शहाणपण..

Submitted by अमृताक्षर on 5 April, 2019 - 13:30

अशीच एक उन्हाळ्यातील रणरणती दुपार..
नुकतच जेवण करून मी नवीन टॉपिक वाचायला घेतला होता आणि नेहमीसारखी कुठली आराधना न करताही निद्रा देवी मला प्रसन्न झाली.
डोकं टेकवून 2 मिनिट पण झाली नसतील तेवढ्यात खुर्ची ओढल्याचा कर्कश आवाज झाला आणि माझ्या झोपेचा सगळा बटयाबोळ झाला.
ही अभ्यासिकेतील समस्थ भावी अधिकारी मंडळी म्हणजे ना आपल्या अभ्यासाची फारच काळजी घेतात, जरा कुणी झोपलेलं दिसलं की लगेच झोपमोड करणार..
मग आपल्याकडे परत जड झालेल्या पापण्या घेऊन डोळे चोळत अभ्यास करण्यापलीकडे काहीच पर्याय उरत नसतो.
असो..तर अशीच माझी आज झोपमोड झाली मग वाटल खाली जाऊन चहा तरी घेऊन यावा. फ्रेश वाटेल (अस फक्त 'वाटतच' असत. प्रत्यक्षात मात्र फ्रेश 'वाटत' नसत)
बाहेर आली. दुपारचे 3.27 झाले असतील. सूर्य मी म्हणत होता, पण तरीसुद्धा माझ्या निस्सीम चहा प्रेमाखातर मला चहा घ्यायचाच होता.
एका झाडाच्या सावलीत गाडीला रेलून मी नेहमीसारखी चहाचा कप हातात घेऊन आजूबाजूच निरीक्षण करत बसले. तेवढाच काय तो विरंगुळा.
एक उंच,सावळी स्त्री एका लहान मुलाची समझुत काढत होती पण तो काही केल्या रडायचं थांबेना. शेवटी तिने समोरच्या दुकानातून एक आइस्क्रीम घेतल.
त्याच्या हातात ते देऊन एका बंद असलेल्या दुकानाच्या पायरीवर त्याला बसवल आणि ती समोरच्या डागडुजी केलेल्या रस्त्यावर पाणी देऊ लागली.
ते मुल साधारण तीनेक वर्षाचं असेल.
विस्कटलेले केस, रडून सुकलेला चेहरा, गळणार नाक , कधीतरी पांढरा असलेला पण आता ओळखू येणार नाही असा शर्ट आणि फाटलेली पँट असा त्याचा अवतार होता.
आइस्क्रीम खाताना तो इतका मश्गूल झालेला की त्याची आई सारखी त्याला वळून पाहतेय हेही त्याच्या लक्षात आलेलं नसणार.
त्या आईला पाहून संत जनाबाईची कविता मला लगेच आठवली.

घार हिंडते आकाशी | झांप घाली पिल्लापासीं
माता गुंतली कामासी | चित्त तिचें बाळापाशीं
 
शेवटी आईच ती.
तिचे अणवाणी पाय उन्हात पोळत असताना सुद्धा तिला सावलीत बसलेल्या तिच्या बाळाची जास्त चिंता वाटतं असणार हे नक्की.
माझा चहा पिऊन झालेला होता मी जायला निघाले तेवढ्यात उन्हामुळे वितळून अर्ध खाऊन झालेलं ते आइस्क्रीम खाली पडलं.
एका क्षणात त्याच्या चेहऱ्यावरचं स्वर्गसुख विरुन गेलं. तो पायरीवरून खाली उतरला आणि ती सांडलेली आइस्क्रीम हाताने उचलू लागला.
आता तो त्याच्या आईच्या नजरेच्या टप्प्यात नव्हता. माझे जाणारे पाय थबकले. 'खाली पडलेल काही खायचं नाही' हे सांगायला त्याची आई जवळ नव्हती. मला वाटल मी जाऊन त्याला सांगावं, ते खाऊ नकोस.
मी कप ठेवला आणि त्याच्याकडे जायला माझा मोर्चा वळवला.
आणि
समोरच दृश्य पाहून अवाक झाले. जेमतेम तीन वर्षाचं असणार ते मुल ती आइस्क्रीम उचलून समोर असलेल्या कचरा पेटीत टाकत होता.
आइस्क्रीम हातातून गेल्यानंतर त्याला त्याची आई आठवली आणि तो तापलेल्या रस्त्यावरून आणवणी पावलांनी तिला शोधत निघून सुद्धा गेला.
मी मात्र त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिले.
मला माझच हसू आल.
आपण शिकली सवरली माणसं नेहमी असच करतो ना..?
प्रत्येकाच्या बाह्य रूपावरून, त्याच्या एकंदरीत अवतारावरून तो कोण असेल कसा असेल हे माहिती नसताना सुद्धा प्रत्येकाला गृहीत धरतो आणि आपल्याला हवं तसं ओळखपत्र त्यांच्या गळ्यात अडकवून मोकळे होतो.
आपलं वागणं, बोलणं सुद्धा त्यावरूनच आपण ठरवतो आणि वरून स्वतःला उच्चशिक्षित वगैरे छान बिरूद लावून समाजात मिरवतो.
दात येऊन पडून सुद्धा जातात मात्र शहाणपण काही आपल्याला तरी येत नसत.

ते मुल कुठल्या बर शाळेत इतकं शहाणपण शिकल असेल..?

#स्वच्छ भारत#स्वच्छ मन

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्यांचे खूप आभार..
मी माबो वर पोस्ट केलेले हे पहिलंच लिखाण आहे..
त्यामुळे कुणी वाचेल की नाही याबद्दल शंका होती..

मी माबो वर पोस्ट केलेले हे पहिलंच लिखाण आहे..
त्यामुळे कुणी वाचेल की नाही याबद्दल शंका होती..>>>> अगं असं कसं म्हणतेस? छानच लिहीलस की. Happy लिहीत रहा. थोडक्यात पण मस्त संदेश आहे या लेखनात.

छान. खरा अनुभव आहे का?
बादवे लेख सध्या फक्त ग्रुपपुरता मर्यादीत झालाय त्याला पब्लिक करा.

खुपच छान.
पहिलाच प्रयत्न आहे अस वाटत नाही.
पुलेशु.

@रश्मी
धनयवाद..
@ॲमी
हो माझा अनुभवच मी जशाचा तसा लीहते..काल्पनिक गोष्टीबद्दल अजून लीहण्याचा प्रयत्न नाही केला..पण नक्की करून पाहीन..
लेख public कसा करायचा..?
@akki320
धन्यवाद..माझ्या डायरी मधे लिहायची मी कधीतरी स्पेशल अनुभव..
पण कधी पोस्ट केले नाही..
माबो वर नेहमी वाचायची सगळ्यांचे लेख..
मग एकदा वाटल आपणही पोस्ट करून पाहू..
सगळ्यांचे प्रतिसाद पाहून खरच खूप आनंद झाला..
आता जमेल तशी लिहत जाईल काहीतरी..

> काल्पनिक गोष्टीबद्दल अजून लीहण्याचा प्रयत्न नाही केला..पण नक्की करून पाहीन.. > नक्की कर प्रयत्न. शुभेच्छा!

>लेख public कसा करायचा..? > लेख संपादन करायचा आणि Group content visibility ला Public सिलेक्ट करून सेव्ह करायचं

@ ॲमी
केलाय आता लेख public..
धनयवाद..