मोगलीची भेट

Submitted by Dr Raju Kasambe on 26 July, 2019 - 06:50

मोगलीची भेट

पेंचच्या जंगलात भटकंतीसाठी गेलो होतो. घनदाट जंगलात वसलेल्या कोलीतमारा येथील टुमदार वन विश्रामगृहात आमचा मुक्काम होता. जवळपास केवळ एक आदिवासी गाव आहे. बाकी सभोवती पेंचचे कुवार जंगल पसरलेले आहे. सायंकाळी जवळपास फेरफटका मारून येतो असे मित्रांना सांगून जंगलातील छोटेखाणी पाऊलवाट पकडली. अशा रानवाटांवरून मुक्त भटकंती करायला मला आवडते. चितळांचे कळप, सांबर, भेडकी असे वन्यजीव बघत बघत आणि पक्ष्यांचे मधुर कुंजन ऐकत मी बराच लांब भरकटलो. अंधार पडायला लागला तेव्हा परत वळलो. परत येताना असे लक्षात आले की ह्या रानवाटांना अनेक फाटे फुटतात. आपली ती नेमकी कुठली ते कळायला ‘मार्ग’ नसतो. सगळ्या रानवाटा सारख्याच दिसायला लागतात. मी अंदाज घेत वाट धरून चालत राहिलो. पण आमचा मुक्काम असलेले वन विश्रामगृह काही मला दिसत नव्हते. थोड्या वेळा पूर्वी मधुर आणि रंजक वाटणारे पक्षी प्राण्यांचे विविध आवाज आता भयानक वाटू लागले. पण मी त्यांना न घाबरता चालत राहिलो. कदाचित त्यामुळे मी मुक्कामपासून अधिक दूर जात राहिलो.
थकून भागून वडाच्या एका पुरातन वृक्षाखाली बसलो. तेव्हा माझ्या डोक्यावरून एक मोठा प्राणी झोका घेऊन गेल्याचा भास झाला. गोरिला? ओरांग उटांग? पण हे वानरवर्गीय प्राणी तर आपल्या देशात आढळत नाहीत. मी घाबरून किंचाळलो.
‘इकडे जंगलात ह्या वेळेस काय करताय?’
झाडावरून एक मानवी आवाज आला.
‘मी रस्ता भटकलोय. मला रस्ता दाखवता का? मी एक निसर्गप्रेमी आहे’
मी म्हणालो, तेव्हा मला उपहासात्मक हसल्याचा आवाज आला. अचानक झाडावरून केवळ कंबरेला लंगोट बांधलेला माणूस माझ्यासमोर अवतरला. वाढलेली दाढी-मिशी, डोक्यावरचे वाढलेले पिकलेले केस. नुसत्या जटा म्हणा हवं तर. चाळीसीतला माणूस. अगदी रानटी वाटावा असा, नव्हे खराखुरा रानटीच!
‘मी मोगली आहे. घाबरू नका. आम्ही कुणाला मारत बिरत नाही. चला माझ्या सोबत’.
मी त्याला रस्ता दाखविण्याची विनंती केली. पण त्याने सांगितले की आता परत कोलीतमाऱ्याला पोहोचायला दोन-तीन तास लागतील. त्यापेक्षा रात्रीला आमच्याकडे मुक्काम करा. उद्या पहाटे तुमच्या रानवाटेवर सोडून देईल. वेडसर व रानटी वाटत असला तरी तो माणूस विश्वास ठेवण्यासारखा वाटला. त्याला खोटं बोलता येत नसावं असं सुद्धा मला वाटलं.
जंगलातील अगदीच कमी वापरलेल्या पायवाटेने त्याने मला एका दरीत उतरवले. नदीचे मधुर पाणी पिऊन आम्ही एका गुहेच्या गवताने झाकलेल्या तोंडाजवळ येऊन पोचलो. कुठूनही बघितले तरी ही गुहा सहजपणे नजरेस पडली नसती. तिथून मात्र नदीचे आणि दरीचे लांबपर्यंतचे दृष्य दिसत होते. नदीच्या प्रवाहाचा मंद आवाज येत होता.
तेवढ्यात भालू (अस्वल) झोकांड्या खात आमच्याकडे येताना दिसला. मला बघून तो दोन पायांवर उभा ठाकला. त्याच्या छातीवरचे पांढरे निशाण मला दिसले. त्याची लांब नखे बघून माझा श्वास थांबला. सुदैवाने तेवढ्यात मोगलीने त्याला मी ओळखीचा असल्याचे खुणावले. तेव्हा तो चार पायांवर आला. नाहीतर क्षणात त्याने माझा चेहेरा विद्रूप केला असता आणि कदाचित मला फाडून पण काढले असते.
