ऋतु- एक मित्र - सुमित्रा भावे

Submitted by चिनूक्स on 31 May, 2019 - 10:19

ऋतुपर्ण घोष यांच्या निधनाला काल सहा वर्षं पूर्ण झाली. उन्नीशे एप्रिल, तितली, बाडीवाली, नौकाडुबी, दहन, शुभो मुहूरत, अंतर्महाल, खेला, चित्रांगदा असे एकापेक्षा एक सरस चित्रपट निर्मिणारा हा एक थोर कलावंत होता.

सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्याशी त्यांचा दाट स्नेह होता.

ऋतुपर्ण घोष यांच्या अकाली निधनानंतर सहा महिन्यांनी सुमित्रा भावे यांनी एका दिवाळी अंकासाठी जो लेख लिहिला होता, तो इथे पुनर्प्रकाशित करत आहे.

***

तशी बरीच वर्षं झाली आता...जवळजवळ वीस वर्षं. आमचा मित्र ऋतु हा भारतातला, किंबहुना जगातला एक नाणावलेला चित्रपट-दिग्दर्शक ऋतुपर्ण घोष म्हणून प्रसिद्ध होण्यापूर्वीची ही गोष्ट.

१९९३मध्ये उदयपूरला आंतरराष्ट्रीय बालचित्रपट महोत्सव भरला होता. त्यात आमचा - मी व सुनील सुकथनकरनं - तयार केलेला 'चाकोरी' हा लघुपट होता. स्पर्धा-विभागामध्ये. आम्हां दिग्दर्शकांची सोय एका हॉटेलात होती, तर आमच्याबरोबर असणारे तीन कलाकार - रेणुका दफ्तरदार, अमृता सुभाष आणि सिद्धार्थ दफ्तरदार हे इतर बालकलाकारांबरोबर राहत होते. या दोघीजणी तेव्हा फार लहान नसल्या तरी जेमतेम शाळा संपवलेल्या होत्या. त्यामुळे आम्हां मोठ्या मंडळींचं काय चाललंय ते बघायची त्यांना उत्सुकता असायची. ही तिघं मुलं त्यांची राहण्याची सोय लागताच आमच्या हॉटेलवर आम्हाला भेटायला आली आणि माझ्या शेजारच्या खोलीत राहणार्‍या एका तरूण दिग्दर्शकाला पाहून अचंबितच झाली. जवळजवळ सुनीलच्याच वयाचा हा तरुण त्याची पहिली फीचर फिल्म घेऊन आला होता. बंगाली बालचित्रपट - 'हीरेर आंगठी'. या तरुणाकडे पाहून त्यांना आश्चर्य वाटण्याचं कारण म्हणजे त्याचे ’बायकी ’ म्हणता येतील असे हावभाव. जीन्स-टीशर्टमध्येदेखील जाणवणारी त्याची स्त्री-सदृश वागण्याची धाटणी. 'गे' असणं तेव्हा इतकं रूढ अर्थानं सर्वांच्या पचनी पडलं नव्हतं - म्हणजे आजच्या इतकंही! त्यामुळे ऋतुचं व्यक्तिमत्त्व हे त्याला स्वतःलाही त्यावेळी चांगलंच संकोचवणारं होतं. त्या पुरुषी जगात कदाचित त्याला माझ्याशीच मोकळं होणं सहज वाटलं की काय कोण जाणे...पण पहिल्या भेटीतच आमची दोस्ती झाली. असं जाणवलं की ही ’दोस्ती’ आहे...संकोचाचे किंवा व्यावहारिक अंतराचे पडदे मध्ये उरले नाहीत.

दररोज सतत गप्पा सुरू झाल्या. तो ऊठसूठ माझ्या खोलीत यायचा. पाय पसरून जमिनीवर बसून मोकळ्याढाकळ्या गप्पा सुरू करायचा. त्याच्या खोलीत त्याचं मनच लागायचं नाही.. अस्वस्थ चित्तच होता तो ! बोलता बोलता जाणवलं - गेली अनेक वर्षं जाहिरातक्षेत्रात भरपूर आणि नवं म्हणून नावाजलं गेलेलं काम केलेला तो अनुभवी दिग्दर्शक आहे, फीचर फिल्म मात्र त्याची पहिलीच. त्यामुळे त्याबद्दल तो खूप साशंक होता! पण बंगालमधल्या अपर्णा सेन, मुनमून सेन, देबश्री रॉ,, इतकंच काय पण आमच्या महोत्सवाच्या संचालक जया (भादुडी) बच्चन यादेखील त्याच्या ताया नाहीतर मावश्या होत्या...म्हणजे मानलेल्या! बंगालच्या अश्या ’एलिट’ - भद्रलोकांपैकी असणारा तो एक संवेदनशील तरूण दिग्दर्शक (होऊ घातलेला) होता. सुनील आणि मी तेव्हा फीचर फिल्म बनवण्याच्या विचारातही नव्हतो. लघुचित्रपट किंवा डॉक्युमेंटरी-दिग्दर्शक म्हणून आमची त्या वर्तुळात होणारी नवी ओळखही आम्हांला अजून सवयीची व्हायची होती. त्याला पहिल्या भेटीतच मी म्हंटलं, 'ऋतुपर्ण हे तुझं नाव फार छान आहे.’ तो म्हणाला, 'ते ठीक आहे...पण एवढं मोठ्ठं फॉर्मल नाव घेण्याची गरज नाही. मला ऋतुच म्हण.’ तेव्हापासून तो ’ऋतु’ झाला. ऋतुशी आमचं छान जमून गेलं.

