कोलेस्टेरॉल : एक लाडावलेला वलयांकित पदार्थ !

Submitted by कुमार१ on 5 November, 2017 - 19:48

गेल्या अर्धशतकात आपण वाढत्या प्रमाणात आधुनिक जीवनशैलीचा स्वीकार केला आणि त्याबरोबर आपल्या आयुष्यातील ताणतणाव देखील वाढत गेले. एकीकडे आपला भौतिक विकास होत असतानाच आपले शरीर मात्र निरनिराळ्या आजारांची शिकार होत गेले. हृदयविकार हा त्यापैकी एक प्रमुख आजार. त्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे करोनरी रक्तवाहिन्यांमध्ये मेद-पदार्थांच्या गुठळ्या होऊन त्या आकुंचित होणे. त्याचा पुढील परिणाम म्हणजे माणसाला येणारा “हार्ट अ‍ॅटॅक ” हा होय. या विकाराचा आपल्या रक्तातील ‘कोलेस्टेरॉल’च्या वाढलेल्या प्रमाणाशी घनिष्ठ संबंध असतो हे आपण सगळे जाणतोच.

सध्या सुशिक्षित समाजात या ‘कोलेस्टेरॉल’ बद्दलचे सामान्यज्ञान खूप वाढलेले जाणवते. ‘तूप जास्ती खाउ नका’, ‘मांसाहार टाळलेला बरा’, ‘शून्य कोलेस्टेरॉल’वाले तेल कोणते’, ‘ट्रान्स फॅट म्हणजे काय’ अशा एक ना अनेक चर्चा वारंवार होत असतात आणि आपण एकमेकाला यासंबंधीचे भरपूर अनाहूत सल्ले देत असतो. त्यामुळे ‘कोलेस्टेरॉल’ हा एक लाडावलेला वलयांकित पदार्थ होऊन बसलाय! तर अशा या कोलेस्टेरॉलचा इतिहास, त्याच्या संशोधनातील प्रगती आणि हृदयविकाराशी असलेले त्याचे नाते या सगळ्याचा लेखाजोखा आपल्यासमोर सादर करीत आहे.

आपल्यातील बऱ्याच जणांना असे वाटते की कोलेस्टेरॉल हे गेल्या साठेक वर्षांत उपटलेले एक खूळ आहे. “आमच्या आजोबांच्या पिढीने हे असले काही ऐकले नव्हते बुवा. तेव्हा लोक कसे दणकून खात पीत होते”, अशी विधानेही आपल्या कानावरून वरचेवर जात असतात. परंतु कोलेस्टेरॉलचा शोध तसा फार जुना आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

इ.स. १७५८ मध्ये Francois P. de La Salle या फ्रेंच डॉक्टरने कोलेस्टेरॉलचा शोध लावला. तेव्हा ते पित्ताशयातून बाहेर काढलेल्या खड्यांचा (gallstones) अभ्यास करीत होते. त्यातून त्यांनी एक घट्ट मेद पदार्थ शोधून काढला. पुढे १८१५ मध्ये फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ Michel E. Chevreul यांनी तो घट्ट पदार्थ शुद्ध स्वरूपात प्राप्त केला आणि त्याला ‘कोलेस्टेरॉल’ हे नाव दिले. ‘कोलेस्टेरॉल’ हा ग्रीक शब्द असून chole = bile =पित्त आणि stereos = solid अशी त्याची व्युत्पत्ती आहे. मग या नव्या पदार्थावरील संशोधनाने वेग घेतला.

