महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेस सुखाचा प्रवास घडवणारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहनची बस अर्थात आपली एस.टी. १ जुन ला ७१ वर्षांची होत आहे. गेल्या ७१ वर्षांत काळानुरुप रुपडे बदललेल्या पण सामान्य जनतेच्या प्रवासाच्या आकांक्षा आपल्या परीने पुर्ण करणार्या राज्य मार्ग परिवहन महामंडळास खुप खुप शुभेच्छा..!!
शेजारच्या गावात हॉस्पिटलमधे जन्मल्यानंतर २ दिवसांनी मला पहिल्यांदा घरी आणले ते एस.टी.ने. त्यामुळे एसटीशी आपोआप नाळ जुळली . माझ्या लहानपणी अगदी श्रीमंत लोकांकडे असलेली एखाद-दुसरी फियाट पद्मिनी नाहीतर अँबॅसिडर कार किंवा बुलेट-स्कूटर सोडली तर एस.टी. शिवाय कोणतेही प्रवासी वाहन रस्त्यावर दिसायचे नाही. गावातील एस.टी. स्टँडवर आलेल्या एस.टी. बसमधे उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवासाला जाण्याचे सुख काय असते ते मी पुरेपुर उपभोगले आहे.
जन्माला आल्यापासुन प्रवासाची आवड निर्माण करणार्या एसटीने मला आजवर अगदी लाखो किलोमिटर फिरवले. प्रवासासाठी आता भरपुर पर्याय उपलब्ध असतानाही एसटीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. संधी मिळेल तेव्हा मी एसटीने प्रवास करण्यास अतिशय उत्साही असतो.
आज एसटी खरेच लोकाभिमुख झालेली दिसते. एसटीची सर्वसाधारण बस (लाल बस) आता सफेद-लाल रंगाच्या बस मधे परावर्तित झाली आहे आणि तीत आरामदायी सिट्स आल्या आहेत. हिरव्या-पांढर्या रंगाच्या निमआराम बसमधे आता पुशबॅक सिट्स आहेत. शिवनेरी आणि मल्टीअॅक्सल अश्वमेध सारख्या अत्यंत आरामदायी वातानुकुलीत बसेस पुणे-मुंबई रुटवर प्रवासी खेचण्यात आजही प्रतिष्ठेचे स्थान टिकवुन आहेत. राज्यातील कानाकोपर्यात माफक दरात वातानुकुलीत प्रवास घडवणार्या शिवशाही बसेस अल्पावधीत लोकप्रिय झाल्या आहेत.
काळानुरुप कात टाकणार्या एसटीने गेल्या ७१ वर्षात अमुलाग्र बदल घडवुन आपली घोडदौड सुरुच ठेवली आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा..!!
साधीबस (लाल बस)^
अपग्रेडेड साधीबस^
निमाअराम बस^
शिवनेरी बस^
अश्वमेध बस^
शिवशाही
एस.टी. चा लोगो
एस.टी. आणि उलटी यांचा
एस.टी आणि उलटी याचा अतूट संबंध आहे. Happy
Submitted by अंजली_१२ on 7 June, 2019 - 13:06>>
एस.टी. आणि उलटी यांचा काहीअंशी संबंध असु शकतो.. अगदीच नाही म्हणु शकत नाही. पण निदान मलातरी एस.टी.च्या कोणत्याही प्रकारच्या बस मधे आजवर एकदाही उलटी झाली नाही याला माझे एस.टी.वरील प्रेम कारणीभुत असु शकते..!
एक गोष्ट सांगु शकतो की ज्या लोकांना प्रवास करणे मनापासुन आवडते त्यांना कधिही उलटी होत नाही.
निरिक्षणाअंती हेही सांगतो की १५ वर्षांपुर्वी एस.टी. मधे उलटी करणार्यांची जेवढी संख्या होती ती आता ९९% कमी झाली आहे. आता एस.टी.ने कोणत्याही रुट वर कधिही प्रवास करा 'वकील' लोक अपवादानेच सापडतात. सद्द्य घडीला एस.टी.तील 'वकिलां'चे प्रमाण ०.००१% असावे असे मला वाटते.
उलटी करणार्याचे प्रमाणसुद्धा
उलटी करणार्याची मोजणी होते?? हे मला ठाऊकच नव्हतं.

हल्ली कुठेही प्रवास करताना एस
हल्ली कुठेही प्रवास करताना एस.टी. बस मधे जेवढे प्रवासी आहेत त्यतिल एकही उलटी करताना दिसत नाही.
