जीवनसत्वे : भाग ६
(भाग ५ : https://www.maayboli.com/node/68717)
*************************
जीवनसत्वांच्या ‘ब’ गटात एकूण ८ घटक आहेत. ती सर्व पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे आहेत. साधारणपणे ती विशिष्ट आहारस्त्रोतांमध्ये एकत्रित आढळतात. त्यापैकी ६ पेशींतील ऊर्जानिर्मितीमध्ये योगदान देतात तर उरलेली २ DNAच्या उत्पादनात मदत करतात. ब-१ हे पहिल्या गटात मोडते. त्याचा परिचय करून देण्यासाठी हा लेख.
ब-१ चे अधिकृत नाव Thiamin असून त्यामध्ये गंधक हे मूलद्रव्य असते.
आहारातील स्त्रोत:
अख्खी (unrefined) धान्ये, मासे, मांस, अंडे , सोयाबीन व हिरवे वाटाणे यांत ते विपुल प्रमाणात असते. जर गहू व तांदूळ ही नित्याची धान्ये ‘अख्ख्या’ स्वरुपात खाल्ली तर निसर्गाने दिलेला हा स्त्रोत सर्वांना सहज उपलब्ध आहे. पण, आधुनिक खाद्यशैलीत आपण ही धान्ये ‘शुद्ध’ आणि दिसायला चकचकीत करू लागलो तेव्हाच आपण हा निसर्गदत्त स्त्रोत गमावू लागलो. म्हणून आता ब-१ च्या इतर स्त्रोतांकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे. तांबडा भोपळा व शतावरी या भाज्यांत ते आहे. तसेच यीस्ट हाही त्याचा एक उत्तम स्त्रोत आहे, जो ब्रेड तयार करताना वापरला जातो.
आहारातील काही पदार्थांमध्ये ‘ब-१ विरोधी’ रसायने असतात. चहा, कॉफी, विड्या चे पान हे ते पदार्थ. तसेच प्रक्रियाकृत खाद्यांमध्ये sulfite खूप प्रमाणात असते व तेही ब-१चा नाश करते. त्यामुळे या पदार्थांचे अतिसेवन टाळणे इष्ट.
शरीरातील कार्य:
पेशींतील जवळपास सर्व रासायनिक क्रिया या एन्झाइम्सच्या मदतीने होतात. या एन्झाइम्सना मदतनीस म्हणून जी द्रव्ये काम करतात त्यांना सह-एन्झाइम्स म्हणतात. सर्व ‘ब’ जीवनसत्वे सह-एन्झाइम्सचे काम करतात. ऊर्जानिर्मितीतील अत्यंत महत्वाच्या रासायनिक क्रियांमध्ये ‘ब-१’ चे योगदान मोलाचे आहे. जेव्हा काही कारणाने शरीरातील चयापचयाची गती खूप वाढते तेव्हा अधिक ऊर्जानिर्मितीसाठी ‘ब-१’चा पुरवठा वाढवावा लागतो. तसेच ‘ब-१’ हे मज्जातंतूमध्येही असते आणि त्यांच्या संदेशवहनाच्या कामात मदत करते.
अभावाची कारणे :
१. कुपोषण व उपासमार : वर म्हटल्याप्रमाणे सामान्य धान्यातील ब-१ ती चकचकीत केल्याने आपण गमावले आहे. आता विविध ‘बीन्स’ व मांसाहार हे त्याचे समृद्ध स्त्रोत आहेत. मुळातच ही खाद्ये महाग असतात. त्यामुळे गरिबी हे या अभावाचे प्रमुख कारण ठरते.
२. दीर्घकालीन अतिरिक्त मद्यपान : हा मुद्दा गरिबीने ग्रासलेल्या आणि मद्याच्या आहारी गेलेल्या व्यक्तींना लागू होतो. त्यांची कमाई आधीच तुटपुंजी असते आणि त्यात व्यसनाधीनता. त्यामुळे कमाईतील बराचसा भाग दारूवर खर्च होतो. मग पोषक आहारासाठी पैसेच उरत नाहीत. त्यातून ‘ब-१’सह अनेक पोषकद्रव्यांचा अभाव होतो.
