जहाँ चार यार मिल जायें (गटग वृत्तांत-जाने. २०१९)

Submitted by हरिहर. on 16 January, 2019 - 06:41

इष्ट मित्र स्वजन सखे, ही तो सुखाची मांडणी (गटग वृत्तांत-२०१८)

दिवाळी गटगच्या समारोपातच जानेवारी गटगची नांदी वाजली होती. पण नांदी वाजल्यानंतर प्रत्यक्षात गटगचा पडदा वर जाण्यासाठी बराचसा अवकाश होता. तो गरजेचाही होता. कारण यावेळचे गटग जरा ‘संस्मरणीय’ करायचे असे मी ठरवले होते. बरेचदा ज्यांना सहजशक्य असते असेच सदस्य हजर रहातात त्यामुळे अनेकांच्या भेटी राहुन जातात. यावेळी शक्य तितक्या सदस्यांनी हजर रहावे असे ठरवले होते. औरंगाबाद, नागपुर, नगर, पुणे व मुंबई तसेच गोवा येथुन अनेकजण येणार असल्याने माझे गावाकडील शेत हे सगळ्या सदस्यांसाठी योग्य मध्यवर्ती ठिकाण होते.

नियोजनाची सुरवात अर्थातच तारीख नक्की करण्यापासुन आणि येणाऱ्या सदस्यांची यादी तयार करण्यापासुन झाली.
जितके जास्त सदस्य तितका सोहळा आनंदाचा होणार हे जरी खरं असलं तरी प्रत्यक्षात नियोजन सुरु झाल्यावर जितके जास्त सदस्य, तितका जास्त गोंधळ हे लक्षात यायला लागले, आणि मी सगळ्यात पहिले काम केले ते म्हणजे गटग होईपर्यंत व्हाटसअॅपचा ग्रुप सोडने. (प्रत्यक्ष भेटीत अगदी सौजन्याचा पुतळा असलेला एक एक सदस्य ग्रुपवर मात्र अगदी 'अवली नग’ होऊन छळतो हो खुप.) आमच्या ग्रुपमधे ३५+ असलेल्या सदस्यांची संख्या जास्त आहे पण ते नावाला. प्रत्यक्षात नियोजन सुरु झाले तेंव्हा लहान मुले परवडली असा गोंधळ ग्रुपवर सुरु झाला. या गोंधळाला काहीही शेंडा नव्हता ना बुडखा. सकाळी एखादे गाणे कानी पडावे आणि दिवसभर तेच ओठी येत रहावे तसे ग्रुपवर रोज गटगसंदर्भात एखादा विषय निघायचा आणि दिवसभर त्यावरच तारे तोडले जायचे. तारखेचा विषय निघाला की दिवसभर ‘तारीख पे तारीख’ चालायचे. मेन्यूचा विषय निघाला की प्लम केक पासुन सारणाच्या पुऱ्यांपर्यंत काहीही सुचवले जायचे. येणाऱ्या सदस्यांची संख्या तर वादळात सापडलेल्या नौकेसारखी कधी उंच लाटेवर असायची नाहीतर एकदम गर्तेत. कधी एकदम तिस तर कधी दहा. या सगळ्या चर्चा ऐकुन माझे व बायकोचे नियोजन दिवसाला दहावेळा बदलायचे. शेवटी मला शहानपणा सुचला आणि प्रथम मी ग्रुप लेफ्टला. अर्थात ग्रुप सोडायच्या अगोदर मी माझे पुन्हा एकदा बारसे करुन घ्यायला विसरलो नाही. पासवर्डच्या काही गोंधळामुळे मी मायबोलीवर बायकोचा आयडी वापरुन लिहायला सुरवात केली आणि नकळत तेच कंटीन्यु झाले. पण त्यामुळे मला कायमचे बायकोचे ‘शाली’ हे नाव चिकटले. (अर्थात त्यात आनंदच आहे.) आता सगळ्या ग्रुपने जर मला सासुबाईंपुढे बायकोच्या नावाने हाक मारायला सुरवात केली असती तर परत सासुरवाडीला जायची सोय राहीली नसती. एका गटगसाठी ही जरा जास्तच किंमत झाली असती. तर असो. यजमानानेच ग्रुप सोडला म्हटल्यावर आता गटगची नौका बुडते की काय या भितीने ग्रुपवर गोंधळ झाला असेल पण तो माझ्या कानावर काही आला नाही. आता मला साधनाताई आणि जागुताई या दोघींकडुनच ग्रुपचे अपडेटस् मिळणार होते. त्यामूळे एक झाले, माझ्या डोक्यातली कलकल थांबुन मला गटगवर जास्त लक्ष केंद्रित करता यायला लागले. (हे गटग म्हणजे पाणीपतची मोहीम होती आणि माझा खऱ्या अर्थाने भाऊसाहेब झाला होता.)

यावेळचे गटग दोन दिवसांचे असल्याने अर्थातच शनिवार-रविवार हे दिवस नक्की ठरले. माझी इच्छा होती की दिवस थोडे पुढे मागे झाले तरी चालतील पण गटग हे पौर्णिमेलाच व्हायला हवे. पौर्णीमेचे टिपुर चांदणे, मस्त थंडी, शेकोटी आणि सगळे मित्र. आणि तसा योग जुळूनही आला. डिसेंबरची पौर्णिमा ही शनिवार-रविवारीच येत होती. गटगचा दिवस इतका सहजासहजी आणि पहिल्याच प्रयत्नात ठरतोय हे पाहुन मला शुभशकुन झाल्या सारखेच वाटले. पण गटगची तारीख इतकी सहजासहजी ठरली तर मग काय पहायचे! एक तारीख ही दोनदा ठरवून तिनदा रद्द झाली नाही तर फाऊल होतो असा एक अलिखित नियमच समस्त सदस्यांमध्ये आहे. त्याला अनुसरुन एका मेंबरने आठवण करुन दिली की या पौर्णिमेला ‘दत्तजयंती’ आहे. मग कुणाला ‘उपवास’ आठवला, कुणाला यात्रा आठवली तर मला स्वतःला “दत्तजयंतीचे गावाकडील नियोजन माझ्याकडे असते” हे आठवले व ती तारीख रद्द झाली आणि गटगतला पहिला फाऊल होता होता वाचला. शेवटी साधनाताईने जानेवारी ५-६, जानेवारी २६-२७ व फेब्रुवारी २-३ अशा तारखा ग्रुपवर टाकुन पोलींग करायला सांगितले. पण सकारात्मक मतांऐवजी नकारात्मक मतांनी मतदानाला सुरवात झाली. (बहुतेक ग्रुपमेंबर मुंबईकर आहेत म्हणून बरं नाहीतर आम्हा पुणेकरांवर घसरले असते.) ५-६ तारखेला जिप्सीची ऑफिस टुर होती. “मला जमणार नाही” हे त्याने सांगुन टाकले. २६-२७ ला त्याला यायला जमणार होते पण “थंडी नसेल तर काय मजा” म्हणत निरुंनी निरुत्साह दाखवत नाराजी नोंदवली व त्या तारखाही रद्द केल्या. मुलीची परिक्षा असल्याने सायुने सगळ्याच तारखांना येवू शकत नाही हे अगोदरच कबुल करुन टाकले. शशांक पुरंदरे आणि शांकली यांना घरी थोडी अडचण होती त्यामुळे ते कुंपणावर होते. ते दोन दिवस अगोदर सांगणार होते. टीनाचा मला स्वतःलाच विश्वास वाटत नव्हता. तीचे नेहमी कसले ना कसले क्लासेस असायचे. याच तारखेला आरतीलाही तिच्या शेतात काही महत्वाचे काम निघाले. मग मात्र मला ग्रुपचा राग यायला लागला. प्रत्येकानेच काहीतरी गैरसोय सहन केल्याशिवाय गटग कसे पार पडायचे? अर्थात ग्रुपवर नसल्याने माझा सगळा राग साधना आणि जागुताईकडेच व्यक्त व्हायला लागला. दोघिंनीही खुप समजुन घेतले, समजुत काढली. साधनाताईतर म्हणाली की “कुणी नाही आले तरी मी आणि निरु येणारच, पण तू रागाऊ नकोस” (मनात म्हणालो, फक्त तुम्ही दोघेच आले तर श्रावणबाळासारखे तुम्हा दोघांना कावडीत बसवून शेत दाखवू का माझे? पण प्रेमापोटी म्हणाल्यामुळे असो..) मग यावर ऊपाय म्हणून मी एक ‘हिवाळी’ गटग करुयात व एप्रिलमधे एक ‘उन्हाळी’ गटग करुयात अशी कल्पना मांडली. पण यालाही सगळ्यांचाच विरोध होता. सगळ्यांनाच एकामेकांना भेटायची अनिवार इच्छा होती, ते ही एकाच गटगमध्ये. शेवटी हो-नाही करता करता ५ आणि ६ तारीख नक्की झाली आणि याच आठवड्यात आमच्या गावी दहा वर्षात पडली नाही अशी विक्रमी थंडीही पडली. (आपण काय नियोजन करतो आणि प्रत्यक्षात होते काय. मी पौर्णीमेचे चांदणे पहात होतो आणि सगळ्यांनी अगदी पंचाग पाहुन ठरवावे तशी गटगसाठी अमावश्या ठरवली होती. आले ग्रुपच्या मना तेथे कुणाचे चालेना.)

