शुभ्र काही जीवघेणे - चादर ट्रेक १

Submitted by हर्पेन on 18 March, 2019 - 12:41

खाली मान घालून पायाखालची वाट नजरेआड न करता एका मागोमाग एक असे आम्ही १९-२० जण नागमोडी वळणे घेत घेत चालत होतो आणि अचानक एका वळणा नंतर आमचा लीडर अचानक चित्कारता झाला. नक्की काय बोलतोय हे लगेच काही कळले नाही पण तो दाखवत होता त्या दिशेला पाहता ताज्या बर्फावर उमटलेले ते पावलांचे ठसे स्पष्ट दिसत होते आणि ते ज्या डोंगरदिशेला गेले होते तिकडे वरती आकाशात बरेच पक्षी घिरट्या घालत होते. लीडरच्या अंदाजानुसार ते ठसे बिबट्याचे होते आणि नुकत्याच केलेल्या शिकारीची चाहूल लागल्यामुळे ते पक्षी तिकडे जमा झाले असावेत. हे ऐकून कळून वळून मेंदूत शिरायला लागणारा वेळ नेहेमी पेक्षा जरा जास्तच होता पण परिस्थितीच तशी होती. "खालून बर्फ, वर बर्फ़ बर्फ बाजूंनी" अशा परिस्थितीत चालताना सगळ्या अंगावर कपड्यांचे थरच्या थर तर होतेच पण कान टोप्या देखील दोन दोन होत्या, एव्हढे करूनही हातापायाच्या बोटांनाच नव्हे तर आख्ख्या आपल्यालाही एक बधिरपण येतं. पण आपण जिथून चालतोय त्या भागात आपल्या अगदी जवळपास हिमबिबट्या वावरतोय ही कल्पनाच किती रोमांचकारी आहे नाही आणि आपण तर त्याच्या पाऊलखुणा प्रत्यक्ष पाहतोय, त्यांच्या शेजारून चालतोय. ते ही इतक्या अनपेक्षितरित्या.
Foot prints.jpg

पुढे काय वाढून ठेवले आहे याचा अजिबात अंदाज बांधता ना येणे ही तर हिमालयातल्या वास्तव्यात येणारी नित्य अनुभूती पण हे असे 'अपेक्षित असलेले अनपेक्षित' अक्षरशः प्रत्येक पावला गणिक अनुभवायचे असेल तर त्याकरता चादर ट्रेक करायलाच हवा.

मला स्वतःला तोचतोचपणाचा बऱ्यापैकी कंटाळा येतो, आयुष्यात नित्यनूतन, अनपेक्षित, ज्या परिघात आपण आश्वस्त असतो त्याबाहेरचे काहीतरी घडायला हवे असे मला फार वाटते. नाहीच तर ते आपण घडवायला हवे अशी माझी धारणा आहे. त्यात जगण्याची खरी मजा आहे आणि त्यामुळेच मी चादर ट्रेकला जाण्याचा निर्णय घेतला आणि तुम्हाला म्हणून सांगतो पुरी हौस फिटली माझी.

