पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – ३०. उडन खटोला (१९५५)

Submitted by स्वप्ना_राज on 11 March, 2019 - 12:45

udan1.jpg

मला गोल्डन एरामधली गाणी ऐकायचं आणि पाहायचं वेड लहानपणी नक्की कधी लागलं ते आठवणं आता कठीण आहे. असली वेडं कधीच बरी होत नाहीत ते एक बरं आहे. कधीतरी असंच गाणी पाहताना एका गाण्यात आकाशातून उडत जाणारं विमान आणि त्याकडे पहात जमिनीवर घोड्यावरून दौडत गाणं म्हणत जाणारा बायकांचा जथ्था दिसला. पुलं.च्या लेखातल्या पानवाल्याच्या ठेल्यावरच्या बाहेर वेलकम पाटी असलेल्या राजवाड्यात वरून विमान उडत जाताना कृष्ण-राधा नृत्य करताना दाखवलेल्या चित्राची आठवण व्हावी असंच हे दृश्य. कुठला बरं हा चित्रपट? आणि काय असेल त्याची कथा? उत्सुकता वाढली. पण तेव्हा गुगलबाबांचा जन्म झाला नसल्याने आईवडिलच गुगलचं काम करीत. मातेचरणी शरण गेल्यावर ‘उडन खटोला’ हे चिवित्र नाव असलेल्या ह्या चित्रपटाची थोडी माहिती मिळाली. ‘उडन’ म्हणजे उडणारा हे लक्षात आलं तरी हिंदी पाचवी ते सातवीच शिकल्याने (नाही, तशी सातवीच्या पुढे शिकलेय मी. गैरसमज नको. आठवी ते दहावी स्कोरिंग सब्जेक्ट म्हणून संस्कृत निवडलं त्यामुळे हिंदी सुटलं) ‘खटोला’ हे प्रकरण काही झेपलं नाही. आपल्या ‘खटारा’ ह्या मराठी शब्दाशी साधारण साम्य असलेला हा शब्द ‘रथ’ किंवा 'वाहन' अश्या काहीतरी अर्थाचा असेल अशी समजूत करून घेतली. आता एका टिचकीसरशी माहिती मिळायच्या काळात हे ‘समजूत करून घेणं’ कालबाह्य झालंय. असो. एकूणात हे सगळं कथानक विमानामुळे घडत असणार हे मातोश्रींनी सांगितलेल्या माहितीवरून पक्कं झालं. पुढे कधीतरी पाहू चित्रपट असंही वाटून गेलं. तो योग मागल्या वर्षी येता येता हुकला. ज्या लॅपटॉपवर चित्रपट डाऊनलोड करून घेतला होता त्याने राम म्हटला. मग गेल्या विकांताला चित्रपट बघायच्या इच्छेने पुन्हा उचल खाल्ली. ती इच्छा यथावकाश फलद्रूपही झाली. तेव्हा आता ह्या चित्रपटाबद्दल.....

चित्रपटाची सुरुवात होते तेव्हा तुफान समुद्रात उंच उफाळणाऱ्या लाटांवर हेलकावे खाणारी एक नाव दिसते. नावेतले लोक कसेबसे जीव वाचवायचा यत्न करत असतात. पण शेवटी नाव काही तगत नाही हे लक्षात येताच त्यांचा कप्तान त्यांना समुद्रात उडी घेऊन जीव वाचवायला सांगतो. ते तसं करतातही. त्यातला एक किनार्याला लागतो. आपण कुठे आलोय ह्याची काहीही कल्पना नसलेला तो माणूस निवार्याच्या शोधात दाट जंगलात इथेतिथे फिरत असताना त्याच्या कानांवर गाण्याचे सूर येतात. इथे कुठेतरी माणूस आहे हे जाणवून तो उत्साहाने पुढे जातो तर त्याला एक झोपडी दिसते. आत एक अतिशय ‘जख्ख’ ह्यां एकाच शब्दाने वर्णन करता येईल असा म्हातारा असतो. तो माणूस त्या म्हातार्याला आपल्यावर आलेला प्रसंग सांगून फक्त एका रात्रीपुरता निवारा द्यायची विनंती करतो. म्हातारा त्याला रहायची परवानगी देतो. पण विश्रांतीसाठी आतल्या खोलीत गेलेला तो माणूस आतलं दृश्य पाहून थोडा भेदरतोच. अस्ताव्यस्त पडलेलं सामान, चित्कारणारे पक्षी, कोळीष्टकं, अंधार ह्यांचं साम्राज्य पाहून तो जीव मुठीत धरून पलंगावर लवंडतो खरा. तेव्हढ्यात त्याला पुन्हा त्याच गाण्याचे सूर ऐकू येतात – पण ह्यावेळी ते सूर असतात एका स्त्रीचे. तो खोलीच्या खिडकीतून बाहेर डोकावून पहातो तेव्हा त्याला आकाशमार्गे येणारा घोडे ओढत असलेला एक रथ दिसतो. त्या रथाचं सारथ्य एक तरुण स्त्री करत असते आणि तीच ते गाणं म्हणत असते. रथ पृथ्वीवर टेकतो तेव्हा ती स्त्री धावत झोपडीपाशी येऊ लागते. हे विलक्षण दृश्य पाहून त्या माणसाची पाचावर धारण बसते. घाबरून तो त्या म्हातार्याला हाका मारू लागतो. त्याचा आवाज ऐकताच ती स्त्री दचकते, मागे फिरून पुन्हा रथावर स्वार होते आणि बघता बघता रथ आकाशमार्गे अदृश्य होतो. ती स्त्री निघून गेलेली पाहून तो म्हातारा त्या खलाश्याला मारायला लागतो. पुन्हा पुन्हा म्हणायला लागतो की ती आता पुन्हा कधीच येणार नाही. त्या खलाश्याला काय चाललंय काही कळतच नाही. तो म्हातार्याला ह्या सगळ्याचा खुलासा विचारतो. म्हणतो की मी माझा जीव देऊनसुध्दा त्या स्त्रीला परत आणेन. तेव्हा म्हातारा त्याला एक गोष्ट सांगतो.....चाळीस वर्षांपूर्वी घडलेली गोष्ट.