मी अगदीच ग्रुपपासुन अलिप्त रहायला नको यासाठी जागुताईने टेलेग्रामवर दुसरा समांतर ग्रुप सुरु केला आणि मला ‘येणाऱ्या सदस्यांची’ पहिली यादी मिळाली. मी यादी वाचायला घेतली आणि मला एकदम दडपणच आले. काही मित्रांनी एकत्र येवून छानसे गटग करणे वेगळे. येथे सगळेच सगळ्यांच्या भेटीच्या ओढीने येत होते त्यामुळे ‘गटग सदस्य संख्या’ एकदम ३५ च्या आसपास गेली होती. ती यादी पाहुन माझा चांगलाच गोंधळ व्हायला सुरवात झाली. अगदी उर दडपले म्हटले तरी चालेल. येणारे ३५ सदस्य+माझे मित्र व घरचे मिळून १० जण असा ४५ पर्यंत आकडा गेला. गावाकडे बायकोचे ३ बेडरुमचे बंगलेवजा घर असले तरी ते एका ‘शेतकऱ्याचे’ घर आहे. ज्यात दोन्ही टेरेसवर, घरात, अंगणात एवढेच काय, पोर्चमधे देखील शेतीचे सर्व साहित्य पडलेले असते. त्यात ४-५ डिग्रिच्या आसपास थंडी पडलेली. आजुबाजुच्या सगळ्याच शेतीत पाणी भरलेले. शेताच्या मागुनच नदी वहात गेलेली त्यामुळे थंडी जास्तच बोचरी झालेली. बरं आमच्या फार्महाऊसचे रुपांतर रिसॉर्टमधे करायचे काम सुरु असल्याने तेथे अगोदरच सिमेंट, विटा, इतर साहित्य आणि कामगार यांचे जोरदार गटग रंगात आलेले. या सगळ्यात आता ४५ व्यक्तिंची झोपण्याची कशी सोय करायची? (माझ्या डोळ्यासमोर आमच्या नुकत्याच रिकाम्या झालेल्या कांद्यांच्या बराखी तरळून गेल्या पण तेथेही नुकताच घेतलेला ट्रॅक्टर पार्क होता.) अंथरुने-पांघरुने कुठून आणायची? बरं, या ४५ जणांमधे ८-१० लहान मुलंही होती. यापैकी कुणालाच आमच्या भागातील थंडीचा थोडाही अंदाज नव्हता. त्यांना हिरव्यागार शेताचे सौंदर्य माहित होते पण हिरव्याकच्च शेतीतल्या थंडीची कल्पना करता येईना. त्यामुळे त्याचे गांभीर्यही कळेना. शेवटी काही गोष्टी स्पष्ट सांगितलेल्याच चांगल्या हे लक्षात घेवून मी साधनाताईला ‘प्रत्येकाने येताना ब्लॅंकेटस, भरपुर गरम कपडे व गाद्या बसमधे टाकुन आणाव्यात’ हे सुचवले. सुचवले म्हणन्यापेक्षा ‘आणलेच’ पाहीजे अशी सुचनाच केली. यामुळे माझ्या मनावरचे एक फार मोठे दडपण दुर झाले. तसेही पंधरा दिवस केलेले नियोजन, मनावर घेतलेला ताण व जागु-साधनातैने दिलेला धिर यामुळे मी आश्वस्त झालो होतो. आता कुठे थोडी फार गम्मत सुचत होती, मिश्किल स्वभाव पुन्हा जागा झाला होता. मी अधुन मधून एखादी पोस्ट ग्रुपवर टाकुन त्यांची थोडी गम्मतही करायला सुरवात केली होती. कधी माझ्या शेतात उमटलेले बिबट्याच्या पावलांच्या ठशांचा फोटो पाठव, तर कधी त्यादिवशी असलेल्या थंडीचा स्क्रिनशॉट पाठव. या दरम्यान दोन तिन वेळा बिबट्या आमच्या अंगणात येवून गेला होता. जाताना त्याने शेजारच्या घरातले पाळलेले कुत्रे नेले होते. त्या बातमीचा स्क्रिनशॉट पाठव असे उद्योग मी अधुन मधून करत होतो. "झाले काही सदस्य कमी तर झाले" असा एक सुप्त हेतुही त्यामागे होताच. अर्थात सदस्यांच्याच काळजीने. पण त्यामुळे पलकच्या घरच्यांनी मात्र तिला जायला विरोध केला आणि तिला मात्र गटगला येता आले नाही. एकुन बाहेरची थंडी रोज वाढत होती आणि इकडे आमच्या गटगच्या गप्पांमधली उबही वाढत होती. उत्साह ओसंडत होता.

गटगचा मेन्यु हा सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय असतो नेहमी पण मी या वेळी मेन्यू चर्चेला घेतला नव्हता. तेवढं शहानपण एव्हाना मला आलं होतं. स्थानिक पदार्थच करायचे हे नक्की केले होते. मी कुणाकडूनही काहीही सुचना मागवल्या नव्हत्या की कुणाची आवडनिवड विचारली नव्हती. कारण ती विचारली असती तर मला छप्पन भोग थाळीच तयार करावी लागली असती हे नक्की. मासवडी, झणझणीत रस्सा, भरले वांगे, बाजरीची भाकरी आणि आमच्या भागातला खास इंद्रायणीचा वाफाळता भात. सोबत दही-कांदा, लिंबू, लोणचे, पापड, सांडगे इत्यादी होतेच. भर थंडीत या सारखा दुसरा मेन्यु नाही. बऱ्यााच जणांनी मासवडीविषयी फक्त ऐकले होते. काहीजणांनी कुठल्याशा खाद्यमहोत्सवात मासवडीच्या नावाखाली मिळणारा बेचव पदार्थ खाल्ला होता त्यामुळे सगळ्यांनाच ऑथेंटिक मासवडी खाण्याची इच्छा होती. मेन्युवर चर्चा करायची नाही हे ठरले होते तरी जागुताईबरोबर चर्चा होत होती. तिने मधेच सुचवले की संध्याकाळचे जेवण जर लवकर उरकले तर रात्री १२:०० च्या आसपास सगळे ‘पोपटी' खावू शकतील. तशीही थंडीच्या दिवसात भुक लवकर लागते आणि शेकोटीही पेटती रहाणारच आहे. त्यामुळे मेन्युमधे ‘पोपटी’चाही समावेश झाला. घाटावरची मासवडी आणि घाटाखालची पोपटी यांचा छान योग जुळून येणार होता. साधारणपणे गटगला सगळे सोबत जातात पण यावेळी कुठून कुठून सदस्य येणार होते. मलाही या सगळ्याचे नियोजन पुण्यात राहुन करावे लागत होते त्यामुळे थोडा गोंधळ होणे स्वाभाविक होते. (पाणीपतची मोहीम हो. लढाई यमुनेकाठी आणि तयारी मुळे-मुठेकाठी) पण साधनाताईने अगोदरच सांगितले होते की “तुम्ही काही यजमान नाही आणि आम्ही पाहुणे नाही. सगळे मिळून साजरा करु गटग. तू टेन्शन घेवू नकोस.” त्यामुळे माझी बरीचशी चिंता कमी झाली होती. तरीही एक चिंता होतीच. काही किलोमिटरवर जशी भाषा बदलते, पाककृती बदलतात तशाच काही मान्यताही बदलतात. त्याप्रमाणेच आमच्या भागातल्या मान्यतेप्रमाणे स्वतःच्या हाताने रांधले नाही आणि पंगतीत वाढले नाही तर त्याला पाहुणचार म्हणत नाही. आता हे सगळे एकत्र पंगतीत कसे बसवायचे हे एक अवघड कामच होते. शेवटी मी ग्रुपवरच सगळा भार घातला आणि निश्चिंत झालो.

