भक्ति तों कठिण सुळावरील पोळी....

Submitted by पुरंदरे शशांक on 6 March, 2014 - 01:53

भक्ति तों कठिण सुळावरील पोळी....

"भक्ति" या विषयाचा आवाकाच इतका अवाढव्य आहे की त्यात नुसते डोकवायचे म्हटले तरीही ती फार फार अवघड गोष्ट आहे. आणि ही भक्ति आचरणात, अमलात आणण्याचे म्हटले तर फक्त संतमंडळीच ती करु जाणे. कारण जनसामान्यांच्या भक्तिच्या कल्पना आणि संतांना अभिप्रेत असलेली भक्ति यात जमीन-अस्मानाइतका फरक आहे.

बुवांनी भक्तिबद्दल त्यांच्या अभंगातून इतक्या सुस्पष्टपणे लिहिले आहे की त्यावर वेगळे भाष्य करण्याची खरं तर गरजच नाहीये. फक्त हे अभंग डोळसपणे अभ्यासणे गरजेचे आहे इतकेच. आणि त्याबरहुकूम कोणाकडून काहीबाही आचरण, भाग्यवशात पण जिद्दीने घडले तर त्याच्या जीवनाचे सार्थक झाल्यावाचून रहाणार नाही.

जुंझायाच्या गोष्टी ऐकतां चि सुख । करितां हें दुःख थोर आहे ॥१॥
तैसी हरिभक्ति सुळावरील पोळी । निवडे तो बळी विरळा शूर ॥ध्रु.॥
पिंड पोसिलियां विषयांचा पाइक । वैकुंठनायक कैंचा तेथें ॥२॥
तुका म्हणे व्हावें देहासी उदार । रकुमादेवीवर जोडावया ॥३॥ ३८६०||

सर्वसामान्यपणे भक्ति म्हणजे - शरणागत भावामुळे आलेला मुळमुळीत, दीनवाणा भाव असा जो सरसकट गैरसमज आहे त्यावर ओढलेला हा एक कोरडा/ चाबूकच आहे.

इथे सुरुवातच झुंजायाच्या गोष्टी अशी करुन बुवा त्यांचे वेगळेपण दाखवत आहेत. लढाईच्या गोष्टी या बोलायला-ऐकायला कशा छान-छान वाटतात, सुखकारक वाटतात पण प्रत्यक्षात करायची वेळ येते तेव्हा मात्र अतिशय दु:खदायक, कष्टदायक अशा असतात. हे उदाहरण भक्ताला लावून बुवा भक्तिचे अंतरंगच उलगडून दाखवत आहेत.
ते पुढे म्हणतात की हरिभक्ति ही सुळावरील पोळीच (अतिशय कठीणतम गोष्ट). म्हणून ती निवडणार्‍याचे कौतुकही करताहेत - बळीवंत, विरळा शूरवीर अशी संबोधने देऊन. इथे सर्वसामान्यांची भिवई निश्चितच आश्चर्याने वर जाईल की यात काय आलीये शूर-वीरता ??
त्यावर लगेच पुढचा चरण येतो की केवळ शरीर (पिंड) पोसणारा म्हणजेच विषयभोगात पार बुडालेला जो कोणी असेल तो का भक्ति करु शकणार आहे ? कारण ज्याचे देहावरील/ देहभावावरील प्रेम कमी कमी होत जाऊन भगवंतावर प्रेम वाढत जाते तो भक्त. जो परमेश्वरापुढे आपल्या देहसुखाचा विचारच करत नाही तो भक्त आणि त्यामुळेच तो आगळावेगळा वीरच जणू....

गाद्यागिरद्यांवर लोळत, अंगावर उंची वस्त्रे लेऊन, मस्त खाणे-पिणे करीत जे रामनाम घेत रहातात वा पूजाअर्चादि भक्तिची साधने करु पहातात त्यांनी हे नक्कीच लक्षात ठेवले पाहिजे - की देहाचे चोचले पुरवले जाताहेत का देहाकडे अगदी गरजेपुरतेच लक्ष दिले जाते आहे. कारण खरा भक्त हा देहाची अगदी जरुरीपुरतीच काळजी घेतो - त्याला मुख्य काळजी भगवत्प्रेमाची असते. ते प्रेम कसे लागेल कसे वाढेल याकडे त्याचे जास्त लक्ष असते.
सदा देवकाजी झिजे देह ज्याचा
सदा रामनामे वदे नित्य वाचा - असे श्रीसमर्थांनीही जे निक्षून सांगितले आहे ते याच अर्थाने.

