"माझी माय"

Submitted by मी_अनामिक on 12 June, 2019 - 08:19

“ मर्दस डे ” च्या निमित्ताने माझ्या आईचं जीवन मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न....

माझी माय

आम्हा चिल्यापिल्यांसाठी
सगळं सहन केलं तिनं
उणं-दुणं बोलणं अन्
चार घरचं भांडी-धुणं

सुंदर सुरकुतलेला चेहरा तिचा
सांगतो सगळी जीवनी
भेगा पडलेल्या हातांनाच
ठाऊक तिची कर्मकहाणी

आहे थोडी देवभोळी अन्
पाठ सगळी तुकाची वाणी
काबाडकष्टातच हयात सरली
नशीबी फक्त दोन फुटकं मणी

जगात दूज कोण आहे
तिच्याइतक निर्मळ अन् निर्मोही
स्वतःसाठी मात्र तिनं कधी
देव्हार्याचा दिवा पेटवलाच नाही

हिंमत हरली नव्हती तेव्हासुद्धा
जेव्हा बाप माझा हरला होता
कणखरपणे पाठीशी उभा राहुन
संसार सगळा तिनंच पेलला होता

एवढंच सांगते ती मला
असलं काळकुट्ट आभाळ जरी दाटलेलं
"तु फकस्त मोठ्ठा हो
एवढंच सपान म्या उराशी बाळगलेलं”

आसरा मिळाला नाही कुठेही
सारं जग पायदळी तुडवलं
सहजच वाकलो पायाशी तिच्या
अन् स्वामित्व तिन्ही जगाचं घावलं

शब्द तरी कुठे पुरे पडतील
तिची महती वर्णु तरी काय ?
माझी पंढरी माझी माऊली
माझी पुण्याई माझी माय...

हा माझा लिखाणाचा पहिलाच प्रयत्न असुन
तुम्ही दिलेला अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहे...
मी टिकाकारांच नेहमीच स्वागत करतो....

Group content visibility: 
Use group defaults

पहिल्या प्रयत्नात डिस्टिंक्शन. खूप सुंदर.
बालपणी अशा माऊली अनुभवल्या आहेत. फक्त देणं एवढंच ठाऊक. थकवा माहीत नाही. कसली अपेक्षा नाही. घरच्या लोकांना सुखी पाहणं ही अपेक्षा.
परवा प्रविण तरडे यांच्या आईविषयी पाहिलं तर तीने केलेले कष्ट कविता वाचताना नजरेसमोर आले.

खूप छान ! पु. ले. शु.
तुमच्या भावना पोहोचल्या. हीच तर असते कविता.
सजवणं, नटवणं सवयीने जमेल.

<<< हा माझा लिखाणाचा पहिलाच प्रयत्न असुन
तुम्ही दिलेला अभिप्राय माझ्यासाठी मौल्यवान आहे... >>>

तुम्ही अभिप्राय मागितला म्हणून मुद्दाम लिहितोय.
पहिलाच प्रयत्न असूनही खूप छान आहे. बहिणाबाईची कविता वाचतोय असा थोडा भास झाला.
अजून लिहित रहा. शुभेच्छा.

छान!

सर्वांना धन्यवाद...... खुप छान वाटत आहे..... आपलं लिखाण आवडेल की नाही हीच भीती होती......
तुम्हा सर्वांचा मी खूप आभारी आहे..... "मन्या" जी ते पु का शु म्हणजे काय तेवढ कळेल का.......