राज्य फुलपाखराच्या निमित्ताने

Submitted by Dr Raju Kasambe on 2 August, 2019 - 23:49

Blue Mormon by Dr Raju Kasambe (1).jpgराज्य फुलपाखराच्या निमित्ताने

नुकतेच महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत ब्ल्यू मोरमॉन या फुलपाखराला 'राज्य फुलपाखरू' म्हणून मान्यता देण्याचा स्तुत्य निर्णय घेण्यात आला. ‘राज्य फुलपाखरू’ घोषित करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाचे तसेच वन विभागाचे अभिनंदन! सध्यातरी इतर राज्यांच्या इतर मानचिन्हांमध्ये आतापर्यंत फुलपाखरू नव्हते. महाराष्ट्र राज्याची इतर मानचिन्हे म्हणजे शेकरू हा प्राणी, हरियाल हा पक्षी, आंबा हा वृक्ष, व जारूळ हे फूल आहेत.

ब्ल्यू मोरमॉन या फुलपाखराला महाराष्ट्राच्या प्राणीकोषात ‘राणी पाकोळी’ असे मराठी नाव दिलेले आहे. हे फुलपाखरू संपूर्ण महाराष्ट्रातील आणि दक्षिण भारतातील जंगलांमध्ये आढळते. पण सह्याद्री पर्वतरांगा आणि आसपासच्या प्रदेशात ते इतर ठिकाणांच्या तुलनेत अधिक प्रमाणात आढळते. सातपुडा पर्वतरांगा तसेच ताडोबा व विदर्भातील इतर जंगलांमध्ये ते तुरळक प्रमाणात आढळते. विशेष म्हणजे हे फुलपाखरू खूप शहरीकरण झालेल्या भागात, जसे मुंबईला अगदी कुलाब्यापर्यंत तसेच नागपूरला अगदी महाराजबाग परिसरात सुद्धा दिसते.

आकाराने (म्हणजे पंख विस्तार- दोन्ही पंख सपाट उघडे ठेऊन दोन पंखांच्या टोकांमधील मोजमाप) १५ सेंटीमीटर पर्यंत असणाऱ्या ह्या फुलपाखराचे शरीर तसेच पंख काळे असतात. पुढील व मागील पंखांवर निळे पट्टे असून मागील पंखांवर निळ्या रंगावर स्पष्ट काळ्या खुणा असतात. वेगात उडताना त्याच्या काळ्या पंखांवरील निळी झळाळी सहज नजरेस पडते. खालील बाजूस पंखांच्या शरीराकडील टोकावर चटकदार लाल ठिपका असतो.

हे फुलपाखरू लिंबू वर्गीय वनस्पतींवर (संत्री, इडीलींबू, मोसंबी ई.) तसेच Glycosmis arborea व Atlantia वर्गीय वनस्पतींवर अंडी घालते. ह्याला फुलांमधील मधुरस चाखायला आवडते तसेच चिखलातून क्षारशोषण करायला आवडते. पण फुलांना भेट देताना ते स्वस्थ बसत नाही तर पंख सतत फडफडवत ठेवते. त्यामुळे त्याचे फुलावर छायाचित्र घेणे आव्हानात्मक असते. पण दुपारच्या वेळेस ते पंख उघडे ठेऊन छान विश्रांती घेताना दिसलेच तर छायाचित्रकारांना लॉटरीच लागली समजा!

