कोलेस्टेरॉल : एक लाडावलेला वलयांकित पदार्थ !

Submitted by कुमार१ on 5 November, 2017 - 19:48

गेल्या अर्धशतकात आपण वाढत्या प्रमाणात आधुनिक जीवनशैलीचा स्वीकार केला आणि त्याबरोबर आपल्या आयुष्यातील ताणतणाव देखील वाढत गेले. एकीकडे आपला भौतिक विकास होत असतानाच आपले शरीर मात्र निरनिराळ्या आजारांची शिकार होत गेले. हृदयविकार हा त्यापैकी एक प्रमुख आजार. त्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे करोनरी रक्तवाहिन्यांमध्ये मेद-पदार्थांच्या गुठळ्या होऊन त्या आकुंचित होणे. त्याचा पुढील परिणाम म्हणजे माणसाला येणारा “हार्ट अ‍ॅटॅक ” हा होय. या विकाराचा आपल्या रक्तातील ‘कोलेस्टेरॉल’च्या वाढलेल्या प्रमाणाशी घनिष्ठ संबंध असतो हे आपण सगळे जाणतोच.

सध्या सुशिक्षित समाजात या ‘कोलेस्टेरॉल’ बद्दलचे सामान्यज्ञान खूप वाढलेले जाणवते. ‘तूप जास्ती खाउ नका’, ‘मांसाहार टाळलेला बरा’, ‘शून्य कोलेस्टेरॉल’वाले तेल कोणते’, ‘ट्रान्स फॅट म्हणजे काय’ अशा एक ना अनेक चर्चा वारंवार होत असतात आणि आपण एकमेकाला यासंबंधीचे भरपूर अनाहूत सल्ले देत असतो. त्यामुळे ‘कोलेस्टेरॉल’ हा एक लाडावलेला वलयांकित पदार्थ होऊन बसलाय! तर अशा या कोलेस्टेरॉलचा इतिहास, त्याच्या संशोधनातील प्रगती आणि हृदयविकाराशी असलेले त्याचे नाते या सगळ्याचा लेखाजोखा आपल्यासमोर सादर करीत आहे.

आपल्यातील बऱ्याच जणांना असे वाटते की कोलेस्टेरॉल हे गेल्या साठेक वर्षांत उपटलेले एक खूळ आहे. “आमच्या आजोबांच्या पिढीने हे असले काही ऐकले नव्हते बुवा. तेव्हा लोक कसे दणकून खात पीत होते”, अशी विधानेही आपल्या कानावरून वरचेवर जात असतात. परंतु कोलेस्टेरॉलचा शोध तसा फार जुना आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

इ.स. १७५८ मध्ये Francois P. de La Salle या फ्रेंच डॉक्टरने कोलेस्टेरॉलचा शोध लावला. तेव्हा ते पित्ताशयातून बाहेर काढलेल्या खड्यांचा (gallstones) अभ्यास करीत होते. त्यातून त्यांनी एक घट्ट मेद पदार्थ शोधून काढला. पुढे १८१५ मध्ये फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ Michel E. Chevreul यांनी तो घट्ट पदार्थ शुद्ध स्वरूपात प्राप्त केला आणि त्याला ‘कोलेस्टेरॉल’ हे नाव दिले. ‘कोलेस्टेरॉल’ हा ग्रीक शब्द असून chole = bile =पित्त आणि stereos = solid अशी त्याची व्युत्पत्ती आहे. मग या नव्या पदार्थावरील संशोधनाने वेग घेतला.