भालूला मी
‘खुश आहेस ना?’ म्हणून छेडले.
तेव्हा तो माझ्यावर गुरकावलाच.
‘अरे तुम्ही लोकं आमची मोहाची फुले भल्या पहाटे वेचून नेता. त्याची हातभट्टी लावता. मधाची पोळी साफ करता. कंद मूळं खोदून काढून नेता. आम्ही खायचं काय? नुसती वाळवी खाऊन खाऊन जाम कंटाळा आलाय. हा मोगली मधाचं पोळं काढायला झाडावर चढ म्हटलं की पाठदुखीचं गाऱ्हाणे सांगतो. आता आमची मैत्री नुसती गुहेपुरती राहते की काय असं वाटायला लागलंय’.
तेव्हा मोगली भडकला.
‘अरे तुझ्या पाठकुळी बसून सारं रान पालथं घालायचो आपण. रात्री बेरात्री भटकायचो. आताशा पाठकुळी बसायचे नुसते नाव काढले तरी तुझी पाठ उमळून येते. माझ्या पायात काटे रुततात. पारंब्यांना लटकून जंगल पार करायचं म्हटलं तर कधी कुठे आपटेल ह्याचा नेम नाही. मधलीच झाडं दिवसागणिक गायब होतात. कितीदा आपटून ह्या सर्वांगावर जखमा झाल्यायत, बघ’.
त्याने मला सर्वांगावर खरचटल्याच्या जखमा दाखवल्या.
आता अंधार वाढला होता. माझे शहरातील प्रकाशाला सरावलेले डोळे आता खूप वेळ मला साथ देतील असे वाटत नव्हते. मोगलीला मी शेकोटी पेटवायची का म्हणून विचारले. तेव्हा त्याने इतर सर्वांना शेकोटीची भीती वाटते असे सांगितले.
‘अरे बाबा, नुसती आग म्हटली की आमची मंडळी सैरावैरा पळायला लागतात. भालूला तर नुसतं ‘आग’ म्हटलं तरी ‘हार्ट फेल’ झाल्यासारखं होतं. त्यात उन्हाळा आला की तुमचे नातेवाईक साऱ्या जंगलात वणवे लावतात. जीवाच्या आकांताने आमची नुसती पळापळ होते. घरच पेटवून दिलं तर आम्हा वनवासिंनी जायचं कुठे?’
आता माझ्या लक्ष्यात आलं. मोगली मला संपूर्ण मनुष्यजातीचा प्रतिनिधी समजत होता!!
रात्रीचा मुक्काम मोगलीच्या गुहेतच घडणार असे अंधारातही स्पष्ट दिसत होते. मी घनदाट जंगलात भरकटलो होतो आणि मला दिवस उजाडल्याशिवाय परत जाणे शक्य नव्हते.
‘अंधाऱ्या गुहेत डास फोडून काढतील मला’.
मी मोगलीला माझी भीती व्यक्त केली.
तो म्हणाला ‘अरे बाबा चिंता करू नको. गुहेच्या आतल्या अंधाऱ्या भागात आमची काही मित्र मंडळी उलटे लटकून झोपले आहेत. ते आता कामाला लागतील. थोड्याच वेळात वटवाघुळांचा ताफा कर्कश किंचाळत गुहेत घिरट्या घालू लागला. मी मटकन खाली बसलो. काही मिनिटांत डास आणि उडणाऱ्या इतर सर्व कीटकांचा बंदोबस्त झाला.
मी म्हणालो ‘अरे तुला भीती वाटत नाही का ह्यांची? रक्त पितात ही वटवाघुळं!’
मोगली म्हणाला ‘मला उगाच वाटलं होतं, तुम्हाला जंगलाचं ज्ञान आहे. लोकं ह्या निरुपद्रवी प्राण्यांना सुद्धा मारतात. दिवसाला हजारो किडे-कीटक फस्त करणारी वटवाघुळं मानवाचे मित्र होत. पण तुम्हा लोकांना कुणी सांगायचं? तुम्ही स्वतःच स्वतःला भूतलावरील एकमेव ‘बुद्धिमान’ प्रजाती म्हणून घोषित केलंय म्हणे. मग आता बाकीच्यांनी काय करायचं?’ गुहेतील किडे-किटूक संपवून वटवाघुळांचा ताफा उदरभरणासाठी बाहेर उडून गेला.
मोगली मला गुहेत घेऊन गेला. एका कोपऱ्यात दोन सोनेरी डोळे चमकत होते आणि श्वास ऐकायला येत होता.
मोगली म्हणाला ‘घाबरू नको. बघिरा (ब्लॅक पँथर) आराम करतो आहे. त्याची आता बाहेर पडायची वेळ झाली आहे. तो काय थोडा ‘सावळा’ आहे ना म्हणून दिवसासुद्धा दिसून पडत नाही’!