सगळे “काळजी करु नको” म्हणत असले तरी मला 'आपल्या घरी पहिल्यांदाच येणाऱ्यांची' काळजी वाटत होती. महिनाभर त्याचाच विचार करुन, अनेक अडचणींच्या नुसत्या विचाराने डोके सैरभर झाले होते. त्यामुळे प्रत्यक्षात पाच तारीख उजाडली तेंव्हा मात्र मनाला अगदी वैराग्य प्राप्त झालं होतं. वृत्ती सन्यस्त झाली होती. आता गाडी काढून गटगसाठी गावी जायचे काय आणि “अल्लखऽऽ” करुन हिमालयात जायचे काय, दोन्ही मला सारखेच वाटत होते. माझा रोजचा लहान मुलापेक्षा जास्त असलेला गोंधळ पहायची सवय असलेली बायको माझा हा शांत अवतार पाहुन जरा धास्तावलीच. एक टिशर्ट, एक जिन्स आणि छोटी टॉयलेटरी बॅग एवढीच माझी तयारी पाहून आता ही माझ्या कपाळाला हात लावून ताप वगैरे पहाते की काय असं वाटले. कारण एक दिवसासाठी जरी कुठे जायचे असले तरी माझी तयारी म्हणजे एक प्रकरणच असते. तिकडे दुर्लक्ष करुन मी पार्कींगला जाऊन तिची निर्विकारपणे वाट पहात थांबलो. पंधरा मिनीटात ती बॅग्ज घेऊन खाली आली आणि त्याचवेळी वॉचमनने गाडीसाठी उघडलेल्या गेटमधुन आमची भाजीवाली आत आली. मला पेरुची कोशिंबिर आवडते म्हणून तिने टोपलीतुन आणलेले पिवळे धम्मक पेरु बायकोकडे देत विचारले “कुठं असं विचारु नये म्हणून नाही विचारत, पण उगाच कशाला अवसेला बाहेर पडता ताई? त्यात शनीअमुशा आहे.”
मी मनात म्हटलं “चला गटगला सुरवात झाली म्हणायची”

आणि खरेच या शनीने सगळ्या प्रवासात त्रास दिला. घरातुन बाहेर पडलो व काही किलोमिटरवरच लक्षात आले की लॅपटॉपची बॅग घरीच राहीली आहे. तसा एक लॅपटॉप नेहमी सोबत असतोच पण बॅगमधे असलेल्या केबल्स, चार्जर, बॅटरीज, पेनड्राईव्ह सगळे घरीच राहीले. म्हणजे आता फोटो, व्हिडीओ काही काढता येणार नव्हते. मग काही वेळाने बायकोला विचारले “निदान सगळ्यांसाठी नविन वर्षांसाठी घेतलेल्या डायरीज घेतल्यात का?” तर उत्तर म्हणून बायकोने प्लेयरवर सुरु असलेला ‘जसराज’ बदलुन ‘नुसरत’ लावला. मी काय समजायचे ते समजलो. एव्हाना जरा भुकही लागायला लागली होती म्हणून “पेरु तरी दे एखादा” म्हणालो तर पेरु सिटवर ठेवल्यानंतर नकळत तिने तिची बॅग त्यावरच ठेवली होती आणि पेरुची कोशिंबिर झाली होती. मग विचार केला “हरकत नाही, या भागातले माझे आवडते हॉटेल जवळच आहे मिसळचे, तेथे जावूयात” पंधरा मिनिटांनी मी हॉटेलसमोरुन “काही कारणामुळे हॉटेल दोन दिवस बंद आहे” असा बंद दारावर चिटकवलेल्या कागदाचे दर्शन घेऊन गाडी गावाच्या दिशेने वळवली. एवढ्यात ग्रुपवरचा पहिला फोटो अवतरला. जिप्सीने आणलेल्या इडली चटणीचा बसमधे सगळे जण आस्वाद घेत होते. त्या फोटोला “वाह!” अशी कॉमेंट लिहुन ‘यम्’ची स्मायली टाकली. प्रत्येकवेळी खरा प्रतिसाद नाही देता येत हो. उपाशी पोटी आवडत्या पदार्थाच्या फोटोला लाईक देणे म्हणजे काय त्रास असतो ते एक उपाशीच जाणे. आजोबा म्हणायचेच “भुका निकले-फाका मिले, खाके निकले-बांके मिले” ते आता पुरेपुर पटले होते. आता घर गाठण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे जरा सवय मोडून स्पिड वाढवला आणि काही मिनिटातच लक्षात आले की काही तरी गडबड आहे. मग पुन्हा गाडी बाजुला घे, जॅक काढ, स्टेपनी काढ वगैरे सोपस्कार सुरु झाले. ग्रुपवर ‘उशिर होईल’ हे सांगण्याऐवजी बायकोने ‘धुळीत मांडी घालुन टायर बदलणाऱ्या नवऱ्याचा’ अगदी योग्य अँगलने फोटो काढुन ग्रुपवर टाकला आणि फार मोठे काम केल्याच्या आविर्भावात मस्त सावलीला उस खात बसली. आज शनी अमावस्या होती पण शनीऐवजी माझ्याच डोक्यावर तेल थापायची वेळ आली होती.
(गटगचा वृत्तांत लिहितोय हेच विसरलो. अशा गोष्टी कुठे सांगायच्या असतात का? त्यामुळे असो. आता छान छान सांगतो फक्त.)

आम्ही गावी पोहचलो, तेथुन कोदंडपाणीला सोबत घेतले व प्रथम बायकोला तिच्या माहेरी सोडवले. खरं तर टीनाला मी खुप फोन करुन पाहीले पण तिने ऐनवेळी नकारच दिला, नाहीतर बायकोला तिची खुप मदत झाली असती. कारण पहिल्या दिवशी सगळे तिच्याच शेतात जमणार होते. मुक्कामही तेथेच करायचे ठरले होते. स्वागताची थोडी फार तयारी तिलाच करावी लागणार होती. एवढ्यात सामीचाही मेसेज आला की ती येणार नाहीए. अधुन मधून बस कोठवर पोहचली याची चौकशी करत होतो. अर्थात दिलेल्या वेळेत कुणी येणार नाही याची खात्रीच होती. कारण माणूस एकदा माळशेज परिसरात रमला की मग वेळेचे फारसे भान रहात नाही. मी फोन केला तेंव्हा हे सगळे माळशेज पॉईंटला भरपुर वेळ घालवून आता पिंपळगाव जोगाच्या बॅकवॉटरमधे उतरुन मस्ती करत असल्याचे समजले.

1xgtg.JPG
माळशेज पॉईंट (फोटो: जिप्सी)

2xgtg.JPG
पिंपळगाव जोगा बॅकवॉटर-१ (फोटो: जिप्सी)

3xgtg.JPG
पिंपळगाव जोगा बॅकवॉटर-२ बच्चेकंपनीची जपुन मस्ती. (फोटो: जिप्सी)

मी किरकोळ गोष्टींची यादी काढली तर बऱ्याच गोष्टी निघाल्या. मग गाडी पुन्हा माझ्या गावाकडे वळवली आणि प्रथम वस्तू गोळा करायला सुरवात केली. सगळे बसू शकतील अशी मोठी सतरंजी गाडीत टाकली, दुधाची व्यवस्था केली, कॉफी, चॉकलेटस्, सनीसाठी (घरचा कुत्रा) बिस्किटस, आणि सगळ्यांना दुसऱ्या दिवशी द्यायच्या ‘वानवळ्या’चा बंदोबस्त केला. बिचाऱ्या कोदंडपाणीची मात्र खुपच धावपळ होत होती. इतक्यात ग्रुपवर डॉ. पटवर्धनांचा मेसेज आला “आम्ही डेस्टिनेशन पासुन फक्त १५ किलोमिटर दुर आहोत” म्हणजे ते आता माझ्या जवळपासच असणार याचा अंदाज आला. त्यांना फोन केला तर ते माझ्यापासुन हाकेच्या अंतरावरच होते. त्यांना तेथेच थांबायला सांगुन मी 'बाकीची तयारी नंतर करु' म्हणत त्यांना रिसिव्ह करायला गेलो. त्यांना मी पाहीले नव्हते त्यामुळे उत्सुकता होतीच. त्यांना भेटलो आणि आश्चर्य वाटले. फक्त मित्रांच्या भेटीच्या ओढीने हे डॉक्टर दांपत्य स्वतः ड्राईव्ह करत औरंगाबादवरुन आले होते. तेही अगदी वेळेवर. डॉक्टरांच्या ड्रायव्हींगचे कौतुकच वाटले. त्यांना कारमागे यायला सांगुन मी निघालो. पंधरा मिनिटात आम्ही घरी पोहचलो. डॉक्टरांनी कार पार्क केली आणि घराच्या अंगणात आले. दोघांचेही चेहरे इतके प्रफुल्लीत दिसले की मी विचारायच्या अगोदरच मानसीताई म्हणाल्या “अहो स्वर्ग आहे हो हा. हिरवी शेते पाहुन अगदी डोळे निवले आमचे.” मी हसुन डॉक्टरांकडे पाहीले तर ते सगळी औपचारीकता विसरुन अंगणातल्या गुलाबांचे, तुळशीवृंदावनाचे फोटो काढत होते. त्यांना पायावर घ्यायला पाणी देवून मी आणि कोदंडपाणी पुन्हा निघालो. कारण साडेचार वाजले होते आणि पोपटीची अजुन काहीच तयारी झाली नव्हती. जेवणानंतर काहीतरी गोड हवे म्हणून 'कुंदा' करायला सांगितला होता मित्राला तोही अजुन आणला नव्हता. पुनश्च गावाकडे निघालो. अजुन किती फेऱ्या माराव्या लागणार होत्या कुणास ठाऊक!

