अजुनि जागे आहे गोकुळ

Submitted by प्राचीन on 8 April, 2019 - 00:45

अजून जागे आहे गोकुळ
मुंबई-गोवा महामार्गावर पनवेल मागे टाकलं की पाच मिनिटांतच ओ.एन्.जी.सी दिसतं. त्याच्या कडेने गाढी नदी झोकात वळण घेताना दिसते.तिच्या कुशीत विसावलेलं हे पारपुंड गाव.. पळस्पे नाक्यावर वसलेलं. महामार्गाच्या उजवीकडे, नदीकिनार्‍याला समांतर अशी (पूर्वी कच्ची असलेली पायवाट) एक निमुळती वाट उतरत जाते. स्थानिक लोकांची छोटी घरं,कोंबड्या,बकर्‍या, क्वचित एखादी म्हैस, असं खास वातावरण या वाटेवर आपली सोबत करतं नि लगेचच उमगतं की गाव आलं !
ही वाट जिथे निवांत होते, तिथेच माझं, नव्हे, आम्हां पाध्ये-गुर्जरांचं घर दिमाखात उभं आहे. प्रथम लक्ष वेधून घेतं, ते ऐसपैस फरसबंदी अंगण – जे पूर्वी शेणाने सारवलेलं असायचं. एक पाण्याची टाकी आणि मग तुळशीचं हळुवार स्वागत.. येणार्‍या- जाणार्‍यासाठी विसावा असलेलं लाकडी बाक ; तुम्ही तिथे टेकलात ना, की आतमधून आजी, आई, आत्या, काकू यांपैकी कोणीतरी बाहेर डोकावणार. मग पाणी, चहा आणि गप्पा अशी चढती सरबराई सुरू होणार.पण आपल्याला तर घराचं अंतरंग न्याहाळायचंय ना? मग आत जाऊ या चला.
मुख्य दार एका लहानशा पडवीत उघडतं. डाव्या हाताला स्वयंपाकघर व उजवीकडे विश्रांतीची जागा व त्याच्या बाजूला खाण्याची खोली. पण ही डायनिंग रूम नव्हे, तर आमच्या गोठ्यातील म्हशींसाठी चारा,कडबा, असं सगळं साठवण्याची ही कोठी आहे. स्वयंपाकघरात लाकडी मांडणी, कणगी, जातं यांच्या संगे फ्रीज, मिक्सर अशी आधुनिक साधनेदेखील मदतीला सज्ज दिसतील. गोठ्यातील म्हशींमध्ये एक शहाणी गाय शोभून दिसते. शिवाय एखादं पारडू असतंच, म्हणजे खरवसाचीही सोय होते. सकाळ – संध्याकाळ आमचा काका म्हशींची देखभाल करताना दिसतो. त्यामुळे तुम्हाला धारोष्ण दूधही चाखायला मिळेलच, बरं का ! छोट्या पडवीतून दोन उंचच उंच दगडी पायर्‍या चढून गेलं की माजघर येतं. लाकडी छप्पर, प्रत्येक भिंतीत मोठाल्या तीन –तीन खिडक्या खिडकीलगत प्रशस्त बैठक, भिंतीमधील लाकडी फडताळं, कपाटं, कड्यांचा झोपाळा आणि सगळ्यांत महत्वाचं म्हणजे एक नीटस देवघर.. तिथे आमची कुलस्वामिनी आर्यादुर्गा, कनकादित्य, शाळीग्राम, गणपती, अन्नपूर्णा, बाळकृष्ण असे मातब्बर देवदेवता दारच्या फुलांचा साज लेवून घरावर कृपाछत्र धरीत आहेत. या माजघरात एक शंभर वर्षांचं जुनं घड्याळ आहे. रात्रीच्या शांततेत त्याचे ठोके अगदी काळजाचे ठोके चुकवतात ! माजघराला जे दुसरं दार आहे ना, त्यातून गेल्यावर एक मोठ्ठी पडवी लागते. वाळवणं, तांदूळ, डाळी, तेल, गहू एवढंच नव्हे, तर औषधं यांची ही हक्काची जागा. शिवाय इथे एक कॅरमबोर्ड स्टँड व दिव्यासकट कायम ठेवलेला असतो. केव्हाही यावं नि आपलं कौशल्य आजमावून पाहावं! याच पडवीतून माडीकडे जाण्यासाठी एक गूढ लाकडी जिना आहे. जसं आपण वर चढत जातो, तसा अंधार, वटवाघुळांची फडफड आणि एकाकीपणा जाणवू लागतो ; म्हणून गूढ म्हटलं ! वाटेत पायरी निसटली तर गम्- गच्छन्ति होणारंच !
माडी म्हणजे सगळ्या घराला सामावणारी, ओळीने सात खिडक्या- त्याही दुहेरी अशा, असलेली, भिंतीमधील कुलुपबंद कपाटांचं कुतूहल जागविणारी, आणि जुन्या, दुर्मिळ ग्रंथांचं समृद्ध भांडार (माझे आजोबा संस्कृतपंडित व आयुर्वेदतज्ज्ञ होते ना, त्यामुळे), शेणाची जमीन, पोटमाळा व त्यावरील खुडबुडीने घाबरवणारी, तरीही मस्त हवेशीर अशी जुन्या काळात घेऊन जाणारी एक पोतडीच आहे ! एका बाजूच्या खिडकीतून दर्शनी अंगण दिसतं. तर दुसरीकडे संथ वाहणारी, वार्‍याबरोबर शहारणारी नदी आपल्याला प्रसन्न करते ! तिसर्‍या बाजूची खिडकी मात्र उघडू नका हं; कारण लहानपणी आम्ही तिथे चिंचेच्या झाडावर एक अजगर पाहिला होता !
घराच्या रचनेची माहिती तर झाली, तरीही या घराचा परिचय हवा असेल, तर इथे वस्ती करणं आवश्यक आहे. मग भोवतालची – माझ्या बाबांनी बहरविलेली बाग पाहणं, नदीमध्ये डुंबणं, एखाद्या सापाची अवचित भेट, मांजरींचं पायांत घोटाळणं, टप्पोरी जांभळं वेचणं, गोबरगॅसची पाहणी, चिंचेची चव चाखणं, डोळे चोळत चुलीतील विस्तव जड फुंकणीने फुलवणं, त्या धुरात कपडे धुरकटून घेणं, येता- जाता आंब्यांचा फडशा पाडणं आणि आणखी कितीतरी अनमोल अनुभवांचं संचित गाठी बांधता येईल….
सुमारे दोनशे वर्षांपूर्वीच्या या माझ्या घराने दोन महापूर पचवले आहेत ! त्यावेळी घरातील वस्तू डोळ्यांदेखत पाण्यासोबत वाहत जातानाही घरातील लाखमोलाच्या जिवांना मायेने आपल्या कुशीत सांभाळलं आहे !
आमच्या लहानपणी भुता- खेतांच्या गोष्टी ऐकून मग घरात वावरताना एक गूढ वलय सोबत असे.. त्या वलयाची ओढ आजहि मनाला जाणवते, खुणावते. या घराच्या प्रेमळ आणि विस्तीर्ण सहवासात आमचं सार्‍यांचं बालपण फुलत गेलं.. त्या बहराचा पुन:प्रत्यय निदान शब्दांतून घेता यावा, यासाठीच हा अल्पसा प्रयत्न !