पहिल्याच दिवशी संध्याकाळी, उद्घाटनाच्या समारंभासाठी आम्ही सगळे तयार होऊन आपापल्या खोल्यांच्या बाहेर आलो. ऋतु, मुलीचा वाटावा अश्या रंगाचा सलवार-कुडता घालून (किंचित जास्त लांब असा) आणि त्यावर नक्षीकाम केलेली सुंदर लांब ओढणी घेऊन आला. सुनीलला त्यानं थोडं संकोचत विचारलं, 'कसा आहे माझा पोषाख? तुला काय वाटतं, पुरुषानं असा पोषाख करूच नये का?’ सुनीलनं त्याला सहज उत्तर दिलं, 'ज्याला जो पोषाख आवडतो त्यानं तो जरूर घालावा...त्यात ’असं करावं की नाही’ हा प्रश्नच येत नाही..!’ ऋतुचं त्या उत्तरानं समाधान झालंसं वाटलं. तेव्हातरी त्याच्या मनात हे सारे संदेह होते हे नक्की. पुढे त्यानं अधिकच धिटाईनं वस्त्रांवर, इतकंच काय शरीरावरही अनेक प्रयोग करून पाहिले. स्त्री-पुरुष भेदामुळे आपण नेमकं वागायचंय कसं, याचे त्याच्या मनातले गोंधळ तो अधिकाधिक सुस्पष्ट करत गेला, मान्य करत गेला की वाढवत गेका, हे आजही कळलंयसं वाटत नाही.

'चाकोरी' आम्ही सर्वांनी एकत्रच पाहिली. ऋतु, भूपेन हजारिका, गोपी देसाई, ए. के. बीर अशी अनेक मंडळी प्रेक्षकांत होती.परीक्षकांमध्ये शेखर कपूर - परीक्षक प्रमुख होते तर सुहासिनी (रत्नम) याही एक परीक्षक होत्या. त्यामुळे प्रतिसादाची खूप उत्सुकता होती. प्रेक्षकांचा 'चाकोरी'ला उत्तम प्रतिसाद मिळाला. इतका की NFDCचे तेव्हाचे संचालक रवी गुप्ता यांनी आम्हांला फीचर फिल्म बनवण्याची एकप्रकारे ऑफरच दिली. या सगळ्या अनुभवाचा ऋतु जवळून साक्षीदार होता. आमच्या आनंदात सहभागी होता होता, आणि दुसरीकडे ’हीरेर आंगठी’च्या खूपच चिंतेत होता. आम्हां सर्वांना त्याची फिल्म पाहण्यापासून परावृत्त करत होता. शेवटी आम्ही सर्वांनी 'हीरेर आंगठी’ पहिली! त्याची भीती सार्थ होती...! कारण कुणालाच ती फार मनाला आली नाही.

रात्री हॉटेलवर सर्वजण जमले. ऋतुला काय दुर्बुद्धी झाली कोण जाणे - त्यानं सर्वांना प्रेमानं विचारलं, 'मोकळेपणानं सांगा - माझी फिल्म कशी वाटली?’ सर्वांनी त्याची विनंती जरा जास्तच 'सिरियसली’ घेतली. सर्वजण त्या फिल्म वर जे काही तुटून पडले... मी मनात म्हटलं - हा मुलगा आता आयुष्यात फीचर फिल्म बनवायचा नाही...सर्वांनी जणू सूड काढल्यासारखं त्याच्या फिल्मला वाईट म्हटलं! त्या फिल्ममधलं थोडंफार बरं वाटलेलं मी त्याला सांगायचा प्रयत्न केला, त्यानंही त्याला फार उपकृत वाटलं! आज वाटतंय, सर्वांच्या अंगात त्या दिवशी असा कुठला राक्षस घुसला होता ज्याला ऋतुला इतकं दुखवावंसं वाटलं? गेली अनेक वर्षं आम्हां सर्वांमध्ये तो एक परवलीचा प्रसंग होऊन बसला होता. कोणीही दिग्दशकानं आपली फिल्म समीक्षकांच्या तोंडी देणं म्हणजे 'हीरेर आंगठी’ करणं, असंच आम्ही म्हणतो! कलावंतानं नम्र असावं, व्हल्नरेबल असावं, पण याचा अर्थ इतरांनी असा काढू नये की, सर्वांनी धरून त्याला धोपटून काढावं. ऋतु त्या दिवशी बहुधा मोठंच शहाणपण शिकला असावा.

