माझी सैन्यगाथा (भाग २४)

Submitted by nimita on 25 July, 2019 - 01:55

वेलिंग्टन च्या त्या एक वर्षाच्या कोर्समधे सगळे ऑफिसर्स त्यांच्या अभ्यासात, परिक्षांमधे इतके बिझी होते की घर म्हणजे त्यांच्यासाठी फक्त लॉजिंग बोर्डिंग ची सोय असणारी एक इमारत होती असं म्हटलं तर अतिशयोक्ती नाही होणार ! पण प्रतिकूल परिस्थितीला शरण जाईल तो सैनिक कसला? या सगळ्या अभ्यासाच्या चक्रव्यूहातुन सुद्धा सगळे घरच्यांसाठी , मित्रांसाठी वेळ काढायचे. 'जहाँ चार यार मिल जाएं , वहीं रात हो गुलज़ार ' या ओळींना शब्दशः जगत; जेव्हा शक्य होईल तेव्हा, जितका वेळ मिळेल तितका ...आम्ही सगळे परिवार एकत्र येऊन आनंदाचे क्षण टिपायचो!

जानेवारी महिन्यात तमाम ऑफिसर्स एका स्टडी टूर साठी बाहेरगावी गेले होते. इतर वेळी नवरा बाहेरगावी जाणार म्हटलं की सगळ्या घरावर एक प्रकारची उदासीन कळा यायची.. तो घरातून निघाल्या निघाल्या त्याच्या परत येण्याची वाट बघणं सुरू व्हायचं !! पण या वेळी चित्र अगदी उलट होतं. त्यांच्या टूर च्या महिनाभर आधीपासूनच आम्हां बायकांचे वेगवेगळे प्रोग्रॅम्स ठरत होते. कारण आम्हांला माहित होतं की आता काही महिन्यांतच आम्ही सगळ्या एकमेकींपासून लांब जाणार होतो.परत कधी, कुठे भेट होईल सांगता येत नव्हतं. गेल्या काही महिन्यांत जुन्या मैत्रिणींबरोबरचं नातं अजूनच घट्ट झालं होतं आणि कितीतरी नव्या मैत्रिणीही मिळाल्या होत्या. ते दहा पंधरा दिवस आम्ही सगळ्या जणींनी अगदी 'जीवाचं वेलिंग्टन' करून घेतलं.सकाळी बच्चेकंपनी शाळेत गेली की आम्हीही बाहेर पडायचो. 'नवरा घरी यायच्या आधी घरी पोचयाची' घाई नव्हती कोणालाच.. त्यामुळे एकमेकींच्या घरी pot luck, कधी कूनूर किंवा ऊटी ला धावती भेट किंवा कधी एखादीच्या घरी गरमागरम कॉफीचे कप रिचवत, खिडकीतून आत येणाऱ्या ढगांच्या दुलईत बसून नॉनस्टॉप गप्पांचे फड !!! खूप धमाल केली. पण तितकीच एकमेकींची काळजीही घेतली. आमची एक मैत्रीण तेव्हा प्रेग्नंट होती. तिच्या अशा अवस्थेत तिला सोबत म्हणून आमच्यापैकी कोणी ना कोणी रोज रात्री तिच्या घरी झोपायला जायचो..... अगदी आपल्या मुलाबाळांसकट !

माझ्या शेजारच्या ब्लॉक मधे राहणाऱ्या माझ्या एका मैत्रिणीचा एका सकाळी फोन आला- म्हणाली,"तुझ्याकडे एखादी पेन किलर गोळी असली तर आणून देतेस का? जरा बरं वाटत नाहीये." मी तिच्या घरी जाऊन बघितलं तर माझी सखी चक्क तापानी फणफणली होती.आमच्या मुलींना शाळेतून परत यायला अजून बराच अवकाश होता. मी सरळ गॅरेज मधून गाडी बाहेर काढली. तिला मागच्या सीटवर झोपवलं आणि हॉस्पिटल मधे घेऊन गेले. त्यानंतर पुढचे दोन तीन दिवस ती पूर्ण बरी होईपर्यंत आम्ही बाकी सगळ्या जणींनी मिळून तिची आणि तिच्या मुलीची काळजी घेतली..

बघता बघता आमचे नवरे परत यायची वेळ झाली..आम्हां समस्त स्त्री वर्गाच्या मनात त्यावेळी मिश्र भावना लपंडाव खेळत होत्या...एकीकडे नवरा परत येणार म्हणून आनंद होत होता तर दुसरीकडे मैत्रिणींबरोबरचे ते मंतरलेले दिवस आता संपणार म्हणून हळहळ वाटत होती.

शेवटी एकदाचे सगळे ऑफिसर्स टूर संपवून परत आले आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं नॉर्मल रुटीन सुरू झालं.