देहावरील ममता जशी कमी कमी होत जाईल तसतशी देवावरील प्रिती वाढत जाईल. याकरता फार काबाडकष्ट करण्याची गरज नाहीये तर देहभाव कमी कमी करण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जितका देहभाव जास्त तितकी भक्ति कमी आणि जितका देहभाव कमी तितकी भक्ति जास्त. कारण "प्रेम गली अति संकरी - ताने दो न समाए" हा सिद्धांतच आहे - एका म्यानात जशा दोन तलवारी राहू शकत नाहीत तसेच हे आहे.

ज्या मनात देहाविषयी (देहसंबंधितांविषयी) अति प्रेम आहे त्या मनात भगवंताबद्दल प्रेम कसे असू शकेल - कारण आपल्याला एकच मन दिले आहे - ते कुठे अर्पण करायचे ते ज्याचे त्याने ठरवावे. प्रपंची/संसारी माणूस ते प्रेम देहावर, संसारावर ठेवतो तर भक्त ते प्रेम भगवतचरणी अर्पण करतो.

बुवा जे पुढे म्हणत आहेत - तुका म्हणे व्हावें देहासी उदार । रकुमादेवीवर जोडावया - ते याच अर्थाने. देहावर उदार होणे म्हणजे काय हे समजाउन घेणेही फार गरजेचे आहे. कारण खर्‍या भक्तित देहाकडून खूप काबाडकष्ट अपेक्षित नाहीयेत. जे कोणी स्वतःच्या शरीरात गळ टोचून घेतात किंव मोठमोठ्या तीर्थक्षेत्री अनेक तथाकथित साधू खिळ्याच्या पलंगावर झोपलेले दिसतात त्यांना भक्तिचे वर्मच समजलेले दिसत नाही असे खेदाने म्हणावेसे वाटते.

भक्ति तों कठिण शुळावरील पोळी । निवडे तो बळी विरळा शूर ॥१॥
जेथें पाहें तेथें देखीचा पर्वत । पायाविण भिंत तांतडीची ॥ध्रु.॥
कामावलें तरि पाका ओज घडे । रुचि आणि जोडे श्लाघ्यता हे ॥२॥
तुका म्हणे मना पाहिजे अंकुश । नित्य नवा दिस जागृतीचा ॥३॥१५३६||

सर्वसामान्यांना भक्तिचे वर्म समजलेले दिसत नाही हे जाणून बुवा म्हणतात की जिथे पहातो तिथे भक्ति म्हणजे एक दिखाऊ गोष्ट झाली आहे. नीट पाया नसलेली, कशीतरी भराभरा बांधलेली, कच्ची भिंत कशी असते तशी ही दिखाऊ भक्ति असते. केव्हा कोसळेल याचा नेम नाही - इतकी ठिसूळ ...
अहो, साधा स्वयंपाक करायचा तर किती मेहनत करावी लागते - ते तिखट-मीठ, ती ठराविक चव येण्यासाठी किती निगुतीने, लक्षपूर्वक सारे काही करावे लागते तेव्हा कोठे तो रुचकर आणि सगळ्यांना आवडीचा असा स्वयंपाक होतो.
असाच भक्तिचाही प्रकार आहे - अतिशय काळजीपूर्वक हे साधन हाताळले पाहिजे - मनाला सतत अंकुश पाहिजे - उगाच वाटेल तसे बोलणे, वाटेल ते खाणे/वर्तन असे कसे चालेल ?? "मन:पूतं समाचरेत" असे वागणार्‍याला भक्ति कशी साधेल ?

एका साधूच्या आश्रमात एक व्यक्ति मोठ्या जोशात, दाण दाण पावले टाकीत आली आणि त्या साधूला विचारु लागली - ते खरे समाधान, शाश्वत सुख मला हवे आहे.
ते साधू म्हणाले - मी पहातो आहे, - इथे येताना तुम्ही मुख्य दरवाजा धाडकन उघडलात, पायातल्या चपला अशाच कुठेतरी भिरकावून दिल्यात - आता माझ्या खोलीतही परवानगी न घेता आलात - इकडे ही अशी वागणूक आणि तिकडे विचारताय की मला शाश्वत शांती-सुख कसे मिळणार म्हणून - तुम्हाला जर खरोखरच सुरुवात करायची असेल तर आत्ताच करा - त्या दरवाजाची, चपलांची मनोमन क्षमा मागा आणि मगच आपण त्या सुखाविषयी-शांतिविषयी बोलू ...