गोष्टीत असतं एक विमान. उंच आकाशातून जाणारं. ज्या प्रदेशावरून ते उडत असतं तो बाकी जगापासून काहीसा तुटलेला असा असतो. ह्या प्रदेशावर सत्ता असते ती बायकांची. ही जमात संगा नावाच्या दैवताची आराधना करत असते. विमान चालवणाऱ्या वैमानिकाला खरं तर ह्या गोष्टी माहित झाल्याही नसत्या कदाचित पण आपल्या मार्गाने नीट जाणारं त्याचं विमान अचानक सूर मारतं आणि क्षणार्धात जमिनीवर कोसळतं. हे दृश्य पाहणारा बायकांचा एक जथ्था त्या वैमानिकाला विमानाच्या अवशेषातून बाहेर काढतो. त्यातली सोनी नावाची तरुणी त्याला आपल्या घरी घेऊन जाते. तिचा भाऊ हिरा वैमानिकावर उपचार करतो. शुद्धीवर आल्यावर त्या वैमानिकाला, काशीला, समोर सोनी दिसते खरी पण ती त्याच्या सगळ्या प्रश्नांना खुणांनी उत्तरं देते. काशीचा गोंधळ पाहून हिरा खुलासा करतो की त्यांच्या प्रदेशात कोणतीही स्त्री परपुरुषासमोर बोलत नाही. अपवाद फक्त त्यांचा ज्यांची तिने आपल्या स्वयंवरासाठी निवड केली आहे. हिरा त्याला हेही सांगतो की सगळे रस्ते बंद असल्याने त्याला सध्या त्यांच्या नगरातून बाहेर पडता येणं शक्य नसलं तरी त्यांच्या कायद्यानुसार त्याला आठ दिवसांच्या वर तिथे राहताही येणार नाही.

ते दोघे बोलत असताना तिथे राज्यातला मुख्य सरदार शानू येतो. तो हा परदेशी इथे राहू शकणार नाही असं हिराला सुनावतो. हिरा वैमानिकाला आपले वडील महाशक्ती, जे तिथल्या राणीचे गुरु असतात, त्यांच्याकडे घेऊन जातो. ते सगळी हकीगत ऐकून घेऊन राणीच ह्याचा फैसला करेल असं सांगतात. त्यानुसार वैमानिक - ज्याला सगळे परदेशी अशीच हाक मारत असतात – राणीला भेटायला जातो. पण त्याने तिथे काही दिवस राहू द्यायची परवानगी मागताच राणी त्याच्याकडे न पाहताच ती मिळणं अशक्य असल्याचं सांगते. परदेशी लोक विश्वास ठेवायला लायक नसतात असं त्या सगळ्यांचं मत असतं. राणी तिच्या सेवकांना त्याला घेऊन जायला सांगते तेव्हढ्यात तिचं त्याच्या चेहेर्याकडे लक्ष जातं. ती त्याच्यावर बेहद्द खुश होते आणि त्याला रहायची परवानगी देते. पण इथल्या तरुण स्त्रियांपासून लांब राहा अशी तंबीही त्याला द्यायला ती विसरत नाही. त्यांचे कायदे ह्याबाबतीत परदेशी लोकांसाठी फार कडक असतात म्हणे.

