आगऱ्याहून सुटका - पुस्तक परिचय - समारोपाचा भाग ४

Submitted by शशिकांत ओक on 3 February, 2019 - 03:15

On horseback Shivaji.JPGसमापन

या पुस्तकात आग्र्याहून सुटकेच्या नव्या प्रमेयाशिवाय अशी बरीच माहिती संग्रहित केलेली आहे, जी इतिहासाच्या चाहत्यांना वाचायला व मनन करायला आवडेल. त्यांची ओझरती ओळख करून ह्या ग्रंथाचा परिचय आवरता घेतो.
लेखक इतिहास शब्दाची व्याख्या,(पान 9) इतिहासाचार्य वि. का. राजवाड्यांनी मांडलेली इतिहास अभ्यासकांसाठी थोडक्यात खालील मार्गदर्शक तत्वे सादर करून आपलाही दृष्टीकोन सांगतो.
1. कोणताही पुर्वाग्रह नको.
2. अस्सल माहिती मिळवल्याशिवाय लेखन हाती घेऊ नये.
3. काही माहिती अनुपलब्ध असेल तर ते स्पष्ट करावे.
4. अस्सल माहितीवरून काही सिद्धांत काढायचा असेल तर काढावा.
5. उपमान प्रमाणावर कोणताही सिद्धांत ठरवू नये.

साधनचिकित्सा

– साधनांचे दोन वर्ग अस्सल कागद आणि बखरींसारखे चरित्रात्मक ग्रंथ. औरंगजेबाच्या दरबारातील कामकाजाची दररोजची नोंदींना ‘अखबार’ म्हणतात. मिर्झाराजे जयसिंह आणि रामसिंह यांच्यातील पत्रव्यवहार ‘राजस्थानी व फारसीतून’ आहे.

रस्ते व सराया

शिवाजीराजे आग्र्याला जात असतानाच्या वर्णनात लेखकानी रस्ते बैलगाडी जाता येईल इतके रुंद असल्याचे नमूद केले आहेत. प्रवाशाच्या सोईसाठी शेरशाहने दर 2 कोसावर सराया बांधल्या. अशा 1700 सरायांचा उल्लेख आढळतो. प्रत्येक सराईत पाण्याचे कुंड, जेवण व झोपायची सोय, तसेच घोड्यांना दाणा-पाणी याची सोय असे. प्रवाशाच्या पदा, श्रेष्ठतेप्रमाणे सोय उपलब्ध असे. नंतरच्या काळात या सरायांभोवती गावे वसली. या सराया डाकचौकी म्हणून ही वापरल्या जात.

बातमीदार व संदेशवाहक

मोगल राज्यात 4 प्रकारचे बातमीदार असत. 1. वाकेनवीस 2. सवाहनिगार. 3. खूफिया नवीस. 4. हरकारा.
पहिले दोन सैन्यात व परगण्यात विखुरलेले असायचे. हरकारा म्हणजे तोंडी निरोप्या किंवा कधी कधी लखोटे नेणारा. आजच्या भाषेतील अंगडिया, कुरीयरवाला तर खूफियानवीस म्हणजे गुप्त हेर. बातमीपत्रे नळ्यातून पाठवली जात. चंगेजखानाच्या सैन्यात मोहिमेवर निघताना अधिकृत बातमीदार जासूदांची दोन रिंगणे सैन्याभोवती असत. पुढील परदेशाची मोहिमेच्यासाठी उपयुक्त माहिती ते सतत पुरवत असत. नदी-नाले, व्यापार-उदीमाच्या जागा, छावण्यांच्या जागा, हातघाईसाठी, लढाईचे मैदान वा जागांची निवड हे काम असे. जासूदाकडे राजमुद्रा असलेला बाण असे त्यातील आदेश राजाज्ञा मानल्या जात.
लेखकाने आग्रा ते बऱ्हाणपुर 520 मैलाचे गणित घालून नोंदींचा पाठपुरावा नकाशे व अन्य साधनांनी केला आहे यावरून त्यांच्या चिकाटीचा व सखोल शोधाचा माग लागतो.

नेताजी पालकर

यांवर सखोल माहितीचे परिशिष्ठ 1 वाचनीय आहे.

पुरंदरचा तह झाल्यावर पन्हाळ्याच्या मोहिमेत अपयश आल्याचे निमित्त होऊन नेताजी पालकर विजापुरच्या अदिलशहाकडे चाकरीला गेला. नंतर शिवाजीमहाराज आग्र्याला 5 मार्च 1666 रवाना झाल्यानंर लगेच 15 दिवसात तो मोगलांना येऊन मिळाला. शिवाजीराजे निसटल्यावर नेताजीला बीड मधून पकडून दिल्लीला रवाना करण्यात आले. नंतर धर्म परिवर्तन करून त्याला अफगाणिस्तानच्या मोहिमेत पाठवले असताना त्याने निसटण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. नंतर त्याची दिलेरखानावरोबर दक्षिणेत नेमणूक झाली असताना 1676 साली त्यानी पुन्हा महाराजांकडे गमन केले.

पुढील संशोधनाच्या दिशा

परिशिष्ठ 2 मधे
हे पुस्तक कुठे उपलब्ध? रसिक साहित्य आणि बुकगंगा.कॉम वर मिळू शकेल

डॉ अजीत जोशींनी 'इतिहास संशोधनातील साधनांत बखर हे निम्न दर्जाचे साधन मानले जाते. तर करीना, पत्रव्यवहार, सरकार दफ्तर दस्तावेज ही उच्च दर्जाची मानली जातात'. असे म्हटले आहे. त्यात बखरी सारख्या संदर्भांना सपोर्टिंग एव्हिडन्स मानले आहे मेन नाही. पुस्तकात या गोष्टीची चर्चा आहे.
त्यांच्या शोध कार्याला पुरस्कार मिळाले आहेत. असे त्यांच्या वेबसाइट वरील माहितीतून समजते.

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults