पिरिअड फिल्म्स मधल्या ढोबळ चुका

Submitted by वाट्टेल ते on 28 November, 2018 - 11:05

हा धागा मराठी चित्रपटांपुरता सीमित करत आहे. पिरिअड फिल्म्सला एक काळ उभा करण्याचे आव्हान असते. सिरीयल वगैरेला, जिथे कथानक म्हणजेच सगळा आनंदी आनंद असतो तिथे ही अपेक्षाही नाही पण चित्रपटांकडून हा मामला जरा जास्त गांभीर्याने हाताळला जातो का, याची काही कल्पना नाही. मी जाणकार, अभ्यासक मुळीच नाही पण चित्रपट बघताना, पात्रांचे पोशाख, देहबोली, भाषा, वावर येथपासून अनेक गोष्टीत कथानकाचा काळ काय आहे या दृष्टीने कितपत विचार केलेला असावा याबद्दल शंका येते. इतकेच नाही तर चित्रपटाची भाषा, कॅमेरा अँगल, शॉट्स आणि कलाकारांचे दिसणे, वावर या गोष्टींवर सिरीयलचा प्रभाव वाढत आहे असे मला वाटते. आता काळ उभा करताना इतकी लिबर्टी घ्यावी का हा वादाचा मुद्दा असू शकेल. काही प्रेक्षकांना काळ नीट उभा राहत नाही अशी जाणीवच नसते आणि त्याबद्दल फारशी आस्थापण नसते. तर काही प्रेक्षकांना लहान लहान गोष्टींनी समाधान होते आणि “काय सुंदर काळ उभा केलाय” असे ऐकायला मिळते आणि काही छिद्रान्वेषी लोकांना “अरे किती साध्या चुका - या टाळता आल्या असत्या, रसभंग होतोय” अशी भावना होते. अनेक गोष्टी अशा आहेत की त्यात कमी बजेटमुळे फरक पडला किंवा त्या काळाबद्दल काही माहितीच उपलब्ध नाही असेही कारण नसावे.

सहज आठवलेल्या काही गोष्टी

बालगंधर्व - एकूणच कपडेपट
तप्तपदी, जोगवापासून सायकलपर्यंत - नववारी साडीवर, पाचवारीसारखी पिन लावणे
कट्यार काळजात घुसली, रमामाधव - सिरीयलचे भाग एकमेकांना जोडून जरासे एडिटिंग केल्यावर जे काय होईल तसे वाटत होते. कपडेपट, पात्रांचे वागणे, बोलणे, वावर एकूणच सगळे धन्य!
गुलाबजाम - इथे पिरियड असे नाही इतके डबे/ स्वंयपाक करणाऱ्या बाईच्या घरात कच्चा माल, भांडी, स्टोव्ह आणि किती धामधूम हवी ? तसा काही प्रकार नाही, कायम सर्व यावरून झाल्यासारखे वाटते. सोनाली कुलकर्णी जेमतेम ३-४ लोकांचा स्वयंपाक करणारी वाटते. मुद्दा हा आहे, की सिरीयलमध्ये जशा भातुकलीसारख्या लुटुपुटीच्या गोष्टी, प्रसंग दाखवतात आणि आपण प्रेक्षक तेच खरं आणि गोड मानून घेतो, तसलाच प्रकार वाटला.

वास्तुपुरुष, बाधा इतकेच नव्हे तर संदूक आणि हरिश्चन्द्राची फॅक्टरी मात्र खूप उजवे वाटले याबाबत ( पुन्हा बघावे का ?)

आपले काय मत ? अशाच तुम्हाला खटकलेल्या गोष्टी कोणत्या ?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला तुंबाड मध्ये बोटीत आई 'तू भी उसी हरामी की औलाद है' असं काही म्हणते तेव्हा हरामी आणि औलाद हे दोन्ही शब्द त्या काळच्या मराठी बायका वापरत नसतील असे वाटले.परत एकदा नीट ऐकायला हवा डायलॉग.

फर्जंद
शिवाजी एन्ट्री सीन, पायावर फोकस
रबरी सोल लावलेली मोजडी क्लोजप

आणि अतिप्राचीन काळातील सरसकट सगळ्या महिलांच्या नीट कोरलेल्या भुवया.. ऐतिहासिक काळातील स्त्रियांच्या तसबिरींत काही वेळा इतक्या कमानदार भुवया नाही दिसत.

