नेव्हर रेस्टिंग, ऑलवेज इन पीस

Submitted by Arnika on 18 March, 2019 - 08:13

“There are four things in this life that will change you. Love, music, art and loss. The first three will keep you wild and full of passion. May you allow the last to make you brave.” Erin Van Vuren

“रेस्ट इन पीस” असं कोणी म्हणणार असाल तर कळलीच नाहीये ती तुम्हाला. कारण रेस्ट असं काही नव्हतंच आजीच्या लेखी. अख्खा स्वर्ग कामाला लावलेला असेल तिने आता. ती ब्रह्मदेवाला बाजूला बसवून वॉशिंग मशीन पुसायला शिकवत असेल. अप्सरेला आमटीची फोडणी आणि रंभेला आमसुलं घालून अळकुड्या शिजवायला शिकवत असेल. त्या व्यापातही वरून आमच्या डोक्यावर खोबरेल तेलाचा नळ सोडला असेल तिने.

लिहून सांगाव्यात अशा सगळ्या गोष्टी नाहीत; लिहिल्याने संपून जातील इतक्या थोड्या गोष्टी नाहीत; आणि एकदाच कधीतरी मुद्देसूद लिहून मांडता यावं इतकं मोजकं आमचं नातं नाही. डोळ्यासमोर असल्यासारखी आठवते आजी रोज. तिच्या कापसासारख्या साड्या, तिचं बटाटेवड्यावारचं प्रेम, तिचं धारदार नाक, तिचा पटवर्धनी आवाज, तिचं दांडगं पेपर-वाचन, तिचं दिवसभर चालू असलेलं काम... किती नि काय...

दूध-लोणी आणि तत्सम पदार्थ फ्रिजच्या वरच्या खणातच ठेवायचे. जेवणानंतर खरकटं पुसताना ढोपरं खाली टेकवायची नाहीत, ओणव्यानेच पुसायचं. कितीही चांगले मित्र असले तरी गेटवर उभं राहून बोलायचं नाही, घरी येऊनच गप्पा मारायच्या. मैत्री आणि व्यवहार वेगळा ठेवायचा. वाईटपणा आला तरी चालेल, उगाच “भिडे भिडे पोट वाढे नको”. लोकाकडे कुमारिका म्हणून जेवायला बोलावलं तरी आपल्या घरून “पोटाला धर हवा” म्हणून खाऊन जायचं... काही नियम मला ताबडतोब पटणारे होते, काही अजिबात न समजणारे होते, काही ती म्हणते म्हणून बिनबोलत पाळायला लागायचे आणि काहींवरून आमची नेहमीची खडाजंगी ठरलेली असायची.

अर्ध्या रात्री उठून मी तिच्या पलंगावर झोपायला गेले की ती तिच्या शिडशिडीत हातांनी मला घट्ट मिठीत घ्यायची आणि माझे विस्कटलेले केस आणि काळा पायजामा बघून म्हणायची, “भवाने, चिरडून टाकशील मला! अस्वलाला मिठी मारल्यासारखी वाटत्ये”. एकदा घरातल्या कार्याच्या धावपळीनंतर मला तिच्या शेजारी अशीच झोप लागली आणि मग तिचे ऐंशी वर्षांचे हात माझ्या अठ्ठाविशीच्या पायांना तेल लावून द्यायला लागले. मी झोपल्ये असं बघून तिने तेलाचा हात चेहऱ्यावरून फिरवला कारण जागेपणी मी तोंडापाशी तेल येऊच दिलं नसतं. तेल लावताना माझे गाल ओले लागले तेव्हा दोन्ही हातात माझा चेहरा घेऊन बसून राहिली आजी अर्धा तास. मला डोळे उघडायचं धाडस करवलं नाही...

