आयबीसबिलची पिलं

Submitted by Dr Raju Kasambe on 27 July, 2019 - 09:26

Ibisbill_Ibidorhyncha_struthersii_by_Dr_Raju_Kasambe_(4)_0.jpgIbisbill_Ibidorhyncha_struthersii_chick_by_Dr._Raju_Kasambe.jpgParo river.jpgआयबीसबिलची पिलं

हिमालयात जाण्याची संधी जेव्हा-जेव्हा मिळते तेव्हा काही पक्ष्यांची मनात यादी तयार होते. बरेच पक्षीनिरीक्षक तर आता स्वतःची ‘लाईफ-लिस्ट’ ठेवतात. त्यामध्ये आपण संपूर्ण आयुष्यात पक्ष्यांच्या किती प्रजाती बघितल्या त्याची गोळाबेरीज केलेली असते.

पक्षीनिरीक्षणाला सुरुवात केली तेव्हापासून अनेकदा हिमालयात जाणे झाले. पक्षीनिरीक्षणाच्या छंदामध्ये आपण ज्याप्रदेशात जातो त्या प्रदेशातील वैशिष्ट्यपूर्ण तसेच प्रादेशिक पक्षी (एंडेमिक) बघायला मिळणे महत्वाचे मानले जाते. कारण हे पक्षी जगात इतरत्र कुठेही बघायला मिळत नाहीत. इतर प्रदेशात किंवा सर्वत्र दिसणारे पक्षी आपण आधीच बघितलेले असतात वा त्यांना बघण्यामध्ये आपल्याला विशेष रुची नसते.

हिमालयात आढळणाऱ्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण पक्ष्यांपैकी एक म्हणजे आयबीसबिल हा पक्षी. एकंदरीत टिटवी आणि आयबीस ह्या दोन पक्ष्यांचा संकर करून निर्माण झाल्यासारखा दिसणारा हा पक्षी. संपूर्ण हिमालयातील खळाळत्या नद्यांच्या पात्रात समुद्र सपाटीपासून विशिष्ट उंचीवर आढळणारा. भारतातही गिलगीट पासून पूर्वेला अरुणाचल प्रदेशपर्यंतच्या हिमालयातील नद्यांमधून त्याचा संचार आहे. डोक्यावर काळी टोपी, गळ्यात काळा पट्टा. तलवारीसारखी बाकदार लाल चोच. मान, वरपाठ व पंख करडे. तोंडावळा काळा. पाय लांब पण शरीराच्या मानाने आखुड वाटणारे. नदीच्या पात्रातील वाटोळे राखाडी-पांढरे दगड धोंडे आणि आयबीसबिलच्या वर्णाची रंगसंगती जुळून येते. फतकल मांडून एकदाचा का तो दगड धोंड्यांमध्ये बसला तर त्याला शोधणे अवघड असते.

हिमालयात केलेल्या पक्षीनिरीक्षणादरम्यान प्रत्येक वेळेस हा पक्षी माझ्या ‘वाँटेड’ (बघायचाय) च्या यादीत असायचा.
मे २०१६ मध्ये भूतानला जाण्याचा योग आला. एका आठवड्याच्या प्रवासात हिमालयातील नद्या आणि पर्वतांवर भटकंती घडत होती. जगातील अतिशय दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या प्रजातींपैकी एक असलेला पांढऱ्या पोटाचा बगळा (व्हाईट-बेलीड हेरॉन), त्याचे घरटे आणि दोन पिलं बघून झाले. दुर्मिळ काळ्या मानेचा क्रौंच (ब्लॅक-नेक्ड क्रेन) बघून झाला.

परतीला एक दिवस शिल्लक असताना भूतानच्या पक्षीतज्ञा श्रीमती रेबेका प्रधान ह्यांना मी आयबीसबिल कुठे दिसेल म्हणून विचारले. आमचा मुक्काम पारो विमानतळाच्या समांतर वाहणाऱ्या नदीच्या पैलतीरावर ताशी नामगे ह्या प्रशस्त रिसॉर्टमध्ये होता. पारो हे गाव समुद्र सपाटीपासून २२०० मीटर उंचीवर वसलेले आहे. आयबीसबिल ह्या नदीच्या पात्रातच दिसतो असे रेबेका मॅडमनी मला सांगितले आणि मिटिंग कधी संपते असे मला झाले.

