नोबेल-संशोधन(४) : रक्तगटांचा शोध

Submitted by कुमार१ on 5 March, 2019 - 22:08

वैद्यकातील प्रभावी नोबेल-विजेते संशोधन : भाग ४

टीप: या लेखमालेचे पाहिले ३ भाग म भा दिनाच्या उपक्रमा अंतर्गत प्रकाशित झालेले आहेत.
( भाग ३: https://www.maayboli.com/node/69129)
*****************
१९३० चे नोबेल
या संशोधनाचा तपशील असा आहे:

विजेता संशोधक : Karl Landsteiner
देश : ऑस्ट्रिया
संशोधकाचा पेशा : औषधवैद्यक व विषाणूशास्त्र
संशोधन विषय : मानवी रक्तगटांचा शोध

अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान समजले जाते. त्या खालोखाल कुठल्या दानाचा क्रमांक लावायचा? माझ्या मते अर्थात रक्तदान ! जेव्हा एखाद्या रुग्णाला काही कारणाने तीव्र रक्तस्त्राव होतो तेव्हा तो भरून काढायला दुसऱ्या माणसाचे रक्तच लागते. विज्ञानाने कितीही प्रगती केलेली असली तरी हुबेहूब मानवी रक्त प्रयोगशाळेत तयार करणे अद्याप तरी जमलेले नाही. अशा वेळी माणसाला गरज असते ती मानवी रक्तदात्याचीच. अशा वेळेस आपण एखाद्या निरोगी आणि रक्तगट जुळणाऱ्या दात्याची निवड करतो. या दात्याचे रक्त जेव्हा संबंधित रुग्णास दिले जाते त्या प्रक्रियेस रक्तसंक्रमण (transfusion) म्हणतात.

सर्व माणसांचे रक्त जरी एकाच रंगाचे असले तरी त्यांचे ‘गट’ निरनिराळे असतात हे आपण आज जाणतो. परंतु हा मूलभूत शोध अनेक वैज्ञानिकांच्या अथक परिश्रमानंतर लागलेला आहे. त्यासाठी हे संशोधन काही शतकांत अनेक टप्प्यांतून गेलेले आहे. त्याचा इतिहास आता जाणून घेऊ.
रक्तसंक्रमणाचे प्रयोग इसवी सनाच्या पंधराव्या शतकापासून सुरु झाले. जेव्हा एखाद्या रुग्णास रक्ताची गरज असे तेव्हा त्याकाळी त्याला एखद्या प्राण्याचे अथवा निरोगी व्यक्तीचे रक्त काढून पिण्यास देत ! किंबहुना यातूनच ‘रक्तपिपासू’ भुताची दंतकथा रुजली असावी. अर्थातच असे प्रयोग अयशस्वी ठरले. त्यातून असा निष्कर्ष निघाला की रक्तसंक्रमण हे शिरेतूनच (vein) झाले पाहिजे. १७व्या शतकाच्या उत्तरार्धात एका प्राण्याचे रक्त दुसऱ्या प्राण्यास देऊन असे प्रयोग झाले. त्यानंतरच्या टप्प्यात सस्तन प्राण्याचे रक्त माणसास दिले गेले. काही प्रयोगांत माणसाचे रक्त कुत्र्यास दिले गेले. मात्र त्यात कुत्रा नंतर मरण पावला. असे बरेच वेळा दिसल्यानंतर एक महत्वाचा निष्कर्ष निघाला.

तो असा की, एका प्राणिजातीचे (species) रक्त अन्य जातीस चालणार नाही. पुढे ते प्रयोगशाळेत सिद्ध केले गेले. त्या प्रयोगात जेव्हा एका प्राण्याच्या रक्तपेशी जेव्हा दुसऱ्या जातीच्या रक्ताबरोबर मिसळल्या जात तेव्हा त्या २ मिनिटांतच फुटून जात. त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे, माणसाला रक्ताची गरज भासल्यावर माणसाचेच रक्त दिले पाहिजे.

अखेर इ.स. १८१८मध्ये इंग्लंडमध्ये एका माणसाचेच रक्त दुसऱ्यास संक्रमित करण्याचा प्रथम प्रयोग झाला. James Blundell या प्रसूतीतज्ञास त्याचे श्रेय जाते. प्रसूतीनंतर रक्तस्त्राव झालेल्या स्त्रीत त्याने असे संक्रमण यशस्वी केले. या घटकेला मानवी रक्तगटांचे ज्ञान झालेले नव्हते ही बाब उल्लेखनीय आहे ! म्हणजेच वरील घटनेत दाता व रुग्ण यांचे ‘गट’ योगायोगानेच जुळले असले पाहिजेत. इथपर्यंतचा अभ्यास हा Karl Landsteiner यांच्या पुढील संशोधनासाठी पाया ठरला.

