स्वतंत्र भारताचा सामरिक इतिहास - १९४७ ते १९७१

Submitted by टवणे सर on 6 February, 2019 - 14:28

India's Wars: A Military History, 1947-1971 एअर व्हाइस मार्शल अर्जुन सुब्रमण्यम

भारतीय सैन्यदलांच्या स्थापनेपासून (१९४७) ते बांग्लादेश मुक्ती संग्रामापर्यंतच्या प्रमुख लढायांची सामान्य लोकांना समजेल अशा भाषेत लिहिलेला इतिहास ही या पुस्तकाची अत्यंत संक्षिप्त ओळख. पण हा इतिहास अत्यंत रंजक (इमेन्सली रिडेबल), माहितीपूर्ण आणि सामरिक बाबींवर फोकस असला तरी राजकीय व सामाजिक अंगाना स्पर्ष करत लिहिलेला आहे.
लेखक स्वतः हवाई दलातील उच्चपदस्थ अधिकारी असले तरी पुस्तकात तिन्ही सैन्यदलांना त्यांच्या योगदानानुसार जागा मिळालेली आहे. भारतीय नौदलाचा युद्धातला सहभाग कमी असल्याने नौदलाच्या लढायांची अर्थातच कमी माहिती आहे आणि लष्कर (भूदल) सर्वात अधिक जागा व्यापते. जिथे हवाई चकमकींचे वर्णन येते तिथे लेखक स्वतः फायटर पायलट असल्याने थोडे तांत्रिक वर्णन जास्त होते असे वाटते. पण एकूणच हवाई चकमकींचा 'अवकाश', तित घडणार्‍या घटना व त्यांची भाषा आपल्या रोजच्या अनुभवांपासून इतकी दूर आहे की अगदी सोप्या भाषेत लिहिले तरी कदाचित सामान्य माणसाला ते समजण्यास अवघड जात असावे.

पुस्तकाच्या पहिल्या भागात भारतीय सैन्यदलांच्या उदयापासून पहिल्या व दुसर्‍या महायुद्धातील सहभागाबद्दल संक्षिप्त आढावा आहे. हा भाग उर्वरित पुस्तकासाठी 'पाया' आहे. मराठी लोकांना अभिमान वाटेल अश्या दोन गोष्टी यात येतात. लेखक भारतीय सैन्याचा उगम इंग्रजांनी स्थापन केलेल्या बटालियन्सच्याही मागे जाऊन शिवाजी महाराज व राजा रणजित सिंह या दोन सेनानी/राज्यकर्त्यांच्या सैन्याशी आहे असे मत मांडतात. त्याची कारणेदेखील पुस्तकात तपशीलात दिली आहेत. इतर काही सेनानी उदा. हैदर अलि, टिपु सुलतान हे का नाहीत याचेही स्पष्टिकरण येते. दुसरी अभिमानाची गोष्ट म्हणजे मराठा रेजिमेन्ट्सचा (एम.एल.आय. आणि महार रेजिमेन्ट) पहिल्या/दुसर्‍या महायुद्धातील पराक्रम.

पुस्तकाचा मुख्य भाग हा १९४७/४८चे काश्मिर युद्ध, हैद्राबाद मुक्तिसंग्राम, गोवा मुक्तिसंग्राम, ६२चे चीनयुद्ध, ६५चे पाकिस्तान बरोबरील युद्ध आणि शेवटी ७१चे बांग्लादेश निर्माण करणारे युद्ध यांचा इतिहास मांडते. यात दोन्ही बाजुची सैन्यदले, त्यांची बलस्थाने/कमजोरी, वैयक्तिक पराक्रम, अतुलनीय नेतृत्वाने कंपनी/रेजिमेंट/बटालियन/ब्रिगेड्सकडून असामान्य पराक्रम करवून घेणारे ऑफिसर यांचे सटिप वर्णन आहे. आपल्याला सामान्यपणे माहिती नसलेल्या अनेक गोष्टी कळतात. जिथे आवश्यक आहे तिथेच फक्त राजकीय नेतृत्वासंबंधी टिप्पणी येते.
या पुस्तकात आपल्याला ले.ज. झोरावर चांद बक्षी, ज. सगत सिंग, शैतान सिंग, निर्मलजित सिंग सेखोन, अ‍ॅडमिरल कोहली, एअर चिफ पी सी लाल, फक्त २१वर्षांचा तरुण सेकंड लेफ्टनंट अरुन खेत्रपाल**, अब्दुल हमीद अन अल्बर्ट एक्का सारखे जे.सी.ओ./जवानांची ओळख त्यांच्या रणांगणावरील कर्तुत्वाने होते. त्याचबरोबरीने शत्रुसैन्यातील प्रमुख सेनानी, लढवय्ये, त्यांनी केलेले पराक्रम यांचेही यथायोग्य वर्णन आहे.
सैन्यदलांचे व राजकीय नेतृत्वाचे चुकीचे निर्णय, रणांगणावरील चुका, दूरगामी स्ट्रॅटेजिक निर्णयांचे परिणाम हे देखील स्पष्टपणे मांडले आहे.
पुस्तकाच्या शेवटी एक वाचन यादी दिली आहे ते अत्यंत आवडले. कुठली पुस्तके व का हे दोन्ही त्यासोबत आहे. या व्यतिरिक्त टिपा (इन्डेक्स) आहेच.