आम्ही पोपटीसाठी लहान माठ (मडकी) घेतले चार पाच. मामाच्या शेतात ज्या ताज्या भाज्या दिसल्या त्या तोडुन घेतल्या. एसटी स्टँडवरच्या नेहमीच्या मुलाण्याला गावठी कोंबड्या साफ करायला सांगितल्या होत्या, त्याच्या दुकानासमोर गाडी लावली आणि खाली उतरलो इतक्यात साधनाताईचा फोन आला की ते एसटी स्टँडवर पोहचले आहेत. म्हणजे आता थांबायला वेळ नव्हता. त्याने एकच कोंबडी साफ केली होती तेवढीच घेतली व पुन्हा गाडी वळवत स्टँडवर पोहचलो.

सगळ्यांना पाहुन समजेनाच की हे प्रवासाला निघालेत की प्रवास करुन आलेत? ही सगळी मंडळी सकाळी मुंबईवरुन निघुन, माळशेज घाटात मनसोक्त मस्ती करुन, पिंपळगावच्या बॅकवॉटरमधे हुंदडून मग येथे आली होती, शिवाय ८-१० मुलांचा अवखळ कळप सांभाळत आली होती, पण कुणाच्याही चेहऱ्यावर प्रवासाचा शिण दिसत नव्हता. मग पुन्हा बसड्रायव्हरला मागे यायला सांगुन गाडी घराकडे वळवली. आता काहीही काम असले तरी पुन्हा गावाकडे यायचे नाही असं ठरवलं. तेवढी एनर्जीही एव्हाना राहीली नव्हती.

सगळे घरी पोहचलो. बसड्रायव्हरने घराशेजारीच बस लावली. एक एक करत सगळे उतरले. चेहरे प्रसन्न. हायवे सोडुन आत वळाल्यावर त्यांना हिरवा रंग सोडुन दुसरा रंगच दिसला नसावा फारसा. तिच हिरवाई आता प्रत्येकाच्या डोळ्यात दिसत होती. सगळ्यांना पाहुन खुप बरे वाटले. महिनाभर ज्यांच्या भेटीची आतुरतेने वाट पहात होतो ते सगळे आता हसतमुखाने माझ्या अंगणात उभे होते. सगळ्यांनी बॅग्ज ठेवल्या, पायावर पाणी घेतले आणि कुणी सोफ्यावर तर कुणी खुर्चीवर विसावले. प्रवास कसा झाला? सारखे औपचारीक प्रश्न विचारावेच वाटले नाहीत. मुलं तर अजुन अंगणातच होती. त्यांनी क्षणातच सनी बरोबर गट्टी जमवली होती त्यामुळे त्यांची काही घरात यायची तयारी दिसेना. हास्यविनोदाला खंड नव्हताच. सगळे जरा विसावले. चहा-पाणी झाले पण कुणाचे सोफ्यावरुन हलण्याचे काही लक्षण दिसेना. पुर्वाभीमुख असलेल्या घराच्या मागच्या शेतात सुर्यनारायण अस्ताचलाला निघाला होता आणि आज येथे एकच मुक्काम असल्याने हे दृष्य कुणी चुकवावे असे मला वाटेना. त्यामुळे एक दोघांना बाहेर काढले. बाकीचे आपोआप मागोमाग आले. घर शेतातच असल्याने दुर जायचेच नव्हते. सगळ्या रानात यावेळी कांदा केला असल्याने मधल्या पाण्याच्या पाटाने सगळेजन शेतात निघाले. समोरच सुर्य डोंगराच्या माथ्यावर टेकायला आला होता. पाटाच्या पाण्यातुन व्यवस्थित चालता येत असल्याने नकळत सगळे एका रांगेत निघाले होते. दुरुन पहाताना 'पताका नसलेली मित्रवेड्या निसर्गप्रेमींची दिंडीच' चालल्यासारखे वाटत होते.

6xgtg.jpeg
"दिंडी चालली..." (फोटो: शाली)

4xgtg.jpeg
घरापासुन डोंगराच्या पायथ्यापर्यंत पसरलेले हिरवेगार शेत. मधे पाटाच्या कडेला घरच्यापुरता लावलेला गहू. (फोटो: शाली)

5xgtg.jpeg
माझे माहेर आणि सासर एकच असल्याने, शेतातुन दिसणारे 'आमच्या दोघांचे' गाव. (फोटो: शाली)

आकाशाच्या निळाईच्या पार्श्वभुमीवर निळसर पिवळे डोंगर आणि डोंगरांच्या पार्श्वभुमीवर पसरलेले समतल हिरवेगार शेत. समोरच क्षितिजावर जमा व्हायला लागलेली लाली आणि हवेत किंचीत गारवा. एकुन सगळ्यांच्या चित्तवृत्ती बहरल्या होत्या. मुलांनीच काय त्यांच्या पालकांनीही बहुतेक प्रथमच असे शेत पाहीले असावे. प्रत्येकाचा मोबाईल हातात होता. कशा कशाचे फोटो काढु असे सर्वांनाच झाले होते. गप्पांना, शाब्दीक कोट्यांना तर ऊत आला होता. इतक्या शुध्द हवेचा फारच कमी अनुभव असावा बहुतेकांना. ध्वनीप्रदुषण तर शुन्यच होते. कुठेही गाड्यांच्या हॉर्नचा, मानसांच्या गोंधळाचा किंवा इतर कुठलाही कृत्रीम आवाज कानावर येत नव्हता. ‘सांज ये गोकुळी, सावळी सावळी' गाण्यातले वातावरण प्रत्यक्ष अनुभवत होते सगळे. सगळ्यांचेच “हे काय आहे?” “ते काय आहे?” सुरु होते. काही गमती जमतीही होत होत्या. मधेच कुणीतरी गव्हाची ओंबी पाहुन हे काय आहे ? असं विचारुन मला धक्का दिला आणि त्यातुन सावरायच्या आत कुणी तरी “अगं ते गव्हाचे झाड आहे” म्हणून दुसरा धक्का दिला. हे कमी म्हणून की काय मागुन नितिनने मजेने “अगं तो गव्हाचा वृक्ष आहे” म्हणून अगदी कळस केला. मधेच कुणी तरी बिबट्याचाही विषय काढून जरा गम्मत केली.

7-2xgtg.jpeg
टच्च भरलेल्या गव्हाच्या ओंब्या. (फोटो: शाली)

एकुन लहान मुलंच काय तर सगळे मोठे सुध्दा लहान होऊन शेतातल्या शेंदरी संध्याकाळचा आनंद मनमुराद अनुभवत होते.

IMG_4620 2.jpeg
(फोटो: शाली)

सुर्य मावळला आणि आम्ही शेताच्या अगदी शेवटच्या टोकाला पोहचलो. तेथे शेत संपते आणि नदी सुरु होते. पण बंधारा बांधल्याने नदीला पाणी अगदीच नावाला आहे. आणि शेताच्या पातळीपासुन नदी बरीच खालच्या पातळीवर वहाते. लहान दरीतुन वाहील्यासारखी. त्यामुळे मुलांवर जरा जास्त लक्ष ठेवावे लागत होते. शेताच्या शेवटच्या भागात पुढच्या कांद्याच्या पिकासाठी बियाणे हवे म्हणून थोडा कांदा केला होता. तो छान फुलोऱ्यावर आला होता. मग त्याचे सविस्तर फोटोसेशन झाले. त्यांना डेंगळे म्हणतात हेही बऱ्याच जणांना माहीत नव्हतेच.

6xgtg.JPG
बियाणांसाठी ठेवलेला कांदा. (फोटो: जागुतै)

7-1xgtg.JPG
कांद्याचा डेंगळा. याच्यातुन कांद्याच्या बिया मिळतात. (फोटो: जागुतै)

7-0xgtg.jpeg
हा त्याचा क्लोजअप (फोटो: जिप्सी)

आता मात्र चांगलेच अंधारुन आले. मी शेवटी सगळ्यांना घराच्या दिशेने वळवले. पुन्हा एकदा सगळ्यांची दिंडी पाण्याच्या पाटाच्या मार्गाने घराकडे निघाली.