फुलपाखरांमधील वैविध्य:
इ.स. १९३२ मध्ये ब्रिगेडीअर डब्लू.एच. एव्हान्स ह्या इंग्रज अधिकाऱ्याने तत्कालीन भारतात (तेव्हाचा बर्मा व सिलोन सुद्धा त्यात अंतर्भूत होता) फुलपाखरांच्या एकूण १४३९ प्रजातींची नोंद नोंद केली होती. स्वतंत्र भारतात अंदाजे १२०० प्रजाती आढळून येतात. महाराष्ट्रात त्यापैकी किमान २२५ तरी प्रजाती आढळतात. इ.स. १९९६ मध्ये श्री गावकर नावाच्या कीटकशास्त्रज्ञाने संपूर्ण पश्चिम घाटातील फुलपाखरांवर इत्थंभूत संशोधन केले. त्यांना ह्या अभ्यासा दरम्यान महाराष्ट्रातील सह्याद्री प्रदेशात २०८ प्रजाती आढळून आल्या. मुंबई-ठाण्याच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आतापर्यंत १७२ प्रजातीच्या फुलपाखरांच्या नोंद झाली आहे. तर संपूर्ण विदर्भात एकूण १६७ प्रजातींची नोंद झाली आहे.

मानचिन्हाच्या निमित्ताने:
ब्ल्यू मोरमॉनला राज्य फुलपाखरू घोषित केल्याच्या निमित्ताने महाराष्ट्राने फुलपाखरांचे निसर्गातील महत्त्व अधोरेखित करण्यात पुढाकार घेतला आहे. वन्यजीव संवर्धन म्हणजे केवळ वाघ अथवा मोठ्या प्रण्यांचेच नव्हे तर संपूर्ण जैवविविधतेचे संवर्धन होय. मग छोट्यात छोटे कीटक सुद्धा महत्त्वपूर्ण ठरतात.

इतरही राज्ये त्यांची ‘राज्य फुलपाखरे’ घोषित करतील अशी आशा करू या. अशी मानचिन्हे जेव्हा आपण ठरवितो तेव्हा त्याचे निश्चित मापदंड जर असले तर आणखी अनेक निर्णय राज्य सरकारांना घेता आले असते. उदाहरणार्थ राज्य पक्षी ठरविताना त्या पक्ष्याची प्रदेशनिष्ठता (Endemicity), संवर्धनमूल्य (Conservation Importance), प्रजाती संकटग्रस्त (Threatened) अथवा दुर्मिळ आहे का, तसेच त्याचे सौंदर्यमूल्य बघितले गेले तर अनेक राज्य पक्षी अथवा इतर राज्य मानचिन्हे बदलावे लागतील. पण काही राज्यांची मानचिन्हे खऱ्या अर्थाने त्या राज्यांची ओळख पटवितात असे दिसेल. जसे मणिपूर राज्याचा राज्यप्राणी ‘संगाय’ हरीण व फुल ‘सेरॉय लिली’ असून दोन्ही प्रजाती मणिपूर सोडून जगात इतरत्र कुठेही आढळत नाहीत. त्यामुळे त्या मणिपूर राज्याची ओळख (Identity) वा मानचिन्ह (Symbol) होण्यास पात्र आहेत.

आणखी काही राज्याचे ‘राज्य प्राणी’, जसे, आसामचा गेंडा व गुजराथचे सिंह हे प्राणी त्या राज्याची ओळख पटवितात आणि त्या राज्याचे त्या विशिष्ट प्रजातीच्या संवर्धनासाठीचे (तसेच आताशा पर्यटनमूल्य) महत्त्व आपल्या मनावर ठसवितात. अशीच सुंदर उदाहरणे म्हणजे जम्मू-काश्मीरचा राज्य पक्षी काळ्या-मानेचा क्रौंच (Black-necked crane), राजस्थानचा गोदावन (माळढोक अर्थात Great Indian Bustard), गुजराथचा मोठा रोहित (Greater Flamingo) व आसामचा राज्य पक्षी पांढऱ्या पंखाचे रानबदक (White-winged Wood Duck) हे होत. ह्या पक्षी प्रजाती सुद्धा आता ह्या राज्यांची ओळख झाल्या आहेत.

