Odd Man Out (भाग ७)

Submitted by nimita on 12 February, 2019 - 20:44

संग्राम ला घेऊन मुली डायनिंग रूम मधे आल्या. नंदिनी नी टेबल वर संग्रामच्या ताटाशेजारी ते मेन्यू कार्ड ठेवलं आणि अनुजाला खूण केली. मग अगदी फिल्मी स्टाईल मधे "ढँणटँढँण" म्हणत अनुजा नी त्याच्या डोळ्यांवरचे हात काढले.

संग्रामनी टेबल वरून नजर फिरवली. आज त्यांच्या दोघांच्या प्लेट्स बरोबर मुलींच्या प्लेट्स ही बघून तो भलताच खुश झाला." अरेच्या, तुम्ही दोघी अजून जेवला नाहीत?" त्यानी अनुजा ला तिच्या खुर्चीवर बसवत मुलींना विचारलं.

"उद्या सुट्टी आहे ना दोघींना, म्हणून मीच म्हणाले की सगळे एकत्रच जेवू. दुपारपासून तूझी वाट बघतायत दोघी." नम्रता पानं वाढता वाढता म्हणाली.

त्यावर संग्राम काही बोलणार इतक्यात नम्रतानी हळूच मेन्यू कार्डच्या दिशेनी इशारा केला. संग्रामनी तो अचूक टिपला आणि कार्ड हातात घेऊन म्हणाला," अरे वा... आज तर पार्टी आहे आपल्याकडे! हे इतकं छान मेन्यू कार्ड कुठून आणलंत ? मेस मधल्या कार्ड पेक्षा पण मस्त आहे हे तर !"

"कुठून आणलं नाहीये काही....मी आणि ताईनी घरीच बनवलंय. मी बाहेरचं drawing काढलंय आणि ताईनी आतलं.." अनुजानी एक दमात सांगून टाकलं.

"हं, तरीच म्हटलं हे कार्ड इतकं स्पेशल कसं काय ? अरे वाह...चंद्र तारे ...छान च काढलंयस की!" संग्राम ची तारीफ ऐकून अनुजा एकदम खुश झाली. खुर्चीवर उभी राहात कार्ड उघडून दाखवत ती म्हणाली,"आतमधे तर बघा...अजून एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी .."

संग्रामनी कार्ड बघितलं- त्याची नजर डाव्या बाजूच्या चित्रावर गेली.. नंदिनी अपेक्षेनी त्याच्याकडे बघत होती. तिच्या चेहेऱ्यावर उत्सुकता अगदी स्पष्ट दिसत होती. पण काही न बोलता ती तिच्या बाबांच्या प्रतिक्रियेची वाट बघत होती.

संग्रामच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलत होते. आधी कुतुहल मग मुलींबद्दलचं कौतुक, प्रेम आणि अभिमान....त्यानी नंदिनी कडे बघितलं आणि म्हणाला,"थँक यू बेटा! खूप मस्त आहे कार्ड. तुझी ही ताटात मेन्यू लिहायची आयडिया मला खूप आवडली. आणि ही चीफ गेस्ट ची पण....एकदम मस्त !"

"आता मी हे कार्ड लॅमीनेट करून माझ्या फाईलमधे ठेवणार आहे. " नंदिनीला जवळ घेत तो म्हणाला.

"आपल्याकडे जेव्हा कोणी पाहुणे येतील तेव्हा त्यांच्यासाठी पण दोघी असंच कार्ड बनवाल का?"

'बाबांना आपलं कार्ड आवडलं' हे कळल्यावर दोघी खूप खुश झाल्या. त्या दोघींसाठी संग्राम कडून होणारं कौतुक सगळ्यात महत्त्वाचं असायचं.'सारी दुनिया एक तरफ, और हमारे बाबा एक तरफ'....असं समीकरण होतं त्यांचं.

"चला आता, लवकर जेवायला बसूया." बाप-लेकींमधलं संभाषण मधेच थांबवत नम्रता म्हणाली.

जेवताना एकीकडे दोघी मुलींची अखंड बडबड चालू होती. कित्ती कित्ती गमतीजमती सांगायच्या होत्या बाबांना... शाळेतली मजा,स्विमिंग पूलमध्ये केलेली दंगा मस्ती, एकमेकींच्या तक्रारी.....

गप्पांच्या नादात जेवण कधी संपलं कळलंच नाही कोणाला.

"बाबा, आज तुम्ही या ना आम्हांला झोपवायला!" अनुजानी संग्रामकडे लाडिक हट्ट केला.तिला दुजोरा देत नंदिनी पण म्हणाली," हो बाबा, प्लीज , या ना. आणि आज तुम्ही आम्हांला एखादी मस्त गोष्ट सांगा.....आजोबा सांगतात ना तशी."

"हो, पण ती ससा आणि कासवाची नाही बरं का... तुम्ही सारखी सारखी तीच गोष्ट सांगता...आज नवीन सांगा." अनुजा तोंड फुगवत म्हणाली.

"गोष्ट !अरे बापरे !!!" संग्रामला जणू काही धर्मसंकटात पडल्यासारखं वाटत होतं. कारण त्याचा आणि गोष्टींचा अगदी दूर दूर पर्यंत संबंध नव्हता.अनुजा म्हणाली तसं, त्याला फक्त एकच गोष्ट माहीत होती.

"आपण नुसत्याच गप्पा मारुया ना.. मला गोष्टी लक्षातच नाही राहात." संग्रामनी आपली बाजू मांडायचा प्रयत्न केला.