चादर ट्रेक म्हणजे आहे तरी काय
चादर म्हणजे बर्फ़ाचा थर, चादर शब्दावर जाऊ नका, हिवाळ्यानुसार घोंगडीच काय गादीपेक्षाही चांगला जाडजूड होत असतो हा थर. वाहत्या नदीचे पाणी हिवाळ्यातल्या उणे तपमानामुळे गोठून हा थर तयार होतो. उत्तर भारतातल्या लडाख भागात सिंधू नदीची उपनदी असलेल्या झंस्कार नदी चे पात्र जेव्हा हिवाळ्यात गोठते, तेव्हा त्याचा वापर स्थानिक माणसे ये जा करण्याकरता करतात. झंस्कार हे नदीप्रमाणेच गावाचे आणि प्रदेशाचेही नाव आहे. हिवाळ्याच्या दिवसात होणाऱ्या प्रचंड हिमवर्षावामुळे या प्रदेशात राहणाऱ्या माणसांचा आजूबाजूच्या गावांशी असलेला संपर्क पूर्णतः तुटतो. अशावेळी नेहमीच्या रस्त्याने जा ये करणे अशक्य होत असल्याने या गोठलेल्या नदीपात्राचा वापर व्यापार करणे सामानाची ने-आण करणे अशा कामांकरता वर्षानुवर्षे करत आलेले आहेत. कधीतरी कोणत्यातरी साहसवेड्या टुरिस्टाला हे कळल्यानंतर काही वर्षातच येथे रीतसर ट्रेक चालू करण्यात आला. हा ट्रेक म्हणजे सिंधू आणि झंस्कार नदीच्या संगमापासून पुढे काही अंतरावर असलेल्या चिलिंग पासून ते 'नेरक'पर्यंत चालत जाणे. ह्या ट्रेकमध्ये इतर ट्रेक प्रमाणे कोणतेही शिखर सर केले जात नसून त्याचे अंतिम गंतव्य स्थान नेरक हे आहे. नेरकच का तर इथे आपल्याला गोठलेल्या अवस्थेतला एक अख्खाच्या आखा धबधबा बघायला मिळतो. गोठलेल्या अवस्थेत ला प्रचंड मोठ्या आकाराचा तो जलप्रपात बघणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. हा धबधबा इतक्या उंचावरून कोसळत असताना कसकसा गोठत गेला असेल ह्याचा विचार करणेही कल्पनातीत. ह्याचा टाईमलॅप्स व्हिडिओ बनवायला मला खूप आवडेल.

सध्या झंस्कारच्या काठाकाठाने चिलिंग पासून ते पार नेरकच्याही पुढे असलेल्या हा गावांपर्यंत एक रस्ता तयार करण्याचे काम चालू आहे. हा रस्ता एकदा तयार झाला की स्थानिकांना नदीपात्रातून बर्फ़ावरून चालत यायची गरज भासणार नाही. ह्या रस्त्यावर काही अंतर गाडीनेच पार पाडल्यावर आमचा पाच दिवसीय ट्रेक चालू झाला. आम्ही गेलो ते अंतर जाऊन येऊन अंदाजे ७० किमी इतके होते.

बर्फावरून चालण्याची एक गंमत असते, बर्फाचा थर निळसर रंगाचा असेल तर जाडजूड असतो पण त्याच्यावरून घसरण्याची शक्यता असते. बर्फाचा थर पातळ असेल तर तो तुटण्याची शक्यता असते. बर्फ ताजाच पडलेला असेल तर खालच्या सगळ्या बर्फाचा रंग आणि त्यामुळे तो थर किती जाड किंवा किती पातळ आहे हे न दिसल्यामुळे त्याच्यावरून कशाप्रकारे चालत जायला हवे ह्याचे आडाखे बांधण्याची शक्यता गमावून बसतो आपण. पण ताज्या बर्फाचा फायदा एवढाच की त्यावरून आपण घसरत नाही. अर्थात ताजा बर्फ सहा ते नऊ इंच इतपतच असेल तर त्याहूनही जास्त तर सापडला अर्थातच पाय रुतून बसतो आणि परत आपलाच पाय जोर लावून काढायला लागतो पुढचं पाऊल टाकण्यासाठी. अर्थातच ह्या सगळ्या संभाव्यता आहेत हे सगळेच्या सगळे आपण जात असताना आपल्याबरोबर आपल्याला अनुभवायला मिळेलच असे नाही. हा एक मात्र आहे की सगळा ट्रेक नदीपात्रातून असल्यामुळे खूप चढ चढून जावे नाही लागत.

पण नुसते हे वाचून हा ट्रेक काय तसा सोपाच दिसतोय असे मात्र समजू नका. मुख्य मुद्दा अजून सांगायचाय. हिवाळ्यातले लडाखमधले तपमान उणे असते अर्थात म्हणूनच तर चादर ट्रेक सारखा ट्रेक करता येतो. इथे दिवसाढवळ्या ऊन पडलेले असतानाचे तापमान उणे ५ असते आणि ते रात्री खाली जाऊन उणे ३० डीग्री सेल्सियस इतके होऊ शकते. त्याच्या जोडीला वाहत असलेले बोचरे वारे आपले जीणे अधिकच बिकट करतात.

अर्थातच लडाख म्हटले की अति उंचावर असल्यामुळे असणारी विरळ हवा, कमी प्रमाणात असलेला ऑक्सीजन आणि त्यामुळे श्वास घ्यायला होणारा त्रास हे गृहीतच धरलेले आहे.

