साधना - ४ : समाप्त

Submitted by प्राचीन on 12 March, 2019 - 05:48

युक्ताहार -
यापुढील भागात आहाराबाबत काही मुद्दे पाहू.
साधनेच्या दृष्टीने आहारशुद्धीचे फार महत्त्व आहे. अन्नाद् भवति भूतानि। (भ.ग३/१४)
म्हणजे मनुष्य जसे अन्न खातो तसा त्याचा स्वभाव बनतो. मागील लेखामध्ये उल्लेखिल्याप्रमाणे साधकाचा आहार सात्विक तर असावाच, परंतु आरोग्याकरिता त्यात सहाही रस योग्य प्रमाणात, प्रकृतिगुणधर्मानुसार व ऋतुमानाप्रमाणे असावेत. याबाबत अधिक माहितीसाठी मायबोलीवर असलेले तत्संबंधी लेख जरूर उपयुक्त ठरतील.शरीर हे पंचमहाभूतांचे बनलेले असते. ही महाभूते एका विश्वव्यापी ऊर्जेतून निर्माण झाली. मानवास जर ही ऊर्जा विना माध्यम ग्रहण करता आली,तर त्याकरिता अन्नासारख्या माध्यमाची गरज राहत नाही. पतंजलिंच्या योगसूत्रात सांगितल्याप्रमाणे, कण्ठकूपे क्षुत्पिपासावृत्ति:।- म्हणजे विशिष्ट (कण्ठकूप) प्रकारे ध्यान केल्यास तहानभूक लागत नाही. (पा.यो.सू.विभूति पाद ३१) ही सिद्धी प्राप्त करणे अत्यंत कठीण आहे. सर्वसाधारण माणसांना व साधकांना मात्र अन्नरूपी इंधनाची गरज असतेच. खरे तर ह्या गोष्टी आपल्याला माहीत असतात, परंतु काही वेळा अतिपरिचयात् अवज्ञा असा प्रकार होत असतो. शरीर हे साधनेचा पायाच असल्याने त्यास सतत क्रियाशील ठेवणे आवश्यक आहे. उपनिषदांचे तर सांगणे आहे की नायमात्मा बलहीनेन लभ्य:। - जो बलहीन आहे, त्यास आपली आत्मिक उन्नती घडवून आणणे कठीण आहे. (मुंडक.३२/४)
त्यामुळे आहार किती,कोणता,कसा, कधी घ्यावा, याचे स्वत:पुरते तारतम्य बाळगून साधनेत आलस्य न येईल, याची काळजी घ्यावी.
उपवास
उपवासाचे महत्त्व धार्मिक व शारीरिक असे दोन्ही प्रकारचे आहे. काही काळ अन्न न घेणे, पचनेंद्रियांना विश्रांती देणे, हा शारीरिक हेतू असला तरी आध्यात्मिक उद्देश मात्र उप + वास म्हणजे परमेश्वराच्या जवळ राहणे हा आहे. विस्तवाजवळ बसल्यावर जसा त्याच्या उष्णता ह्या गुणधर्माचा अनुभव मिळतो,तसे ईश्वराच्या सहवासात राहून आपल्याला (नामसंकीर्तन,भजन,पूजा,इ.) शक्ती, ज्ञान,आनंद ह्यांची अनुभूती घेता येते.
तरीदेखील आरोग्यशास्त्रातील उपवास, आहार यांचे महत्त्व व त्याअनुषंगाने साधकास साधनेकरिता जीवनशक्तीचा होणारा लाभ यांचे थोडे स्पष्टीकरण पाहू या.
जीवनशक्तीचे तिहेरी कार्य
आपल्या शरीरात पचनक्रियेमधील जीवनशक्ती मुख्यत्वेकरून तीन प्रकारचे कार्य करीत असते.
1) खाल्लेल्या अन्नाचे पचन करणे
2) आपल्याकडून श्रम करून घेणे
3) आपल्या शरीरात एकत्र आलेल्या अनिष्ट विषारी विजातीय द्रव्यांचा, मलमूत्रादि पदार्थांचा निचरा करणे.
