मोरोक्कन पिझा

Submitted by दिनेश. on 13 October, 2009 - 19:07
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 

पिझाचे आपण खातो ते अमेरिकन व्हर्जन आहे. (म्हणजे जाड गोल बेस)
मूळ इतालियन पिझा, अगदि पातळ असतो, आणि तो कुरकुरीत लागतो.
हे आहे मोरोक्कन व्हर्जन. यात वर टॉपींग न करता, पिठातच सर्व
मिसळतात. याने मस्त चव येते यासाठी ड्राय यीस्ट लागेल, पण अवन नसला
तरी चालेल.

साहित्य दोन कप मैदा वा कणीक वा दोन्हीचे मिश्रण
एक चहाचा चमचा ड्राय यीस्ट
अर्धा चमचा साखर
दोन टेबलस्पून तेल
मीठ

आत भरण्यासाठी
एक मोठा कांदा, उभा चिरून
एक मोठा टोमेटो, बारिक चिरुन
एक दोन हिरव्या मिरच्या, बारिक चिरुन,
अर्धा कप शेडार चीज, किसुन
थोडे जिरे, मीठ, तेल वा तूप

क्रमवार पाककृती: 

एका कपात अर्धा कप कोमट पाणी घ्या, व त्यात साखर टाका
जरा हलवून त्यात यीस्ट टाका, व दहा मिनिटे बाजूला ठेवा.
मैदा वा कणीक चाळून घ्या. त्यात खळगा करुन, यीस्टचे मिश्रण
टाका. मीठ व थोडे तेल घालून मळून घ्या. लागेल तसे पाणी
घालून सैलसर मळा. वरून तेल लावून झाकून ठेवा. अर्ध्या पाऊण
तासाने मिश्रण फ़ुगुन दुप्पट होईल.

त्या दरम्यान, तेलावर वा तूपावर जिरे मिरच्याची फ़ोडणी करुन कांदा सोनेरी
परता. त्यात टोमेटॊ घाला. जरा परतून सारण थंड करत ठेवा.
त्यात मीठ टाका ( सारणात आवडीप्रमाणे, बेसिल, पुदिना, कोथिंबीर
टाकता येईल. ) त्यात चीज किसून हलक्या हाताने मिसळा.
आता पिठाचे मिश्रण परत मळून त्यातली हवा काढून टाका.
लांबट लाटून त्यावर थोडे सारण पसरा. घडी घाला, परत लाटून
आणखी थोडे सारण पसरा, परत घडी घाला ( असे केल्याने
सारण नीट पसरते ) आता एका नॉन स्टीक पॅनला पुसट
तेल लावून त्यावर हे मिश्रण थापा. तासभर झाकून ठेवा. मिश्रण
परत फ़ुगुन येईल. तसे आले की मंद गॅसवर भाजायला ठेवा. पंधरा
वीस मिनिटाने पॅनवर डिश टाकून पिझा डिशमधे काढा. परत पॅनमधे
ठेवून दुसर्‍या बाजूने भाजा (अवनमधे केले तर असे करायची गरज
नाही. भाजताना वरून हवे तर तीळ वा खसखस लावता येईल.
हा प्रकार थंड झाल्यावर पण छान लागतो. सोबत ग्रीक सलाद घ्या
( फ़ेटा, काकडी, सिमला मिरची, टोमेटॊ, ऒलिव्ह, बेसिल व थोडे क्रीम
वा दही एकत्र करा. मीठ घालायचे नाही कारण फ़ेटा खुप खारट असते.
वरुन मिरपूड घाला. )

वाढणी/प्रमाण: 
एक मोठा पिझा होईल
अधिक टिपा: 

हा प्रकार भाजताना मस्त वास सुटतो. भूक चाळवणारच !!!

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवन मध्ये करायचं असेल तर किती ठेवायच टेंपरेचर? आणि किती वेळ ठेवायच?
घडी घालायची म्हणजे, घडीच्या पोळ्या करतानां जश्या घड्या घालतो तश्या घालत लाटायचं का ?

अवन मधे २२० से ला १५ ते २० मिनिटे लागतील. हो घडीच्या पोळीप्रमाणेच, म्हणजे कांदा सगळ्या पिठात विखुरला जातो.

मस्त रेसीपी आहे दिनेश तुमची नेहेमीप्रमाणेच !! "हा प्रकार थंड झाल्यावर पण छान लागतो" हे आणखीन छान! कोणी येणार असल्यास करायला.. पोळीच्या किती घड्या करायच्या?? पिझ्झ्याचा फायनल आकार साधारण कसा दिसतो?