सर्व प्राण्यांच्या पेशींमध्ये तो असतो हे लक्षात आले. पुढे १८३८ मध्ये Louis Rene Lecanu यांनी संशोधनातील एक महत्वाचा टप्पा गाठला आणि असे दाखवून दिले की कोलेस्टेरॉल हा आपल्या रक्तातही आढळतो. तरीही कोलेस्टेरॉलची ओळख अजून ‘पित्तात आणि रक्तात आढळणारा एक घट्ट मेद’ एवढीच होती. त्याचे रासायनिक सूत्र वगैरे अद्याप माहित नव्हते.
१९०३ मध्ये Adolf Windaus या जर्मन शास्त्रज्ञाने खूप प्रयत्नांती कोलेस्टेरॉलचे रासायनिक सूत्र शोधून काढले. त्याबद्दल ते १९२८ च्या नोबेल पारितोषिकाचे मानकरी ठरले. पुढे १९३० मध्ये Heinrich Wieland यांनी Windaus च्या संशोधनातील काही चुका दुरुस्त करून कोलेस्टेरॉलचे पक्के सूत्र जाहीर केले. कोलेस्टेरॉल हा ‘स्टीरॉइड’ गटातील एक मेद असल्याची नोंद झाली.
त्यानंतर आजपावेतो कोलेस्टेरॉल संबंधीचे संशोधन सतत चालू आहे. त्यातून त्याचे नवनवे पैलू समजून येत आहेत. आतापर्यंत १३ वैज्ञानिकांनी या पदार्थावरील संशोधनासाठी नोबेल पारितोषिके प्राप्त केली आहेत. असे भाग्य शरीरातील एखाद्या घटकाच्या वाट्याला क्वचितच आले आहे.

आता आपल्या शरीराच्या दृष्टीतून कोलेस्टेरॉलकडे बघूयात. हा पदार्थ आपल्याला फक्त प्राणिज पदार्थांच्या सेवनातून मिळतो तसेच आपल्या शरीरातही तो तयार होतो. या दोन्ही स्त्रोतांचा शरीरात प्रतिदिन समतोल साधला जातो. म्हणजे, जर आपल्या आहारात त्याचे प्रमाण कमी असेल तर शरीरात तो अधिक तयार केला जाईल आणि आहारात जास्त असेल तर शरीरात कमी प्रमाणात तयार होईल. कुठल्याही वनस्पतीमध्ये कोलेस्टेरॉल नसते. त्यामुळे ‘व्हेगन’ आहारशैलीत अन्नातून ते शरीराला मिळणार नाही.
भारतात आपण जी तेले स्वयंपाकासाठी वापरतो ती बहुतांश वनस्पतीपासून केलेली असतात जसे की, शेंगदाणे, करडी, सूर्यफूल, जवस, ओलिव्ह इ. त्यामुळे या सर्व तेलांच्या जाहिरातीत “ शून्य कोलेस्टेरॉल तेल” असे जे ठळकपणे दाखविलेले असते, ती खरे तर ग्राहकांची दिशाभूल आहे (म्हणजे ‘पिवळा पितांबर’ म्हटल्यासारखा तो प्रकार आहे). कारण कुठलाही वनस्पतीजन्य पदार्थ हा “शून्य कोलेस्टेरॉलयुक्तच” असतो. त्या तेलांची एकमेकाशी तुलनाच करायची झाली, तर त्यांमध्ये कशात एकूण उष्मांक आणि संपृक्त मेदाम्ले (saturated fatty acids) कमी/जास्त आहेत, यावरून केली पाहिजे.

सध्या विविध माध्यमांतून ‘कोलेस्टेरॉल आणि हृदयविकार’ या विषयावरील माहितीचा सतत भडीमार आणि काथ्याकूट चालू असतो. त्यामुळे सामान्य माणसाचा कोलेस्टेरॉलकडे पाहण्याचा एक पूर्वग्रह झालेला आहे. जसे काही कोलेस्टेरॉलला आपण आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतो आणि मग पूर्वग्रहदूषित नजरेने त्याच्याकडे पाहतो. त्यामुळे सामान्य माणसाला या कोलेस्टेरॉलच्या शरीरातील उपयुक्ततेची काही जाणीवच नसते. क्षणभर आपण ‘रक्तातील वाढलेल्या कोलेस्टेरॉलचे परिणाम’ हा विषय बाजूला ठेवू आणि आपल्या पेशींमध्ये जे कोलेस्टेरॉल आहे ते किती उपयुक्त आहे ते पाहूयात.

आपल्या शरीरातील पेशींमध्ये कोलेस्टेरॉलपासून कितीतरी महत्वाची संयुगे तयार होतात. त्यापैकी तीन महत्वाची अशी:
१. त्वचेतील कोलेस्टेरॉलवर सूर्यकिरण पडले की त्यापासून ‘ड’ जीवनसत्व तयार होते.