या जीवनशक्तीची काही स्वाभाविक वैशिष्ट्ये आहेत, त्यांपैकी एक म्हणजे असे आहे की जीवनशक्तीला जेव्हा जेव्हा अवसर मिळतो, तेव्हा तेव्हा मल काढून टाकण्याकरिता ती स्वत:च झटू लागते. आणि म्हणून आपण अन्न जरी खाल्ले नाही तरी पचनाचे कार्य करावयाचे नसल्यामुळे जीवनशक्ती, हा मळ काढून टाकण्याच्या कामाला स्वत:हून सुरुवात करते. आयुर्वेदात दिलेले आहे – “ आहार: पचति शिखी दोषानाहरवर्जत:।“ म्हणजे शिखी (जठराग्नीच्या रुपातील जीवनशक्ती, वैश्वानर) अन्न पचवितो, पण पोटात अन्न नसल्यास ती जीवनशक्ती मलनिष्कासनाच्या कार्यास प्रवृत्त होते; मल काढून टाकण्याचे काम शिल्लक नसल्यास ती शक्ती श्रमाच्या कामास प्रवृत्त होते.
तसेच सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी असलेले शरीर हे पंचभूतात्मक आहे. पृथ्वी,आप,तेज, वायू, आकाश ही पाच महाभूते आणि या पंचभूतात्मक शरीरात परमेश्वर वैश्वानराच्या रूपाने वास करीत असतो.
अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिना देहमाश्रित:।
प्राणापानसमायुक्त: पचाम्यन्नं चतुर्विधम्॥ (भगवद्गीता २५/२४)
- परमेश्वरच सर्व प्राण्यांच्या शरीरामध्ये वैश्वानर (अग्नि) रूपाने चारी प्रकारचे अन्न शिजवीत असतो. हे चार प्रकारचे अन्न म्हणजे पृथ्वी, आप, तेज व वायू ह्या चार महाभूतांचे प्रातिनिधिक अन्न. ही चार महाभूते - तत्त्वे आहारविषयक आहेत नि पाचवे तत्त्व आकाश हे उपवासविषयक आहे. उपवासकालामध्येच या तत्त्वांचा संपूर्ण समावेश शरीरामध्ये होऊ शकतो.
बाकी चार तत्त्वांच्या आहाराच्या पदार्थांशी ज्या प्रकारचा संबंध आहे, ते प्रकार असे –
धान्याचा संबंध पृथ्वीतत्त्वाशी आहे; धान्यामध्ये गहू,तांदूळ,ज्वारी,बाजरी,मका ह्यासारखी एकदल धान्ये येतात. डाळी व कडधान्ये यांसारखी द्विदल धान्येही येतात. पण डाळीमध्ये पृथ्वीतत्त्व अधिक प्रमाणात असते. ही धान्ये शरीराला स्थूलता देतात, आकार देतात, शरीराचे पोषण करतात. जे लोक शारीरिक श्रम करतात, तेच लोक जास्त सकस अन्न खाऊन ते पचवू शकतात. बौद्धिक श्रम करणार्‍यांना या प्रकारच्या अन्नाची कमी गरज असते.
जल व तेज तत्त्वांचा संबंध – जल व तेज तत्त्वांचा संबंध आपल्या जेवणातील भाज्यांशी आहे. त्यांत पालेभाज्या, भोपळा, कारली, पडवळ, श्रावणघेवडा (फरसबी) वगैरे सारख्या हिरव्या फळभाज्यांमध्ये जलतत्त्व अधिक प्रमाणात असते. बटाटे, रताळी यांमध्ये कमी असते. तेज तत्त्व विशेषकरून पिकलेल्या फळांमध्ये असते. त्यामध्ये तसे पाहिले तर जलतत्त्वही भरपूर प्रमाणात असते.
अग्नि म्हणजे सूर्यापासून मिळणारे तेज, मिळणारा प्रकाश. ज्यावेळी आपण उन्हातून हिंडत असतो, सूर्याच्या उष्णतेने पिकलेली फळे खातो, त्यावेळी शरीरात तेजस् तत्त्वाचा समावेश होतो. फळेदेखील 2 प्रकारची असतात – रस देणारी व गर असणारी. गराच्या फळांत पृथ्वी तत्त्व असते तर रसदार फळांत जल असते.
वायुतत्त्वाचा खुलासा – चौथे तत्त्व म्हणजे वायू. हे विशेष प्रमाणात पालेभाज्यांत असते. या तत्त्वाचा उल्लेख गीतेमध्ये पत्र या शब्दाने केला आहे. पत्रामध्ये सुद्धा तुळस, बेल यांमध्ये शरीर शुद्ध करण्याची शक्ती जास्त प्रमाणात असते.