पण पुढच्या एक दोन दिवसांतच नितीनची तब्येत बिघडली. एका संध्याकाळी त्याला अचानक हुडहुडी भरून खूप ताप चढला, दोन तीन ब्लॅंकेट्स घेऊनसुद्धा थंडी कमी होत नव्हती. आम्ही लगेचच हॉस्पिटलमधे जायचं ठरवलं. पण तोपर्यंत अंधारून आलं होतं. अशा अंधारात त्या डोंगराळ नागमोड्या उतारांवरून कार चालवण्याचा कॉन्फिडन्स माझ्याकडे नव्हता. आणि नितीनला त्या अवस्थेत ड्राइविंग करण्याचा नुसता विचार करणंही शक्य नव्हतं. मी पुढचा मागचा कसलाही विचार न करता सरळ आमच्या ब्लॉक मधे वरच्या मजल्यावर राहणाऱ्या मेजर बक्षी च्या घरी धावले.त्यांना बाहेर दारातच मी सगळी परिस्थिती सांगितली आणि आम्हांला हॉस्पिटलमधे घेऊन जाण्याची विनंती केली. त्यांनीही लगेच तयारी दाखवली. पण अचानक माझ्या लक्षात आलं की त्यांच्या घरी त्यावेळी बरेच पाहुणे होते... त्यांच्या मित्रपरिवराचं गेट टूगेदर असावं. ते बघून मलाच ओशाळल्यासारखं झालं. मी 'sorry' म्हणत निघाले तेव्हा मला थांबवत ते म्हणाले," मॅम, अहो पाहुणे आणि पार्टीज तर काय होतच राहतील, पण आत्ता तुमचं हॉस्पिटलमधे वेळेत पोचणं जास्त महत्वाचं आहे. तुम्ही घरी जाऊन निघायची तयारी करा, मी पाच मिनिटांत गाडी काढतो. "

त्यांना 'थँक्स' म्हणत मी घरी गेले आणि तयारी सुरू केली. नितीनला आत्ता ऍडमिट करून घेतील याची मला खात्री होती, त्यामुळे त्या दृष्टीनी त्याचे एक दोन कपडे, टॉवेल, टूथ ब्रश, शेविंग किट वगैरे अगदी आवश्यक असं सामान एका बॅगमधे भरून तयार ठेवलं. ऐश्वर्या ला शेजारच्या मैत्रिणी कडे सोडून आले, सगळी परिस्थिती कळल्यावर ती मैत्रीण म्हणाली," काळजी नको करू. आणि अजून काही मदत हवी असेल तर नक्की सांग."

घरी आले तोपर्यंत मेजर बक्षी गाडी स्टार्ट करून तयारच होते.. नितीनला मागच्या सीट वर झोपवलं आणि आम्ही हॉस्पिटलच्या दिशेनी निघालो. माझ्या अंदाजाप्रमाणे तिथल्या ड्युटी वरच्या डॉक्टरनी नितीनला ऍडमिट करून घेतलं आणि पुढच्या काही मिनिटांतच आवश्यक त्या टेस्ट्स आणि ट्रीटमेंट च्या दृष्टीनी कारवाईला सुरुवात झाली. परिस्थिती थोडी स्थिरस्थावर झाल्यावर डॉक्टर म्हणाले," प्रथमदर्शनी मला वाटतंय की यांना न्यूमोनिया झाला आहे. पण काळजीचं कारण असेल असं आत्ता तरी वाटत नाहीये. अगदी mild इन्फेक्शन आहे. उद्या टेस्ट रिपोर्ट्स आले की नक्की काय ते कळेल. आता तुम्ही घरी जा, उद्या visiting hours मधे भेटायला याल तोपर्यंत रिपोर्ट्स ही आलेले असतील."

मिलिटरी हॉस्पिटल्स मधे पेशंट बरोबर नातेवाईकांना राहायची परवानगी नसते. (अर्थात, लहान मुलांच्या बाबतीत हा नियम लागू नसतो.) फक्त निर्धारित visiting hours मधेच जाऊन भेटता येतं. कारण एकदा पेशंट ऍडमिट झाल्यावर त्याच्या खाण्यापिण्याची आणि इतर सर्व काळजी घ्यायला तिथला स्टाफ समर्थ असतो.

त्यामुळे, नितीनचा निरोप घेऊन मी आणि मेजर बक्षी घरी गेलो. घरी पोचल्यावर शेजारच्या मैत्रिणीला फोन केला. काही मिनिटांतच ती झोपलेल्या ऐश्वर्याला कडेवर घेऊन आली. आणि येताना माझ्यासाठी जेवणही पॅक करून घेऊन आली. मला म्हणाली," ऐश्वर्याचं जेवण वगैरे सगळं झालंय. आता तू पण जेवून घे आणि विश्रांती घे."