२. कोलेस्टेरॉलपासून सगळी ‘स्टीरॉइड हॉर्मोन्स’ तयार होतात. या हॉर्मोन्सचे एक मोठे कुटुंबच आहे. त्यापैकी पुरुषातील testosterone आणि स्त्रीतील estrogen ही आपल्या अगदी परिचयाची. किंबहुना या दोघांमुळेच आपले पुरुषत्व वा स्त्रीत्व सिद्ध होते आणि आपण ते मिरवत असतो!

३. यकृतात त्याच्यापासून होणारी जी आम्ले (bile acids) आहेत ती अन्न्पचनात मोलाची मदत करतात.

आपल्या रक्तातही कोलेस्टेरॉल संचार करीत असते. त्यातील काही भाग हा रक्तवाहिन्यांच्या आतील आवरणावर हळूहळू साठत असतो. त्या साठ्यांमध्ये कोलेस्टेरॉलबरोबरच इतरही काही मेद असतात. जेव्हा रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित असते तेव्हा हे साठे अतिशय मंदगतीने वाढतात आणि त्यामुळे रक्तप्रवाह हा विनाअडथळा व्यवस्थित चालू राहतो. पण जर का रक्तातील मेदपदार्थ हे प्रमाणाबाहेर वाढले तर मात्र ही साठण्याची प्रक्रिया खूप मोठ्या प्रमाणात होते. यालाच atherosclerosis असे म्हणतात. या आजाराचा सर्वप्रथम शोध Rudolf Virchow यांनी १८५४मध्ये लावला. हा आजार जेव्हा करोनरी रक्तवाहिन्यांमध्ये होतो तेव्हा त्या आकुंचित पावल्याने किंवा ‘ब्लॉक’ झाल्याने त्या रुग्णास ‘हृदयविकाराचा झटका’ येतो. अशा प्रकारच्या ‘झटक्यांची’ वैद्यकशास्त्रात प्रथम नोंद १९१०च्या सुमारास झालेली दिसते.

आपल्या रक्तात संचार करणारे कोलेस्टेरॉल हे काही मोठ्या रेणूंच्या माध्यमातून फिरत असते. त्यातील दोन मुख्य रेणू म्हणजे LDL & HDL. LDLमध्ये जे कोलेस्टेरॉल असते त्याला “वाईट” कोलेस्टेरॉल, तर HDLमधल्याला “चांगले” कोलेस्टेरॉल असे सामान्य भाषेत म्हणतात. आता हे ‘चांगले आणि वाईट’ हे शब्द शास्त्रीयदृष्ट्या तितकेसे योग्य नाहीत. LDL मधले कोलेस्टेरॉल जर नेहमी योग्य प्रमाणात राहिले तर तसे ते आपल्याला ‘वाईट’ ठरत नाही. केवळ ‘चांगले’ चा विरुद्ध शब्द म्हणून तो प्रचलित आहे. त्याचे प्रमाण वाढते राहिल्यासाच atherosclerosis चा धोका संभवतो. तेव्हा त्या दोन्ही शब्दांचा अर्थ ढोबळमानाने घ्यायचा आहे.

आता वळूयात “कोलेस्टेरॉल आणि करोनरी हृदयविकार” या बहुचर्चित आणि वादग्रस्त विषयाकडे. विसाव्या शतकाच्या मध्यापासून हा विषय वैद्यकविश्वात सतत प्रकाशझोतात राहिला आहे. १९५३मध्ये Ancel Keys यांनी अनेक प्रयोगांती असे मत मांडले की आहारातील मेदाचे जास्त प्रमाण आणि करोनरी हृदयविकार यांचा घनिष्ठ संबंध आहे. त्यावर वैज्ञानिकांत बऱ्याच चर्चा झडल्या आणि त्यांचे मतभेदही चव्हाट्यावर आले. त्यांमध्ये John Yudkin या मधुमेहतज्ञांचे ठाम मत होते की आहारातील मेदापेक्षाही साखर हा अधिक घातक पदार्थ आहे. मग Keys आणि Yudkin यांच्यात बऱ्याचदा वैचारिक खडाजंगी झाली. त्यात अखेर Yudkin ना नमते घ्यावे लागले आणि Keys यांचे मत वैद्यकविश्वाने उचलून धरले.