आणि मग इतरांपासून फटकून आमची तिघांची वेगळी मेहेफिल जमायला लागली. तेव्हा जाणवलं त्याच्या आत किती गोष्टींचा खजिना होता ते...
माझ्या मनात तेव्हा ’दोघी’ची कथा जन्म घ्यायला लागली होती. कोण जाणे खरंच फीचर फिल्म करू, न करू, पण मनात गोष्ट तयार करायला तर पैसे पडत नाहीत ना, अश्या उमेदीनं मी ती गोष्ट मनात तयार करू लागले होते. जणू काही ती फिल्म तयार झालीच आहे, अश्या पद्धतीनं ऋतुला ती वर्णन करून सांगत होते. त्याच्या मनात सुप्रसिद्ध कलावंत आई आणि तिची निराश मुलगी अशी एक कथा जन्म घेत होती! एका सुस्वरूप अभिनेत्री आईची आणि रूपानं तिच्यापेक्षा कमी सुंदर असणार्‍या मुलीची आणि आईच्या मित्राची गोष्ट तयार होत होती. सध्याच्या स्पर्धेच्या युगात आम्ही दोघंही एकमेकांना आमच्या आगामी चित्रपटांची कथानकं शॉट बाय शॉट ऐकवत होत. आज याची गम्मत वाटतेय, पण आपल्या कल्पना दुसरं माणूस चोरणार तर नाही ना, अशी भीती मनाला स्पर्शही करून गेली नाही.

महोत्सवाचा शेवट जवळ आला. स्पर्धा-विभागातल्या मंडळींमध्ये एक टेन्शन तयार होऊ लागलं होतं. भूपेनदा जाता जाता आमच्या टीमला म्हणाले, 'तुम्ही तयारीत आहात ना...?’ संयोजकांकडून निरोप आला, 'तुमची बसायची व्यवस्था वेगळीकडे केली आहे.’ आमच्यापेक्षा ऋतुच जास्त एक्सायटेड होता! म्हणाला, 'मला अंदाज आलाय, तुम्हाला नक्कीच काहीतरी पुरस्कार आहे, मला काही नाहीये. मी संध्याकाळच्या ट्रेनचं बुकिंगही केलंय. तुम्ही पुरस्कार घ्याल तेव्हा मी ट्रेनमधूनच टाळ्या वाजवीन!’ त्या दिवशी 'चाकोरी'ला परीक्षकांचा विशेष पुरस्कार मिळाला, तेव्हा आम्हां सर्वांनाच त्या क्षणी ऋतुची आठवण आल्यावाचून राहिली नाही. त्याच्यात आणि आमच्यात झालेली ती भाबडी शाब्दिक देवाणघेवाण आज मागे वळून पहाताना जिवाला चटका लाऊन जाते आहे.

त्या दिवशी दुपारी तो माझ्या खोलीत येऊन बसला तो जाईचना... त्याचा पाय निघेना. पोरकटपणे, तुम्ही आता जाणार, असा रुसका चेहरा करून बसला. आधीचे तीन दिवस आम्ही एकत्र (आपापल्या आर्थिक परिस्थितींप्रमाणे - म्हणजे त्यानं खूप, मी नेमकं पण मोजकं) अश्या खरेद्या केल्या होत्या. तिथल्या संस्कृतीमधलं नेमकं काय शोधून बरोबर न्यायचं, अशी ओढ आम्ही एकमेकांना बोलूनही दाखवली होती. त्यानं निरनिराळ्या प्रकारचे लाकडी घोडे विकत घेतले होते. त्यांची पॅकेट्स खूपच झाली होती!

त्या दिवशी तो म्हणाला, 'बघता बघता इतकं सामान तयार करून बसलोय...आता बॅग कशी भरायची? यू नो, सुमित्रा, कायम माझी आई मला बॅग भरून देते, त्यामुळे मला बॅग स्वतःला भरताच येत नाही! तू मदत करशील का?’ आणि खरंच त्यानं सगळं सामान उचलून माझ्या खोलीत आणलं आणि मी चक्क त्याला त्याची बॅग भरून दिली. त्याचं ते बॅग आपल्या आपण न भरणार्‍या मुलाचं रूप हे लाडावलेल्या पुरुषाचं नव्हतं. त्यात एक एकटा पोरकेपणा होता. गोडवा होता. त्याचे लाड करायला प्रवृत्त करणारा असा. त्या सगळ्या मुक्कामात जाणवली ती त्याची तीक्ष्ण बुद्धिमत्ता, तिरकस विनोदबुद्धी आणि निर्मितीचा झपाटा आणि उत्साह. आणि त्याचबरोबर चिंतेची वाटणारी गोष्ट होती, ती म्हणजे पुरुषी जगात त्याचं मिसफिट असणं.