सन १९०० मध्ये कार्ल हे व्हिएन्नातील एका संशोधन संस्थेत काम करीत होते. त्यांनी वेगवेगळ्या माणसांचे रक्तनमुने गोळा करून त्यांच्यावर प्रयोग चालू केले. आपल्या रक्तात पेशी आणि द्रव भाग (serum) असे दोन घटक असतात. या प्रयोगांत पेशींपैकी त्यांनी लालपेशीवर लक्ष केंद्रित केले होते. त्यांच्या प्रयोगात एका माणसाच्या लालपेशी दुसऱ्या माणसाच्या serum बरोबर मिसळल्या जात. हे प्रयोग अनेक जणांचे रक्तनमुने घेऊन करण्यात आले. त्यापैकी काही मिश्रणे व्यवस्थित राहिली. पण, अन्य काहींत लालपेशींच्या गुठळ्या (clumps) झाल्या. यातून असा निष्कर्ष निघाला की काही माणसांच्या लालपेशीच्या आवरणात विशिष्ट antigens असतात तर अन्य काहींच्या नसतात. या अनुषंगाने त्यांनी माणसांची तीन रक्तगटांत विभागणी केली: A, B आणि C. याचा अर्थ असा होता:

A गटाच्या रक्तात लालपेशीत ‘A’ हा antigen असतो.
B गटाच्या रक्तात लालपेशीत ‘B’ हा antigen असतो आणि,
C गटाच्या रक्तात लालपेशीत कुठलाच antigen नसतो.

त्याचबरोबर त्यांच्या हेही लक्षात आले की एखाद्या रुग्णास समान गटाचे रक्त दिल्यास त्याच्या लालपेशीना कुठलीच इजा पोहोचत नाही. मात्र अन्य गटाचे रक्त दिल्यास धोका पोहोचतो. अशा प्रकारे या घटकेला या संशोधनाचा पाया तयार झाला. पुढे कार्ल यांच्या विद्यार्थ्यांनी एक चौथा गट शोधला आणि त्याला AB हे नाव दिले. या गटाच्या रक्तातील लालपेशीवर A व B हे दोन्ही antigens असतात. पुढे अधिक विचारांती C गटाचे O असे नामांतर झाले. या O चा अर्थ ‘शून्य’(antigen) असा आहे. अशा रीतीने ही ४ रक्तगटांची एक प्रणाली तयार झाली आणि त्याचे A, B, O व AB हे प्रकार ठरले. या संशोधनावर आधारित पहिले रक्तसंक्रमण १९०७मध्ये न्यूयॉर्कमध्ये केले गेले.

आता आपण या चारही गटांचा अर्थ समजून घेऊ (चित्र पाहा).

1200px-ABO_blood_type.svg_.png

A = लालपेशीत A antigen आणि सिरममध्ये anti-B हे प्रथिन.
B = लालपेशीत B antigen आणि सिरममध्ये anti-A हे प्रथिन.

AB = लालपेशीत A व B हे दोन्ही antigens आणि सिरममध्ये कोणतेच विरोधी प्रथिन (antibody) नाही.

O = लालपेशीत कोणताही antigen नाही आणि सिरममध्ये anti-A व anti-B ही दोन्ही प्रथिने.

यातून रक्तसंक्रमणासंबंधी खालील महत्वाचे निष्कर्ष निघाले:
१. समान रक्तगटाची माणसे एकमेकास रक्त देऊ शकतात.

२. O गटाचे रक्त अन्य तिन्ही गटांस दिल्यास काही बिघडत नाही कारण या लालपेशीत कोणताच antigen नसतो. त्यामुळे हे रक्त घेणाऱ्यांच्या रक्तात कोणतीच ‘प्रतिक्रिया’(immune reaction) उमटत नाही.

३. AB गटाची माणसे अन्य तिन्ही गटांचे रक्त स्वीकारू शकतात कारण त्यांच्या सिरममध्ये A वा B ला विरोध करणारी प्रथिने तयार होतच नाहीत.