३. चयापचय गतिमान असणाऱ्या अवस्था: गरोदर व स्तनदा माता, मोठा ताप आलेला असता आणि थायरोइड-अधिक्याची अवस्था. या सर्व अवस्थांत ‘ब-१’ चा आहारपुरवठा वाढवावा लागतो.
अभावाचे परिणाम:
या आजाराला ‘बेरीबेरी’ असे नाव आहे. हा मजेदार शब्द सिंहलीज भाषेतील असून त्याचा शब्दशः अर्थ “मी काहीही करू शकत नाही”, असा आहे. त्यात रुग्णाची अशी अवस्था होते कारण त्याला प्रचंड अशक्तपणा जाणवतो. ‘ब-१’च्या अभावाने पेशींतील ऊर्जानिर्मितीस खीळ बसते हे त्याचे मूलभूत कारण. त्याचा परिणाम शरीरातील सर्वच पेशींवर होतो. त्यातही मज्जासंस्था आणि हृदयावरील परिणाम गंभीर असतात. त्यानुसार या आजाराचे दोन मुख्य प्रकार आहेत:
१. कोरडी बेरीबेरी
२. ओली बेरीबेरी
कोरडी: यात प्रामुख्याने मज्जासंस्थेवर परिणाम होतो. त्यात अनेक मज्जातंतूंचा (विशेषतः पायाच्या) दाह होतो. परिणामी स्नायूदुखी होते. त्यात जर असा रुग्ण दारुडा असेल तर त्याच्यात मानसिक आजाराचीही लक्षणे दिसतात आणि त्याला विस्मरण होते.
ओली: यात प्रामुख्याने हृद्य व रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. हृदयाचे कार्य मंदावल्याने ते क्षीण होत जाते. परिणामी पायांवर सूज(edema) येते.
उपचार : ‘ब-१’ चे उपचार चालू केल्यावर रुग्णास लवकर आराम पडतो. सौम्य ते मध्यम आजारात गोळ्या देतात तर गंभीर स्थितीत इंजेक्शनद्वारा ते द्यावे लागते.
********************************************
वारंवार जिभेला फोड येणे किंवा
वारंवार जिभेला फोड येणे किंवा वारंवार तोंड येणे, टाचा दुखणे हे ब जीवनसत्त्वाच्या अभावी होत असेल का?
ब जीवनसत्वाची मोजणी पॅथॉलॉजीमध्ये कशी करतात.
धन्यवाद.. खुप छान माहितीपूर्ण
धन्यवाद.. खुप छान माहितीपूर्ण लेखमालिका आहे ही.. विटामिन्स ची..
हाही भाग मस्तच !
हाही भाग मस्तच !
हल्ली मेट्रो सिटी आणि इतरत्रही स्पिरुलिना टॅबलेटचा रोजच्या जीवनात आवर्जून सहभाग असतो. तर स्पिरिलुनामध्ये असलेल्या थायमिन राइबोफ्लेविन नायसिन ह्यांच्या मुबलक प्रमाणाचा आपल्याला प्राइस वर्सेस एक्चुअल गेन आणि असेच इतर फॅक्टर मध्ये खरोखर कितपत फायदा होतो हे जाणून घ्यायला आवडेल.
वरील सर्वांचे आभार. आता
वरील सर्वांचे आभार. आता शंकानिरसन.
सचिन,
वारंवार जिभेला फोड येणे किंवा वारंवार तोंड येणे >>> ही ब-२ च्या अभावाची लक्षणे आहेत.