आमची कडाक्याची भांडणंसुद्धा व्हायची. संध्यानंदमध्ये वाचलेलं तिचं सायन्स आणि माझं सायन्स यात फरक निघाला की तर विचारायलाच नको! “अडचण आहे का? जाण्यासारखी आहेस ना?” असं तिचं चार-चौघांत विचारणं मला कधीच आवडायचं नाही आणि तिला त्यात काही गैर वाटायचं नाही. कधीकधी भयानक चिडून आणि कधीकधी लटक्या रागाने मी तिच्याकडे तक्रार करायचे की अगं बारक्या बारक्या गोष्टी सांगणं बंद कर आता. तिशी आली माझी, अजूनही तुझे संस्कार करून झालेलेच नाहीयेत का? का म्हणून तुझ्याचसारखे वाळत घालायचे कपडे? का म्हणून डोश्याचा तवा पोळीला नाही घ्यायचा? का म्हणून अमुक एकीकडे जायचं नाही? गेटवर गप्पा मारत का नाही उभं राहायचं? मी काय लहान आहे का? मी कुठे काही चुकीचं करत्ये? पण नाही. नाही म्हणजे नाही. मग माझी धुसफूस, भांडणं, रडारड चालायची दिवसभर. तिला बाकी नातवंडांनी असा त्रास दिला नाही; ती तिघं खरोखर शहाणी आणि कधी शब्दाबाहेर न जाणारी आहेत. त्यामुळे हे आमचं दोघींचं खास होतं असंच म्हणायला हवं. मग दुसऱ्या दिवशी वातावरण पुन्हा निवळलं की पहाटे तोंड सुकेपर्यंत गप्पा टाकत बसायचो दोघी. परत त्याच विषयावरून वाद होतोय असं वाटलं तर ती म्हणायची, “जाऊ दे, ते झालं आता”.

केसाला तेल लावलं की डोकं चप्पट दिसतं म्हणून माझा थयथयाट असायचा आणि ही दोघींच्या वाटचं तेल स्वतःच्या डोक्याला लावून त्यातून माझा कोरा कंगवा तिच्या केसांतून फिरवायची. चरफडत का होईना, मला त्या कंगव्याने भांग पाडून आपोआप तेल लावून घ्यायला लागायचं. नाहीतर फ्याशनच्या आहारी जाऊन टक्कल पाडशील म्हणायची डोचक्याला!

आम्हाला लहानपणापासून ताकीद होती. कधीही कोणीही टीव्हीवर नि नाटकात काम करायला बोलावलं तर नाही म्हणून सांगायचं. का? तर तिकडे फार लव्ह म्यारिजिस होतात. लोक म्हणतील आई लंडनला असताना आजीने लक्ष दिलं नाही म्हणून असं झालं. एवढा आडवळणाचा विचार करायला कोणाला वेळ असतो असं मी विचारलं, तर मला म्हणाली की विचार न करता बोलणाऱ्यांना वेळ लागतच नाही मुळी! आपण कशाला परीक्षा पहायची?

मी कुठे रहायला गेले, मित्र-मैत्रिणींमध्ये फार वेळ रमले, रात्रीच्या नाटकाला किंवा कार्यक्रमाला गेले किंवा खरं सांगायचं तर अगदी कुठेही गेले तरी मी कधी एकदा घरी जात्ये असं व्हायचं तिला. सगळ्यांबद्दल तिचं असंच होतं, पण माझ्या बाबतीत एक वळसा जास्त. गेल्या वर्षी महाराष्ट्रात मोर्चे निघाले होते तेव्हा विमानतळावरून घरी येण्याआधी एक दिवस मैत्रिणीकडे थांबून येणार होते मी. नको म्हणाली आजी! म्हणे काही नाही होत मोर्च्यामुळे. घाबरतेस कसली? ये तू घरी! दुसऱ्या दिवशी मला गाण्याच्या कार्यक्रमाला दादरला जावंसं वाटत होतं तेव्हा मात्र नाकाबंदी. “मोर्चे चालू आहेत केवढे! काही सांगता येत नाही, ऐकलंस? घरी थांब कशी!” तात्पर्य – घरी थांब.

दातांना ब्रेसेस लावू का विचारलं तर म्हणाली, “तुला कशाला तारा हव्यात भवाने? सुंदर दात आहेत तुझे”. म्हंटलं, “अगं पहिले दोन पुढे आहेत ना!” तर खणखणीत आवाजात, सबंध गल्लीला ऐकू जाईल असं म्हणाली, “पुढे कुठे, काहीतरीच काय? भोपळ्याच्या बियांसारखे सुंदर दात आहेत”.
ही कुठे कॉम्प्लिमेंट असते का? पण तिच्या लेखी होती, त्यामुळे हसून गप्प बसण्याशिवाय पर्याय नसायचा कोणालाच! आपल्या वाट्याला कौतुक आलंय की चपराक हे कळू नये असा तिचा कोकणचा आणि ब्रिटिश खाक्या होता.
माझी पटियाला सलवार कशी आहे? तर सुरेख; आगीचा बंब कमरेला बांधल्यासारखा वाटतोय म्हणे.
मी केलेली उकड कशी झाल्ये? तर मिसळवाणाच्या पाळ्यात सात खण हिंगच भरला होता असं वाटतंय.
मी गणिताचा पेपर कसा सोडवलाय बघ? तर म्हणे खुलासा-कृती इतकी नेटकी का लिहितेस गं? चुकीच्या उत्तराकडे लक्ष जाऊ नये म्हणून?