आज गंमत वाटते आहे - नंतर एकदोन वर्षांत आमची ’ती’ कथानकं फळाला आली. 'दोघी’ तयार झाला, ऋतुचा पहिल्या कथेवरचा 'उन्निशे एप्रिल’ही तयार झाला. नंतर काही वर्षांनी दुसर्‍या कथेवरचा ’तितली’देखील तयार झाला! ’उन्निशे एप्रिल’ला राष्ट्रपतींचं सुवर्णपदक मिळालं आणि तो लाजरा मुलगा बंगालचा 'इंटलेक्चुअल स्टार’ झाला! 'उन्निशे एप्रिल’ चित्रपटगृहातही खूप चालला आणि 'हीरेर आंगठी'साठी मान खाली घालणारा ऋतु स्वाभिमानानं ताठ झाला.

पुन्हा आमची महोत्सवामध्ये गाठ पडली ती 'फीचर फिल्म दिग्दर्शक' या नात्यानं. 'दोघी' त्याला खूप आवडला. उदयपूरला भेटलेली 'चाकोरी'मधली लहान रेणुका 'दोघी'मध्ये प्रगल्भ भूमिकेत पाहताना ऋतुला प्रेमाचं भरतं आलं. ’उन्निशे एप्रिल’ पाहून बाहेर पडल्यावर तो लहान मुलाच्या उत्साहानं म्हणाला, ’ते उदयपूरचे लाकडी घोडे पहिलेस ना फिल्ममध्ये?’ आपल्या चित्रपटांमधल्या कलादिग्दर्शानामधला हा उत्साह हाही त्याच्या आणि माझ्या दोस्तीतला एक महत्त्वाचा दुवा होता. 'उन्निशे एप्रिल'मध्ये आई- मुलीच्या नात्याचं नाट्य रंगवताना ऋतुनं मेलोड्रामाचा आश्रय घेतला नव्हता, तर व्यक्तिरेखानिर्मितीमधल्या नेमकेपणातून, तपशिलांमधून सूक्ष्म नात्याची निर्मिती साधली होती. हे सादरीकरणामधलं ’सोफेस्टिकेशन’ पुढे त्याचं वैशिष्ट्य होत गेलं. सेलिब्रिटी गायिका आई - अपर्णा सेन आणि आत्महत्येच्या उंबरठ्यावरची तिची मुलगी - देबश्री रॉय या व्यक्तिरेखांमधून आई-मुलीमधलं स्पर्धात्मक आणि तरीही अतूट, घट्ट नातं असं चमत्कारिक स्वरूप ऋतुनं आई आणि मुलगी या दोन्ही स्त्रियांशी तादात्म्य पावून लिहिलं आणि दिग्दर्शित केलं होतं.

त्याच्या संहितालेखनामध्ये, वेशभूषा, कला यांच्या तपशिलांकडे बघण्याच्या पद्धतीमध्येच एक बाईची नजर होती. याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्याची ’दहन’ ही फिल्म. ही त्याची मला सर्वाधिक आवडलेली फिल्म. एका मोलेस्ट होत असलेल्या बाईच्या मदतीला जाणारी दुसरी स्त्री आणि त्या प्रसंगानंतर त्या दोन्ही स्त्रियांचं त्यांच्या त्यांच्या आयुष्यातल्या पुरुषांबरोबरचं कायमचं दुरावलं जाणारं नातं - हा ’दहन’चा विषय. मी फिल्म पाहून बाहेर येताच त्याला म्हटलं, 'ही फिल्म तू का केलीस? ही मी करायला हवी होती...!’ या चित्रपटातले त्या दोनही स्त्रियांच्या जगण्याचे असंख्य तपशील हे फक्त एखाद्या स्त्रीलाच समजू शकतील असे होते. स्त्रीच्या मनोवृत्तीतून विचार करत करतच जणू ती फिल्म लिहिलेली होती. मोलेस्ट करणार्‍या बड्या घरच्या तरुणाशी जिचं लग्न होणार आहे ती तरुणी असो, जिच्यावर तो प्रसंग गुदरला होता ती संसारी स्त्री असो, तिचा मध्यमवर्गीय, सारवासारवीचं धोरण बाळगून अरेरावी करणारा नवरा असो, मदतीला गेलेल्या आणि त्यामुळे सेलिब्रिटी झालेल्या उच्चवर्गीय, विचारी स्त्रीची तिच्या होणार्‍या नवर्‍याबरोबर होत जाणारी फारकत असो, किंवा या सार्‍यांतून धीट निग्रहाचा आणि स्वाभिमानी एकटेपणाचा मार्ग दाखवणारी आजी असो.या सगळ्या व्यक्तिरेखा एका समजूतदार, प्रगल्भ स्त्रीवादी संवेदनशील मनाच्याच अविष्कानाच्या, यात तीळमात्रही संशय नाही.