ब जीवनसत्वाची मोजणी पॅथॉलॉजीमध्ये कशी करतात>>>> सर्व 'ब' नेहमीच्या व्यवसायात मोजायची गरज नसते कारण रुग्णाच्या तपासणीवरून त्याचे निदान बरेचदा होते. 'ब-१२' सारखी मोजली जातात. त्यांच्या पद्धती या आधुनिक स्वरूपाच्या असतात. उदा. Immunoassay.
डूडायडू, तुमच्या प्रश्नाचे सविस्तर उत्तर जरा वेळाने..
डूडायडू,स्पिरिलुनामध्ये
डूडायडू,
स्पिरिलुनामध्ये असलेल्या थायमिन राइबोफ्लेविन नायसिन >>>>
जर आपण या गोळीतील घटकांचे प्रमाण पाहिले तर असे दिसेल:
थायमिन : रोजच्या गरजेच्या ११%
राइबोफ्लेविन .......,,........... १५%
नायसिन..............,,............. ४%, इतकेच आहे.
त्यामुळे समतोल आहाराला ही गोळी पर्याय नाही होणार.
अजून एक.....
औषधी गोळ्यांच्या रूपातील जीवनसत्वे ही
१. त्याचा अभाव झाला असता आणि
२. विशिष्ट परीस्थीतीत ( गरोदरपण, म्हातारपण, इ.) अशाच वेळी घ्यावीत.
सामान्य जनांनी ती आहारातूनच मिळवलेली चांगली.
हा भाग ही छान, आणि प्रश्नांची
हा भाग ही छान, आणि प्रश्नांची छान उत्तरे.
सामान्य जनांनी ती आहारातूनच
सामान्य जनांनी ती आहारातूनच मिळवलेली चांगली.+१११
धन्यवाद डॉक्टर
नेहमीप्रमाणेच छान व पौष्टिक
नेहमीप्रमाणेच छान व पौष्टिक लेख !
लेखात ब्रेडमधील यीस्टचा उल्लेख आहे.
यीस्ट हा तर ब-१ चा दमदार स्रोत आहे. तो घरच्या स्वयंपाकात वापरता येईल का ?
छान माहिती .
छान माहिती .
वरील सर्वांचे आभार.
वरील सर्वांचे आभार.
यीस्ट घरच्या स्वयंपाकात वापरता येईल का ?>>>>
मी कधी वापरला नाही पण काही जण तो घालून तंदूर रोटी आणि अप्पम बनवतात.
सुरेख माहिती. धन्यवाद डॉ.
सुरेख माहिती. धन्यवाद डॉ. कुमार या संकलनाबद्दल.
नेहमीप्रमाणेच ।माहितीपूर्ण
नेहमीप्रमाणेच ।माहितीपूर्ण लेख आणि प्रतिसाद.
धन्यवाद डॉक्टर ... तुमचे
धन्यवाद डॉक्टर ... तुमचे बहुमोल योगदान आहे मायबोलीकरांच्या आरोग्यासाठी. लेखही समजायला सोपे कुठेही पाल्हाळ नाही तरी रंजक आणि माहितीपूर्ण ... तुमचे शंकानिरसनाचे तत्पर प्रतिसाद आदर निर्माण करतात तुमच्याविषयी...
वरील सर्व नियमित वाचकांचे
वरील सर्व नियमित वाचकांचे मनापासून आभार.
तुम्ही दाखवत असलेल्या आपुलकीमुळेच लेखनाचा हुरूप वाढतो.
तुमचे बहुमोल योगदान आहे
तुमचे बहुमोल योगदान आहे मायबोलीकरांच्या आरोग्यासाठी. लेखही समजायला सोपे कुठेही पाल्हाळ नाही तरी रंजक आणि माहितीपूर्ण ... तुमचे शंकानिरसनाचे तत्पर प्रतिसाद आदर निर्माण करतात तुमच्याविषयी...>> +1234567......