गुहेच्या आतल्या भागात आणखी गडद अंधार होता.
मोगलीचे मानलेले आई-बाबा अकेला आणि रक्षा (लांडगे) तिकडे पहुडले होते. ह्यांनीच त्याचा लहानपणी सांभाळ केला होता. पण आता लांडग्यांचे जोडपे म्हातारे झाले होते आणि त्यांचाच सांभाळ करायची जबाबदारी मोगलीवर येऊन पडली होती.

त्यांना उद्देशून तो म्हणाला ‘शहरी मनुष्य आहे. जंगलात भटकलाय. ठेऊन घेतो रात्रीला. उद्या रानवाटेवर सोडून येईल.’ त्यांनी बहुतेक त्याला होकार दिला असावा. म्हाताऱ्या लांडग्याचा आवाज आला ‘बघ बाबा. सांभाळून. ह्या मनुष्यजातीवर जास्त विश्वास टाकू नकोस. नाही तर उद्या बंदुका घेऊन गुहेत यायचे आणि मुलगा पळवला म्हणून आपल्या सर्वांच्या छाताडात गोळ्या घालायचे. तिकडे माळरानावर आमची पिल्लं ठेचून मारतात ही मंडळी. काय तर म्हणे आम्ही शेळ्या-मेंढ्या पळवतो. पहिले ह्यांनी आमचे खाद्य पळवले. आता वंशच संपवायला निघालेत आमचा. तुझा विश्वास असेल तर राहु दे त्याला रात्रभर गुहेत. काही माणसं चांगली पण असतात म्हणे. माणसांनी माणुसकी सोडली म्हणून आम्ही माणसासारखं वागू शकत नाही’.
मोगलीने मला थोडे मधाचे पोळे खायला दिले. त्यातला गोड मध मी चोखून चोखून खाल्ला. कुठल्यातरी झाडाची फळे खायला दिली. तुरट गोड फळे खाऊन मी खोटाच ढेकर दिला. मोगली मला गुहेच्या तोंडाशी घेऊन आला. आकाशात लाखो चांदण्यांनी आरास मांडली होती. झाडांवर काजव्यांनी रोषणाई केली होती. चांदण्यांचा एवढा प्रकाश पडला होता की मला सर्व काही छान दिसायला लागले. मी गेल्या अनेक वर्षात आकाशातलं चांदणं बघितलं नव्हतं. इतके वर्ष फक्त शहरातली विद्युत रोषणाई बघत होतो. मोगलीच्या अंगणात देवाने केलेली ती आरास होती. मला वाटलं आम्ही आमची श्रीमंती हरवली आहे. आमचे आकाश रिते आहे. आम्ही आमच्या चांदण्या हरवल्या आहेत.
रात्री झोपण्यापूर्वी मला मोगलीने बघिराच्या चांगुलपणाबद्दल गोष्टी सांगितल्या. बघिरा केवळ वर्णाने सावळा आहे पण तो सुद्धा एक बिबळ्याच आहे. मनाने मात्र बघिरा फार चांगला प्राणी आहे. बघिरा रात्री शिकारीच्या शोधात निघून गेल्यामुळे मला त्याच्याशी गप्पा करता आल्या नाहीत.
मोगली असेच काहीतरी सांगत राहिला. अंथरून पांघरून नसूनही मला झोप कधी लागली ते कळलेच नाही.
भल्या पहाटे पक्षी प्राण्यांच्या किलबिलाटाने मला जाग आली. बाहेर सर्व पक्षी प्राणी आनंदाने गात होते. कुंजन करीत होते. वटवाघुळं गुहेत परतत होती. मोगलीने माझ्या खांद्यावर हात ठेवताच मी दचकलो. त्याने हसून मला चालायचा इशारा केला.
दरीच्या बाहेर पडतानाची पाऊलवाट अरूंद होती. तोल सांभाळून चालताना मोगली बोलू लागला
‘तु स्वतःला फक्त एका प्राण्यापासून सांभाळायचे आणि तो म्हणजे शेर खान. वाघ तसे नरभक्षक नसतात. वाघाला आम्ही राजा मानतो. तो कधीही मुद्दाम कुणाच्या वाटेला जात नाही. त्याला आवश्यक तेवढीच शिकार तो करतो. पण शेर खान म्हातारा झालाय आणि पायाने अपंग सुद्धा. त्यामुळे तो सोपी शिकार म्हणून मानवी मांस खायला लागला. आता त्याला चटकच लागली आहे. पण तु घाबरायचे कारण नाही. सध्या शेर खान दूरच्या जंगलात निघून गेलाय. काय सांगावे कदाचित त्याला तुझ्या जातीच्या शिकाऱ्यांनी मारले सुद्धा असेल.’
मी मोगलीला म्हणालो
‘मला ह्या जंगलाबद्दल काही सांग ना’.
मोगली बोलु लागला ‘आता जंगलात पूर्वीसारखा एकांत मिळेनासा झालाय. सकाळ-संध्याकाळ इकडून-तिकडून माणसांनी भरलेल्या जिप्सी गाड्या भटकत असतात. कुठल्या कॅमेऱ्यात कुणी फोटो-बिटो काढला तर उगाच समस्या निर्माण व्हायची. म्हणून मी आता दिवसा सहजासहजी बाहेरच पडत नाही’.