कोणाही जीवाचा न घडो मत्सर | वर्म सर्वेश्वर पूजनाचे || असे बुवा म्हणतात त्यात भक्तिचे सारे तथ्य आहे.. आपण जो क्षण जगत असतो तोच ठरवत असतो - की मी परमेश्वराच्या जवळ जातोय का त्याच्यापासून लांब जातोय - असे जागृतीचे क्षण -क्षण मिळवित मिळवितच तो दिवस जागृतीचा होईल ना - एकदम सगळा दिवस कसा जागृतीचा होईल ?

रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग - असे जे बुवा म्हणतात ते यासाठीच ... डोळ्यात तेल घालून बुवा आपले आचरण पुन्हा पुन्हा तपासत होते - की माझ्याकडून न जाणो काही चूक होतीय का ते ....

हे सारे करताना जेव्हा आपल्या देह-मन-बुद्धीची शक्ति कमी पडते हे जाणवते तेव्हा तो भक्त परमेश्वराला आर्ततेने - टाहो फोडून हाक मारतो - म्हणतो "काम क्रोध लोभ ठाकले पर्वत | राहिला अनंत पैलिकडे ||"
आपल्या मर्यादांची जाणीव झाली की सहाजिकच लीन भाव येतो - शरणागतता येते -
"शरण शरण हनुमंता | तुज आलो रामदूता |
काय भक्तिच्या त्या वाटा | मज दावाव्या सुभटा ||"

तुकोबा जेव्हा अशी टाहो फोडून हाक मारतात ती अगदी निकराने - जळाविण मासोळी | तैसा तुका तळमळी ... अशी ... आणि जेव्हा मग त्यांचे समाधान होत नाही तेव्हा मग त्या विठ्ठलास विचारायलाही कमी करत नाहीत - अरे, विठ्ठला, माझ्याकडे लक्ष द्यायला जर तुला वेळ नाही तर मला व्यालास तरी का रे?

तुकोबांची भक्ति अशी सर्वव्यापक आहे, मोठी गोड आहे, आर्तता ल्यालेली आहे, भावात चिंब भिजलेली आहे - पण तितकीच अतिसजगही आहे - उगाचच केलेला आरडा-ओरडा नाहीये ना त्यात काही दिखाऊपणा...
या भक्तिला जे नित्यनूतनत्व आहे ते केवळ बुवांमुळेच - अतिशय प्रयोगशीलतेने आचरलेल्या या भक्तिचे पडसाद त्यांच्या अभंगात असे काही उमटलेत की ते वाचताना आपल्या डोळ्यांना कधी अश्रुधारा लागतील तर कधी त्यांच्या हाकांना विठ्ठल कशी साद देत असेल याबद्दल उत्कंठा दाटून येईल ...... एकंदरीत ही अनुभवण्याचीच गोष्ट - ज्याला जितकी समजेल तितकी भावेल ....

पण हेही तितकेच खरे की - गाथेसारख्या ग्रंथांचे नुसते पारायण करायचे नसते वा लांबून त्याला नुसता नमस्कार करायचा नसतो - तर त्या ग्रंथांमधे ही जी शाश्वत तत्वे/मूल्ये सांगितली जातात ती आपल्या आचरणात थोडे-बहुत का होईना पण आणण्याचा मनापासून प्रयत्न करणे फार महत्वाचे आणि गरजेचे आहे. - कारण हे वाचून त्याप्रमाणे आचरण करताना अगदी विठ्ठलरुप का न होईना पण एक चांगला माणूस म्हणवण्या इतपत फरक जरी आपल्यात पडला तरीही खूप झाले - गाथेसारखा ग्रंथ जर संत निळोबारायांना उद्धरुन जायला मदत करतो तिथे आपल्यासारख्यांना दूर थोडाच लोटेल !!

जय जय राम कृष्ण हरि .....
---------------------------------------------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शशांक, हा ही लेख मस्तच !

सामान्य मानवाने पुरुषार्थ साधताना झालेल्या दैनंदिन जीवनातील वैचारिक चुका ज्या कधी कधी अटळ असतात, त्यांची जाणीव ठेवून तरीही "तू मला टाकू नकोस, तुझ्याच पायाशी मला रहायचं आहे, मी कितीही मलीन झालो तरी मला माहित आहे की तू मला हळूवारपणे स्वच्छ करणारच आहेस" ही तळमळ, हा विश्वास मनाशी राखायला हवी. वैचारिक चुकांचे पर्यवसान प्रत्यक्षातील चुकांमध्ये होण्यापासून स्वतःला रोखायला हवे. जिथे तेही शक्य नसेल तिथे त्या चुकाही ईश्वरचरणीच अर्पण केल्या पाहिजेत. काठावरचे सांडपाणी पोटात घेऊन नदी जेव्हा समुद्राला मिळते तेव्हा ती देखिल समुद्रच बनून जाते, तश्याच त्या चुकाही प्रांजळपणे त्याच्या चरणी अर्पण केल्या तर त्यांचे काय करायचे ते तोच बघतो.