अशा प्रकारे शाखा, फल, कंद व अन्न या प्रकारचा वायू ,तेज, आप व पृथ्वी या तत्त्वांशी अनुक्रमे संबंध आहे. आणि आकाशतत्त्वाचा संबंध उपोषणाशी आहे. दैनिक जीवनात आकाशतत्त्वाचा म्हणजे उपोषणाचा जेवणात समावेश करता आला तर आहार संतुलित होऊ शकतो व अशा संतुलित आहाराने शरीर निरोगी व दृढ होऊ शकते.
टीप - जिज्ञासूंनी याबद्दल अधिक माहितीसाठी परमहंस योगानंद यांचे आत्मचरित्र तसेच पवहारी बाबांचे चरित्र (केवळ वायूभक्षण करून जगलेले) किंवा डॉ. बार्बरा मूर यांचे लेख (भारतात येऊन गेल्यावर त्यांनी शरीरशुद्धीसाठी स्वत:वर केले प्रयोग) जरूर वाचावेत, ही विनंती.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
याआधी साधनेचे जे विविध मार्ग पाहिले होते, त्यांपैकी सर्वच मार्गांचे यथास्थित विवेचन हा प्रस्तुत लेखनाचा उद्देश नाही, तर त्यांचा केवळ परिचय करवून देणे ज्यायोगे, आपल्या स्वभावधर्मास अनुसरून साधना करण्याकडे कल निर्माण होऊ शकेल, हा हेतू आहे..
मात्र प्रार्थना किंवा नामस्मरण ह्या विषयाबाबत आणखी काही गोष्टी मांडाव्यात, ह्या दृष्टीने यापुढील लेखनप्रयत्न असेल.
ह्ल्लीच्या समाजात एक प्रवाह असा आहे की आध्यात्मिक, आधिभौतिक वगैरे सर्व थोतांड आहे, त्याच्या नादी लागणे म्हणजे व्यर्थ कालक्षेप करणे होय. दुसरा प्रवाह असा आहे की हे सर्व सत्य आहे; मात्र त्याबाबत श्रद्धा पाहिजे. ही दोन्ही मते सर्वथा चुकीची म्हणता येणार नाहीत. आपल्याला न दिसणारी गोष्ट अस्तित्वातच नाही हे म्हणणे जसे एकांगी , तसे कोणीतरी सांगितले म्हणून श्रद्धा ठेवलीच पाहिजे, हाही आग्रह एकांगी नाही का?
पार्थना किंवा जप कशाकरिता, कोणती , कोणी व कोणाकडे करावयाची हे आधी समजून घ्यायला हवे. जसे- एखाद्या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज करणे हीदेखील एक प्रकारची प्रार्थना आहे. त्या अर्जात जर आपण संबंधित अधिकार्‍याची नुसती स्तुती,त्याच्या कुटुंबियांचे गुणगान केले, स्वत:ची पात्रता मात्र लिहिलीच नाही, किंवा तशी पात्रता स्वत:कडे नसेलच, तर ती नोकरी मिळणे किती बरे कठीण होईल ? म्हणजे आधी तेवढी पात्रता मिळवायची, मग ती अर्जात नमूद करायची व जरूर तर ती त्या अधिकार्‍यापर्यंत पोहोचवायची ही खरी आवश्यक बाब. अध्यात्मामध्येदेखील साधना/प्रार्थना कशाकरिता करावयाची ते समजून घ्यायला हवे.निष्काम प्रार्थना फार कठीण असते.जसे कोठे जाताना नुसते घरातून निघून उगीच ध्येयशून्यपणे चालणे वेडेपणाचे असते, तसे पारमार्थिक कारणाकरिता का होईना, फलविरहित श्रम व कालापव्यय का करावा?
आपले ध्येय साध्य करण्याकरिता कोणते मार्ग आहेत, जे याआधी त्या मार्गाने गेलेले आहेत, त्यांचा अनुभव काय आहे, याचा सांगोपांग विचार करून प्रयत्न केला की कार्यसिद्धी सुलभ होते. याकरिता वेळी आपल्याकडे कमीपणा घेऊनही तद्विषयक माहिती ग्रंथ वा अनुभवी व्यक्तीकडून मिळवावी. यानंतरसुद्धा एक गोष्ट लक्षात असू द्यावी की व्यक्तीच्या स्वभाव – प्रकृतीप्रमाणे फलनिष्पत्तीस कमी अधिक काळ लागू शकतो.