मिटिंग संपताच मी कॅमेरा व दुर्बीण घेऊन नदीकडे धाव घेतली. याठिकाणी खचून जाऊ नये म्हणून नदीचा संपूर्ण काठ दगडी भिंत आणि लोखंडी तारांनी बांधून सुरक्षित केलेला आहे. ह्या भिंतीवर बसून ‘छान’ पक्षी निरीक्षण करता येते. बुडाला थोडेफार दगड आणि तारा बोचतात, आता एवढे सहन करायला लागेलच की! प्लंबीअस रेडस्टार्ट ह्या वाहत्या नदीच्या पात्रात कीटक खाऊन जगणाऱ्या पक्ष्यांच्या दोन जोड्या, पांढऱ्या धोबीच्या (व्हाईट वॅगटेल) दोन जोड्या बघून झाल्या. मला नदीच्या पात्राकडून एक विशिष्ट आवाज येत राहिला पण मला तो पक्षी काही केल्या दिसेना. तेवढ्यात एक राखाडी करडा, वाकड्या काळपट चोचीचा, तुतारी (सँडपायपर) सारखा आणि आकाराचा पक्षी दगड धोंड्यांमधून तुरुतुरु चालत येताना दिसला. नवीन प्रजाती मिळाल्याच्या आनंदात मी अनेक छायाचित्रे काढली. त्याचा कल न उडता तुरुतुरु चालण्याकडेच असल्याचे दिसले. त्यामुळे मला तो किवीपक्ष्याचे पिलू असल्याप्रमाणे भासला. तो पक्षी पाण्याजवळ जाऊन खाद्य शोधायचा प्रयत्न करू लागला. थोड्याच वेळात त्याच्या मागावर आणखी एक मोठा पक्षी असल्याचे मला दुर्बिणीतून दिसले. टिटवीसारखा हा पक्षी ओळखण्यसाठी मला पुस्तक उघडायची आवश्यकता नव्हती. आयबीसबिलला मी कितीदा तरी पुस्तकात बघितले होते आणि अशा अधिवासात धुंडाळले होते. आज पुस्तकातला आयबीसबिलच नव्हे त्याचे पिलू सुद्धा इथे हजर होते. पिलू नदीच्या पात्रात खाद्यशोधण्यसाठी उतावीळ झाले होते तर त्याची आई त्याला पाण्यापासून दूर बोलावत होती.

थोड्या वेळात त्याची आई त्याला आवाज करीत स्वतःच्या मागेमागे चालायला प्रवृत्त करून थोड्या उंचीवरील दगडांमध्ये घेऊन गेली. पिलू अलगदपणे तिच्या पोटाखाली घुसले आणि दिसेनासे झाले. आयबीसबिल आवाज करीत राहिला. सायंकाळचे जवळपास सात वाजत आले होते आणि हवेत बऱ्यापैकी गारठा जाणवत होता. उद्या पहाटे परत आयबीसबिलचे निरीक्षण करायचे अशी मनात खुणगाठ बांधून झोपी गेलो.

पहाटे साडेचारलाच पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग आली. साडेपाचच्या सुमारास आयबीसबिल मायलेकाच्या शोधात मी नदीतीरावर पोहोचलो. गारठा भरपूर होता पण मी थंडीच्या हिशोबाने कपडे घालून आलो होतो. थोड्याच वेळात मला आयबीसबिल एकटा नसून दोघे आहेत तसेच पिलं सुध्दा दोन आहेत असे लक्षात आले. यावेळेस मी दोन कॅमेरे सोबत घेतले होते. त्यामुळे मला एस.एल.आर.नी छायाचित्रण तर डिजिटल कॅमेऱ्यानी व्हिडीओ शूटिंग करता आले. माझ्या असे लक्ष्यात आले की पिलांची आई नदीच्या पैलतीरावर जाऊन तिकडून पिलांना साद घालीत होती. परत पिलांजवळ जाऊन आवाज करीत होती. ती त्यांना नदीचे खळाळते पात्र पार करण्यासाठी उद्युक्त करीत होती. थोड्या वेळाने दोन्ही पिलं आईच्या समोर तुरुतुरु धावत वाहत्या पाण्यात उतरली. सुरुवातीला पाण्याचा जोर व खोली कमी असल्यामुळे ती पुढे गेली. थोडे पुढे जाताच ती पोहायला लागली. मी श्वास रोखून धरला. कारण पुढे पाणि खोल तर होतेच शिवाय प्रवाहाचा जोर सुध्दा खूप होता. आईकडे पोहत जाणारी पिलं काही क्षणातच नदीच्या शक्तीपुढे खळाळत्या पाण्यात वाहून गेली, किमान मला असे वाटले. कारण व्हिडीओ शूटिंगमध्ये एक पिलू वाहून जाताना मला स्पष्ट दिसले. मी दुसरे पिलू शोधले तेव्हा ते प्रवाहातील दगडावर ओरडत उभे असलेले दिसले. मला हादरल्यासारखे वाटत होते. सुदैवाने त्याने माघार घेतली.

