पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – २९. छाया (१९६१)

Submitted by स्वप्ना_राज on 24 February, 2019 - 08:53

chhaya1.jpg

आपण निगुतीने एखादा संकल्प करावा आणि तो तडीस जातोय म्हणून खूश व्हावं तेव्हढ्यात कुठेतरी माशी शिंकते. मग गाडी पुन्हा रुळावर आणण्यात बराच वेळ निघून जातो. गोल्डन एरातले चित्रपट पहायच्या माझ्या निश्चयाबद्दलही असंच काहीसं झालं. चांगले २०-२५ चित्रपट पाहून (आणि त्यांच्यावर लिहून!) झाल्यावर 'जमतंय हे आपल्याला' म्हणत स्वत:ची पाठ थोपटेपर्यंत माझ्या लाडक्या लॅपटॉपने राम म्हटला. घरात आधीचा एक बंद लॅपटॉप असल्याने हे दोन्ही जोवर नीट डिस्पोझऑफ करत नाही तोवर नवा लॅपटॉप विकत घेणार नाही अशी पर्यावरणवादी वगैरे प्रतिज्ञा केली. पण ते डिस्पोझऑफ करता येण्याची चिन्हं दिसत नव्हती. भावाचा एक जुना लॅपटॉप उधार घेऊन बाकी कामांसाठी वापरायला सुरुवात केली तरी त्यावर गुगल इनपुट टूल्स इन्स्टॉल वगैरे करून मराठीत लेख टायपत बसण्याचा उत्साह नव्हता. बरं गोल्डन एरातले चित्रपट पाहिले तर त्यावर लिहिणार(च) असा निश्चय असल्याने चित्रपट पाहणं आपसूक बंद झालं. एकूणात काय तर लॅपटॉपपाठोपाठ माझी लेखणीही बंद पडली Happy

मग एके दिवशी चॅनेल सर्फिंग करताना ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट चॅनेलवर आशा पारेख आणि सुनील दत्तची जोडी दिसली. ह्यांनी कुठल्याही चित्रपटात एकत्र काम केलंय ह्याचा मला पत्ताच नव्हता. आशा पारेख अगदी फेव्हरेट नसली तरी अगदी नावडतीही नाही. आणि सुनील दत्तबद्दल तर क्या केहने? गोल्डन एरातल्या ह्या एकाच हिरोबद्दल मी आणि मातोश्री एकाच मताच्या आहोत. मौसीभी तय्यार बसंतीभी तय्यार! 'जलते है जिसके लिये' लागलं की टीव्हीसमोर मी आणि आई अनेक वेळा अश्या ठिय्या देऊन बसलोय की गुळाला चिकटलेला मुंगळा लाजेल. Happy हा चित्रपट आहे तरी कुठला म्हणून उत्सुकतेने नाव पाहिलं तर तो होता १९६१ सालचा छाया. झालं! चित्रपट पहायच्या माझ्या इच्छेने उचल खाल्ली खरी. पण तेव्हढ्यात धोक्याचे दोन लालभडक सिग्नल समोर उभे ठाकले. एक म्हणजे चित्रपटात निरूपां रॉय दिसत होती. ही माता कुठल्याही चित्रपटात दिसली की तो भयाण रडारडीचा असणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ. आणि ही कमी म्हणून एका प्रसंगात ललिता पवार दिसली. हरे रामा! अश्रुपात raised to infinity! पण सुनील दत्त आणि आशा पारेख ह्या दोघांना एकत्र पाहण्याचा मोह सोडवेना. मग 'अगदीच असह्य झाली रडारड तर फॉरवर्ड करायचा ऑप्शन आहे की' अशी मनाची समजूत करून तूनळी उघडली.