त्याचं बोलणं ऐकून अनुजा काही क्षण विचारात पडली. आणि मग कंबरेवर हात ठेवून त्याच्याकडे बघत म्हणाली," अरेच्या , म्हणजे मग तुम्ही आजोबांसारखे म्हातारे झाल्यावर आम्हांला गोष्टी नाही सांगणार ??"

तिचा तो निरागस प्रश्न आणि त्याहीपेक्षा जास्त-प्रश्न विचारतानाचा तिचा आविर्भाव बघून बाकी तिघांची हसता हसता पुरेवाट झाली. पण त्यामुळे अनुजा अजूनच गोंधळात पडली. "अगं, मी खरंच म्हणतीये. गंमत करत नाहीये."

तिला समजावत नंदिनी म्हणाली," अगं, बाबा जेव्हा आजोबांसारखे म्हातारे होतील तेव्हा आपण सुद्धा बाबांसारख्या मोठ्या झालेलो असू ना? मग? ते कसे सांगणार आपल्याला गोष्टी?"

आता अनुजाच्या डोक्यात प्रकाश पडला आणि ती पण "ए, खरंच की..." म्हणत हसायला लागली.

पण 'बाबांकडून गोष्ट ऐकायचा' दोघींचा निर्धार अजूनही कायम होता. त्यांच्या बालहट्टापुढे संग्रामचं काही चालेना.. त्यानी मदतीच्या अपेक्षेनी नम्रताकडे पाहिलं. त्याला असा हतबल झालेला बघून नम्रताच्या मनात एक मजेशीर विचार आला,' सीमेवर शत्रूला धूळ चारणारा हा शूरवीर मुलींच्या निरागस हट्टापुढे मात्र चारो खाने चित झालाय."

तिला हसताना बघून संग्राम अजूनच गडबडला. शेवटी न राहवून नम्रता त्याच्या मदतीला धावली. ती मुलींना म्हणाली," अगं, गोष्टी तर काय कोणीही सांगेल तुम्हांला.. त्यात काय एवढं ! पण NDA मधल्या गमतीजमती तर फक्त बाबाच सांगू शकतात ना? आज तुम्ही त्याच ऐका ."

मुलींना ही आयडिया एकदम आवडली. आता त्या दोघी "NDA, NDA..." करत संग्रामच्या अवतीभोवती नाचायला लागल्या.

संग्राम कृतज्ञता भरलेल्या नजरेनी नम्रताकडे बघत तिला म्हणाला," थँक्स, you are my saviour. आपका ये एहसान मैं कैसे चुकाऊंगा?"

"ते बघू नंतर... आधी मुली काय म्हणतायत ते बघ." खोलीतून बाहेर जाता जाता नम्रता म्हणाली. तिच्या मागे येत संग्राम म्हणाला," सकाळी मी म्हणालो होतो त्याबद्दल काही विचार केलास का ? कुठे राहायचं ठरवलंयस? मी मुलींना झोपवून येतो, मग बोलू आपण त्या विषयावर."

पुढच्या काही मिनिटांतच मुलींच्या खोलीतून हसण्या खिदळण्याचे आवाज येऊ लागले. संग्रामचे NDA मधले किस्से ऐकताना मुली पण खूप एन्जॉय करत होत्या. मधूनच 'बाबा, तुम्ही किती ब्रेव्ह आहात... तुम्हांला भीती नाही वाटली ....' असे मुलींचे रिमार्कस ऐकू येत होते.

थोड्या वेळानंतर हळूहळू आवाज कमी होत गेला... नम्रतानी मुलींच्या खोलीत डोकावून बघितलं- अनुजा संग्रामच्या कुशीत झोपून गेली होती. नंदिनी मात्र डोळ्यांवरची झोप परतवत,बाबांशी गप्पा मारण्यात दंग होती. पण नम्रताच्या अंदाजाप्रमाणे पाच एक मिनिटांत तिचीही विकेट पडणार होती.

बराच वेळ झाला तरी संग्राम आला नाही म्हणून नम्रता परत खोलीत डोकावली. बघते तर काय- मुलींबरोबर त्यांचे बाबा सुद्धा गाढ झोपी गेले होते.

त्या तिघांना असं शांत झोपलेलं बघून नम्रताला त्यांच्यावर अचानक खूप प्रेम आलं. किती निरागस दिसत होते तिघंही!

'आता संग्राम जाईपर्यंत पुढच्या एक दीड महिन्यात या तिघांनाही असंच एकत्र वेळ घालवायला प्रोत्साहित केलं पाहिजे'- नम्रताच्या मनात आलं.' एकमेकांपासून दूर असताना या अशा आठवणीच उपयोगी ठरतात...'

या आत्ताच्या क्षणाला कायमचं जतन करण्यासाठी ती कॅमेरा आणायला निघाली, तेवढ्यात तिला तिच्या आजीचं एक वाक्य आठवलं- 'झोपलेल्या माणसाचा कधी फोटो काढू नये..अपशकुन असतो तो.'

एरवी नम्रता या असल्या विचारांना अंधश्रद्धा मानायची. यावरून बऱ्याच वेळा तिचे आणि तिच्या आजीचे वाद ही व्हायचे. पण आज या हळव्या क्षणी का कोण जाणे तिनी तिच्या आजीचं ऐकायचं ठरवलं.

चोरपावलांनी खोलीत जाऊन तिनी तिघांची पांघरुणं सारखी केली, लाईट बंद केला आणि बाहेर येऊन हलक्या हातानी खोलीचं दार बंद केलं.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users