एस.टी. ची एक्काहत्तरी..!

Submitted by DJ.. on 31 May, 2019 - 07:50

महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेस सुखाचा प्रवास घडवणारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहनची बस अर्थात आपली एस.टी. १ जुन ला ७१ वर्षांची होत आहे. गेल्या ७१ वर्षांत काळानुरुप रुपडे बदललेल्या पण सामान्य जनतेच्या प्रवासाच्या आकांक्षा आपल्या परीने पुर्ण करणार्‍या राज्य मार्ग परिवहन महामंडळास खुप खुप शुभेच्छा..!!

शेजारच्या गावात हॉस्पिटलमधे जन्मल्यानंतर २ दिवसांनी मला पहिल्यांदा घरी आणले ते एस.टी.ने. त्यामुळे एसटीशी आपोआप नाळ जुळली Bw . माझ्या लहानपणी अगदी श्रीमंत लोकांकडे असलेली एखाद-दुसरी फियाट पद्मिनी नाहीतर अँबॅसिडर कार किंवा बुलेट-स्कूटर सोडली तर एस.टी. शिवाय कोणतेही प्रवासी वाहन रस्त्यावर दिसायचे नाही. गावातील एस.टी. स्टँडवर आलेल्या एस.टी. बसमधे उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवासाला जाण्याचे सुख काय असते ते मी पुरेपुर उपभोगले आहे.

जन्माला आल्यापासुन प्रवासाची आवड निर्माण करणार्‍या एसटीने मला आजवर अगदी लाखो किलोमिटर फिरवले. प्रवासासाठी आता भरपुर पर्याय उपलब्ध असतानाही एसटीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. संधी मिळेल तेव्हा मी एसटीने प्रवास करण्यास अतिशय उत्साही असतो.

आज एसटी खरेच लोकाभिमुख झालेली दिसते. एसटीची सर्वसाधारण बस (लाल बस) आता सफेद-लाल रंगाच्या बस मधे परावर्तित झाली आहे आणि तीत आरामदायी सिट्स आल्या आहेत. हिरव्या-पांढर्‍या रंगाच्या निमआराम बसमधे आता पुशबॅक सिट्स आहेत. शिवनेरी आणि मल्टीअ‍ॅक्सल अश्वमेध सारख्या अत्यंत आरामदायी वातानुकुलीत बसेस पुणे-मुंबई रुटवर प्रवासी खेचण्यात आजही प्रतिष्ठेचे स्थान टिकवुन आहेत. राज्यातील कानाकोपर्‍यात माफक दरात वातानुकुलीत प्रवास घडवणार्‍या शिवशाही बसेस अल्पावधीत लोकप्रिय झाल्या आहेत.

काळानुरुप कात टाकणार्‍या एसटीने गेल्या ७१ वर्षात अमुलाग्र बदल घडवुन आपली घोडदौड सुरुच ठेवली आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा..!!

ST.jpg
साधीबस (लाल बस)^

newST.jpg
अपग्रेडेड साधीबस^

Asiad_1.jpg
निमाअराम बस^

Shivaneri_1.jpg
शिवनेरी बस^

Ashwamedh_1.jpg
अश्वमेध बस^

Shivashahi.jpg
शिवशाही
STlogo.jpg
एस.टी. चा लोगो

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदा पुणे एअरपोर्ट वरून नगर रोडला येऊन नगरला जाणारी एक एसटी हात दाखवून थांबवली. नेहमीप्रमाणे शिरूर स्टँडला गाडी थांबली (पुणे-नगर नॉन-स्टॉप गाड्या तेव्हा अजून फारशा चलनात नव्हत्या).
बुक स्टॉलवर टाईम्स घेतला आणि शंभरची नोट दिली. स्टॉलवाला सुटे करायला गेला तो बराच वेळ गायबच. मी ही ऊभ्या ऊभा पेपर वाचण्याच्या नादात माझी गाडी निघून गेली. माझी सामान आणि लॅपटॉप बॅग बस मध्येच राहिली. चौकशी कक्षात विचारपूस करून गेलेल्या बसचा नंबर घेतला.
त्याच वेळी दुसरी एक नगरला जाणारी बस स्टेशनात आली. मी नव्याने तिकिट काढून 'आता काही आपले सामान मिळत नाही' म्हणत नाराजीनेच त्या मागाहून आलेल्या बसमध्ये बसलो. नगरमधल्या मित्राला फोन करून आधीच्या एसटीचा नंबर देऊन गाडी नगर स्टँडवर येताच सामान काढून घ्यायला सांगितले. पण मधल्या सुप्या वगैरेंच्या स्टॉपवर कोणी सामान ऊतरवून घेतले तर काय अशी चिंता सतत वाटत होती.