(इतरत्र पूर्वप्रकाशित)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अद्भूत !! तुमचे मूळ कोकणातले का? मला कोकणवासीयांचा खूप हेवा वाटतो ( चांगल्या पद्धतीने बरं का, वाईट नाही) आणी त्यांना एक छानसी पप्पी द्यावीसी वाटते. Proud Happy

छानच लिहीले आहे. मनीमोहर आणी जागुनंतर तुम्ही एक कोकणवासीय भेटलात. कीप इट अप ! हो, आणी जमल्यास फोटो टाका की.

सुंदर लिहीलंय...
छानच लिहीले आहे. मनीमोहर आणी जागुनंतर तुम्ही एक कोकणवासीय भेटलात. कीप इट अप ! हो, आणी जमल्यास फोटो टाका की.>>>>> +१
शीर्षक समर्पक !

सुरेख!
भाग्यवान आहात. > +१ . फोटो पण टाका.

रश्मी, रावी, किल्ली, वावे, हर्पेन, अज्ञातवासी, शाली, देवकी, अंजली कूल आणि मंजूताई : प्रतिसाद छान आहेत व त्या बद्दल धन्यवाद.
@रश्मी - माझे आजोबा कोकणातील कशेळी येथील रहिवासी.
आणि फोटो सध्या एकच आहे तो पाठवते..
@शाली - जरूर यावं. मी स्वतः जाणार असेन तेव्हा विपू करेन. :स्मित :