कढाई पनीर

Submitted by Adm on 7 January, 2019 - 01:22
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

- ३०० ग्रॅम पनीर
- १ मोठी सिमला मिरची
- १ मोठा कांदा
- २ मध्यम टमॅटो
- १ मोठा चमचा आलं लसूण पेस्ट
- १ मोठा चमचा धने
- ३ किंवा ४ लाल मिरच्या (आकाराप्रमाणे)
- १ चमचा गरम मसाला
- २ चमचे तेल
- कसुरी मेथी
- चवीला मिठ

क्रमवार पाककृती: 

ही किती ऑथेंटीक रेसिपी वगैरे माहित नाही. अचानक उत्साह आला म्हणून इंटरनेटवर २-४ लिंका बघून आणि स्वतःचे काही बदल करून (आणि घरात असलेलं सामान वापरून) केलेली ही भाजी. चवीला चांगली लागली आणि इथे कढाई पनीरची रेसिपी सापडली नाही म्हणून लिहून ठेवतो आहे.
१. पनीरचे लहान चौकोनी तुकडे करून घेतले. इथल्या देशी दुकानात मिळाणारं पनीर नीट पॅक केलेलं होतं, त्यामुळे ते पुन्हा धुतलं नाही. हवं असेल तर धुवुन कोरडं करून घेऊ शकता.
२. सिमला मिरची उभी चिरून घेतली. कांदा आणि टमॅटो बारिक चिरून घेतले.
३. धने आणि लाल मिरच्या एकत्र करून मिक्सरवर कोरडं दळून घेतलं. ह्याला 'कढाई मसाला' म्हणायचं म्हणे.
४. कढईत दोन चमचे तेल घालून त्यावर कांदा परतून घेतला. (पारदर्शक होईपर्यंत).
५. नंतर त्यात आलं लसूण पेस्ट घालून कच्चा वास जाई पर्यंत परतून घेतलं.
६. मग टमॅटो घालून दोन मिनिटे परतलं आणि मग त्यावर कोरडा कढाई मसाला घातला.
७. हे सगळं मिश्रण गोळा होऊन त्यातून तेल सुटेपर्यंत परतलं.
८. त्यात सिमला मिरची घालून दोन मिनिटे परतलं.
९. त्यात अंदाजे पाणी घालून सिमला मिरची अर्धवट शिजू दिली.
१०. नंतर त्यात पनीरचे तुकडे घालून वरून गरम मसाला घातला.
११. चवीप्रमाणे मिठ घालून नीट ढवळून घेतलं आणि १० मिनीटे शिजू दिलं.
१२. वरून कसुरी मेथी चुरून घालून गॅस बंद केला.
१३. खायला घेताना वरून लिंबू पिळून घेतलं.

वाढणी/प्रमाण: 
२.५ जणांना भात आणि पोळी/पराठ्या बरोबर पुरलं.
अधिक टिपा: 

१. इंटरनेटवर एका रेसिपीत उभ्या चिरा पाडून हिरव्या मिरच्या आणि आल्याचे उभे काप घालायला सांगितले होते. मी दोन्ही घातलं नाही. तसच क्रिमही सांगितलं होतं. ते ही मी घातलं नाही.
२. सुरूवातीला पाणी थोडं जास्त घातलं की भाजी शिजेपर्यंत ते आटून अंगाबरोबर रस रहातो. अश्या रसामुळे पोळी आणि दोन्हींबरोबर भाजी खाऊ शकतो.
३. एकंदरीत मसाले बघता गरम मसाला घातला नसता तरी चाललं असतं असं वाटलं. पुढच्या वेळी तसं करून बघेन.
४. चमचाभर साखर घालायचा मोह आवरला!

माहितीचा स्रोत: 
इंटरनेटवरच्या रेसिपी बघून केलेला स्वतःचा प्रयोग
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान वाटते आहे पाकृ..
पढाई कनीर म्हणातो संक त्याच्या व्हीडीओमध्ये Proud
पण फोटु टाका बुआ! त्याशिवाय तोंपासु होत नाही

छान आहे रेसेपी. फोटो नसला तरी चालेल, कारण कृती करायला खूप सोपी व पटकन होणारी वाटली. पण नेटवरचा प्रताधिकार मुक्त फोटो टाका हवे तर.

छान आहे रेसिपी, सोपी आणि सुटसुटीत.

फक्त माझा आगाऊपणा असा असेल की - अधिक टीपा मध्ये जे नको सांगितलं ते करणार ( उदा. हिरव्या मिरच्या आणि क्रीम आवडेल, गरम मसाला हवाच, टोमॅटोचा आंबटपणा किल करण्यासाठी चिमूटभर साखर घालेन)

आणि पाणी जास्त घालायचा सल्ला आहे, पण वाफेवर शिजवलेलं टोमॅटोची ग्रेव्ही असलेलं पनीर जास्त आवडेल)

छान रेसिपी आहे. ही कितपत स्पायसी होते?