आणि काय आश्चर्य...शिरूरपासून दहा पंधरा किलोमीटरवर माझी आधीची एसटी मागाहून येणार्‍या एसटीची वाट बघत थांबलेली होती. मागे असल्यामुळे माझे लक्ष नव्हते पण त्या आधीच्या एसटीच्या कंडक्टरने माझी एसटी थांबवून आत येऊन विचारले त्या गाडीत सामान विसरलेलं कोणी आहे का?
आणि माझे सामान मिळाले. धन्य ती एसटी आणि तिचे कंडक्टर. Happy

आपल्या लाडक्या एसटी साठी कमीतकमी १ प्रतिसाद तर बनतोच... Proud
७१ प्रतिसाद तरी येऊद्या लोकहो. Wink

माझं बहुतांश फील्डवर्क/ भटकंती लाल डब्ब्याच्या जिवावर होते. झालेली आहे. एस्टी जात नाही अशीही काही गावं असतात. किंवा मग दिवसातून एकदाच गैरसोयीच्या वेळेला जाते अशी.. पण नाहीतर एस्टी हे सगळ्यात सुरक्षित सर्वत्र घेऊन जाणारे वाहन आहे. त्याचे ड्रायव्हर कंडक्टर बहुतेकवेळा सुस्वभावी आपणहून मदत करणारे असेच बघितले आहेत. व्यवस्थित घेऊन जातात. पुणे मुंबई तर शिवनेरी झिंदाबाद.
हल्ली ग्रामीण भागात सर्रास मुलीही कंडक्टर असतात हे बघितलेले आहे. त्याही तितक्याच उत्तम सेवा देतात.
एकाहत्तराव्या वादिनिमित्त एस्टीला अगदी मनापासून शुभेच्छा. अशीच उत्तम सेवा आम्हाला कायम मिळत राहो...

छान लेख! एसटीने बऱ्यापैकी प्रवास केला आहे. माझी एक खास आठवण म्हणजे मी २६ जुलै २००५ ची रात्र बोरघाटात बसमध्ये बसून काढली आहे. पुण्याहून निघाले तेव्हा एवढ्या पावसाची कल्पना नव्हती केली. रात्रभर ट्रक्सच्या रांगेत बस उभी. पहाटे पाच वाजता मुसळधार पावसात लोणावळा स्टँडमध्ये गाडी बदलून खोपोलीमार्गे जाणाऱ्या गाडीत बसले आणि सकाळी सहाला घरी पोचले. दुपारी 3 वाजता शिवाजीनगरहून निघून केलेला एसटीचा थरारक प्रवास!
एक होतं की भीती वाटली नाही. एसटीत सुरक्षित आहोत हे माहीत होतं. शिवाय नवीन घेतलेला नोकियाचा दणकट मोबाईल होता त्यामुळे सगळ्यांना कळवता आलं होतं. ती काळजी नव्हती.

किती सुंदर आठवणी, लेख आणि फोटो ..
एसटीचा प्रवास खूप असा केला नाहीये. पण जेवढा काही आहे त्या सुखदच आठवणी आहेत. आता लाल एसटी नाही का? हे माहित नव्हते. नवीन रूपही छानच आहे पण ती जुनी किती देखणी दिसायची.

