काही नवे ग्रह (भाग २)

Submitted by shriramb on 24 March, 2019 - 13:18

काही नवे ग्रह (भाग २)

केजू
“केतू” ह्या पुरातन ग्रहाचा आधुनिक युगातला अवतार म्हणजे “केजू” हा ग्रह होय. या ग्रहाचा उत्तर हिंदुस्थानात, विशेषतः राजधानीच्या प्रदेशात सर्वाधिक प्रभाव असतो. इतर राज्यांत देखील या ग्रहाची धडपड चाललेली असते, पण त्याला तिथे कोणी फारसा भाव देत नाही. शनि, उरेनस वगैरे ग्रहांना जसे एक कडे असते, तसे केजूला देखील एक कडे असते. ते नेहमी त्याच्या मस्तकाभोवती गुंडाळलेले असते. (काही लोक त्याला ‘मफलर’ असेही म्हणतात). ‘केजू’ला खरं तर ग्रह न म्हणता “दुराग्रह” म्हटले पाहिजे. कारण या ग्रहाचे एक व्यवच्छेदक लक्षण म्हणजे सतत चालू असणारे मोर्चे, घेराव, निदर्शने, आणि महिन्यातून किमान दोनदा होणारी “आमरण” उपोषणे. ह्या ग्रहाला निदर्शनांची इतकी सवय झालेली असते, की स्वतःच्याच सरकारच्या विरोधात निदर्शने करायलासुद्धा तो मागेपुढे पहात नाही. ‘केजू’चा एक मोठा शत्रू म्हणजे ‘नमो’ नावाचा एक बलाढ्य ग्रह. ‘नमो’ च्या विरोधात वक्तव्ये करणे हा केजूचा एक-कलमी कार्यक्रम असतो. त्यामुळे, ‘नळाला पाणी आले नाही’ इथपासून ‘चेकोस्लोवाकिया आणि बोस्निया यांच्यात तणाव निर्माण झाला’ इथपर्यंत काहीही घडले झाले तरी त्यामागे ‘नमो’चाच हात असल्याचे केजू ठणकावून सांगत असतो. एकदा केजूच्या वायफायचा पासवर्ड रीसेट झाला म्हणून त्याने नमोचा राजीनामा मागितला होता, आणि एकदा त्याच्या कारची ब्याटरी डाऊन झाली म्हणून त्याने नमोच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव आणू अशी घोषणा केली होती.
केजू हा एक अतिशय अस्थिर ग्रह आहे. त्याचे सतत भ्रमण सुरु असते. त्यामुळे त्याच्या अनुयायांचा नेहमी गोंधळ होतो. ते कधी याच्या जवळ येतात, तर कधी त्याला सोडुन निघून जातात. केजूच्या समधर्मी इतर ग्रहांचेही तसेच असते. केजूबरोबर युती करावी की नाही ते ठरवताना त्यांचा गोंधळ उडतो. त्यामुळे असे बरेचदा होते की, केजू दुसऱ्या एखाद्या ग्रहाच्या अगदी जवळ येतो, पण युती न करता निघून जातो. “राहू” आणि “केजू” यांच्या करमणूक मूल्यात खूप साधर्म्य असल्यामुळे त्यांची युती होईल असे बऱ्याच ज्योतिषांनी वर्तवले होते, पण ऐनवेळी केजूचा चंचलपणा नडला, आणि ज्योतिषांचे भाकीत खोटे ठरले.
अतिशय उच्च महत्वाकांक्षा असूनही व्यावहारिकतेच्या पूर्ण अभावामुळे केजूच्या योजना सपशेल फोल ठरतात. पण त्या योजनांचे करमणूक-मूल्य इतके जबरदस्त असते, की त्या दीर्घकाळ लोकांच्या स्मरणात राहतात. प्रदूषण कमी करण्यासाठी केजूने अशी योजना राबवली होती की सम तारखेला सम क्रमांकाची गाडी वापरायची, आणि विषम तारखेला विषम क्रमांकाची. पण राजधानीतल्या लोकानी त्याला उत्तर म्हणून एक सम आणि एक विषम अशा दोनदोन गाड्या घेतल्या, आणि मग ती योजना बारगळली. विजेचे बिल कमी करण्यासाठी दिवसातून दोन तास जनरेटर वापरायची सक्ती, पाण्याचे संवर्धन करण्यासाठी मोठ्या आकाराच्या बादल्यांवर बंदी, लोकसंख्या कमी करण्यासाठीसाठी जोडप्यांना स्मार्टफोन्सचे वाटप, नागरीकांच्या आरोग्यासाठी 'झाडू आणि मफलर' योजना इत्यादि अनेक अफलातून कार्यक्रम केजूच्या डोक्यात होते, पण अनुयायांच्या अभावामुळे ते राबवणे अशक्य ठरले.
अशाच एका महत्वाकांक्षी प्रकल्पाचा प्रस्ताव केजूने मांडला होता, तो असा की कुतुबमिनारच्या वरती एक पाण्याची मोठ्ठी टाकी बांधायची, त्या टाकीत खालून पंपाच्या द्वारे पाणी वर चढवायचे, ते पाणी खाली ओतून त्याचा एक मोठ्ठा धबधबा बनवायचा, आणि मग त्या धबधब्याखाली एक हायड्रो-टरबाइन लावून वीजेची निर्मिती करायची. पण शास्त्रज्ञांची आणि अभियंत्यांची कल्पनाशक्ती कमी पडल्यामुळे तो प्रस्ताव बारगळला.

तर असा हा अत्यंत कल्पक, महत्वाकांक्षी, आणि (अति)उत्साही ग्रह त्याच्या अस्थिर स्वभावामुळे आणि युतीच्छुक ग्रहांच्या अभावामुळे काहीसा उपेक्षित राहिलेला आहे.

- श्रीराम बर्वे

Group content visibility: 
Use group defaults