पण प्रथमग्रासे मक्षिकापात:! चित्रपटाची टायटल्स सुरु झाली तीच मदर इंडिया छाप हातात बाळ घेतलेली निरूपां रॉय घेऊन. पूर्ण टायटलभर रस्त्यावर चालत जात असताना तिची पडलेली सावली दिसत राहिली. चित्रपटाच्या नावाचा अर्थ तर लागला पण मी जवळपास चित्रपट न पाहण्याच्या निश्चयाप्रत आले. कारण पुष्पा, I hate tears! तेव्हढ्यात टायटल्स संपली आणि चित्रपट सुरु झाला. म्हटलं पाहू काय होतंय ते......

तर चित्रपटाला सुरुवात होते तेव्हा शामलाल नावाचा कोणी एक गृहस्थ घरी जात असतो. त्याला वाटेत डॉक्टर भेटतात. ते त्याला त्याच्या घरी जाऊन आलो म्हणतात. शामलाल थोडा धास्तावतो पण डॉक्टर म्हणतात की तुझी छोटी मुलगी आता ठीक आहे पण बायकोच्या तब्येतीकडे थोडं लक्ष दे. अर्थात त्यांची फी द्यायला शामलालकडे पैसे नसतात कारण त्याला नोकरी नसते. तो घरी जातो तेव्हा बायको मनोरमा देवाकडे नवर्यासाठी नोकरी, दोन वेळचं जेवण, अंगभर कपडे आणि आयुष्यात शांती एव्हढा(च) ऐवज मागताना त्याला दिसते. नोकरीचं काही जमत नाही तेव्हा काही दिवस मनोरमाने मुलीला घेऊन लखनौला तिच्या मामाकडे जावं असं तो सुचवतो. तसंही तिला १५ वर्षात मामाकडची काही खबरबात नसते. पण मनोरमा त्याला सोडून कुठेही जायला नकार देते. तेव्हढ्यात पोस्टमन एक पत्र घेऊन येतो. त्यात शामलालला नोकरी मिळाल्याची बातमी असते. हरखलेला शामलाल घरासाठी काही खरेदी करायला बाहेर पडतो आणि एका अपघातात त्याचं निधन होतं.

आता मामाकडे जाण्यावाचून मनोरमेला काही पर्याय नसतो. पण लखनौला जाताच तिला हे कळतं की आठ महिन्यांपूर्वीच तिच्या मामाचं निधन झालंय आणि त्याने राहतं घरही दुसर्याला विकून टाकलंय. ती अक्षरश: रस्त्यावर येते. अन्नाअभावी तिची मुलगी कमजोर होते आणि सरकारी इस्पितळातली डॉक्टर मुलीचा जीव वाचवायचा असेल तर तिला नीट जेवणखाण मिळायला हवं हे निक्षून सांगते. नाईलाजाने मनोरमा मुलीला एका मोठ्या बंगल्याच्या पायर्यांवर सोडून जाते. ह्या बंगल्याचे मालक असतात सेठ जगतनारायण चौधरी. त्यांची बायको सहा महिन्यांपूर्वी वारलेली असते आणि त्यांना मूलबाळ नसतं. हे अनाथ मूल पोलिसांच्या ताब्यात द्यायला त्यांचा जीव होत नाही. ते आपली मुलगी म्हणून तिचा सांभाळ करायचं ठरवतात. मनोरमा मुद्दाम नोकरी मागायला त्यांच्या बंगल्यात येते आणि ते तिला आया म्हणून ठेवून घेतात. अर्थात ही मुलगी त्याची स्वत:ची नाही हे कोणाला कळू नये म्हणून ते लखनौ सोडून मुंबईला निघून येतात. तिथे आल्यावर काही दिवसांनी त्यांची मावसबहिण रुक्मिणी आपल्या मुलाला, लालीला घेऊन त्यांच्याकडे रहायला येते.