१९५६मध्ये अमेरिकी हृदयविकार संघटनेने अधिकृतरीत्या जाहीर केले की आहारात बटर, अंडे आणि बीफ यांच्या अतिसेवनाने करोनरी हृदयविकाराचा धोका वाढतो. इथपासून ‘आहार आणि हृदयविकार’ या चर्चेला एक निर्णायक वळण लागले. किंबहुना, एक प्रकारे कोलेस्टेरॉलचे 'भूत' समाजाच्या मानगुटीवर बसले! त्यानंतर रक्तातील वाढलेल्या कोलेस्टेरॉलला जाणीवपूर्वक ‘लक्ष्य’ करून ते कमी करण्यासाठी अनेक उपचारपद्धती विकसित झाल्या. स्वयंपाकात कोणते तेल वापरायचे याच्या जोरदार प्रचारमोहीमा चालू झाल्या. एक दोन दशके तर सूर्यफुलाचेच तेल कसे सर्वोत्तम आहे हे ठसवणाऱ्या जाहिरातींचा सुळसुळाट झाला होता.

दुसऱ्या बाजूस वैज्ञानिकांचा एक गट हा सातत्याने फक्त कोलेस्टेरॉलला ‘लक्ष्य’ करण्याच्या विरोधात होता. त्यांच्या मते आहारातील साखर, रक्तातील अन्य एका मेदाचे (triglycerides) प्रमाण, जीवनशैली यासारखे इतर अनेक घटकही atherosclerosis होण्यास कारणीभूत होते. त्यामुळे निव्वळ कोलेस्टेरॉल कमी करण्याचे उपाय राबवणे ही त्या रुग्णांची दिशाभूल करणारे आहे, असे त्यांचे मत होते. १९७७मध्ये George Mann यांनी तर ‘आहार आणि करोनरी हृदयविकार’ हे गृहीतक म्हणजे वैद्यकाच्या इतिहासातील सर्वात मोठी बनवाबनवी (scam) असल्याचे मत नोंदवले होते.

अशा तऱ्हेने ‘कोलेस्टेरॉल आणि हृदयविकार’ या वादग्रस्त विषयावरील काथ्याकूट आजही चालू आहे. त्याच्या बाजूने आणि विरोधात विविध वैद्यकीय संघटना आग्रही मते मांडीत आहेत. १९८७पासून रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करणारी ‘Statins’ नावाची औषधे बाजारात उपलब्ध असून त्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. कोलेस्टेरॉलप्रमाणेच तीसुद्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. त्यांचे समर्थक आणि विरोधक आपापली मते सतत हिरीरीने मांडत असतात (अगदी नोटबंदी या विषयासारखी!). किंबहुना चर्चेसाठी हा विषय माध्यमांत वारंवार उकरून काढला जातो.

करोनरी हृदयविकाराच्या कारणांच्या बाबतीत अशा प्रकारचे वाद होणे अगदी स्वाभाविक आहे. मुळात हा आजार कोणत्या एका कारणामुळे होत नसतो. अनुवंशिकता, वांशिकता, जीवनशैली, व्यसने, मधुमेह आणि रक्तातील विविध मेदांचे प्रमाण असे अनेकविध घटक तो होण्यास कारणीभूत ठरतात( multifactorial disease). त्यामुळे त्यापैकी एका घटकाचा नक्की ‘वाटा’ किती हे ठरवणे खरेच अवघड असते. जेव्हा आपण आहारातील मेदांचे विश्लेषण करतो, तेव्हा फक्त कोलेस्टेरॉलकडे न बघता एकूण संपृक्त मेदांच्या (saturated fats) प्रमाणाकडे लक्ष दिले पाहिजे. त्याचबरोबर नियमित व्यायाम आणि धूम्रपानापासून अलिप्तता हेही घटक आजार प्रतिबंधाच्या दृष्टीने तेवढेच महत्वाचे आहेत.

