अभिनव स्पर्धा - भाग घ्या, विजेते व्हा, विजेते ठरवा

Submitted by किरणुद्दीन on 28 April, 2019 - 23:09

ही एक अभिनव स्पर्धा आहे.

ही स्पर्धा मायबोलीवर अस्ली तरी तिचा मायबोलीशी काही एक संबंध नाही. मायबोली प्रशासनाचा यात कोणताही सहभाग नाही.
हा एक खेळ आहे. यात कौशल्य पणाला लागणार आहे. कोणीही मायबोलीकर यात भाग घेऊ शकतो. किंवा प्रेक्षक म्हणून मतदान करू शकतो.

स्पर्धा अगदी सोपी आहे.

कोणताही धागा भरकटवणे - हे या स्पर्धेचे स्वरूप आहे.

धागा भरकटवण्याची कला काहींकडे जन्मतःच असते. त्याचे परीक्षक म्हणून इथल्याच लोकांनी काम पहायचे आहे.
स्पर्धा अभिनव का ?
तर स्पर्धक म्हणून नाव देण्याची आवश्यकता नाही. एकदा तुम्ही धागे भरकटवायला सुरूवात केलीत की आपोआप तुमचे नाव स्पर्धेत येते.
परीक्षक म्हणून कोणाचीही नेमणूक केलेली नाही. कुणीही परीक्षक होऊ शकते. मात्र जे स्पर्धक आहेत ते परीक्षक होऊ शकणार नाहीत एव्हढेच पथ्य सांभाळले जायला हवेय. अर्थात स्पर्धक हे जन्मजात भरकटक असल्याने हा नियम सुद्धा ते स्वतःच्या हिंमतीवर भऱकटवून दाखवतील यात शंकाच नाही.

स्पर्धेचे नियम

१. कोणताही विषय राजकारणाकडे नेऊन त्याचे पर्यावसान भाजप विरुद्ध काँग्रेस अशा घमासानात झाले पाहीजे.
२. धाग्याच्या शेवटी एकमेकांवर गलिच्छ आरोप होऊन तो बंद पडण्यासाठी आदमखान धावत आले पाहीजेत.
३. धाग्यात नेहरू, गांधी, पटेल, मोदी, सावरकर, आंबेडकर यांचे आगमन झाले पाहीजे. त्यांना चरकात घालून रस काढल्याशिवात त्यांची सुटका झाली नाही पाहीजे. यांच्या जोडीला धाग्यात हनुमान, राम, येशू ख्रिस्त पण आणून दाखवले तर त्या क्रमाने गुण द्यावेत.
४. गुण देताना राजकारशी संबंधित धागा राजकीय कारणांसाठी भरकटवणे याला सर्वात कमी गुण असावेत. तर सर्वात जास्त गुण ज्या विषयांचा राजकारणाशी अजिबात संबंध येत नाही असे विषय लीलया भरकटवून त्यात मोदी विरुद्ध राहुल गांधी सुरू करणे याला सर्वोच प्राधान्य दिले गेले पाहीजे.
उदा पाककृती विभागात आळूचे फदफदे आणि मूगाची खिचडी असा विषय असेल तर हे सगळे पेठी पदार्थ आहेत. हे फडणविसांना सांगा. आमचे पवारसाहेब नळ्या ठोकून खातात अशी काडी टाकून विषय इच्छित स्थळाकडे नेण्याचे कसब दिसून आले तर त्यास गुण द्यावेत
५. स्पर्धा सातत्याने चालू राहील. कालावधी प्रत्येकाने आपापला ठरवावा. त्या कालावधीत आपण जे गुण दिले आहेत त्यातून विजेते जाहीर करावेत. त्याचे थोडेसे विश्लेषण असेल तर उत्तमच
६. कितीही परीक्षक असू शकतात. कितीही विजेते असू शकतात.
७. विजेत्यांची नावे याच धाग्यावर येऊ द्यात.

घेताय ना सहभाग ?
शुभेच्छा !

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला असं वाटतंय की हे राजकारणी धागे उघडताच लेटेस्ट dj गाणी वाजायला पाहिजेत, म्हणजे चिखलफेक करत असताना गाणी सुद्धा ऐकू येतील ज्यामुळे खेळाडूंचा जोश वाढेल आणि आनंद द्विगुणित होईल, जय हिंद जय महाराष्ट्र.

मायबोलीवर कुठेही तुम्ही गांधी , मोदी, नेहरू असे शब्द लिहीले की काहींच्या फोनवर नोटीफिकेशन्स येत असावेत बहुधा.. Happy

छान आहे
धागा भरकटवण्यामागे माबोकरांचा हात कुणीच धरु शकत नाही.