अर्थात हा कायदा तिला स्वत:ला लागू होत नसावा कारण तिथे रहायची परवानगी देणारं राणीचं फर्मान घेऊन आलेला शानू त्याला राणीने राजवाड्यात बोलावलं असल्याचं सांगतो. राणी परदेशीवर खुश आहे हे लक्षात येताच सोनीचा जळफळाट होतो. कारण तीही त्याच्यावर लट्टू असते. त्या तिरमिरीत पुरुषी वेश परिधान करून आपलं धनुष्य घेऊन ती लपतछपत राजवाड्यात प्रवेश मिळवते. राणीला परदेशीसोबत बसलेली पाहून रागाने ती बाण सोडते तो नेमका राणीच्या डोक्यावर असलेल्या खांबात घुसतो. संतापून राणी तिचे हात तोडायची शिक्षा देते. पण परदेशी मध्यस्थी करतो. हा माझा मित्र शिबू आहे आणि त्याने माझे प्राण वाचवले आहेत असं तो राणीला सांगतो. शिबूसुध्दा मी माझ्या लाडक्या पोपटाला ससाण्याच्या तावडीतून वाचवायला बाण मारला असं सांगतो. राणीचा विश्वास बसतो आणि ती शिबुची शिक्षा माफ करते. त्यानंतरही अश्या काही घटना घडतात ज्यामुळे राणी आणि परदेशी दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे असा सोनीचा गैरसमज होतो. पण परदेशी तो दूर करून त्याचं तिच्यावरच प्रेम आहे हे तिला पटवून देतो. सोनी हिरालाही आपल्या प्रेमाबद्दल सांगते.

पण राणी काही परदेशीची पाठ सोडायला तयार नसते. ती शानूकरवी आपली अंगठी परदेशीकडे पाठवते. तर सोनी शिबुच्या रुपात जाऊन परस्पर ती परत करून येते. भडकलेली राणी परदेशीला देश सोडून जायचं फर्मान काढते. मग मात्र सोनीचा नाईलाज होतो. ती शिबुच्या रुपात परदेशीला स्वत: राणीकडे घेऊन येते. परदेशीसोबत शिबुलाही राजवाड्यात रहायची परवानगी मिळते. आणि मग ‘रानीके नांकके नीचे’ परदेशी आणि शिबुच्या रूपातली सोनी दोघांची प्रेमकहाणी बहरत जाते.

udan2.jpg

परदेशीला आपल्याकडे आकृष्ट करून घ्यायचे राणीचे प्रयत्न चालूच राहतात. सोनी ते यथाशक्ती परतवून लावायचा प्रयत्न करते. एकदा ह्या प्रयत्नात तिला शिरच्छेदाची शिक्षा होऊ नये म्हणून तिला चाबकाचे फटके मारायची वेळसुध्दा परदेशीवर येते. वैतागलेली राणी शेवटी शिबू उर्फ सोनीला राजवाड्यातून हाकलून लावते.तरीही ती आणि परदेशी भेटतच राहतात. ते पाहून सोनीवर डोळा ठेवून असणारा शानू गावकर्याना दोघांविरुध्द भडकावतो. ते निर्दोष असल्याची खात्री असलेले महाशक्ती राणीने गावकर्यानी दोषी ठरवलेल्या एका जोडप्याचा निवाडा करावा अशी तिला विनंती करतात. ते जोडपं म्हणजे परदेशी आणि सोनी आहेत हे माहित नसलेली राणी राजी होते. पण जेव्हा ती त्या दोघांना बघते तेव्हा शिबू = सोनी हे समीकरण तिच्या लक्षात येतं. ह्या विश्वासघाताने चवताळून ती सोनीला अग्निपरीक्षा द्यायची आज्ञा करते. ती ह्या परीक्षेत यशस्वी होऊ नये अशीही तजवीज करते. तरीही परदेशीवर खरं प्रेम असणारी सोनी ह्या अग्नीपरीक्षेतून तावूनसुलाखून सुखरूप बाहेर पडते. त्या दोघांवरचा आरोप खोटा असल्याचं आपोआप सिद्ध होतं. पण.....