आता एवढे सगळे पुराण सांगितल्यावर वाचक मला एक प्रश्न नक्की विचारतील. तो असा, “मग काय, रक्तातील वाढलेले कोलेस्टेरॉल हा काळजी करण्याचा विषय आहे की नाही?” मी याचे उत्तर एका सोप्या उदाहरणाने देतो. समजा, तुम्ही खूप लांब पल्य्याच्या आणि बऱ्याच दिवसांच्या प्रवासास निघाला आहात. या काळात तुम्ही अंगावरती अगदी नजरेत भरतील असे काही लाख रुपयांचे दागिने घातले आहेत. आता प्रवासादरम्यान हे दागिने हमखास चोरले जातील का? इथे हो किंवा नाही अशा दोन्ही शक्यता आहेत. पण, ते दागिने तुम्ही चोरांच्या नजरेत ठेऊन एक मोठी जोखीम नक्कीच पत्करली आहेत. त्याचप्रमाणे रक्तातील वाढलेले कोलेस्टेरॉल ही आयुष्याच्या प्रवासातील एक जोखीम नक्की आहे. पण, त्यामुळे ‘करोनरी हृदयविकार होईलच’ असे विधान मात्र करता येत नाही.

....तर असा हा भरपूर संशोधन झालेला, बहुचर्चित, बहुगुणी आणि वादग्रस्त कोलेस्टेरॉल! आरोग्यविज्ञान क्षेत्राशी संबंध नसलेल्या कोणाही सामान्य माणसाला त्याची मूलभूत माहिती व्हावी या उद्देशाने हा लेख लिहीला आहे. त्यावरील प्रतिसाद आणि शंकांचे स्वागत आहे.
******************************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साद ,
कोलेस्टेरॉल, कॉफीपान आणि हृदयविकार हा गुंतागुंतीचा विषय आहे. यावरील संशोधकांचे निष्कर्ष उलट-सुलट आहेत.

१. काहींच्या मते अतिरिक्त कॉफीपान हे संवेदनक्षम व्यक्तीमध्ये हृदयविकाराचा धोका वाढवते. अशा लोकांनी नेसकॉफी ऐवजी फिल्टर कॉफी प्यावी असा एक मतप्रवाह आहे.

२. माझ्या मते फक्त वाढलेले कोलेस्ट्रॉल एवढ्याच घटकावर आहारासंबंधी निर्णय घेऊ नये. संबंधित व्यक्तीमध्ये लठ्ठपणा, मधुमेह उच्चरक्तदाब आणि कौटुंबिक इतिहास या सर्व गोष्टींकडे लक्ष द्यावे आणि मगच डॉक्टरांच्या सल्ल्याने बदल करावेत.
३. अर्थात अशा लोकांत कॉफीचे सेवन नियंत्रणात (दिवसाला एखाद-दुसरा कप) असणे केव्हाही चांगले.
.....
वैद्य, आभार !

झटका असा निष्कर्ष नाही एकदम काढता येत. परंतु हृदयविकाराची शक्यता वाढवणाऱ्या घटकांमध्ये अनेक वर्षांपासून अतिरिक्त कॉफीपान हे कारण दिलेले आहे.

अर्थात चहा व कॉफीचे सेवन आणि आरोग्यावरील परिणाम हा प्रचंड वादग्रस्त विषय आहे !

कॉफी आणि कोलेस्टेरॉल संदर्भातील हे ताजे संशोधन आहे.
https://openheart.bmj.com/content/9/1/e001946
अर्थात शेवटी ते लोक म्हणतात की यासंदर्भात अधिक अभ्यासाची गरज आहे, इत्यादी.

कॉफी तील विशिष्ट घटक diterpenes, cafestol and kahweol आणि कोलेस्टेरॉलचा काहीतरी संबंध या संशोधनातून दिसतो

>>>>>>>>.मला तर वाटलं कॉफीमुळे टाईप २ डायबिटिस ला मदत होते आणि इतर ही फायदे आहेत.
+१०१
कॉफीने जी तरतरी, उत्साह, फोकस, सेन्स ऑफ वेल्बीईंग येते. "ऑल वेल विथ द वर्ल्ड" फीलींग ते पहाता वाट्टेल ते विरोधी संशोधन होउ द्या, मी कॉफी सोडेनसं मला वाटत नाही. माय फर्स्ट लव्ह इज कॉफी.
हां आधी पहीलं प्रेम, पाणीपुरी होतं पण आता पाणीपुरीची, function at() { [native code] }इपरिचयात अवज्ञा झालेली आहे.
कॉफी झिंदाबाद!