स्वातंत्र्यपूर्व काळात आमच्या कुटूंबाची खानदेशान मोटर सर्व्हिस होती. जळगाव जिल्ह्यांतल्या गावांदरम्यान ह्या बसगाड्या चालवल्या जायच्या. घरगुती व्यवसाय असल्याने तेव्हा फार काही नियम वगैरे नव्हते. हात दाखवून बस थांबवायची. संध्याकाळी शेवटच्या फेरीला आजोबा स्वत: असायचे आणि बर्‍याचदा शेतांवरून परताणार्‍या मजूर आणि बायाबापड्यांना बिनातिकीट घेऊन यायचे आणि त्यामुळे बस ओव्हरलोड व्हायची. आजोबा म्हणायचे की ही बस गेली की ह्या लोकांना बरच अंतर चालत यावं लागतं. आधीच दिवसभर शेतात कष्ट झालेले शिवाय घरी लहान पोरं, कुठे त्यांना मागे ठेवायचं! पुढे एसटी सुरू झाल्यावर ह्या मोटरसर्व्हिसचेही सरकारीकरण झाले. गाड्या एसटी महामंडळाने विकत घेतल्या आणि आजोबा आणि २ काका एसटीत नोकरी करायला लागले. सरकारीकरणानंतर नियम आले, इन्स्पेक्शन सुरू झाले. संध्या़काळच्या फेर्‍यांना जास्त गर्दी म्हंटल्यावर इन्स्पेक्टर तिकीटं तपासायला तेव्हा यायला लागले. अर्थात दरवेळी इन्स्पेक्टर आहे अशी खबर आधीच कोणीतरी आणायचं आणि मग जास्तीची लोकं स्वतःहून खाली उतरून थोडं अंतर पुढे चालत जायची. इन्स्पेक्टर गेला की पुन्हा बसमध्ये! आजोबा रिटायर झाले तेव्हा तो इन्स्पेक्टर येऊन सांगून गेला की तुम्हांला काही मला कधी जास्तीचे बिनातिकीट प्रवासी घेतल्याबद्दल दंड करता आला नाही! Happy
माझी आज्जी एसटी बद्दलच्या बर्‍याच आठवणी सांगायची. आज ह्या लेखानिमित्ताने आठवण झाली.

छान आठवणी वाचायला मिळतायत इथे.
लहानपणी सुट्टीसाठी आतेभावंडं यायची तेव्हा जर कुठल्या दिवशी येणार आहेत हे माहीत असलं तर आम्ही त्यांना एसटी स्टॉपवर आणायला जायचो. हिरव्या झाडीतून येणारी ती लाल एसटी काय छान दिसायची Happy शिवाय सुट्टीत करायला मिळणाऱ्या मजेचाही आनंद त्यात मिसळलेला असायचा. कुठल्याही गाडीचा आवाज आला की घाईघाईने बघायला जायचो. पण माझा एक आतेभाऊ नुसत्या लांबून येणाऱ्या आवाजावरून ही एसटी आहे की नाही एवढंच नाही, तर (अशोक) लेलॅंडची आहे की ' टाटा' ची हेही ओळखायचा. Happy

अजून एक आठवण म्हणजे शाळेच्या सहलीसाठी ' प्रासंगिक करारा'ने एसटी भाड्याने मिळायची. ड्रायव्हर एसटीचाच. मजा यायची २-३ दिवस.

दर उन्हाळी सुट्टीत एसटीनेच कोकणात आजोळी येणं जाणं झाल्याने एसटी जिवाभावाची. तेव्हा बॉंबेसेंट्रलला जावं लागे. बाबा एक महिना आधी पहाटे जाऊन लाईन लावून आई व आम्हा बहिणभावाची तिकिटं काढत. येतानाची रिकिटं मामा काढून ठेवत असे.

लेख छान झाला आहे.

झाले ७१ Happy

प्रतिसादांमधून खूप छान आठवणी वाचायला मिळाल्या

म्हणुनच धागा त्रोटक ठेवला होता.. एस.टी.च्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त सर्वांच्या जिव्हाळ्याचे अनुभव वाचायला मिळावेत हाच हेतु होता..! Bw

पुणे मुंबई अश्या मोठ्या शहरात स्थानिक बस सेवा चालवण्यासाठी महामंडळे असतात. बाकी छोट्या जिल्ह्या-तालुका गावी एसटीच स्थानिक बससेवा चालवते. टपावर कॅरेज नसेल तर लोकल बस, कॅरेज असेल तर एसटी!

बाकी छोट्या जिल्ह्या-तालुका गावी एसटीच स्थानिक बससेवा चालवते. टपावर कॅरेज नसेल तर लोकल बस, कॅरेज असेल तर एसटी!>> बर्‍याच ठिकाणच्या शहर बससेवा एस.टी. ने ८-१० वर्षांपासुन बंद केल्यात. सातारा, कराड, अहमदनगर, नागपुर आदी ठिकाणच्या शहर वाहतुक सेवा एस.टी. ने बंद केल्या. अगदी ठरावीक शहरात शहर बससेवा आहे आणि ती कोणत्याही म.न.पा. शहर बससेवेपेक्षा चांगली आहे. नाशिक, सांगली मधे महापालिका असुनही एस.टी.च शहर बससेवा देत आहे. रत्नागिरी मधे देखिल फार पुर्वी एस.टी. ची शहर वाहतुक होती आता आहे की नाही माहित नाही.