पण पुढे काय होतं? सोनीला तिचं प्रेम मिळतं? का परदेशीला तो देश सोडून जावा लागतो? ह्या गोष्टीचा झोपडीतल्या त्या म्हातारयाशी काय संबंध असतो? रथातून पृथ्वीवर येणारी ती स्त्री कोण असते? ती कोणासाठी आलेली असते? हे प्रश्न पडले असतील तर उत्तरं मिळवायला हा चित्रपट पाहायला हवा. पण पाहायला हवा’च’ असंही काही नाही. म्हटलं तर ही कहाणी कोण्या एका आटपाटनगराची, त्या नगरातल्या कोणा दोन प्रेमी जीवांची अन त्यांच्या प्रेमात बिब्बा घालणाऱ्या दुष्ट राणीची. शतकानुशतकं ह्या जगात कोणा ना कोणासोबत घडणारी. हां, आता हिंदी चित्रपटांच्या नेहमीच्या कथानकांच्या मानाने गोष्ट थोडी वेगळी आहे हे कबूल. पण चित्रपट ’५५ सालचा आहे हेही लक्षात घ्यायला हवं बरं का. अर्थात प्रेमाच्या आणि राजाराणीच्या गोष्टी आवडत असतील तर तुम्ही तो पाहणारच म्हणा. पण मग पुढला लेख वाचू नका म्हणजे झालं. Happy

चित्रपटातल्या मुख्य व्यक्तिरेखात ओळखीचे चेहेरे मोजकेच. वैमानिकाची भूमिका दिलीपकुमारने केलीय. ह्याचं नाव ‘काशी’ असतं हे विकिपीडिया वाचून मला कळलं. नाहीतर चित्रपटभर हे नाव ऐकल्याचं मला तरी आठवत नाही. सगळे आपले त्याला परदेशीच म्हणत असतात. “What’s in a name?” म्हणणाऱ्या शेक्सपियरचं आणि ह्यांचं चांगलं जमलं असतं नाही? आता ‘दिलीपकुमार’ ह्या विषयावर माझं मत फारसं बरं नाही - अनेक वर्षांपूर्वी आलेला त्याचा रंगीत मुघल-ए-आझम पाहून आल्यापासून. तो चित्रपट अर्धवट टाकून निघून आले नाही ते माझ्या लाडक्या मधुबालामुळे. पण ह्या चित्रपटात तो चक्क अभिनय करताना दिसतो. हसायचं तिथे हसतो (आणि चक्क क्युट दिसतो!), रडायचं तिथे रडतो. कधी गोंधळतो, कधी मिश्कील होतो, कधी वैतागतोदेखील. फक्त त्या शेवटच्या भयानक वाढलेल्या दाढी-मिशांत थोडा उपरा वाटतो. अर्थात तो नेहमीप्रमाणेच तोंडातल्या तोंडात बोलून आपल्याला डायलोग कळू नयेत ह्याची पुरेपूर दक्षता घेतोच. सोनी झालेली निम्मी दिसलेय छान. पण कधीकधी तिचा अभिनय थोडा वेडगळपणाकडे झुकतो असं मला नेहमी वाटत आलेलं आहे. राणीची महत्त्वाची भूमिका सूर्याकुमारी नावाच्या कोणा तेलुगु अभिनेत्रीने केली आहे. High cheekbones असलेली ही नटी राणी म्हणून अगदी शोभलेय. राणीचा ठसका, रुबाब, ‘मी म्हणेन ती पूर्व दिशा’ ही वृत्ती, परदेशीच्या प्रेमात पडल्यावरचा तिचा नखरा तिने झक्कास साकारलाय. पण तिच्याही अभिनयात कधीकधी खास दाक्षिणात्य बटबटीतपणा डोकावून जातो. शानुच्या बेरकी भूमिकेत खलनायक जीवन आपलं ब्लडप्रेशर वाढवतात. आगा (हिरा) आणि टुणटुण (हिराच्या मागे लग्नासाठी हात धुवून लागलेली स्त्री) ह्या दोघांकडे चित्रपटाची विनोदी बाजू सांभाळायची जबाबदारी आहे. महाशक्तीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याचं नाव विकीपिडियावरही स्पष्ट दिलेलं नाहीये.

गाण्यांबद्दल म्हणाल तर संगीत नौशादका, बोल शकील बदायुनीके, आवाज लता मंगेशकर और मोहम्मद रफी.  गाणी बरीच आहेत पण माझी खास आवडती म्हणजे उडत्या चालीचं टायटल सॉंग मेरा सलाम ले जा, हमारे दिलसे न जाना, मोहब्बतकी राहोमें चलना संभलके, मोरे सैय्याजी उतरेंगे पार आणि ओ दूरके मुसाफिर. पैकी टायटल सॉंग आणि ओ दूरके मुसाफिर सोडल्यास बाकीची ३ पाहून ‘ही ह्या पिक्चरमधली आहेत?’ अशी माझी रिएक्शन झाली.