डॉ डीन ओर्निशच्या पुस्तकात आहे

Tea and coffee borrow energy from future.

म्हणजे एक प्रकारचे ते एक क्रेडिट कार्ड असते, म्हणजे नंतर काहीतरी मोबदला द्यावा लागेल ना ?

*Tea and coffee borrow energy from future.>>>>
वाक्य छान आहे. आवडले !

चहा आणि कोफी नेमके काय करत असतील ?

तो विक्रम चा डबल रोल असलेला सिनेमा , त्यात तो व्हिलन पंप ओढत असतो

https://youtu.be/X3B6ByXnDkU

इरू मुगन

https://youtu.be/EzKsPDOOwcc

Enjoy with mugs of tea and coffee

Proud

माझ्या डोळ्यावर पिवळसर पॅच आले आहेत, skin स्पेशालिस्ट ला दाखवून झालं,ते म्हणतात कोलेस्ट्रॉल चे आहेत,कोलेस्ट्रॉल तपासून घेतलं तर एकदम ok लेव्हल आहे मग म्हणतात आनुवंशिक आहे म्हणून आलंय(माझे वडील आणि आत्या ला पण आहे असं),
पण ते पॅच कायमस्वरूपी जाण्यासाठी ट्रीटमेंट नाही म्हणतात डॉक्टर, लेझर आणि अजून एक ट्रीटमेंट आहे पण तात्पुरती आहे,वाईट दिसणं सोडलं तर त्याचा काही त्रास नाही

तर खरंच यावर काही उपाय नसतात का?मी नक्की काय करू,कोणत्या डॉ कडे जाऊ याबाबद्दल कुणी मार्गदर्शन करू शकेल का?

आदू
डॉ नी Xanthelasma हा शब्द वापरला होता का ?
समजा, कोलेस्टेरॉल योग्य पातळीत असेल, तर TG मोजले होते का ?
निदान होत नसल्यास काही वेळा biopsy करून तपासतात.
लेझर उपचार एकदा घेऊन भागत नाही. ३-४ वेळा करावे लागू शकतील. त्यातूनही पुन्हा ते उद्भवण्याची शक्यता असते.

हे सर्व पाहता ...
पॅचमुळे सौंदर्यहानी कितपत वाटते आहे हे बघून निर्णय घ्या.
शुभेच्छा

Xanthelasma>>>yesss हाच शब्द होता,
सौन्दर्य हानी सोडलं तर खरोखर उपद्रव नसतो का?

थेट त्यांच्यामुळे काही उपद्रव होणार नाही.

एकदा ग्लुकोज तपासणी करून मधुमेह नसल्याची खात्री करून घ्या. हृदयविकारा संबंधित कौटुंबिक इतिहास असेल तर फिजिशियनचा सल्ला घ्या
आणि
हे असलं काही नसेलच तर मग निवांत राहा !

रच्याकने
तसे पॅच येण्याचे प्रमाण स्त्रियांमध्ये पुरुषांच्या तुलनेत जवळजवळ दुप्पट आहे.

२ कप कॉफी सकाळी उठल्यानंतर इज जस्ट फाईन. व संध्याकाळी ४ ला एक चहा.
आजपर्यंत अजिबात त्रास झालेला नाही.
स्वानुभव प्रमाणम!! हजार उलटसुलट - उलटसुलट रिसर्चेस येतात अन जातात. वाट्टेल ती सर्च द्या गुगल त्या सर्चला पोषक हजार साईटस काढून देते.

*स्वानुभव प्रमाणम!!
हे महत्त्वाचे
वर्ज्य काहीच नको; गरजेनुसार नियंत्रण. Happy

एच डी एल वाढवायचे आहे. त्यासाठी धागा काढा. प्लस कोलेस्टेरॉल बरो बरीने ट्रायग्लिसेराइड्स पण चेक करावे.

