तिचा पुरस्कार

Submitted by प्रतिक सोमवंशी on 17 June, 2019 - 02:51

सभागृहाच्या भिंतींना कापरे भरतील एवढ्या टाळ्यांच्या कडकडाट आज ज्ञानपीठ जाहीर झाला. सभागृह गच्च भरलय, पुढे vip लोकांच्या रांगा, त्यांच्या मागे बसलेली रसिक मंडळी, या सुवर्णक्षणाचे साक्षीदार बनायला शेकडोंच्या संख्येने भरलीय. त्या पुढच्या रांगेतून उठून एका व्यक्तीची सगळ्यांना प्रतिसाद देत हळू हळू व्यासपीठाकडे जाणारी पाठमोरी आकृती मला अंधुकशी दिसतेय. हो...तिला मिळालाय ज्ञानपीठ!
तसा मी नेहमी वेळेच्या आधी सगळीकडे पोहोचतो पण आज मात्र पाय अडखळत होते. मनात किती प्रश्नांनी घर केल होत. भावनांचा झालेला गुंता सोडवता सोडवता थोडा उशीरच झाला मला. काय चालू असेल तिच्या मनात, तिच्या दीड तपांच आज सार्थक झालय, एवढ्या गर्दीतही सभागृहाच्या दारात उभ्या असलेल्या मला शोधेल का तिची नजर? मी जाऊ पुढे? नको कश्याला उगाच आपली ओळख ती केवढी? तिच्या बाबतीत असे प्रश्न नेहमीच पडतात मला, तिच्या मनात काय होत असेल या प्रश्नाचे उत्तर समजून घ्यायला मला खूपच आवडत. आठवतय मला असच तिच्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळीसुद्धा मी लांबून तिला न्याहाळत होतो. असो,
डोळ्यातले आनंदाश्रू बोटांनी टिपले तेंव्हा कुठे ती दिसू लागली मला. तिच्या हातात ज्ञानपीठ आहे. साईड स्क्रिन वर तिचा चेहरा स्पष्ट दिसतोय. तिच्या चेहऱ्यावर समाधान आहे. तिचा आनंद तिच्या स्मितहास्यातून दिसून येतोय. तेच पाणावलेले डोळे, जे वेगळंच काहीतरी सांगून जातायत जसे पहिल्या भेटीत मला खूप काही सांगून गेलते, तिच्या आत दडलेला एकटेपणा, तिने लपवून ठेवलेल्या जखमा, तिने सहन केलेला त्रास, तिने केलेला त्रागा, तिला मिळालेले वयापेक्षा जास्तीचे अनुभव, अजून खूप काही आहे. तीच भाषण चालुय, पण मला ऐकू येत नाहीय, कारण मी तिने बोललेल्या एकाही शब्दावर आज विश्वास ठेवणार नाही. हे सभागृह, हे व्यासपीठ, हे रसिक, यांना ते आवडेल, ते विश्वास ठेवतील, टाळ्या वाजवतील पण मी नाही... हे सगळे लोक तिला फक्त तिच्या पुस्तकातून भेटलेत, यांनी तिला तिच्या पुस्तकात वाचलय पण मी, मी मात्र तिला वाचलय. मला माहिती आहे ती नाही सांगणार, तिने काय कमावलय! ती इथे परिस्थितीच भांडवलही नाही करणार. ती इथे नाही दाखवणार तिच्या जखमा, तिचा एकटेपणा, तिला झालेला त्रास, तिने केलेला त्याग. यांना कळणारही नाही आणि कळला तरी वळणार नाही! ती आनंदाने रडेल त्यामुळे मला पूर्ण भाषण (खरं) तिच्या डोळ्यात नाही वाचता येणार. कित्येक शब्द, कित्येक वाक्य, तिच्या गालावरून ओघळून जातील. ती रुमालाने टिपेल, सर्वांचे आभार मानेल पण मला मला आता ते ओघळून गेलेले वाक्य, शब्द हवे आहेत, त्या शिवाय मला चैन नाही पडणार. कारण तिला कितीही वाचल, कितीही समजून घेतल तरी खूप काही राहून जात.
आता सगळ काही सार्थकी लागलंय, तिच्या आयुष्याच चीज झाल्याच समाधान आहे. शेवटी तिने करूनच दाखवल. जिद्दी आहे हो पोर खूप! अजून मी माझी आहे अस नाही म्हणणार पण माझीच आहे माझ्यासाठी. खूप खुश आहे मी, आणि मला गर्व वाटतो आज तिचा. She is a queen, a self-made queen...
©प्रतिक सोमवंशी

Group content visibility: 
Public - accessible to all site users