एस.टी. प्रवासामध्ये
एस.टी. प्रवासामध्ये अनुभवलेल्या एका अपघाताबद्दल आठवले. एका रात्री पुण्याहून मुंबईला परतत होतो. मी विंडो सीट ला बसलो होतो आणि बाहेरच बघत होतो. तेव्हा एका कारला पाठून येणाऱ्या ट्रॅक ने जोरात धडक दिली आणि ती कार जोरात पुढे ढकलली गेली. कार च्या पुढे असलेल्या टेम्पोने कारची धडक वाचविण्यासाठी अर्जंट राईट टर्न घेतला आणि तो टेम्पो आमच्या एस.टी. च्या दारावर आदळला. एस.टी. चा बॅलन्स गेला होता पण ड्रायव्हरने मोठ्या शिताफीने गाडी दोन्ही रस्त्यांच्या मधील गॅपमध्ये घातली आणि थांबवली आणि आम्ही वाचलो. एस. टी. चा दरवाजा उघडत नव्हता म्हणून आम्ही ड्राईवरकडील दरवाज्याने उतरलो. टेम्पोमधील दोघांच्या डोक्याला जबर मार लागला होता. त्यांना पाठून येणाऱ्या एका कारमधून पुढे पाठवले आणि आम्हा सगळ्यांना पाठून आलेल्या एस.टी. ने पुढच्या प्रवासाला पाठवले. ड्राइवर आणि कंडक्टर तिथेच थांबलेले. पुढच्या आठवड्यात परत त्या एस.टी. ने जाताना कळले कि ते सकाळी एकदम उशिरा घरी गेले होते.
अबुवा यांच्या लेखातला
अबुवा यांच्या लेखातला खिडकीतून रूमाल टाकण्याचा प्रसंग वाचून हा किस्सा आठवला.
वीसेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी तेव्हा पुण्यात रहात होते आणि एका हौशी संस्थेत बऱ्यापैकी active होते. साताऱ्याला आमच्या संस्थेने एक कार्यशाळा आयोजित केली होती आणि त्यासाठी पुण्याहून संस्थेतले एक काका आणि त्यांना मदत करायला म्हणून मी, असे दोघे गेलो होतो. १५ ऑगस्टचा दिवस होता. स्वारगेटहून पुणे-सातारा विना वाहक विना थांबा गाड्या असायच्या त्यातून गेलो होतो आणि येतानाही तशाच गाडीने येणार होतो. दिवसभर तिथला कार्यक्रम छान पार पडला. साताऱ्याला १५ ऑगस्टला जिकडेतिकडे जिलब्या विकायला असतात, आम्हीही खाल्ल्या, कंदी पेढे वगैरे घेतले आणि एसटी स्टँडवर आलो. तिथे समजलं की खंबाटकी घाटात अपघात झाला आहे आणि त्यामुळे पुण्याहून येणाऱ्या विना वाहक गाड्या येऊ शकत नाहीयेत. त्यामुळे इथूनही पुण्याला जायला गाड्या नाहीत. किती वेळ लागेल ते काही सांगता येत नव्हतं. रात्र झाली. गर्दी वाढत वाढत गेली. खूप उशिराने पुण्याला जाणारी एक एसटी आली. ती साताऱ्याजवळच्या कुठल्या तरी गावाहून सुटणारी होती. जवळजवळ पूर्ण रिकामी होती. साहजिकच इथे रांग लावून थांबलेले आम्ही सगळे तिकडे धावलो. काकांनी सगळ्यांच्या पुढे नंबर पटकावला. तेवढ्यात एका चौकोनी कुटुंबातल्या वडिलांनी एका खिडकीतून सीटवर रूमाल टाकला. खेचाखेच करून प्रवासी गाडीत चढले. आम्हाला तर सीट मिळाली. पण तो रूमाल आमच्या पुढच्या सीटवर होता आणि एका माणसाने हुशारीने तो रूमाल सीटखाली टाकला आणि तो, त्याची बायको आणि छोटी मुलगी असे त्या सीटवर बसले. चौकोनी कुटुंब गाडीत तर चढलं, पण त्यांना रूमाल काही दिसेना. आधी वडील शोधून गेले, मग दोन्ही मुली, ज्या कॉलेजच्या वयाच्या असाव्यात, त्या शोधून गेल्या. पण त्यांना रूमाल दिसेना आणि कुठल्या सीटवर टाकला होता तेही आठवेना. शेवटी परत बाहेर जाऊन त्यांनी आठवून आठवून बरोबर सीट शोधली आणि खिडकीतून या माणसाला विचारलं की रूमाल होता का सीटवर? आता तुम्हाला बसायचंय तर बसा, पण रूमाल तरी परत द्या!
हा माणूस अजिबात मान्य करायला तयार नव्हता. शेवटी चौकोनी कुटुंबातली आई जातीने वर आली आणि तिने स्वतः रूमाल शोधला. मग तिने खोटं बोलल्याबद्दल त्या माणसाची व्यवस्थित कानउघाडणी केली. जाता जाता छोट्या मुलीकडे बघून तिने 'चांगले संस्कार करताय मुलीवर' असा शेवटचा टोमणा मारला!
ST च्या वाहक आणि चालक दादांना
ST च्या वाहक आणि चालक दादांना/ताईंना नमस्कार !! कठीण परिस्थितीत खूप संयम ठेवून काम करतात..
Pages