शाळेतून घरी आलं की हात-पाय धुवून दहा मिनिटं तिच्यासमोर बसायचं असा पायंडा पडला होता. दिवस कसा गेला, काय काय झालं ते तिच्या पुढ्यात बसून ती ताक घुसळत असताना सांगायचं. कधीच असं वाटलं नाही की आपलं ऐकून घ्यायला घरी कोणाला वेळ नाही. वही अपूर्ण असली तरी तिला सांगायचं, मैत्रिणींनी कधी नालायकपणा केला तरी तिला सांगायचं. ज्या मित्र-मैत्रिणींबद्दलची माझी पारख गंडली होती तिथे तिला आधीपासूनच काळंबेरं दिसायचं. त्यांच्याशी कितीही छोटे किंवा मोठे वाद झाले तर “सगळ्यांचे नखरे झेलत दरवेळी तुला नमतं घ्यायची काही गरज नाहीये” असा उलटा ओरडा बसायचा मला.

कितीतरी गाणी म्हणायचो आम्ही. पणजी आजीपासूनची ही गाणी अजूनही आमच्या तोंडी असतात ती आजीमुळेच! गावात रमत-गमत जाऊन दुकानं बघायची, घरासाठी वस्तूंची खरेदी करायची, असलं तिला खूप आवडायचं. माझ्या बहिणीच्या लग्नात तिने माझी पैठणी नेसायला मागून घेतली होती पण कपड्यालत्त्याच्या बाबतीत एरवी माझी-तिची आवड कधी जुळली नाही. मी कपड्यांचे रंग चुटुक घेत नाही, सगळे मळखाऊच असतात अशी तक्रार असे नेहमी तिची. तेच रंग तिच्या साड्यांचे असले की मात्र ती त्यांना मळखाऊ नव्हे, “सुरेखसे इंग्लिश कलर” म्हणायची.

आमटी भात हे आमच्या घरातलं सर्वोच्च सत्य आहे; घरातलं अग्निहोत्र आहे. बाहेर जेवायला जाण्याआधी मित्र-मैत्रिणी घरी आले की आमटीच्या वासाने घरीच रेंगाळून नुसती आमटी पिऊन मग निघायचे. आजीलाही कोण सुख वाटायचं. “त्याला काय होतंय, सूप पिऊ नका फार तर!” बिनमसाल्याची आमटी, डाळ-वांगं, वाटपाची आमटी, सांबार, आणि खूपच थ्रिल हवं असेल तर लसूण मार के आमटी! त्यावर तुम्हाला हवं-नको असलं तरी तूप. चुकून कधीतरी मी तुपाला नाही म्हणाले होते तेव्हा तिने एका ओळीत गीता सांगितली होती. “तुपाने वजन वाढत नाही, मनासारखं न झाल्याने वजन वाढतं.”

दरवेळी विमानाने परत जाताना मेथीचे पराठे (“ते पिठात कालवून केलेले कोरडे ठाण नव्हे, भाजी भरून केलेले खुसखुशीत”), सांज्याच्या पोळ्या, डिंकाचे लाडू अशी बाळंतिणीच्या आहाराला लाजवणारी शिदोरी द्यायची ती माझ्याबरोबर. विमानातल्या भवान्यांना स्वयंपाक येत नाही म्हणून हा सगळा खटाटोप... आणि काय दैवी चव तिच्या हातची! कोळाचे पोहे, पातोळे, पानगी, फणसाची भाजी, कुळथाचं पिठलं, डाळिंब्यांची उसळ, फोडणीची मिरची, एवढंच कशाला, तिने कालवलेला ताक-भातसुद्धा तिच्या भाषेत “राजाला भेट देण्यासारखा” असायचा. कधी घाईघाईत मी भाजी करून वाढली तर म्हणायची, “काय गं आज भाजीला आईस-बापूस नाही कोणी?” ती आईस म्हणजे कोथिंबीर आणि बापूस म्हणजे अर्थात नारळ!