सर्व प्राण्यांच्या पेशींमध्ये तो असतो हे लक्षात आले. पुढे १८३८ मध्ये Louis Rene Lecanu यांनी संशोधनातील एक महत्वाचा टप्पा गाठला आणि असे दाखवून दिले की कोलेस्टेरॉल हा आपल्या रक्तातही आढळतो. तरीही कोलेस्टेरॉलची ओळख अजून ‘पित्तात आणि रक्तात आढळणारा एक घट्ट मेद’ एवढीच होती. त्याचे रासायनिक सूत्र वगैरे अद्याप माहित नव्हते.
१९०३ मध्ये Adolf Windaus या जर्मन शास्त्रज्ञाने खूप प्रयत्नांती कोलेस्टेरॉलचे रासायनिक सूत्र शोधून काढले. त्याबद्दल ते १९२८ च्या नोबेल पारितोषिकाचे मानकरी ठरले. पुढे १९३० मध्ये Heinrich Wieland यांनी Windaus च्या संशोधनातील काही चुका दुरुस्त करून कोलेस्टेरॉलचे पक्के सूत्र जाहीर केले. कोलेस्टेरॉल हा ‘स्टीरॉइड’ गटातील एक मेद असल्याची नोंद झाली.
त्यानंतर आजपावेतो कोलेस्टेरॉल संबंधीचे संशोधन सतत चालू आहे. त्यातून त्याचे नवनवे पैलू समजून येत आहेत. आतापर्यंत १३ वैज्ञानिकांनी या पदार्थावरील संशोधनासाठी नोबेल पारितोषिके प्राप्त केली आहेत. असे भाग्य शरीरातील एखाद्या घटकाच्या वाट्याला क्वचितच आले आहे.

आता आपल्या शरीराच्या दृष्टीतून कोलेस्टेरॉलकडे बघूयात. हा पदार्थ आपल्याला फक्त प्राणिज पदार्थांच्या सेवनातून मिळतो तसेच आपल्या शरीरातही तो तयार होतो. या दोन्ही स्त्रोतांचा शरीरात प्रतिदिन समतोल साधला जातो. म्हणजे, जर आपल्या आहारात त्याचे प्रमाण कमी असेल तर शरीरात तो अधिक तयार केला जाईल आणि आहारात जास्त असेल तर शरीरात कमी प्रमाणात तयार होईल. कुठल्याही वनस्पतीमध्ये कोलेस्टेरॉल नसते. त्यामुळे ‘व्हेगन’ आहारशैलीत अन्नातून ते शरीराला मिळणार नाही.
भारतात आपण जी तेले स्वयंपाकासाठी वापरतो ती बहुतांश वनस्पतीपासून केलेली असतात जसे की, शेंगदाणे, करडी, सूर्यफूल, जवस, ओलिव्ह इ. त्यामुळे या सर्व तेलांच्या जाहिरातीत “ शून्य कोलेस्टेरॉल तेल” असे जे ठळकपणे दाखविलेले असते, ती खरे तर ग्राहकांची दिशाभूल आहे (म्हणजे ‘पिवळा पितांबर’ म्हटल्यासारखा तो प्रकार आहे). कारण कुठलाही वनस्पतीजन्य पदार्थ हा “शून्य कोलेस्टेरॉलयुक्तच” असतो. त्या तेलांची एकमेकाशी तुलनाच करायची झाली, तर त्यांमध्ये कशात एकूण उष्मांक आणि संपृक्त मेदाम्ले (saturated fatty acids) कमी/जास्त आहेत, यावरून केली पाहिजे.

सध्या विविध माध्यमांतून ‘कोलेस्टेरॉल आणि हृदयविकार’ या विषयावरील माहितीचा सतत भडीमार आणि काथ्याकूट चालू असतो. त्यामुळे सामान्य माणसाचा कोलेस्टेरॉलकडे पाहण्याचा एक पूर्वग्रह झालेला आहे. जसे काही कोलेस्टेरॉलला आपण आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतो आणि मग पूर्वग्रहदूषित नजरेने त्याच्याकडे पाहतो. त्यामुळे सामान्य माणसाला या कोलेस्टेरॉलच्या शरीरातील उपयुक्ततेची काही जाणीवच नसते. क्षणभर आपण ‘रक्तातील वाढलेल्या कोलेस्टेरॉलचे परिणाम’ हा विषय बाजूला ठेवू आणि आपल्या पेशींमध्ये जे कोलेस्टेरॉल आहे ते किती उपयुक्त आहे ते पाहूयात.

आपल्या शरीरातील पेशींमध्ये कोलेस्टेरॉलपासून कितीतरी महत्वाची संयुगे तयार होतात. त्यापैकी तीन महत्वाची अशी:
१. त्वचेतील कोलेस्टेरॉलवर सूर्यकिरण पडले की त्यापासून ‘ड’ जीवनसत्व तयार होते.