गुगलवर कढई पनीरच्या अक्षरशः हजारो रेसिपी आहेत. मी पण तो कोरडा मसालाबिसाला करून ट्राय केलं पण ठीकच लागत होती. नवऱ्याला आवडली, त्याने संपवली ,मला यापेक्षा क्रीम काजू वगैरे वाली बटर पनीर जास्त आवडेल. मी अर्थात मिरच्या भीतभीतच घातल्या होत्या.

छान वाटते आहे, ट्राय करेन.
त्याच त्या क्रीम + काजूपेस्ट चवीचा कंटाळा येतो तेव्हा करायला चांगली आहे. Happy

धन्यवाद Happy भुक लागलेली असल्याने फोटो काढायचा राहीला!

ही कितपत स्पायसी होते? >>>> लाल मिरच्या किती तिखट आहे त्यानुसार तिखटपणा येतो. शिवाय धने, आलं लसूण पेस्ट आणि गरम मसाल असल्याने मसालेदारही होते. मी मिक्सर उघडल्यावरच खाट आला म्हणून हिरव्या मिरच्या घातल्या नाहीत.

टोमॅटोचा आंबटपणा किल करण्यासाठी चिमूटभर साखर घालेन >>>> बाकी भाज्यांपेक्षा टमेटोंचं प्रमाण कमी असल्याने खूप आंबटपणा रहात नाही. पण चव बघून साखर घालू शकता.

सोपी, सुटसुटीत रेसेपी.
माझी अ‍ॅडीशनः पनीर तुकडे करून त्याला थोडं लिंबू, मीठ आणि थोड काश्मिरी/ब्यडगीचं तिखट लावून १०-१५ मिनेटे ठेवायचं. मग शॅलो फ्राय करून घ्यायचं. लिंबू मीठ लावल्यानं पनीर मऊ होतं (प्रोटीन्स सुटे व्हायला लागतात?). तळून्/भाजून घेतल्यानं कुरकुरीत होतं. गोडसरपणा येण्यासाठी चमचाभर केचप घालायचं!

कढ़ाई मसाला मस्त...
पनीर गॅस वर जास्त वेळ शिजवले तर कड़क होतं..(स्वानुभव)..

पनीरचे क्रीमी प्रकार खाऊन कंटाळा आला आहे तेव्हा नक्की करेन किंवा संबंधितांना रेसिपी पाठवेन.

शनिवारी केली होती ही भाजी. मस्त झाली. मिळून आलेली ग्रेव्ही जास्त आवडते त्यामुळे पुढल्यावेळी कांदा-टोमॅटो परतून घेतले की त्याची प्युरे करणार.

छान!

इकडे तुझी रेसिपी वाचून मीही इकडे तिकडे बघितलं. धणे आणि लाल मिरच्या आधी कोरड्या भाजून मग एकत्र वाटलं मसाल्याकरता. तसंच दोन अखंड हिरव्या मिरच्या चीरा देऊन ग्रेव्ही परतताना घातल्या आणि काही टोमॅटो ब्लांच करून प्युरे करून घेतले.

ह्यामुळे चवीत किती आणि कसा फरक पडला हे कळायला सध्या तरी वाव नाही Biggrin
रेसिपी करता थँक्स.

ही पण छान वाटतीय रेसिपी. मी साधारण अशीच करते. एक अ‍ॅडिशन म्हणजे थोडा कढिपत्ता चिरुन घालते यात. मस्त फ्लेवर येतो रेस्टॉरन्ट सारखा.

दुसऱ्या धाग्यावर प्रश्न विचारला होता की नॉनव्हेज मसाले कसे संपवू- तर त्यानुसार रेडिमेड कढई चिकन मसाला वापरून ही रेसिपी केली. छान आणि झटपट झाली.
काही बदल केले जसं ग्रेव्ही मिक्सरमधून काढून घेतली. वरून लिंबू पिळून घेतलं नाही (कारण जे रोमा टोमॅटो वापरले ते मेले आंबट होते.)

मी पण अगदी अशीच करते, सोपी रेसिपी.
फक्त सिमला मिरची नाही घालत आवडत नाही म्हणून बाकी रेसिपी सेम.
IMG_20200828_090138.JPG

मी पण अगदी अशीच करते, सोपी रेसिपी.
फक्त सिमला मिरची नाही घालत आवडत नाही म्हणून बाकी रेसिपी सेम.
IMG_20200828_090138.JPG