गेल्या वर्षी माझी भारतातली फेरी आधी ठरली नव्हती. लहर आली म्हणून मी ग्रीसला जायच्या आधी तीन आठवडे अचानक ठाण्यात आले. सुरुवातीच्या दहा दिवसांत आम्ही खूपदा एकत्र स्वयंपाक केला, गाणी म्हंटली, महत्त्वाच्या विषयांवर गॉसिप टाकलं... आणि पाच ऑगस्टला दैवी आमटी भात करणारी आजी एकवीस ऑगस्टला अचानक नव्हतीच... शेवटचे दहा दिवस ती पलंगाला खिळून होती. ग्लानीत असायची. अन्न-पाणी जवळपास जातच नव्हतं. तरी झोपेतही घरी आलेल्या डॉक्टरबाईंना विचारलंन, “आमटी-भात खाल्लात का?”. त्यावेळी फोडणीचा छान वास आला की म्हणायची, “तुम्ही जेवा म्हणजे माझं पोट भरेल”.

शेवटचे दहा दिवस नाईलाजाने जी काही विश्रांती झाली तेवढीच तिच्या साडे एक्क्याऐंशी वर्षांतली विश्रांती. एरवी अखंड, अविरत, अथक (अशी अजून दहा विशेषणं वापरली तरी अतिशयोक्ती होणार नाही) काम!

मी ग्रीसमध्ये पोचले त्याच दिवशी ती गेली. तिच्या मनाप्रमाणे घरी असताना, नातवंडांचा हात हातात असताना डोळे मिटलेन. ग्रीसमधून फोन करत रहा, मला सांगत रहा, समुद्रात फार खोलवर जाऊ नकोस, चांगल्या माणसांमध्ये आहेस ना एवढं कळवत रहा आणि लिहीत रहा असं मला म्हणाली होती. हे सगळं केलं मी, पण ते ऐकायला तीच नव्हती...

एक दिवस ती नसेल असा विचारही करायला घाबरणारे आम्ही तिच्याशिवाय कसे राहू शकणार आहोत हे मला अजूनही माहीत नाही. तिच्याबद्दल सांगताना प्रत्येक क्रियापद भूतकाळात लिहावं लागतंय म्हणून बोटं भरून येतायत माझी. कधीतरी वाटतं यापुढे कधी ताकावर लोणी येणारच नाही. आमटीला उकळी येणारच नाही. खोबरेल तेलाने कधी केसांची तहान भागणारच नाही... पण तिची तब्येत अचानक खालावल्यावर घरात इतकी धावपळ आणि अस्वस्थता असतानाही मी लंडनला परत जायच्या दिवशी आत्याने माझ्या हातावर द्यायला ताजं दही लावलं होतं. मला विमानात खायला आणि बांधून न्यायला लाडू वळून दिले होते. आत्याला कोणी काही सांगितलं-मागितलं नव्हतं. या गोष्टी झाल्या नसत्या तर मला खरोखर काहीही वाटलं नसतं. पण मी निघयच्या वेळी आजीने चालू केलेली प्रत्येक पद्धत आत्याने जीव ओतून सांभाळली होती. आजी आमच्यात कशी घर करून आहे ते मला आत्यामुळे समजलं होतं.

ताई गुणाची माझी छकुली
झोका दे दादा म्हणू लागली
सांभाळ ताई फांदी वाकली
दोही दोरांना गच्च आवळी

दत्त नावाच्या कवींचं हे गाणं आजी आणि आम्ही अगदी काल परवापर्यंत एकत्र म्हणत होतो. शेवटचं कडवं आठवत नाही, तूच म्हण असं सांगायची ती मला. मला ते ठाऊक होतं तरी मी कधी म्हंटलं नाही कारण ते शब्द विचित्र वाटायचे. त्यावेळी त्यांचा अर्थ लागला नाही, आणि आज अर्थ लागतोय पण आवाज फुटत नाही...

देव दयेचे झाड थोरले
भक्ती-प्रीतीचे दोर बांधले
मोक्षप्राप्तीचा झोका हा बाळे
आनंद देवो तुला वेल्हाळे...