कॅरेज असेल तर एसटी! >>> आणि त्यावर आंब्याच्या करंड्या,फणस, ट्रंका, वळकट्या. स्टॅंडला फलाटावर एसटी लागली की हे सामान मागच्या शिडीवरून वर चढवायची लगबग. तोपर्यंत बायकामुलं, म्हातारेकोतारे आत बसून घेणार. खिडकीतून पुन्हा थोड्या गप्पा. पोहोचल्यावर पोस्टकार्ड टाक म्हणून सांगत सासरी परतणाऱ्या माहेरवाशिणीला सोडायला आलेला भाऊ भाचरांशी ह्यावर्षीची शेवटची मस्ती करणार. मध्येच जवळच खुळखुळ आवाज करत बिझी असलेल्या रसवंतीगृहामधून रसाचे ग्लास घेवून आलेला पोरगा, आलेपाक, संत्र्या-लिंबाच्या गोळ्या, चिक्की,शेंगदाणे घेवून आलेले विक्रेते आवाज देणार. ड्रायव्हर येवून बसला, कंडक्टर चढला की एसटीआतल्यांची व बाहेरच्यांची वेगळीच हालचाल. मग एसटी सुरू झाल्याचा भ्रूम्म्मम्म आवाज झाला की हात हलवत निरोप.

सुरक्षा कारणास्तव आता एसटीने कॅरिअर्स काढून टाकली आहेत. सोलापुर पुणे मार्गावर रात्रीच्या एसटीतून टपावरुन सर्रास गांजाची चोरटी वाहतूक होत असे. पोलिस दिसले की सरळ टपावरुन गांजाची पोती खाली रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात फेकून दिली जात असत.

एसटीचा वाढदिवस संपून चार दिवस झालेत तेव्हा कटू आठवणी मांडायला हरकत नसावी.

एसटी स्टँडवर कँन्टीन्मध्ये जेवायला न थांबता विशिष्ट खासगी ढाब्यांमध्येच गाडी जेवणाकरिता थांबविण्यामागे असलेले ड्ड्रायव्हर कंण्डक्टरचे ढाबामालकाशी असलेले साटेलोटे हा वेगळ्या चर्चेचा विषय ठरेल. डिझेल व स्पेअर पार्टची चोरी आणि खासगी जीपांमधून चालविली जाणारी बेकायदा वाहतू़क हा एस्टीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचा भ्रष्टाचार त्याहूनही गंभीर मुद्दा आहे.

आणि सर्वात शेवटी, एसटीचा विषय आहे आणि संतोष माने प्रकरणाची आठवण येणार नाही तो खरा पुणेकरच नव्हे. २०१२ संपताना झालेल्या दिल्ली रेप आणि मर्डर केसमधल्या आरोपींना फाशी व्हावी म्हणून देश पेटून उठतो, अनेक कँडल मार्चेस निघतात आणि तसा फाशीचा निकालही लागतो आणि त्याच्या नुकत्याच आधी झालेल्या पुण्यातील हत्याकांडात अनेक निरपराध्यांना ठार मारणारा संतोष माने केवळ जन्मठेप भोगतो व त्याला फाशी व्हावी म्हणून कुठलीच चळ्वळ उभी राहत नाही हे फार दुर्दैवी आहे.

तसेच स्वतः वर झालेल्या अत्याचारांचा मुकाबला करणारी तरुणी 'निर्भया' ठरते आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून संतोष मानेच्या एसटीचा पाठलाग करुन त्याला थांबवणारा तरुण कोण त्याचे आज आम्हाला नावही आठवत नाही.

संतोष मानेला कठोर शिक्षा व्हावी आणि त्या तरुणाचा देशपातळीवर गौरव व्हावा या दोन्ही मुद्यांवर एसटी प्रशासनाने दाखविलेली उदासीनता खेदजनक आहे.

संतोष माने बस चालवत होता का एसटी?

नवीन Submitted by च्रप्स on 5 June, 2019 - 07:33 >> तुम्ही कधीच एस.टी. मधे बसला नाही ना म्हणुन तुम्हाला हा प्रश्न पडला.. Bw
मी पुण्यात असेही लोक बघितलेत की ज्यांना 'पुणे महानगर परिवहन मंडळ लि.' आणि 'महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ' यातील फरकच माहित नसतो. हे असं काही वेगवेगळं असु शकतं यावर त्यांचा विश्वासच बसत नाही.. Proud

वाढदिवसानिमित्त एस्टीला मनापासून शुभेच्छा! काय काय आडमार्गावर एस्टी ची सर्विस असते आणि त्याचा तेथील लोकांना किती उपयोग होतो ते पाहिल्यावर एसटीची किती गरज आहे ते कळते. पूर्वी एसटीने अनेकदा फिरलेलो आहे. खूप आठवणी आहेत.