या क्रांतीकारी संशोधनाबद्दल कार्लना १९३०मध्ये नोबेल दिले गेले. हे संशोधन अत्यंत मूलभूत असल्याने त्यांना रक्तसंक्रमणशास्त्राचा पिता म्हणून ओळखले जाते.
यानंतर वैद्यक व्यवसायात अनेक रक्तसंक्रमणे होऊ लागली. त्यासाठी दाते निवडताना फक्त वरील ABO या प्रणालीचाच विचार होत होता. परंतु कार्ल यांचे संशोधन अद्याप चालूच होते. त्यांच्या मते लालपेशीत या प्रणालीखेरीज अन्य काही प्रकारचे antigensही असण्याची शक्यता होती. अखेर त्यांच्या परिश्रमास १९३७मध्ये यश आले. आता अन्य एका सहकाऱ्यासमवेत त्यांनी Rh या नव्या antigenचा शोध जाहीर केला. Rh हे नाव देण्यामागे एक कारण होते. तेव्हा त्यांना असे वाटले की आपल्या लालपेशीतला हा antigen ‘Rhesus’ माकडाच्या पेशींत असलेल्या antigen सारखाच आहे. पुढील संशोधनात असे आढळले की माणूस व माकडातील हे antigens वेगवेगळे आहेत. त्यामुळे आता Rh हे नाव शास्त्रीयदृष्ट्या बरोबर नसले तरीही ऐतिहासिक कारणासाठी ते टिकून आहे.

आता रक्तगट प्रणालींत ABOच्या जोडीला Rhची भर पडली. त्यानुसार माणसांचे २ गट पडले:
लालपेशीत Rh(D) हा antigen असल्यास त्याला Rh-positive म्हणायचे आणि,
लालपेशीत Rh(D) हा antigen नसल्यास त्याला Rh-negative म्हणायचे.

आज आपण आपला रक्तगट सांगताना वरील दोन्ही प्रणालींचा वापर करतो. उदा.: A, Rh-positive.

Rh प्रणालीच्या शोधानंतर रक्तदानासाठी “सार्वत्रिक दात्या”ची व्याख्या सुधारण्यात आली. त्यानुसार O, Rh-negative हा गट असलेली व्यक्ती सार्वत्रिक दाता ठरते. अर्थात रक्तसंक्रमणापूर्वी दाता व रुग्ण यांच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पूर्णपणे “match” करून आणि दात्याचे अन्य काही निकष बघूनच योग्यायोग्यतेचा निर्णय घेतला जातो.
कार्ल यांनी वरील शोधाव्यतिरिक्तही अन्य संशोधन केले आहे. ते रोगप्रतिकारशक्ती आणि allergy या संदर्भात आहे. तसेच त्यांनी अन्य सहकाऱ्याच्या मदतीने पोलिओच्या विषाणूचा शोध लावलेला आहे. ते अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी आहेत.

सन १९१०च्या दरम्यान अन्य काही संशोधकांनी रक्तगट हे अनुवांशिकतेने पुढच्या पिढीत संक्रमित होतात हे सिद्ध केले. पुढे त्याचा उपयोग वादग्रस्त पितृत्वासंबंधीच्या दाव्यांमध्ये करता आला.
.......

काही आजार वा शस्त्रक्रियादरम्यान रुग्णास रक्तस्त्राव होतो. अन्य काही आजारांत शरीरात निरोगी रक्त तयार होत नाही. अशा सर्व प्रसंगी रुग्णास अन्य व्यक्तीचे रक्त द्यावे लागते. त्या प्रसंगी ते जीवरक्षक ठरते. आपल्या अनेक सामाजिक कर्तव्यांत रक्तदान हेही समाविष्ट आहे. त्यासाठी आपल्या प्रत्येकाला स्वतःचा रक्तगट माहित असणे अत्यावश्यक आहे. रक्तगटांच्या मूलभूत शोधामुळे वैद्यकातील रक्तसंक्रमण निर्धोकपणे करता येऊ लागले. हा क्रांतिकारी शोध लावणाऱ्या कार्ल यांना वंदन करून हा लेख पुरा करतो.
******************
(चित्र जालावरून साभार).