वर्षं लोटतात. ती मुलगी, सरिता, आता कॉलेजात जाऊ लागलेली असते. हिंदी चित्रपटाच्या पूर्वापार परंपरेला जागून ती सुंदर तर असतेच पण अभ्यासासोबत नृत्यातसुध्दा प्रवीण असते. अश्याच एका नृत्याच्या स्पर्धेत तिला पहिलं बक्षीस मिळतं म्हणून जगतनारायण तिच्यासाठी एक पियानो विकत आणतात. तिला पियानो शिकवायला तसंच अभ्यासासाठी शिकवणी घ्यायला एक शिक्षक ठेवावा असं ते ठरवतात. त्याप्रमाणे पेपरात एक जाहिरातसुध्दा देतात. अट एकच असते - ती म्हणजे शिक्षक वयस्कर हवा. अभ्यासाच्या शिकवणीसाठी खूप अर्ज येतात. पण पियानोशिक्षक म्हणून फक्त एकच अर्ज येतो - अरुणकुमार नावाच्या एका माणसाचा. त्याचा इंटरव्ह्यू सरिता स्वत:च घेते. पण अरुणकुमार जवळपास तिच्याच वयाचा असतो. सामोसे बांधून आलेल्या वर्तमानपत्राच्या तुकड्यावर त्याने अर्धीच जाहिरात पाहिलेली असते त्यामुळे त्याला वयाच्या अटीची कल्पना नसते. पण एमए होऊनही नोकरी नसलेला हा उमदा तरुण पाहून आया मनोरमा त्याच्यासाठी रदबदली करते. सरिता वडिलांची परवानगी काढते आणि तिची अभ्यासाची शिकवणी घ्यायच्या कामी अरुण रुजू होतो. पियानोशिक्षक म्हणून रुक्मिणी आपल्या दिराच्या मुलाची, रामूची, वर्णी लावून घेते. अर्थात त्यात तिचा अंतस्थ हेतू वेगळाच असतो हे सांगायला नको.

सरिता राही नामक प्रसिध्द कवीची जबरदस्त चाहती असते. अरुण तो आपला बालपणचा मित्र आहे असं तिला सांगतो. पण त्याची यथेच्छ निंदा करतो - म्हणजे तो कुरूप आहे, तिरसट आहे वगैरे वगैरे. सरिता त्याची भेट करवून दे म्हणून अरुणच्या मागे लकडा लावते. खरं तर अरुण स्वत:च 'राही' ह्या टोपणनावाने कवितांची पुस्तकं प्रसिध्द करत असतो. पण हे सरिताला कळू नये असं त्याला वाटत असतं त्यामुळे तो तिचे राहीला भेटायचे सगळे बेत हाणून पाडतो. तो आपली मदत करणार नाही हे लक्षात येताच सरिता एका मैत्रिणीच्या मदतीने राहीला भेटायचा प्रयत्न करते, त्याला पत्रं लिहिते. आणि मग अचानक एक दिवस तिला अरुण हाच राही आहे हे कळतं. एव्हाना ती राहीच्या प्रेमात पडलेली असते. अरुणही सरितावर लट्टू असतो.

chhaya2.jpg

त्याच्या घरी हे कळताच त्याची मोठी बहिण सरिताच्या वडिलांकडे अरुणच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन येते. पण आपली मुलगी गरिबाघरी पडावी असं त्यांना वाटत नसल्याने ते तिचा अपमान करून तिला हाकलून लावतात.एव्हढंच नव्हे तर सरिताचं लग्न एका श्रीमंताच्या, मोतीलालच्या, मुलाशी ठरवून मोकळेही होतात. सरिताची कष्टी अवस्था मनोरमाला पाहवत नाही. ती मोतीलालला पत्र लिहून सरिता जगतनारायणची स्वत:ची मुलगी नाही हे सांगते. हे सत्य आहे हे जगतनारायणकडून कळताच मोतीलाल लग्न मोडतो. मनोरमाने ते पत्र लिहिलं होतं हे कळताच जगतनारायण तिला घरातून हाकलून लावतो आणि नाईलाजाने अरुणने सरिताशी लग्न करावं अशी त्याला गळ घालतो. पण बहिणीच्या अपमानाने दुखावलेला अरुण लग्न करायला सपशेल नकार देतो.