ते तिरपे फलाट, मागच्या चाकामागचे "ओव्हरहँग" त्याच्या वरती येउन गाडी थांबली आणि दार उघडले की उडणारी झुंबड, सीटवरचे रूमाल आणि टोप्या. ५० पैसे की दोन रूपये भरून केलेली आरक्षणे. अधिकृत नसलेले पण अनेकांना सोयीचे असल्याने अनेकदा कंडक्टरला पटवून बनवलेले थांबे, टपावर चढवल्या व उतरवल्या जाणार्‍या अचाट वस्तू, गावोगावचे बाजार, तेथील वस्तू. उन्हाळ्यात गर्दी, घाम व त्या रेक्झिन च्या सीट्स चा येणारा एकत्रित वास, कधी धूळ/फुफाटा, तर कधी बाहेरची हिरवीगार शेते आणि डोंगर, ते "<> घाट, वेडीवाकडी वळणे, वाहने सावकाश हाका" वगैरे - रेल्वे इतके प्रचंड नसले तरी एसटीचेही एक स्वतंत्र विश्व आहे. नेहमीच्या प्रवाशांचे त्या त्या ठिकाणचे विशिष्ठ उच्चार - "पुणा गाडी" सारखे.

रत्नागिरीहून सकाळी एकदम लौकर निघून न्याहारीच्या वेळेपर्यंत गणेशगुळ्याला पोहोचवणारी साधारण तासाभराची ट्रीप, तसेच पुण्यातून सकाळी सिंहगड पायथ्याशी नेणारी तशीच पाउण-एक तासाची, नारायणगावहून जुन्नर ला जाणारी - असे अनेक छोटे प्रवास, तर गणपतीपुळे ते पुणे असा सुमारे ११ तासांचा प्रवास - अशा बर्‍याच आठवणी आहेत. भर उन्हाळ्यात पुण्याहून सायकली हाणत आम्ही सातारा-कोल्हापूर, आणि मग आंबा घाटामार्गे गणपतीपुळे असे गेलो होतो कॉलेज मधे असताना. तेव्हा परतताना तेथे "वस्ती" ला असलेली एसटी सकाळी निघते असे कळाल्यावर कंडक्टर ड्रायव्हर ला विचारून सकाळी सायकली टपावर चढवून त्याने परतलो होतो. त्याच्याच आदल्या संध्याकाळी आंबा घाट उतरून साखरप्याला पोहोचल्यावर कोणीतरी सांगितले की एसटी स्टॅंडवर रात्री गाड्या असतात, त्या सकाळी निघतात - तेथे जाउन खुशाल झोपा. मग स्टॅण्डवर जाउन तेथील लोकांना विचारले - त्यांनी एका एस्टीकडे बोट दाखवले. त्या गाडीत सुखाने रात्रभर झोपलो होतो. मात्र तेव्हाच शेजारी एक पुण्याला जाणारी गाडी दिसल्यावर माफक होमसिकनेसही आला होता, ते ही लक्षात आहे Happy

'मल्हारवारी' गाण्यात संजय नार्वेकर व त्याचे सगळे कुटुंब गावी जाते त्याची सुरूवात एस्टीच्या प्रवासानेच दाखवली आहे. पावसाळ्यातील सह्याद्री/मावळ वगैरे चे अतिशय सुंदर चित्रीकरण आहे. माझ्या आठवणीतील पावसाळ्यातले एस्टीचे प्रवास असेच होते बहुधा.

लहानपणी खुप फिरलोय एसटीने
आम्ही इस्लामपुरात रहात असताना बऱ्याचदा सुट्टीत मुंबईला जायला एक चांदोली-मुंबई रातराणी असायची (एशियाड वगैरे तेंव्हा एव्हढे प्रस्थ नव्हते) तिच्या त्या निळ्या प्रकाशात केलेला अर्धवट झोपेतला प्रवास अजूनही लख्ख आठवतोय.... खोपोलीचे दिवे बघायला आईबाबा हमखास उठवायचे.
पुढे कॉलेजला पुण्याला आल्यावर आणि नंतरच्या बॅचलर असेपर्यंतच्या दिवसात दर वीकेंडला साताऱ्याला पळायचो!
शुक्रवारी संध्याकाळची आणि सोमवारी सकाळची विना वाहक विना थांबा ठरलेली असायची.... आणि आमच्यासारखे बरेच असायचे.... दर वीकेंडला एकत्र प्रवास करून इतक्या ओळखी झालेल्या असायच्या की तिकीट काढायला लाईनमध्ये क्वचित उभे रहायला लागायचे.... कुणी ना कुणी तरी ओळखीचे अगोदरच असायचे लायनीत उभे.... नुसते हाताने खुणवायचे.... "माझे पण एक" म्हणून
बाकी एसटीच्या प्रवासात जी झोप लागते त्याला अवघ्या जगात तोड नाही Happy