एक पिलू वाहून गेल्यानंतरसुद्धा आयबीसबिल मादी दुसऱ्या पिल्लाला पैलतीरावर येण्यासाठी बोलवत होती. थोड्याच वेळात दुसरे पिल्लूही नदीच्या जोरदार प्रवाहात वाहून जातानाचे दुर्दैवी दृष्य मला बघावे लागले. मी सुन्न मानाने जागेवरच थिजलो. दोन्ही कॅमेरे बंद केले. मी आता गाशा गुंडाळून रूमवर जायचा विचार करीत असताना काही मिनिटांनी नव्याने ओळखीचा झालेला आयबीसबिलच्या पिल्लाचा चिरका आवाज मला थोडा दूरवरून ऐकू आला.

मोठ्या मोठ्या दगडधोंड्यांमधून वाट काढीत सर्वांग भिजलेले आणि घाबरलेले ते पिलू जेथून पाण्यात उतरले होते तिकडे परत धावत होते. त्याची आई पैलतीरावरुन केविलवाण्या हाका घालीत होती (किंबहुना ते मला तसे वाटत असावे). तीला तिच्या बच्च्याचा आवाज येताच त्याच्या डोक्यावरून उडून ती उंच ठिकाणी उतरली व त्याला जवळ बोलावून घेतले. पिलू धावत जाऊन आईच्या पोटाखाली गुडूप झाले. पिलू पोटाशी असून सुद्धा ती माय माऊली केविलवाण्या हाका घालीत होती आणि सैरभैर नजरेने सभोवती बघत होती. तीचे दुसरे पोर कुठे दिसत नव्हते.

पिल्लाला मायेची उब लाभली. थोड्याच वेळात त्याच्या अंगातली हुडहुडी निघून गेली असावी. परत आई उडून पैलतीरावर गेली आणि पिल्लाला साद घालू लागली. पिल्लू तुरुतुरु धावत सुटले. नदीच्या पात्रातील दगडधोंड्यांची त्याला पर्वा नव्हती. त्याला दिसत होती ती फक्त आई आणि ऐकू येत होते ते आईचे बोलावणारे स्वर. खळाळत्या प्रवाहाची त्याला चिंता नव्हती. भीतीही नव्हती. आई मला सुरक्षित ठिकाणी घेऊन जाणार आहे असा त्याला विश्वास होता.

माझ्या मानवी मनाला कीव आली ती आयबीसबिलच्या मादीची. खळाळत्या नदीच्या पात्रातील छोट्याशा बेटावर (सँडबार) तीने आपले घरटे केले होते. त्यात अंडी घालून, उबऊन त्यातून ह्या गोंडस पिल्लांना जन्म दिला होता. तिथे तीला आणि तिच्या वंशाच्या दिव्याला साप किंवा अशा जमिनीवरील शत्रूपासून धोका नव्हता. कारण नदीच्या अशा धोकादायक पात्रात कुणीही प्रवेश केला नसता. पिल्लांना अलीकडच्या तीरावर घेऊन येण्यामागे मग तिचा काय उद्देश असावा ह्याचा मी विचार करीत होतो. कारण नदीच्या कडेला संपूर्ण दगडी भिंत बांधलेली होती. माझी भीती वाटावी तर ती माझ्यापासून दूर नव्हे तर पिल्लांना माझ्याकडे घेऊन येत होती. पण एक गोष्ट मात्र निश्चित होती ती म्हणजे नदीला थोडा जरी लोंढा आला तर मात्र ह्या बेटावरची पिलं निश्चितच वाहून गेली असती. हिमालयातील नद्या कधी दुथडी भरून वाहतील ह्याचा काही नेम नाही. त्या दृष्टीने पात्रामधील ही जागा निश्चितच धोकादायक होती. त्यामुळे जन्मताच पिल्लांना नदीच्या काठावर हलविणेच सुराक्षित ठरले असते. कदाचित तीला ह्याची जाण असावी.