मग काय होतं सरिताचं? तिचं लग्न अरुणशी होतं का? मनोरमा आपली आई आहे हे सत्य तिला कसं कळतं (कळतं का हा प्रश्न संयुक्तिक नाही!)? ह्या प्रश्नांची उत्तरं मिळवायला चित्रपट पहायची गरज नाही. खरं तर हा चित्रपट पहाच म्हणून सांगायला माझ्याकडे अमुक असं कारण नाहीच आहे मुळी. मी तो पाहिला कारण मला सुनील दत्त फार आवडतो. तसंच मी टीव्हीवर चित्रपटाचा जो भाग पाहिला त्यातला अरुण-सरिताच्या प्रेमात पडण्याचा प्रवास मला मस्त वाटला. हा प्रवास थोड्याफार फरकाने हिंदी चित्रपटात नेहमी दाखवतात तसाच आहे, फारसा वेगळा नाही. तरीपण मला त्यांच्या प्रेमात पडण्याची गोष्ट आवडली म्हणून मी पूर्ण चित्रपट पाहिला - अगदी रोमँटिक चित्रपटांची अजिबात चाहती नसतानाही. Happy

आता संपूर्ण रामायण सांगून झाल्यावर कोणी 'रामाची सीता कोण' असं विचारणार नाही हे माहित आहे. Happy तरी नेहमीप्रमाणे पात्रयोजनेबद्दल लिहीतेच. सरिता झालेली आशा पारेख ह्यात खूप गोड दिसलेय. ह्या चित्रपटात जेमतेम १८-१९ ची असेल कदाचित. त्यामुळे विश्वास बसू नये इतपत बारीकसुध्दा आहे. Happy आणि हो.....तिचा तो डोनाल्ड डकसारखा आवाजसुध्दा बराच सहन करता येण्याजोगा आहे. सुनील दत्त अरुणकुमार म्हणून फारच उमदा दिसलाय. सरिताची फिरकी घेण्याच्या सिन्समध्ये चेहेर्यावर मिश्कील भाव आणतो तेव्हा तर फार क्युट दिसतो. फक्त खिन्न किंवा दु:खी भाव चेहेर्यावर आणायला त्याला फार प्रयास पडतात Happy गरीब असहाय्य आईची भूमिका करण्यात निरुपा रॉयचा हातखंडा असल्याने तिच्या अभिनयाबद्दल वेगळं काही लिहायची आवश्यकता नाही. तीच गोष्ट सेठ जगतनारायण झालेल्या नझीर हुसेनची. ललिता पवारने रुक्मिणीची भूमिका नेहमीच्या ठसक्यात केलेय. अभिनेता मोहन चोटीने तिचा थोडा भोळसट पण मनाने चांगला मुलगा सुरेख उभा केलाय. अचला सचदेव अरुणच्या मोठ्या बहिणीच्या आणि असित सेन त्याच्या मित्राच्या छोट्या भूमिकांत दिसतात.

chhaya3.jpg

चित्रपटाला संगीत दिलंय सलील चौधरींनी आणि गाणी राजिंदर किशन ह्यांची आहेत. ह्या चित्रपटातलं माझं सर्वात आवडतं गाणं म्हणजे तलत महमूद आणि लता मंगेशकर ह्यांनी गायलेलं 'इतना ना मुझसे तू प्यार बढा'.खूप उदास वाटायला लागलं की ऐकायच्या गाण्यांची माझी एक लिस्ट आहे त्यात हे गाणं 'उंची पायदानपे' आहे. त्या लिस्टबद्दल पुन्हा केव्हातरी. ह्या गाण्याची सिच्युएशनही फार सुरेख आहे. अर्थात फक्त तलतच्या आवाजात ह्याचं एक दु:खी व्हर्जनसुध्दा आहे हे मला माहित नव्हतं. शिवाय 'छमछम नाचत आई बहार' हे आशाच्या नृत्यकौशल्याचं दर्शन घडवणारं गाणं, 'आंखोमे मस्ती शराबकी' हे अरुण-सरिताचं हिरो-हिरोईनने बागेत बागडत गायचं customary song, तेव्हढीच customary नोकझोक झाल्यावर दु:खी चेहेर्याने म्हटलेलं, पार्टीतलं "लेकी बोले-सुने लागे" छाप 'आंसू समझके क्यो मुझे' हीसुध्दा श्रवणीय आहेत. त्यामानाने बाकीची दोन म्हणजे 'दिलसे दिलकी डोर बांधे' आणि 'ये कह दे हम इन्सान नही' मला फारशी आवडली नाहीत.