हिवाळ्यातले लडाख थोडक्यात सांगायचे म्हणजे

दिवस असो वा रात्र खोलीत किंवा तंबूत आल्याआल्या वाटणारी ऊब
ती तात्पुरतीच होती हे कळायला लागलेला जरासा वेळ
खोल्या असो की तंबू, त्यातल्या अतिगार पडलेल्या किंवा गोठलेल्या सगळ्या वस्तू
हातापायांच्या बोटांच्या हरवलेल्या संवेदना
हातावर हात / पायांवर पाय घासत अंगात कशीबशी आणलेली ऊब
मग झोपायच्या पिशव्यांमध्ये पायाकडून आत जाताना सर्वांगाला लागणारा थंडगार चटका
हे सर्व करून होतंय ना होतंय तोवर आलेली निसर्गाची हाक त्यामुळे बाहेर जायला लागणे
मग परत पार पाडलेल्या वरच्या सगळ्या पायऱ्या
आधीच कश्याबश्या लागलेल्या झोपेतून ऐन रात्रीत झोपायच्या पिशवीची चेन उघडल्यामुळे थंडी वाजून आलेली जाग
भल्या पहाटे ऐकू आलेला खरंच आला की भास होता वाटणारा पक्ष्यांचा आवाज
हिमवर्षावातही तग धरून असणारे पक्षी
आणि
सर्वदूर पसरलेला जीवघेणा पांढरा शुभ्र रंग

क्रमशः

भाग २ -
https://www.maayboli.com/node/69486

Group content visibility: 
Public - accessible to all site users

टीजर एकच नंबर
पाहिजे तर दोन दिवस जास्त घे पण सविस्तर लिही
पुढचा भाग

मस्त! अजून फोटो असतीलच, ते पण टाक. सुरुवात गारेगार झालीय. हो, आणी मी मिसळपाव या साईटवर बहुतेक या ट्रेक विषयी वाचले होते, लेखक कोण आहे लक्षात नाही पण त्याचे वर्णन असेच होते. शोधते ते.

अहा हा.... फारच जबरदस्त!!!!! शीर्षक व सुरूवात बघता ही ऐतिहासिक लेखमाला ठरणार हे निश्चित!!!! आपल्या लेखणीला पाझर फोडल्याबद्दल किंवा फुटवल्याबद्दल अनेक धन्यवाद!!!!! Happy

मस्त सुरुवात हर्पेन Happy आता पुढचे भाग तितक्याच गतीने येऊद्या जेवढ्या गतीने हा भाग वाचून हृदयाची धडधड वाढवलीत Lol

मस्त.

पण एका भागात एकच फोटो द्यायचा पण वगैरे केला नाहीयेस ना? Wink

पुनश्च धन्यवाद मंडळी

सॉरी हर्षल, मी आशुचं 'दोन दिवस जास्त घे' हे ऐकतोय Happy

वावे, मार्गी, पॅपिलॉन
शीर्षक आवडल्याचे नमूद केल्याबद्दल खास धन्यवाद.

वावे - हो हा फोटो हिमबिबट्याच्या पावलांच्या ठशांचा आहे. घेतला बघितला तेव्हा मला पावलं फार जवळ वाटली होती पण नंतर परत आल्यावर गुगल करून बघितले असता ही पावले हिमबिबट्याचीच असावीत अशी माझी धारणा झाली आहे.

गोल्ड फिश - आम्हाला हिमबिबट्या दिसला नाही. त्याचा फोटो मिळावा म्हणून जगभरातील माणसे संपुर्ण हिवाळाभर मुक्काम ठोकून असतात. तेव्ह कुठे त्याचे दर्शन घडते.

पण हो इतर फोटो भरपूर टाकणार आहे.

छान सुरुवात.
फोटोतली पावलं पाहुन..... बाप रे!!

४७ हिम बिबट्यांना वाचवणार्‍या लडाखी माणसाची गोष्ट (हे इथे वाचायला छान वाटेल असे वाटले म्हणून.)
https://www.thebetterindia.com/239887/ladakh-how-to-track-snow-leopard-r...

Pages