ह्या दृष्टीने विचार केला तर अनेक राज्यांची मानचिन्हे बदलण्याची आवश्यकता असल्याचे जाणवते. जसे, महाराष्ट्राचा राज्यपक्षी हरियाल महाराष्ट्राची ओळख बनू शकत नाही असे वाटते. त्याऐवजी रानपिंगळा (Forest Owlet) हा ११३ वर्षानंतर महाराष्ट्रात पुनर्शोध लागलेला घुबड प्रजातीतील पक्षी योग्य उमेदवार ठरू शकतो. घुबड हे लक्ष्मिचे वाहन असून शेतीच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी पक्षी आहेत. विशेष म्हणजे रानपिंगळा (मध्य प्रदेशातील बोटावर मोजण्याइतके पक्षी वगळता) केवळ महाराष्ट्रात आढळतो. रानपिंगळ्याला राज्य पक्षी केल्यास अनेक अंधश्रद्धांपोटी तसेच जादूटोण्याच्या नावाखाली घुबडांची केल्या जात असलेली हत्या थांबेल व खऱ्या अर्थाने एका घुबडाला राज्यपक्षी घोषित करणारं महाराष्ट्र पुन्हा एकदा देशातील पाहिलं राज्य ठरेल.

फुलपाखरांचे निसर्गातील महत्त्व:
आपल्या देशातील जैव-विविधता हा आपला नैसर्गिक वारसा असून तो जतन करणे आणि पुढच्या पिढीला उपभोगू देणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असते.
फुलपाखरे कुठल्याही परीस्थितीकी मधील एक महत्वाचा घटक असून अन्नसाखळीत त्यांचे महत्व आहे. अनेक पक्षी प्रजातिंचा प्रजनन काळ हा कीटक-फुलपाखरांची संख्या जेव्हा सर्वाधिक असते त्या काळात अर्थात पावसाळ्यात असतो. बुलबुल, कोतवाल (ड्रोंगो), वेडे राघू (बी-इटर) इत्यादी प्रजातीच्या पक्ष्यांच्या आहारात फुलपाखरांचे प्रमाण बरेच असते. अनेक प्रकारचे कोळी (स्पायडर), चतुर (ड्रॅगनफ्लाय) सुद्धा फुलपाखराची शिकार साधतात.
फुलपाखरे म्हटले की त्यांचा आणि फुलांचा संबंध आपल्या नजरेसमोर तरळतो. फुलांमधील मधुरस हाच अनेक प्रजातीच्या फुलपाखरांचा आहार असतो. हा मधुरस चाखण्यासाठी जेव्हा फुलपाखरे फुलांना भेट देतात तेव्हा त्या वनस्पती त्यांच्या कडून एक काम करवून घेतात. फुलांचे परागकण फुलपाखरांच्या शून्डेला, पायांना चिकटून दुसऱ्या फुलापर्यंत पोहोचतात. अशा प्रकारे फुलांचे पर-परागीभवन घडून येते. मधुरासाच्या बदल्यात ही पोस्टमनगिरी फुलपाखरांना नकळत करावी लागते. पण पर-परागीभवनामुळे वनस्पतींच्या नवनवीन प्रजाती उत्क्रांत पावतात. असेही मानले जाते की फुलांचे रंगच मुळी फुलपाखरांना आकर्षून घेण्यासाठी निर्माण झाले असावेत. अनेक वनस्पतींमध्ये केवळ पर-परागीभवनाद्वारा बीज निर्मिती होते. अशा वनस्पतींचे अस्तित्व फुलपाखरे आणि पक्ष्यांच्या अस्तित्वावर अवलंबून असते.
फुलपाखरे कुठल्याही परीसंस्थेच्या प्रतीचे आणि तिथे झालेल्या बदलाचे निदर्शक असतात. त्यांचा अभ्यास केला असता विशिष्ट जंगल किती समृध्द आहे हे लक्षात येते. म्हणून फुलपाखरांचा अभ्यासाला फार महत्त्व आहे. फुलपाखरांमुळे कुठल्याही ठिकाणच्या पर्यावरणाचे सौंदर्य मूल्य वाढते. भारतातील अनेक ठिकाणे केवळ फुलपाखरांच्या वैविध्यामुळे नावारूपास येत आहेत. सिक्कीम, गारो हिल्स आदी ठिकाणे आता शेकडो निसर्गप्रेमींसाठी आकर्षण ठरत आहेत.