डाॅक्टर, मला हायपोथायराॅईड आहे. आणि कधी कधी खूप अशक्तपणा जाणवतो म्हणजे जेवणानंतर ( भात न जेवता फक्त चपाती, भाकरी खाल्ली की) लगेचच पण असा थकवा येतो. हे ब-१ च्या अभावाने असू शकेल का??
@ निधी,
@ निधी,
हायपोथायराॅईड अवस्था हे थकायचे कारण आहेच. त्यामुळे तुमचे उपचार व्यवस्थित लागू झालेत ना याची तुमच्या डॉ कडून खात्री करा. त्यांच्या सल्ल्यानेच अन्य उपचार घ्या.
शुभेच्छा व धन्यवाद !
Becosules खाल्ल्यावर लघवी
Becosules खाल्ल्यावर लघवी जर्द पिवळी होते ती त्यातील ब-१ मुळेच का?
साद,
साद,
नाही, पिवळा रंग 'ब-२' (riboflavin) मुळे येतो.
धन्यवाद डाॅक्टर. पुढच्या
धन्यवाद डाॅक्टर. पुढच्या डाॅक्टरभेटीत या शंका विचारेन त्यांना.
हायपोथायराॅईड अवस्था हे थकायचे कारण आहेच. >> हो. ते आहेच.
माझे रिपोर्टस् गेली साडेचार वर्षे नाॅर्मलच आहेत. दर सहा महिन्यांनी चेक करते. 50 mg ची गोळी पहिल्यापासुन चालू आहे.
धन्यवाद डॉक्टर. एक प्रश्नः
धन्यवाद डॉक्टर. एक प्रश्नः तुमच्या बर्याचश्या लेखात मांसाहारात (मांस, अंडी, मासे) बरेचसे पौष्टीक अन्नघटक असतात असं जाणवतं. एक सोयिस्कर निष्कर्ष म्हणून, रेग्युलर मांसाहार केल्यास, बरीचसी पोषणमुल्यं सहजरीत्या मिळतील असं म्हणता येईल का?
फे फ,
फे फ,
तुमच्या प्रश्नाचे उत्तर होय असे आहे.
पण, शाकाहारीनी गांगरून जाऊ नये.
वनस्पती +दूध + अंडे अशी आहारशैलीही पुरेशी पोषक आहे.
अजूनही काही लोक अंडी मांसाहार
अजूनही काही लोक अंडी मांसाहार समजतात त्यामुळे त्यांना फक्त भाजी + दूध हाच पर्याय आहे.
सुंदर लेख डॉक्टर !
डॉक्टर, माहिती बद्दल अनेक
डॉक्टर, माहिती बद्दल अनेक आभार.
पु भा प्र
च्रप्स, सहमत.
च्रप्स, सहमत.
चर्चेत सहभागी सर्वांचे आभार.
"फे फ,
"फे फ,
तुमच्या प्रश्नाचे उत्तर होय असे आहे." - धन्यवाद!
हाही लेख छान.
हाही लेख छान.
पुन्हा एकदा वरील सर्वांचे
पुन्हा एकदा वरील सर्वांचे आभार.
यापुढचा लेख ( ब-१२) इथे:
https://www.maayboli.com/node/68838
तुमचे बहुमोल योगदान आहे
तुमचे बहुमोल योगदान आहे मायबोलीकरांच्या आरोग्यासाठी. लेखही समजायला सोपे कुठेही पाल्हाळ नाही तरी रंजक आणि माहितीपूर्ण ... तुमचे शंकानिरसनाचे तत्पर प्रतिसाद आदर निर्माण करतात तुमच्याविषयी...>>>>+1000
जाई, धन्यवाद.
जाई, धन्यवाद.
तुम्ही दाखवत असलेल्या आपुलकीमुळेच लेखनाचा हुरूप वाढतो.
सुरेख
सुरेख
खाण्यत काय काय असणे गरजेचे आहे हे आपल्या लेखामुळे कळायला सोपे जातेय. धन्यवाद __/\__