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा क्रांतिकारी शोध लावणाऱ्या कार्ल यांना मी सुध्दा त्रिवार वंदन करतो.
त्यांना सोप्या भाषेत आमच्या पर्यंत तुम्ही पोहचवलेत म्हणून तुमचे आभार .‌

मानव, धन्स.
.........
मला या विषयावरील एका परिसंवादात खालील प्रश्न विचारला गेला होता:

समजा एखाद्या जोडप्यातील पुरुष A आणि स्त्री B गटाची आहे तर त्यांच्या अपत्याचा गट A किंवा B यापैकीच असतो का ? जरा स्पष्ट करणार का?
…..
हा प्रश्न चांगला असल्याने सर्वांचे माहितीसाठी त्याचे उत्तर लिहितो. सामान्य माणसाच्या तर्काप्रमाणे त्याचे उत्तर A/B इतकेच असते. पण, वस्तुस्थिती तशी नाही !
असे का, ते समजावून घेऊ.

१. समजा एखाद्याचा गट A आहे तर त्याला phenotype A म्हणतात.
२. या A च्या अंतर्गत २ genotypes असू शकतात : AA किंवा AO. त्यातला कुठला हे त्याच्या आईवडिलांच्या genotypes वर ठरेल.

३. A व B हे antigens अनुवंशिकतेत ‘प्रबळ’ असतात तर O (शून्य) हा दुर्बल असतो.
४. त्यामुळे O गट असणाऱ्याचा genotype OO च असतो.

५. समजा, वडील A व आई B गटाचे आहेत . तर त्यांना होणारी मुले ही A, B, AB अथवा O ची सुद्धा असू शकतात. हे समजण्यासाठी खालील चित्र पहा :

800px-ABO_system_codominance.svg_.png

उत्तम माहिती कुमार.
तुम्ही शेवटच्या प्रतिसादात आई बाप आणि मुलाचा रक्तगट याबद्दल जी माहिती दिली ती भरपूर व्हायरल होण्याची गरज आहे.असा आईबापाचा रक्तगट अ ब आणि मुलाचा ओ वगैरे निघाला तर भलते संशय घेतले जायचे.

आईबापाचा रक्तगट अ ब आणि मुलाचा ओ वगैरे निघाला तर भलते संशय घेतले जायचे.>> अरे देवा!

अनु, जाई आणि वरील सर्वांचेच आभार.

माझा तो प्रतिसाद ज्यांची इच्छा आहे ते खुशाल फॉरवर्ड करू शकतात. तो लोकशिक्षणाचाच भाग राहील.

मानव,
याबद्दल बरेच जोक्स प्रत्यक्ष ऐकले आहेत म्हणूनच म्हणतेय ☺️☺️ 'बाळाचा ब्लडग्रुप अमुक निघाला?हो तो तर निघणारच होता.वेगळा निघाला असता तर लोचा असता' अश्या वाक्यात.
आता पुढच्या वेळी असे जोक्स परिचितांकडून ऐकल्यावर मी कुमार यांच्या पोस्ट मधली माहिती धपाधप तोंडावर फेकून गप करेन. ☺️

अनु,
एकंदरीत वादग्रस्त पितृत्व हा कायम कुजबूज करण्याचा विषय असतो. त्यावरील बरेच विनोदही उठसूठ चघळले जातात.

हे असे वेगवगळे रक्तगट असण्याचा माणसाच्या उत्क्रांती/अनुकूलतेशी काही संबंध आहे का? अमुक प्रांतात अमुक गट अधिक आढळतो इत्यादी काही निरीक्षणे आहेत का?

माहितीपूर्ण लेख

बाँबे ब्लड ग्रुपबद्दल कृपया माहिती सांगाल का ?

धन्यवाद.

मी_अन_, अरे देवा! हे लोक या थराला जातात याबद्दल होते.
आपटा ही माहिती त्यांच्या टाळक्यात.

आमच्या घरात (माहेरी)सर्वांचे रक्तगट भिन्न आहेत Happy
आई : AB+
बाबा : O-
बहिण : B+
मी : A+

एक शंका कुमार१,
लग्न ठरवताना मुलगा आणि मुली चा रक्तगट सारखा असू नये अस म्हणतात, खरंच असं काही असतं का?
सारखा असेल तर त्याचे काही दुष्परिणाम होतात का?

Filmy,
चांगला प्रश्न. या संदर्भात काही वांशिक भेद आहेत. या प्रतिसादात थोडी Rh गटाची माहिती देतो.