२. कोलेस्टेरॉलपासून सगळी ‘स्टीरॉइड हॉर्मोन्स’ तयार होतात. या हॉर्मोन्सचे एक मोठे कुटुंबच आहे. त्यापैकी पुरुषातील testosterone आणि स्त्रीतील estrogen ही आपल्या अगदी परिचयाची. किंबहुना या दोघांमुळेच आपले पुरुषत्व वा स्त्रीत्व सिद्ध होते आणि आपण ते मिरवत असतो!

३. यकृतात त्याच्यापासून होणारी जी आम्ले (bile acids) आहेत ती अन्न्पचनात मोलाची मदत करतात.

आपल्या रक्तातही कोलेस्टेरॉल संचार करीत असते. त्यातील काही भाग हा रक्तवाहिन्यांच्या आतील आवरणावर हळूहळू साठत असतो. त्या साठ्यांमध्ये कोलेस्टेरॉलबरोबरच इतरही काही मेद असतात. जेव्हा रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित असते तेव्हा हे साठे अतिशय मंदगतीने वाढतात आणि त्यामुळे रक्तप्रवाह हा विनाअडथळा व्यवस्थित चालू राहतो. पण जर का रक्तातील मेदपदार्थ हे प्रमाणाबाहेर वाढले तर मात्र ही साठण्याची प्रक्रिया खूप मोठ्या प्रमाणात होते. यालाच atherosclerosis असे म्हणतात. या आजाराचा सर्वप्रथम शोध Rudolf Virchow यांनी १८५४मध्ये लावला. हा आजार जेव्हा करोनरी रक्तवाहिन्यांमध्ये होतो तेव्हा त्या आकुंचित पावल्याने किंवा ‘ब्लॉक’ झाल्याने त्या रुग्णास ‘हृदयविकाराचा झटका’ येतो. अशा प्रकारच्या ‘झटक्यांची’ वैद्यकशास्त्रात प्रथम नोंद १९१०च्या सुमारास झालेली दिसते.

आपल्या रक्तात संचार करणारे कोलेस्टेरॉल हे काही मोठ्या रेणूंच्या माध्यमातून फिरत असते. त्यातील दोन मुख्य रेणू म्हणजे LDL & HDL. LDLमध्ये जे कोलेस्टेरॉल असते त्याला “वाईट” कोलेस्टेरॉल, तर HDLमधल्याला “चांगले” कोलेस्टेरॉल असे सामान्य भाषेत म्हणतात. आता हे ‘चांगले आणि वाईट’ हे शब्द शास्त्रीयदृष्ट्या तितकेसे योग्य नाहीत. LDL मधले कोलेस्टेरॉल जर नेहमी योग्य प्रमाणात राहिले तर तसे ते आपल्याला ‘वाईट’ ठरत नाही. केवळ ‘चांगले’ चा विरुद्ध शब्द म्हणून तो प्रचलित आहे. त्याचे प्रमाण वाढते राहिल्यासाच atherosclerosis चा धोका संभवतो. तेव्हा त्या दोन्ही शब्दांचा अर्थ ढोबळमानाने घ्यायचा आहे.

आता वळूयात “कोलेस्टेरॉल आणि करोनरी हृदयविकार” या बहुचर्चित आणि वादग्रस्त विषयाकडे. विसाव्या शतकाच्या मध्यापासून हा विषय वैद्यकविश्वात सतत प्रकाशझोतात राहिला आहे. १९५३मध्ये Ancel Keys यांनी अनेक प्रयोगांती असे मत मांडले की आहारातील मेदाचे जास्त प्रमाण आणि करोनरी हृदयविकार यांचा घनिष्ठ संबंध आहे. त्यावर वैज्ञानिकांत बऱ्याच चर्चा झडल्या आणि त्यांचे मतभेदही चव्हाट्यावर आले. त्यांमध्ये John Yudkin या मधुमेहतज्ञांचे ठाम मत होते की आहारातील मेदापेक्षाही साखर हा अधिक घातक पदार्थ आहे. मग Keys आणि Yudkin यांच्यात बऱ्याचदा वैचारिक खडाजंगी झाली. त्यात अखेर Yudkin ना नमते घ्यावे लागले आणि Keys यांचे मत वैद्यकविश्वाने उचलून धरले.