8xgtg 2.JPG
"सांज ये गोकुळी, सावळी सावळी" (फोटो: जिप्सी)

घरी परतलो तर अंगणातच डॉक्टर दांपत्य सासरेबुवांबरोबर गप्पा मारताना दिसले. मी त्या दोघांना घरी सोडुन पुन्हा गावात गेलो होतो त्या दरम्यान सासरेबुवांनी त्यांना सगळे शेत फिरवून दाखवले होते. ते तिघेच बराच वेळ एकत्र भटकल्याने त्यांची छान तार जुळल्याचे दिसत होते. मी आणि भैय्याने (कोदंडपाणी) चटकन अंगणात मोठी सतरंजी अंथरली आणि मग त्यावर सगळेच विसावले. गारवा वाढायला लागला होता. महिलामंडळ आता बच्चेकंपनीच्या मागे लागली होती. गप्प बसा रे! खाऊन घ्या रे! वगैरे सुरु झाले होते. बाहेर अंगणात मात्र आमच्या गप्पा सुरु झाल्या. गटग गप्पांशिवाय झालेय असं कुठे होतं का? आता याला उगाच गप्पा म्हणायचे, नाही तर ही एखादा विषय घेऊन झडलेली बौध्दीक चर्चाच असते. गप्पांचा विषय अर्थात शेतीभोवती फिरणार हे ओघानेच आले. माणसाने गरजा कमी कशा केल्या पाहिजेत, निसर्गाकडे कसे वळले पाहिजे यावर मग मतमतांतरे सुरु झाली. हातात आयफोन घेऊन मी मारे “मला तांत्रीक प्रगती नसली तरी चालेल, हवे तर पुन्हा नांगर बैल वापरुन शेती करु पण समाधान हवे” अशी मते मांडत होतो. तर कुणी आयटी इंजीनिअर मात्र “अगदीच इतकं निकरावर यायला नको. तांत्रिक प्रगती हवी पण तंत्रज्ञानाचा जरा डोळस आणि संयमीत वापर व्हावा” असा विचार मांडत होता. डॉक्टर तर अगदी मिश्किल होते. हास्योपचाराने पेशंट बरे करतात की काय अशी शंका यावी इतके. तोवर घरच्या मंडळींची जेवणाची तयारी झाली होती. आतुन सारखा बसुन घ्या, बसुन घ्या अशा सुचना यायला सुरवात झाली. मग तेथेच सतरंजीवर छान पंगत बसली. पण सगळ्यांचाच गोंधळ सुरु होता. कुणी बुफेसारखे हातात घेवून खावे या विचारात होते तर कुणी स्वतः वाढून घ्यायच्या तयारीत होते. या गोंधळाची मला पुर्वकल्पना होतीच त्यामुळे प्रत्येकाला व्यवस्थीत पंगतीत बसवून दोन जनांनी वाढायला घेतले. प्रत्यक्षात वाढताना लक्षात आले की दही-कांदा करण्यासाठी दही ऐनवेळी पोहचले पण ते चुकीच्या घरी गेले म्हणजे बायकोच्या काकांच्या घरी. दही नाही त्यामुळे ताक करायचेही राहीलेच. स्विट म्हणून आमच्या भागातला प्रसिध्द ‘कुंदा’ आणायचे भैय्याच्या लक्षात राहीले नव्हते. जेवणानंतर खायला पाने आणायची लक्षात राहीले नव्हते. पण आहे तो मेन्यच खुप असल्याने सगळ्यांची पंगत बसली. बरेचजण पहिल्यांदाच मासवडी खात असल्याने ‘कशी खायची’ येथुन सुरवात होती. पण चवदार पदार्थ असले की फारसे प्रश्न पडत नाही त्यामुळे छान हसत खेळत जेवणे सुरु झाली. भाकरी गरम होत्या, रस्सा जरा जास्तच झणझणीत होता, मासवडीत अगदी योग्य प्रमाणात लसुन पडला होता, तोही गावठी त्यामुळे वडीचाही छान झटका लागत होता, भरल्या वांग्यांचा मसाला अगदी वांग्याला लपेटुन प्रमाणात होता आणि या सगळ्यात भर म्हणजे छान थंडी पडली होती. बहुतेकांच्या हातात आता रुमाल दिसायला लागले होते. ते रुमाल आता नाक आणि डोळे असे क्रमाणे फिरत होते. याचा अर्थ मासवडी जमुन आली होती. निरुदांनी मात्र स्वभावाप्रमाणे ‘हे काय आहे? ते काय आहे?’ विचारत प्रत्येक पदार्थाला अगदी योग्य न्याय दिला. जेवणे उरकत आल्यावर इंद्रायणीच्या वासामागोमाग वाफाळता भात आला आणि उदरभरन यज्ञाचा उत्तरार्ध सुरु झाला. सगळे अगदी मनसोक्त जेवले. आवडते जेवण, तेही मनासारख्या वातावरणात, प्रिय मित्र-मैत्रीणींसोबत असल्यावर अजुन काय हवे असते माणसांना. याच साठी तर सगळा अट्टाहास असतो.

9-1xgtg.jpeg
या आकारामुळे मासवड्यांना 'मासवडी' हे नाव पडले. अनेकांना हा पदार्थ मांसाहारी असावा असे वाटते. पण हा पुर्ण शाकाहारी पदार्थ आहे. (फोटो: शाली)

9-2xgtg.jpeg
कापायला घेतलेल्या मासवड्या. काही अर्धवट कापल्या आहेत. (फोटो: शाली)

12xgtg_0.jpeg
हा अजुन एक मासवडीचा सुरेख क्लिक. (फोटो: जिप्सी)

10xgtg.jpeg
हा मासवडी सोबत खायचा झणझणीत रस्सा. हा रस्सा जर जमुन आला तर मटण रश्याच्या तोंडात मारतो. आमचा अगदी तसाच जमुन आला होता. (फोटो: शाली)

11xgtg.jpeg
फक्कड जमुन आलेले 'भरले वांगे'. आमच्याकडची बारीक आणि काटेरी असलेली वांगी छान चवदार असतात. अगदी कृष्णाकाठच्या वांग्यांइतकीच. (फोटो: शाली)

जेवणे उरकली आणि मग जे मागे जेवायचे राहीले होते, ज्यांनी वाढायचे काम केले होते त्यांची पंगत बसली. तोवर काहीजनांनी घराच्या शेजारी, जेथुन शेत सुरु होते तेथे शेकोटीसाठी जागा साफ करायला घेतली. थंडी आता वाढायला लागली होती. आम्ही अंगणात गप्पा मारत बसलो होतो तेंव्हा जागुताईने किचनमधे सगळा मसाला वाटुन तो भाज्यांना लावून ठेवला होता. मुंबईवरुन येतानाच रस्त्यात थांबुन सगळ्यांनी भरपुर भांबुर्ड्याचा पाला आणला होता तो बाहेर काढून ठेवला होता. ते सगळे साहित्य घेऊन जागुताई पोपटी लावायला बसली. अन्नपुर्णा अन्नपुर्णा म्हणत सगळ्यांनी बिचारीला चांगलेच कामाला लावले होते. जिप्सी मात्र तिला मदत करत होता. मी आणलेली कोंबडी जिप्सीने बाहेरच ठेवली होती. सासरेबुवा वारकरी असल्याने चिकन आत नेले नव्हते. त्यालाही जागुताईने व्यवस्थीत मॅरीनेट करुन ठेवले.

13xgtg.jpg
जागुताईने करुन ठेवलेली पोपटीची तयारी. जास्त फोटो होतील म्हणुन कोलाज टाकला आहे. (फोटो: शाली, जिप्सी)

तोवर रात्रीचे दहा वाजुन गेले होते. हॉलमधे जिथे जागा होती तिथे गाद्या घातल्या गेल्या आणि दमलेल्या बच्चेकंपनीला एकदाचे झोपवण्यात आले. तोवर बाहेर थंडीबरोबर शेकोटीही झकास पेटली होती. मग जे दमले ते गाद्यांकडे वळाले व ज्यांचा उत्साह अजुनही टिकून होता ते शेकोटीकडे वळाले. पोपटीची मडकी लावण्यात आली आणि शेकोटी आणखी धगधगीत केली गेली.