एच डि एल तसं ट्रिकी वाटतं मला अमा. अनुवंशिकतेमुळे जर सातत्याने एच डि एल चा आकडा कमी येत असेल तर डायट कंट्रोल मध्ये ठेवून एल डि एल कमी ठेवायचे येवढेच करता येते. कार्डियो व्यायामानी एच डि एल वाढतं म्हणतात पण माझ्या बाबतीत ते खरं नाही ठरलं. मला माहित नाही हे कनेक्टेड आहे की नाही पण माझं वन मी ड्रास्टिकली कमी केलं तेव्हा एच डि एल चांगलं आलं होतं.
कुमार साहेब सांगतीलच. ऑवरलॉच ह्या दोन्ही कोलेस्टेरॉलांवर खुप लक्ष देऊन उपयोग नाही कारण नाहीतर दररोजची अ‍ॅंग्जायटी वाढते. अन खुप कमी लक्ष देऊन वाट्टेल ते खाऊन आणि व्यायाम न करुन पण चालणार नाही. कुमार म्हणत आहेत तसं आपल्या बॉडीची टेन्डन्सी बघून, डॉ कडून योग्य तो सल्ला घेऊन ते रुटिन नीट मेन्टेन करावं आणि भिती न बाळगता जगावं अशा मताला मी आता पोहोचलो आहे.

अगदी बरोबर. अतिरिक्त काळजी नको.
मागच्या पानावरील माझा प्रतिसाद पुन्हा इथे डकवतो :

नुकतेच एका जाल-परिषदेत एका हृदयरोगतज्ञांचे यावरील विवेचन ऐकले. ते रोचक आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार करोनरी हृदयविकाराचा धोका वाढवणारे एकूण 60 घटक आहेत - त्यापैकी 20 प्रमुख तर 40 गौण आहेत !!

20 प्रमुखमध्ये त्यांनी वाढलेल्या कोलेस्टेरॉलला नवव्या क्रमांकावर टाकले आहे. पहिले दोन क्रमांक अर्थातच अयोग्य आहार आणि व्यायामाचा अभाव हे आहेत. त्यानंतर मधुमेह, उच्चरक्तदाब ही मंडळी रांगेत आहेत.

Submitted by कुमार१ on 17 December, 2020 - 20:45

....
धोका वाढवणाऱ्या महत्त्वाच्या चार-पाच घटकांवर एकत्रित लक्ष हवे. निव्वळ कोलेस्टेरॉल चा
एकमेव झेंडा हाती घेण्यात काही अर्थ नाही Happy

HDL-c हा कोलेस्टेरॉलचा एक उपप्रकार असून त्याची कार्ये खालीलप्रमाणे आहेत :

• रक्तवाहिन्यांमध्ये अतिरिक्त कोलेस्टेरॉल साठू न देणे ( रक्तवाहिन्यांचा स्वच्छतादूत)
• दाहप्रतिबंधक
• रक्तगुठळी प्रतिबंधक

इस्ट्रोजनच्या प्रभावामुळे स्त्रियांमध्ये मासिक ऋतुचक्र चालू असेपर्यंत याचे प्रमाण पुरुषांच्यापेक्षा जास्त असते.
खालील गोष्टींमुळे याची कमी झालेली पातळी काही प्रमाणात वाढू शकते:
१. नियमित एरोबिक व्यायाम
२. बीएमआय योग्य प्रमाणात ठेवणे

३. इथेही स्त्री व पुरुषांच्या बाबतीत रोचक भिन्नता आहे. स्त्रियांच्या बाबतीत झपझप चालण्यासारख्या मध्यम दर्जाच्या व्यायामांमुळेही याचे प्रमाण वाढू शकते. परंतु पुरुषांत मात्र दणकट व्यायाम केल्यावरच याचे प्रमाण वाढू शकते.
४. वाढ होण्याच्या बाबतीत अनुवंशिकतेच्या मर्यादा असतात.

पुरुष असणे हा स्वतःच हा साठ घटकातला एक घटक आहे

मिनोपॉज होईपर्यत स्त्रीच्या शरीरात जी स्त्रीत्व हार्मोन असतात , ती त्यांना हार्ट अटॅक विरुद्ध संरक्षण देतात

मिनोपॉजनंतर हे हार्मोन कमी होतात व मग स्त्रीपुरुष हे हार्ट अटॅकला समानच रिस्की होतात