हळूहळू बंगाली किंवा इतरही समीक्षकांनी त्याला सत्यजीत राय यांचा वारसदार ठरवलं. त्याच्या चित्रपटांचं मध्यमवर्गीय, उच्चवर्गीय वातावरण, हाताळणीचं ’सोफेस्टिकेशन’, टागोरांच्या अनेक कवितांचा त्यानं केलेला वापर, 'नौकाडूबी', 'चोखेर बाली' यांसारख्या टागोरांच्या कथा-कादंबर्‍यांवर आधारित त्यानं चित्रपट बनवणं या सार्‍यांमुळे त्याला हा सन्मान बहाल केला गेला असेल. पण माझ्या मते त्याची संवेदनशीलता वेगळ्या धाटणीची होती. तो त्याच्यातल्या स्त्रीचा शोध घेत राहिल्यामुळे त्याच्या स्त्री-व्यक्तिरेखा अधिक सशक्त (व्यक्तिरेखा या नात्यानं) आणि त्याच वेळी व्यक्ती म्हणून व्हल्नरेबल, अस्वस्थ, सुखदुःखाच्या असोशीमध्ये तडफडणार्‍या आहेत. त्यांना खर्‍याखुर्‍या गुणावगुणांचं बनवणं, तथाकथित सुपरवूमन न बनवणं, यात त्याची स्त्रीमनाची समजूत दिसते.

प्रत्येक महोत्सवात भेटून आगामी चित्रपटांची कथाबीजं एकमेकांना सांगण्याची परंपरा आम्ही नंतरही काही वर्षं पाळली. माझ्या मनातलं ’वास्तुपुरुष’चं कथानक त्याच्याशी शेअर केल्याचं आठवतंय. तसं त्यानं ’बाडीवाली’च्या कथानकाविषयी चर्चा केली होती. आपण चित्रपटकर्ते माणसं, वास्तू, प्रसंग कसे वापरून फेकून देण्याचा दुष्टपणा (कधीकधी नकळतसुद्धा) करतो हे एका विधवा, एकट्या वाडा-मालकिणीच्या कथेतून त्याला सांगायचं होतं. त्या कथेमधल्या दिग्दर्शकाची किंवा सह-दिग्दर्शकाची भूमिका तू करशील का, असं त्यानं सुनीलला विचारलंही होतं! अर्थात पुढे तसं घडलं नाही. त्या विधवा मालकिणीनं छोट्या भूमिकेपुरतं शूटिंगध्ये सुवासिनी होणं, नकळत त्या दिग्दर्शकाला आयुष्यात अचानक आलेला पुरुष या नात्यानं अनन्यसाधारण महत्त्व देणं, सह-दिग्दर्शकानं असहायपणे तिची ही तडफड पहाणं, या सगळ्या अनुभवातून त्या स्त्रीनं आयुष्याकडे पुन्हा एका रुक्ष कडवटपणानं पाहू लागणं...हा सगळाच प्रवास आपल्याला अंतर्मुख करणारा आहे. या चित्रपटातून ऋतु वास्तव आणि अति-वास्तव या दोन थरांच्या मांडणीचा वापर करत करत एका व्यामिश्रतेपर्यंत पोचला आहे. हे मांडणीचं सिनेमॅटिक कौशल्य त्यानं नंतरच्याही अनेक कलाकृतींमध्ये साध्य केलं आहे.

’बाडीवाली’सारखा अंतर्मुख करणारा चित्रपट त्यानं आपल्याला दिला, पण त्याचबरोबर त्याच्या ’उत्सब’ किंवा ’तितली’सारख्या चित्रपटांमध्ये त्याचे ठोकताळे रूढ होत चाललेत का आणि त्यांतून हे चित्रपट साचेबंद होत चाललेत का, असंही वाटलं. अशी टीका तो ऐकूनही घेत असे. काही वेळेला ’आत्ता या झपाट्यात मला असंच सुचलं’, असं म्हणून सुटका करून घेत असे. ’रेनकोट’सारख्या हिन्दी म्हणून आणि अजय देवगण-ऐश्वर्या राय यांच्यामुळे गाजलेल्या चित्रपटाला तर थोडासा वायफळ-वैचारिकतेचा वासही येत होता. पण त्यावर भांडायला तो सापडला नाही! ’तितली’बद्दल वाद घालताना मी त्याला म्हटलं, ’तुझ्या चित्रपटांमध्ये सुद्धा गोडगोड स्त्री-व्यक्तिरेखा का दिसू लागल्यायत?’ तो हसून म्हणाला,’ या नट्या तसं करतात कधीकधी! आणि प्रोजेक्ट यशस्वी करण्यासाठी त्यांना घ्यावंही लागतं ना..!’ हे त्याचं स्पष्टीकरण फारसं पटणारं नव्हतं. कारण खरोखर बंगाली दिग्दर्शक या नात्यानं तो निश्चितच सुदैवी होता आणि हव्या त्या कलात्मकतेचा मार्ग निवडू देणारे निर्माते त्याला त्याच्या भाषेत उपलब्ध होत होते.