फुलपाखरांवरील संकटे:
संपूर्ण जगात फुलपाखरांच्या अनेक प्रजातीची संख्या रोडावत असून अनेक प्रजाती विलुप्त झाल्या आहेत. वाढती लोकसंख्या आणि पर्यायाने मानवी हस्तक्षेपामुळे होत असलेला जंगलांचा ऱ्हास एकंदरीतच सर्व वन्यजीवांच्या ऱ्हासास कारणीभूत ठरत आहे. मनुष्याने स्वतःच्या स्वार्थासाठी जगातील अनेक जंगले साफ केली आहेत. त्याठिकाणी चहाचे मळे, पामच्या बागा, शेती केल्या जाते. शहरीकरणामुळे सुद्धा अनेक जंगले साफ झाली आहेत अथवा जंगलांचे तुकडे पडले आहेत.

जंगलामध्ये दरवर्षी मुद्दाम आगी लावल्या जातात. त्याचे रुपांतर वणव्यात होते. अशा वणव्यात फुलपाखरे, त्यांची अंडी, सुरवंट तसेच अगणित कीटकांचा होरपळून मृत्यू होतो. पुन्हा पुन्हा लावल्या जाणाऱ्या वणव्यांमुळे जंगलातील अधिवासाचा ऱ्हास होतो. अनेक वनस्पतींची बीजे नष्ट होऊन त्या वनस्पती दुर्मिळ होतात. अशा वनस्पतींवर अवलंबून असलेल्या फुलपाखरांच्या प्रजाती सुद्धा मग दिसेनाशा होतात.
गुरांची अनियंत्रित चराई सुद्धा जंगलाच्या प्रतीचा ऱ्हास करते. अति-चराईमुळे जंगलाचे पुनरुज्जीवन थांबते. वनस्पतीची नवीन रोपे वाढत नाहीत. कालांतराने ते जंगल कमी प्रतीचे होते.

फुलपाखरांची संख्या कमी करणाऱ्या मानव निर्मित घटकांपैकी महत्त्वाचा म्हणजे कीटक नाशके आणि तणनाशकांचा वाढता वापर. आपण अनवधानाने बगीच्यात फवारलेल्या ह्या रसायनांमुळे फुलपाखरांचे सुरवंट तसेच अंडी बळी पडतात. फुलपाखरांना आकर्षित करायचे असेल तर आपल्या परसबागेत कधीही कुठलेही रासायनिक औषध फवारू नये.

आणखी एक मोठे संकट म्हणजे सुंदर आणि दुर्मिळ फुलपाखरांची तस्करी. संशोधनासाठी तसेच आठवण (ट्रॉफी) अथवा भेटवस्तू म्हणून फुलपाखरांची आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणावर खरेदीविक्री चालते. बऱ्याच देशांमध्ये हा व्यापार अवैध असूनही चालू आहे. काही देशांमध्ये (उदा. सिंगापूर) फुलपाखरांच्या ट्रॉफीची अधिकृतरित्या विक्री केली जाते. आपल्या देशात अशा वन्यजीवांच्या व्यापारावर बंदी आहे. ईशान्य भारतात मागील काही वर्षात हजारो फुलपाखरांची तस्करी करताना काही लोकांना अटक करण्यात आली. मनुष्यच फुलपाखरांचा सर्वात मोठा शत्रू आहे याबद्दल दुमत नसावे.

