासाची सोबत! किन्नौर जिल्हा सुरू झाला. इथून रस्त्याचं नियंत्रण बीआरओ कडे आहे, असं दिसलं. बीआरओने जागोजागी रस्त्यावरील स्थितीविषयी फलक लावले आहेत. त्याशिवाय अतिशय अर्थपूर्ण सुविचारसुद्धा लावले आहेत! आता प्रवासातला खरा रोमांच सुरू झाला आहे. परत एकदा एका ठिकाणी स्पॅनिश सायकलिस्टस भेटले. एका चढावावर ते हळु हळु जाताना त्यांना हाय- हॅलो म्हणून पुढे निघालो.


.

.

मध्ये मध्ये ब्रेक घेत जात राहिलो. इथे आलू- पराठा आणि चहा- बिस्किट जवळजवळ सगळीकडे मिळतं. त्यामुळे फ्युएलचा त्रास नाही झाला. नंतर तर हवामान सुखद असल्यामुळे इतकं थकायलाही झालं नाही. सतलुजच्या किना-यावर असलेली अनेक गावं पार होत गेली. टापरी जवळ आलं, तेव्हा रस्त्यावर आणखी भितीदायक वळणं सुरू झाली! अनेकद रस्ता सतलुजच्या अगदी जवळून जातोय. सतलुज समोरून वाहात येत असल्यामुळे वारा सायकलला थोडा अडवतोय. काही ठिकाणी त्याउलट सतलुज अगदी खाली दरीत वाहात असल्यामुळे काही वेळ तिची गर्जनाही डोंगराने अडवल्यामुळे ऐकू येत नाही! आणि रस्ता जेव्हा बरोबर दरीच्या तोंडाला येतो, तेव्हाच अचानक गर्जना सुरू होते! अशा दरीची मात्र भिती वाटतेच. त्यातच जागोजागी रस्त्याचं काम आणि अनेक डायव्हर्जन्सही आहेत.


.

अनेकदा रस्ता वळत वळत जातो आणि दोन डोंगरांच्या मधून कोसळणा-या झ-याला क्रॉस करून पुढे जातो. एका टेंपलेटसारखं हे दृश्य परत परत दिसतंय! टापरीच्या थोडं अलीकडे रस्त्याने सतलुज ओलांडली. मला असं होईल, ह्याची कल्पना नव्हती. जेव्हा ह्या बाजूच्या डोंगरावर रस्ता करण्यासारखी जागा उरली नाही, तेव्हा रस्ता पलीकडे नेला गेल. इथे काही अंतरापर्यंत फार मस्त उताराचा रस्ता मिळाला. त्याचा पुरेपूर लाभ घेतला. न जाणो, चांगला रस्ता परत कधी मिळेल, न मिळेल! मध्ये एका जागी शूटिंग स्टोन्सचा बोर्ड लागला आणि पुढे छोटे दगड पडतानाही दिसले! अशा रस्त्यावर अनेक अपूर्व निसर्गचित्रांचा आनंद घेत दुपारी टापरीला पोहचलो. इथल्या गेस्ट हाऊसचीही माहिती काढली होती. ते नदीच्या बाजूलाच आहे. तिथे पोहचलो तेव्हा सरकारी अनाउंसमेंट एका जीपमध्ये सुरू होती- धरणातून पाणी सोडलं जात आहे, त्यामुळे कोणीही नदीजवळ जाऊ नये. संध्याकाळी आराम केला आणि टापरीच्या मेन रोडवर जाऊन राजमा चावल- जेवण केलं. आज तिसरा दिवस सर्वांत थरारक राहिला! आता खरा दुर्गम प्रवास सुरू झाला आहे. आज जवळजवळ ६९ किलोमीटर झाले आणि सात तास सायकल चालवली. चढ होतेच, पण इतके तीव्र वाटले नाहीत. आजची सुरुवात तर फार बिकट झाली होती, मन विरोध करत होतं. पण टापरीमध्ये आराम करताना अगदी हलकं व फ्रेश वाटतंय. शरीर आणि मन ह्या प्रवासाच्या फ्लोमध्ये आले आहेत.


आजचा रूट मॅप. ढगांमध्ये जीपीएस बंद झाल्यामुळे स्ट्राव्हा app सुद्धा उपयोगी पडलं नाही.


चढ होतेच, पण इथे दिसतात तितके तीव्र नव्हते. चढ स्थिर व सलग होते.

पुढील भाग- सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ५: टापरी ते स्पिलो

अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

जबरी!! ते डोंगर कोरून रस्ता बनवलेला पाहूनच उर दडपला माझा. वाहनातून अशा रस्त्याने जायची पाळी आली तर जीव मुठीत धरून प्रवास करीन मी. लेख मस्त झाला आहे. तुम्ही वर्तमान काळाप्रमाणे लिहिता ' आता रस्ता असा असा आहे, पाऊस पडतोय वगैरे वाचून तिकडे हजर असल्याचा फिल येतो. धन्यवाद.

तुमच्या काही ब्लॉग पोस्ट्स वाचल्या आज. आवडले ते ट्रॅव्हलॉग. शक्य असल्यास एखाद यूट्यूब चॅनेल सुरु करा म्हणजे बाकीच्यांनाही ह्या सफरींचा अधिक आनंद घेता येईल.

सर्वांना धन्यवाद! @ हर्पेन जी, ओके. . . Happy

@ अमर९९ जी, धन्यवाद!

@ जिद्दू जी प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! मला अनेक जण बोलले आहेत तसं. पण मला व्हिडिओ रेकॉर्डिंग व प्रोसेसिंगचं स्किल नाहीय, आवडही नाहीय. आपली प्रतिक्रिया बघून छान वाटलं, कृष्णमूर्तीजींबद्दल खूप ऐकलेलं आहे. धन्यवाद. Happy

भारीच!! मला या रस्त्यावर गाडी चालवताना स्ट्रेस येत होता. तुम्ही तर सायकल हाणताय. जबराच

माझा एक झब्बू देतो, बहुतेक तुमच्या फोटोतला आणि हा स्पॉट एक्झॅक्ट सेम असणार

IMG_1468.jpgIMG_1470.jpg

>>तुम्ही वर्तमान काळाप्रमाणे लिहिता ' आता रस्ता असा असा आहे, पाऊस पडतोय वगैरे वाचून तिकडे हजर असल्याचा फिल येतो.

अगदी अगदी......