टीव्ही चॅनेलवर दाखवताना चित्रपट हवे तसे एडीट करतात अशी माझी समजूत होती पण तूनळी वरून डाऊनलोड करून घेतलेले चित्रपटसुध्दा वाटेल तिथे कापलेले आढळतात अशी माझी स्वानुभवाने खात्री झालेय. हाही चित्रपट त्याला अपवाद नाही. त्यामुळे मनोरमाचा नवरा नक्की कसा मरतो, मोतीलालच्या मुलाशी ठरलेलं लग्न मोडल्यावर रुक्मिणी सरिताचं लग्न आपल्या दिराच्या मुलासोबत का लावून देत नाही, सरितावर हात उगारला म्हणून जगतनारायणने नोकरीवरून काढल्यावर पुढच्याच सीनमध्ये आया त्यांच्या घरात कशी मौजूद असते हे प्रश्न अनुत्तरीतच राहतात. ज्या लेखकाची पुस्तकं दुकानात आल्याबरोबर हातोहात खपतात तो एव्हढा गरीब कसा हेही गूढ मला उकललं नाही. असो. पण २ रुपयाला डझनभर मोसंबी, महिना ३०० रुपये पगार आणि ६००० रुपयांचा पियानो हे आकडे वाचून करमणूक मात्र झाली.

हिंदी चित्रपटात सहसा नायक-नायिकेची गोष्ट महत्त्वाची असते. बाकी लोक तोंडी लावायला असतात. पण ह्या चित्रपटात मुलीसोबत सावलीसारखी राहणारी, तिच्या भल्यासाठी कधी अप्रिय तर कधी कठोर निर्णय घेणारी, त्यापायी स्वत:ची परवड होईल ह्याची पर्वा न करणारी तिची कणखर आई नायकापेक्षा कांकणभर जास्त महत्वाची आहे. विशेष म्हणजे निरुपा रॉय आणि ललिता पवार ह्या दोन्ही बाया असतानाही चित्रपट फार रडका नाही. सुरुवातीची १५-२० आणि शेवटची ५-१० मिनिटं सोडली तर हृषीकेश मुकर्जीनी दिग्दर्शित केलेल्या ह्या पूर्ण चित्रपटभर एक प्रकारचं प्रसन्नपण, साधेपण जाणवलं मला. एक उदाहरण सांगते. आया घरी आल्यावर मुलीची दूध प्यायची बाटली कुठे आहे हा प्रश्न विचारेल हे लक्षात येऊन जगतनारायणचा विश्वासू नोकर त्याला बाटली मोडलेय तेव्हा बाहेर जाताय तशी घेऊन या असं त्याला सांगतो. जगतनारायणच्या लक्शात येत नाही तेव्हा तो नोकर आयाकडे डोळ्यांनी इशारा करून हे नाटक तिच्यासाठी आहे असं मिस्किलपणे सुचवतो. साधासाच प्रसंग पण वास्तव वाटतो अगदी.

खरं तर तसं खूप काही वास्तववादी पहावंसं नाही वाटत आजकाल. बरंच वास्तव बातम्यातून, पेपरातून, व्हॉटसेपच्या मेसेजेसमधून मेंदूवर आदळत राहतं २४ * ७. ते स्वीकारणं आता अपरिहार्य आहे. पण 'एक आटपाटनगर होतं बरं का' अश्या वाक्याने सुरुवात होणारी पुस्तकं आवडायचं वयही केव्हाच निघून गेलंय की. म्हणून मग माझ्यापुरता हा गोल्डन एराच्या चित्रपटांचा सुवर्णमध्य शोधलाय मी. तेव्हढे दोन-अडीच तास छान मजेत जातात.