आधी म्हटल्याप्रमाणे चित्रपट ’५५ सालचा आहे. तेव्हा आजच्या चित्रपटांच्या तुलना करून त्याच्याकडे पाहणं अन्यायकारक ठरेल. तरीही काही त्रुटी टाळता आल्या असत्या असं वाटतंच. उदा. चित्रपटाचा नक्की काळ आणि स्थळ स्पष्ट होत नाही. राणी काशीला ‘तू कुठून आला आहेस’ असं विचारते तेव्हा तो ‘हिंदुस्थानहुन’ असं उत्तर देतो. ह्याचा अर्थ ते नगर भारतात नसतं. पण तरी तिथे लोक स्वच्छ हिंदी बोलत असतात. आणि एका संवादात तर चक्क कबड्डीचाही उल्लेख होतो Happy तसंच ह्याचं विमान त्या भागातून उडत जात असतं म्हणजे तो प्रदेश अगदीच अज्ञात नसावा. रस्ते बंद झाल्याने काशीला तिथून निघता येत नाही असा उल्लेख येतो पण रस्ते बंद असल्याचं कारण कळत नाही. आकाशात उडणारं विमान सुपरइम्पोज केलं असल्यामुळे फारच मोठं दिसतं. त्या ऐवजी एखाद्या विमानाचा आकाशात उडताणाचा स्टोक शॉट वापरायला हवा होता. तिथल्या स्त्रिया परपुरुषाशी बोलत नाहीत असाही उल्लेख येतो पण सोनी नंतर काशीशी बिनधास्त बोलताना दिसते. बाकी स्त्रियाही उदा. राणीची दासी परपुरुषाशी बोलताना दिसतात. तसंच नावांत बसून गाणी गाणारे स्त्रिया-पुरुष एकत्रच बसलेले दिसतात. महालाचा सेट छान असला तरी एका ठिकाणी चक्क फिश टँक मध्ये मासे ठेवलेले पाहून मी चमकलेच. काशीच्या मृत शरीरातून त्याचा आत्मा बाहेर पडतो तोही म्हातारा असतो. मला त्यातून तरुण आत्मा निघेल असं वाटलं होतं Happy सोनीला दगड मारायला निघालेल्या नागरिकांना महाशक्ती ‘ज्यांनी पाप केलं नाहीये त्यांनीच फक्त दगड मारा’ असं सांगतात ते पाहून ह्यांनी बायबल वाचलं होतं का काय अशी शंका येते. सोनी काशीला न्यायला यायला इतकी वर्षं का लावते तेही कोडं उलगडत नाही.

एक जमेची बाजू म्हणजे देशाचे कायदेकानू राज्यकर्त्यांना लागू नसतात, फक्त जनसामान्यांसाठी असतात हे त्रिकालाबाधित सत्य इथेही पाहायला मिळतं. राणी खुलेआम काशीला भेटतेय ह्याबाबत कोणीही आक्षेप घेत नाही. मात्र सोनीला अग्निपरीक्षा द्यायला लावली जाते तेव्हा कोणी विरोध करत नाही. अमिरोंका खून खून, गरीबोंका खून पानी! सोनीला दगड मारायला निघालेले लोकच ती अग्निपरीक्षेतून सुखरूप बाहेर पडते तेव्हा तिला खांद्यावर घेऊन नाचतात. हेही जनरीतीला धरूनच.

आभासी जगाच्या दुनियेत असे वास्तव जगाचे तुकडे दिसणं अपरिहार्यच. शेवटी काय तुम्ही आम्ही जे जगतो तेच आपल्यासाठी आयुष्य असतं. हो ना?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लहानपणी बघितला होता आणि तेंव्हा खूप आवडला होता. त्या काळात ते vfx Wink भारी वाटले होते. ढगांवरून येणारा तो रथ अजूनही डोक्यात आहे.

अजून एक प्रचंड आवडलेले म्हणजे एक गाणे जे तुझ्या यादीत नाहीये - ओ दूर के मुसाफीर! तेंव्हा ते त्या सेटमुळे आवडले होते. आणि आता आवडते ते त्याच्या लिरिक्समुळे आणि नौशादच्या संगितामुळे. 'चले आज तुम जहांसे हुइ जिंदगी परई, तुम्हे मिल गया ठिकाना हमे मौत भी ना आई' आज शब्द ऐकताना अंगावर काटा येतो. ट्रॅजेडी किंगकरता ते गाणे सादर करणे म्हणजे डाव्या हाताचा मळ होते त्यामुळे बघायलाही छान वाटते.

स्वप्ना, नेहमी प्रमाणे खुशखुशीत लिहिले आहेस !​+ १

तुम्ही लिहिता असं की पहायची इच्छा होते.
हा चित्रपट पहायची माझीही इच्छा आहेच आधीपासून.