14-1xgtg.jpg
शेकोटीत लावलेली पोपटी. यातल्या फक्त एकात चिकन होते. आणि मडकी चांगली फिरवून लावली होती तरी सगळ्यांना माहित होते की चिकन कोणत्या मडक्यात आहे. (फोटो: शाली)

मग जो चावटपणा सुरु झाला की विचारु नका. अमावश्या असल्याने व प्रकाशाचे अजिबातच प्रदुषण नसल्याने चांदण्या जास्तच लखलखीत दिसत होत्या पण आकाशदर्शनाचा प्लॅन असुनही आता कुणी शेकोटी आणि गप्पा सोडून मान वर करायला तयार नव्हता. शेकोटीमुळे समोरुन जरी सगळे ‘तापले’ होते तरी पाठी मात्र अगदी गार पडल्या होत्या. मला ऐनवेळी एकच कोंबडी आणता आल्यामुळे सगळ्यांचे लक्ष गप्पा मारतानाही चिकन असलेल्या मडक्याकडेच होते. हवेत आता गारव्याबरोबरच भांबुर्ड्याच्या पाल्याचा मिरमिरीत वास आणि शेतावरुन येणारा पिकांचा वास पसरला होता. साधारण बाराच्या दरम्यान पराग यांनी (जागुताईंचे ‘हे’) एक एक मडके बाहेर काढले. मग स्टिलच्या ताटात पोपटी काढली गेली. वाटलेल्या नारळाच्या मसाल्याचा आणि भांबुर्ड्याच्या पाल्याचा एक मिरमिरीत फ्लेवर सगळ्या भाज्यांना, शेंगांना आणि चिकनला येत होता. दहा पंधरा मिनिटात पोपटी खावून मग हळू हळू शेकोटीभोवतीचा एक एक सदस्य कमी होत गेला. शेवटी मी, बायको, जागुताई आणि पराग येवढेच राहीलो. मग मात्र पाणी टाकुन शेकोटी पुर्ण विझवली आणि घरात आलो. ज्याला जेथे जागा मिळेल तो तिथे झोपला होता. वरच्या दोन्ही बेडमधे भरले थोडीही जागा नव्हती. शेवटी मी आणि जिप्सीने टेरेसमधे गाद्या टाकाल्या. इतक्या वर्षात पहिल्यांदा 'जावाईबापु' कुठे झोपले हे सासुरवाडीला समजले नाही. बाकीच्यांचे माहित नाही पण मी आणि जिप्सी न आलेल्या सदस्यांच्या आठवणी काढत दोन वाजेपर्यंत जागे होतो. नंतर कधी झोप लागली ते मात्र आठवत नाही.

रात्री जागुनही सकाळी जाग मात्र लवकर आली पण थंडीमुळे अंथरुनातून हलावेसे वाटेना. खाली सगळे उठल्याची चाहूल येत होती. जिप्सीही लवकर उठला होता. दहा मिनिटातच समोरच्या डोंगराआडुन सुर्य डोकावला.

14-2xgtg.jpg
हा आहे टेरेसमधुन अंथरुनावर पडल्या पडल्या दिसणारा सुर्योदय. (फोटो व्यवस्थित आला नाही. (फोटो: जिप्सी)

मग मात्र अंग झाडुन उठलो. खाली आलो तर पराग व निरु चक्क मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. कमाल झाली या लोकांची. बऱ्याच जनांच्या अंघोळी उरकल्या होत्या. जे राहीले होते ते करणारच नव्हते. मग घाईत बाथरुममधे घुसलो. माझे नशिबच असे आहे की कुठेही गेलो तरी गरम पाण्याची अंघोळ काही नशिबात नसते. सगळ्यांच्या अगोदर गेलो तर पाणी कितीही गरम असले तरी माझ्या वाट्याला सुरवातीचे पाईपमधले दोन बादल्या थंड पाणी येते आणि सगळ्यांच्या नंतर गेलो तर गरम पाणी संपलेले असते म्हणून थंड पाणी वाट्याला येते. आजही तेच. शेवटी थंड पाण्याने अंघोळ करुन बाहेर आलो. सगळ्यांची चहाची गडबड सुरु होती. निरुदा, जिप्सी आणि पराग सगळे गाद्या व बाकीचे सामान बसमधे चढवत होते. मोनालीपच्या नवऱ्याला सकाळीच मुंबईला निघायचे असल्याने त्यांना मेव्हण्याच्या बाईकवर एसटी स्टँडवर पाठऊन दिले. बच्चेकंपनी बाहेर सनीबरोबर (घरचा कुत्रा) खेळत होते. तोही चांगलाच रमला होता मुलांमधे. माझी कार रात्री भैय्या घेऊन गेल्यामुळे मलाही बसमधेच जायचे होते. कपडे वगैरे करुन चहा घेतला. तेवढ्यात आमच्या सासुबाईंनी गावठी लसणाच्या गड्ड्या हॉलमधे आणुन ठेवल्या. प्रत्येकाला एक एक गड्डी दिली

गार्लीक.jpg
हा शालीच्या म्हणजे बायकोच्या शेतातला 'गावठी लसुन' (फोटो: शाली)

बाजारात मिळणारा लसुण आणि गावठी लसुण यावर चर्चा सुरु व्हायच्या बेतात होती पण सगळ्यांना घाईत बाहेर काढले. कारण आज आमच्याकडे फक्त दुपारपर्यंतच वेळ होता. माझे सासु सासरे बाहेर येवून हात हलवत होते, त्यांचा निरोप घेऊन बस गावाकडे वळवली. एवढ्यात मानुषीताईंचा फोन आला. ते नगरवरुन सकाळी निघाले होते आणि वेळेवर भैय्याच्या हॉटेलवर पोहचले होते. त्यांना तेथेच थांबायला सांगीतले. रात्री छान झोप झाल्याने सगळ्यांच्याच बॅटरीज फुल चार्ज झाल्या होत्या. काहीतरी विषय हवा म्हणून मग कोदंडपाणी यावरुन चर्चा सुरु झाली. रामाला का कोदंडपाणी म्हणतात? मग पीनाकपाणी म्हणजे कोण? वगैरे चर्चा फिरु लागली. दहाच मिनिटात आम्ही कपर्दिकेश्वरला येऊन पोहचलो. येथेच आमची यात्रा भरते. (ज्यावर माझा छोटासा लेख लेख आहे.) मग पुन्हा सगळे उतरले. दर्शन घेतले. तेथेच तुकाराम महाराजांच्या गुरुंची समाधी आहे. तिचेही दर्शन घेतले. परिसरात निरव शांतता होती. सकाळचे वातावरण व सुंदर परिसर यामुळे येथे आमचा तासभर छान गेला. येथेही साधनाताईने कसल्या कसल्या बिया गोळा केल्या.

15-1xgtg.jpg
हे आमचे कपर्दिकेश्वराचे मंदिर. येथे श्रावण महिन्यात दर सोमवारी यात्रा भरते. (फोटो: शाली)

15-2xgtg.jpg
हे शालीचे घर, म्हणजे माझी सासुरवाडी. आणि मंदिराच्या आतला भाग, गाभारा.

18-1xgtg.jpeg
ही आहे तुकाराम महाराजांचे सद्गुरु 'बाबाजी चैत्यन्य' यांची समाधी. आम्ही गेलो तेंव्हा फुलांनी छान पुजा झालेली होती. (फोटो: शाली)

18-2xgtg.jpg
समाधी परिसर-१ (फोटो: शाली)

16xgtg.jpeg
समाधी परिसर-२ (फोटो: शाली)

17xgtg.jpeg
समाधी परिसर-३ (फोटो: शाली)

भैय्याचे सारखे फोन येत होते “निघालात का? कोठवर आलात?” मग एकदाचे निघालो. रस्ता अतिशर सुंदर असल्याने पंधरा मिनिटातच भैय्याच्या ढाब्यावर बस पोहचली. मानुषीताईंना आणि त्यांच्या अहोंना जवळ जवळ तासभर आमची वाट पहात थांबावे लागले होते. रात्री मित्राकडे गेलेले पटवर्धन दांपत्यही येवून पोहचले होते. आम्हालाच उशीर झाला होता. मग पटापट पोहे खावून निघालो. प्रथम भैय्याने आणि मी लावलेली फळझाडे आणि आमचा देशी गाईंचा गोठा पाहीला आणि मग मोर्चा शेताकडे वळवला.