प्रत्येक भारतीयाने जरूर वाचावे असे हे पुस्तक आहे.

७१नंतरच्या युद्धांवर दुसरा खंड लिहिणार आहे असे लेखकाने लिहिले आहे त्याच्या प्रतिक्षेत आहे.

पुस्तकाची गूडरिड्स लिंकः https://www.goodreads.com/book/show/29983805-india-s-wars
लेखकाचा ट्विटरः https://twitter.com/rhinohistorian?lang=en

** देअर आर नो विक्टर्स इन द वॉर. २१वर्षाचा नुकताच कमिशन मिळालेला अरुण खेत्रपालने ७१च्या युद्धात टँक निकामी झाला असला तरी मुख्य गन काम करत असल्याने अखेरच्या श्वासापर्यंत पाकिस्तानी रणगाड्यांवर हल्ला चालू ठेवला. पाकिस्तानी सैन्य तुकडीचा कमांडर ख्वाजा अब्दुल नासर यांच्या तोफेने अखेर अरुणच्या रणगाड्याचा वेध घेतला. से.ले. अरुणचे वडिल तेव्हा सैन्यात ले. कर्नल होते. ते पुढे ब्रिगेडियर म्हणून निवृत्त झाले.
आता पाकिस्तानात असलेल्या सरगोधा इथे जन्मलेल्या ब्रि. खेत्रपालांनी वयाच्या ८१व्या वर्षी २००१मध्ये पाकिस्तानला आपल्या जन्मगावी भेट दिली. त्या भेटीचा हृद्य प्रसंग इथे वाचा. https://en.wikipedia.org/wiki/Arun_Khetarpal#Legacy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

परिचय आवडला
वेश घेतला ऐवजी वेध घेतला हवं होतं!

नेहमीप्रमाणेच सुंदर परिचय.

अखेर अरुणच्या रणगाड्याचा वेश घेतला >>> इथे वेध हवंय.

ती विकीची लिंक वाचताना अंगावर काटा आला. It was destined that I was to live and he was to die. कधीकधी मी जिवंत आहे हा विचारही खूप त्रास देत असेल का माणसाला?

छान लेखन व लिंक बद्दल धन्यवाद. वर्ल्ड वॉर टू वर पीएच डी नाही तरी समग्र नेट अभ्यास होत आला आहे. आता हे चालू करते.

अतिशय सुंदर परिचय, पुस्तक नक्कीच मिळवून वाचणार.

अरुण खेत्रपाल बद्दल वाचून अंगावर काटा आला . मुलगा तर शूर होताच पण त्या रात्री वडीलांची काय मनस्थिती झाली असेल कल्पना करवत नाही.

अतिशय सुंदर परिचय, पुस्तक नक्कीच मिळवून वाचणार.

अरुण खेत्रपाल बद्दल वाचून अंगावर काटा आला . मुलगा तर शूर होताच पण त्या रात्री वडीलांची काय मनस्थिती झाली असेल कल्पना करवत नाही.>>>> +100

सुंदर पुस्तकपरिचय! >> +१

From the Wikipedia article ……

"There are never any victors in war; both sides lose and it is the families that have to pay the price and suffer the most. As someone once said 'Wars are created by politicians, compounded by bureaucrats and fought by soldiers"

आवडला पुस्तक परिचय

मानवतावादी दृष्टिकोनातून जगात युद्ध नकोत, शेजाऱ्यावर प्रेम करावे, सैन्यच नको ई कितीही वाटत असले तरी अशी मानवतावादी माणसे आणि विचारधारा शिल्लक राहावी म्हणून आपल्या सीमेचे रक्षण करणारे सैन्य अत्यावश्यक ठरते. भारतीय सैन्य हे काम अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधेही वर्षानुवर्षे समर्थ पणे पार पाडत आलेले आहे त्याबद्दल सार्थ अभिमान आणि अतीव आदर वाटतो.

पुस्तक परिचय आवडला.

"There are never any victors in war; both sides lose and it is the families that have to pay the price and suffer the most. As someone once said 'Wars are created by politicians, compounded by bureaucrats and fought by soldiers" > अगदी Sad

या पुस्तकाचा दुसरा भाग नुकताच प्रकाशित झाला आहे. दुसर्‍या भागात ७२ ते २०२० या कालखंडातील युद्धांचा आढावा आहे. नथुला आणि चोला येथे झालेल्या चीनबरोबरच्या चकमकी आणि नागा/मिझो इन्सर्जन्सीं पहिल्या भागात राहून गेल्या होत्या त्यांना दुसर्‍या भागात समाविष्ट केले आहे.
Full Spectrum: India's Wars, 1972-2020

नितिन गोखलेंनी घेतलेली मुलाखत

अ‍ॅड्मिरल अरुण प्रकाशांनी घेतलेली एक उत्तम मुलाखत