सध्याच्या काळात हेही नसे थोडके, नाही का?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप खूप सुरेख लिहिलंस ग.. शेवटचा पॅरा भिडलाच.

इतना तू मुझसे न प्यार बढा मोत्झार्टच्या 40 नंबरच्या सिम्फनिवर जसेच्या तसे बसवलेय, पण माझे अति लाडके आहे. इतर सगळी गाणीही माझी लाडकी आहेतच. आता जुने चित्रपट पहायचे ते फक्त गाण्यासाठी. तो जमाना आता गेला, ती मूल्ये संपली.

सुनिल दत्त आणि आशा पारेख यांनी हीरा आणि जख्मी या सिनेमातही एकत्र काम केले आहे.
जख्मी मध्ये त्यांच्या जोडीला राकेश रोशन आणि रीना रॉय होते. ( जलता है जीया मेरा भीगी भीगी रातोंमे... )

तलतच्या काही सुंदर गाण्यात चित्रपट छाया म्हणून येते तो हा होय. आता परत गाणी ऐकली पाहिजेत. आम्ही एक तलत स्पेशल कॅसेट बनवली होती त्यात ह्यातली गाणी होतीच.

एक चिराग नावाचा चित्रपट आहे त्यातही बहुतेक हीच जोडी आहे. तेरी आंखों के ... कोनाचे तरी डोळे जातात् वगैरे.

कथा सरळ धोपटच वाटते आहे. मी तुमच्या मालिकेतील नव्या पुष्पाची वाट बघत असते. कुच्छ भी जुगाड करके लिखते रहो.

छान ‌. यातलं इतना ना मुझसे ' गाणं आवडतं . अजून एक पिक्चर आहे यांचा त्यात 'तेरी आँखो के सिवा दुनिया मे असं काही तरी गाणं आहे.

छान लिहिलंय.
चित्रपट पाहिल्याचं आठवत नाही.
यातल्या अनेक घटना पुढे अनेक चित्रपटांत आलेल्या दिसतात.
आईने आपल्या मुलाला सो डून देणं आणि मग आया म्हणून त्याचा सांभाळ करणं हा फॉर्म्युला लॉस्ट & फाउंड सारखा हिट दिसतोय.
(जन्मतःच मुलं बदलण्याचा आणखी एक ).
एकेका फॉर्म्युलाचे कोणकोणते चित्रपट होते, त्याची यादी करायला हवी.
अर्थात तलतची सगळी गाणी आवडती. इतना न मुझसे चा अर्थ चित्रपटाचं कथानक वाचून अधिक पोचला.

तेरी आँखों के सिवा वर अमांनी म्हटलेल्या चिराग मधलं. यात कसल्याशा स्फोटात डोळ्यांचा मेकप जराही खराब न होता आशा पारेखची दृष्टी जाते.

वेलकम बॅक. छान लिहीलंय.
इतना तू मुझसे न प्यार बढा मोत्झार्टच्या 40 नंबरच्या सिम्फनिवर जसेच्या तसे बसवलेय >>> ओह! याची कल्पना नव्हती. आवडतं गाणं आहे, जरा विरस झाला.

चिराग कुठल्यातरी ग्लिसरीन कारखान्याच्या मालकाने प्रोड्यूस केला असावा अशी शंका यावी इतके दुःख त्यात भरलेय. आशा पारेख आधी मूल नाही म्हणून कारखान्यातले ग्लिसरीन वापरून अश्रूपात करत असते, त्यात भर तिची दृष्टी जाण्याने होते (आधी 1 डझन बाटल्या दरदिवशी लागायच्या, आता 2 डझन लागणार). सासू साक्षात ललिता पवार असल्याने असल्या दुहेरी कुचकामी ठरलेल्या सुनेला घरातून फेकून देण्याखेरीज दुसरा पर्याय कथेत ठेवलेला नसतो. इतकी वर्षे मूल नसलेली हिरवीन नेमकी घरातून फेकून देताना गरोदर असते हे गुपित तिलाही माहित नसते. स्वतः अनुपस्थित असताना गायब झालेल्या बायकोचा नवरा तिच्या शोधकामात लक्ष घालतो की ग्लिसरीनच्या बाटल्या संपवित वेळ घालवतो हे आता आठवत नाही पण रिवाजाप्रमाणे शेवटच्या रीळात त्याला बायकोसकट मुलगाही मिळणार व सासुलाही अचानक उपरती होऊन ललिता पवारचे सुलोचनेत स्वभावांतर होणार यात शंका नाही.