तिचं हे असं सहज, काही गाजावाजा न करता आमची काळजी घेणं माझ्या मनाला आत कुठेतरी स्पर्श करून गेलं. मी तिला तसं बोलून दाखवलं तर ती म्हणाली," अगं, त्यात काय एवढं! मी जगावेगळं काही नाही केलं. त्यासाठी थँक्स वगैरे ची काही गरज नाहीये. तसं असेल तर मग माझ्याकडून पण तुला थँक्स...माझ्या मुलीच्या बर्थडे पार्टीमधे तू पण तर मला किती मदत केली होतीस... मुलांचे खेळ घेतलेस, केक वर icing करून दिलंस. त्यामुळे आता फॉर्मलिटी थांबव आणि जेवून लवकर झोपून जा."

त्या रात्री नितीनच्या काळजीनी शांत झोप लागलीच नाही. रिपोर्ट्स मधे काय असेल ? डॉक्टर म्हणाले त्याप्रमाणे 'काळजी करण्यासारखं काही नसू दे' अशी देवाकडे सतत प्रार्थना करण्यातच रात्र निघून गेली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ऐश्वर्या ला बरोबर घेऊन नितीनला भेटायला हॉस्पिटलमधे गेले. रिपोर्ट्स आले होते. डॉक्टरांच्या अंदाजाप्रमाणे mild न्यूमोनिया होता. नितीनचा तापही आता खूप कमी होता. एकंदरीतच परिस्थिती आटोक्यात होती. एक दोन दिवसांत पुन्हा टेस्ट्स करायच्या होत्या. जर रिपोर्ट्स नॉर्मल असले तर त्याला घरी सोडणार असं डॉक्टर नी सांगितलं. मला हुश्श झालं. भेटायची वेळ संपली आणि मी आणि ऐश्वर्या घरी गेलो.

दुसऱ्या दिवशी रविवार होता. त्यामुळे हॉस्पिटल मधे सकाळी पण भेटायची परवानगी होती. मी निघायची तयारी करतच होते तेवढ्यात हॉस्पिटलमधून फोन आला ...ऑफिसर्स वॉर्ड मधून नर्सिंग असिस्टंट बोलत होता,"मॅम, साब का मेसेज है। आप जब उनसे मिलने आयेंगी तो उनका स्वेटर लेके आईये।"

'अचानक थंडी का बरं वाजायला लागली असेल नितीनला ?' माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पण पटकन त्याचे एक दोन स्वेटर्स, सॉक्स, मफलर्स वगैरे जे जे लक्षात आलं ते सगळं बॅग मधे ठेवून घेतलं.

ऐश्वर्या ला घेऊन जरा घाईतच हॉस्पिटलमधे पोचले. आम्ही ऑफिसर्स वॉर्ड मधे नितीनच्या रूममधे गेलो तर तिथे नितीन नव्हताच. कोणाला तरी विचारावं म्हणून बाहेर आले तेवढ्यात एक नर्सिंग असिस्टंट तिथे आला आणि म्हणाला," साब को थोडी देर पहले ICU में शिफ्ट किया है।"

त्याचं हे वाक्य ऐकलं आणि छातीत धस्स झालं....मनात नको नको ते विचार यायला लागले...'नितीननी मुद्दाम फोन करून स्वेटर्स घेऊन यायला सांगितलं होतं म्हणजेच त्या सकाळी त्याला खूप थंडी वाजत असावी. आणि मागच्या तासाभरातच अचानक त्याला ICU मधे शिफ्ट करावं लागलं ? काय झालं असेल नक्की ? आपण नेहेमी वाचतो, ऐकतो तसा काही medical negligence वगैरे तर नसेल ना झाला ?'

त्या नुसत्या कल्पनेनीच पोटात गोळा आला. जानेवारीच्या त्या थंडीत सुद्धा मला अक्षरशः घाम फुटला.मन सैरभैर झालं होतं.कधी एकदा नितीनला बघते असं झालं होतं. तेवढ्यात माझा हात ओढत ऐश्वर्यानी विचारलं,"आई, बाबा कुठे गेले?" " गेले नाही बेटा... इथेच आहेत." मी पटकन उत्तरले. तिला हे सांगताना मी नकळत स्वतःलाच धीर देत होते की काय!! तिचा चिमुकला हात हातात घेत मी म्हणाले,"ठीकच आहेत ते, फक्त त्यांना दुसऱ्या खोलीत शिफ्ट केलंय." माझं उत्तर ऐकून ती निर्धास्त झाली. मी मात्र तिच्या हाताच्या पकडीतून धीर गोळा करत होते.

तो नर्सिंग असिस्टंट मला अजूनही काहीतरी सांगत होता बहुतेक; पण ते सगळं ऐकायला मी थांबलेच नाही. ऐश्वर्या चा हात घट्ट धरून सरळ ICU च्या दिशेनी चालायला सुरुवात केली.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

I was eagerly waiting for this, khup divsanni ha bhag ala! tumcha anandache dohi sudha follow karte ahe!
pudhcha bhag lavakr yava.. Happy