माधव धन्यवाद! चित्रपट पाहताना फोनवर प्लॉट्ससोबत मी गाण्यांची नोंद करत नाही. लेख लिहिताना विकिवर पाहून गाण्यांची लिस्ट देते. ती सवय नडली. 'ओ दूरके मुसाफिर' ची सुरुवात 'चले आज तुम जहा से' ह्या शब्दांनी आहे. विकीवरसुध्दा तशीच नोंद आहे. पण माझ्या हे लक्षात आलं नाही आणि गाणं मिस झालं. आता गाण्यांची नोंदही ठेवावी लागेल. शॉर्ट कट कामी येत नाही हेच खरं. चूक सुधारली आहे. लक्षात आणून दिल्याबद्दल पुन्हा एकवार आभार Happy

मानव, सरि आभार Happy

मस्त परीक्षण. मला फक्त दिल का सलाम लेजा. गाणे माहीत होते. व विमान म्हणजे उडन खटोला हे ह्या सिनेमाच्या नावावरूनच कळले.

उडन खटोले पे उड जाऊ, तेरे हाथ ना आऊ हे गाणं लागायचं लहानपणी रेडिओवर, शमशाद बेगम आणि जोहरबाईंचं. त्यावरून उडन खटोला म्हणजे उडण्याचं कसलं तरी विमान हे कळलं. ते गाणं या चित्रपटातलं असावे असे आधी वाटायचे, पण ते अनमोल घडी मधलं आहे.

मस्त परीक्षण. गाणी आवडतात म्हणून मी सिनेमा पहाण्याचा प्रयत्न केला होता. पण अर्ध्यातच कंटाळा आला. फक्त गाणी पाहिली सगळी.

खूप मस्त लिहिलंस ग नेहमीप्रमाणे. मी बघितलाय उडन खतोला, पण आता पूर्ण विस्मरणात. फक्त गाणी लक्षात आहेत.

ओ दूर के मुसाफिर मास्टर पीस आहे एकदम..

पोस्टरवर उरन लिहिलंय Happy
नवीन Submitted by सस्मित on 12 March, 2019 - 14:53

इंग्रजी स्पेलिंग बनवताना

ड = र

साडी = सारी

पूर्वी अशाच फँटसी बनत होत्या. परीक्षण छानच लिहीलेस स्वप्ना. जमल्यास पारसमणी बद्दल पण लिही पुढे, जेव्हा तुला पहायला मिळेल तेव्हा. मी अगदी लहानपणी पाहीला होता तो. त्यातला मोठ्ठा कोळी मात्र लक्षात राहीला होता, जेव्हा तो नायकाला आपल्या जाळ्यात पकडुन मारायला बघतो तेव्हा मी जाम घाबरले होते.
Parasmani.jpg

सुवर्णसुंदरी नावाचा पण एक छान सिनेमा होता. ज्यातले कुहु कुहु बोले कोयलीयां हे लता-रफीचे गाणे प्रचंड गाजले होते.

Suvarnsundari.jpg

इंग्रजी स्पेलिंग बनवताना
ड = र>>> असं काही नाही.

इंग्रजीत साडीला सारी म्हणतात म्हणुन तशी स्पेलिंग.
उडन शब्द इंग्रजीत पण आहे का?
udaan.jpg

छान लिहलंय नेहमीप्रमाणे.
मला वाटतं ओ दूर के मुसाफिर गाणे टीव्हीवर पाहिल्यावरच मी तरुण दिलीपकुमारच्या प्रेमात पडले होते. त्याआधी फक्त देवानंद आवडायचा.

दोनदा माझी प्रतिक्रिया गायब झाली.

परीक्षण अर्थात उत्तम आहे.

डोंबाऱ्यासारखी दोरी वरून चालणारी निम्मी आठवली. ती जिंकते आणि मग आगीत उडी घेते अस मला वाटतं. नक्की शेवट काय आहे? कारण त्याकाळी दुरदर्शनवर कधीही चित्रपट संपवून टाकायचे

मला तर चित्रपटही आठवत नाही पण नऊच्या बातम्यांआधी चित्रपट संपला नाही तर निर्दयपणे तो बंद करून बातम्या सुरू करायचे हे आठवतेय.

महेश भटचा एक चित्रपट (बहुतेक जनम) लागलेला, साक्षात पंप्र राजीवजीही आमच्यासारखे भावुक होऊन तो पाहत असताना अचानक वरील निर्दयी नियम त्यांच्या लक्षात आला. त्यांनी तात्काळ दूरदर्शनला फोन करून बातम्या थोड्या पुढे ढकलून चित्रपट पूर्ण दाखवायची विनंती केली होती ही बातमी तेव्हा थोडीफार गाजलेली.