त्याच्या चित्रपटांमधल्या या थोड्या वेगळ्या स्त्री-प्रतिमांचं रहस्य त्याच्या ’गे’पणात असावं, असं मला वाटतं. अश्या पुरुषाला स्त्री-मन समजतं हे जसं खरं, तसं स्त्री ही त्याची शत्रूही वाटत असावी! त्यामुळे दुप्पट जोमानं स्त्रीची साचेबद्ध प्रतिमाही त्याच्या हातून मांडली जात असावी. अगदी साचेबंद पुरुषाला आवडेल अशी. त्यामुळे त्याच्या नायिका सेन्शुअस पद्धतीनं मांडण्याच हव्यासही त्यानं कधी केला, तर कधी प्रखर प्रामाणिकपणे स्त्रीची वेगळी वास्तववादी म्हणता येईल अशी प्रतिमाही रंगवली. तो स्वतः एक रोमॅंटिक असल्यामुळे या व्यक्तिरेखा रंगवण्याच्या धाटणीमध्ये एक धीट अलंकरणाचाही भाग असत आला आहे. या सगळ्यासहित तो झपाट्यानं चित्रपट बनवत राहिला. त्याच्या पद्धतीचा सिनेमा पुन्हा पुन्हा समोर मांडतच राहिला. राष्ट्रीय पुरस्कारांच्या परीक्षकमंडळावर मी असताना त्याचा ’असुख’ पाहिला. ’असुख’सारख्या चित्रपटातून शौमित्र चटर्जींना घेऊन बापमुलीच्या नात्याची सौम्य, साधी कथा त्यानं संगितली. मध्यमवयीन अभिनेत्री मुलीच्या मनातला वडलांविषयीचा संदेह, एड्ससारख्या अनपेक्षित मुद्द्याला केलेला स्पर्श, तिची स्वतःविषयीची तुटलेपणाची भावना अश्या वेगळ्या रस्त्यानं ’असुख’ जात राहतो. यात पुन्हा नेहमीचा ऋतु भेटल्यासारखं वाटलं.

अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, बिपाशा बासू अश्या हिन्दीमधल्या स्टार्सना घेऊनही त्यानं चित्रपट केले. ते सगळे पाहण्यात आले नाहीत. ’द लास्ट लिअर’ टीव्हीवरच पाहिला. पण तो चित्रपट काही तितका मनाला आला नाही. काही वेळा लेखक-दिग्दर्शक आपल्याला जाणवलेल्या जीवन-नाट्यात कलावंत म्हणून स्वतःच अडकत जातो की काय, असाही प्रश्न हे त्याचे पुढचे चित्रपट पाहताना पडत गेला. मग ते त्याच्या आशयाचं नाट्य असो की अभिव्यक्तीचा विलास असो.

गेल्या वर्षी आमची ’संहिता’ ही फिल्म आणि त्याची ’ चित्रांगदा’ ही फिल्म बर्‍याच महोत्सवांमध्ये एकत्र होती. पण दुर्दैवानं शेड्यूल्स अशी लागत गेली की महोत्सवाच्या पूर्वार्धात किंवा उत्तरार्धात आमच्या या दोन्ही चित्रपटांचा लपंडाव चालू राहिला. त्यामुळे ती फिल्म पाहायची राहून गेली आणि त्याची भेटही... एका चित्रपट-दिग्दर्शिकेची गोष्ट संगणारी आणि संहितालेखनाच्या प्रक्रियेतून जन्माला येणारी ’संहिता’ त्याला दाखवण्याची मनापासून इच्छा होती. त्याचप्रमाणे ऋतुनं लेखन-दिग्दर्शनाबरोबरच स्वतः अभिनय केलेली ’ चित्रांगदा’ पाहण्याचीही खूपच उत्कंठा होती. पण जमलंच नाही. दरम्यान, त्यानं केलेलं सेक्स चेंजचं ऑपरेशन, त्यानं ब्रेस्ट्स वाढवण्यासाठी हार्मोन्स घेणं, त्याचे पूर्ण स्त्री-वेषातले फोटो, तो जाहिरातक्षेत्र, टीव्ही आणि फॅशनच्या दुनियेला गॉसिप करण्याजोगा वाटणं, त्याच्या आईचं निवर्तणं...तो एकाकी होत चालला असेल का याची चिंता...या सगळ्या पार्श्वभूमीवर धाडकन आली त्याच्या निधनाची बातमी...This is not fair...! You can't do this to all of us...!असं वाटलं!!