१९५६मध्ये अमेरिकी हृदयविकार संघटनेने अधिकृतरीत्या जाहीर केले की आहारात बटर, अंडे आणि बीफ यांच्या अतिसेवनाने करोनरी हृदयविकाराचा धोका वाढतो. इथपासून ‘आहार आणि हृदयविकार’ या चर्चेला एक निर्णायक वळण लागले. किंबहुना, एक प्रकारे कोलेस्टेरॉलचे 'भूत' समाजाच्या मानगुटीवर बसले! त्यानंतर रक्तातील वाढलेल्या कोलेस्टेरॉलला जाणीवपूर्वक ‘लक्ष्य’ करून ते कमी करण्यासाठी अनेक उपचारपद्धती विकसित झाल्या. स्वयंपाकात कोणते तेल वापरायचे याच्या जोरदार प्रचारमोहीमा चालू झाल्या. एक दोन दशके तर सूर्यफुलाचेच तेल कसे सर्वोत्तम आहे हे ठसवणाऱ्या जाहिरातींचा सुळसुळाट झाला होता.

दुसऱ्या बाजूस वैज्ञानिकांचा एक गट हा सातत्याने फक्त कोलेस्टेरॉलला ‘लक्ष्य’ करण्याच्या विरोधात होता. त्यांच्या मते आहारातील साखर, रक्तातील अन्य एका मेदाचे (triglycerides) प्रमाण, जीवनशैली यासारखे इतर अनेक घटकही atherosclerosis होण्यास कारणीभूत होते. त्यामुळे निव्वळ कोलेस्टेरॉल कमी करण्याचे उपाय राबवणे ही त्या रुग्णांची दिशाभूल करणारे आहे, असे त्यांचे मत होते. १९७७मध्ये George Mann यांनी तर ‘आहार आणि करोनरी हृदयविकार’ हे गृहीतक म्हणजे वैद्यकाच्या इतिहासातील सर्वात मोठी बनवाबनवी (scam) असल्याचे मत नोंदवले होते.

अशा तऱ्हेने ‘कोलेस्टेरॉल आणि हृदयविकार’ या वादग्रस्त विषयावरील काथ्याकूट आजही चालू आहे. त्याच्या बाजूने आणि विरोधात विविध वैद्यकीय संघटना आग्रही मते मांडीत आहेत. १९८७पासून रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करणारी ‘Statins’ नावाची औषधे बाजारात उपलब्ध असून त्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. कोलेस्टेरॉलप्रमाणेच तीसुद्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. त्यांचे समर्थक आणि विरोधक आपापली मते सतत हिरीरीने मांडत असतात (अगदी नोटबंदी या विषयासारखी!). किंबहुना चर्चेसाठी हा विषय माध्यमांत वारंवार उकरून काढला जातो.

करोनरी हृदयविकाराच्या कारणांच्या बाबतीत अशा प्रकारचे वाद होणे अगदी स्वाभाविक आहे. मुळात हा आजार कोणत्या एका कारणामुळे होत नसतो. अनुवंशिकता, वांशिकता, जीवनशैली, व्यसने, मधुमेह आणि रक्तातील विविध मेदांचे प्रमाण असे अनेकविध घटक तो होण्यास कारणीभूत ठरतात( multifactorial disease). त्यामुळे त्यापैकी एका घटकाचा नक्की ‘वाटा’ किती हे ठरवणे खरेच अवघड असते. जेव्हा आपण आहारातील मेदांचे विश्लेषण करतो, तेव्हा फक्त कोलेस्टेरॉलकडे न बघता एकूण संपृक्त मेदांच्या (saturated fats) प्रमाणाकडे लक्ष दिले पाहिजे. त्याचबरोबर नियमित व्यायाम आणि धूम्रपानापासून अलिप्तता हेही घटक आजार प्रतिबंधाच्या दृष्टीने तेवढेच महत्वाचे आहेत.