अमा, मानव, स्निग्धा, अनघा, किल्ली, साधना, सस्मित, बिपीन चन्द्र हर..., रश्मी, अ‍ॅमी, गुगु धन्यवाद Happy

>>जमल्यास पारसमणी बद्दल पण लिही पुढे
बापरे! महिपालला कसाबसा सहन करत एकदा पाहिला होता. Happy पाहेन नक्की परत तू सांगितलंस म्हणून. मला काही तो कोळी आठवत नाही. सुवर्णसुंदरी काय आहे ते पाहिलं पाहिजे.

>>मला वाटतं ओ दूर के मुसाफिर गाणे टीव्हीवर पाहिल्यावरच मी तरुण दिलीपकुमारच्या प्रेमात पडले होते.
ह्या चित्रपटात तो छान दिसतो. मला मधुमती मध्येही आवड्ला होता.

>>मला तर चित्रपटही आठवत नाही पण नऊच्या बातम्यांआधी चित्रपट संपला नाही तर निर्दयपणे तो बंद करून बातम्या सुरू करायचे हे आठवतेय.

ये आपुनको नही आठवता बॉस. कैच्याकैच नियम. राजीव गांधी दूरदर्शन्वर पिक्चर पहायचे हीच मला न्यूज वाटतेय Happy

मला तो आकाशातून येणारा पांढर्‍या घोड्यांचा रथ भारी आवडला.

>>नक्की शेवट काय आहे?

/** स्पॉयलर अलर्ट **/

सोनी अग्निपरिक्षेतून सहीसलामत बाहेर पडलयाने राणीचा तीळपापड होतो. शानूच्या भडकावण्यावरून ती मला परदेशी मिळाला नाही तर कोणालाच मिळू देणार नाही अशी भूमिका घेते. त्यामुळे स्वयंवरात सोनी नाईलाजाने शानूच्या गळ्यात माळ घालते. पण तेव्ह्ढयात भयानक तुफान सुरू होतं. समुद्राचं पाणी शहरात घुसू लागतं. महाशक्ती हे सारं थांबवायचं असेल तर कोणाचा तरी बळी द्यावा लागेल असं सांगतात. राणी पळून जात असताना तिचा रथ कड्यावरून कोसळून मरण पावते. शानूही पळून जातो. सोनी आणि परदेशी दोघे बळी जायला तयार असतात पण शानूशी लग्न झाल्याने सोनीचा जगण्यातला रस संपलेला असतो. ती बळी जाते. पण जाताना परदेशीला ते शहर सोडून न जाण्याची शपथ घालते. तसंच तू जेव्हा हाक मारशील तेव्हा तेव्हा मी येईन असं वचनही देते. चित्रपटाच्या शेवटी त्याला न्यायला येऊन ती आपलं वचन पुरं करते.

/** स्पॉयलर अलर्ट **/

हा चित्रपट पाहिलाय. पण मला फक्त शेवटच़ गाणं आठवत़य आणि एक सीन ज्यात निम्मी खुर्चीखाली लपलेली असते आणि राजकुमारीच्या हातातलं मोरपीस निम्मीच्या नाकात जात असतं , असं काहीतरी .

खूप वर्षांपूर्वी हा चित्रपट पाहिला आहे. गाणी सगळीच फार आवडतात. निम्मी अजिबात सहन होत नाही. तिच्या सर्व चित्रपटात (मेरे मेहबूब आणि आकाशदीपचा अपवाद सोडून) ती भयानक overacting आणि चित्रविचित्र चेहेरे करते हे वैयक्तिक मत! दिलीपकुमार काही काही वेळा आवडतो, या चित्रपटात आवडला.
तुमच्या साठी अजून काही चित्रपट सुचवत आहे. जमले तर त्यांचीही परीक्षणे वाचावयास आवडतील!
इश्क पर जोर नही - धर्मेंद्र, साधना आणि विश्वजित यांनी एकमेकांबरोबर काम केलेला एकमेव चित्रपट. तसंच साधनाच्या याच एका चित्रपटाला सचिनदेव बर्मन यांचं संगीत आहे. विश्वजित या चित्रपटात चक्क धर्मेंद्रपेक्षा जास्त उठून दिसतो!
बहारोंका मौसम - धर्मेंद्र, मीनाकुमारी, रहमान. रहस्यमय आणि हटके स्टोरी आहे.
घुंघट - बीना राय, प्रदीपकुमार, भारत भूषण, आशा पारेख. स्टार कास्ट जरी दिव्य असली तरी चित्रपट चांगला आहे. रबींद्रनाथ टागोरांच्या नौकाडूबी कथेवर आधारित आहे.