'तेरी आंखोके सिवा' खूपच सुंदर आहे. छायागीतात लताचे गाणे व त्यात आंधळी आशा बघून चिराग हे नाव आंखोकी बुझी हुयी रोशनी संबंधित असणार असा माझा गैरसमज झाला होता. प्रत्यक्षात ते घर/खानदान का चिराग या अर्थाने असल्याचे कळल्यावर फसवणूक झाल्याची भावना मनात निर्माण झालेली. त्यावर उतारा म्हणून अजून काही गोड गाणी चित्रपटात टाकण्याचे चातुर्य प्रोड्युसरने दाखवल्यामुळे मी त्याला माफ केले. तसेही आंधळ्या नायिकेवर चिराग नावाचा चित्रपट काढून प्रेक्षकांना संभ्रमित ठेवायचे व प्रत्यक्षात घरका चिराग नातूच असतो हे ठसवायचे इतके मोठे चातुर्य दाखवून त्याने मला इम्प्रेस केले होतेच.

छान लिहिलयस.
इतना तू मुझसे न प्यार बढा आवडतं गाणं.
सुनील दत्त पण आवडता.
सिनेमा पाहिलेला नाही.
बाकी ह्या सिनेमाची थोडीबहुत कथा सुत्र पुढे बर्याच सिनेम्यांत वापरली. आराधना, साजन लगेच आठवले.

कळतं का हा प्रश्न संयुक्तिक नाही! >>>
तिचा तो डोनाल्ड डकसारखा आवाज >>>
हे भारी आहेत.

शेवटचा पॅरा अजिबात पटला नाही (कारण हे चित्रपट मला फक्त गाण्यांकरता आवडतात. त्यापलीकडे मला ते अजिबात आवडत नाहीत) पण प्रचंड आवडला.

बरेली की बर्फीचं बीज यात दडलंय होय! पण बरेली की बर्फी कितीतरी उजवा आहे.. हा 'ट्विस्ट' पेक्षा 'इतना ना मुजसे' ती तफावत भरून काढते हा भाग वेगळा.

कुठे बरेली की बर्फी आणि.... असो.

हिरोने स्वतःची खरी ओळख लपवून हिरॉईनचा गैरसमज तसाच ठेवणे हे कित्येक चित्रपटात झालेय... पण त्या सगळ्या कथांमध्ये केवळ प्रेमात पाडण्यासाठी ही क्लुप्ती वापरलीय.

बकीब पूर्णपणे यावरच बेतलाय.. गोड चित्रपट.

काल यु ट्यूबवर छायातली गाणी पाहिली. आशा व सुनील खूप गोड दिसतात.

छाया व माया या दोन्ही चित्रपटातली गाणी मस्त आहेत. रेडियोवर मायातले गाणे लागले की मला छाया आठवायचा, आणि छायातले लागले की माया...

अरे हो की. Happy
मला फक्त साजनच आठवला तशा स्टोरीचा. Happy

भावाचा एक जुना लॅपटॉप उधार घेऊन बाकी कामांसाठी वापरायला सुरुवात केली तरी त्यावर गुगल इनपुट टूल्स इन्स्टॉल वगैरे करून मराठीत लेख टायपत बसण्याचा उत्साह नव्हता. बरं गोल्डन एरातले चित्रपट पाहिले तर त्यावर लिहिणार(च) असा निश्चय असल्याने चित्रपट पाहणं आपसूक बंद झालं. एकूणात काय तर लॅपटॉपपाठोपाठ माझी लेखणीही बंद पडली >> मग शेवटी कसं लिहीलंस हे सगळं Proud

भारी जमलाय लेख Happy

'इतना ना मुझसे तू ' हे गाणं फारच आवडतं. छान लिहिलायस हा पण लेख.
बाळाचे बाप ब्रह्मचारी या मराठी सिनेमात पण अलका कुबल आपलंच बाळ आया म्हणून सांभाळते ना?