तिच्याबरोबर लहानपणापासून भरपूर वेळ मिळाला आम्हा नातवंडांना. आमच्यावर तिचा विशेष जीव होता. आहे. तिचा नुसता वावर बघून आम्हाला समज आली. तिने केलेल्या कौतुकाने बारा हत्तींचं बळ आलं. इतकी ताकदवान, प्रेमळ, पराकोटीची कष्टाळू, हुशार, अन्नपूर्णेचा अवतार असलेली व्यक्ती एकदाच घडून गेली असावी. मी तिच्यावर रोज एक पुस्तक लिहिलं तरी तिला न्याय देऊ शकणार नाही.

आम्हाला तिची गरज आहे हे कळण्याआधीच आजी कायम शेजारी होती. कान ओढायला, वेण्या घालायला, माझ्या नखऱ्यापायी त्या परत परत घालायला, बडबड ऐकायला, अभ्यास घ्यायला, कविता आणि स्वयंपाक शिकवायला, अगदी अगदी प्रत्येक पायरीवर. यापेक्षा मोठं सुख तरी काय मागावं? तिच्या कुशीत असताना हिंदी सिनेमातला एक डायलॉग आपल्यासाठीच लिहिला असावा अशी खात्री पटली – “उनके होते हुए दुनिया की कोई ताकद हमारा बाल भी बांका नहीं कर सकती”. तिच्या आठवणीने पोटात खड्डा पडतो, पाय लटपटतात, पण तरीही कुठेतरी सुरक्षित वाटतं. कुठली कवच-कुंडलं होती तिच्या कुशीत कुणास ठाऊक? आमची खास मैत्रीण, गुरू, गॉसिप गर्ल ऑगस्टमध्ये निघून गेली असली तरी मऊमऊ लोण्याची ती ढाल आम्हाला अभेद्य करून गेली…

आणि आता वर देवांच्या पंगतीला बसली असेल. अर्थात आमटी भाताच्या...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इतकं सुंदर लिहिलंय.... काळजाला भिडणारं..... आपल्या वडिलधार्‍यांची आठवण करू देणारं..... दूर कुठे तरी ते दिसताहेत का शोधायला लावणारं..... त्यांच्या मायेची दुलई अन त्यात गुरफटून लावणारं लिखाण.... नुसत लिखाण नाही... एक पर्वाचा सुंदर प्रकाशात ...चांदण्यात न्हाऊ घालणारा प्रवास..... जियो

सुरेख लिहीलय..
गोड आज्जीच गोड चित्रण

रेव्यु+!१११११
अनुमोदन

वाचता वाचता स्क्रीन केव्हा धूसर झाला कळलेच नाही....

लेखनशैली केवळ सुंदर....

लोण्यासारख्या आजींनी अंतःकरणाचा ठाव केव्हा घेतला कळलेच नाही.... शिर साष्टांग नमन...

आमटीचा दरवळ इथपर्यंत पोहोचलाच...

काही बाबतीत तू माझ्याच आज्जीबद्दल लिहिलंयस कि काय असं वाटलं ! वाचताना भरून आलं .. क्षणभर मऊ नऊवारी ची ऊब जाणवली ! तुझ्या लिखाणातून १-२ दा भेटली होती आजी या आधी मला वाटतंय .. ती आता नाही हे वाचून वाईट वाटलं _/\_

एकदा घरातल्या कार्याच्या धावपळीनंतर मला तिच्या शेजारी अशीच झोप लागली आणि मग तिचे ऐंशी वर्षांचे हात माझ्या अठ्ठाविशीच्या पायांना तेल लावून द्यायला लागले. मी झोपल्ये असं बघून तिने तेलाचा हात चेहऱ्यावरून फिरवला कारण जागेपणी मी तोंडापाशी तेल येऊच दिलं नसतं. तेल लावताना माझे गाल ओले लागले तेव्हा दोन्ही हातात माझा चेहरा घेऊन बसून राहिली आजी अर्धा तास. मला डोळे उघडायचं धाडस करवलं नाही..>>>

किती रडवतेस ग साध्या साध्या वाक्यातुन तु नेहेमी...आणी हा तर आज्जी वरचा लेख..
आत्ता या क्षणी आज्जीला पळत जाउन मिठी मारावीशी वाटतेय मला...
आमटी भात, लोण्याचे हात, खोबरेल तेल सगळं सगळं तेच आणि तसचं असतं बहुतेक सगळ्या आज्ज्यांचं...