मुख्य म्हणजे त्याला जिप्सीतल्या मानवी मुलींचे आवाज ऐकायला आले की मोगलीला कसेसेच होते. त्याला ते आवाज खूप गोड वाटतात. पण त्याच्या इतर सर्व मित्र प्राण्यांचे मात्र ‘ते मधुर आवाज हडळींचे आहेत’ यावर एकमत होते. तो म्हणाला की ‘मी मोगली छोटं बाळ नसून मी मोठा झालोय, म्हणजे ‘टारझन’ झालोय’. मोगलीचे असे विचार ऐकून कधी कधी बघिरा, वाघ आणि इतर बुजुर्ग प्राण्यांना त्याची चिंता वाटायला लागते.
वाघ तर त्याच्याबद्दल चिंतातूर झालाय. शिकाऱ्यांनी बंदुकी घेऊन आणि पायात अडकायचे फास टाकून अर्धे अधिक वाघ गायब केलेयत. वाघाचे म्हणणे असे की हे सर्व शत्रू मोगलीचे नातेवाईक आहेत आणि त्याने शहरात जाऊन त्यांना समज द्यायला हवी.
जंगलात आणखी काही प्राण्यांनी अतिक्रमण केले आहे. ते म्हणजे गावठी कुत्री. ह्या कुत्र्यांनी नुसता हैदोस घातला असून चितळ, नीलगाय किंवा अशा तृणभक्षी प्राण्यांना मारायला सुरुवात केली आहे. एकीकडे रानकुत्र्यांचे कळप आणि दुसरीकडे गावठी कुत्र्यांचे कळप. असे एकंदरीत वन्यप्राण्यांना सळो की पळो झाले आहे.
आता वन्य प्राण्यांना जिप्सी गाड्या बघायची सवय झाली आहे. त्यात बसलेले मोगली सारखे दिसणारे मनुष्यप्राणी त्यांचे फोटोबिटो काढीत असतात. विजा चमकावत असतात. पण पलीकडून जाणारा पूर्वीचा रहदारीचा रस्ता आता राष्ट्रीय महामार्ग होऊन फार रूंद झालाय. वन्यप्राण्यांना त्या रस्त्यावरून जाणारी कानठळ्या बसविणारी गुरगुर करीत अतिवेगात धावणारी वाहने म्हणजे राक्षसी आकाराचे प्रचंड प्राणीच वाटतात. त्या वाहनांच्या वेगाचा त्यांना अंदाज येत नाही. रस्ता पार करण्यासाठी जीव मुठीत घेऊन धावणारे प्राणी त्या वाहनांच्या प्रकाशात डोळे दिपून गोंधळून जातात आणि उडवल्या जातात. काही प्राणी तर रस्त्यात उभे राहून त्यांच्यावर धावून जातात. त्यांना अजूनही ह्या समस्येवर उपाय सापडलेला नाही. त्यांचे कुठे चुकतेय हे सुद्धा त्यांना कळेनासं झालंय.
जंगलात दरवर्षी वन्यप्राणी सभा घेतात. वाघोबाला राजा म्हणून पूर्वीपासून मान्यता आहे. सर्व वन्य प्राणी आपल्या तक्रारी घेऊन त्यांच्याकडे जातात. आता तर इतरांच्या तक्रारी ऐकण्याआधीच राजे स्वतःचे नातेवाईक कसे गायब झालेत आणि मीसुद्धा एक दिवस असाच गायब होणार आहे म्हणून सांगत बसतात आणि धाय मोकलून रडतात. जंगलाचा राजा स्वतःच रडताना बघून इतर वन्यप्राणी अतिशय चिंतातूर झालेयत. हिम्मत हारत चाललेत. आपल्या जंगलाचे आता कसे होईल ही काळजी त्यांना सतावत असते.
बोलता बोलता मध्येच वडाचे झाड दिसताच मोगली पारंब्यांना लटकून माझ्यासोबत रस्ता कापत होता. एक थोडी मोठी रानवाट आल्यावर मोगली म्हणाला ‘ह्या रस्त्याने चालत राहायचं. दोन तासात तुम्हाला मोठा रस्ता लागेल. मोठ्या रस्त्याने आणखी थोडा वेळ चालत राहिलात तर तुम्हाला वन विभागाने लावलेली पाटी दिसेल. तिकडून तुमचा पत्ता निश्चित सापडेल. कदाचित एखादे वाहन मिळेल. तुम्हाला सर्व जण शोधतच असतील.’
कृतज्ञता म्हणून मी मोगलीला म्हणालो ‘बघ शहरात राहायचे असेल तर मला सांग. सेटल होऊन जा. वाटल्यास काही व्यवस्था करतो’.
तेव्हा तो बोलून गेला ‘तुम्हीच राहा तुमच्या शहरात. फक्त आमच्या जंगलात येऊ नका. आमचा आनंद, जंगल, जीव सगळं तुम्ही हिरावून घेताय. किमान तेवढं समजवा तुमच्या मित्रांना, भाऊबंदांना. म्हणजे आम्ही सुखात जगू. तुमचे शहर तुम्हीच ठेवा’.
मोगलीला भेटून बरेच दिवस झालेत. तो काही तत्त्ववेत्ता नाही. त्याने मला फार काही मागितले नाही. पण जे मागितले ते मी त्याला का देऊ शकत नाही ह्याचे उत्तर मी शोधतोय.