नुकताच बधाई हो हा हिंदी चित्रपट पाहिला. त्यात सुरावातीच्या १-२ द्रुश्यात नीना गुप्ता आणि तिच्या कुटुंबातील सर्व जण आंबे खाताना दाखवले आहेत. नवरा (तो टिकेट कलेक्टर असतो) स्टेशन वर मुलाची वाट बघात उभा असतो. मुलगा आल्यावर तो "पसीनेसे मेरी जान निकल जा रही थी" असा काहीतरी संवाद म्हणतो. पण त्यानंतरच्या सर्व द्रुश्यात नीना गुप्ता, तिचा नवरा, मुलं, घरातील म्हातारी आजी सगळेच लोक स्वेटर, शाली, रजया अश्या गरम कपड्यात दाखवले आहेत.
चित्रपटाची कथा दिल्लीत घडते. दिल्लीत किंवा सर्व भारतातच आंबे नेहमी उन्हाळ्यात मिळतात. मग भर उन्हाळ्यात सगळी पात्र गरम कपडे घालून का फिरत असतात?
हा चित्रपट National Film Award साठी nominate केला आहे. अशी बातमी नुकतीच वाचली. कलाकारांचा उत्तम अभिनय सोडल्यास ह्या चित्रपटाची इतर कोणतीही जमेची बाजू मला तरी जाणवली नाही. Sad

फर्जंद -
तानाजी पडल्यावर त्याचे डोळे झाकताना रत्नाच्या अंगठ्या घातलेला हात. लढाईला कुठला मावळा अंगठ्या घालून जाइल?

सध्या कलर्स मराठीवर स्वामिनी नावाच्या आगामी मालिकेची जाहिरात लागते. पेशवाईच्या काळातील मालिका आहे असं संवादातून कळतं. त्यात ती छोटी मुलगी कात्री घेऊन इकडच्या स्वारींची शेंडी कापण्याचा प्रयत्न करताना दिसते. तर पेशवाईत कात्र्या असायच्या का? कशासाठी वापरायचे?
मला ही शंका येण्याचं कारण म्हणजे तुंबाडचे खोत या कादंबरीत ( माझ्या आठवणीनुसार) कात्री ही नवीनच उपयुक्त वस्तू म्हणून इंट्रोड्यूस केलेली आहे. काळ कुठला ते लक्षात नाही, पण मुळात पेशवाई बुडाल्यानंतर ते स्वातंत्र्यलढा आणि गांधीवध इथपर्यंत कादंबरीचे मुख्य कथानक आहे. आता कोकणात समजा उशीरा पोचली असेल कात्री. पण पुण्या-मुंबईत साधारण कधीपासून कात्री सर्रासपणे वापरायला लागले हे कुणाला माहिती आहे का?

भेट या चित्रपटात उन्हाळ्यात कथानक घडताना रस्त्यावर माठ विकणारी हातगाडी, पन्ह्याचा उल्लेख, पाण्याची थोडी टंचाई असं समर्पक दाखवलंय.

जुन्या राऊ सिरियलमधे (स्मिता तळवलकर, अश्विनी भावे) केसात हेअर क्लिप्स लावल्याचं स्पष्ट दिसतं Happy
हिंदी अकबर सिरीयलमधे (अकबर खान प्रमुख भूमिकेत होता), जेव्हा जोधाबाई लग्न करून आग्र्याला येते तेव्हा तिला ओवाळायच्या सीनमधे तिच्या डोक्यावरच्या ओढणीला लावलेल्या सेफ्टी पिना दिसतात!
बाजीराव मस्तानीमधे दीपिका घोडेस्वारी करत युध्दात केस मोकळे सोडून दौडत असते ते खटकतं.
रामानंद सागरांच्या रामायण मालिकेतही राम, सीता, दशरथ, कौसल्या वगैरे राजघराण्यातल्या लोकांची एक वेषभूषा तर प्रजा सगळी आधुनिक राजस्थानी पेहरावात (पुरुष धोतर, अंगरखा, फेटे तर बायका ब्लाऊज, घागरे, ओढण्या) Happy

बाजीराव मस्तानी आणि मन कर्णिका पिक्चर मध्ये घातलेले स्ट्रेच वेलवेट वर जरदोसी काम असलेले ब्लाउज.बाजीराव मस्तानी मध्ये अजिबात मराठी(कापड आणि बुट्टे वाईज) न वाटणाऱ्या नौवाऱ्या.
सब टीव्ही वर तेनाली राम मधील सर्व पात्रांचे कपडे.बायकांचे अगदी चालू फॅशन च्या डोल्स गबाना किंवा रोहित बाल गाऊन चे वरचे भाग वाटावे असे आडवे ऑफ शोल्डर ब्लाउज(मला नीट सांगता येत नाहीये पण त्या काळी असे ऑफ शोल्डर ब्लाउज चोळ्या नव्हते इतके आठवते.)
अलादिन मध्ये त्या छान गुणी जिम्नॅस्टिक वाल्या पोराला अली दिसायला केलेला भयंकर आय मेकअप आणि आयब्रो आणि लिपस्टिक.

हा धागा मराठी चित्रपटांपुरता सीमित करत आहे >>>>>> हे लेखातील पहिलं वाक्य आहे, पण बहुतेक सगळे प्रतिसाद हिंदी सिनेमा आणि सिरियलमधील goof ups बद्दल आहेत.

प्रा. श्रद्धा कुंभोजकर यांनी 'अ हिस्टॉरियन रिअ‍ॅक्ट्स टू ..' म्हणून 'बाजीराव मस्तानी'चा अतिशय संतुलित आढावा घेतला आहे. हा धागा मराठी चित्रपटांपुरता असला तरी हे इथे देण्याची गुस्ताफी करतो आहे. रिव्ह्यु मराठीतून आहे.
https://www.youtube.com/watch?v=mk91-MYCoKM