<<पण ते पॅच कायमस्वरूपी जाण्यासाठी ट्रीटमेंट नाही म्हणतात डॉक्टर, लेझर आणि अजून एक ट्रीटमेंट आहे पण तात्पुरती आहे,वाईट दिसणं सोडलं तर त्याचा काही त्रास नाही<<
एक्झेक्टली मला असेच व्हाईट स्पॉट डोळ्यान्च्या पापण्यान्वर सुरवातीला आले. २-३ वर्षानन्तर त्यान्च्या गाठी बनल्या. इतक्या मोठ्या झाल्या की मला नॉर्मल बघतांना त्या जाणवाय्ला लागल्या. दुसरा त्रास काही नव्ह्ता. मग दोन वर्षापुर्वी कोविड काळात लेझरचे ऑपरेशन केले. (बरे हे मेडिक्लेम मधे कव्हर होत नाही) पण पुन्हा आता दुसर्या ठिकाणी बारीक बारीक पुटकुळ्यासारखे दिसु लागले आहे. मलाही हेच कळले होते की कोलेस्टेरॉलमुळे होतात.

>>>>स्त्रियांच्या बाबतीत झपझप चालण्यासारख्या मध्यम दर्जाच्या व्यायामांमुळेही याचे प्रमाण वाढू शकते. परंतु पुरुषांत मात्र दणकट व्यायाम केल्यावरच याचे प्रमाण वाढू शकते.>>> चांगली माहिती.
>>>>>पुरुष असणे हा स्वतःच हा साठ घटकातला एक घटक आहे>>>> +१

हल्लीच कोलेस्टेरॉल तपासून घेतलं
माझं वय 35 नि वजन 59 उंची 5.3

Total Cholesterol 179.79 mg/dL
HDL Cholesterol 42.5 mg/dL
Triglycerides 266.2* mg/dL
LDL Cholesterol 84.09 mg/dL
VLDL Cholesterol 53.24* mg/dL
LDL/HDL Ratio 1.98 mg/dL
Non-HDL Cholesterol 137.29*

आकडे बघून जाम घाम फुटलाय

आदू
कोलेस्टेरॉलचे इतके मनावर घ्यायला नको
TG मात्र चांगलेच जास्त आहे
आता व्यायाम करून चांगला घाम काढा Happy

बाकी..
आहार व जीवनशैली ....नेहमीचच मुद्दे सगळ्यांनाच माहित आहेत !
शुभेच्छा...

खूप खूप धन्यवाद डॉक्टर
तुमच्याशी बोलून नेहमीच खूप बरे वाटते
Doc नि सुद्धा व्यायाम करण्याचा सल्ला दिला आहे, वेगात चालणे सध्या सुरू आहे,आहारात बदल केले आहेत
सध्या कोणतीही गोळी औषध मात्र दिले नाही

एक प्रश्न मात्र पडतो,माझं तळलेले,चमचमीत आणि बाहेरचं खाणं बरंच कमी आहे,कामाच्या निमित्ताने चालणं ही होतंच, बैठ काम नाहीये,वजन आटोपशीर आहे,मी दारू किंवा सिगारेट ला कधी स्पर्श ही केला नाही मग माझं TG इतकं का वाढलं असावं,
आई वडील ,आजी आत्या कुणालाही high कोलेस्ट्रॉल नाही
वडील आणि आत्या दोघांना फक्त डोळ्यावर कोलेस्टेरॉल चे patch आहेत पण बाकी दोघेही वय वर्षे 65 62 ठणठणीत आहेत
मग माझं कोलेस्टेरॉल TG इतकं का असेल?

एक गैरसमज दूर करा
तुमचे एकूण कोलेस्ट्रॉल 200 च्या आत आहे ही चांगली गोष्ट आहे .
TG हे वेगळे रसायन आहे. आपण आहारात कर्बोदकांचे प्रमाण जास्त ठेवले की मग एकंदरीत TG म्हणजेच मेद -त्याचे प्रमाण वाढते
तसेच एरोबिक व्यायाम करत नसल्यास ठराविक एंजाइम्स नीट काम करत नाहीत. त्यामुळे रक्तातील TG वाढते
तेव्हा झोपेल इतका व्यायाम , एरोबिक प्रकारचा, नियमित करायचा.
धावणे/ जिने चढणे /पोहणे /सायकल.
निव्वळ चालणे हा व्यायाम समजायचा असेल तर ते इतके झप झप व्हावे लागते ही चालत असताना अजिबात बोलता आले नाही पाहिजे Happy

Pages