<<<<रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग - असे जे बुवा म्हणतात ते यासाठीच ... डोळ्यात तेल घालून बुवा आपले आचरण पुन्हा पुन्हा तपासत होते - की माझ्याकडून न जाणो काही चूक होतीय का ते ....>>>>> मानव हा शब्दच मनाच्या आधीन असणे ह्यावरुन आला असावा. ते मनच त्याच्या चरणी जडवून टाकले की आपल्यासारख्या सामान्य जीवाच्याही मनात ही तपासणी सुरु होतेच. तुकोबारायांची तर गोष्टच वेगळी.

<<<<<पण हेही तितकेच खरे की - गाथेसारख्या ग्रंथांचे नुसते पारायण करायचे नसते वा लांबून त्याला नुसता नमस्कार करायचा नसतो - तर त्या ग्रंथांमधे ही जी शाश्वत तत्वे/मूल्ये सांगितली जातात ती आपल्या आचरणात थोडे-बहुत का होईना पण आणण्याचा मनापासून प्रयत्न करणे फार महत्वाचे आणि गरजेचे आहे. - कारण हे वाचून त्याप्रमाणे आचरण करताना अगदी विठ्ठलरुप का न होईना पण एक चांगला माणूस म्हणवण्या इतपत फरक जरी आपल्यात पडला तरीही खूप झाले - गाथेसारखा ग्रंथ जर संत निळोबारायांना उद्धरुन जायला मदत करतो तिथे आपल्यासारख्यांना दूर थोडाच लोटेल !!>>>>>> करेक्ट! ह्याचसाठी आम्हाला परत परत श्रीसाईसच्चरिताच्या पाचही परिक्षा द्यायला सांगितल्या आहेत...देतच रहायचं. प्रत्येक वेळी ओव्यांमधून काहीतरी नविन गवसत जातं. त्यांचा संदर्भ आपल्या दैनंदिन जीवनाशी लावायला आपण शिकतो आणि त्यातून मार्गदर्शनही मिळतं. असं करता करता त्या चित्तात ठसत जातात. समजा, आपल्या मनात ५०% चांगुलपणा आणि ५०% वाईटपणा आहे असं धरुन चालू, तर चांगुलपणाची टक्केवारी नक्कीच वाढत जाणे अपेक्षित असते, कारण हेच, स्वतःला त्या ओव्यांमधल्या निकषांवर तपासून पहायची सवय लागते. ५ पावलं पुढे, ३ पावलं मागे असं करत करत आपण net पुढे सरकत राहतो.

____/\____ शशांकजी, काय बोलू. खरंच तुमचं निरुपण समोर बसून ऐकायला मिळाले तर तो एक सुंदर योग असेल.

मला कुठलीही पोथी परत वाचताना नेहेमीच एक वेगळा अर्थ नव्याने गवसतो, मग असं वाटतं ' अरे मागच्यावेळी हे आपल्याला कळले नव्हते'.

वरती साईसच्चरिताबद्दल जे अश्विनी ह्यांनी लिहिलेय तसंच सेम मला साईबाबा, गजानन महाराज, स्वामी समर्थ, सर्वांच्या बाबतीत होते. प्रत्येक वेळी नवीन अर्थ गवसतो.

हेच तुम्ही आत्तापर्यंत निरुपण केलेली ज्ञानेश्वरी, परत वाचायला गेले की असाच नवीन उलगडा होतो.

असे जरी वाटत असले तरी प्रत्येकवेळी वाटते अरे आपण अजूनही कोरडेच आहोत. आपल्याला अजूनही खूप काही समजलेच नाही. बहुतेक ज्ञान घेण्यात मी तोकडी पडते.

तुमचे विवेचन नुसते वाचतानाही डोळ्यात पाणी येते इतके परिणामकारक लिहिता. तुकोबारायांची फार सुंदर ओळख करून देताहात. माधवच्या प्रस्तावाचा जरूर विचार करा, एक अलभ्य लाभ होईल आम्हाला.

वाह! अगदी सुरेख.
शशांकदा कबिरावर लिहाच आता तुम्ही.

प्रेम पियाला जो पिये शीश दक्षिणा देय।
लोभी शीश न दे सके,नाम प्रेम का लेय॥