सर्वांचे मनापासून आभार Happy

साधना, ते गाणं सिंफनीवर बेस्ड आहे हे मलाही माहीत नव्हतं. अजून एक सिंफनी टायटल्समध्ये पण वाजते, ओळखीची आहे पण कुठली ते माहित नाही. चिरागबद्दल आईकडून ऐकलंय. Happy

रिव्हर्स स्वीप, बाबा कामदेव माहितीबद्दल आभार!
अमा, भरत, हो कथा सरधोपटच आहे. पण स्वातंत्र्यानंतर जेमतेम १४ वर्षांनी आलेला चित्रपट असल्याने ह्याआधी हा फॉर्म्युला वापरला गेला होता का हा प्रश्न आहे मनात. Happy

किल्ली, चित्रपट पाहिल्यावर जुन्याच लॅपटॉपवर गुगल इनपुट टूल्स इन्स्टोल केले आणि लिहिला लेख Happy

वावे, मला अलका कुबलची अ‍ॅलर्जी आहे त्यामुळे त्या पिक्चरबद्दल माहिती नाही Happy
pravintherider , पिक्चर पाहून मला शिव्या घातल्यात का? Wink मी रेकमेन्ड केला नव्हता हं.

छान लिहलंय. हा चित्रपट मी पाहिला नाही.

इतना ना मुझसे तू गाणे कोणत्या चित्रपटातले आहे हेदेखील कधी पहायचे कष्ट घेतले नव्हते.

आराधना आणि बरेली कि बर्फी पहिले नाहीत पण मलादेखील साजन पटकन आठवला.

सुनिल दत्तचे लाजतलाजत हसणे छान वाटते.

कवी असतो ना तो, मग गरीबच असणार, खपून खपून अशी किती पुस्तकं खपणारेत कवितांची Wink
बाकी ६१ साली ३०० ₹ पगार म्हणजे भरपूरच झाला.

> खरं तर तसं खूप काही वास्तववादी पहावंसं नाही वाटत आजकाल. > +१ मीतर बातम्या, पेपर वाचणंच सोडून दिलंय.

{पण स्वातंत्र्यानंतर जेमतेम १४ वर्षांनी आलेला चित्रपट असल्याने ह्याआधी हा फॉर्म्युला वापरला गेला होता का हा प्रश्न आहे मनात}
मी या चित्रपटाच्या नंतर म्हणतोय.

अजून एक सिंफनी टायटल्समध्ये पण वाजते, ओळखीची आहे पण कुठली ते माहित नाही.>>>

Bagatell for Ellise.

बिथोवेनची आहे, भयंकर फेमस. इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी वाजवलेली आहे की ही आपोआपच निर्माण झाली असणार असे मला वाटले होते. मी लिफ्टमध्येही ऐकलेली आहे बहुतेक.

बरेच दिवसानी लिहिलस स्वप्ना.
>>खरं तर तसं खूप काही वास्तववादी पहावंसं नाही वाटत आजकाल. बरंच वास्तव बातम्यातून, पेपरातून, व्हॉटसेपच्या मेसेजेसमधून मेंदूवर आदळत राहतं २४ * ७. ते स्वीकारणं आता अपरिहार्य आहे. पण 'एक आटपाटनगर होतं बरं का' अश्या वाक्याने सुरुवात होणारी पुस्तकं आवडायचं वयही केव्हाच निघून गेलंय की. म्हणून मग माझ्यापुरता हा गोल्डन एराच्या चित्रपटांचा सुवर्णमध्य शोधलाय मी. तेव्हढे दोन-अडीच तास छान मजेत जातात.>>
Happy अगदी. छान लिहिल आहेस.

Pages