आता एवढे सगळे पुराण सांगितल्यावर वाचक मला एक प्रश्न नक्की विचारतील. तो असा, “मग काय, रक्तातील वाढलेले कोलेस्टेरॉल हा काळजी करण्याचा विषय आहे की नाही?” मी याचे उत्तर एका सोप्या उदाहरणाने देतो. समजा, तुम्ही खूप लांब पल्य्याच्या आणि बऱ्याच दिवसांच्या प्रवासास निघाला आहात. या काळात तुम्ही अंगावरती अगदी नजरेत भरतील असे काही लाख रुपयांचे दागिने घातले आहेत. आता प्रवासादरम्यान हे दागिने हमखास चोरले जातील का? इथे हो किंवा नाही अशा दोन्ही शक्यता आहेत. पण, ते दागिने तुम्ही चोरांच्या नजरेत ठेऊन एक मोठी जोखीम नक्कीच पत्करली आहेत. त्याचप्रमाणे रक्तातील वाढलेले कोलेस्टेरॉल ही आयुष्याच्या प्रवासातील एक जोखीम नक्की आहे. पण, त्यामुळे ‘करोनरी हृदयविकार होईलच’ असे विधान मात्र करता येत नाही.

....तर असा हा भरपूर संशोधन झालेला, बहुचर्चित, बहुगुणी आणि वादग्रस्त कोलेस्टेरॉल! आरोग्यविज्ञान क्षेत्राशी संबंध नसलेल्या कोणाही सामान्य माणसाला त्याची मूलभूत माहिती व्हावी या उद्देशाने हा लेख लिहीला आहे. त्यावरील प्रतिसाद आणि शंकांचे स्वागत आहे.
******************************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उच्च कोलेस्टेरॉल आणि मेंदूविकार यावर अलीकडे संशोधन जोरात चालू आहे. मध्यम वयातील उच्च कोलेस्टेरॉल पातळी मुळे मानसिक ऱ्हास आणि अलझायमर आजार होण्याची धोका वाढू शकतो ,असे एक गृहीतक आहे.

तसेच कोलेस्टेरॉल कमी करणारी statins ही औषधे दीर्घकाळ घेतल्यास आकलनावर काही परिणाम होतो का याचाही अभ्यास चालू आहे.

सध्याचे निष्कर्ष उलटसुलट आहेत. अजून संशोधनातून यावर अधिक प्रकाश पडेल.

गेल्या वर्षीच्या सुरुवातीला माझे कोलेस्टेरॉल वाढले होते. नंतर डॉ. atorvastatin हे औषध घ्यायला सांगितले. सोबत लो कार्ब, शुगर कटडाऊन हे पण सांगितले. पुढच्या तपासणीत नॉर्मल लेव्हल आली तरीही गोळ्या चालू ठेवायला सांगितल्या. दर ३ महिन्याने तपासत आहे तर रेंज मधेच आहे कोलेस्टेरॉल म्हणून डॉ. ला आता गोळी बंद करण्यासाठी विचारले तर म्हणाली तुला टाईप २ डायबेटीस आहे तर जसं गोळी बंद करशील तर पुन्हा वाढेल कोलेस्टेरॉल असं म्हटली.. असं खरंच आहे का?
माझं वजन १३८ पाऊंड वरून १२० करायला सांगितलेय मगच म्हणे तुझी गोळी बंद करायचा विचार करू... मी गोंधळले आहे आता...

@ अंजली,
तुमच्या डॉ चे हे दोन सल्ले आहेत:
** “माझं वजन १३८ पाऊंड वरून १२० करायला सांगितलेय
आणि
तुला टाईप २ डायबेटीस आहे तर जसं गोळी बंद करशील तर पुन्हा वाढेल कोलेस्टेरॉल असं म्हटली.”**

… अगदी बरोबर आहेत !
जास्त वजन, मधुमेह व उच्च कोलेस्टेरॉल हे सर्व एका छत्रीखाली नांदणारे आजार आहेत. तुमची तब्बेत बघून त्यांनी दिलेला सल्ला हा योग्यच आहे.

आता फक्त माहिती म्हणून Statins बद्दल काही लिहितो.