20-2xgtg.JPG
पुर्वी जास्त गायी होत्या पण कामाच्या व्यापामुळे आता फक्त एक गिर आणि एक खिल्लार गाय ठेवली आहे. (फोटो: शाली)

सकाळचे दहा वाजले असावेत. हवेतला गारवा गायब झाला होता. बस सरळ शेतातच नेऊन उभी केली. खरं तर येथे चुल मांडून स्वयपाक करायचा प्लॅन होता पण तो ऐनवेळी सगळ्यांनी नाकारल्यामुळे आता नक्की असे काही नियोजन नव्हते. समोर शेवग्याची, डाळीबांची बाग होती. पलीकडे पपईचे रान होते. विहिरीवर पुर्ण जाळी बसवल्याने मुलांची काही चिंता नव्हती. त्यामुळे सगळ्यांना “आपलाच मळा आहे, जसे भटकायचे तसे भटका” असे सांगीतले आणि मी निवांत झाडाच्या सावलीला बसलो. सगळी मुले शेवगा आणि फुललेली डाळीबांची बाग पाहुन खुष झाली होती. भैय्याची गार्गीही त्यांच्यात मजेत मिसळली. त्यांच्याकडे आता खास लक्ष द्यायची गरज नव्हती. मग पुन्हा एकदा मानुषीताई, मानसीताई आणि इतर यांच्या अगदी गळाभेटी सुरु झाल्या. मायबोलीवर लेखातुन, प्रतिसादातुन एकमेकांना भेटणारी ही मानसे प्रत्यक्षात एकमेकांना भेटताना अगदी आनंदाने भरुन आली होती. मानुषीताईंनी त्यांचा ‘फेमस’ ड्रायफ्रुट फज आणला होता सगळ्यांसाठी. त्याची चव चाखत डाळींबाच्या बागेत तास दिड तास कसा गेला ते समजलेच नाही. मग शेवग्याच्या शेतात सगळ्यांनी शोधुन शोधुन भरपुर शेंगा तोंडल्या. थोड्या वेळाने सगळे पपईच्या शेतात पोहचले आणि लहान मुले अगदी हरखुन गेली. अगदी सहज हाताशी येणाऱ्या पपया पाहुन त्यांना आश्चर्य वाटले असावे.

21xgtg.jpeg
आमचे पपईचे शेत. (फोटो: जिप्सी)

22xgtg.jpeg
गटगसाठी पुढे ढकललेला पपईचा तोडा. (फोटो: जिप्सी)

20xgtg.jpeg
सगळ्यांना देण्यासाठी काढलेल्या पपया. पण प्रत्येकाने स्वतःला आवडेल तिच तोडली. (फोटो: शाली)

23xgtg.jpeg
शेताच्या बांधावर लावलेली तुर. (फोटो: जिप्सी)

सगळ्यांनी “आपलेच शेत आहे ना?” याची खात्री करुन घेतली आणि मग मनसोक्त पपया तोडल्या. भैय्याने सुरी मागवली होती पण ती यायचीही कुणी वाट पाहीली नाही. साधनाताईने बोटांनीच कशी अलगद पपई उघडता येते याचा शोध लावला आणि मग सगळ्यांची पपई खायची धांदल उडाली. तोवर सुरी येवून पोहचली होती. सुरवातीचा उत्साह आता बराच कमी झाल्यामुळे आणि तिन साडेतिन तास रानात भरपुर भटकल्यामुळे सगळे लिंबाच्या थंड सावलीत विसावले. निरुदांनी, उजुने आणि जागुताईने व्यवस्थीत पपई कापुन दिल्यावर सगळ्यांनी पुन्हा सावलीच्या गारव्याला बसुन पपई खाल्ली. मग झाडाखालीच इकडच्या तिकडच्या गप्पा मारत, एकमेकांची टिंगल, मस्करी करत बराच वेळ काढला. मुलांचा मात्र अजुनही दंगा सुरु होता. शेवग्याच्या शेंगांच्या तलवारी करुन युध्दही पेटले. कांचनच्या मुलाने तर अगदी धमाल उडवली होती. त्याने आवाक्यात असलेली पपई पाहुन तिला दोन्ही हात लावले आणि निमित्ताला टेकलेली ती मोठी पपई धप्पकन त्याच्या अंगावर पडली. पोरगं बावरलं. त्यात त्याला कुणीतरी झाडाखालुनच ओरडुन सांगीतले “तुला आता ओरडनार सगळे.” तो आणखीच गांगरला. पण क्षणभर विचार करुन त्याने चटकन आजुबाजुचा पाचोळा उचलुन झटकन ती पपई झाकून टाकली आणि मी त्या गावचाच नाही असा चेहरा करुन सगळ्या मुलांमधे मिसळला. हे पाहुन आमची मात्र चांगलीच करमणूक झाली. त्याला पाहुन मला सारखी पलकच्या वेदची आठवण येत होती.

ऋग्वेद.jpg
ऋग्वेदने पपईला हात लावला आणि कुणीतरी तोच क्षण अलगद कॅमेऱ्यात टिपला. (फोटो: जिप्सी)

एकुन सगळ्यांची धमाल चालली होती. पपया खावून झाल्यामुळे आता प्रत्येकाने घरच्यांसाठी नेण्यासाठी भरपुर पपया घेतल्या. शेवग्याच्या शेंगाही मनासारख्या घेतल्या आणि आम्ही बसकडे वळालो. तरीही एकटा दुकटा सारखा मागे बागेत रेंगाळत होताच. उन्हं आता चढली होती. मी प्रत्येकासाठी आमच्या भागातला इंद्रायणी तांदुळ पॅक करुन ठेवला होता. ते पॅकेट बायकोने प्रत्येकाच्या हाती सोपावले. कुणी कुणी आणलेल्या भेटी आम्हालाही दिल्या. मानुषीताईने फज करुन आणला होता, तो आम्ही खाल्ला होताच पण जाताना काजुकतली आणि छान फरसान दिले. कांचननेही गुळाच्या पोळ्या (शेंगापोळ्या) आणल्या होत्या त्या दिल्या. डॉक्टरांनी खास औरंगाबादहुन शाल आणली होती ती दिली. उजूने आणि कांचने सुरेख पितळी दिवे आणले होते ते दिले. साधनाताईने मस्त मोबाईल पाऊच दिले, जागुताईने सुरेख आणि उपयोगी ‘सारी’ कव्हर आणि बॅग दिली. निरुदांनी अत्यंत उत्तम दर्जाची संत्राबर्फी आणली होती, मोनालीपने पौष्टीक ढोकळा पिठ जे तिचे स्वतःचे प्रॉडक्ट आहे ते आणले होते. कुणी कुणी प्रेमाने काय काय आणले होते. माझीही अल्पशी भेट सगळ्यांनी प्रेमाने स्विकारली होती. जे आले नाही त्या सगळ्यांची खुपदा आठवण काढुन झाली होती. आता निरोपाचा सोहळा उरकत आला होता.

25.jpg
डाळींब, शेवगा आणि पपई (फोटो: जिप्सी, शाली)

26xgtg.jpeg
कांचनची कलाकुसर. (फोटो: कांचन कुलकर्णी)

19-1xgtg.jpeg
आमच्या शेताचा समोरील भाग. हे शेत मी आणि भैय्या (कोदंडपाणी) मिळून करतो. (फोटो: कोदंडपाणी)

दुपार झाली होती. शनिवार रविवारचे अत्यंत महत्वाचे काम सोडून मी गटगला आल्यामुळे माझे लक्ष आता पुण्याकडे लागले होते हे तर खरेच, पण खरं तर “आता हे सगळे निघणार” या विचारांनीच मी जास्त अस्वस्थ झालो होतो. बायकोला बाजुला घेवून मी विचारलेही होते की मी जातो पुढे, यांना माझ्या मागे जायला सांग म्हणजे मला त्रास नाही होणार. पण “ते बरं दिसेल का?” म्हणत बायकोने मला थांबवून ठेवले होते. एखादा मित्र पुण्याला आला आणि सकाळी गेला तर मला दुसरा दिवस करमत नाही. येथे तर इतकी माणसे मुले दोन दिवस माझ्याबरोबर फिरत होती. आणि आता त्यांना निरोप द्यायचा होता. मी राहुन राहुन हा विचार करत होतो की कोण कुठली ही माणसे, आणि कुठे इतक्या जिव्हाळ्याने, प्रेमाने येवून भेटतात काय, सगळ्या गैरसोयींकडे दुर्लक्ष करुन माझ्या घरी आनंदाने रहातात काय! सगळेच अगम्य. ‘पुर्वजन्मीचे ऋणानुबंध’ मी मानत नसलो तरी अशा वेळी विश्वास ठेवावा वाटतो.

मानुषीताईंनी त्यांची कार आणली होती. त्यांना निरोप दिला. मानसीताईंनीही त्यांची कार आणली होती, त्यांचाही निरोप घेतला.
मग मी सगळ्यांना बळेच बसमधे बसवले. कुणाकुणाला ड्रॅगनफ्रुटचे फुटवे पाहीजे होते त्याचे एक लहानसे बोचकेच बसमधे टाकले. ड्रायव्हरला खुण केली आणि तो निघाला. माझ्या समोरुन बस शेतातली धुळ उडवत निघुन गेली. “कारे इतका लळा लावूनी नंतर मग ही गाडी सुटते?” ही कविता लिहिताना संदिपला आतुन किती तुटले असेल हे त्या दिवशी पुन्हा कळाले.