फुलपाखरांचे संवर्धन आणि रोजगाराच्या संधी:
कायद्याद्वारा संवर्धन: भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यामध्ये आपल्या देशात आढळणाऱ्या वनस्पती, वन्यजीव आणि त्यांच्या अधिवासांना संरक्षण देण्यात आले आहे. ह्या कायद्यामध्ये संकटग्रस्त प्रजातींच्या याद्या दिलेल्या असून त्यांना परिशिष्टांमध्ये समाविष्ठ करण्यात आले आहे. नष्ट होण्याची सर्वात जास्त भीती असलेल्या वन्य प्राण्यांना परिशिष्ट क्र.१ मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. भारतीय द्वीपकल्पात आढळणाऱ्या खालील पाच फुलपाखरांच्या प्रजाती मध्ये ब्लू नवाब, ब्लू बॅरन, डॅनाईड एगफ्लाय, मलबार बँडेड स्वॉलोटेल आणि क्रीम्सन रोझ परिशिष्ट क्र.१ मध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. ह्या फुलपाखरांच्या जीवितास हानी पोहोचविणाऱ्या व्यक्तीस सहा वर्षेपर्यंत कारावास व दंड अशी शिक्षा होऊ शकते. भारतातील फुलपाखरांच्या एकूण ४५० प्रजाती संरक्षित असून पहिल्या परिशिष्टात त्यापैकी १२८ प्रजातींचा समावेश केल्या गेला आहे. ह्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे काम वनविभागाद्वार केल्या जाते. दुर्दैवाने सध्या तरी वनविभागाचे लक्ष मोठ्या वन्य जीवांच्या संवर्धनावरच आणि एकंदरीत जंगलाचे संवर्धन करण्यावर केंद्रित झालेले दिसते. आपल्या पर्यावरणाचे महत्वपूर्ण घटक असलेल्या फुलपाखरे तसेच कीटकांच्या संवर्धनासाठी सध्या तरी वेगळे प्रयत्न केल्या गेल्याचे दिसत नाही. विदेशात अशा प्रकारचे प्रयत्न बऱ्याच आधी सुरु झाले आहेत. उदाहरणार्थ, अमेरिकेत मोनार्क फुलपाखरांच्या स्थलांतराच्या मार्गातील जंगलांचे अनेक भाग ‘मोनार्क बटरफ्लाय बायोस्फेअर रिझर्व’ म्हणून संरक्षित करण्यात आले आहेत. आपल्या देशात तर अशी परीस्थिती आहे की आपली फुलपाखरे कुठून-कुठे स्थलांतर करतात ह्याचाच आपल्याला अजून थांगपत्ता नाही ! केवळ काही ठिकाणी फुलपाखरे हजारोंच्या संख्येत दिसल्याच्या त्रोटक नोंदी उपलब्ध आहेत.
फुलपाखरांच्या संवर्धनासाठी सामान्य जनता तसेच विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण केली पाहिजे.

‘बटरफ्लाय गार्डन’ अर्थात फुलपाखरांच्या उद्यानांची निर्मिती:
फुलपाखरांचे उद्यान हा एक खुला बगीचा असून तेथे फुलपाखरांच्या सर्व गरजा पुरविल्या जातात. त्यामुळे उद्यानात फुलपाखरांची संख्या वाढते. असे उद्यान उद्योग म्हणून चालविल्यास अनेक स्थानिक रहिवास्यांना रोजगार उपलब्ध करून देता येतो. आदिवासींना फुलपाखरांच्या सुरवंटाची निगराणी करावयाचे, त्यांच्या आवडत्या वनस्पती वाढविण्याचे प्रशिक्षण दिल्यास त्यांना रोजगार मिळू शकतो. अशी अनेक उद्याने निर्माण झाल्यास फुलपाखरांच्या नष्टप्राय प्रजातींसाठी ‘जनुक साठा’ (Gene Bank) निर्माण करता येईल.

विदेशात अनेक बंदिस्त ‘बटरफ्लाय गार्डन’ वा ‘बटरफ्लाय पार्क’ तयार झाले असून ह्या ठिकाणी दररोज हजारो प्रवासी भेट देतात. अशा बंदीस्त उद्यानात फुलपाखरांचे कोशीत आणून ठेवले जातात. त्यामधून निघालेली फुलपाखरे उद्यानात सोडली जातात. अशी हजारो फुलपाखरे उद्यानात सोडल्यामुळे सामान्य व्यक्तीसाठी अगदी अनोखा अनुभव होतो.