१. या गोळ्यांवर वैद्यकविश्वात प्रचंड काथ्याकूट झालाय व भरपूर मतभेद आहेत.
२. दीर्घकाळ या गोळ्या घेतल्यावर काही रुग्णांना स्नायूदुखी व सांधेदुखी होते. ती जर तीव्र असेल तर गोळ्या बंद करतात.
३. काही रुग्णांत फक्त कोलेस्टेरॉल उच्च असते व ग्लुकोज नॉर्मल असते. त्यांना या गोळ्या चालू केल्यावर मधुमेह उत्पन्न होऊ शकतो !
४. या सगळ्याचे तारतम्य ठेवूनच statinsचे उपचार द्यायचे असतात.

ट्रायग्लिसेरॉल जास्त आहे,एचडीएल्,एलडीएलपण जास्त आहे.तरीही एचडीएल्+एलडीएल रेशो ३.५-४ मधे आहे.त्यामुळे डॉ.नी गोळ्या दिल्या नाहीत.हे बरोबर आहे का?

देवकी,
रक्तातील मेद कमी करणारी औषधे ही अनेक प्रकारची आहेत. त्यांची निवड रुग्णाच्या लिपिड प्रोफाइलनुसार ठरते. तसेच औषधे सुरू करण्यापूर्वी आहार, व्यायाम व सुयोग्य जीवनशैली चे सल्ले दिले जातात.

मधुमेहादि अन्य आजार आहेत का तसेच अनुवंशिकताही पाहिली जाते. औषधे हा शेवटचा पर्याय असतो.
तुमच्या डॉ नी या सगळ्याचा आढावा घेऊन दिलेला सल्ला योग्यच असणार.

हृदयविकार हा त्यापैकी एक प्रमुख आजार. त्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे करोनरी रक्तवाहिन्यांमध्ये मेद-पदार्थांच्या गुठळ्या होऊन त्या आकुंचित होणे. त्याचा पुढील परिणाम म्हणजे माणसाला येणारा “हार्ट अ‍ॅटॅक ” हा होय

हे समजलं पण blood pressure Kami जास्त होणे हे वरील karnashi संबंधित आहे का .
कारण bp नॉर्मल असणाऱ्या व्यक्तींना सुधा heart attack आल्याची उदाहरण आहेत

राजेश,
तुमचा प्रश्न चांगला आहे. उत्तर सावकाश देतो. तूर्त पेनिसिलिनच्या धाग्यावरील प्रश्न अग्रक्रमाने घेतोय.

@ राजेश,
तुमचा प्रश्न :

***करोनरी रक्तवाहिन्यांमध्ये मेद-पदार्थांच्या गुठळ्या होऊन त्या आकुंचित होणे (atherosclerosis) आणि रक्तदाब यांचा संबंध काय असतो? ***
या प्रश्नाकडे आपण दोन प्रकारे बघू.

१. जेव्हा करोनरी विकार बळावतो तेव्हा रुग्णांचा रक्तदाब जास्त किंवा कमी होणे, अशा दोन्ही शक्यता असतात. कमी होणे हे भवितव्याच्या दृष्टीने अधिक वाईट.

२. आता उच्च रक्तदाबची कारणे पाहू. जवळपास ९०% लोकांत कारण सांगता येत नाही. म्हणून त्याला Essential hypertension म्हणतात.

सारांश : करोनरी विकार आणि उच्च रक्तदाब यांचे कारणमीमांसा वेगळी आहे. त्यामुळे नॉर्मल दाब असणाऱ्यानाही हार्ट attack येऊ शकतो.

धन्यवाद sir
खूप दिवस हा प्रश्न पडला होता

तुमची तब्बेत बघून त्यांनी दिलेला सल्ला हा योग्यच आहे.>>>>> ओके.

. या सगळ्याचे तारतम्य ठेवूनच statinsचे उपचार द्यायचे असतात.>>>> धन्यवाद डॉ. शंकानिरसनासाठी.

फार छान, सोप्या रितीने समजावुन सांगितलेय, डॉक्टर धन्यवाद!

नुकतेच मी ८ मार्च ला टेस्ट केल्यात.