> घुंघट - बीना राय, प्रदीपकुमार, भारत भूषण, आशा पारेख. स्टार कास्ट जरी दिव्य असली तरी चित्रपट चांगला आहे. रबींद्रनाथ टागोरांच्या नौकाडूबी कथेवर आधारित आहे. > बघितला आहे हा. याच कथेवर रिया सेन, रायमा सेन यांचा कशम्कश सिनेमादेखील आहे. ऋतुपर्ण घोष दिग्दर्शक.

ह्या निम्मी वरून एक शाळू जोक होता कि एका बस मध्ये ३० लोकं आहेत त्यातून निम्मी उतरली तर किती उरतील .. समोरचा काय उत्तर देतो पाहून आपण २९ किंवा १५ हे बरोब्बर उत्तर म्हणून सांगायचे -;)

भरत, हो असा सीन आहे पिक्चरमध्ये

चीकू, लिस्टबद्दल धन्यवाद! जुनी लिस्ट लॅपटॉपसोबत गेली. आता नवी करायला हवी. घुंघट आधीही कोणीतरी सुचवला होता. आईकडून ऐकलंय ह्याबाबत. नवपरिणीत जोडपी लग्नानंतर ट्रेनने जात असतना अ‍ॅक्सीडेंट होतो आणि त्यात बायकांची अदलाबदल होते अशी काहीतरी आहे ना ती स्टोरी? एकमेकांचे चेहेरेही न बघता लोक कसे लग्न करतात आणि नंतर एकदा ही नावांचा उल्लेख कसा होत नाही वगैरे बरेच प्रश्न मनात आहेत. पण तुम्ही म्हणता तशी दिव्य कास्ट असल्याने अजून पहायची हिंमत झालेली नाही. त्यात भाभू आणी प्रकु नायक असल्याने पहायचं कोणाकडे हा प्रशन आहेच Happy पण पाहेन कधीतरी. तुम्हाला बहारोंकी मंझील म्हणायचं आहे का? तो पाहेन नक्की.

सरि Happy

{{{ बहारोंका मौसम - धर्मेंद्र, मीनाकुमारी, रहमान. रहस्यमय आणि हटके स्टोरी आहे. }}}

प्लीज करेक्ट - बहारों की मंझिल

https://www.youtube.com/watch?v=5vN46f5isls

{{{ तिच्या सर्व चित्रपटात (मेरे मेहबूब आणि आकाशदीपचा अपवाद सोडून) ती भयानक overacting आणि चित्रविचित्र चेहेरे करते हे वैयक्तिक मत! }}}

मेरे मेहबूब हाच एक अतिभयाण सिनेमा होता. त्यात अशोक कुमारचं घर वाचविण्याकरिता राजेंद्र कुमार स्वतःला विकतो आणि त्या घराच्या किंमतीएवढी रक्कम देऊन साईड हिरवीण राजेंद्र कुमारला विकत घेते असलं काहीतरी अतर्क्य त्यात दाखवलं होतं. याच कथेवर नंतर फिरोज खानचा मीत मेरे मनके बनला होता. तोही इक्वली असह्य होता.

विकत घेऊन घेऊन घ्यायचा कोणाला तर राजेंद्र कुमारला Rofl Rofl
बादवे यातली साईड हिरोईन म्हणजे ती तुमसा नही देखा मधली चकणी ना?

===
> एकमेकांचे चेहेरेही न बघता लोक कसे लग्न करतात आणि नंतर एकदा ही नावांचा उल्लेख कसा होत नाही वगैरे बरेच प्रश्न मनात आहेत. > अरे सिनेमा बघ मग अजून भरपूर प्रश्न पडतील. लय कायकाय मज्जाय यात. पण कथा ज्या काळात लिहली गेली तो काळ विचारात घेतला तर ठिकच वाटते.

{{{ बादवे यातली साईड हिरोईन म्हणजे ती तुमसा नही देखा मधली चकणी ना? }}}

म्हणजे अमिताच ना? मग बहुदा तीच असेल.

मस्त! पहायला हवा आता.
त्या अमिताची मुलगीही (साबिया) आली होती ना एका सिनेमात. स्मिता पाटील, राजेश खन्ना आणि साबिया (शैक्षणिक पालकाच्या प्रेमात पडणारी अनाथ मुलगी) अशी कास्ट होती. तेव्हा साबियावर आलेल्या एका लेखात अमिताबद्दल फारच कौतुकाचे बोल होते सौन्दर्यवती म्हणून!

Pages