दुर्दैवाने आपल्या भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यामध्ये असे बंदीस्त उद्यान प्राणी संग्रहालय म्हणून गणले जाते. अर्थात त्याला ‘झू ऑथॉरीटी ऑफ इंडिया’ची परवानगी घ्यायला लागते. अशी परवानगी मिळविणे फार जाचक तसेच कठीण काम आहे. त्यामुळे कुणीही बंदीस्त ‘बटरफ्लाय पार्क’ निर्माण करायला धजावत नाही. खरे तर आपल्या देशात शेकडो ‘बटरफ्लाय पार्क’ उभारून त्याद्वारा हजारो लोकांना रोजगार मिळवून दिला जाऊ शकतो. आपल्या देशात फुलपाखरांच्या कितीतरी सुंदर प्रजाती असल्यामुळे आपल्याला बाहेरून काहीही आयात करण्याची आवश्यकता पडणार नाही. खरी गरज आहे ती कायद्यामध्ये थोडी लवचिकता आणण्याची !

मी स्वतः सिंगापूर आणि लंडन येथील ‘बटरफ्लाय पार्क’ला भेट दिली असता आपण अशी उद्याने का उभारू शकत नाही असा प्रश्न पडतो ?

डॉ. राजू कसंबे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिंगापूर आणि लंडन येथील ‘बटरफ्लाय पार्क’ला भेट दिली असता आपण अशी उद्याने का उभारू शकत नाही असा प्रश्न पडतो ?

# पण त्यांच्या आराखड्यात बाहेरून सतत फुलपाखरांचे कोष/अळ्या/अंडी पुरवावे लागतात ना?
# हे दुसऱ्या / परदेशांतून आणत असतील तर उद्याने असलेल्लया देशांचे वनजीवरक्षण नियम लागू होणार नाहीत अशी पळवाट निघते का?
#आपल्याकडचीच फुलपाखरे अशी उद्यानात ठेवायची तर आपल्या कायद्यानुसार असे कोश वनातून आणता येणार नाहीत. आणि परदेशातून आयात करणे भारताला परवडणार नाही.
तुम्हाला काय वाटते?

>> त्याऐवजी रानपिंगळा (Forest Owlet) हा ११३ वर्षानंतर महाराष्ट्रात पुनर्शोध लागलेला घुबड प्रजातीतील पक्षी योग्य उमेदवार ठरू शकतो. घुबड हे लक्ष्मिचे वाहन असून शेतीच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी पक्षी आहेत. विशेष म्हणजे रानपिंगळा (मध्य प्रदेशातील बोटावर मोजण्याइतके पक्षी वगळता) केवळ महाराष्ट्रात आढळतो. रानपिंगळ्याला राज्य पक्षी केल्यास अनेक अंधश्रद्धांपोटी तसेच जादूटोण्याच्या नावाखाली घुबडांची केल्या जात असलेली हत्या थांबेल व खऱ्या अर्थाने एका घुबडाला राज्यपक्षी घोषित करणारं महाराष्ट्र पुन्हा एकदा देशातील पाहिलं राज्य ठरेल.

हे पटले.

पण त्यांच्या आराखड्यात बाहेरून सतत फुलपाखरांचे कोष/अळ्या/अंडी पुरवावे लागतात ना?
उत्तर :
भारतीय भरपूर प्रजाती आहेत. बाहेरून कशाला आणायचे?

# हे दुसऱ्या / परदेशांतून आणत असतील तर उद्याने असलेल्लया देशांचे वनजीवरक्षण नियम लागू होणार नाहीत अशी पळवाट निघते का?

उत्तर :
वरीलच लागू.

#आपल्याकडचीच फुलपाखरे अशी उद्यानात ठेवायची तर आपल्या कायद्यानुसार असे कोश वनातून आणता येणार नाहीत. आणि परदेशातून आयात करणे भारताला परवडणार नाही.
तुम्हाला काय वाटते?
उत्तर :
तेच तर लिहिलंय. कायद्यात लवचिकता हवी.
धन्यवाद !!