टोटल कॉलेस्टेरॉल- १०२
ट्रायग्लिसेराईड- ११२
एच डी एल- २५.९९
व्ही एल डी एल- २२.४
एल डी एल- ५३.६१
कोलेस्टेरॉल/ एच डी एल रेशो- ३.९२
एल डी एल/ एच डी एल रेशो- २.०६

असा रिपोर्ट आहे. एच डी एल चांगले कॉलेस्टेरॉल असले तरी २५.९९ असल्याने अक्षरे ठळक केली आहेत.
काही चिन्ताजनक आहे का?
(रिपोर्ट अजुन आमच्या फॅमिली डॉक्टरला दाखवलेला नाही.)

आर्या, धन्यवाद.

****एच डी एल चांगले कॉलेस्टेरॉल असले तरी २५.९९ असल्याने अक्षरे ठळक केली आहेत.
काही चिन्ताजनक आहे का?>>>>>>

साधारण भारतीय स्त्रीचे (रजोनिवृत्ती पूर्वी)चे HDL-c हे ५५ ते ६० असल्यास अतिउत्तम.
तुमचे एकूण कोलेस्टेरॉल छान आहे.
कोलेस्टेरॉल/ एच डी एल रेशो- ३.९२ हा जर ३ वा अजून कमी आला तर छानच.

Statins घेत आहात काय ?
लेखात लिहिल्याप्रमाणे चिंता करू नका. अनुवंशिकता बघा. आहार, व्यायाम सांभाळून मस्त जगा !

मनापासुन धन्यवाद डॉक्टर! __/\__

नाही कुठलीही हृदयविकारावरील औषधे नाही. डायबेटीस आहे. त्यासाठी मेटफॉर्मिन ५०० एम जी, टेबलेट्स आणि थायरॉईड साठी थायरॉक्स७५ एम जी चालु आहे.
गेल्या कित्येक वर्षापासुन व्हेजी आहे.

आर्या,
टोटल कॉलेस्टेरॉल- १०२ >>> हा रिपोर्ट म्हणजे एखाद्याने स्वतःला प्रयत्नपूर्वक ‘फिगर’ मध्ये ठेवल्यासारखे वाटले ! ☺️

कारण सांगतो. औषधांवर नसलेल्या साधारण मध्यमवयीन लोकांचा हा आकडा २००-२५०च्या घरात किंवा मधुमेहींत जास्तही बघायची सवय असते आम्हाला.
तेव्हा तुमचा हा मस्त आकडा असाच राहो,
शुभेच्छा

( तिकडे थायरॉईड च्या धाग्यावर मी ‘मोना लिसा’वर एक मजेदार प्रतिसाद लिहिला आहे. सवडीने बघा).

<<टोटल कॉलेस्टेरॉल- १०२ ><<< काय सांगता!! Lol
खरच असे काही नाहीये. डायबेटीसमुळे दिक्षित डायेट फॉलो करण्याचा प्रयत्न करते. पुष्कळसे जमते, खुप काही नाही. Proud चपाती खाणे ही बन्द केलय... सध्या ज्वारीच्या भाकरीवर जोर आहे. भात सुटत नाही मात्र Proud
हा, मात्र जेवणानन्तर बडीशेपच्याऐवजी भाजलेली जवस खाते, त्यामुळे एच डी एल वाढले असावे असे एक डॉक्टर मैत्रीण म्हणाली.

*****भाजलेली जवस खाते, त्यामुळे एच डी एल वाढले असावे असे एक डॉक्टर मैत्रीण म्हणाली.>>>

अहो, मग तुमचे ते २५.९९ समाधानकारक नाही ना ! आता वर्षभर जवस खात राहा आणि पुढचा रिपोर्ट कळवा. बघू यात तरी.

वरच्या चर्चेत जो जवसाचा उल्लेख आला आहे त्याचे सर्वांसाठी स्पष्टीकरण:

जवसाच्या तेलात एक विशिष्ट fatty acid (Linolenic) असते. त्याच्या नियमित सेवनाने कोलेस्टेरॉलची रक्तपातळी कमी होण्यास मदत होते. तसेच हे acid रक्तवाहिन्यातील दाहप्रक्रिया देखील कमी करते. त्यामुळे रक्तवाहिन्यात गुठळ्या होण्याची प्रक्रिया मंदावते.