वर्षा , भारतात हे चीज क्राफ्ट नावाने मिळते. अमूल आणि ब्रिटानियाचे पण बघितले होते. हे मऊ नसते त्यामूळे सहज किसता येते.
यीस्ट घातलेल्या पिठात सारण भरणे जरा कठीण जाते. त्याचा एकाच ठिकाणी गोळा होतो, म्हणुन घड्या घालायच्या. दोन तीन घड्या घातल्या की पुरे. हा पिझा गोल पण फुगीर दिसतो. वरुन पावासारखाच दिसतो, पण आतल्या सारणामूळे छान चव येते. (नेहमीचा पिझा खाताना, बेस खुपदा बेचव लागतो, तसे यात होत नाही. )
हा आधी करुन ठेवता येतो. ( आधी केला तर सारणाचा छान स्वाद उभारून येतो. यात एखादे तरी हर्ब वापरावे, मी घरचे बेसिल घातले होते.) मी डब्यातच नेला होता, छान पोटभरीचा पदार्थ होतो हा.
असाच एक प्रकार FOCACCIA या नावाने इताली मधे करतात.

छान रेसिपी.. पूर्वतयारी मध्ये आदल्यादिवशी काय करुन ठेवता येईल? ( सकाळी डब्यात न्यायचा असेल तर ) आणि मुंबईच्या हवेत ७-८ तास चांगला राहील ना?

हा रात्री बेक केला तरी चालेल, किंवा सारण भरुन फ्रीजमधे ठेवला तरी चालेल. चांगली यीस्ट असेल तर फ्रिजमधे ठेवल्यावरही कार्यक्षम राहते. व सकाळि बेक केल्यावरही फरक पडत नाही. रात्री बेकच केला तर सकाळपर्यंत छान स्वाद मुरतो (पण बेक झाल्यावर हवाबंद डब्यात, फ्रीजमधे ठेवावे लागेल )

भाजल्यावर पॅन च्या खाली टिचक्या मारल्या तर पोकळ असल्यासारखा आवाज येतो ( कुठलाही पाव झाला कि नाही, हे बघायची हि खूण आहे ) तसा झाला कि लंच टाईमपर्यंत नक्कीच टिकेल.

हे सगळे गणित, फुगण्यासाठी तो तास सव्वा तास लागतो, आणि नंतर बेक करण्यासाठी जो अर्धा तास लागेल, तो कधी मिळेल यावर अवलंबून. जर सकाळी तेवढा वेळ असेल, तर सारण आदल्या रात्री शिजवून, बाकिची कृति, म्हणजे पिठ भिजवणे वगैरे, सकाळी करता येईल.

धन्यवाद दिनेश, सकाळी एवढा वेळ मिळेल, ह्याची खात्री नाही, तेव्हा एक दोन वेळा रात्री सारण भरुन आणि सकाळी बेक करुन किती वेळ चांगला राहतो हे पाहता येईल. (मुंबई ची हवा फार वाईट. आणि डब्यात खराब झाला तर मुलाला कळणार नाही म्हणून.)

पिठ भिजवताना व्हीनीगर *एवढ्या प्रमाणात दोन ते तीन टिस्पून * घातले तर हा पिझा मुंबईच्या हवेतही खराब होणार नाही. पॅक करताना फॉईलमधे पॅक करायचा. एरवी कांदा घातलेल्या पदार्थाच्या बाबतीत काळजी घेणे उत्तमच. (सध्या मुंबैत थंडी असायला हवी ना ? )

व्हिनीगर घालून करुन पाहते....
थंडी असायला हवी (च!), सकाळी जरा थंड असत, पण नंतर उकडायला लागत..

दिनेश, मुंबैत, विषेशतः नव्या मुंबईत सध्या भरपुर थंडी आहे. पावसाने पाठ फिरवली तरी थंडीने मात्र पाठ फिरवली नाहीय Happy

त्यामुळेच हा पिज्जा मला करायला काल दोन तासापेक्षा जास्त वेळ लागला. पहिले पिठ फुगायला तासभर गेला. दुस-या वेळी तास झाल्यावर मुलीला धीर निघवेना त्यामुळे तसाच उचलुन अवन मध्ये टाकला.

सांगायला आनंद होतोय की अगदी मस्त झाला. पण मला ते गोल लाटवेना. घडी घालत घालत मी त्रिकोणी पिज्जा केला. शिवाय घरी बीन्स आणि स्विटकॉर्न होते तेही टाकले सारणात. त्यामुळॅ कदाचित ऑथेंटी मोरोक्कन नसेल झाला पण जे काय झाले ते मुलीने फटाफट संपवुन टाकले. Happy

अरे वा ! मुंबईत थंडी पडली का ?
तसे सारण कसलेही वापरु शकतो. यातली गंमत ते सारण सगळीकडे सारखे पसरण्यामूळे येते. भूमध्य समुद्राचा सर्व परिसर पीक पाणी आणि मासे याने समृद्ध आहे. त्यामूळे त्यांच्याकडे फार वेगवेगळे पदार्थ केले जातात. आपल्याला त्या सर्वांची तशी अजून नीट चव लागलेली नाही.
कुणी हा पदार्थ हॉटेलमधे ठेवला तर नक्कीच लोकप्रिय होईल.