प्रार्थना अथवा जप
प्रार्थना म्हणजे केवळ स्तुती नाही, हे आपण पाहिले. प्रार्थना म्हणजे जे आपले साध्य आहे, ते साध्य करून घेण्याची आपली पात्रता सिद्ध करून घेणे व नंतर त्याचे अधिष्ठान असलेल्या ईष्टदेवतेचे साधन करणे होय. इष्टदेवता याचा अर्थ त्यात अभिप्रेत असलेल्या शक्तीचे अधिष्ठान होय; मग त्यास कोणतेही नाव वा रूप असो ! नाम-रूप दिल्याने ध्यानास सुलभता येते इतकेच. उदाहरणार्थ, गणपती ही विघ्न नाहीसे करणारी एक शक्ती आहे व तिची विशिष्ट प्रकारे साधना केली म्हणजे संकटे दूर होतात. कोणी असेही म्हणेल की परमेश्वर सर्वसमर्थ आहे व त्याच्या शक्तीत सर्व शक्ती अंतर्भूत आहेत. तर भेद कशासाठी करावयाचा? वाच्यार्थाने हे खरे असले तरी आपण देहबुद्धीच्या पातळीवर असल्याने आपल्याला अखिल ब्रह्मांडाचा निर्माता व धारणकर्ता परमेश्वर म्हणजे काय, त्याचे स्वरूप कसे आहे, याची कल्पना येणे फार अवघड आहे. मग त्याची उपासना तर त्याहून कठीण. एखाद्या देशात जसे प्रांतवार अधिकारी असतात, त्यांच्याकडे आपले काम साधण्याची अधिक शक्यता असते किंवा एखाद्या कारकुनाच्या जागेसाठी पंतप्रधानाकडे अर्ज केला तर ते त्याचा विचार करू शकणार नाहीत असे नाही,परंतु व्यावहारिक दृष्टीने असे करणे शहाणपणाचे ठरणार नाही, तद्वत् अध्यात्मामध्ये देखील कार्यसिद्धीकरिता निरनिराळ्या शक्ती व त्याची अधिष्ठाने असतात. त्यांच्या उपासनेमुळे जगातील सुप्तावस्थेमध्ये असलेली विविध शक्तिस्थाने जागृत होतात व कार्य साधून देतात.
जसे निसर्गात अनेक औषधी वनस्पती असतात; रोगही अनेक असतात; परंतु ठराविक वनस्पति ही विशिष्ट रोगाकरिता परिणामकारक असते. शिवाय अनुपान रोग्यालाच करावे लागते, पथ्यही त्यालाच पाळावे लागते, कितीही प्रिय वा जवळची व्यक्ती असली तरी ती रोग्याऐवजी हे करू शकत नाही व केले तरी आजार बरा होणार नाही; याकरिता कोणताही जप वा नामस्मरण वा प्रार्थना करण्यापूर्वी मन शुद्ध (द्वेषरहित) करण्याचा प्रयत्न करावा व पुढेदेखील तशी अवस्था टिकवावी. राग, द्वेष,सूड, इ. विचाराची स्पंदने उत्पन्न होतानाच मनोमालिन्य वाढवतात व त्यांचे प्रगटीकरण झाल्यावर इतरांवर जे आघात होतात, त्याची प्रत्याघातरूपी स्पंदने आपले मन दूषित करतात. याकरिता रागावणे हे कधी कधी जरूरी असले तरी ते मनापासून नसून कार्यापुरते असावे. सज्जनाचा राग म्हणजे तेलाचा नव्हे, तर पाण्याचा डाग असावा. आणि व्यवहारात हे चालणार नाही, असे जर वाटत असेल तर थोडा वेगळा विचार करून पाहा. समाजातील मोजक्याच व्यक्ती जप वा साधना करणा र्‍या असतात. तुम्ही जेव्हा साधना करण्याचे निश्चित करता, तेव्हा सर्व अपवादात्मक व्यक्तींपैकी तुम्ही एक असता; तर मग त्याप्रमाणे त्यागाचीही तयारी ठेवून अपवादात्मक अशी वागणूक असायला काय हरकत आहे?
रामनाम तो सब कोई कहे – ठक,डाकू और चोर।
नारद पवनसुत कहे उनकी महिमा कुछ और॥ - संत कबीर

सारांश, मंत्र कितीही प्रभावी असला तरी त्याचे ग्रहण करणारे मन शुद्ध असायलाच हवे. हे साधले की शक्तीची स्पंदने वाढत जाऊन इष्टदेवता प्रसन्न झाल्याखेरीज राहणार नाही !
साधारणपणे रोज ठराविक वेळी व ठराविक ठिकाणी जप करावा; परंतु शहरी जीवनात हा नियम काटेकोरपणे पाळणे कठीण असल्याने अखंडता/सातत्य हे सूत्र तेवढे पाळावे. शक्यतो एकाच देवतेचे अनुसंधान असावे. कारण प्रत्येक नामाचा उच्चार म्हणजे मन:पटलावर घाव घालणे वा तेजाचे कण जमा करणे होय. मंत्रजपामुळे ती शक्ति एकत्र झाली की तिचा परिणाम साधला जातो. सर्व औषधे जशी पोटातच घेतली तरी एक ज्वरावर परिणाम करते, एक कफावर करते, तसे मंत्रोच्चाराने जरी सारखीच कंपने निर्माण होत असली तरी त्यांचे साधकाच्या शरीर व मनावर तसेच आत्मशक्तीवर निरनिराळे परंतु निश्चित व सकारात्मक परिणाम होतात. काही ठिकाणी लाखो लोक अनेक वर्षे जाऊन आपली भावनात्मक स्पंदने ठेवून जातात, त्या ठिकाणी केलेले अनुष्ठान अधिक लवकर फलदायी होते. मात्र ते अनुष्ठान/साधना त्या ठिकाणच्या देवतेच्या शक्तिस्थानास अनुसरून असले पाहिजे (जसे गुरूकडे वा संतांकडे भौतिक गोष्टी न मागता मोक्ष मागणे श्रेयस्कर)
नामस्मरणात आपल्या ध्येयमूर्तीशी तिच्या नामातून संवाद साधणे अभिप्रेत आहे. या संवादात लय लागू लागला की शाश्वत आनंदाची अनुभूती मिळते. आपल्यामध्ये अस्तित्त्वात असलेल्या परमात्मतत्त्वाची ओळख पटणे हाच ईश्वरी साक्षात्कार होय. किंबहुना हे साधणे हेच मानवी जीवनाचे अंतिम ध्येय होय,असे जगभरातील सर्व संतांचे सांगणे आहे. अर्थात साधनेचा खटाटोपदेखील याकरिताच आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(माझे परिचित कै.माधव कुलकर्णी यांनी साधनेविषयी केलेली माझ्याकडील उपलब्ध टिपणे येथेच संपतात, त्यामुळे हीच लेखनमर्यादा आहे. परंतु या विषयावरील विविध मार्गदर्शनपर वाड़्मयाचा अभ्यास करून साधनेच्या प्रवासामध्ये सातत्य राखता येऊ शकेल. धन्यवाद.)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहीलय..
आहार विहाराचे नियम पाळले पाहिजेत हे पटले
उपवासाची खरी व्याख्या तर हल्ली दुर्ल़क्षितच झाली आहे, असो

पु ले शु
पु भा म्प्र

मालिका लवकर संपवलीत. आपण स्वत: साधनेच्या कुठल्या टप्प्यावर आहात, तसेच आपले स्वानुभव लिहावेत ही अपेक्षा. पुलेशु.

अरे संपली लेखमाला?
प्राची तुमच्याकडे जर एवढीच टिपणे असली तरी तुम्ही या टिपणांवर तुमची मते, तुमचे विचार मांडत हा मालीका पुढे सुरु ठेवू शकता. विषय चांगला आहे आणि त्या निमित्ताने तुमचे तसेच इतरांचेही विचार वाचायला मिळतील. असो.

हा भाग सुध्दा खुप सुरेख आणि मााहितीपुर्ण झाला आहे.

शाली, हा विषय गहन आहे व आपल्यासारख्या समर्थ लेखणीतून त्यावर पुढे लिहिलं गेलं तर बरंच होईल.