आताश्या फारसा प्रवास होत नाही एसटीने पण मला अजुनही कधीमधी आवडते एसटीने फिरायला!

र वीकेंडला एकत्र प्रवास करून इतक्या ओळखी झालेल्या असायच्या की तिकीट काढायला लाईनमध्ये क्वचित उभे रहायला लागायचे.... कुणी ना कुणी तरी ओळखीचे अगोदरच असायचे लायनीत उभे.... नुसते हाताने खुणवायचे.... "माझे पण एक" म्हणून>> आता फार अवघड झाले आहे असे करणे.. ऑनलाईन तिकिटमुळे लायनीत उभे राहणे तद्दन मुर्खपणाचे ठरत आहे कारण फलाटावर आलेली विनावाहक विनाथांबा निम्म्याहुन जास्त रिझर्वड्च असते.

हो... तेही आहेच!
तेंव्हा नसायचे ऑनलाईन रिझर्वेशन वगैरे फारसे.... विना वाहक विना थांबा ला तर नाहीच.
सणासुदीला पार स्वारगेटच्या बाहेरपर्यंत यायची लाईन.

हो ना.. आताही असते... बिचारे वाट बघत असतात कोणत्या गाडीत जागा मिळतेय ते.. २ तास लायनीत उभा राहीपर्यंत दुसर्‍या एसटीने सातार्‍यात पोचु शकतो हे त्यांच्या गावीही नसते. Biggrin तरिही एस.टी. व्यवस्थापन शक्य तेवढ्या नॉन रिझर्वड बसेस फलाटावर उभा करुन लाईन कमी करण्याचा आटोकाट प्रयत्न करत असते.

लहानपणी एसटीत उलटी करायची हे ठरलेलेच होते. एसटीतला एकंदर गचाळपणा ,स्थानकावरचा कोलाहल व घाण चित्रविचित्र वास,सतत थरथरणारे धुड यामुळे हे वाहन कधी आपले वाटले नाही. अजूनही गलथानपणा चालू आहे. जुन्या गाड्यांच्या चॅसिसवर नविन पत्रे बसवुन मेक ओव्हरचा केविलवाणा प्रयत्न आहे. आपल्याला हे वाहन कधी आवडले नाही .

सुंदर धागा !

प्रिय एस टी
असंख्य प्रवास, असंख्य आठवणी.
तुज्यासोबत प्रवासाने ओठांवर उमलली जीवनगाणी .

आमचा प्रवास समृद्ध केल्याबद्दल आभार

वाट पाईल पण एस टी नेच जाईल Happy

लाखांवर किलोमीटर एसटी ने मी प्रवास केला आहे. पंधरा वीस वर्षांपूर्वी कंडक्टर फार माजूर्डे असत. पण आताचे फार शेळपट झाले आहेत. बहुतेक सोशल मीडिया कारणीभूत असेल. एकदा एक महानुभाव साधू माझ्या शेजारी खिडकीच्या बाजूला बसला होता आणि तंबाखू खाऊन बसमध्ये आतल्या बाजूला थुंकत होता. मी त्याला विचारलं काही लाज वाटते का नाही. तर म्हणतो कसा" एसटी थुकायसाठीच असती." इतका संताप झाला.एक ठेवून द्यावी असं वाटलं. घाण करणारे, स्त्रीयांच्या अंगचटीला जाणारे विकृत प्रवासी पाहिले की खूप राग येतो. दंगल बंद मध्ये एसटीलाच टार्गेट केले जाते. वर काही प्रवासी चालक पन्नास साठने चालत असला तर काय बैलगाडी चालवतोय का असे शेरे मारतात.‌
शेवटी कंडक्टर, ड्रायव्हर यांच्यावर सत्तर टक्के मदार असलेल्या महामंडळात यांना सुविधा, पगार फार कमी असतात.

Pages