ऋतुला प्रत्यक्ष भेटणं आता अशक्य होतं, पण ’ चित्रांगदा’ पाहणं निदान शक्य होतं.

’चित्रांगदा’पाहिली आणि ऋतुचा अंत अतीच नाट्यपूर्ण वाटायला लागला.

चित्रांगदा ही बापानं मुलासारखी वाढवलेली मणिपुरी राजकन्या. अर्जुनाला पाहताच आपल्यातल्या स्त्रीचा साक्षात्कार होणारी. यावर नृत्यनाट्य बसवणारा प्रथितयश नर्तक (स्वतः ऋतुनं ही भूमिका फार सुंदर केली आहे) आणि त्याचा ड्रग-अडिक्ट ड्रमर मित्र - टागोरांनी रंगवलेलं चित्रांगदेचं नृत्यनाट्य बसवता बसवता स्वतःच्या प्रेमाचा शोध घेत आपल्या प्रियकरासाठी स्त्री होऊ पाहणारा हा नायक (किंवा नायिकाही)...त्या नात्याची पुरुषी ओढाताण करणारा तो मित्र, आपल्या मुलाची फरफट पाहणारी आई, हताश झालेले तरीही शेवटी प्रेमानं मुलाच्या सुखापुढे आपली सामाजिकता विसरणारे वडील, नायकाला स्त्री होण्याचं ऑपरेशन करण्यापूर्वी समुपदेशन करणारा एक तज्ज्ञ अशी ही सगळी मोट आहे. या चित्रपटात जाणवलं की तो नृत्यातही किती कुशल होता. नृत्यदिग्दर्शक म्हणून किती ग्रेसफुली त्यानं हालचाली केल्या आहेत. त्या रेखीव हालचालींबरोबरच नृत्यात आणि व्यक्तिरेखा म्हणूनही त्यानं अभिनयही उत्तमच केला आहे. या चित्रपटाच्या मांडणीमध्येच जगण्याचं वास्तव, नायकाच्या मनातलं सुप्त-वास्तव आणि नृत्य-नाट्याच्या प्रतीकात्मक मांडणीमधलं अति-वास्तव या सर्व पातळ्या त्यानं सतत वापरत्या ठेवल्या आहेत.

चित्रपट पाहताना डोळे दोन्ही कारणांनी भरून येत होते. चित्रपटातल्या नायकाची तगमग पाहून आणि त्यामागची ऋतुची धडपड जाणवून.

हा चित्रपट पूर्ण झाल्यावर तो काय मनस्थितीत होता? यात सांगितलेल्या प्रगल्भतेकडे तो पोचला? त्याला पोचायचं होतं? तो पोचला असता? त्याच्या एकटेपणाच्या तो प्रेमात होता का? तो शोधत तरी काय होता? एकटं असणं म्हणजे एकाकी असणं असं तरी का मानायचं? पण हे त्याला उमगलं होतं का? मग त्याच्या शरीरानं त्याला दगा दिला का? नाहीतर आणखी उमदी अशी कलाकृती देऊन त्यानं आपल्याला अधिकच अचंबित केलं असतं का? चित्रांगदेचा साक्षात्कार त्यानं केवळ चित्रपटापुरता निवडलेला नव्हता. त्याच्यासारख्या पुरुषदेहात अडकलेल्या स्त्रीचं हेच अटळ भागधेय होतं का? का स्त्री-मनाची सखोल समजूत असणारा तो एक समलिंगी प्रेमभावनेचा शोध घेणारा पुरुष होता? हे त्याचं व्यक्तिमत्त्व सहन न होऊन त्याच्या मनात हा चित्रांगदेचा - स्त्री होऊन पाहण्याचा - गोंधळ तयार झाला असेल का? का स्त्री-पुरुष कोणालाही न चुकलेली अशी जीवाचा मैतर- स्त्री म्हणा, पुरुष म्हणा- शोधण्याची त्याची धडपड त्याला अधिकाधिक विकल बनवत होती? तुम्ही कितीही सुटायला पाहा, पण स्त्री म्हणून किंवा पुरुष म्हणून, तुमचं आस्तित्व आणि जन्मजात तुमच्याबरोबर असणारं समाज नावाचं अदृश्य परिमाण या दोन्ही गोष्टी तुम्हांला सोडताच येत नाहीत का? या दोन्हीच्या जोखडातून मृत्यूच तुम्हांला सोडवू शकतो का? त्याचा मृत्यू हा नुसत्या शारीरिक विकाराचा अपरिहार्य शेवट म्हणून मान्य का होत नाही? ’चित्रांगदा’ पाहिल्यावर असं का वाटतं की, जणू त्यानं कलावंत म्हणून आत्महत्येची तयारीच चालवली होती?