हे तेल बाजारात इतर खाद्यतेलां इतके सहज मिळत नाही. निमशहरी भागात ग्रामोद्योग प्रकल्पात मिळू शकते.

इकडे नागपूर, चंद्रपूरकडे जवसाच्या तेल बरेचजण वापरतात, सहज उपलब्धही आहे. पण मला त्याचा वास .... म्हणजे मी त्यात स्वयंपाक करू नाही शकत पण कोणी करून आणून दिला तर खाऊ शकते हे मला नुक्तच कळलंय कारण एका मैत्रीणीन् जवसाच्या तेलात केलेली उकडपेंडी खाऊ घातली. चांगली लागते. कच्च्या चिवड्यात तर कच्चच तेल वापरतात... चिवडा अजून खाऊन नाही बघितला बंगालात मिळणार्या कच्च्या सरसों तेलातला झालमुडी प्रकारासारखा!
तेलावर बरेचदा चर्चा झालीये तरी डाॅ एक सांगा कच्च तेलं तापदायक नाहीये... तापवलेले (अति व वारंवार) घातक , ह्यात कितपत तथ्य आहे.

मंजुताई, चांगला प्रश्न :

**** तापवलेले तेल (अति व वारंवार) घातक , ह्यात कितपत तथ्य आहे. >>>
अगदीच तथ्य आहे !
एखादे उकळलेले खाद्यतेल तळणासाठी वारंवार वापरुन त्यात aromatic hydrocarbons तयार होतात. हा प्रकार कनिष्ठ दर्जाच्या खानावळीत हमखास होतो. ही रसायने कर्करोगकारक आहेत.

म्हणूनच ‘बाहेरचे’ जपूनच खावे हे बरे.

@डॉ.कुमार,
जवसाचे तेल बहुतेक दुकानात नाही मिळत.
Amazon online वर दाखवतंय। अवघ्या 100 मि ली साठी 286 रु .
नाय परवडत राव

साद,
माहितीबद्दल आभार.

त्याची किंमत बघता २ पर्याय सुचवतो:
१. ज्यांना जवसच खाऊन पहायचाय त्यांनी रोज मूठभर ते धान्य खावे

२. कोलेस्टेरॉल कमी करण्याचे इतरही मार्ग आहेत ना. जसे की योग्य आहार व व्यायाम, मर्यादित तेलतुपाचा वापर, सूर्यफूल-तेल वापर इत्यादी.

लाकडी घाणा चे जवस तेल मिळते.वास उग्र असतो.कुकिंग मध्ये अजिबात वापरता येणार नाही.मी कप केक मोल्ड ला लावायला वापरले आणि पस्तावले. भाकरी वर कच्चे वेगळ्या चटणी बरोबर किंवा सॅलड वर अगदी 4 थेंब घालून झेपते.
कच्चे जवस अगदी थोडे खाणे, किंवा भाजलेले बडीशोप सारखे रोज थोडे भाजून लगेच 1 छोटा चमचा खाणे उत्तम असावे.

अनु, धन्यवाद.

हल्ली लाकडी घाणा .com च्या जाहिराती जोरात आहेत. त्यांची अन्य तेले कोणी नियमित वापरत असल्यास स्वयंपाकातले अनुभव जरूर सांगा. नेहमीच्या तेलांच्या तुलनेत काही फरक ?

कोलेस्ट्रॉल वाढू नये म्हणून आहारात काय टाळावे >>>

लाल मांस, अतिरिक्त साखर, एका वेळेस अति जेवण.
चोथायुक्त पदार्थ भरपूर खावेत.

च्रप्स,
एकूण कोले. कमी असेल तर काळजीचे कारण नाही.

मात्र HDL-c बरेच कमी आणि LDL-c बरेच जास्ती असे आले असेल, तर डॉ. चा सल्ला घ्या.
तुमची शारिरिक तपासणी आणि त्याची रिपोर्टशी सांगड घालणे आणि त्यावर डॉ. चे मत हे महत्वाचे आहे.

Pages