बघता बघता दोन तास निघून गेले. आयबीसबिलच्या मादीची पिल्लाला घेऊन जाण्याची धडपड चालू राहिली. पिल्लू वाहत्या प्रवाहाला घाबरून परत वळत राहिले. मला माघारी फिरणे आवश्यक होते. आज माझ्या दौऱ्याचा शेवटचा दिवस होता. माझा परिवार मुंबईला माझी वाट बघत होता. थोड्याच वेळात पैलतीरावरील विमानतळावरुन मी आकाशभरारी घेतली. उंचउंच जाणाऱ्या विमानातून खाली बघताना नदीचे पात्र केवळ रेषेसारखे दिसू लागले. विश्वाच्या प्रचंड पसाऱ्यात आयबीसबिलचा जन्म मृत्यूचा संघर्ष यशस्वी व्हावा म्हणून देवाला मी मनोमन साकडे घातले.

डॉ. राजू कसंबे,
मोबाइल क्र.९००४९२४७३१

पूर्वप्रसिद्धी:
“आपलं पर्यावरण”. पर्यावरण दक्षता मंच. भाग-१३ (२०१६). अंक-२. पृ.९-१०.

व्हिडिओ: आयबिसबिल पालक आणि पिल्लं:
https://www.youtube.com/watch?v=GkKducx9G90

व्हिडिओ: आयबिसबिलचे पिल्लू प्रवाहात उतरले, वाहून गेले. एक पिल्लू आईजवळ परत आले
https://www.youtube.com/watch?v=DtPF3FxeR_E

व्हिडिओ: आयबिसबिलचे प्रवाहात वाहून गेलेले एक पिल्लू आईजवळ परत आले तो प्रसंग:
https://www.youtube.com/watch?v=Nul8RByr258

व्हिडिओ: आयबिसबिलचे दुसरे पिल्लू प्रवाहात वाहून गेले तो प्रसंग:
https://www.youtube.com/watch?v=SeoVIIIpGD8&list=UUCLkUOHYqAb0LSOh3uaH12...
src="/files/u72591/Ibisbill_Ibidorhyncha_struthersii_by_Dr_Raju_Kasambe_%284%29.jpg" width="800" height="505" alt="Ibisbill_Ibidorhyncha_struthersii_by_Dr_Raju_Kasambe_(4).jpg" />

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्हिडिओ बघून जरा सुन्न वाटलं. शेवटी ती आई पक्षीण एकटीच साद घालत राहिली होती. तिच्या दर विणीच्या वेळेला असंच होत असेल का?

खूप छान लिहिताय. फोटोग्राफीही सुंदर.

पक्षी म्हटलं की नकळतच मनात त्यांच्याबद्दल हळवा कोपरा असतो.
व्हिडिओ बघुन वाईट वाटल.
कदाचित वावे म्हणतात तसं "वाचलं असेल दुसरंही पिलू" होप्स ठेवायला हरकत नाही.
असे बरेच पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अर्थातच कारण वेगवेगळी असतात.
पृथ्वीवरील प्रत्येक प्रजाती टिकुन रहावी एवढीच अपेक्षा.

- खरच छान लिहिताय.

लिहलंय चांगलं पण प्राणी -पक्षांना मानवी भावना लागू करू नयेत (इसपनीती कथा असल्याखेरीज) हेमवैम.
व्हिडिओऐवजी फोटोच टाकायला हवे होते.

लेख वाचून इतकी अस्वस्थ झाले की video पहाण्याचे धैर्य झाले नाही. काय झाले असेल पुढे अशी हुरहुर लागून राहिली.
तुम्ही कळकळीने लिहिलेले इतर लेख / कविताही आवडल्या.

प्राणी पक्षांना मानवी भावना लावाव्यात की नको (असतात की नाही हा सुद्धा) हा वादग्रस्त विषय आहे. आणि त्याचे अंतिम उत्तरं मिळायला अजून वेळ आहे. पण त्यामुळे वाचन रोचक होते असे मला वाटते.
सर्वांना खुश करणे शक्य नाही.

प्रतिसाद आणि कौतुकाबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद !