येडा दादा मामा

Submitted by टोच्या on 4 March, 2019 - 09:19

उंच कपाळ. त्यावर पांढऱ्या शुभ्र गंधगुळीची आडवी त्रिपुटं ओढलेली. मध्ये अष्टगंधाचा टिळा. बेडकासारखे मोठे बटबटीत डोळे. बटाट्यासारखं बसकं नाक. जाड, काळपट ओठांतूनही सतत पुढे डोकावणारे पिवळट दात… डोईवरील केस न्हावी दिसेल तेव्हा सफाचक केलेले… त्यांची किंचित वाढलेली खुंटं… दाढीही तशीच… वावरात उगवलेली रोपं उन्हानं करपून जावीत, अशी कुठंमुठं उगवलेली. अंगात पिवळट पांढऱ्या खादीच्या कापडाची जाडी-भरडी कोपरी, कमरेला धोतर. तसल्याच कापडाची काखेत एक पिशवी आणि हाती भगवा झेंडा. असा दादा मामा. माझ्या मित्राचा मामा.
दादा मामा सटीसहामासी कधीतरी बहिणीकडं यायचा. आला की मळ्यातली सगळी मुलं त्याच्या अवतीभोवतीच रहायची. तो होताच तसा. माझ्या मित्राच्या वडिलांचं छानपैकी माडींचं कौलारू घर. तिघा भावांच्या वाटण्या झालेल्या. ते मधल्या घरात राहात. पांढऱ्या मातीनं पोचारलेलं आणि शेणानं सारवलेलं असं, कुठल्याही शेतकऱ्याचं असतं तसं घर. पूर्वेकडं तोंड असलेल्या या माडीच्या अंगणालगतच पाच फूट उंच आणि जवळपास आठ-दहा फूट रुंदीचा मोठा ओटा बनवून घेतलेला होता. त्यावर मित्राच्या आजी-आजोबांचा दगडी चिरा स्थापलेला. पुढे पसरलेलं त्यांचं विस्तीर्ण शेत...
दादा मामा आला की त्याचा मुक्काम या सिमेंटच्या चौथऱ्यावर असायचा. त्याचा संसार म्हणजे बखोटीतली एकमेव काळकट, मळकट पिशवी. तो भल्या सकाळी उठायचा. विहिरीवर कोणी पाणी काढत असलं तर त्यांच्याकडून बादल्या-दोन बादल्या अंगावर ओतून भल्या सकाळी अंघोळ करायचा. साबण आयुष्यात त्यानं पाहिला नाही. त्यानंतर ओलेत्या धोतरानंच सूर्याकडं बघून काहीतरी तोंडातल्या तोंडात पुटपुटायचा. मग त्याला हात जोडायचा. धोतर बदलून चिरा असलेल्या ओट्यावर यायचा. त्यावर ऐसपैस बसकन मारून पिशवीतून एकएक ऐवज काढू लागायचा. हा सिमेंटचा चौथरा हेच त्याचं संपूर्ण विश्व. सगळी जागा मग त्याचीच. तांब्याची किनार असलेलेले रुपेरी देवाचे टाक हळूहळू तो बाहेर काढायचा. यात सगळेच देव असायचे. तत्पूर्वी त्याच्याकडं असलेला तांब्याचा गडू आणि ताटली जवळच्याच चुलीतील राखेनं स्वच्छ घासून काढायचा. ती धोतरांने पुसून समोर ठेवायचा. मग एक एक देवाचा टाक त्यात ठेवायचा. आमच्यापैकीच कोणातरी मुलाला विहिरीचं ताजं पाणी आणायला सांगायचा. मोटर चालू असली तर ठीक नाहीतर, मळ्यातली कोणीतरी बाई तिथे पाणी शेंदत असायची. तिच्याकडून एखादं पोरगं तांब्या भरून घेऊन यायचं. मग सुरू व्हायची दादा मामाची शास्त्रोक्त पूजा. ‘जे जे दिसे भूत, ते ते जाणिजे भगवंत’ या उक्तीप्रमाणे दादा मामाच्या पोतडीतील दगड-गोट्यांनाही देवत्व आलेलं होतं. तोंडाने ‘रामकृष्ण हरी’, ‘राम राम’, ‘नारायण नारायण’ असं पुटपुटत स्वत:तच गढलेला दादा मामा देवांना सर्वस्व विसरून अंघोळ घालायचा. मग एका डब्यात ठेवलेली गंधगोळीची वडी त्यासाठी खास त्याने जवळ बाळगलेल्या चोपड्या सहाणेवर घासायचा. त्यात मधल्या बोटाने जरासा अष्टगंध मिसळायचा. प्रत्येक देवाला अत्यंत भक्तिभावाने टिळा लावायचा. मग पिशवीतील कळकट छोटासा गोल आरसा काढून स्वत:च्या कपाळावर गंधगुळीची त्रिपुटं ओढायचा. मध्ये अष्टगंधाचा टिळा. मग दोन्ही दंडावर दोन-दोन, गळ्यावर एक, पोटाच्या दोन्ही बाजूंना दोन अशा गंधगुळीच्या जाड पांढऱ्या रेषा तो ओढायचा. जणू हाच त्याचा श्रृंगार. आम्हाला त्याचं भारी कौतुक वाटायचं. ही संपूर्ण साग्रसंगीत पूजा सुरू असताना तो मध्येच एखाद्या पोराच्या पोटाला गुदगुल्या करायचा आणि ‘काय रे चिंट्या… डबल्या डबल्या…गुबल्या गुबल्या’ असं काहीबाही म्हणून त्याला लाडही करायचा. पूजा झाली की आम्ही सर्व प्रेक्षक मुलांना तो खडीसाखरेचा प्रसाद द्यायचा. त्याच्याकडे एक छोटीशी चंची होती, ज्यात त्याला कधीतरी-कोणीतरी दिलेली पाच-दहा, वीस पैशांची चिल्लर असायची. त्याच्या भोवती मुलं जमली की मग तो त्याची ही चिल्लर मुलांमध्ये वाटून टाकायचा. कोणाला दहा पैसे मिळायचे, कोणाला पाच, कोणाला वीस पैसे. रुपया-दोन रुपये हे त्याच्याकडे कधीच दिसले नाहीत. त्याच्याकडे ‘नवनाथ कथासार’, ‘हरिविजय’ वा ‘भक्तिविजय’ अशा जीर्ण झालेल्या पोथ्या हमखास असायच्या. रोज एकतरी अध्याय वाचल्याशिवाय त्याची पूजा सुफळ संपूर्ण व्हायचीच नाही.
दादा मामाला कधीच कोणावर रागावताना पाहिलं नाही. मोठी माणसं त्याच्याशी ‘काय मग दादा मामा?’ काय चाललं?’ एवढंच विचारायची. त्यावर तो मनमोकळं हसून ‘देवाजीची कृपा’ असं उत्तर द्यायचा. खरंतर मोठ्यांना त्याच्याशी जास्त बोलण्यात रस नसायचा आणि त्यालाही. पण, तरी त्याच्याविषयी कोणालाच द्वेष नव्हता, राग नव्हता. बायाबापड्या मात्र त्याला अगदी प्रेम, आदर द्यायच्या. जिथे जाईल तिथे तो जणू घरातला सदस्य असल्याप्रमाणे हक्कानं जेवायला मागायचा. तीच त्याची एकमेव गरज होती. जेवायला मागताना त्याला कधीच लाज वाटली नाही आणि त्याला खाऊ घालतानाही कधी कोणत्या बाईने हात आखडता घेतला नाही. मोठी पोरं त्याला कधी कधी चिडवायची. पण तो चिडायचा नाही. सगळं काही हसल्यावारी न्यायचा. त्याचा अवतार कसाही असला तरी तो अगदी निरागस दिसायचा, हसायचा…एखाद्या नवजात बालकासारखा.
कोणी म्हणायचं, त्याची बायको पळून गेली म्हणून तो वेडा झालाय. त्याला बऱ्यापैकी बागायती शेती-पोती होती. पण बायको निघून गेल्यामुळे डोक्यावर परिणाम झाला आणि तो घराबाहेर पडला, तो कायमचाच, असंही कोणी कोणी म्हणायचं. सत्य काय, हे आजपर्यंत मला ठाऊक नाही, ते माहिती करून घ्यायची गरजही वाटली नाही.
खांद्यावर भगवा झेंडा आणि काखेत पिशवी, अंगात कोपरी अशा अवतारात तो सतत भटकत असायचा. त्याला सदऱ्याचीही गरज पडली नाही. नुसतंच भटकायचा असं नाही, तर कधी पंढरपूर, कधी आळंदी, देहू… अशा देवस्थानांची यात्रा करायचा. तीही पायीच. त्याला कधीच एसटीची गरज वाटली नाही. तीर्थयात्रेला सरावलेल्या पायांनी कधी आरामाची अपेक्षा केली नाही. अनवाणीच हिंडायचा तो. ऊन, वारा, पाऊस कशाचीच तमा नसायची. ना छत्री, ना टोपी. कुठंतरी झाड दिसलं की तिथं टेकायचा. तिथेच मस्तपैकी पोतं टाकून झोप काढायचा. ना गादीची गरज, ना उशीची आवश्यकता. कोणी देईल ते खायचा. हेच पाहिजे, तेच पाहिजे अशी कुरकुर नाही. दिलेलं अन्न अगदी कण न् कण संपवायचा आणि स्वत:च ताटली धुवून बाया-बापड्यांकडे सोपवायचा. लगेच पुढच्या प्रवासाला निघायचा.
भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात-
प्रजहाति यदा कामान्सर्वान्पार्थ मनोगतान् ।
आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते ॥
दु:खेष्वनुद्विग्नमना: सुखेषु विगतस्पृह: ।
वीतरागभयक्रोध: स्थितधीर्मुनिरूच्यते ॥
(भावार्थ- जेव्हा मनुष्य त्याच्यातील सर्व इच्छांचा त्याग करतो आणि स्वरुपातच संतुष्ट राहतो. सर्व वासनांचा त्याग करतो. दैहीक, दैविक, भौतिक सुख-दु:खांविषयी तो निरिच्छ असतो. त्याच्यातील काम, क्रोध, मोह, मत्सर, भय हे षडरिपू नष्ट झालेले असतात. मानसिक तर्क करण्याचा टप्पाही त्याने ओलांडलेला असतो, अशा पुरुषास स्थितप्रज्ञ म्हणतात. )
हा श्लोक वाचून त्यातील शब्द न शब्द लागू पडणारा दादा मामा माझ्या डोळ्यांसमोर उभा राहतो. दादा मामाला संपत्तीचा, पैशांचा हव्यास नव्हता. तो कुटुंबात-मुलाबाळांत कधी अडकला नाही. त्याने कधी कोणाकडून सन्मानाची, आदराची अपेक्षा केली नाही. कधी कोणी अपमान केला तर त्याला कधीच राग आला नाही. प्रवासाला भौतिक साधनांची अपेक्षा केली नाही. त्याला मनोरंजनासाठी टीव्ही, रेडिओ कधी लागला नाही. रात्री-बेरात्री हिंडताना त्याला कधी चोरांची भीती वाटली नाही. त्याने कोणत्याही बाया-बापडीकडे कधी रोखून पाहिलेलं आठवत नाही. या सर्व भौतिक गोष्टींच्या तो पलिकडे गेलेला होता. माझ्या दृष्टीने तरी तो स्थितप्रज्ञ होता. किरकोळ, बारीक-सारीक गोष्टीत हेवेदावे, वाद विवाद करणारी आजूबाजूची शहाणी संसारी माणसं त्याला वेडा का म्हणायची, हे आजपर्यंत मला कळले नाही. माझ्या दृष्टीने तो जगातील एकमेव सुखी माणूस होता!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगलं लिहलंय.

> जिथे जाईल तिथे तो जणू घरातला सदस्य असल्याप्रमाणे हक्कानं जेवायला मागायचा. तीच त्याची एकमेव गरज होती. जेवायला मागताना त्याला कधीच लाज वाटली नाही आणि त्याला खाऊ घालतानाही कधी कोणत्या बाईने हात आखडता घेतला नाही. > मूलभूत गरजांमधील एक प्रश्न सुटला.

धन्यवाद धनि, शाली, अम्मी, दत्तात्रय साळुंखे. व्यक्तिचित्र
पहिल्यांदा लिहिलंय. तसंही मी या दादा मामाला फार लहानपणी पाहिलंय, सात आठ वर्षांचा असताना. त्यामुळे जास्त लिहिलं नाही.