>>>कायद्यात लवचिकता हवी.
!>>>
- म्हणजे अशक्य आहे. आता केलेला कायदा - वन्यजी्व संरक्षण - शिथील करणार नाहीत.
बॉम्बे न्याचरल हिस्ट्री सोसायटीच्या पुढाकाराने बरीच क्षेत्रे संरक्षित करण्यात आलेली आहेत. तीच संस्था अशी सवलत करा म्हणून सरकारकडे विनंती करेल असं वाटत नाही.
उपक्रम स्तुत्य असला तरी भारतात होणार नाही.

राजूसर, तुम्ही सीईसीला फुलपाखरु उद्यानाची उभारणी केली आहेत याबद्दल तुमचे अभिनंदन. आरे कॉलनीमध्येही अशी एक बाग केली आहे असं ऐकून आहे.

बाकी लेख नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण.

लेख खुपच माहितीपूर्ण आहे. खुप आवडला.
आमच्याकडेही बरीच फुलपाखरे येतात. सवडीने फोटो टाकेन. हा राज्यफुलपाखरुही येतो. तुम्ही लिहील आहे त्यानुसार लिंबाच्या झाडाच्या आसपास आणि जास्वंदीवरच असतो.

खूपच छान लेख. अजून लिहित रहा.
देशाचे किंवा राज्याचे मानचिन्ह असा प्राणी किंवा पक्षी निवडणे हा प्रकार मला व्यक्तीश: विचित्र वाटतो. त्यातून काय साध्य होते माहीत नाही. पक्षी निवडायचा तर कावळा निवडावा, दिसायला मोरासारखा सुंदर नसला तरी कावळे खूप हुशार असतात.

का विचित्र वाटेल? की दिसायला सुंदरच पाहिजे?
तसेही कावळेपण आता कमी कमी दिसू लागले आहेत. माझ्या लहानपणी खूप चिमण्या आणि कावळे दिसत मुंबईत, आता त्यांची संख्यापण खूप कमी होत आहे दिवसेंदिवस.

हा लेखही फार छान आहे. खुप नव्याने माहिती मिळाली.
ऑफिस टाईमवरही फुलपाखरे येतात. गुलाबाच्या बाबतीत अगदी बरोबर त्यावर नाही येत.
मी पण कोणतेही रासायनीक खत किँवा औषध फवारणी करत नाही. मला अजून काही फुलझाडाँची माहिती द्या प्लिज ज्यामुळे फुलपाखरे आकर्शीत होतील.

Nectar Plants मकरंद वनस्पती
1 Verbena
2 Maxican Heather
3 Clerodendron
4 Lantana घाणेरी रंगीत
5 Pentas
6 Jamaican Spike (Pink, Blue)
7 Ixora (Red)
8 Mussaenda (Red)
9 Vinca, गुलाबी सदाफुली
10 झेंडू
11 Wedelia
12 Duranta
13 Leea दिंडा
14 Tridax, एकदांडी

Host / Food Plants खाद्य वनस्पती

1 Indian Laburnum, बहावा
2 Lemon लिंबू
3 Pomelo, Chinese Grape Fruit, पपनस
4 पानफुटी
5 Curry Leaf कढीलिंब
6 Passion Flower (Blue, White), कृष्णकमळ
7 False Ashok, खोटा अशोक, आसूपालव
8 Mango,आंबा
9 बेल
10 Custard Apple, सीताफळ
11 Cluster Fig, औदुंबर
12 Rui रुई
13 हळदीकुंकू
हि काही झाडे आहेत , यात अधिक भर सगळे जाणकार घालतीलच

का विचित्र वाटेल? की दिसायला सुंदरच पाहिजे?

उबो, कावळा सुंदरच दिसतो की.
पण जो जगभरात अगदी सगळीकडे आढळतो त्याला राज्य किंवा देश पातळीवर सीमीत केले तर विचित्रच वाटेल ना.
शक्यतो प्रदेशनिष्ठ प्रजाती निवडल्या जातात अशा वेळी