डॉ. राजू कसंबे,

डोंबिवली (पूर्व), जि. ठाणे.
मोबाइल: ९००४९२४७३१.

Group content visibility: 
Use group defaults

व्वा ! सुरेख. डॉ जबरी लिहीलत. अगदी मोगली त्याच्या मनातले बोलतोय असे वाटले. पण खरच वाईट वाटले. माणुस हा निव्वळ स्वार्थी प्राणी आहे, आणी आपलयाला माणुस म्हणून घ्यायची लाजच वाटायला हवी.

पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावा हा लेख. मुलांना लहानपणीच चांगली माहिती कळेल व निसर्ग संवर्धनाचे महत्व पटेल. फार सुंदर आहे लेख.

खुपच छान...!! खरंच आता अशी वेळ आली आहे कि जंगल सफारी प्रकार बंद करावा, प्राण्यांना माणसापासूनच धोका आहे!
छान लेख.. Happy

खूप छान लिहिलंय.

हे लिखाण आणि तुमच्या काही कविता बालभारतीत समाविष्ट करण्यायोग्य वाटतंय. ह्या लिखाणाचं एक गॅदरिंगमधलं नाटकही होईल छोट्यांचं.

ठिकय. वरवर वाचला.

बादवे सर्वसामान्य सदस्य म्हणून एक सुचवणी आहे:
तुम्ही आधीच लिहून ठेवलेले लेख दिवसाला २-३ असे टाकताय का? त्याएवजी २-३ दिवसातून एक लेख टाकलात तर बरे होईल. कोणी, कधी, किती लेख टाकावेत असा काही नियम नाही पण ट्रॅकरमधे केवळ तुमचेच नाव बऱ्याचदा दिसतेय...