द्वंद्व-अनंत मनोहर

Submitted by mi_anu on 10 May, 2016 - 12:54

एन आय सी यु..निओनेटल आय सी यु.
ही खोली म्हणजे आयुष्यातला एक मोठा आनंद एका कुटुंबाला मिळता मिळता अचानक समोर आलेली टांगती तलवार.असे निरागस नवजात जीव ज्यांना आजार म्हणजे काय हेच माहिती नाही, आजाराशी लढण्याची शक्ती अद्याप आलेली नाही.आपली काळजी करणारी, आपल्याला आधीपासून ओळखत असलेली ही व्यक्ती कोण आहे तेही ओळखीचं नाही.पण त्यांना आयुष्यातला हा पहिला लढा रोगांशी, इन्फेक्शनशी देऊन चिवटपणे या खोलीतून बाहेर यायचं आहे.खर्‍या जगातले इतर लढे लढायला.

अशाच एन आय सी यु मध्ये, नवजात बालकांच्या आजारांमध्ये निष्णात असलेला एक डॉक्टर.याला जीव वाचवायचे असतात.वाचवला जाणारा जीव एका गरिब वस्तीतला आहे की कोट्यधीशाच्या वारसाचा हे याच्यासाठी महत्वाचं नाही.कोणा श्रीमंताला ताटकळत ठेवून गरिबांच्या वस्तीत महत्वाचं भाषण द्यायला काही तास तो गायब होऊ शकतो.स्वतःच्या कर्तव्याचं महत्व त्याच्या लेखी पैसे,बक्षीसं, मानसन्मान यापेक्षा जास्त मोठं आहे.नुकत्याच याने ज्याला ताटकळत ठेवून त्याच्या नातवाला तपासण्या आधी ठरलेल्या वस्तीतल्या भाषणाला प्राधान्य दिलं आहे तो माणूस याच हॉस्पिटल च्या बोर्डावर आहे.

डॉक्टर या माणसाच्या नातवाला तपासायला घेतात.बर्‍याच नवजात बालकांना होत असलेला आजार, जन्मजात कावीळ या बाळाला आहे.डॉक्टरांसाठी एकदम साधी केस.ते बाळाला उघडं करुन बर्‍याच ट्यूबलाईटच्या प्रकाशात काही तास ठेवणे-फोटोथेरपी सुचवतात आणि चालू करतात.आणि आपलं दुसर्‍या रुग्णासंबंधीचं कर्तव्य करायला दुसरीकडे निघून जातात.कावीळ अपेक्षेप्रमाणे झरझर उतरते आणि हे बाळ आपल्या घरी परत जातं.

पण नेहमीपेक्षा अनपेक्षित काहीतरी घडलंय.ते बाळ, म्हणजेच त्या श्रीमंत शेटजींचा बर्‍याच वर्षांनी झालेला ऐकुलता नातू आता डोक्याने मतीमंद झालाय.हा फरक पडलाय तो त्या फोटो थेरपी नंतर.शेटजी प्रचंड संतापले आहेत.त्यांना स्वतःला फक्त एक मुलगी आहे.मुलीच्या मुलाला, म्हणजे या नातवाला वाढवून त्याच्या हाती शेटजींना सर्व धंदा सोपवायचा होता.पण आता एक मतीमंद, ब्रेन डॅमेज्ड बाळ ही जबाबदारी त्यांना आयुष्यभर सांभाळावी लागणार आहे.आधार मिळण्याऐवजी द्यावा लागणार आहे.संतापून शेटजी आता या डॉक्टर चं पूर्ण करीयर उध्वस्त करण्यासाठी त्यांची अब्रू,वजन आणि संपत्ती पणाला लावणार आहेत.

डॉक्टरांना आपल्या निदानावर आणि फोटोथेरपीवर पूर्ण विश्वास आहे.बाळाचं थेरपीनंतर मतीमंद होणं हा परीणाम नसून कावळा बसला आणि फांदी मोडली या प्रकाराचं दुसरंच काहीतरी आहे.पण एका डायरेक्टर माणसाशी हा एकटा कसा लढणार आहे?त्याला साथ देणारी आणि मनातून त्याच्यावर प्रेम करणारी वकील मैत्रीण तरी त्याच्या बाजूने लढू शकणार आहे का?करीयर्,आर्थिक स्थिती,चांगला डॉक्टर म्हणून असलेली प्रतिष्ठा हे सर्व धुळीला मिळण्यापासून तो कसं वाचवणार आहे?

प्रत्यक्षच वाचा- द्वंद्व या कादंबरी मध्ये.

Group content visibility: 
Public - accessible to all site users