गटग नंतर काही दिवसांनी ग्रुपवर गप्पा मारताना साधनाताई सहज मजेने म्हणाली की “त्या दिवशी अप्पाने आम्हाला फुटवले तेथुन” आणि मिही त्यावर काहीतरी मिश्किल उत्तर दिले होते. पण तिला काय सांगू की “हो खरच त्या दिवशी मी फुटवले होते सगळ्यांना. रेंगाळत निरोप घेतला असता तर कदाचीत मी लहान मुलासारखा सगळ्यांपुढे रडलो देखील असतो.”
______________________________________

(गटगला आलेल्या सर्व सदस्यांचे मी येथे वृत्तांताच आभार मानतो. आपण आलात, आपले घर असल्यासारखे वावरलात, राहीलात, दोन दिवस अत्यंत गोमटे केले, माझ्याकडुन अनेक गोष्टी राहील्या त्यांचा उल्लेखही कुणी केला नाही या साठी आणि दोन दिवसात दोनशे वर्ष पुरतील इतक्या सुरेख आठवणी दिल्याबद्दल सगळ्यांचा मी ऋणी आहे. ऋणी रहायलाच आवडेल. जे आले नाही त्या सर्वांचीही खुप कमी जाणवली. मी येथेच पुढच्या गटगचे माझ्या सगळ्या निसर्गायण ग्रुपला आणि मायबोलीवरील मित्र-मैत्रीणींना आताच अक्षद देतो. आमंत्रण देतो. पुढच्या गटगला तक्रारीला वाव देणार नाही याचीही खात्री देतो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे कोदंडपाणीशिवाय हे गटग होऊ शकले नसते. त्याचेही खुप धन्यवाद! हे ‘वृत्तांत’ प्रकरण जरा जास्तच लांबले तेंव्हा आता रजा घेतो. लोभ आहेच फक्त तो वृध्दींगत होत राहूद्या येवढीच इच्छा!
धन्यवाद!)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पहिला...
छान लिहिलाय वृतांत..
जमल्यास काही फोटो अपलोड करीन..

निसर्ग आणि मित्र यांचा एकत्रित सहवास म्हणजे अपरंपार सुख. नुसते वाचूनही मजा आली.
(तुमचे गाव ओतूर आहे हे माहित नव्हते.)

अरे किती धमाल.. आता तर मलाच आतुरता लागलीय तुमच्या पुढच्या गटग ची ( कारण वृत्तांत वाचता येईल म्हणून ☺️)

मस्त लिहलंय! आणि भारी फोटो.

> मधेच कुणीतरी गव्हाची ओंबी पाहुन हे काय आहे ? असं विचारुन मला धक्का दिला > कोणय ते माझं भावंड? मीदेखील हाच प्रश्न भाजीवाल्याला विचारला होता Wink त्याने ते पूजेसाठी असतं सांगितलं आणि तिथेच थांबलेल्या एका बाईने ती गव्हाची ओंबी आहे म्हणलं Lol

छानच!
फोटोपण सगळे सुंदर!
मासवडी अशी दिसते? मग मी नारायणगावला काय खाल्लं होतं? Lol

अहाहा, किती सुंदर वर्णन, इतक्या हळुवार भावना व्यक्त करायला तितकेच प्रभावी शब्द कसे सापडले तुम्हाला, वाह!!!

फारच सुंदर वर्णन. जिव्हाळ्याने ओत:प्रोत भरलेला वृत्तान्त. आपुलकीचा झरा सगळीकडून झुळझुळतोय. त्यात मधून मधून नर्म विनोदाचा शिडकावा. नुसते वर्णन वाचूनच आमच्यासारखे दूरस्थ या प्रेमागत्यवर्षावाने चिंब भिजले. मग उपस्थितांचे काय झाले असेल!
एक नितांतसुंदर आणि अत्यंत वाचनीय अनुभव दिल्याबद्दल आभार.
ता.क. फोटोही अप्रतिम आहेत. संपूर्ण वातावरण डोळ्यांसमोर उभे राहिले.

ही तो सुखाची मांडणी....
शीर्षकच सारे सांगते...
मलाही गाव आठवले....
प्र. चित्र. सुरेखच...

फारच सुंदर वर्णन. जिव्हाळ्याने ओत:प्रोत भरलेले >>>+१

निसर्ग आणि मित्र यांचा एकत्रित सहवास म्हणजे अपरंपार सुख. नुसते वाचूनही मजा आली. >> +१

ही खरी श्रीमंती, हे खरं जीवन जगणं !!!
ब्राव्हो, कीप इट अप !!!

वा वा! मस्त फोटो! मजा केलेली दिसते. Happy
वृतांत लिहून तुमच्या मजेत आम्हालाही सामील करून घेतल्याबद्दल धन्यवाद. Happy

छान लिहिलंय

कुंदा, इन्द्रयणी भात अन हिरवीगार शेती म्हणजे तुमचे ओतूर बेळगाव जवळचे का???? ज्याला आम्ही उत्तुर बोलतो☺️

भारीच !!! एकदम सुरेख फोटो आणि सविस्तर वृत्तांत.
अगदी मनापासुन केलय सगळ तुम्ही.

तुम्ही इतक्या वेळा आग्रहाने बोलावून पण यायला जमलं नाही याची कायम रूखरूख राहीलं.

निरुदा पहिल्याच प्रतिसादासाठी खुप धन्यवाद! तुमच्या प्रतिसादाची वाट पहात असतो.

विठ्ठल, हर्पेन प्रतिसादासाठी खुप आभार!

च्रप्स धन्यवाद! पुढच्या गटगला आपण आलात तर आनंद वाटेल. वृत्तांत वाचण्यापेक्षा अनुभवण्यात गम्मत आहे.

कुरुडी धन्यवाद. अॅमी, खरं सांगता की काय? कमाल आहे. असो. खुप धन्यवाद!

वावे, मासवडीसाठी मी तुम्हाला आमत्रण दिले होते पण यावेळी तुम्हाला बोलवायचे खरच सुचले नाही. तुम्ही खाल्ली ती मासवडीच होती. वरील फोटोत दिसणारी वडी वाढताना आळुवडीसारखी कापुन वाढतात. त्रिकोणी आकाराची दिसते. आम्ही दुपारी मासवडी केली आणि संध्याकाळी खायला घेतली. त्यामुळे चव वाढते. पण थंडीमुळे मासवडी व्यवस्थित कापली जाईना. त्यामुळे तिचे जरा तुकडे झाले बाकी काही नाही. नारायणगावला खाल्ली असेल तर तुम्ही मासवडीच खाल्ली हे नक्की. पण घरची ती शेवटी घरची. बाहेर कुणी घरी दळलेले बेसन, गावठी लसुन वगैरे वापरत नाही ज्यामुळे खुप फरक पडतो.

वर्षुताई कौतुक केल्याबद्दल खुप धन्यवाद! तुमची सगळ्यांनीच खुप आठवण काढली.

हिरा खुपच सुंदर प्रतिसाद दिलात. खुप आभारी आहे!

देवकी, लंपन धन्यवाद!

जागुताई प्रतिसादाची आवश्यकता नाही. तुम्ही सगळे मनापासुन जेवलात तेंव्हाच मला कौतुकाची पावती मिळाली. कोकणातली पोपटी तू अगदी जुन्नर ओतुरपर्यंत पोहचवलीस. त्यासाठी खरच धन्यवाद!

दत्तात्रय साळुंके, असुफ, मैत्रेयी तुमचे खुप आभार!

धन्यवाद स्वातीताई!

VB हे माळशेज जवळचे, जुन्नरमधले ओतुर आहे. बेळगावमधे इंद्रायणी मिळतो हे ऐकुन आश्चर्य वाटले. खुप धन्यवाद!

आबा तुला जितका आग्रह मी केला तितका कुणालाच केला नाही. तु यायलाच हवे होते. माझी फार इच्छा होती तशी. असो. प्रतिसादासाठी खुप धन्यवाद!

दणक्यात गटग झालंय की, वृत्तांत एकदम झकास..
काश ववि पण असाच दणक्यात साजरा होत राहिला असता!!!

तिथे नसुनही अगदी सुरवातीपासून ते शेवटपर्यंत हा गटग आम्ही अनुभवला. वृत्तांतही मस्त!

तिथे नसुनही अगदी सुरवातीपासून ते शेवटपर्यंत हा गटग आम्ही अनुभवला. वृत्तांतही मस्त! >>>>>>> +१ ह्याची देही ह्याची डोळा घ्यायलाही आवडेल Happy

कुठले गाव ते वगौरे लिहा ना.
आणि लहान मुलं इतकं तिखट जेवलीत?( मला आपली उगीच फुकट्टची चिंता).. Happy
आणि कोंबडी एकच होती , ती कोणी फस्त केली?

बाकी, मस्तच मजा केलेली दिसतेय. ती पपई एकदमच 

Pages