या प्रश्नांची उत्तरं फक्त तोच देऊ शकला असता. पण ती न देता तो निघून गेला. आता त्याच्या चित्रपटांमधून त्याला नव्यानव्यानं शोधत राहणं, एवढंच आपल्या हातात आहे. आणखी एक करणं शक्य आहे - कोणाही कलावंताला - खरंतर कोणाही व्यक्तीला आपला रस्ता शोधत जाण्याचं, त्यात भरकटण्याचं, वेडेपणा करण्याचं, पुन्हा सावरण्याचं, पुन्हापुन्हा त्याच चुकाही करत जाण्याचं, मनानं मृदू असण्याचं, संवेदना जागृत असल्यामुळेच आतून नाजुक, हळवं असण्याचं स्वातंत्र्य आणि अवकाश आपण समाज नावाच्या अमर्याद शक्तीनं आदरानं द्यायला हवं.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा लेख वाचून खुप काय बघायचं राहिलंय असे वाटले. ऋतुपर्ण घोष यांच्याबद्दल फक्त लेख वाचूनच माहिती होती पण अशी मनापासून ओळख वाचून खुपच हळहळ वाटली. हा लेख इथे टाकण्याकरता धन्यवाद चिनूक्स.

छान लिहीले आहे! उन्नीशे एप्रिल बद्दल ऐकले होते. बाकी फारशी माहिती नव्हती (लिअर वगैरे सोडून).

हा लेख वाचून खुप काय बघायचं राहिलंय असे वाटले. ऋतुपर्ण घोष यांच्याबद्दल फक्त लेख वाचूनच माहिती होती पण अशी मनापासून ओळख वाचून खुपच हळहळ वाटली. हा लेख इथे टाकण्याकरता धन्यवाद चिनूक्स.>>>>> + १

_/\_ काय बोलणार?

रेनकोट आणि नौकाडुबी पाहिले आहेत. दोन्ही आवडले होते. नौकाडुबीमधे कपडे,दागिने 'एवढे ' देवदास पद्धतीचे केले नसते तर घुंगटपेक्षा कितीतरी पटीने अधिक परिणामकारक झाला असता हा चित्रपट.

> ’रेनकोट’सारख्या हिन्दी म्हणून आणि अजय देवगण-ऐश्वर्या राय यांच्यामुळे गाजलेल्या चित्रपटाला तर थोडासा वायफळ-वैचारिकतेचा वासही येत होता. > वायफळ-वैचारिकता कशी ते कळू शकेल का? मलातरी जाणवली नव्हती.

बिपाशा, ऐश्वर्या इ. मेनस्ट्रीम नायिकांचे वेगळे सिनेमे म्हणून शोब चरित्रो, चोकेर बाली, आंतरमहोल इ. बरेच पाहिले होते पण ऋतुपर्ण घोष यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हती. छान लेख.
(मेमरिज इन मार्च खूप आवडला होता. त्यात ऋतुपर्ण घोष नायक (?) होते.)

एक करणं शक्य आहे - कोणाही कलावंताला - खरंतर कोणाही व्यक्तीला आपला रस्ता शोधत जाण्याचं, त्यात भरकटण्याचं, वेडेपणा करण्याचं, पुन्हा सावरण्याचं, पुन्हापुन्हा त्याच चुकाही करत जाण्याचं, मनानं मृदू असण्याचं, संवेदना जागृत असल्यामुळेच आतून नाजुक, हळवं असण्याचं स्वातंत्र्य आणि अवकाश आपण समाज नावाच्या अमर्याद शक्तीनं आदरानं द्यायला हवं.>>> अगदी अगदी.

"एक करणं शक्य आहे - कोणाही कलावंताला - खरंतर कोणाही व्यक्तीला आपला रस्ता शोधत जाण्याचं, त्यात भरकटण्याचं, वेडेपणा करण्याचं, पुन्हा सावरण्याचं, पुन्हापुन्हा त्याच चुकाही करत जाण्याचं, मनानं मृदू असण्याचं, संवेदना जागृत असल्यामुळेच आतून नाजुक, हळवं असण्याचं स्वातंत्र्य आणि अवकाश आपण समाज नावाच्या अमर्याद शक्तीनं आदरानं द्यायला हवं."
खुप आवडला लेख

लेख आवडला.
ऋतुपर्णो याची पूर्ण फिल्मोग्राफी इकडे लिहिता येईल का?

सुंदर लेख, शेअर केल्याबद्दल धन्यवाद

सुमित्रा भावे आणि ऋतुपर्णाचे एवढे जिव्हाळ्याचे नाते होते
हे वाचून भारी वाटले.
दोघही प्रतिभाशाली दिग्दर्शक
ऋतुपर्णाचा फक्त रेनकोट बघितला आहे
बाकी बघावे लागतील आता