आजी डोळ्या समोर उभी राहिली.
मन:पूर्वकनमन. माझ्या आजीच्या आठवणींच्या मऊ मऊ लुगड्याच्या गोधडीत शिरल्या सारखंं अनुभवलंं

किती सुरेख लिहितेस ग तू!
आमचीही आजी होती,पण काय कोणास ठाऊक खटखटीत होती.असं काही अलवार नाही अनुभवलं. लहानपणी रात्रीची तिला उठवायचे.बिचारी न करवादता उठायची खरी.तेवढीच काय ती मऊ आठवण.

खरोखरच साष्टांग नमस्कार लेखिकेला. इतकं अलवार लिहिले आहे की शब्दच नाहीत माझ्याकडे कौतुक करायला

एका ओळीत गीता >>>
अगदी अगदी १००%

बोटं भरून येताहेत >>> शप्पथ ... काळजाला हात
सुरेखच लिहिलं आहेस. कसं सुचतं गं ... लिहीत रहा ! <3

फारच मस्त लिहिलेयस गं.. एकदम हळवं..
माझ्या दोन्ही आज्ज्यांची आठवण झाली.
आज्ज्या अशाच असतात सगळ्या मायाळू. आजीला (बाबांची आई) भेटायला येणार त्या दिवशीच मी विमानप्रवासात असताना ती वारली . अजूनही खोल जखम आहे काळजात आमची शेवटची भेट न झाल्याची. ती आठवली की आठवतात दुधा-तुपाचे सायी लोण्याचे हात, गोधडी, खोबरेल तेलाचा वास, तिचे काळेभोर लांब केस, केशररत्न सुपारीचा घमघमाट, जोडीला राजा-सोन्या आता कधी भेट?

आईची आई ८२ वर्षाची. आता थोडी थकलेय. पण भारतात असताना माझी ती खास मैत्रीण. वाचायला, फिरायला, लायब्ररीत जायला, निरनिराळ्या विषयांवर गप्पा मारायला, जुने किस्से सांगायला, मामीच्या लटक्या तक्रारी करायला मी तिची पार्टनर Wink
ती म्हणते मी तिला आज्जी गं अशी काही वेगळीच हाक मारते, इतर नातवंडांच्या सारखी नाही . तिला काय सांगू या हाकेत आहे इतक्या वर्षांचा दुरावा, प्रेम, कधी भेटायला मिळणार याची आतुरता, खूप काही सांगायच्या गुजगोष्टी.

खूपच मस्त लिहिलंय.आजीची आठवण, दुःख सगळं उघड पूर्ण लेख जाणवू न देता आणि तरीही तुला तिची किती आठवण येते हे मनाच्या मागे सतत जाणवत राहील असं खुसखुशीत.

प्रतिक्रिया लिहिण्यासाठी शब्दच सुचत नाहीत. डोळे भरून आले. तुझ्या ग्रीसच्या लेखमालेत कुठेतरी चुटपुरता उल्लेख केला होतास त्यावरून वाटलं होतं असं काही तरी झालं असणार.
पहिलं अवतरणही आवडलं.

निव्वळ अप्रतिम लिहिले आहेस ग.
सकाळी सकाळी ट्रेन मध्ये वाचताना डोळे भरून आले .अशी आजी सगळ्यांना मिळूदे.
अशी आजी काही मला लाभली नाही कारण मी लहान असतानाच ती देवाघरी गेली. पण हा लेख वाचल्यावर असे वाटले कि माझ्या नातवंडांसाठी मी अशीच आजी व्हायला पाहिजे Happy

अर्निका खूप सुंदर लिहिलय! आजी बद्दलचा जिव्हाळा वाक्यावाक्यातून जाणवतो आहे.
देव दयेचे झाड थोरले
भक्ती-प्रीतीचे दोर बांधले
मोक्षप्राप्तीचा झोका हा बाळे
आनंद देवो तुला वेल्हाळे...
हे वाचून अंगावर काटा आला.

कधीतरी वाटतं यापुढे कधी ताकावर लोणी येणारच नाही. आमटीला उकळी येणारच नाही. खोबरेल तेलाने कधी केसांची तहान भागणारच नाही... खूप हृद्य आठवणी....

Pages