Rh -ve हा गट जगातील विविध वंशांत किती आढळतो ते पहा .
Rh –ve चे प्रमाण (%) :

१. Basques (युरोपातील भाग) : ३५
२. मोरोक्कोतील वंश : २९
३. अमेरिकी वंश : १५
४. भारत : ०.६ ते ८.५

म्हणजेच या आढळाची कारणे वांशिक आहेत. Rh +ve असण्याचे काही फायदे आहेत. त्यातला एक म्हणजे Toxoplasma या जंतूसंसर्ग पासून संरक्षण. अर्थात हे काही प्रमाणात लागू आहे.

किल्ली,
एक विनंती. तुमचा व माहेरच्यांचे असे सर्वांचे गट इथे लिहिता का? म्हणजे सर्वांसमोर एक जिते जागते उदाहरण स्पष्ट होईल.
शशांक,
तुमचा प्रश्नही मनोरंजक आहे. सविस्तर उत्तरासाठी वेळ लागेल.
आपणा सर्वांचे सहभागाने चर्चा चांगली होत आहे.

@ किल्ली,
>>>>>लग्न ठरवताना मुलगा आणि मुली चा रक्तगट सारखा असू नये अस म्हणतात, खरंच असं काही असतं का?
सारखा असेल तर त्याचे काही दुष्परिणाम होतात का?>>>>>

बिलकूल नाही, चक्क गैरसमज आहे हा.
जोडप्याची Rh भिन्नता हा एक वेळ दखलपात्र मुद्दा आहे पण त्यावरही तोडगा आहेच, जसे अनु यांनी लिहिले आहे.
सारखा गट असण्यात काहीच नुकसान नाही.

सारखा(म्हणजे दोघे पॉझिटिव्ह किंवा दोघे निगेटिव्ह ) असेल तर बाळाला जन्मतः कावीळ/अँटीबॉडी रिऍक्शन होणार नाही, भिन्न(बाप पॉझिटिव्ह आई निगेटिव्ह बाळ पॉझिटिव्ह, बाप निगेटिव्ह आई पॉझिटिव्ह बाळ निगेटिव्ह) असेल तर 4 थ्या महिन्यात आणि बाळजन्मानंतर बाळ क्र 2 तयारी साठी अँटी डी घ्यावे लागेल इतकेच काय ते.
डॉक्टर याबाबत व्यवस्थित माहिती सांगतात.
जन्मतः कावीळ असेल तर फोटो थेरपी ने कंट्रोल केली जाते(हे सर्व इस्पितळ चांगले/अद्ययावत असल्यास.)

धन्यवाद कुमार आणि अनु .. Happy
आमचे गट वरील प्रतिसादात लिहुन अपडेट केले आहे
एक विनंती, येथे प्रतिसादात आलेले प्रश्न आणि तुमची उत्तरे हेडर मधील लेखात अपडेट कराल का?

किल्ली, मस्त !
आता या उदाहरणावरून अनुवंशिकता छान स्पष्ट होईल.
आई : AB+
बाबा : O-
बहिण : B+
मी : A+ >>>>>>>
आईचा A भाग + बाबांचा O = किल्ली A
……. B...….+ ……....O = बहीण B .

@ शशांक: बॉम्बे गट
* हा एक दुर्मिळ गट असून त्याचे शास्त्रीय नाव Oh आहे.
* याचा शोध डॉ. वाय. एम. भेंडेनी १९५२ मध्ये मुंबईस्थित एका व्यक्तीत लावला.

* तो भारत, पाक, बांगला व इराणमध्ये आढळतो.
अशा व्यक्तीच्या लालपेशीत O प्रमाणेच नेहमीचे antigens नसतात पण h हा वेगळा antigen असतो.

* अशा व्यक्तीस रक्ताची गरज लागल्यास त्याच गटाचे रक्त लागते.
* पूर्वीच्या मुंबईत याचे प्रमाण लोकसंख्येच्या ०.०१ %इतके होते. आताची मुंबई प्रचंड ‘मिश्र’ असल्याने काय सांगणार ?

@किल्ली,
सर्व चर्चा संपल्यावर बघू. पण त्यामुळे मूळ लेख लांबलचक होतो आणि मग वाचक लांब पळायची शक्यता वाटते. ☺️

अवांतर: अँटी डी न देण्याशी अप्रत्यक्ष संबंध असलेली अनंत मनोहर यांची द्वंद्व ही कादंबरी अवश्य वाचावी अशी आहे.

अनु, चांगली माहिती.
दरम्यान तुम्हीच त्यावर 'वाचू आनंदे'त सवडीने लिहावे. ☺️

Pages